रविवार, २९ डिसेंबर, २०२४

दीपस्तंभ साहित्य संमेलनात...

सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात पार्थ पोळके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. एन.डी. जत्राटकर.

सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात निवृत्त न्या. अनिल वैद्य यांच्यासमवेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव कांबळे आणि डॉ. आलोक जत्राटकर


दुसऱ्या साहित्य संमेलनाचे विविध वृत्तपत्रांतील वार्तांकन




आजचा दिवस (रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४) सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनामध्ये अतिशय अविस्मरणीय असा ठरला. आमचे मार्गदर्शक डॉ. जगन कराडे आणि त्यांच्या दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या सर्वच सहकाऱ्यांनी दीपस्तंभ साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर बाकी राखली नव्हती. या साहित्य संमेलनामध्ये आंबेडकरी समाजातील युवकांना एकविसाव्या शतकातील सामाजिक, आर्थिक विकासाच्या संधी या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मांडणी करण्याची संधी मला लाभली.

केवळ आंबेडकरी समाजातील युवकच नव्हे, तर एकूणच भारतीय युवकांचं नजीकच्या काळामध्ये शैक्षणिक आणि रोजगार या अनुषंगाने भवितव्य काय असेल, त्यांचं आपल्या भारताच्या पायाभरणीमध्ये, उभारणीमध्ये काय योगदान असेल, हा माझ्या नित्य चिंता आणि चिंतनाचाच विषय. त्या चिंतनाला भरीव स्वरूप देण्याचं, त्याची मांडणी करण्याची ही एक चालून आलेली संधी होती. त्यामुळं विचार करीत असताना मुळात भारतीय युवकांना नजीकच्या २५ वर्षांमध्ये डेमोग्राफिक डिव्हीडंडचा फार मोठ्या प्रमाणात लाभ उठवण्याची संधी आहे, या अनुषंगाने मांडणीची दिशा ठरवली. मग गेल्या पन्नासेक वर्षांमध्ये दक्षिण आशियाई विभागातील ज्या देशांनी डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या बळावर आपली प्रगती करून घेतलेली आहे, अशा देशांची उदाहरणे अभ्यासली. यामध्ये जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि थायलंड यांची उदाहरणे घेतली. या देशांनी, त्यांच्या देशामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड असताना त्याचा लाभ कशा पद्धतीने घेतला, ते पाहिले. आणि त्या अनुषंगानेच भारतामध्ये सुद्धा पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये साधारण २०५६ पर्यंतचा कालावधी असणार आहे. त्या काळामध्ये भारत या गोष्टीचा कसा लाभ घेऊ शकतो, भारतातील युवकांना प्रगतीची कितपत संधी आहे, हे या निमित्ताने अधोरेखित करता येऊ शकलं. मात्र हे करत असताना, या देशांनी जेव्हा त्यांच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा उठविला, तेव्हाचा काळ आणि आजची भारतासमोरील परिस्थिती यामध्ये ठळकपणे फरक करणारा एक फार महत्त्वाचा घटक आत्ता, आजघडीला आपल्यासमोर आहे. घटक म्हणा, आव्हान म्हणा, मात्र ते आपल्यासमोर आहे आणि ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! भारतीय युवकांना या कालखंडात जी काही रोजगाराची, शिक्षणाची संधी मिळणार आहे, त्यासमोर एक भलं मोठं आव्हान आणि प्रश्नचिन्ह या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उभे राहिलेले आहे. या आव्हानाला भारत कसा सामोरा जातो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी न जा,ता तिचा उपयोग करून आपल्या देशाची प्रगती कशी साधून घेता येईल, या दृष्टीने जोपर्यंत हा युवक विचार करणार नाही, तोपर्यंत ही प्रगती होईल किंवा नाही, अशी साशंकता या निमित्ताने उभी राहिलेली आहे. तर, या समग्र अंगानं या परिसंवादामध्ये मांडणी करता आली.

महत्त्वाचं म्हणजे आमचे मित्र कुलवीर कांबळे हे सहपरिसंवादक होते तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत पार्थ पोळके हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. पार्थ पोळके यांना मी अनेक कार्यक्रमांमध्ये ऐकले आहे, मात्र, या परिसंवादाच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. मी केलेली मांडणी ऐकून ते भयचकित झाले. अशा प्रकारची मांडणी आपण प्रथमच ऐकली आणि ती फार महत्त्वाची असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या भाषणाचे लेखात रुपांतर करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी केली आणि आपण त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची प्रेमळ धमकी सुद्धा दिली. आपण लिहीत, बोलत राहतो, हे सारे ठीकच, पण या निमित्ताने पोळके सरांसारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वासमवेत मंचावर बसता येणे, त्यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द मिळणे, यापेक्षा माझ्यासारख्या अभ्यासकाला आणखी दुसरे काय बरे हवे असते?

त्याखेरीज, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना ऐकावयास मिळणे, निवृत्त न्या. अनिल वैद्य यांचा परिचय होणे हे सुद्धा महत्त्वाचेच!

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

आळंदीच्या 'रिंगणा'त!

आळंदी येथे रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, संपादक सचिन परब, भागवत महाराज साळुंके, सुप्रसिद्ध लेखक, कवी यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर


डॉ. आलोक जत्राटकर यांना आपली पुस्तके भेट देताना आळंदीचे भागवत महाराज साळुंके

रिंगण वक्तृत्व स्पर्धेचा देखणा मंच

डुडूळगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी रिंगण वक्तृत्व स्पर्धकांच्या स्वागतासाठी उभारलेली स्वागत कमान

डुडूळगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी रिंगण वक्तृत्व स्पर्धकांचे स्पर्धास्थळी असे रेड कार्पेट स्वागत होते.





आळंदी येथे काल, रविवारी (दि. १५ डिसेंबर) रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणासाठी उपस्थित राहिलो. सन्मित्र सचिन परब यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे केवळ संत विचार, संत साहित्य याला वाहिलेली अशी ही राज्यातील कदाचित एकमेव वक्तृत्व स्पर्धा असेल.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणे ही खरं तर कस पाहणारी अशी गोष्ट होती. याचं कारण असं की, मुळात मी तसा काही संत साहित्याचा विशेष अभ्यासक वगैरे नाही; वाचक आहे. मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धक अतिशय तयारीनिशी आलेले असतात आणि आपल्याला जे काही संतांचं वाङ्मय माहिती आहे, त्या पलीकडे सुद्धा आजच्या कंटेम्पररी विषयांच्या अनुषंगाने संत विचारांचे महत्त्व, वेगळेपण आणि प्रस्तुतता या अनुषंगाने ही मुलं अशी काही मांडणी करतात की ऐकत राहावं. म्हणूनच मी म्हटलं की स्पर्धकांपेक्षाही परीक्षकांचा कस पाहणारी ही स्पर्धा होती. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजघडीला राज्यभरामध्ये जेवढेही वक्तृत्व स्पर्धेमधील दिग्गज असे स्पर्धक आहेत, ते जवळजवळ सगळेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. इतक्या तयारीच्या मुलांचं परीक्षण करणे हा आणखी एक वेगळा असा कस बघणारा भाग होता.
ही स्पर्धा उत्तम पद्धतीने आयोजित केली जातेच कारण परब सर अर्थात रिंगण प्रकाशन, मुंबई आणि आळंदीतल्या डुडूळगाव इथले श्री गजानन महाराज शिक्षण प्रसार मंडळ, ओतूर यांच्या शरदचंद्र पवार कला, वाणिज्य महाविद्यालय यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये, तिच्या देखणेपणामध्ये कुठेही काही कसर राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतलेली होती. त्यामुळे अत्यंत नेटके आयोजन आणि एकूणच वातावरणनिर्मिती यामुळे स्पर्धा ही प्रेक्षणीय सुद्धा झाली. म्हणजे श्रवणीय असण्याबरोबरच प्रेक्षणीयता आणि अनुभूतीशीलता हाही यामधील फार महत्त्वाचा भाग होता. येणाऱ्या स्पर्धकांच्या चहापानापासून ते दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या चहापानापर्यंत सगळी व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आलेली होती. राज्यभरातून दीडशेहून अधिक स्पर्धकांची नोंदणी आणि ८० हून अधिक स्पर्धकांचा प्रत्यक्ष सहभाग हे या स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. माझे सहपरीक्षक भागवत महाराज साळुंके यांच्याशीही या निमित्ताने नवस्नेह प्रस्थापित झाला. त्यांनी त्यांचे पुस्तक आणि दिवाळी अंक अत्यंत प्रेमपूर्वक मला भेट दिले. आळंदीमध्ये एक नवे जिव्हाळ्याचे ठिकाण मिळाले. सोबत प्रवीण, वैभव अशी पुणे वक्तृत्व वाद मंडळाची मित्रमंडळी या देखण्या आयोजनाचे नेपथ्य सांभाळायला होतीच. त्यांचा सहवास ही सुद्धा माझ्यासाठी सदैव हवीहवीशीच बाब असते.
या स्पर्धेचा समारोप समारंभ सुद्धा अप्रतिम अविस्मरणीय असा झाला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सुप्रसिद्ध लेखक, कवी अरविंद जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एरवी अरविंद जगताप यांना आपण शब्दांमधून वाचतो; पण प्रत्यक्ष ऐकत असताना जगताप सरांना त्यांच्या पॉझेसमधून ऐकणं हा सुद्धा एक अविस्मरणीय असा अनुभव होता, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांच्या दोन शब्दांमधला, मुद्दामहून थोडा अधिक लांबवलेला पॉझ हा विक्रम गोखलेंपेक्षा सुद्धा अधिक उत्तम आणि दमदारपणे अनेक गोष्टी ध्वनीत करत होता. सलाम आहे या माणसाला! अरविंद जगताप यांना अशा पद्धतीने ऐकणं हा सुद्धा एक आगळ्या वक्तृत्वाचा पथदर्शी नमुनाच ठरला.
या स्पर्धेच्या निमित्ताने मला देहूला जाता आलं, तुकोबारायांचं दर्शन घेता आलं, आळंदीमध्ये माऊलींचे दर्शन घेता आलं आणि त्या दर्शनाबरोबर आमच्या या दैवतांना नवबडव्यांनी कसे घेरले आहे किंवा पुढे आणखी ही पकड कशी मजबूत होत जाणार आहे, याचं सुद्धा एक दर्शन या निमित्ताने घडलं. हे होतच राहणार आहे. त्याला आपण काही करू शकत नाही, याचेही एक वेगळे शल्य मनाला बोचत राहिले. अतिशय बेमालून पद्धतीने हा सगळा पगडा बहुजनांच्या डोक्यावर बसविण्यात येत आहे. म्हणजे ज्या गोष्टींच्या विरोधात तुकोबांनी बंड पुकारले, ज्ञानराजांनी समाधी घेतली, तीच व्यवस्था त्यांच्याभोवतीचे आपले पाश घट्ट करत असताना दिसते आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना, भाविकांना वेगळ्या पद्धतीने हा भागवत धर्म सांगण्याचे एक वेगळेच षडयंत्र या निमित्ताने पाहता आले. हे होत राहणार, त्याला पर्याय नाही. पुढच्या वेळी मी जाईन त्यावेळी कदाचित यापेक्षाही अधिक वेगळे चित्र मला दिसू शकेल; मात्र सध्या जे दिसलं ते असं!
रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्याच गोष्टींचा दर्शन घेण्याची संधी मिळाली. मित्रवर्य सचिन परब आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दोन दिवस घालवता आले, याचा एक वेगळा आनंद आहे. त्याचबरोबर राज्यभरातले जे तयारीचे स्पर्धक होते, त्यांना ऐकणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळाली, ही त्यातली जमेची बाजू. त्या दृष्टीनेही रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

लीडरशीप मॅटर्स...

(छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सव समारंभात साक्षात मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडून जाहीर कौतुकोद्गार)

(शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची रंजक माहिती)



(छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची माहिती देणारी रील)


माहितीपुस्तिकेचे मुखपृष्ठ


शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडून विशेष प्रशंसापत्र

शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बजावलेल्या कामगिरीबद्दल डॉ. आलोक जत्राटकर यांना प्रशंसापत्र प्रदान करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. वैभव ढेरे.

सहकाऱ्यांकडूनही कौतुक: शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देताना सौ. विभा अंत्रेडी. सोबत (डावीकडून) डॉ. वैभव ढेरे, धैर्यशील यादव, अभिजीत रेडेकर, सौ. अनुष्का कदम आणि गजानन पळसे






शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा सुवर्णमहोत्सव नुकताच ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२४ रोजी विद्यापीठ प्रशासनासह समस्त विद्यापीठप्रेमींनी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा केला. विद्यापीठानं या पुतळ्याचे शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या सर्व म्हणजे नऊ मुलींना त्यांच्या कुटुंबियांसह सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचा शाल, श्रीफळ आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सत्कारही केला. या कार्यक्रमात या पुतळ्याची समग्र माहिती देणारी सुवर्णमहोत्सव विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची पुस्तिका, पुतळ्याविषयीचे रील आणि माहितीपट हे मी तयार केले आणि ते इथं माझ्या वॉलवर शेअरही केले आहेत. हे मी केलं, हे सांगण्यासाठी लिहीत नाहीय; तर, ते करण्यासाठी पाठीवर हात ठेवणाऱ्या वरिष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा आहे. पुतळ्याची माहितीपुस्तिका अगर माहितीचा फलक उभारण्याची संकल्पना मा. कुलगुरूंशी चर्चा करताना मला सुचली नक्कीच होती, मात्र या कल्पनेला उचलून धरीत पाठिंबा देणारं नेतृत्व त्यांच्या ठायी असल्यामुळं या गोष्टी तडीस जाऊ शकल्या. माहिती संकलन, संपादन या सर्व बाबींचं स्वातंत्र्य आणि मोकळीक त्यांच्याकडून लाभली. त्यामुळंच कागदावर कुठेही कसलाही आदेश नसताना केवळ शिवछत्रपतींवरील निष्ठा आणि प्रांगणातील त्यांच्या पुतळ्याविषयी असणारं ममत्व या दोन बाबींमुळं पुतळा सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम अगदी यथासांग आणि देखणेपणानं पार पडला. साऱ्यांचा उत्साह आणि मनासारख्या घडून आलेल्या सर्व गोष्टी यामुळं एक आगळं समाधान लाभलेलं होतंच. तशात मा. कुलगुरूंनी या कार्यक्रमात या साऱ्या करण्याचं जाहीर कौतुक केलं, ही बाब आनंददायी खरीच, पण संकोचून टाकणारी अधिक होती. कुलगुरू म्हणूनच नव्हे, पण डॉ. शिर्के सरांचा स्वभाव हा मुळी थेट आणि प्रांजळ आहे. त्या निर्मळपणातूनच त्यांचं हे सहजकौतुक माझ्या वाट्याला आलं. त्यामुळं उपस्थितांनीही सरांनी घेतलेल्या नोंदीवरून अभिनंदन केलं. फुलटाईम इलेक्शन ड्युटी असतानाही कार्यालयीन काम सांभाळून त्या पलिकडं केवळ प्रेमभावनेतून केलेल्या कामाचं इतकं कौतुक वाट्याला येणं हीच सुखावून टाकणारी बाब होती खरं तर... पण... काल सायंकाळी ऑफिस अवर संपता संपता मा. कुलगुरू सरांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून मा. प्र-कुलगुरू, कुलसचिव, डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. वैभव ढेरे या सन्मित्रांच्या साक्षीनं अभिनंदनाचं पत्र देऊन पुनश्च एकदा कौतुकाचा वर्षाव केला की ज्यानं गहिवरुनच आलं. अजिबातच अपेक्षा नव्हती अशी काही, मात्र सरांनी ते घडवून आणलं. निरपेक्षभावानं केलेल्या कार्याची ती वरिष्ठांनी दिलेली महत्त्वाची पोचपावतीच जणू. या गौरवाबद्दल या साऱ्यांप्रती पुनश्च एकवार जाहीर कृतज्ञता व्यक्त करून हा गौरवही पुन्हा महाराजांच्या चरणी अर्पण करतो.
आज त्यापुढची कडी माझ्या तमाम सहकाऱ्यांनी जोडली. (डॉ. ढेरेच त्यामागे असणार, याची खात्री आहेच). या सर्व मंडळींनी आज एकत्र येऊन शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन अभिनंदनप्रेमाचा इतका वर्षाव केला की त्यानं भारावून गेलो. एकीकडं कामावरील प्रेमाचं कौतुक करत असतानाच जबाबदारीची जाणीवही मनी दृढतर होण्यामध्येच या साऱ्याचं रुपांतर झालेलं आहे. अंगिकृत कामाशी आजवर कधी प्रतारणा केली नाही, येथून पुढंही होऊ देणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो... बाकी आपणा सर्वांचं प्रेम हे असंच अखंडित राहो... चांगलं काम करण्याची, सकारात्मकता अबाधित राहण्याची प्रेरणा त्यातून मिळत राहो, हीच काय ती अपेक्षा!
आमचा 'हक्काचा माणूस' मित्रवर्य जगदीश गुरव यांनी कुलगुरू महोदयांच्या कौतुकोद्गाराचा व्हिडिओ अतिशय प्रेमानं पाठवला, त्यांनाही धन्यवाद देणे अगत्याचे आहे.

शनिवार, ४ मे, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: वर्ष तिसरे

आव्हानात्मक जल-अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरसंधी मुबलक: विनय कुलकर्णी

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत 'आविष्कार जल-अभियांत्रिकीचा' या विषयावर बोलताना अभियंते विनय कुलकर्णी.

(श्री. विनय कुलकर्णी यांचे सविस्तर व्याख्यान येथे ऐका.)


कोल्हापूर, दि. ४ मे २०२४: जल-अभियांत्रिकीचे क्षेत्र हे आव्हानात्मक असले तरी करिअरच्या मुबलक संधीही या क्षेत्रात उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्राचा जरुर विचार करावा, असे आवाहन टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. कंपनीचे उप-सरव्यवस्थापक विनय कुलकर्णी यांनी आज केले. आलोकशाही वाहिनीच्या वतीने आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते आविष्कार जल-अभियांत्रिकीचा!’ या विषयावर बोलत होते. तिसऱ्या वर्षीचे द्वितिय व अंतिम पुष्प त्यांनी गुंफले.

श्री. कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये जल-अभियांत्रिकीच्या क्षेत्रामधील आव्हानांची, आवश्यक क्षमतांची, ज्ञानाची आणि करिअर संधींची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, जल-अभियांत्रिकी क्षेत्राचा आवाका अतिशय मोठा आहे. अभियांत्रिकीच्या पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात त्यासंदर्भातील विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. फ्लुईड मॅकेनिक्स विषयात पाण्याच्या वर्तनाचा सविस्तर अभ्यास आहे. हायड्रॉलॉजीमध्ये पावसासह जमिनीवरील आणि भूगर्भातील पाण्याचा अभ्यास आहे. पाण्याचे पृथ्वीवरील वितरण आणि त्याची हालचाल याविषयी अभ्यास करता येतो. हायड्रॉलिक्समध्ये कालव्यांची निर्मिती, त्यांची संरचना, पाईपलाईन्स, पूरसंरक्षक संरचना तसेच पाण्याच्या यांत्रिक गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये शाश्वत जलव्यवस्थापनाचा विचार, विकास आणि नियोजन समाविष्ट असते. कोस्टल/मरिन (तटीय) अभियांत्रिकीमध्ये समुद्रकिनाऱ्यांवरील प्रकल्प विकासाचा अभ्यास असतो. पर्यावरणीय अभियांत्रिकीमध्ये पाणी, हवा, माती यांच्या गुणवत्तेचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि सांडपाणी शुद्धीकरण आदींचा विचार असतो. त्याचप्रमाणे वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अभियांत्रिकीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प, सिंचन आदींचा अभियांत्रिकीय दृष्टीकोनातून अभ्यास असतो. हा अभ्यास करीत असताना त्याच्या जोडीने भूशास्त्राचा अभ्यासदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामधून भूस्तराच्या संरचनेचा सखोल अभ्यास करावा लागतो, जेणे करून कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये भक्कम बांधकामाची उभारणी करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे रिमोट सेन्सिंग, जीआयएस या नवतंत्रज्ञानात्मक शाखांचा अभ्यासही उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्य शासनाच्या पाटबंधारे, कृषी, जलसंपदा, महापालिका प्रशासन आदी ठिकाणी अभियंता म्हणून करिअरच्या संधी आहेत. सेंट्रल वॉटर कमिशन, ओशनोग्राफी केंद्र, रिमोट सेन्सिंग एजन्सी, नॅशनल वॉटर अकॅडमी, भारतीय हवामान विभाग अशा अनेक विभागांमध्ये संशोधक, अभियंता म्हणून संधी आहेत. खाजगी क्षेत्रात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तर भरपूर संधी आहेत. अपार कष्ट आणि परिश्रम करावे लागत असले तरी त्यातून उभे राहणारे सृजनशील अभियांत्रिकी काम हे मोठे समाधान देणारे असते, असेही कुलकर्णी म्हणाले.

विनय कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये जल-व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या इतिहासाचाही थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले, पाणी व्यवस्थापन हा मानव उत्क्रांतीच्या इतकाच जुना घटक आहे. दहा हजार वर्षांपूर्वी धान्य विकासाच्या पद्धती बदलत असताना मानवाने नदीच्या किनारी वसाहती वसविण्यास सुरवात केली. तेव्हापासूनच सिंचन, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे वहन अशा गोष्टी तो शिकला. इसवी सनाच्या चौथ्या शतकातच रोमन अभियंत्यांनी तेथील नगरांसाठी शेकडो मैलांवरुन जमिनीखालून तसेच कालव्यांद्वारे पाणी वाहून आणण्याची किमया केली. भारतात थरच्या वाळवंटानजीक असलेल्या चाँदबावडी या दहाव्या शतकातील सुमारे शंभर फूट खोल बांधीव विहीरीतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. सिंधु संस्कृतीमध्ये पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचे दाखले प्राप्त झाले आहेत. आधुनिक काळात १८८०मध्ये पहिला काँक्रिट आर्च (कमानीच्या आकाराचा) डॅम बांधण्यात आला. चीनमधील यांगझी नदीवर थ्री गॉर्जेस हे महाकाय धरण उभारण्यात आले. भारतातील भाक्रा-नानगल धरण हा देशातील पहिला १५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प ठरला. टाटांनीही खाजगी क्षेत्राकडून धरणबांधणी व ऊर्जानिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी मुळशी, भुशी, भिरा, वळवण, ठोकरवाडी आदी धरणे बांधली. सर एम. विश्वेश्वरय्या, डॉ. वीरभद्रन् रामनाथन, डॉ. जॉन ब्रिस्को, डॉ. राजेंद्रसिंह राणा आदी संशोधक आणि जलतज्ज्ञांमुळे भारताचे जल अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्र समृद्ध झाले, असेही त्यांनी सांगितले. वाढते शहरीकरण, त्या शहरी विकासाचे नियोजन, तापमानवाढ, बदलते पर्जन्यमान आदी सर्व बाबींची शाश्वत विकासाशी सांगड घालणे आवश्यक असून शक्य त्या ठिकाणी पर्यावरणपूरक बांधकामे करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मतही विनय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला, तसेच आभार मानले.

शुक्रवार, ३ मे, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: वर्ष तिसरे

हरित रसायनशास्त्र हा डॉ. भालचंद्र काकडे यांच्या संशोधनाचा गाभा: डॉ. माणिकराव साळुंखे

 

आ'लोकशाही प्रस्तुत डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत 'हरित रसायनशास्त्र' या विषयावर बोलताना माजी कुलगुरू व ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे

(डॉ. माणिकराव साळुंखे यांचे संपूर्ण व्याख्यान येथे ऐका)


कोल्हापूर, दि. ३ मे २०२४: डॉ. भालचंद्र काकडे यांचे संशोधन शाश्वत विकासकेंद्रित होते. हरित रसायनशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा गाभा होता. त्यांच्या निधनामुळे देश एका आश्वासक वैज्ञानिकाला मुकला आहे, अशी भावना ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ तथा माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज व्यक्त केली.

डॉ. भालचंद्र काकडे यांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आलोकशाही या वाहिनीच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये डॉ. साळुंखे हरित रसायनशास्त्र या विषयावर बोलत होते.

डॉ. साळुंखे म्हणाले,  डॉ. भालचंद्र काकडे यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर माझा कधी संबंध आला नसला तरी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील त्यांचे मार्गदर्शक डॉ. विजय मोहन यांच्याशी मात्र माझा चांगला परिचय राहिला. डॉ. काकडे यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये हाती घेतलेले संशोधन आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांतून सादर केलेल्या शोधनिबंधांचे स्वरुप पाहता त्यांचे संशोधन हे पूर्णतः पर्यावरणपूरक होते, असे म्हणता येते. आज आपण शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये घेऊन संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रेरित करतो आहोत, तथापि तत्पूर्वीच डॉ. काकडे यांनी शाश्वत विकासाचे संशोधन होती घेतल्याचे दिसून येते. पाण्यावर रेल्वे चालविण्याचे अतिशय महत्त्वाकांक्षी संशोधन त्यांनी हाती घेतले होते. हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने ते खरोखरीच खूप महत्त्वाचे असे होते. त्यांच्या अचानक निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, हरित रसायनशास्त्र म्हणजे जास्तीत जास्त रासायनिक प्रक्रिया, अभिक्रिया या जास्तीत जास्त पर्यावरणपूरक पद्धतीने घडवून आणणे होय. आज मोठमोठ्या उद्योगांमध्ये विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी ज्या काही रासायनिक प्रक्रिया घडवून आणल्या जातात, त्या अतिउच्च तापमानाला आणि विविध रसायनांच्या वापराद्वारे घडवून आणल्या जातात. त्यामधून बाहेर पडणारी उप-उत्पादने ही सुद्धा पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही घातक असतात. त्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जन आणि हवा-पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. या उलट निसर्गामधील प्रक्रियांचे असते. निसर्गातील प्रत्येक प्रकारची रसायननिर्मिती ही पर्यावरणपूरक पद्धतीने घडविली जाते. हरित रसायनशास्त्राचे उत्तम उदाहरण म्हणजे मानवी शरीर होय. मानवी शरीरातील अभिक्रिया आपल्याला खूप काही शिकविणाऱ्या आहेत. शरीरातील सर्व अभिक्रिया या सर्वसामान्य तापमानामध्ये होतात. इतर कोणत्याही नव्हे, तर पाण्यासारख्या द्रावणामध्ये होतात. त्याचप्रमाणे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी पद्धतीने न होता उदासीन पद्धतीने होतात. त्यामधून कोणतेही घातक उपपदार्थ निर्माण होत नाहीत. त्याचप्रमाणे ते नैसर्गिकरित्या विघटनशीलही असतात. सध्या तरी आपल्याकडे मानवी शरीराइतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही. मात्र, आपण त्या दिशेने संशोधनाच्या दिशा केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण औद्योगिक, व्यावसायिक पातळीवर घडवून आणत असलेल्या अभिक्रियांमधील उप-उत्पादनांचे आणि प्रदूषकांचे प्रमाण कमी कमी करीत नेण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढे टप्प्याटप्प्याने असे घातक पदार्थ निर्माणच होणार नाहीत किंवा जे निर्माण होतील ते नैसर्गिकरित्या विघटनशील असावेत, याकडे कटाक्ष असावा. सध्या आपण रासायनिक अभिक्रियांसाठी अनेकविध हानीकारक रसायने वापरतो. पण, पुढे या अभिक्रिया पाण्यातच घडविता येतील का, या दिशेनेही विचार व संशोधन करणे गरजेचे आहे. पुनर्वापरक्षम कच्चा माल, नवनिर्मितीक्षम उत्पादने आणि त्यांचे तत्काळ विश्लेषण करण्याची सुविधा यांचाही या संशोधनामध्ये समावेश करायला हवा. त्या पद्धतीच्या साधनसुविधांची निर्मिती, उद्योग संरचना विकसित करण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज संकल्पनेमध्येही निसर्गाला ओरबाडू नका, असाच संदेश आहे. मानवी समुदायाचे भवितव्य उज्ज्वल बनवायचे असेल, तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासक्षम हरित रसायनशास्त्राला पर्याय नाही, असा संदेश डॉ. साळुंखे यांनी दिला.

कार्यक्रमात आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत करून परिचय करून दिला, तसेच आभार मानले. डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत उद्या (दि. ४ मे) सायं. ७ वाजता टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. कंपनीचे उप-सरव्यवस्थापक विनय कुलकर्णी यांचे आविष्कार जल अभियांत्रिकीचा!’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

रविवार, २८ एप्रिल, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी

डॉ. माणिकराव साळुंखे

विनय कुलकर्णी


डॉ. भालचंद्र काकडे

कोल्हापूर, दि. २८ एप्रिल: येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये देशातील पाच नामांकित विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी यांची व्याख्याने होणार आहेत. दि. ३ व ४ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या व्याख्यानांचे आ’लोकशाही (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल. ही माहिती वाहिनीचे संपादक व व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी दिली आहे.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा तृतीय स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये दि. ३ मे रोजी माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचे ‘हरित रसायनशास्त्र’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. साळुंखे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासह राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (जयपूर), सिम्बायोसिस (इंदोर), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) आणि भारती विद्यापीठ (पुणे) या पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविलेले आहे. रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहेच, त्याबरोबरच धडाडीचे शैक्षणिक प्रशासक म्हणूनही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. ‘विद्येच्या प्रांगणात’ हे त्यांचे आत्मचरित्र अत्यंत लोकप्रिय आहे.

या व्याख्यानमालेत दि. ४ मे रोजी प्रसिद्ध अभियंते विनय कुलकर्णी यांचे ‘आविष्कार जल-अभियांत्रिकीचा’ या विषयावर व्याख्यान होईल. हायड्रॉलिक्स आणि वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट या विषयातील एम.टेक. असणारे श्री. कुलकर्णी हे मूळचे निपाणीजवळील बेनाडी येथील असून गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ देशातील एक महत्त्वाचे स्टॉर्मवॉटर स्पेशालिस्ट आणि वॉटर रिसोर्स अभियंते म्हणून काम करीत आहेत. ते सध्या पुण्यातील टाटा कन्सल्टिंग इजिनिअर्स लि. या कंपनीत उप-सरव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. देशातील अनेक धरणे, पायाभूत सुविधा प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्प यांचे मूलभूत संकल्पना अहवाल निर्मितीपासून ते त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापर्यंत त्यांचे योगदान राहिले आहे. फियाट, महिंद्रा, गोदरेज, एम्बसी, जॉन-डिअर आदी कंपन्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्ट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत सिल्चर, कोईमतूर येथील मल्टीमोडल लॉजिस्टीक पार्क उभारणीतही त्यांचे योगदान आहे.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत गेल्या दोन वर्षांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे, ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे आणि कोविड-१९वरील लस संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चमूमध्ये योगदान देणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची अतिशय लक्षवेधक व्याख्याने झालेली आहेत. ती आजही मोठ्या प्रमाणावर ऐकली जात आहेत. सदर व्याख्यानमाला आ’लोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना युट्यूबवर @alokshahi या वाहिनीवर जाऊन सहभागी होता येईल.


रविवार, १४ एप्रिल, २०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे वास्तवभान

 (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या निमित्ताने 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला विशेष लेख या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचकांसाठी मूळ स्वरुपात शेअर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारतीय समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतात १९५२च्या पहिल्या निवडणुका झाल्यानंतर जून १९५३मध्ये बीबीसीसाठी एडन क्रॉली यांनी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी उपरोक्त विधान केले. भारतीय नागरिक जोपर्यंत त्याच्या विषमतावादी, जातीयवादी मानसिकतेमधून बाहेर पडत नाही आणि वर्तनाच्या पातळीवर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाही मूल्ये आत्मसात करीत नाही, तोवर या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजणे अशक्य आहे, असे त्यांचे मत होते. खरे तर, ही त्यांची चिंता होती. भारतीय समाज हा त्याच्या जातजाणिवांतून बाहेर पडावा, जातिगत संवेदनांचा त्याग करून त्याच्यात समग्र देशबांधवांप्रती संवेदनांचा विकास व्हावा, भारत हा मानवीय पातळीवर एक व्हावा, त्याच्यात एकराष्ट्रीयत्वाची सच्ची भावना जागृत व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर परिश्रम घेतले होते. बाबासाहेब सातत्याने लोकशाही मूल्यांसाठी आग्रही राहिले. विशेषतः भारतीय समाजामध्ये त्यांची अग्रक्रमाने प्रस्थापना होणे त्यांना आवश्यक वाटत होते. त्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याचा पायाच मुळी या देशात समताधिष्ठित समाजाचा विकास हा होता. बाबासाहेबांचा लढा केवळ दलितमुक्तीसाठी होता, हे अर्धसत्य आहे. ते लढले अखिल मानवमुक्तीसाठी, हे पूर्णसत्य. कारण जोवर या देशातील नागरिक चातुर्वर्णीय स्तरित मानसिकतेमधून बाहेर पडत नाही, तोवर तो एकसंध समाज म्हणून कधीही एकत्र येऊ शकणार नाही. बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनलढा हा त्यासाठी होता. म्हणून या देशात लोकशाहीच्या माध्यमातून मानवतावादी मूल्यांची प्रतिष्ठापना हा त्यांच्या प्राधान्यक्रमावरील महत्त्वाचा विषय होता. मात्र, भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय समाजाला प्रदान केलेली ही मूल्ये येथील प्रत्येक व्यक्तीच्या आचरणामध्ये उतरली, तरच ती खऱ्या अर्थाने रुजतील, अन्यथा नाही, याचे इशारे त्यांनी संविधानाच्या निर्मितीनंतरही वेळोवेळी देऊन ठेवले आहेत.

संविधान सभेच्या कामकाजाला ९ डिसेंबर १९४६ पासून सुरवात झाली. ३१ डिसेंबर १९४६ रोजी संविधानाचे साध्य आणि उद्दिष्ट सांगणारा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. पुरूषोत्तमदास टंडण यांनी ठरावाला अनुमोदन देणारे भाषण केले. डॉ. एम.आर. जयकर यांनी मुस्लीम लीग आणि भारतीय संस्थानिकांच्या प्रतिनिधींचे सहकार्याची गरज व्यक्त केली. ते सहभागी होईपर्यंत या ठरावावरील चर्चा पुढे ढकलावी, असे मत व्यक्त केले. साहजिकच बहुतेक सदस्यांनी त्यांच्या या दुरुस्तीला विरोध केला. या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर १९४६ रोजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बोलण्यासाठी पुकारले. संविधान सभेचे कामकाज सुरू झाल्याच्या नवव्या दिवशी त्यांचे पहिले भाषण झाले. तोवर डॉ. आंबेडकर यांच्याविषयी त्या सभेत बसलेल्या देशभरातील नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी अनेक ग्रह-पूर्वग्रह होते. जयकरांप्रमाणे तेही आता सभागृहाचा रोष ओढवून घेतील, असेच अनेकांना वाटले. पण, प्रत्यक्षात त्यांचे भाषण इतके प्रभावी झाले की, त्यानंतर सभागृहाबाहेर लॉबीमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सदस्यांनी गराडा घातला. खरे तर, इतक्या लवकर सभेत आपल्याला बोलण्याची संधी मिळेल, असे त्यांना वाटले नव्हते. त्यामुळे त्यांनी भाषणाची अशी तयारी केलेली नव्हती. तरीही त्यांनी अत्यंत मुद्देसूद, आशयगर्भ आणि दिशादर्शक मांडणी केली. “आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत, याची मला जाणीव आहे. आपण एक-दुसऱ्याच्या विरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत. आणि मी तर यापुढेही जाऊन हेही मान्य करेन की, बहुशः एका छावणीचा मीही एक नेता आहे. परंतु, हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की, अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. विभिन्न जाती आणि संप्रदाय असले तरी आपण एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही.असा प्रखर आत्मविश्वास बाबासाहेब व्यक्त करतात. आपल्या विरोधकांचे पूर्वग्रह लक्षात घेऊन त्यांना काही सवलती देऊ या, त्यांना सोबत घेऊ या, जेणेकरून आपण ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत, त्या मार्गावर ते स्वखुशीने येऊन मिळतील. या मार्गावर जर आम्ही सर्वांनी दीर्घकाळ वाटचाल केली तर, तीच आम्हाला निश्चितपणे ऐक्याकडे घेऊन जाईल, असा विश्वास ते सभेला देतात. हा विश्वास सुनिश्चित करण्याच्या दिशेनेच बाबासाहेबांनी त्यापुढील काळात राज्यघटनेची संरचना केल्याचे दिसते. एकसंध समाजनिर्मितीसाठी आवश्यक तमाम मूल्यांचे समावेशन त्यांनी त्यात केले.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन संविधान संमत झाले. त्या आधी एक दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविश्रांत आणि विद्वत्तापूर्ण योगदानाचा गौरव संविधान सभेतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला. त्यावेळी अर्थात २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकर यांचे भारतीय समाजाला जबाबदाऱ्यांची जाणीवा करून देणारे अत्यंत महत्त्वाचे भाषण झाले.

सुमारे ५५ मिनिटांच्या या अंतिम ऐतिहासिक भाषणात त्यांनी संविधानाच्या समोरील प्रमुख आव्हानांचा वेध घेऊन काही बाबींच्या संदर्भात निःसंदिग्ध इशारा देऊन ठेवला आहे. ते म्हणतात, “संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील, तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच, संविधान कितीही वाईट असो, ते राबविणारे जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. भारतातील लोक आणि राजकीय पक्ष कसे वागतील, हे कोण सांगू शकेल? आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गांचा अवलंब करतील की क्रांतीकारी मार्गांचा? त्यांनी क्रांतीकारी मार्गांचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो, ते अयशस्वी होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणून भारतीय लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील, हे जाणून घेतल्याशिवाय संविधानाबाबत कोणताही निर्णय घेणे निरर्थक ठरेल.”

भारताच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेविल की पुन्हा गमावून बसेल? भवितव्याबाबतचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करीत असल्याचे सांगून बाबासाहेब म्हणतात की, भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले, असे नव्हे, तर देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले, ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते.... जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरुपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबत भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही त्यात भर पडणार आहे. भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्त्वप्रणालीला मोठे मानतील, मला माहित नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.

भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांचीही चर्चा बाबासाहेबांनी या भाषणात केली आहे. भारताला लोकशाही म्हणजे काय, हे माहित नव्हते, असे नाही. एक काळ असा होता की, भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एक तर निवडलेली असायची किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून भारताला संसद आणि संसदीय प्रणाली यांचा परिचय होताच. ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार का, मला माहित नाही. परंतु, भारतासारख्या देशात हे सहजशक्य आहे की, लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे- जिथे लोकशाहीने हुकूमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे. हे सहजशक्य आहे की, नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरुप सांभाळेल, परंतु प्रत्यक्षात ती हुकूमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे.

लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी काय करायला हवे, हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार, सत्याग्रह या मार्गांना दूर ठेवले पाहिजे. जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत, तेव्हा असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे. जितक्या लवकर त्यांना दूर सारू, तेवढे ते आपल्या हिताचे आहे.

भारतीय समाजाला आणखी एक सर्वाधिक महत्त्वाचा इशारा बाबासाहेब देतात, तो हा की, “भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणतात येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल; परंतु, राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.” त्याचबरोबर राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तनाची गरजही अधोरेखित करतात. ते म्हणतात, “राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही एक असा मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. या त्रयीची एकमेकांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय.” हजारो जातींमध्ये विखुरलेल्या लोकांचे एक राष्ट्र होऊ शकत नाही. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही, याची जाणीव आम्हाला जेवढ्या लवकर होईल, तितके ते आमच्या हिताचे ठरेल, असेही बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.

क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी राष्ट्र आणि राष्ट्रीयता म्हणजे नेमके काय, हे फार विस्तृतपणे सांगितले आहे. राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिकदृष्ट्या कितीही एकात्म असलेला प्रदेश नव्हे. राष्ट्र म्हणजे केवळ समान भाषा, समान धर्म, समान वंश यातून निर्माण झालेल्या समान संस्कृतीचे लोक नव्हेत. राष्ट्रीयता ही एक आत्मनिष्ठ मानसिकता आहे. ही एक अशी भावना आहे की ज्यात सर्वांमध्ये सामूहिक एकतेची भावना असते आणि त्यामुळे आपण सर्व आप्तसंबंधी आहोत, असे त्यांना वाटते. ही राष्ट्रीय भावना दुहेरी स्वरुपाची असते व दुसरीकडे जे आपले नाहीत त्यांच्याबाबत बंधुत्वाच्या भावनेचा विरोध आढळून येतो. आपल्या स्वतःच्या गटात राहण्याची इच्छा आणि दुसऱ्या गटात न जाण्याची इच्छा त्यात असते. आणि जे आपल्या गटाच्या बाहेर आहेत, त्यांच्याशी संबंध न बाळगण्याची इच्छाही त्यात असते. राष्ट्रीयत्वाचा आणि राष्ट्रीय भावनेचा हा गाभा आहे. स्वतःच्या गटातील लोकांतच राहण्याची इच्छा ही एक मानसिक, आत्मकेंद्रित अवस्था आहे. या भावनेचा भूगोलाशी, संस्कृतीशी, आर्थिक प्रश्नांशी वा सामाजिक संघर्षाशी काही संबंध नसतो. भौगोलिक एकात्मता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि भौगोलिक एकात्मता नसतानाही ही भावना अत्यंत प्रबळ असू शकते. सांस्कृतिक एकता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि आर्थिक व वर्गीय संघर्ष असूनही आपण या गटाचे आहोत, या राष्ट्राचे आहोत, ही भावना प्रखर होऊ शकते. मुख्य मुद्दा असा की, राष्ट्रीयता हा केवळ भूगोल, संस्कृती यांच्याशी संबंध असलेला प्रश्न नाही.

असे जर असेल तर मग भारतासारख्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल. कोणत्या बाबींचे भान राखायला हवे, याचीही चर्चा बाबासाहेबांनी पुणा डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीमध्ये केलेल्या भाषणात केली आहे. या भाषणात लोकशाहीच्या त्यांना अभिप्रेत असलेल्या व्याख्येपासून अनेक गोष्टींचा ऊहापोह त्यांनी केला. गेट्टीसबर्ग येथील भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकांचे, लोकांनी व लोकांच्यासाठी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या केली. लोकांना लोकशाहीची जाणीव करून देणाऱ्या अशा अनेक व्याख्या असल्याचे बाबासाहेब सांगतात. आपल्याला अभिप्रेत लोकशाहीची व्याख्या सांगताना बाबासाहेब म्हणतात की, रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतीकारी बदल घडवून आणणाऱ्या शासन व्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात.

केवळ लोकशाहीची व्याख्या सांगून बाबासाहेब थांबत नाहीत, तर त्यापुढे जाऊन लोकशाहीच्या यशस्वितेसाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याचीही साद्यंत चर्चा करतात. त्या बाबी अशा-

विषमताविरहित समाजव्यवस्था: लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये. पिळलेला, दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत व जो केवळ ओझ्याचा बैल आहे, असे वर्ग समाजात असता कामा नयेत. समाजाच्या या व्यवस्थेत व विभाजनात रक्तरंजित क्रांतीची बीजे असतात आणि कदाचित हे दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होईल. जगातील वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केली असता असे आढळते की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक महत्त्वाचे आहे.

विरोधी पक्षाचे अस्तित्व व माध्यमांची भूमिका: हा मुद्दा स्पष्ट करताना बाबासाहेब लोकशाहीच्या कार्यासंबंधी चिंतन करतात. त्या अनुषंगाने ते लोकशाहीला नकारशक्ती मानतात. अनुववंशिक अधिकार किंवा स्वयंसत्ताक अधिकार यांचा प्रतिशोधक म्हणजे लोकशाही. ज्यांची देशावर सत्ता आहे त्यांच्या अधिकारावर कोठे तरी केव्हा तरी नकाराधिकार वापरणे म्हणजे लोकशाही, असे सांगतात. स्वयंसत्ताक राज्यव्यवस्थेत नकाराधिकार नसतो. राजाची एक वेळ नियुक्ती झाल्यानंतर अनुवंशिक किंवा दैवी अधिकार म्हणून तो राज्य करतो. परंतु लोकशाहीत सत्तेवर असणाऱ्यांना दर पाच वर्षांनी जनतेला सामोरे जावे लागते. तथापि, या पाच वर्षांच्या मधल्या काळात सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या तात्काळ नकाराधिकाराची लोकशाहीला फार आवश्यकता असते. जे शासनाला तेथेच आणि त्यानंतर तात्काळ आव्हान करू शकतील, अशा लोकांची संसदेत नितांत आवश्यकता असते. लोकशाही म्हणजे राज्य करण्याचा कोणाचाही अखंड अधिकार नव्हे. राज्य करण्याचा अधिकार हा लोकांच्या मान्यतेला बांधलेला असतो व त्याला संसदेत आव्हान करण्यासाठी विरोधी पक्ष ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. सत्याधाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला न मानणाऱ्या लोकांसाठी केलेल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे, यालाच विरोधी पक्ष म्हणतात.

याठिकाणी बाबासाहेब माध्यमांच्या भूमिकेविषयीही प्रश्न उपस्थित करतात. आपल्या देशातील सर्व वृत्तपत्रे कोणत्या तरी एका कारणासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी जाहिरातीपासून उत्पन्न उपटण्याचे साधन आहे. अशी वृत्तपत्रे शासनाला विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रसिद्धी देतात. कारण त्यांना विरोधी पक्षाकडून जाहिरातीचे उत्पन्न मिळत नाही. शासनाकडून उत्पन्न मिळते आणि मग साहजिकच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांच्या वृत्तांताने वर्तमानपत्रांचे स्तंभच्या स्तंभ भरतात आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या भाषणाचे वृत्तांत कोठेतरी शेवटच्या पानावर शेवटच्या स्तंभात दिले जातात. वृत्तपत्रांनीही लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची गरज बाबासाहेब येथे व्यक्त करतात.

कायदा व प्रशासन यांसमोरील समानता: कायद्यासमोरील समानता ही बाब न्यायपालिकेच्या अखत्यारीतील आहे. त्यांनी कोणताही दबाव न घेता न्यायाला सर्वोच्च स्थानी मानून कार्य करणे आवश्यक आहे. एखादा गुन्हेगार सत्तारुढ पक्षाशी संबंधित असल्यास त्याच्या भागातील पक्षप्रमुख न्यायाधीशांना सांगू लागला की, तो आमच्या पक्षाचा असल्यामुळे त्याच्यावर खटला भरणे उचित नाही. याउपर आपण आमच्या सांगण्याप्रमाणे वागला नाहीत, तर हे प्रकरण मंत्रीमहोदयांकडे नेऊन आम्ही आपली बदली करू. असे घडू लागले तर मोठी अनागोंदी आणि अन्याय शासनात निर्माण होईल. अशा नाशपद्धतीला (स्पॉईल सिस्टीम) आपण लोकशाहीत थारा देता कामा नये. नाशपद्धती म्हणजे एखादा पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्याच्या पूर्वसुरी सत्ताधारी पक्षाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना, कारकून आणि शिपाई यांच्यासह सर्वांना कामावरुन काढून टाकणे आणि त्यांच्या ठिकाणी त्या नवीन पक्षाला सत्तेवर येण्यासाठी ज्यांनी मदत केली, अशा लोकांची नेमणूक करणे. सत्ताधारी पक्षाने त्या पक्षाच्या सदस्यांच्या फायद्यासाठी प्रशासन न राबविता प्रशासनात समानतेची, समन्यायी वागणूक ही बाब लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे.

सांविधानिक नैतिकता: बाबासाहेब लोकशाहीच्या बाबतीत सांविधानिक नैतिकतेला फार मोलाचे स्थान देतात. हा मुद्दा स्पष्ट करताना ते सांगतात की, ज्यांना भारतीय संविधान नष्ट करून त्याचा नवीन मसुदा करावासा वाटतो, अशा लोकांमध्ये सामील होण्यास माझी खरोखरीच तयारी आहे. परंतु आपण हे विसरतो की, आपले संविधान म्हणजे दुसरेतिसरे काही नसून वैध तरतुदींचा समावेश असलेला तो केवळ सांगाडा आहे. या सांगाड्याचे मांस, आपण ज्याला सांविधानिक नैतिकता म्हणतो, त्यामध्ये आहे. यालाच इंग्लंडमध्ये संविधानाचे संकेत म्हणतात. आणि लोकांनी त्या संकेतांचे पालन केलेच पाहिजे. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे उदाहरण देऊन बाबासाहेब हा मुद्दा स्पष्ट करतात. वॉशिंग्टन यांची पहिली टर्म संपल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास नकार दिला. वास्तविक ते दहा वेळा उभारले असते, तरी तितक्या वेळा लोकांनी त्यांना निवडून दिले असते. मात्र, त्यांनी लोकांना संविधानाची आठवण करून दिली. आपल्याला अनुवांशिक राजा किंवा हुकूमशहा नको आहे. तुम्ही माझी पूजा करू लागलात, तर आपल्या तत्त्वप्रणालीचे काय?, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तरीही लोकाग्रहास्तव ते दुसऱ्यांना अध्यक्ष झाले. तिसऱ्यांदा मात्र त्यांनी लोकांना झिडकारले. हे सांविधानिक नैतिकतेचे उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांनी त्याचे पालन करणे हे लोकशाहीच्या हिताचे आहे.

अल्पमताचा सन्मान: लोकशाहीच्या नावावर बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमतवाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमतवाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमतवाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किंवा त्यांना डावपेचाने मार दिला जातो आहे, अशी अल्पमतवाल्यांची भावना होता कामा नये. अल्पमतवाल्या पक्षाने मांडलेल्या प्रस्तावास सत्ताधारी पक्षाने नेहमीच विरोध केला तर अल्पमतात असलेल्या सदस्यांना त्यांची गाऱ्हाणी मांडण्याची संधी मिळणार नाही. याचा परिणाम असा होईल की, अल्पमतातील लोकांमध्ये बेसनदशीर क्रांतीची वृत्ती बळावते. त्यामुळे लोकशाहीप्रमाणे ज्यावेळी कामकाज चाललेले असते आणि ज्या बहुमतांतील लोकांवर ती अवलंबून असते, त्यावेळेस बहुमतातील लोकांनी जुलमी पद्धतीने वागता कामा नये, असे बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.

नैतिक अधिष्ठान: समाजातील नैतिक अधिष्ठान कार्यशील ठेवणे लोकशाहीला अत्यावश्यक आहे. नितीशास्त्र हे राजकारणापासून अलिप्त अथवा भिन्न असू शकत नाही. लोकशाहीच्या संबंधाने मुक्त शासन असे संबोधले जाते. मुक्त शासन म्हणजे समाज जीवनाच्या भव्य दृष्टीकोनातून लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय प्रगतीसाठी मोकळे सोडणे होय. किंवा जर कायदाच करावयाचा असेल तर, कायदा करणाऱ्याला अशी खात्री पाहिजे की, कायदा यशस्वी होण्यासाठी समाजामध्ये पुरेसे नैतिक अधिष्ठान आहे. नैतिक सुस्थिती नसल्यास लोकशाहीचे तुकडे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा बाबासाहेब देतात.

लोकनिष्ठा: लोकशाहीला लोकनिष्ठेची फार गरज असते, असे बाबासाहेब सांगतात. लोकनिष्ठा म्हणजे सर्व अन्यायाच्या विरोधात आंदोलनासाठी उभी राहणारी कर्तव्यनिष्ठा. कोणावर अन्याय होतो आहे, ही गोष्ट गौण आहे. प्रत्येकाने, मग तो त्या विशिष्ट अन्यायाखाली भरडलेला असो अगर नसो, अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या माणसाच्या मुक्तीसाठी मदत करण्याची तयारी केली पाहिजे. जर अन्यायाखाली चिरडल्या गेलेल्यांना अन्यायाचे निवारण करण्यासाठी इतरांपासून मदत झाली नाही, तर अशा वेळी लोकशाही धोक्यात आणणारी बंडाची वृत्ती त्यांच्यात बळावल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचा विचार असा साकल्याने मांडताना दिसतात. लोकशाहीचे रोपटे सर्वच ठिकाणी वाढत नाही. आपल्याला त्याची सदोदित जोपासना करीत राहावे लागते. लोकशाहीच्या मूल्यांची सातत्याने तपासणी आणि राखण करावी लागते, तेव्हा कुठे ती कार्यान्वित राहते. लोकशाहीस पोषक अशा संविधानाचेही पोषण करीत राहावे लागणार आहे. पंचवार्षिक निवडणुकांतून मतदान हे आणि एवढेच आपले कर्तव्य नाही, तर सजग नागरिकाची भूमिका लोकशाही जोपासनेत आणि संवर्धनात महत्त्वाची असते. लोकशाहीमध्ये मतदान हे तर महत्त्वाचेच; मात्र, एक व्यक्ती, एक मत इथवरच अद्याप आपला प्रवास येऊन ठाकला आहे. येथून पुढचा बाबासाहेबांना अभिप्रेत एक व्यक्ती, एक मूल्य हा सांविधानिक मूल्यांपर्यंतचा प्रवास अद्याप बाकी आहे. तो पूर्ण करणे म्हणजेच देशातील समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीप्रणालीशी सुसंगत करणे आणि बाबासाहेबांचे उपरोक्त मुलाखतीमधील विधान खोडून काढून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणे होय.