रविवार, ५ मार्च, २०२३

डॉ. बाळकृष्ण, ‘शिवाजी द ग्रेट’ आणि शिवाजी विद्यापीठ

डॉ. बाळकृष्ण

'शिवाजी द ग्रेट' महाग्रंथाचे मुखपृष्ठ


महाराष्ट्री अगर मराठी नसूनही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिरविला, असे शिवचरित्राचे महान संशोधक डॉ. बाळकृष्ण यांनी अस्सल इंग्रजी, फ्रेंच, डच व पोर्तुगीज साधनस्रोतांचा वापर करून ‘शिवाजी द ग्रेट’ या महाग्रंथाचे लेखन केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने चारेक वर्षांपूर्वी मूळ चौखंडी महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्याचे संपादन केले होते. उद्या (दि. ६ मार्च २०२३ रोजी) या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’ या द्विखंडीय महाग्रंथाचे ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन होते आहे. ही फार मोलाची गोष्ट आहे. या मराठी आवृत्तीचे संपादनही डॉ. जयसिंगराव पवार सरांनीच केले असून वसंत आपटे यांनी अनुवाद केला आहे.

स्वराज्य- तेही मावळ्यांचे आणि मावळ्यांसाठीचे, स्थापन करण्यासाठी शिवरायांनी ज्या पद्धतीने समाजातल्या सर्व स्तरांतल्या घटकांना सोबत घेतले आणि त्यांना एका ध्येयाने प्रेरित करून अक्षरशः त्यांच्याकडून ते कार्य करून घेतले, त्याला तोड नाही. केवळ स्त्रियांचाच नव्हे, तर पर्यावरणाचा आणि निसर्गाचा सन्मान हे सुद्धा शिवछत्रपतींच्या राज्याचे अंगभूत वैशिष्ट्य होते. त्यांचा हाच वारसा शंभूराजांनीही समर्थपणे पुढे चालविला. 

शिवछत्रपतींचे मोठेपण हे त्या काळाची गरज असलेल्या राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये, धोरणी गनिमी लढाई तंत्रामध्ये जसे होते, तसेच ते त्यांच्या या सामाजिक जाणिवेमध्येही होते. किंबहुना, राज्याभिषेकानंतर रायगडावरील सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वीच जनतेच्या हृदय सिंहासनावर ते त्यापूर्वीच विराजमान झालेले होते. त्याला त्यांची संवेदनशीलता, चारित्र्यसंपन्नता आणि सामाजिक जाणीव कारणीभूत होती. 

शिवरायांच्या या समग्र जीवनपटाचा अत्यंत भारावून टाकणारा, रोमहर्षक इतिहास डॉ. बाळकृष्णांनी या महाग्रंथाच्या रुपाने साकारला आहे. १९३२ ते १९४० या कालखंडात म्हणजे आयुष्याच्या अंतिम पर्वात या चरित्राचे लेखन केले. डॉ. बाळकृष्ण मूळचे पंजाब प्रांतातले होते, आर्यसमाजाच्या विचारसरणीने भारावलेले होते आणि त्यामुळेच त्यांनी इथल्या राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारले आणि तेव्हापासून ते या भूमीचेच होऊन गेले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्यावर शिवचरित्राचा प्रचंड प्रभाव पडला आणि तेव्हाच त्यांनी समग्र शिवचरित्र साकारण्याचे ठरविले होते. शिवरायांच्या समकाळातील डच भाषेतील संदर्भ वापरून लिहिण्यात आलेले हे एकमेव चरित्र आहे. डच साधने मिळवून शिवचरित्रात मोलाची भर घालणारे ते पहिले इतिहासकार आहेत. हेच या चरित्राचे वेगळेपण आणि प्रमुख वैशिष्ट्य आहे. डॉ. बाळकृष्णांची ते लिहिण्याची कळकळ इतकी तीव्र होती की, शरीरात प्रचंड ताप असतानाही रात्री-अपरात्री उठून ते लिहायला बसत. १९४०मध्ये अखेरचा खंड लिहून त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतर अगदी अल्पावधीत त्यांचे निधन झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी हा आपला संकल्प पूर्ण केलेला होता. 

डॉ. बाळकृष्ण यांचे दुसरे एक अत्यंत महत्त्वाचे स्वप्न होते, ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना. शाहू महाराजांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत करवीरमध्ये रुजू झाल्यानंतर छत्रपती राजाराम आणि डॉ. बाळकृष्ण या दोघांनी मिळून शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने त्यांनी आखणीही करायला सुरवात केली होती. 

डॉ. बाळकृष्णांनी त्या काळात या विद्यापीठाचे स्वरुप कसे असायला हवे, त्याची योजनाही करून ठेवलेली होती. ही योजना अशी- “कोल्हापूरच्या पूर्वेस दीड मैलावर पुना-बेंगलोर रस्त्याच्या समीप राजाराम तलावानजीक निसर्ग वलयांकित अशी जवळजवळ दीडशे एकर जमीन यासाठी राखून ठेवून तेथे राजाराम कॉलेजच्या आर्ट्स व सायन्सच्या शाखा, लॉ कॉलेज, टीचर्स कॉलेज, ओब्रायन टेक्निकल स्कूल व शेतकी शाळा या संस्था तेथे न्यावयाच्या. यालाच पुढे व्हेटर्नरी व मेडिकल कॉलेजची जोड द्यावयाची. वरील सध्याची कॉलेजे निरनिराळ्या विषयांची भर घालून वाढविता येण्यासारखी आहेत, ती वाढवावयाची. उदाहरणार्थ, राधानगरी येथील हायड्रो-इलेक्ट्रीक स्कीम व अल्युमिनिअमचा कारखाना सुरू झाल्यावर येथील सायन्स कॉलेजमध्ये खनिज वस्तूशास्त्र (मिनरॉलॉजी) व भूगर्भशास्त्र (जिऑलॉजी) हे विषय शिकविले जावेत. हे विषय शिकविण्यासाठी व तेथील विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून घेण्यासाठी अंशतः आर्थिक झीज सोसण्यात वरील कारखान्यांच्या चालकांना आनंदच वाटेल. हायड्र-इलेक्ट्रीक स्कीम सुरू होताच इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगचा कोर्स सुरू करता येईल. अल्युमिनिअम व हायड्रो-इलेक्ट्रीक स्कीममुळे उत्पन्न होणाऱ्या विजेच्या सहाय्याने कोल्हापुरात इतर धंद्यांची वाढ होऊन रेल्वेची वाढ होईल, त्यासाठी मॅकेनिकल इंजिनिअर्सची जरुरी भासेल; म्हणून, तीही शाखा उघडावी लागेल. उद्योगधंद्यांचा वाढीमुळे कमर्शियल स्कूल उघडणे सोयीस्कर होईल, तसेच कोल्हापूर हे संगीत-चित्र-नाट्य-चित्रपट या कलांचे माहेरघर असल्यामुळे त्या कलांचे शिक्षण देण्यासाठी एकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स सुद्धा स्थान करावी लागेल. कोल्हापूरची मल्लविद्येबद्दलची बरीच ख्याती असल्यामुळे लष्करी शिक्षणाच्या खालोखाल शास्त्रशुद्ध शारीरिक शिक्षण जितक्या तरुण-तरुणींस देता येईल, तितक्यांना मिळायला हवे. १) शारीरिक शिक्षण व मल्लविद्या आणि २) लष्करी शिक्षण यांच्या दोन शाळा उघडाव्या लागतील. या सर्व कॉलेजांची वसतिगृहे एकाच ठिकाणी बांधली गेली तर, बनारस हिंदू विश्वविद्यालयाप्रमाणे कोल्हापूर शिवाजी विश्वविद्यालयास स्वरुप येईल.” 

डॉ. बाळकृष्णांच्या या योजनेनुसार, छत्रपती राजाराम महाराजांनी आपला सक्रिय पाठिंबाही जाहीर केला होता. एवढेच नव्हे तर, महाराजांनी या नियोजित युनिव्हर्सिटीसाठी टेंबलाई मंदिराच्या परिसरात एक स्वतंत्र जागाही दिली होती. त्याही पुढे जाऊन त्यांनी युनिव्हर्सिटीच्या खर्चासाठी सात लक्ष रुपयांचे अनुदानही मंजूर केले होते.

डॉ. बाळकृष्ण यांची शिवाजी विद्यापीठाची कल्पना पाहताना त्यांच्या द्रष्टेपणाविषयी अचंबा वाटल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या स्वप्नातील शिवाजी विद्यापीठाच्या जागेचे स्थान व आजच्या शिवाजी विद्यापीठाच्या जागेचे स्थान एकच असावे, हा केवढा विलक्षण योगायोग आहे, असे म्हणण्याऐवजी तो डॉक्टरांच्या द्रष्टेपणातील प्रतिभेचा सुंदर आविष्कारच समजला पाहिजे. खरोखरच आजच्या शिवाजी विद्यापीठाचे आद्य संकल्पक डॉ. बाळकृष्ण असून, शिवाजी विद्यापीठ हेच त्यांचे खरेखुरे स्मारक आहे, असे म्हणता येईल. 

छत्रपती राजाराम महाराज असोत की बाळकृष्ण, या दोघांनी आणि त्यानंतरच्या काळातील विद्यापीठाच्या संकल्पकांनीही या विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी युनिव्हर्सिटी’ असावे, असले पाहिजे, असे म्हणून तेच नाव त्यांच्या लेखनात, बोलण्यात वापरले आहे. या माध्यमातून शिवछत्रपतींचे नाव देशविदेशांतील लोकांच्या ओठी यावे, त्या निमित्ताने शिवरायांच्या कर्तृत्वाची माहिती सर्वदूर व्हावी, म्हणून या विद्यापीठाचे नाव हे शिवाजी विद्यापीठ असावे, असा त्यांचा आग्रह होता आणि त्यानुसारच या विद्यापीठाचे नामकरण ‘शिवाजी विद्यापीठ’ असे करण्यात आले. डॉ. बाळकृष्णांचे हे दुसरे स्वप्न मात्र, त्यांच्या निधनानंतर सुमारे २२ वर्षांनी प्रत्यक्षात आले. मात्र, या विद्यापीठाचा पाया हा त्यांच्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळेच रचला गेला, याची कृतज्ञ जाणीव आपण सदैव मनी बाळगली पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा