मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

नितळ-४: तू, तुम आणि आप...

 ('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेतील पुढील भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)


सोशल मीडियावर हरक्षणी काही ना काही घडामोड सुरू असते आणि तिचे पडसादही तत्काळ उमटत राहतात. यातली गंमत म्हणजे घटना किती महत्त्वाची, यापेक्षा तिचे पडसाद किती मोठे, यावर त्या घटनेचं महत्त्व अवलंबून असण्याचा हा सारा माहौल आहे. काही दिवसांपूर्वीचीच ही गोष्ट. नवी दिल्लीच्या प्रतिभा नामक एका महिलेनं मुंबईतला माणूस हा एखाद्या अनोळखीशी हिंदीत बोलताना तू किंवा तुम असं संबोधतो; आप म्हणत नाही, हे नॉट एक्सेप्टेबल असल्याचं म्हटलं. यावरुन मुंबईतल्या माणसांना बोलण्याची तहजीब नाही, अशा सुरावरुन सुरू झालेलं बोलणं, अखेरीस मुंबईतल्या बहुभाषिक आणि विशेषतः मराठीबहुल नागरिकांच्या प्रभावामुळं इथली बंबैय्या बोली विकसित झाली असून त्यातून हे घडतं, इथपर्यंत पोहोचला. खरं तर बोली भाषेवरुन आणि ती सुद्धा मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन मेट्रो शहरातल्या नागरिकांची तहजीब काढण्याची खरंच गरज नव्हती. पण, ती काढली गेली. गंमतीचा भाग म्हणजे या पोस्टकर्त्या प्रतिभा दहा वर्षांपूर्वी मुंबईत आल्या होत्या, तेव्हाच्या अनुभवावरुन त्यांनी दहा वर्षांनंतर हे ट्विट केलं आणि वाद सुरू झाला. तिलाही हे इतकं काही होईल, असं अपेक्षित नव्हतं. पण, शेवटी खुलं माध्यम आहे हे...

हे सारे ट्विट्स वाचताना एक किस्सा आठवला तो शरद पवारांचा... पवार साहेब संरक्षणमंत्री म्हणून प्रथमच संसदेत गेले, तेव्हाचा असावा. त्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळातील प्रथेप्रमाणे संसदेच्या सभागृहातही बोलताना त्यांनी अध्यक्षांना अध्यक्ष महाराज म्हणून संबोधलं. असं दोन-तीनदा झाल्यानंतर सभागृहात चुळबूळ सुरू झाली. अध्यक्षांनी त्यांना समजावलं की, हिंदीमध्ये खानसाम्याला महाराज म्हणतात. त्यामुळं आपण महोदय असं संबोधावं. पवार साहेबांसारख्या नेत्याने ही बाब खूप गांभीर्याने घेतली. त्यांनी हिंदी भाषेच्या तज्ज्ञाकडून ती भाषा तिच्या वैशिष्ट्यांसह आत्मसात केली. त्यानंतर आजतागायत त्यांच्या बाबतीत संसदेत तसा अनुभव पुन्हा आला नाही. उलट पवार साहेब जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा सर्वच नेते त्यांचे बोलणे कान देऊन गांभीर्यपूर्वक ऐकतात, असा अनुभव आहे.

मुंबईत मराठी भाषिक नागरिक बहुसंख्य आहेत. तिथे त्यांच्या हिंदीवर मराठीचा पगडा हा असावयाचाच. आईलाही अगं, तू गं करणाऱ्या मराठी माणसाच्या मनात आईबद्दल आदरभाव नसतो, असं कोण म्हणेल? तसंच तो तुम्ही आणितुम्हाला यांच्याऐवजी तुम असं म्हणतो. इथं आप म्हणायचं असतं, हे त्याच्या गावीही नसतं. कारण बोली भाषेत तो आपण माझ्या घरी यावे, असं न म्हणता तुम्ही या नं माझ्या घरी असं म्हणतो. त्या सांगण्यानं त्याचं अगत्य अजिबात कमी होत नाही. मुळात विविध भाषिकांचं जिथं सम्मीलन होत असतं, तिथं त्यांच्या भाषेचा एकमेकांवर प्रभाव हा अगदी सहजस्वाभाविक असतो.

आता उत्तर भारतीय हिंदी भाषिकांनी मुंबईतलं आपलं मराठी बोलणं कसं भ्रष्ट केलंय, याची काही उदाहरणं इथं देतो. उल्हासनगरला साडी खरेदीसाठी गेलेल्या कल्याणमधल्या महिला त्या दुकानदाराला भय्या, ही वाली नको, ती वाली साडी दाखवा, असं सहज म्हणतात. आता हे वाली प्रकरण मराठीत कुठंच येत नाही (रामायणाखेरीज!). मग आलं कुठून? तर त्याचा उगम हा हिंदीतल्या भय्या, वो वाली साडी दिखानामध्ये असतं. मुंबईतल्या मराठी घरातल्या आईनं हाक मारल्यानंतर तिच्या मुलीकडून आले असं प्रत्युत्तर न येता आली असं मिळतं. याचं मूळही हिंदीतल्या आयीमध्ये आहे. मी तिकडे गेली, मी इकडे आली हे त्याचेच उदाहरण.

दुसरं म्हणजे मुंबईत कोणी काही म्हणत नाही; तर, जो तो बोलतो. म्हणजे मी त्याला म्हणालो, अगर मी तिला म्हणाले असं फारच क्वचित कानी येईल. त्याऐवजी मी बोल्लो, मी बोल्ली हे सर्रास ऐकू येणार आणि त्यात कोणाला काही गैर वाटतही नाही. हे सुद्धा मैं उसको बोला अगर मैं बोली या हिंदीतूनच आलेलं आहे.

सांप्रतचा लेखक हा काही भाषातज्ज्ञ वगैरे अजिबातच नाही. पण, आजूबाजूला जे भाषिक व्यवहार सुरू आहेत, त्याचा मूक निरीक्षक आहे. मात्र, ही उदाहरणे द्यायचं कारणच असं की, सहजीवनातून भाषेचा विकास होत असतो. विविध भाषांचा एकमेकींवर प्रभाव हा पडत असतोच. त्यातूनच भाषेची समृद्धी होत असते. दरवर्षी जगातील अनेक देशांमधील निवडक शब्दांची भर इंग्रजी भाषेत पडत असते. भर पडते असं म्हणण्यापेक्षा इंग्रजी अशा शेकडो शब्दांचा दरवर्षी स्वीकार करून अधिकाधिक समृद्ध-संपन्न होत चालली आहे, असे म्हणावे लागेल. आपली कढी-चपाती सुद्धा त्या भाषेने आत्मसात केली आहे. हिंदी भाषा सुद्धा तशीच अत्यंत लवचिक आहे. फार खळखळ न करता विविध शब्दांमध्ये मोजके फेरबदल करून ते ती स्वीकारते. भाषेची लवचिकता जितकी अधिक, तितकी ती प्रवाही आणि चिरकाल टिकाऊ बनत जाते. भाषिक ताठरता आपल्याला परवडणारी नाही.

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये गेल्या ५० वर्षांत देशातील २२० भाषांचा अस्त झाला आहे. त्यांनी आपल्या सर्वेक्षणात ७८० भारतीय भाषांचा शोध घेतला. त्यापैकी ६०० भाषा धोक्यात असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. त्यात भटक्या समाजाची, किनारपट्टीवरील आणि आदिवासी समाजाची भाषा अधिक धोक्यात आहे. युनेस्कोच्या अस्तंगत होत चाललेल्या भाषांसंदर्भातील अहवालानुसार, १९५० पासून जगातील २३० भाषा नामशेष झाल्या आहेत. २००१मध्ये त्यांनी ९०० भाषा नामशेष होण्याचा धोका वर्तविला होता, तो आकडा २०१७मध्ये २४६४पर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यातही भारतीय भाषांची संख्या लक्षणीय होती. बोली भाषांना हा धोका अधिक भेडसावतो. जगभरात बोलल्या जाणाऱ्या ७१३९ भाषांपैकी ३०१८ भाषा (४२ टक्के) धोक्यात आहेत.

ही भाषेची संख्याशास्त्रीय चर्चा करण्याचे कारण म्हणजे आपल्या बोली जपणे, आपल्या सर्वच भाषा समृद्ध करणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आज जगाच्या पाठीवर काही भाषा बोलणारे अवघे एक-दोन लोक राहिले आहेत. ती भाषा त्यांच्याबरोबरच संपणार आहे. किती वेदनादायी आहे हे! आणि विविधतेमध्ये एकता हेच आमच्या देशाचे सौंदर्य असे म्हणताना आपण एखाद्या शब्दयोजनेमागील सहजभाव समजून न घेता थेट त्यावरुन गदारोळ उठवतो, हे त्याहून वेदनादायी नव्हे काय?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा