कोल्हापूर, दि. २ मे: बौद्ध स्थापत्य हा भारतीय सांस्कृतिक वारशाचा
अमूल्य ठेवा असून त्याचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक
असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आ’लोकशाही या वाहिनीद्वारे आयोजित बुद्ध जयंती
ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत ‘बौद्ध
स्थापत्य कला’ या
विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. राजहंस यांनी आपल्या भाषणात बौद्ध
स्थापत्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सांगितले की, स्तूप, चैत्यगृह
आणि विहार ही केवळ धार्मिक स्थळे नसून बौद्ध तत्त्वज्ञान, समाजरचना
आणि ज्ञानपरंपरेची साक्ष देणारी केंद्रे आहेत. या स्थापत्य रचनांमध्ये
प्रतीकात्मकता, भूमितीय अचूकता आणि पर्यावरणाशी सुसंगत
नियोजन दिसून येते. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध स्थापत्याला मोठी चालना मिळाली
असून देशभर उभारण्यात आलेले स्तूप आणि शिलालेख हे त्या वैभवाचे द्योतक आहेत. या
वारशामुळे भारताची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या काळात नागरीकरण, दुर्लक्ष
आणि अपुऱ्या संवर्धनामुळे अनेक बौद्ध वारसा स्थळे धोक्यात आली आहेत, याबाबत
डॉ. राजहंस यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासन संस्था, पुरातत्त्व
विभाग, संशोधक आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने काम
करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नव्या पिढीमध्ये या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल
जागरूकता निर्माण करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश
करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून संवर्धनाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले. बौद्ध स्थापत्य हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून मानवी मूल्ये, शांती
आणि सहअस्तित्वाचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे, असेही
राजहंस यांनी सांगितले.
डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले.
--

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा