शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

सरला माहेश्वरी आणि दूरदर्शनच्या आठवणी...

सरला माहेश्वरी

शम्मी नारंग आणि रिनी खन्ना

निती रविंन्द्रन, गीतांजली अय्यर, मीनू तलवार आणि सलमा सुल्तान




दूरदर्शनच्या न्यूज अँकर सरला माहेश्वरी यांचं काल ७१ व्या वर्षी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहात असताना त्या कालखंडातील अनेक आठवणी मनी जागू लागल्या. सरला माहेश्वरी हे नाव आजच्या पिढीला तितकंसं माहिती असण्याचं कारण नसलं तरी दूरदर्शनवरील सोज्वळ प्रज्ञाशील चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. आजच्या कर्कश्य आणि नकोशा वाटणाऱ्या अँकरिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांचं शांत, सस्मित असं बातम्यांचं वाचन हा दूरदर्शनच्या बातमीपत्रांना नवी उंची प्राप्त करून देणारा होता. हिंदीवर प्रकांड म्हणावं, असं प्रभुत्व असणारं हे व्यक्तीमत्त्व त्यांच्या शालीनतेमुळं वेगळं उठून दिसायचं. आजकाल लोकांना स्क्रीनला खिळवून ठेवण्यासाठी अँकरला नाना गोष्टी कराव्या लागतात. ती आजच्या २४x७ वाहिन्यांच्या जमान्यात कदाचित गरजही आहे. तथापि, केवळ आपल्या शब्दफेकीतून आणि आवाजाच्या आवश्यक तितक्या चढउतारांमधून बातमीचं महत्त्व आणि मूल्य अधोरेखित करण्याचं कौशल्य त्यांच्याकडं होतं. एनडीटीव्हीच्या निधी कुलपतींना पाहिलं की मला माहेश्वरींची हटकून आठवण यायची. कुलपतीही नुकत्याच निवृत्त झाल्यात. माहेश्वरी यांच्या निमित्तानं त्या काळच्या दूरदर्शनमधील अनेक न्यूज अँकर मला त्यांच्या नावानिशी आठवू लागले, याचं माझं मलाही आश्चर्य वाटू लागलं.
यात पहिल्या आठवल्या त्या सलमा सुल्तान! मुस्लीम समाजातील सलमा याही टापटीपतेचा आणि व्यावसायिकतेचा मोठा आदर्श होत्या, असं म्हणायला हवं. परवीन बाबीसारखा हेअरकट, केसांत व्यवस्थित खोवलेले गुलाबाचे फूल आणि साडी गळ्यावरुन अगदी परफेक्ट कोनात दुमडलेली. अखेरपर्यंत त्यांच्या या नीटनेटकेपणात काहीही फरक पडला नाही. आज तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, सलमा या हसत नाहीत, यावरुन त्या काळी देशभरात जशा चर्चा घडल्या, तसंच त्यांनी एकदा स्माईल दिलं, तर त्याच्याही बातम्या झालेल्या. म्हणजे, हे न्यूज रीडर बातमीपत्राच्या अखेरीस जय हिंद.. शुभ रात्री... असं म्हणाले की कॅमेऱ्याकडं पाहून एक हलकंसं स्माईल द्यायचे. पुरूष अँकरही त्याला अपवाद नव्हते. मात्र सलमा त्याला अपवाद होत्या. सलमा इतरांसारख्या हसत नाहीत, याचा माझ्या आईलाही खूप त्रास होई. माध्यमांतच कार्यरत असल्याने आपल्याबद्दलची ही देशभरातील प्रतिक्रिया सलमा यांच्यापर्यंत पोहोचली असावी. आणि एके दिवशी त्या चक्क हसल्या.... मात्र, त्या हसल्या, त्या दिवशी आई ‘ही बया आज कशी काय हसली बरं?’ असं आश्चर्य आणि कौतुकमिश्रीत उद्गारली. हे आश्चर्य देशभरात सार्वत्रिक होतं.
त्या खालोखाल आठवतात ते शम्मी नारंग. एकदम भारदस्त पर्सनॅलिटी आणि आवाजही तसाच. बातमीपत्र कसं वाचावं, हिंदी कसं असावं, याचा उत्तम नमुना म्हणजे शम्मी नारंग यांचं वार्तापत्र सादरीकरण. त्यावेळी त्यांच्यासोबतच रिनी खन्ना या इंग्रजी बातमीपत्र सादर करीत. दिल्ली दूरदर्शननंतर अलिकडं हे दोघे दिल्ली मेट्रोचा आवाज बनलेले आहेत. दिल्ली मेट्रोच्या हिंदी उद्घोषणा व सूचना शम्मी यांच्या, तर इंग्रजी उद्घोषणा रिनी यांच्या आवाजात केल्या जातात.
गीतांजली अय्यर, मीनू तलवार आणि दाढीवाले पण एकदम पॉलिश्ड असे सुनीत टंडन या तिघांना मी विसरू शकणार नाही. हे इंग्रजी वार्तापत्र सादर करायचे. तेव्हा इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी त्यांच्या इंग्रजी बातम्यांचे सादरीकरण आईबाबा लक्षपूर्वक ऐकायला सांगायचे. यातल्या प्रत्येकाची शैली वेगळी तसेच भाषेचे आणि व्यक्तीमत्त्वाचे प्रत्येकाचे अपीलही स्वतंत्र ठसा उमटविणारे असे होते. बातमी कोणती आहे, चांगली आहे, वाईट आहे, यानुसार त्यांचं सादरीकरण बदलायचं. माझं इंग्रजी सुधारण्यामध्ये आईच्या बरोबरीने या अँकर मंडळींचंही श्रेय मान्य करायला पाहिजे. म्हणजे या लोकांनी बातम्या सांगण्यापलिकडं जाऊन एका पिढीच्या व्यक्तीमत्त्व विकासातही काही हातभार लावला आहे. हे त्यांचे ऋण मान्य करायला हवेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा