कथा-कादंबऱ्यात अलिकडं जीव रमत नाही. वर्तमानातील भोवताल अस्वस्थकारक
असताना कल्पनाविश्वात रमावं, अशी मनोवस्था नाहीय. मात्र, काही वर्षांपूर्वी ‘डियर तुकोबा’ या कादंबरीकडं तिच्या नावामुळं खेचला गेलो होतो आणि ती वाचल्यानंतर
तिच्या लेखकाकडं खेचला गेलो.
विनायक होगाडे या युवा लेखकाचा मी चाहता झालो आहे. त्याचं ‘डियर तुकोबा’ वाचलं आणि तोच त्याला- मला जोडणारा धागा ठरला. ऐतिहासिक पात्रांची वर्तमानाच्या
प्रतलावर फेररचना करीत मिथककथा, लोककथा, इतिहासातील नेमके संदर्भ यांचा अत्यंत
चपखल वापर करीत कथाबीज फुलवत नेत वाचकाला आपसूक कह्यात घेणारे मर्मग्राही लेखन हे
विनायकचे वैशिष्ट्य. तुकोबामध्ये त्याने संत तुकारामांची मीडिया ट्रायल ज्या
पद्धतीनं मांडली आहे, तिला तोडच नाही. आता विनायकचीच ताजी कादंबरी वाचून पूर्ण झाली
आहे.
तुकोबानंतर पुढचं पाऊल टाकताना ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या
पुस्तकाची विनायकनं घोषणा केली होती, तेव्हापासूनच आता विठोबाचं तो काय करणार, हे
वाचण्याची उत्सुकता लागून राहिली होती. त्या उत्सुकतेपोटीच पुस्तक प्रकाशित होताच
मागवून वाचून संपवलं. एकच सांगतो, विनायक आपली अजिबात निराशा करीत नाही. आजच्या
तरुणाईला संतपरंपरा समजून घ्यायची, तर त्यांचं समग्र साहित्य किमान नजरेखालून
घालणं आवश्यकच ठरतं. तथापि, विनायक त्यांचा हा भार थोडा हलका करतो आणि या मुलांनी किमान
‘विठोबा’ वाचलं, तरी त्यांना आपल्या या
परंपरेची एक झलक निश्चितपणानं समजून घेता येऊ शकेल, अशी मांडणी करतो. मात्र ही
मांडणी ओढूनताणून येत नाही, तर कथाबीजाची आवश्यकता म्हणून हा काळाचा व्यापक पट
आपल्यासमोर उलगडत जातो.
पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पनाच वेगळी आहे. आजवर संत विठोबाच्या वारीला
येत आले आहेत. इथं मात्र साक्षात विठोबाच संतवारीला निघालेला आहे. तो का आणि कसा,
हे कादंबरीतच वाचणं खरं रंजक आहे. समकाळासह भूत-वर्तमानाच्या पटलावर आंदोलने घेत
अत्यंत गतीने या कादंबरीचा पट आकार घेत राहतो आणि आपल्यालाही विठोबासमवेत ही
विस्मयकारक वारी घडवतो. समताग्रही संतांना सामाजिक आंदोलने आणि बहिष्कारांना तोंड
देत आपले दायित्व वेळोवेळी सिद्ध करीत राहावे लागले. त्यांचा विषमतेवरील प्रहार,
वंचितांप्रती कळवळा या साऱ्यांचा वेध विनायक इथे घेतोच, पण काळाच्या पटलावर या
संतविचारांचा अनुयायांकडूनच झालेला पराभव, नैतिक मूल्यांची घसरण यावरही मर्मभेदी प्रकाश
टाकतो. मुखी हरीनाम, संतविचार आणि कृतीमध्ये, आचरणामध्ये मात्र भेदाभेद अशा दांभिक
विसंगतीमध्ये जगणाऱ्या या समाजाचे दर्शन इथे घडते. संतांच्या विचारांचं, उपदेशाचं
आपण नेमकं काय करून ठेवलं आहे, त्याचा अत्यंत बोचरा वेध ही कादंबरी घेते आणि तीही
विठोबाच्या परिप्रेक्ष्यातून.
अनेक संतांनी एका अशा नगरीची कल्पना केली आहे की, जिथे दुःख नाही, सुख
आहे, आनंद आहे, समता आहे आणि म्हणूनच समाधान आहे. आजच्या भोवतालावर नजर
टाकल्यानंतर विठोबालाही तशाच एका नगरीची आस लागून राहिलेली आहे. पण वास्तव काय आहे? हा ‘युटोपिया’ प्रत्यक्षात येणार का? मानवी समाजानं ज्या दिशेनं वाटचाल चालवली आहे, ती पाहता तो युटोपियाच
राहणार, हे खरं असलं तरी विनायकसारखे युवक त्यातला काही अंश सत्यात उतरविण्यासाठी
आपापल्या परीनं कार्यरत आहेत, ही मोलाची, आशेची बाब आहे. या युवकांमधली ही
सकारात्मकता, सामाजिक आस्था, कणव, संवेदनशीलतेनं समग्राकडं पाहण्याची दृष्टी हे
सारं प्रचंड आश्वासक आहे. ‘डियर तुकोबा’प्रमाणंच हा ‘विठोबा’ही नक्कीच
इतिहास घडविणार आहे. विनायककडून अशा अनेकानेक दर्जेदार साहित्यकृतींची अपेक्षा आहे.
खऱ्या अर्थानं बुद्धप्राप्तीच्या दिशेनं वाटचाल करणारा समकाळातला एक अतिशय
महत्त्वाचा लेखक म्हणून त्याचा झालेला उदय मला खूप आश्वासक वाटतो.
विठोबा मिसिंग इन पंढरपूर
लेखक: विनायक होगाडे
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे: ३६७
किंमत: रु. ४००/-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा