गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

कम्फर्ट झोनला धक्का देऊन प्रज्ञेचा विकास साधणे आवश्यक: प्रा. जे.डी. कांबळे

(कोल्हापूर येथील फुले, शाहू, आंबेडकर फोरमचा २८ वा वर्धापनदिन समारंभ दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडला. फोरमचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन.डी. जत्राटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. जे.डी. कांबळे यांचे 'आंबेडकरी चळवळीपुढील आव्हाने' या विषयावर नितांतसुंदर प्रबोधक व्याख्यान झाले. या व्याख्यानाचा हा संपादित अंश...)

प्रा. जे.डी. कांबळे

कोल्हापूर येथील फुले, शाहू, आंबेडकर फोरमच्या वर्धापन दिन समारंभात बोलताना प्रा. जे.डी. कांबळे. मंचावर डॉ. एन.डी. जत्राटकर, प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, डॉ. प्रकाश कांबळे, ए.बी. कांबळे आदी.


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली प्रेरणा हीच आंबेडकरी समाजाची खरी ताकद आहे.  तेच आपले भांडवल आहे. एकटा माणूस जरी उरला, भोवती कोणीही नसले, तरी प्रतिकूल परिस्थितीच्या छातीवर पाय देऊन पुढे जाण्याची हिंमत जर कुठून मिळत असेल, तर ती बाबासाहेबांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञानातून मिळते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. मानवजातीच्या उत्क्रांतीमध्ये जेव्हा माणूस चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिला, तेव्हा त्याचे हात मोकळे झाले आणि त्या मोकळ्या हातांनी, मोकळ्या मनाने आणि प्रगल्भ होत गेलेल्या मेंदूने विचार करायला सुरुवात केली. म्हणूनच विचार ही माणसाची प्रचंड शक्ती आहे, आणि ज्ञान ही त्याहूनही महान शक्ती आहे.

मानवेतर प्राणी हे प्रामुख्याने इन्स्टिंक्टवर, जैविक प्रेरणांवर आणि नैसर्गिक प्रवृत्तीवर जगतात. पण माणूस केवळ जैविक प्रेरणांवर जगणारा प्राणी नाही; तो शिकतो, वर्तन घडवतो, कसे जगायचे, कसे राहायचे, कशा पद्धतीने वागायचे याचा विचार करतो. या अर्थाने माणसाचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व हे त्याच्या विचारशक्तीत आहे. मात्र ही क्षमता केवळ उपजत असली तरी ती विकसित व्हायची असेल, तर भोवतालची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था अनुकूल असावी लागते. माणसातील मनुष्यत्व जागवणारी ऊर्जा इन्स्टिंक्टमध्ये असली, तरी त्या ऊर्जेचे व्यवस्थापन समाजव्यवस्था करत असते. म्हणून माणूस आणि व्यवस्था, माणूस आणि समाज यांच्या परस्परसंबंधांचे आकलन झाले, तरच समाजपरिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकता येते.

माणसाच्या जगण्याला अर्थ हवा. केवळ जगणे पुरेसे नाही. कावळे-कोंबड्यांचेही जगणे असते; ते जन्मतात, जगतात आणि मरून जातात. पण माणसाचे तसे नाही. माणूस अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असतो. परिपूर्ण जीवनाच्या शोधात असतो. आज माणूस बाहेरून सुस्थितीत दिसतो — गाडी, बंगला, कुटुंब, सोयीसुविधा असतात — तरी आतून तो अस्वस्थ का असतो, कोलमडल्यासारखा का वाटतो, मनात पोकळी का जाणवते? याचे कारण असे की माझ्या वैयक्तिक गरजा भागल्या तरी माझ्या भोवतीचा समाज, माझा बांधव, माझे नातेवाईक, माझे गाव, माझा समुदाय, माझा समाज आणि अंतिमतः माझे राष्ट्र हे जर त्या उंचीवर पोहोचले नाहीत, तर माझे जगणे पूर्ण अर्थपूर्ण होत नाही. माझे एकट्याचे सुख पुरेसे नाही; माझ्या भोवतीच्या सर्व समाजाचे जीवन अर्थपूर्ण झाले पाहिजे. यालाच मानवतावादी दृष्टिकोन म्हणतात.

हा मानवतावादी दृष्टिकोन आपोआप येत नाही. तो शिकावा लागतो. वाचावे लागते, चिंतन करावे लागते, मनन करावे लागते. मोठ्या माणसांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. ते केवळ बौद्धिक पातळीवर नाही, तर अंतःकरणात उतरले पाहिजे. बाबासाहेबांच्या नंतर आपल्या समाजामध्ये जी पोकळी निर्माण झाली, तिच्यामागेही सामाजिक मानसशास्त्र आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यवस्थेत केंद्रीय नेतृत्व दिसेनासे होते, त्या वेळेला रणांगणात कॅप्टन पडल्यावर सैनिकांची जी अवस्था होते, तशी अवस्था समाजाची होते. पण मोठा माणूस गेला म्हणून जगणे थांबत नाही. जीवन निरंतर आहे. त्या जीवनामध्ये आपण आपल्या स्थानिक हितसंबंधांना जपत, आंबेडकरी चौकटीत पुढे गेले पाहिजे.

आज दलित समाजातील सुशिक्षित, सुसंस्कृत, जागरूक असा एक वर्ग स्थानिक पातळीवर लहान-मोठ्या संघटना निर्माण करून कार्य करत आहे. या उपक्रमांमागे वैचारिक स्पष्टता असेल, तर अशा संस्था- संघटनांचे वृक्ष मोठे होऊ शकतात. पण आजची पोकळी कशामुळे निर्माण झाली आहे, वास्तव काय आहे, आणि त्या वास्तवाचे आकलन किती खोल आहे, हे महत्त्वाचे आहे. आज जातीय भावना अत्यंत टोकदार झाल्या आहेत. राजकारणात जात हे हत्यार म्हणून अत्यंत हुशारीने वापरले गेले आहे. जात आणि धर्म यांचे विकृत राजकारण समाजासमोर येत आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नांना बाजूला सारले जात आहे, आणि भव्य, दिव्य, आक्रसलेले, विक्राळ असे भासणारे खोटे प्रश्न समोर आणले जात आहेत.

आपले खरे प्रश्न आणि खोटे प्रश्न यांच्यात फरक करण्यासाठी विवेक, शहाणपण आणि ज्ञान आवश्यक आहे. केवळ माहिती पुरेशी नाही; माहितीच्या पुढचा टप्पा म्हणजे विवेक. आंबेडकरी समाजात हे विवेकशील शहाणपण परंपरेने आलेले आहे. कारण आमचे हितसंबंध आणि परंपरेत गुरफटलेल्या इतरांचे हितसंबंध यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आमच्यावर झालेले संस्कार आणि जातीय-धर्मवादी संस्कार यातही मोठा फरक आहे. म्हणूनच आपली मान्यता काय आहे, हे तपासणे महत्त्वाचे. कारण मान्यतांनुसार आपले वर्तन घडते, बोलणे घडते, चालणे घडते. मान्यता चुकीच्या असतील, तर संपूर्ण व्यवहार चुकीचा होतो. आपण जे समजतो तेच अंतिम सत्य आहे, अशी संकुचित मनोवृत्ती असल्यास भविष्य आपल्याला माफ करणार नाही.

आज आपण आर्थिकदृष्ट्या पूर्ण सक्षम नसू, पारंपरिक दृष्ट्या मागे राहिलो असू; पण बाबासाहेब वाचणारा, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चा अभ्यास करणारा, बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान समजून घेणारा माणूस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाची रसायने आपल्या अंतःकरणात सामावून घेतो. हेच आपले खरे भांडवल आहे. आणि याच भांडवलाच्या जोरावर आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. नरम व्हायचे काही कारण नाही. समाजाचा विकास कधी वर, कधी खाली असा चालू असतो. आज आपण ठप्प झाल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणजे भोवतालचे वातावरण धर्मवादी झाले आहे. धर्माच्या विकृत व्याख्या करून, धर्माचे राजकारणाशी संगनमत करून, धर्मगट तयार करून, वोट बँक तयार करून, स्त्री-पुरुषांच्या संघर्षात नवीन भेगा निर्माण करून एक वेगळीच प्रक्रिया चालू आहे. त्याला तोंड देण्यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे.

नवभांडवलशाहीने प्रचंड प्रमाणात रोजगाराची क्षति केली आहे. शिक्षण वाढले, पण रोजगार कमी झाला. बीए, बीकॉम, एमए, एमकॉम झालेली मुले फक्त परीक्षा पास होण्यापुरते शिकत आहेत; जीवनात उपयोगी पडेल, असे शिक्षण त्यांना मिळत नाही. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार यांची सांगड बसणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांना फक्त शिकवायचे नाही, तर ते शहाणपणाच्या दिशेने वळतील, संस्कारक्षम होतील आणि कुटुंब संस्था बळकट राहील, याकडेही लक्ष द्यावे लागेल. कारण कुटुंब संस्था डळमळीत झाली, तर सर्व काही डळमळीत होते. माणूस आपल्या बायको-मुलांवर, भावंडांवर, नातेवाईकांवर प्रचंड भावनिक गुंतवणूक करतो. मग उरलेल्या थोड्याशा ऊर्जेत तो सामाजिक चळवळीत सहभागी होतो. बाबासाहेबांचा त्याग सर्वांमध्ये येईलच असे नाही. पण कमीतकमी आपला कम्फर्ट झोन तोडण्याइतपत धैर्य हवे.

बाबासाहेबांच्या नंतर शिकलेली-सवरलेली पिढी, नोकरी मिळालेली पिढी, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचे फायदे मिळवलेली पिढी हळूहळू कम्फर्ट झोनमध्ये अडकली. या झोनमधून बाहेर येण्याची ताकद प्रत्येकामध्ये नसते. पण काही माणसे हा झोन तोडतात, संघर्ष करतात, पुढच्या पिढीला वारसा देतात. आपणही तेच केले पाहिजे. कारण आपण स्वतःभोवती तयार केलेला कम्फर्ट झोन हेच खरे तर एक तुरुंग आहे. तो तोडणे म्हणजेच प्रज्ञेचा विकास. जर आपल्याला वाटत असेल की माझे कुटुंब आणि मी, याच्या पलीकडे जग नाही, तर आपण शहामृगासारखे वागतो — डोके वाळूत खुपसून बाहेरचे जग नाही असे मानतो. असे चालणार नाही.

यासाठी बाबासाहेब वाचले पाहिजेत. पण नुसते वाचून चालणार नाही; त्यांचे समाजशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय आणि सांस्कृतिक आकलन झाले पाहिजे. यालाच interpretative understanding म्हणतात. हे आकलन झाले की आपण कम्फर्ट झोनला धक्का देऊ शकतो. पण आपल्या भोवतीचा ब्राह्मण्यवादी, ब्राह्मणवादी विचार आपल्याला बाहेर पडू देत नाही. “आपले तेवढे पाहायचे, बाकी जगाशी काय करायचे” ही वृत्ती दिसायला साधी वाटते, पण तिचे परिणाम फार खोल असतात. ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचते. मग पुढच्या पिढीला कळते की मागच्या पिढीने जे करायला हवे होते, ते झाले नाही.

म्हणूनच जीवन केवळ सुखी व्हायचे म्हणून नाही. चिरंजीवी विकास साधायचा असेल, तर आपण पुढच्या पिढीला जो वारसा देऊ, तो चिरंजीवी असला पाहिजे. आजचा सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ समजला, तर पुढच्या पिढीला काय द्यायचे, हे स्पष्ट होते. आणि मग माणसे एकत्र येऊ लागतात. एकत्र येणे सहज घडत नाही; त्यामागे प्रक्रिया असते. संघटन घडते, नेतृत्व घडते. मानवजातीच्या इतिहासात महामानवांचे योगदान प्रचंड आहे. बाबासाहेब म्हणतात, माणसाला इतिहासातून वजा केले, तर तो इतिहासच उरत नाही. मानवाला वगळून इतिहास समजत नाही.

आपला विश्वास मानवत्वावर आहे. मनुष्यत्वाची प्रतिष्ठा हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. याचा अर्थ असा की आपण दोन जगांत जगतो — बाह्य भौतिक जग आणि आंतरिक मानसिक जग. बुद्धांनी मनाला जीवनात सर्वोच्च स्थान दिले. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक आशयासकट समजले नाही, तर ते अनेकदा वाचूनही उपयोग होत नाही. बाबासाहेबांचे सर्वात अद्वितीय, सर्वात तेजस्वी लेखन कोणते असेल, तर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हेच आहे. त्याचे आकलन झाले नाही, तर सामाजिक जीवनात आपली उणीव राहते, अहंकार वाढतो, संघटन होत नाही.

संघटित होण्यासाठी भ्रातृभाव, बंधुभाव, मैत्रीची भावना आवश्यक असते. जिथे द्वेष आहे, तिरस्कार आहे, मत्सर आहे, जिथे मी आणि तू वेगळे आहोत, तिथे संघटन अशक्य आहे. बाबासाहेब आणि बुद्ध यांच्यासारखी करिष्मॅटिक व्यक्तिमत्त्वे लोकांना आकर्षित करतात. पण असे महामानव दूर झाल्यावर त्यांच्या जागी कमी उंचीची माणसे येतात. अशा वेळी आपल्याकडे शहाणपण असले पाहिजे — कोणाचे म्हणणे ऐकायचे, कोणाचे म्हणणे अर्थपूर्ण आहे हे ओळखायचे.

आज आपल्या समाजात नकारात्मक दृष्टिकोन वाढत चालला आहे. त्यामुळे आई-वडील मुलांकडे, मुलं आई-वडिलांकडे, नातेवाईक एकमेकांकडे, गाव एकमेकांकडे नकारात्मकतेने पाहू लागतात. याचा परिणाम म्हणजे चांगल्या कामाचेही मातेरं होते. काही लोकांचा स्वभावच असतो विनाकारण वाद घालणे. कोणतेही प्रपोजल आले की पहिला विरोध करायचा. हा एक मानसिक रोग आहे. आपण रोगी आहोत, हे आपल्याला कळत नाही. आत्मपरीक्षण, आत्मटीका, आत्मचिकित्सा यांची गरज आहे. जे माणसे वाद घालून इतरांना गोंधळात टाकतात, त्यांना बाजूला ठेवून भ्रातृभाव निर्माण करायला हवा. आपल्या परीने का होईना, संघटित ताकद निर्माण करायला हवी.

केंद्रीय नेतृत्व आज नसले, तरी जगणे थांबत नाही. हा देश आपला आहे. देशाचे प्रश्न आपले प्रश्न आहेत. शहरांचे, गावांचे, तालुक्यांचे, जिल्ह्याचे, राज्याचे, देशाचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत, ही जाणीव प्रगल्भ झाली पाहिजे. आपण वैज्ञानिक पद्धतीने विचार करणार, आणि उपाययंत्रणांमध्ये सहभागी होणार, ही भूमिका घेतली पाहिजे. कोणतीही सामाजिक चळवळ शेवटी राजकीय चळवळीत रूपांतरित होते. जर तसे झाले नाही, तर ती चळवळ गोठते, साचते, कंटाळवाणी होते. राजकारण आणि अर्थकारण या दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय अंग प्रगल्भ झाले नाही, तर अर्थकारण आपल्या हातून निसटते. त्यामुळे वैचारिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक भनंगता नष्ट करण्यासाठी व्यापक दृष्टी हवी.

संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व यांचा अतिशय निकट संबंध आहे. जशी संस्कृती, तसा माणूस; जसा माणूस, तशी संस्कृती. संस्कृती वगळली, तर माणसाकडे काहीच उरत नाही. म्हणून आंतरिक जीवन प्रगल्भ होण्यासाठी संस्कृतीची आवश्यकता असते. बाबासाहेबांनी याचा अत्यंत खोलवर विचार केला. “मी कोण?” या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर माणूस पांगळा होतो. “मी बौद्ध आहे” या उत्तरामध्ये प्रचंड मानसिक कुवत, मनोबल आणि नैतिक शक्ती आहे. धम्माच्या चळवळीला कमी लेखण्याचे कारण नाही. माणूस नुसता भाकरीवर जगत नाही; त्याच्या अंतर्गत व्यवस्थेसाठी धर्म, विचार, भावना, बुद्धी, वृत्ती यांचे व्यवस्थापन आवश्यक असते.

बाबासाहेबांनी स्वतःबद्दल जेव्हा सांगितले की मी राजकारणी माणूस नाही, मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा की त्यांच्या भव्य कार्यामागे त्यांची धार्मिकता, म्हणजेच नैतिकता, मनुष्यत्व आणि आंतरिक शुद्धी होती. धार्मिक वृत्तीमुळे माणसाचे मीपण कमी होते, टोकदार अहंकार बोथट होतो, आणि “मी आणि तू” या भिंती विरघळू लागतात. वी-फिलिंग, सामूहिकता, सामाजिक बांधिलकी ही त्यातूनच जन्मते. जर मीपणा वाढला, तर सामाजिक जीवन नासते.

पुढे वाटचाल करताना आपण हे विसरता कामा नये की टीव्हीवर दिसणारी काही माणसे म्हणजे अखंड भारतीय समाज नव्हे. सामान्य माणूस, त्याच्या आतल्या वेदना, संघर्ष, इच्छा, असुरक्षितता, हीच खरी समाजाची मूळ जमीन आहे. सामान्य माणूस विसरला, की एलिटिझम वाढतो. आपले आकलन मोठ्या प्रमाणात एलिटिस्ट झाले आहे. पण खालून वर येणारा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. मला या देशाबद्दल काय वाटते, माझ्या समाजाला काय वाटते, हे महत्त्वाचे आहे. धर्म हा चिकित्सेच्या बाहेर नाही. आज देवळांमध्ये प्रचंड गर्दी दिसते. ही श्रद्धा नसून अनेकदा असुरक्षितता, भय, अनिश्चितता यांचे प्रतिबिंब असते. माणूस अलौकिक शक्तीचा आधार शोधतो, पण ती मनाची शुद्धी नसते; ती अनेकदा विकृत मनोवृत्ती असते.

म्हणून धारणा बदलणे, वृत्ती बदलणे, प्रवृत्ती बदलणे आणि सुसंस्कृत माणसाची उंची काय असते, हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणतात, मी जिथे जाईन तिथे काट्यासारखा बोचत राहीन. ढेकळासारखा विरघळून जाणारा मी नाही. दगडासारखा आहे; पाणी त्याच्यावर कितीही आदळले तरी त्याला फारसा परिणाम होत नाही. आपल्यालाही व्यवस्थेला तसेच सांगता आले पाहिजे. परिस्थिती कितीही विकट असली, तरी हात टेकणे उपयोगाचे नाही. धम्म ही प्रचंड ताकद आहे.

अर्थकारणासाठी लढे द्यावे लागतील. राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार करावी लागतील. व्यापक दृष्टिकोनाशिवाय राजकारण चालणार नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. मतांचे राजकारण नव्हे, लोकसंख्येचे आणि व्यापक सामाजिक गठबंधनाचे राजकारण आवश्यक आहे. जातीच्या पातळीवर निवडणुका लढवून यश मिळणार नाही. आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण, याचे व्यापक आकलन हवे. जात आणि वर्ग यांचा संबंध समजून घ्यावा लागेल. जात वर्गामध्ये रूपांतरित झाली, तरच राजकारण गतिमान होते. जातीमध्ये अडकलेला रथ पुढे जात नाही.

आज आपले सामाजिक बांधव कोण, हे अचूक ओळखणे आवश्यक आहे. पूर्वी शेड्युल कास्ट फेडरेशनमागे बाबासाहेबांचा व्यापक वर्गनिर्मितीचा विचार होता. पण जातींची भावना इतकी टोकदार झाली की आपणच आपल्यात भांडत राहिलो. एकमेकांना शिव्या देत राहिलो. “हे महार-हे मांग” अशा पातळीवर अडकून राहिलो, तर रथ मागेच राहील. म्हणून प्रागतिक राजकारण करायला शिका. कोणाची गुलामी पत्करू नका. समतेचे राजकारण करा. कोणाच्याही पायावर डोके ठेवू नका. असे केले, तर ताठ मानेने राजकारण करता येईल. आपला प्रतिनिधी निवडून आला, तरी प्रेशर ग्रुप म्हणून, दबाव गट म्हणून आपली कामे करून घेता येतील. पण त्यासाठी नेतृत्वात कौशल्य हवे.

नेतृत्वाचा अभाव झाला, की गोंधळ माजतो. सामान्य माणूस भरकटतो, इकडे तिकडे धावतो, एकमेकांना नावं ठेवू लागतो. आपला समाज विकला जाणारा समाज आहे, अशी वरच्या स्तरावरील लोकांची समजूत आहे. ती समजूत मोडून काढली पाहिजे. नाहीतर “हा समाज विकतो” हा समज बळकट होत राहील. आणि मग आपण आंबेडकरवादी राहणार नाही. हे एका व्याख्यानात संपत नाही. यासाठी वारंवार सभा, प्रबोधन, लोकशिक्षण, लोकचळवळी, आणि त्यासाठी किंमत द्यायला तयार होणारे माणसे निर्माण करावी लागतील.

अशा प्रकारची माणसे आपण आपल्या समाजात निर्माण करू शकलो, तर भविष्यकाळ उज्ज्वल असेल. पुढच्या पिढीला गुणी, सक्षम, प्रगल्भ असा वारसा देता येईल. मी स्वतःही विविध ठिकाणी, विविध संघटनांमध्ये, पक्ष कोणताही असो, नेता कोणीही असो, माझ्या समाजाचे काही चाललेले असेल तिथे जात आलो, ऐकत आलो, गरज वाटली तर सूचना केली, गरज पडली तर बोललो. आपण शहाणे, समजूतदार, प्रज्ञावान आणि माणूस म्हणून तेजस्वी व्हावे, हीच व्यक्तिगत इच्छा आहे. आणि सामाजिक जीवनात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला मिलिटंट धम्म या देशात निर्माण करण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे, हीच अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा