![]() |
| संजय देसाई |
माझे सकाळमधील ज्येष्ठ छायाचित्रकार मित्र संजय देसाई यांचे काल अकाली आणि अचानकपणे निधन झाले. या क्षणापर्यंत ही वार्ता खोटी ठरावी, असे वाटत राहिले आणि त्यामुळेच श्रद्धांजलीपर पोस्ट लिहायला मन धजावत नव्हते. गेल्या शुक्रवारीच आम्ही सारे पूर्वाश्रमीचे सकाळवासी विश्वास पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एकत्र आलो होतो. देसाईही आले होते. सकाळमधून मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतरही छायाचित्रणापासून मात्र ते दुरावले नव्हते. मुक्तपणे फिरणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होणे, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांशी संपर्क राखणे अशा सर्व गोष्टी त्यांच्या सामाजिकतेची साक्ष देणाऱ्या होत्या. मुलांच्या प्रगतीचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून पाझरत असे. आमचा काही ना काही कारणाने नित्य संपर्क असे. अगदी गेल्या ३० डिसेंबरलाही प्रेस क्लबमध्ये पुरस्कार निवड समितीसाठी आम्ही एकत्र होतो. अगदी शेजारी बसून सकाळमधील कामाच्या आठवणी आम्ही जागवल्या होत्या. विशेषतः 'सकाळ टुडे' पुरवणी लॉन्चिंगच्या कालखंडात देसाई, चेचर यांच्या साथीने फोटोजर्नालिझमचे अनेक प्रयोग केले होते. त्या आठवणीही त्यांनी काढल्या. त्या काळात आमचे हे दोन फोटोग्राफर म्हणजे सकाळचे दोन डोळेच होते जणू, इतकं अप्रतिम योगदान त्यांनी दिलंय. आता देसाई यांच्या जाण्यानं हा एक डोळा कायमचा मिटला गेला आहे... देसाई ६३ हे काही आपल्यासारख्याचे जाण्याचे वय नव्हे... पण, तुम्ही गेलात... हे काही बरे नाही केलेत... आपणास भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा