शनिवार, १ जानेवारी, २०२२

'गेम'चा उद्योग!

('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्ताने आज, शनिवार दि. १ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या 'डिजीटल लाइफ स्टाईल' या विशेषांकामध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे 'दै. पुढारी'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)




पूर्वी बाजारात मध्येच एखादा पडदे सोडलेला दरवाजा असायचा आणि त्यावर व्हिडिओ गेम्सचा लाइटिंगवाला फलक असायचा. त्याच्या बाहेर उभारलं की, चित्रविचित्र इलेक्ट्रॉनिक आवाज यायचे. त्या पडद्याच्या फटीतून एक मोठी स्क्रीन दिसायची. त्यावर जुगाराच्या वर्तुळासारखी वर्तुळं आणि व्हर्चुअल चेंडू दिसायचे. या प्रकाराविषयी त्यावेळी कुतूहल असलं तरी मनात अढीच अधिक आहे. कदाचित खरोखरीच तिथे खेळ असतील; मला मात्र हा प्रकार ऑनलाईन जुगाराचाच वाटतो आजही.

संगणकाच्या पडद्यावर इंटरनेटच्या आमगनानंतर ऑनलाइन गेम्सचे अनेकविध प्रकार दाखल झाले. त्यातल्या प्रिन्स ऑफ पर्शिया आणि अस्फाल्ट या गेम्स क्लासिक आहेत. राजकन्येला प्राप्त करण्यासाठी प्रिन्सचा राजवाड्यातला शिरकाव आणि तिथल्या शिबंदीशी तो करीत असलेले दोन हात हे अद्भुत आहे. अस्फाल्टमधला कार रेसिंगचा वेग आणि थरार अचंबित करणाराच. या दोन्ही गेम्सचे विविध लेटेस्ट व्हर्जन्स आज स्मार्टफोनच्या जमान्यातही आपली लोकप्रियता टिकवून असण्याला हेच कारण आहे.

पुढे मात्र स्मार्टफोनमध्ये विविध गेमिंग कंपन्यांच्या माध्यमातून अक्षरशः लाखो गेम्स दाखल झाल्या. अँड्रॉइडच्या आमगनानं तर त्यांना व्यापक व्यासपीठच मिळालं. विशेषतः गेल्या काही वर्षांत तर टीनएजर्ससह युवा पिढीला पूर्णतः आपल्या कह्यात घेणाऱ्या गेम्स निर्माण झाल्या.

जगभरातील तरुणांमध्ये सरासरी लोकप्रिय असणाऱ्या गेम्स कोणत्या, याचा आढावा घेतला असता त्यात पबजी, डंजन फाइटर ऑनलाईन, पॅक-मॅन गुगल डुडल, कँडी क्रश सागा, अमंग अस, जी-कार्ट, क्रॅशलँड्स, द एस्केपिस्ट, इव्होलँड, मॅडफिंगर गेम्स, माईनक्राफ्ट, मोनुमेंट व्हॅली, निंटेंडो, नुडलकेक स्टुडिओज, पोकेमॉन गो, रिप्टाईड जीपी, स्क्वेअर एनिक्स, द रुम सिरीज, धीस वॉर ऑफ माईन, मायक्रोसॉफ्ट सॉलिटेअर आणि व्हेनग्लोरी (संदर्भ: अँड्रॉईड अथॉरिटी डॉट कॉम) यांचा समावेश होतो. तर भारतात कॉल ऑफ ड्युटी-मोबाईल, अमंग अस, अस्फाल्ट-९, कॉलब्रेक, कॉईनमास्टर, ८ बॉल पूल, क्लॅश रोयाल, सबवे सर्फर्स, फ्री फायर, कॅन्डी क्रश सोडा सागा, ल्युडो किंग, पबजी, क्लॅश ऑफ क्लॅन्स आणि कॅन्डी क्रश सागा (संदर्भ: देसीब्लिट्झ डॉट कॉम) अशा गेम्स लोकप्रिय आहेत.

या गेम्सचं स्वरुप पाहिलं, तर कॅन्डीसारख्या गेम्समध्ये वेगवेगळी आमिषं आहेत, त्यामुळं पुढं पुढं खेळत राहण्याचा मोह होत राहतो आणि माणूस त्यातच गुंतून जातो. इतर गेम्स या एक तर वेगाशी निगडित आहेत किंवा हिंसेशी. या दोन्ही गोष्टींची नशा माणसात सुप्तपणे दडलेली आहेच. या गोष्टींवर कायद्यानं बंधनं आणि मर्यादा घातलेल्या आहेत. पण, जिथं संधी मिळते तिथं माणसातल्या या दोन्ही गोष्टी बाहेर पडतात- विशेषतः तारुण्यात. एखाद्या मित्राची नवी सायकल, मोटारसायकल वेगानं पळवून पाहण्याचा मोह होतोच. एखाद्या विवाह समारंभात वगैरे धारकऱ्याच्या हातातली तलवार हाताळायला मिळाली, तर रुबाबात ती तलवार हातात धरून फोटो काढणारे तरुण-तरुणी असतातच. ज्यांच्या घरात पारंपरिक शस्त्रे वगैरे आहेत, त्यांना तर ती हाताळण्याचा आपला खानदानी अधिकारच आहे, असे वाटून वेळप्रसंगी एखाद्यावर ती चालवून पाहायलाही ते कचरत नाहीत. कॉलेजमधल्या गँगवॉर वगैरेच्या प्रसंगी या सुप्त प्रवृत्ती उफाळून आल्याचं दिसतंच.

वेगाची नशा आणि हिंसेची प्रवृत्ती या आपल्या आदिम प्रेरणा आहेत. शेपटं गळून पडली तरी आत खोलवर दडलेलं आपल्यातलं जनावर बाहेर यायला सारखं धडपडत असतं. पिढ्यानपिढ्या त्याला दाबण्याचे संस्कार झाले असले, तरी संधी मिळेल तेव्हा सतत बाहेर यायला धडपडतंच.

मधल्या पिढ्यांसाठी त्यांच्यातल्या सुप्त इच्छा अप्रत्यक्षरित्या रिझविण्याचं काम चित्रपट करीत राहिले. जेव्हा गिरणी कामगारांवर मालकांकडून अन्याय सुरू होते, त्या काळात चित्रपटाच्या पडद्यावर अमिताभ नावाचा अँग्री यंग मॅन त्या मालकांविरुद्ध थेट एल्गार पुकारून त्यांची चामडी लोळवायलाही कमी करायचा नाही. कामगार त्याच्यात स्वतःला पाहायचे. त्यातून हा महानायक घडला. त्यातून त्यांच्या आशा जिवंत राहात होत्या. प्रत्यक्ष हिंसेचा कंड शमविण्याचं काम अमिताभ करीत असे आणि कामगारांचं आंदोलन सनदशीर मार्गानं चालू राहात असे. मी हे सांगतोय, इतकं हे प्रकरण साधंसरळ नसलं तरी त्यात काहीअंशी तथ्य आहे, हे मान्य करायला हवं.

मोबाईलच्या आगमनामुळं कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर माध्यमांचं व्यक्तीगतीकरण झालेलं आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळं सारं अशक्य ते शक्य होत निघालं आहे. मोबाईल गेमिंगच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलायचं झाल्यास मानवाच्या नेमक्या याच मूलभूत प्रवृत्तींना साद घालून त्यांच्या माध्यमातून प्रचंड नफा कमावणं, इतका सरळसोट धंदेवाईक दृष्टीकोन या गेमिंग कंपन्यांचा आहे. आकडेवारीतच सांगायचं झाल्यास आज जागतिक गेमिंग उद्योगातला ५० टक्क्यांहून अधिक वाटा मोबाईल गेमिंगचा आहे. या उद्योगातली महसुलाची सरासरी उलाढाल सुमारे १५० अब्ज डॉलरच्या घरात आहे. कोविड कालखंडात त्यामध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली.

भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सन २०१८मध्ये जसं ४-जीमुळं मोबाईलचा स्पीड वाढला आणि अंबानींच्या कृपेमुळं डाटा स्वस्त झाला, तसं मोबाईल गेम्स डाऊनलोड करण्याचं आणि खेळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. भारत ही जगातली स्मार्टफोनची सर्वाधिक मोठी बाजारपेठ असून सन २०२२मध्ये इथल्या स्मार्टफोन्स धारकांची संख्या दुप्पट होणे अपेक्षित आहे. गुगलच्या अहवालानुसार, भारतातल्या ऑनलाईन गेमर्सपैकी सुमारे ६० टक्के १८ ते २४ या वयोगटातील आहेत. विशेषतः ग्रामीण भागात गेम्स डाऊनलोड करण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. कोविड काळात गेम डाऊनलोड करण्याचं प्रमाण ५० टक्क्यांनी तर खेळण्याचं प्रमाण ६५ टक्क्यांनी वाढलं. नॅसकॉमच्या अहवालानुसार, भारतातल्या मोबाईल गेम्स वापरकर्त्यांची संख्या ६२८ दशलक्ष आणि उलाढाल १.१ डॉलर अब्जांच्या घरात आहे.

जगभरात सुमारे दोन अब्ज अँड्रॉईड डिव्हाईस कार्यरत आहेत आणि त्यांवर दिवसाला २५० दशलक्ष अॅप्लीकेशन्स डाऊनलोड होत असतात. त्यातही गेम्सची संख्या लक्षणीय असते. भारतात अँन्ड्रॉईड वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गेमिंग उद्योगाचे हे लोक लक्ष्य आहेत. येत्या पाच वर्षांत शंभरहून अधिक देशी गेम डेव्हलपर कंपन्या भारतात सुरू होण्याचा अंदाज आहे. परदेशी आणि गुगलसारख्या कंपन्याही या क्षेत्राकडे भविष्य म्हणून पाहात आहेत.

प्रचंड स्वरुपाचा नफा दिसत असल्यामुळे आणि स्पर्धाही तितकीच तीव्र असल्यामुळे या कंपन्या गेमर्सना गुंतवून ठेवण्यासाठी, विशेषतः त्यांच्या मन आणि मेंदूवर ताबा मिळविण्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे गेम डिझाईन करीत आहेत. नफेखोरीमुळे सामाजिक अगर मानसिक स्वास्थ्याचा विचार अगर त्याचा लवलेशही इथे नाही. भारत म्हणजे तर त्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच वाटते. कारण इथली जवळजवळ ४२ ते ४३ टक्के लोकसंख्या १५ ते ४० वयोगटातली आहे. त्यातही इथले ५५ ते ६० टक्के इंटरनेट वापरकर्ते ऑनलाइन गेम्स खेळतात. ही संख्या लवकरच ५३० दशलक्षांच्या घरात जाणार आहे. डिजीटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या ३०० दशलक्षांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.

भारतातलं सारं वातावरण या गेमिंग कंपन्यांना अनुकूल स्वरुपाचं आहे. त्यामुळं इथल्या युवकांवर त्यांनी आपली पकड गच्च करायला सुरवात केली आहे. या गेमिंग कंपन्यांच्या अर्थकारणाशी अजिबातच काही देणंघेणं नसलेला आपला गावाकडचा युवक सुद्धा त्याच्याही नकळत त्यांच्या पाशात खेचला जातो आहे. त्याला परवडेल असा स्मार्ट फोन व्यवस्थेनं त्याच्या हातात दिला आहे. त्याहून परवडेल इतका स्वस्त डाटा उपलब्ध केला आहे. माशाला पकडण्यासाठी टाकलेल्या गळाप्रमाणं असलेल्या या आमिषामध्ये आपली पिढी गुरफटत चालली आहे. त्या गुरफटण्याचे अत्यंत भयावह, विकृत परिणाम सामोरे येऊ लागलेले आहेत.

यात आघाडीवर आहे ती गेम म्हणजे पबजी. विनर, विनर; चिकन डिनर!’ ही आरोळी अनेक युवा तरुणांच्या भावविश्वाला, मेंदूला विळखा घालून बधीर करून सोडते आहे. प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड असं जीभेला जडशीळ असं नाव घेतलं तर कदाचित कोणाच्याच लक्षात येणार नाही; पण पबजी (PUBG) असं म्हटलं की लगेच लक्षात येतं. या पबजीनं आपल्या देशात मोठा गहजब माजविला. दोनेक वर्षांपूर्वी बेळगावमधल्या एका २१ वर्षांच्या तरुणानं सारखं पबजी खेळत जाऊ नकोस, असं सांगणाऱ्या आणि सशस्त्र सैनिक दलातून निवृत्त असलेल्या आपल्या बापाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. रात्रभर गेम खेळणाऱ्या या मुलानं सकाळी सकाळी आपल्याला गेम खेळू नको, असं सांगणाऱ्या बापाचं शीर कोयत्यानं धडावेगळं केलं आणि तेवढ्यावरच न थांबता त्याच्या मृतदेहाचेही तुकडे तुकडे केले. कोल्हापूर परिसरातल्याच पोर्ले तर्फ ठाणे या गावातला तरुण सलगपणानं पबजी खेळल्यानं मनोरुग्णच बनला. उपचारासाठी त्याला घरच्यांनी सरकारी दवाखान्यात आणलं, तर तिथंही त्या गेम्समधलेच संदेश त्याच्या तोंडून बाहेर पडत होते. इतर कशाचंही भान त्याला नव्हतं. उपचारासाठी दाखल केल्यानंतरही तेथून तो हळूच पळूनही गेला.

काही दिवसांपूर्वी एका मुलाला आईनं उद्या दहावीच्या परीक्षेचा पेपर आहे, पबजी खेळू नको, असं सांगितलं, तर त्या मुलानं आत्महत्याच केली. दुसरीकडं एकानं याच कारणासाठी बहिणीच्या नियोजित पतीवरच हल्ला केला. एका ठिकाणी सलग आठ तास मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला बेशुद्ध झाल्यानं उपचारांसाठी दाखल करण्याची वेळ आली होती. आणखी एका तरुणाची बोटं गेम खेळताना मोबाईल ज्या पोझिशनमध्ये धरतात, त्याच पोझिशनमध्ये तशीच वाकडीच्या वाकडीच राहिली होती.

तत्पूर्वी, पोकेमॉन गो आणि ब्लूव्हेल या गेम्सनी अनेक तरुण तरुणींना अक्षरशः सैरभैर करून सोडलं. पोकेमॉनला शोधण्याच्या नादात मुलं बेभान होऊन शहरात कुठंही भरकटताना दिसत होती. त्यांच्या भरकटण्याच्या बातम्या झाल्या. ब्लूव्हेलनं त्यावर कळस केला. गेम खेळणाऱ्यांना टप्प्याटप्यानं निर्दयी बनविण्याचा खेळ मांडला. या गेममध्ये स्वतःच्या शरीरावर छोट्या मोठ्या जखमा करून घेऊन त्यामध्ये आनंद मिळविण्याचा एक विकृत सॅडिस्ट प्रकार आरंभला. अखेरच्या टप्प्यात तर अक्षरशः उंचावरुन उडी मारुन आत्महत्या करायला लावण्यापर्यंत या गेमची मजल गेलेली. एक प्रकारे खेळणाऱ्यांच्या तनमनाचा ताबा घेऊन त्यांना बाद करण्याचाच हा प्रकार होता. पबजी हे सुद्धा त्याच वळणानं जाणारं आहे. रुथलेस किलींग, अंदाधुंद गोळीबार, त्यातून उन्मादी विजय आणि मग चिकन डिनर असं एका वाक्यात वर्णन करता येत असलं तरी ते तितकं सरळसोपं नाही. शंभर जणांचा गट एका बेटावर उतरून तिथं अंदाधुंद हिंसा करीत स्वतःचा जीव वाचवत अखेरीस एकट्यानं जिवंत राहणं यासाठीचा सारा खटाटोप तुम्हाला माणसाच्या मूळ प्रवृत्तीच्या विरोधात आणि जनावराच्या बाजूनं अधिक उभा करतो. सारासार विवेक नष्ट करण्याचं काम या गेम करीत आहेत.

या गेमच्या विळख्यात टीनेजर्स ते नुकतीच त्यातून पुढं सरकलेली तरुणाई अडकलीय. त्यातून निर्माण होणाऱ्या मनोविकृतीचे दुष्परिणाम आपल्याला लक्षणीय स्वरुपात दिसू लागले आहेत. या गेमवर बंदी घाला, अशी सरधोपट मागणी करता येणं शक्य आहे. पण, त्याचा काही उपयोग नाही. ब्लूव्हेलवर बंदी घातल्यानंतरच पबजी पुढं आलंय. आणखीही फ्री फायरसारख्या गेम्स आहेत आणि त्यात आपली मुलं गुंतत चाललीयत- प्रमाणाबाहेर... ही अधिक चिंतेची बाब आहे. शरीर मनाच्या सुदृढ आरोग्यासाठी खेळ खेळणं आवश्यक असताना नेमकं त्याविरुद्ध या गेम्सचं कामकाज चालू आहे. तरुणांच्या बळावर जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या देशातील तरुण पिढी मनोविकृत करण्याची सुपारी घेऊन या परदेशी, विशेषतः चिनी कंपन्या हेतूपुरस्सर काम करताहेत की काय, इतपत शंका येण्यासारखी परिस्थिती येऊन ठेपली आहे. केवळ गेम्सच नव्हे तर, टिकटॉकसारखी अनेक अॅप्लीकेशन्स तयार करून केवळ त्यामध्ये या तरुणाईला गुंतवून आणि गुंगवून ठेवून त्यांच्या मनावर अंमली पदार्थांपेक्षाही घातक ग्लानी चढवून त्यांना कोणत्याही सृजनाकडे वळू न देण्याचे षडयंत्र जणू जागतिक पातळीवर भारताविरुद्ध आखले गेले आहे. म्हणजे ही अत्यंत कार्यक्षम वयातली तरुण पिढी कोणत्याही अतिरिक्त योगदानाशिवाय कामातून जाईल.

म्हणून इथं आपली जबाबदारी अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं आहे. गेम्सवर बंदी घालून काहीही साध्य होणार नाही. एक गेम बंद केली, तर त्यासारख्या किंवा त्याहून अधिक लाखो गेम्स तयार होतील. त्यामुळं त्यांच्यावर बंदी घालण्यापेक्षा त्या खेळणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या मनावर परिणाम होण्यापूर्वीच सावध करणं, त्यांना त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे... जे तरुण मित्र अशा गेम्स खेळत असतील, त्यांनी त्यापासून दूर व्हावं, होण्याचा प्रयत्न करावा, ते त्यांना निश्चित जमेल... कारण तुम्ही अधिक अॅडव्हान्स्ड, अधिक समंजस पिढी आहात. ज्या मित्र-मैत्रिणींची मुलं-मुली सतत तुमचा मोबाईल घेऊन आतल्या खोलीत बसत असतील, त्यांना मोबाईलपासून प्रयत्नपूर्वक दूर करा. याचा अर्थ लगेच टीव्हीच्या पडद्यासमोर बसवा, असा मात्र नाही. त्यांना काही क्रिएटीव्ह चॅलेंजिस द्या. जे मित्र-मैत्रिणी, आपलं लहानगं कसं मोबाईल अनलॉक करून युट्यूबवर जाऊन त्याला हवा असणारा व्हिडिओ लावतंय, याचं कौतुक करत असतील, किंवा मोबाईलवर अमूक एक व्हिडिओ लावल्याशिवाय जेवण भरवूनच घेत नाही, असं कौतुकानं सांगत असतील, त्यांनी वेळीच सावध व्हावं... तुम्ही भविष्यातला मनोरुग्ण घडवताय, एवढं लक्षात घ्या... थोडक्यात, आयुष्याचा गेम करणाऱ्या अशा गेम्सना तुमच्या अगर तुमच्या मुलांच्या आयुष्यात थारा देऊ नका, एवढंच कळकळीचं सांगणं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा