![]() ![]() |
| शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासनामार्फत आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. मेघा पानसरे, डॉ. गिरीष मोरे व डॉ. अंबादास सकट. |
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनामार्फत आयोजित परिसंवादात बोलण्याची संधी मिळाली, ती सुद्धा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. गिरीष मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मेघा पानसरे यांच्यासारख्या दिग्गजांसमोर... हा केवळ एका साहित्यिकावर बोलण्याचा कार्यक्रम नव्हता; तर माणूसपण, समता आणि सांस्कृतिक संघर्षाचा अर्थ नव्याने समजून घेण्याचा एक विलक्षण अनुभव होता....
अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचताना प्रत्येक वेळी एक नवीन अण्णाभाऊ भेटतात. विद्यार्थी दशेत त्यांच्या कथा "गोष्ट" म्हणून वाचल्या; पण आज त्याच कथा वाचताना प्रत्येक वाक्यामागचा विचार, प्रत्येक प्रतिमेमागची सामाजिक जाणीव आणि प्रत्येक पात्रामागचं माणूसपण अधिक गहिरं होत जातं.
१९५८ च्या दलित साहित्य संमेलनातील त्यांचं ते ऐतिहासिक विधान आजही अंतर्मन हलवून जातं— "पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नव्हे, तर दलितांच्या तळहातावर तरलेली आहे." हे केवळ घोषवाक्य नव्हतं; तर त्यांच्या संपूर्ण साहित्याचं सार होतं. अण्णाभाऊंनी मनोरंजनासाठी लेखन केलं नाही. त्यांनी मानवमुक्ती, स्वाभिमान आणि समतेचा सांस्कृतिक घोष आपल्या लेखणीतून आविष्कृत केला.
त्यांच्या भाषेचं सौंदर्य अद्वितीय आहे. "एक ऊस मांडीएवढा," "सह्याद्रीचे दोन कडे एकमेकांकडे तोंड करून उभे होते," "तापलेल्या तव्यावरनं थेंब उडून जावा तसं पाणी आटलं होतं," किंवा "एखाद्या फौजदाराने कैद्याला बडवावं तसा पाऊस बडवत होता"— ही फक्त वर्णनं नाहीत; तर जीवन जगलेल्या माणसाच्या अनुभवातून आलेल्या जिवंत प्रतिमा आहेत. दीड दिवस शाळेत गेलेल्या लेखकाची निरीक्षणशक्ती किती विलक्षण असू शकते, याचा हा प्रत्यय आहे.
अण्णाभाऊंच्या साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी माणसाला त्याच्या जातीने नाही, तर त्याच्या माणूसपणाने पाहिलं. फकीरामधील विष्णुपंत कुलकर्णी असो, वारणेचा वाघमधील सत्तू भोसले असो किंवा अन्यायाविरुद्ध उभं राहणारं कोणतंही पात्र— अण्णाभाऊंच्या लेखणीत न्यायाला जात नसते. अन्यायाविरुद्ध उभं राहणारा प्रत्येक माणूस त्यांचा नायक असतो.
आज आपण सिनेमॅटिक युनिव्हर्सबद्दल बोलतो; पण अण्णाभाऊंनी अनेक दशकांपूर्वी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून पात्रांचं एक सशक्त विश्व उभं केलं होतं. त्यांच्या प्रत्येक कथेत दृश्यात्मकता आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निर्माण झाले आणि आजही नवीन पिढीला त्यांचं साहित्य पडद्यावर आणण्याची प्रेरणा मिळते.
अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे फुले-आंबेडकरी विचारांचा लोकभाषेतील सांस्कृतिक आविष्कार आहे. धर्मचिकित्सा, लोकशिक्षण, स्त्री-पुरुष समता, आंतरजातीय संबंधांची प्रतिष्ठा, श्रमिकांचा सन्मान, संसाधनांचं न्याय्य वाटप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूसपण— ही त्यांच्या साहित्याची मूलभूत मूल्यं आहेत.
"जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..." या ओळीतील "घाव" हा माणसावर नाही; तर जातिव्यवस्थेवर, अंधश्रद्धेवर, विषमतेवर आणि माणुसकी नाकारणाऱ्या मानसिकतेवर आहे. म्हणूनच अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये विद्रोह आहे; पण द्वेष नाही. संघर्ष आहे; पण हिंसेचं समर्थन नाही. अन्यायाविरुद्धचा प्रखर आवाज आहे; पण त्याचबरोबर न्याय, आशावाद आणि परिवर्तनाची अढळ श्रद्धाही आहे.
त्यांच्या स्त्री पात्रांकडे पाहिलं तर ती दया मागणारी नाहीत. ती स्वाभिमानी आहेत, निर्णय घेणारी आहेत, अन्यायाला विरोध करणारी आहेत. अण्णाभाऊ स्त्रीला वस्तू म्हणून पाहत नाहीत; तर स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून तिची प्रतिष्ठा जपतात.
स्मशानातलं सोनं असो किंवा आवडी, फकीरा, वारणेचा वाघ, वैजयंता, माकडीचा माळ— प्रत्येक साहित्यकृती समाजाच्या अंतरंगात डोकावणारी आहे. प्रत्येक कथा उपेक्षित माणसाचा आवाज बनते.
आणि त्यांच्या अनेक कथांत डोकावणारं एक अप्रतिम वाक्य...
"जमीन इतकी सुपीक की माणूस पेरला तरी उगवून येईल."
हे वाक्य फक्त जमिनीचं वर्णन नाही. ती अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्याची जीवनदृष्टी आहे. त्यांनी माणूसपण पेरलं... समतेची बीजं पेरली... स्वाभिमानाची मशागत केली... आणि संघर्षाच्या उन्हात त्या विचारांना वाढवलं.
बाबासाहेबांनी विचारांची बीजं पेरली; अण्णाभाऊंनी त्या बीजांना लोकभाषेची माती, लोककलेचं पाणी आणि संघर्षाचं ऊन दिलं. म्हणूनच त्यांचं साहित्य पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. प्रत्येक वाचनात नवा अर्थ सापडतो, नवा विचार उगवतो आणि नव्याने माणूस होण्याची प्रेरणा मिळते.
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचं साहित्य वाचणं, त्यातील माणूसपण समजून घेणं आणि समतेचा विचार आपल्या आचरणात उतरवणं होय.
(परिसंवादातील भाषणातून)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा