शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

दुसरा यमकर होणे नाही..! या सम हाच...

अनिल यमकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी उपसंचालक वसंत शिर्के आणि आणि सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके आणि सहकारी.

अनिल यमकर यांना शुभेच्छा देताना डॉ. आलोक जत्राटकर.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातील माझे ज्येष्ठ सहकारी, छायाचित्रकार अनिलजी यमकर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. नुकताच त्यांचा सुमारे तीन तास चाललेला भरगच्च असा निरोप समारंभ अनुभवून परत आलोय.
यमकर यांनी महाराष्ट्र शासनामध्ये केवळ छायाचित्रकार म्हणून सेवा बजावली, इतकंच म्हणणं त्यांच्या गेल्या तीसेक वर्षांच्या कारकीर्दीवर अन्याय केल्यासारखे होईल. कारण, यमकर हा माणूस त्यापलिकडे काही तरी आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेतून निर्माण झालेली छायाचित्रकारिता इतक्या प्रदीर्घ कालावधीत कोल्हापूरसह अखिल महाराष्ट्रानं वेळोवेळी अनुभवली आहेच. पण, यमकरांनी सेवा बजावत असताना कोल्हापूरसह सर्वदूर एक व्यापक जनसंपर्क निर्माण केला. जी माणसं जोडली, त्यातून त्यांचं म्हणून एक वर्तुळ आकाराला आलं. याला त्यांचं स्नेहशील, स्वागतशील, मृदू मितभाषी वर्तन आणि समाधानी सुहास्यमुद्रा कारण होती. ‘नाही’ हा शब्दच यमकरांच्या शब्दकोषामध्ये कधी नव्हता. कोणत्याही विभागाचं काम असो, अगर बाहेरचं काही नियोजन असो, त्यांनी प्रत्येकाच्या सादाला तत्परतेनं दिलेला प्रतिसाद हे त्यांच्या या प्रचंड जनसंपर्काचं गमक आहे. कितीही ताणतणावाची परिस्थिती असली तरी संयम, तोल ढळू न देता आपलं नियमित काम ते अत्यंत इमानेइतबारे करीत होतेच, पण त्यापलिकडे जाऊन सर्वांसाठी त्यांचा मदतीचा हातही तितकाच तत्पर असे. मग तिथे ते वरिष्ठ-कनिष्ठ वगैरे कोणताही भेद मानत नसत. लोकांचं कोणतंही काम असो, त्याच्या पूर्ततेमध्ये अत्यंत निरपेक्ष, निस्वार्थ भावाने त्यांना मदत करणं, हे यमकरांचं फार महत्त्वाचं स्वभाववैशिष्ट्य आहे. म्हणूनच आजच्या निरोप समारंभाला माहिती जनसंपर्कचं संपूर्ण कार्यालय फुला-रांगोळ्यांनी सजलं, उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह सर्व सहकारी हा सोहळा अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रेमानं राबले, अगदी अल्पावधीत त्यांच्यावर आठेक मिनिटांची एक उत्तम ध्वनीचित्रफीत तयार केली, जिल्हाधिकारी अमोल येडगे हे खास वेळ काढून यमकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले, दहा मिनिटांहून अधिक वेळ त्यांच्यासमवेत व्यतित केली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, त्यांचे सहकारी अनिल तांदळे आणि विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले, माजी उपसंचालक वसंत शिर्के सर आपला निवृत्त झाल्यानंतर कार्यालयात पुन्हा न येण्याचा शिरस्ता मोडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आठवणीने उपस्थित राहिले, यमकरांचे बॉस राहिलेले अनेक माजी जिल्हा माहिती अधिकारी या प्रसंगी आवर्जून आले, कोल्हापूर प्रेस क्लब, अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सदस्य, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे जनसंपर्क अधिकारी यांच्यासह यमकरांचा प्रचंड मोठा मित्रपरिवार यावेळी उपस्थित राहिला.
आदरणीय यमकर वहिनी आज या निरोप समारंभाच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी शेवटी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “साहेबांनी कधी त्यांच्या कामाबद्दल आम्हाला काही सांगितलं नाही, मात्र आज उपस्थितांनी व्यक्त केलेल्या मनोगतांमधून त्यांनी किती चांगलं काम केलंय, याची माहिती होऊन मन अभिमानानं भरून गेलंय.” खरं आहे वहिनी, अभिमानानं ऊर भरून यावा, असाच तुमचा नवरा आणि आमचा हा ज्येष्ठ मित्र आहे. यमकर हे कोल्हापूर विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा चेहरा होते, ब्रँड अँबॅसिडर होते. आपल्या सेवेव्यतिरिक्तही विभागाला असा चेहरा प्रदान करण्याचे काम करणारा यमकरांसारखा दुसरा सहकारी पुन्हा होणे नाही, मिळणे नाही, अशीच भावना या प्रसंगी मनी येत आहे. गेल्या तीस वर्षांच्या सेवेतील महत्त्वाच्या घडामोडींचं दस्तावेजीकरण करावं, अशी सूचना समीर देशपांडे यांनी यावेळी केली. त्या दृष्टीने यमकरांनी काम करावं, आवश्यक प्रसंगी विभागालाही मदत करावी, आणि हे सर्व आता कुटुंबाला वेळ देत करावं, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावी आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा