मंगळवार, २६ मार्च, २०१९

भगतसिंग- भाषेचा चिकित्सक अभ्यासकशहीद दिनानिमित्त नुकतेच आपण भगतसिंग-राजगुरू-सुखदेव या त्रयींच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाचे, आत्माहुतीचे स्मरण केले. पण, त्यापलिकडे या व्यक्तीमत्त्वांच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्याकडे आपला कल नसतो. या ऐतिहासिक घटनेमधील नाट्यातील प्रेरणेमुळे अनेक चित्रकृती त्यावर निर्माण झाल्या. मात्र, आपला कल त्यांचे एक तर लार्जर दॅन लाइफ उदात्तीकरण करण्याकडे असतो किंवा अस्मिताकरणाकडे तरी असतो. भगतसिंगांच्या हौतात्म्याशी राष्ट्रवादाची जोडणी करीत आपण त्याचेही असेच अस्मिताकरण करून ठेवले आहे. मात्र, या भगतसिंगांचा असाच एक महत्त्वाचा दुर्लक्षित पैलू कोल्हापूरच्या भाषाविकास संशोधन संस्थेने याच दिवशी प्रकाशात आणला आहे. भगतसिंगांचा हा पैलू आहे भाषा अभ्यासकाचा- संशोधकाचा! संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मित्र डॉ. नंदकुमार मोरे यांनी पुढाकार घेऊन भगतसिंगांनी लिहीलेला पंजाबच्या भाषा आणि लिपीची समस्या हा अतिशय मूलभूत स्वरुपाचा निबंध तन्मय केळकरांकडून अतिशय उत्तम मराठीत अनुवादित करवून घेतला आहे. त्याला विवेचक टिपणांची जोडही दिली आहे.
राष्ट्र उभारणीत भाषा आणि लिपीचे स्थान अधोरेखित करणारा मूलभूत निबंध असे या निबंधाचे वर्णन केले जाते. तो भगतसिंगांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहीला होता. १९२३ साली राष्ट्रीय राजकारणात भाषिक मुद्यावर विचारमंथन सुरू असताना तत्कालीन अखंड पंजाब (पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश मिळून) प्रांतात एक निबंध स्पर्धा झाली. त्यावेळी अकरावीचे विद्यार्थी असलेल्या भगतसिंगांनी पंजाबच्या भाषा व लिपीच्या समस्या या विषयावर लिहीलेल्या या निबंधाला अखंड पंजाब प्रांतात प्रथम क्रमांक मिळाला होता. या निबंधाचे परीक्षक प्रा. विद्यालंकार यांनी तो जपून ठेवला होता. त्यानंतर आठ वर्षांनी जेव्हा भगतसिंग फासावर चढला, तेव्हा त्यांनी तो प्रकाशित केला.
भाषेचे सामाजिक प्रगतीतील महत्त्व, पंजाबमधील भाषा, तिचा इतिहास, पंजाबच्या भाषिक तुटलेपणाची मीमांसा आदी बाबींचे विश्लेषण करीत भगतसिंगांनी पंजाबी भाषेसह समाजाच्या अभ्युदयासाठी सुचविलेल्या उपाययोजना या बाबी मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. भगतसिंगांचा भाषाभ्यास, त्यांनी अतिशय मूलगामी स्वरुपाची केलेली मांडणी यातून त्यांची वैचारिक जडणघडण, प्रज्ञाशीलता झळाळून सामोरी येते. भाषिक अस्मिता, धार्मिक अस्मिता यांच्या पार्श्वभूमीवर भारताला अखंड राष्ट्र बनविण्यासाठीचे स्वप्न आणि त्यासंदर्भातील आव्हाने यांचा उहापोह भगतसिंग अवघ्या सोळाव्या वर्षी सुद्धा अत्यंत पोक्तपणे घेताना दिसतात. त्यातून त्यांची सुजाण भूमिका दृग्गोचर होते. मॅझिनीपासून टॉलस्टॉय, मार्क्स, मॅक्झिम गॉर्की, कबीर, समस्त शीख गुरू, गुरूमुखी वाणी व लिपी, पंजाबी संत-कवी, अन्य समकालीन भाषिक प्रवाह यांचा वेध घेत घेत भगतसिंगांनी विषयाची अत्यंत वेधक मांडणी केल्याचे दिसते. भाषेच्या संदर्भात अत्यंत प्रगल्भ जाणीवा आणि त्यातून राष्ट्रभावनेचा आग्रह भगतसिंगांच्या मांडणीत ठायी ठायी दिसतो. आजच्या संदर्भात तर या मांडणीकडे अत्यंत चिकित्सकपणे पाहण्याची गरज आहे, हे हा निबंध वाचताना जाणवते.
भगतसिंगांच्या मूळ निबंधासह, त्याचा अनुवाद यांच्यासह संस्कृत, ऊर्दू, आयरिश, फारसी भाषांच्या क्षमता, मर्यादा, दमन आदींच्या अनुषंगाने पूरक टिपणे, पंजाबची धार्मिक व सांस्कृतिक वाटचाल यांचाही या पुस्तिकेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही साठ पानी पुस्तिका एका बैठकीत वाचून संपत असली तरी, त्यातून विचाराला देण्यात आलेली चालनाही अत्यंत महत्त्वाची आहे- आजच्या अस्मिताकरणाच्या आणि संदर्भांच्या सरसकटीकरणाच्या काळात तर अधिकच! भगतसिंगांची राष्ट्रवादी पण अत्यंत संयत, अभ्यासू प्रतिमा या पुस्तिकेमुळे अधिक झळाळली आहे. आजच्या युवा पिढीसाठी तर भगतसिंगांचे आकलन, त्यांची सर्वसमावेशक मांडणी, संशोधकीय बैठक या बाबी आदर्शवत स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे आजच्या प्रत्येक तरुणाने तो वाचलाच पाहिजे.
ही अमूल्य पुस्तिका भाषाविकास संशोधन संस्थेने अवघ्या ६० रुपयांत उपलब्ध केली आहे. त्यासाठी आपण डॉ. नंदकुमार मोरे यांच्याशी ९४२२६२८३०० या क्रमांकावर जरुर संपर्क साधावा, हे माझे आग्रहाचे सांगणे...

२ टिप्पण्या: