गुरुवार, ७ मे, २०२६

मीडिया विस्तारतोय; पत्रकारिता आक्रसतेय...





(ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर)


कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये काल (दि. ६ मे २०२६) अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार यांचे वितरण झाले. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ आणि युवा पत्रकार अभिजीत करंडे यांना अनुक्रमे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या समारंभाचा होस्ट म्हणून काम करण्याची संधी अनंत दीक्षित स्मृती समितीने माझ्यावर सोपविली होती. या निमित्ताने पी. साईनाथ यांचे जे व्याख्यान झाले, ते मी आजवर ऐकलेल्या भाषणांमधील सर्वोत्तम असावे. एक महान पत्रकार जगाकडे, आपल्या भोवतालाकडे, त्या भोवतालामधील वंचित, शोषित, कष्टकऱ्यांच्या जगण्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, किंबहुना समाजाने कसे पाहावे, हे दाखविणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे साईनाथ सर. पत्रकाराने सरकारी पुरस्कार स्वीकारला, तर त्या सरकारचे अंकित ठरून त्यांचे त्रुटीनिर्देश, चुका दाखविण्याच्या कामामध्ये कुचराई होऊ शकेल, यामुळे आजवर एकही सरकारी पुरस्कार न स्वीकारणारा- म्हणजे अगदी पद्म पुरस्कारही नाकारणारा हा पत्रकार. मात्र, पत्रकारांनी एका पत्रकार-संपादकाच्या स्मरणार्थ पत्रकारांचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला पुरस्कार म्हणून अनंत दीक्षित पुरस्कार स्वीकारणारा अगदी प्रांजळ असाही हा पत्रकार!

माध्यमांच्या अनुषंगाने साईनाथ यांनी फार चांगली निरीक्षणे नोंदविली आणि उपस्थित पत्रकारांना प्रोत्साहितही केले. मीडिया अँड एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आणि जर्नालिझम या दोन स्वतंत्र गोष्टी एकच असल्याचे मानल्यामुळे आताच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मीडिया क्षेत्र प्रचंड गतीने विस्तारत असताना त्या अवकाशामध्ये पत्रकारिता मात्र आक्रसत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मीडिया व एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीचा आजचा विस्तार हा २.७८ ट्रिलियन रुपये इतका प्रचंड आहे आणि ७ टक्के दराने त्याची वृद्धी होत आहे. एकीकडे या उद्योगांत संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत, मात्र त्याचवेळी सन २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालखंडात सुमारे २० हजार पत्रकार वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले किंवा काढले गेले. पत्रकारांनी भाट म्हणून काम करणे व्यवस्थेच्या हिताचे असते. त्यासाठी सर्व तऱ्हेचे खेळ खेळले जातात. माध्यमे त्याला बळी पडल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे त्याचवेळी आजही ग्रामीण स्तरावर अनेक पत्रकार वंचितांना आवाज प्रदान करण्यासाठीची पत्रकारिता करीत आहेत, फक्त मीडियाच्या गदारोळात त्यांच्या आवाजाला मिळणारे स्थान नगण्य आहे. त्यामुळे तो दबला जातो. जर्नालिझममधील जे हा जस्टीसचा आहे, सामाजिक न्यायाचा आहे. त्यामुळे व्यापक समाजाला त्याला त्याच्या वाटणीचा न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेने काम करीत राहायला हवे. ‘How do I sell my labour without selling my soul?’ हा आजच्या पत्रकारांसमोरील कळीचा प्रश्न असला तरी ते त्यातून निश्चित वाट काढत राहतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

साईनाथ यांचे आणखी एक वैशिष्ट्य मला भावले, ते म्हणजे ते केवळ व्यवस्थेवर दोषारोपण करण्यात वेळ घालवत नाहीत. तर, वर्षातले २७० दिवस शेतकरी, कष्टकऱ्यांत फिरून गावखेड्याचे, ग्रासरुटवरील वास्तव आकडे, पुराव्यानिशी समोर ठेवतात. करेक्शन नेमके कुठे करण्याची गरज आहे, हे सांगत राहतात. मग त्या आड येणाऱ्या धोरणांवर सडकून टीका करतात. या पद्धतीची आदर्श पत्रकारिता आजही ते करीत असल्यामुळे ते आपल्या भाषणातून श्रोत्यांना संपूर्ण देशभरातील शोषितांच्या वेदनांमधून फिरवून आणतात. त्यांच्या वेदना शमविण्यासाठी आपल्या स्तरावर आणि शासकीय स्तरावर आवश्यक उपाययोजनांचे सूचन करतात. त्या सूचनामागे त्यांची फार मोठी कळकळ शब्दाशब्दांतून पाझरत राहते आणि आपल्या हृदयाला हात घालते. त्यातून आपल्यातला संवेदनशील माणूस जागा झाला, तर या पत्रकाराची ही कष्टकऱ्यांप्रतीची तळमळ सार्थकी लागलेली असते. त्यांनी समाजाकडून अपेक्षा बाळगणे सार्थच आहे, पण म्हणून तेवढ्यावरच न थांबता ते पुन्हा या आपल्या गावखेड्यांतल्या बांधवांच्या वेदना वाटून घेण्यासाठी, त्यावर अभ्यास, संशोधन करून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वेशीवर टांगण्यासाठी पुढे मार्गस्थ होतात. हीच बाब त्यांना समकाळातला महान पत्रकार ठरविते.

 

(पी. साईनाथ यांनी काल ४५ मिनिटांचे भाषण केले. सभागृह अगदी स्तब्ध होऊन त्यांचे बोल कानात आणि हृदयात साठवत होते. मी तर इतका नादावून गेलो की, समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने त्यांना धन्यवादाचा प्रणिपात केला. कार्यक्रमानंतरही त्यांच्याशी काही वेळ हितगूज करण्याची संधी मिळाली. तेच हे क्षण आमचे भाईजान डॉ. विनोद कांबळे यांनी कॅमेराबद्ध केले आहेत.) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा