शनिवार, १६ मार्च, २०१९

स्थितप्रज्ञ समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे

Prof. Dr. Jagan Karadeशिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे यांच्या शेड्युल्ड कास्ट एलिट्स या संशोधन ग्रंथाचे काल (शुक्रवार, दि. १५ मार्च २०१९) सायंकाळी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात देशातल्या नामवंत समाजशास्त्रज्ञांच्या उपस्थितीत अतिशय शानदार प्रकाशन झाले. कोल्हापुरातल्या फुले-शाहू-आंबेडकर फोरमच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. आर. इंदिरा (अध्यक्ष, भारतीय समाजशास्त्र सोसायटी, नवी दिल्ली), ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. उत्तमराव भोईटे (माजी अध्यक्ष, भारतीय समाजशास्त्र सोसायटी, माजी कुलगुरू, भारती विद्यापीठ, पुणे व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), प्रा. आर.एस. देशपांडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बेंगलोर), प्रा. एस. गुरूसामी (गांधीग्राम विद्यापीठ, दिंडीगुल, तमिळनाडू), प्रा. विनोद चंद्रा (श्री जेएनपीजी महाविद्यालय, लखनौ, उत्तर प्रदेश), प्रा. मनोजकुमार टिओटिया (सेंटर फॉर रिसर्च इन रुरल एन्ड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, चंदीगढ), प्रा. राजेश खरात (दक्षिण आशिया अभ्यास केंद्र, जे.एन.यु., नवी दिल्ली) आणि प्राचार्य डॉ. हरिष भालेराव (अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर फोरम, कोल्हापूर) अशी दिग्गजांची मांदियाळीच विचारमंचावर अवतरली होती. आणि या कार्यक्रमात प्रत्येकाने मांडलेले विचार म्हणजे जणू मेजवानीच होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला लाभली, ही बाब महत्त्वाची आहेच; पण शेड्यूल्ड कास्ट इलाइट्स या ग्रंथासाठी मुंबई विभागाचा सर्वेक्षक म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची संधी डॉ. कराडे यांनी मला दिली, ही बाब अधिक अभिमानाची आहे. या निमित्ताने डॉ. कराडे यांच्या संशोधनाच्या बैठकीचे, मांडणीचे मला अधिक जवळून निरीक्षण करता आले. त्यांचा हा अकरावा ग्रंथ आहे.
डॉ. जगन कराडे यांनी ज्या पद्धतीने संशोधन क्षेत्रातील आपली आगेकूच चालविली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. उपयोजित शास्त्रांमधील संशोधनाला प्रोत्साहन आणि भरीव आर्थिक मदत करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था आहेत. मात्र, सामाजिक शास्त्रे, कला, ललितकला, भाषा आदी उर्वरित विद्याशाखांच्या बाबतीत मात्र त्यांची संख्या ही अत्यंत त्रोटक म्हणावी, अशी आहे. या परिस्थितीमध्ये संधी उपलब्ध नाही, असे म्हणून डॉ. कराडे यांना हातावर हात ठेवून बसता आले असते. पण, त्यांचा मूळचा पिंडच अत्यंत धडपड्या स्वरुपाचा आहे. हा माणूस जेव्हाही कधी भेटतो, तेव्हा उत्साहाने ओसंडून वाहातच असतो. कधीही कोणाविरुद्ध अगर परिस्थितीविषयी तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. उलट, अत्यंत उपक्रमशील आणि कल्पक असा त्यांचा स्वभाव आहे. याची प्रचिती सातत्याने येत असते. अनेक विद्यार्थीभिमुख उपक्रम, विशेषतः संशोधनाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आयसीएसएसआरच्या सहकार्याने कॅम्पसवर १५-१५ दिवसांची संशोधन शिबीरे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत. आणि त्यात मार्गदर्शन करण्यासाठी देशातील दिग्गजांना आमंत्रित केले होते. किंबहुना, या देशविदेशांतील तज्ज्ञांशी विद्यार्थ्यांचा संवाद व्हावा, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, ही तळमळ डॉ. कराडे यांना असते. त्यातून अनेक दिग्गज अभ्यासक, तज्ज्ञ, संशोधक यांचा वावर विद्यापीठाच्या परिसरात वाढला आहे. त्यामुळे सामाजिक विज्ञानातील अत्यंत अद्यावत ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यास मदत होते.
डॉ. कराडे यांचा पिंडच मुळी संशोधकाचा आहे. केवळ संशोधक नव्हे, तर अत्यंत गांभीर्य, सजगता आणि स्थितप्रज्ञता ही त्यांच्या संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय सामाजिक समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने वेध घेऊन त्याची सखोल व चिकित्सक मांडणी करणाऱ्या देशातील महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांपैकी ते एक आहेत. आरक्षण- धोरण आणि वास्तव, राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर,जागतिकीकरण- भारतासमोरील आव्हाने,सीमांतिक समूह- स्वरुप आणि समस्या,धम्मक्रांतीची फलश्रुती या मराठी संशोधन ग्रंथांबरोबरचऑक्युपेशनल मोबिलीटी अमंग शेड्युल्ड कास्ट्स, डेव्हलपमेंट ऑफ शेड्युल्ड कास्ट्स एन्ड शेड्युल्ड ट्राइब्ज इन इंडिया,कास्ट-बेस्ड एक्सक्लुजन आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन अशी संशोधनात्मक ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे.डेव्हलपमेंट ऑफ शेड्युल्ड कास्ट्स एन्ड शेड्युल्ड ट्राइब्ज इन इंडियाहा त्यांचा ग्रंथ तर केंब्रिज स्कॉलर्स पब्लिशिंगतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे, एवढे सांगितले तरी या ग्रंथाचे जागतिक महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकेल.
शेड्युल्ड कास्ट एलिट्स हा डॉ. जगन कराडे यांचा संशोधन ग्रंथ नवी दिल्ली येथील रावत पब्लिकेशन्सने प्रकाशित केला आहे. सरकारी आरक्षणाच्या धोरणामुळे देशातील अनुसूचित जातींना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली. त्याच्या योगे त्यांना उच्च, प्रतिष्ठित आणि योग्य पदांवर सरकारी आणि बिगर सरकारी क्षेत्रांत नोकरी, रोजगाराच्या संधी मिळाल्या. बौद्धिक, प्रशासकीय, व्यावसायिक आणि राजकीय कुटुंबांचा समावेश असलेल्या या पिढ्या शहरी भागात स्थलांतरित झाल्या आहेत आणि उच्च जातीच्या समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परीघात त्यांनी स्वतःचे महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. अशा उच्च वर्तुळात राहणाऱ्या अनुसूचित जातींनी आपली सामाजिक-आर्थिक स्थिती उंचावत स्वत:ला उच्च आणि मध्यम सामाजिक वर्गांमध्ये नेऊन ठेवले आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकजिनसीपणाच्या दृष्टीने हा बदल खूप महत्वाचा आहे. वैयक्तिक तसेच सामाजिक स्तरावरही सामाजिक-सांस्कृतिक बदल ते स्वीकारत आहेत आणि पूर्वीच्या तुलनेत त्यांची संवाद साधनेही बदलली आहेत.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील शहरी केंद्रांचा प्रस्तुत संशोधनादरम्यान डॉ. कराडे यांनी अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये अनुसूचित जातीप्रेमींची वृत्ती आणि उच्च जाती व इतर अनुसूचित जातींसमवेत त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परस्परसंवादांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या उच्चशिक्षित अनुसूचित जातींनी आपल्या नातेवाईकांपासून स्वतःला वेगळे केले आहे, जे अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत, परिणामी, त्यांच्यातील सामाजिक मतभेदही गतीने वाढत आहेत. अशा अनेक बाबींचा ऊहापोह या समाजशास्त्रीय संशोधनात करण्यात आला आहे. समकालीन समाजशास्त्रीय संशोधनाच्या अनुषंगाने ऑक्युपेशनल मोबिलिटी अमंग शेड्युल्ड कास्ट्स या ग्रंथानंतरचा हा एक महत्त्वाचा ग्रंथ डॉ. कराडे यांनी सिद्ध केला आहे.
डॉ. कराडे यांच्या या संशोधन प्रवासाकडे एक नजर टाकली तरी आपल्या लक्षात येईल की, केवळ इतिहासात रमणारा हा संशोधक नाही. इतिहासाचे वर्तमानावर होणारे, होत असलेले बरेवाईट परिणाम अत्यंत तटस्थ आणि त्रयस्थ भूमिकेतून अभ्यासून त्यातून समकालीन परिस्थितीविषयी भाष्य करणारा हा एक महत्त्वाचा संशोधक आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास वर्तमानाच्या भिंगातून इतिहासाचे परीक्षण करून समकालीन वास्तवाची तरीही भविष्यवेधी मांडणी हे कराडे यांचे संशोधकीय वैशिष्ट्य मला जाणवते. त्यापुढे जाऊन समाजाचा, समाजातल्या प्रत्येक घटकाला विशेषतः स्वतःला एलिट म्हणविणाऱ्या घटकाला सुद्धा अंतर्मुख करून विचार करायला लावणारे त्यांचे प्रत्येक लेखन आहे. आता तर त्यांनी शेड्युल्ड कास्टमधील एलाइट्सच्याच वर्तनाविषयी साक्षेपी संशोधन केले आहे. खरे तर, त्यांच्या या ग्रंथाचा केवळ अभिजनांनी अगर मागासांतील ब्राह्मणांनीच नव्हे, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा. त्यातील निष्कर्ष हे केवळ मागासवर्गीयांपुरतेच मर्यादित राहणारे नाहीत. डॉ. कराडे यांची संशोधनाची बैठक पक्की असल्यामुळे त्यांनी विषयवस्तूला अनुलक्षूनच निष्कर्ष काढलेले आहेत. तथापि, प्रत्येक स्वहितसाधू व्यक्तीला ते लागू होतात. प्रत्येक समाजातल्या प्रगती साधून मोकळ्या झालेल्या आणि मागील समाजाला वाऱ्यावर सोडणाऱ्या व्यक्तींना ते लागू होतात, इतकी या संशोधनाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक समाजघटकाने या संशोधनाची अत्यंत जागरुकतेने दखल घेण्याची गरज आहे. इतके या संशोधनाचे महत्त्व मोठे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा