सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

विश्वव्यापी माध्यमान्तर!


सोशल नेटवर्किंगच्या साह्यानं जी माध्यमं आविष्कृत झालेली आहेत, त्या समस्त माध्यमांना आपण सोशल मिडीया असं म्हणू शकतो. मानवाच्या संवादाची गरज भागविण्यासाठी माध्यमांचा विकास होणं, ही स्वाभाविक गोष्ट ठरली. किंबहुना, मानवानं आजपर्यंत जे काही शोध लावले किंवा संशोधन केंद्रित केलं आहे, त्यामागे त्याची संवादाची प्रचंड भूक आहे. चांद्रयान मोहिमा, मंगळयान मोहिमा या मानवाच्या वैश्विक संवादाची भूक अधोरेखित करणाऱ्या गोष्टी आहेत. तथापि, छपाईच्या शोधानं मानवाच्या संवाद प्रक्रियेला खरी गती आली. जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावलेल्या छपाई तंत्राच्या शोधामुळं जगाच्या संवाद क्षेत्राला गतिमानता प्रदान केली.


आजच्या तरुणाईचं सर्वाधिक आवडतं किंवा त्यांच्याच शब्दांत हँगआऊट करण्याचं ठिकाण कोणतं, असा विचार केला तर सोशल मिडिया असंच उत्तर आपल्याला द्यावं लागेल. सोशल मिडिया नामक ठिकाणं व्हर्चुअल असली तरी हरकत नाही, पण त्यांच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट मात्र खरंखुरं राहता येतं. यामध्येच आजची युवा पिढी धन्यता मानते आहे.
सोशल नेटवर्किंग या शब्दातील सोशल आणि नेटवर्क हे दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मानव हा समाजशील प्राणी आहे, अशी मानवाची अत्यंत समर्पक व्याख्या कार्ल मार्क्स यांनी केली आहे. हरेक संस्कृतीमध्ये मानवाच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसतं. काळानुरुप समाजामध्ये जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार त्या त्या काळातल्या संस्कृतीही बदलत गेल्या, तथापि, त्यांची मूळ समाजशीलतेची आस आजही कायम आहे. आणि संवाद हा त्या समाजशीलतेला अधिक समृद्ध करणारा महत्त्वाचा घटक आहे. नेटवर्क हा शब्दही पुन्हा दोन अर्थांनी घेता येऊ शकतो. पहिला अर्थ पुन्हा सामाजिक अर्थाने सामोरा येतो. एकमेकांशी जोडलं जाणं, कनेक्ट होणं असा पहिला आणि दुसरा अर्थ हा अर्थातच तांत्रिक अंगांनी आहे. तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या साह्यानं आविष्कृत झालेल्या या नवमाध्यमातून संवादाची भूक भागविली जाण्यासाठी समाज जेव्हा एकमेकांशी जोडलं जाण्यासाठी प्रयत्नरत होतो, तेव्हा या सोशल नेटवर्किंगचं वर्तुळ पूर्ण होतं; किंबहुना, हे जोडलं जाणं जिथं होत नाही, त्या नेटवर्कच्या परीघाविषयी आणि आवाक्याविषयीही शंका घ्यायला जागा आहे, असं म्हणता येऊ शकतं.
सोशल नेटवर्किंगच्या साह्यानं जी माध्यमं आविष्कृत झालेली आहेत, त्या समस्त माध्यमांना आपण सोशल मिडीया असं म्हणू शकतो. मानवाच्या संवादाची गरज भागविण्यासाठी माध्यमांचा विकास होणं, ही स्वाभाविक गोष्ट ठरली. किंबहुना, मानवानं आजपर्यंत जे काही शोध लावले किंवा संशोधन केंद्रित केलं आहे, त्यामागे त्याची संवादाची प्रचंड भूक आहे. चांद्रयान मोहिमा, मंगळयान मोहिमा या मानवाच्या वैश्विक संवादाची भूक अधोरेखित करणाऱ्या गोष्टी आहेत. तथापि, छपाईच्या शोधानं मानवाच्या संवाद प्रक्रियेला खरी गती आली. जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावलेल्या छपाई तंत्राच्या शोधामुळं जगाच्या संवाद क्षेत्राला गतिमानता प्रदान केली. औद्योगिक क्रांतीनंतर नवतंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या चालनेतून पुढे माध्यमांचं क्षेत्र अधिकच व्यापक होत राहिलं, विस्तारत गेलं. दूरध्वनीपासून ते दूरचित्रवाणी अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत हे क्षेत्र विस्तारलं. मानवाची माहितीची भूक भागविण्यासाठी अखंडितपणे ही माध्यमं सेवारत झाली, आजही आहेत. संगणक आणि त्यानंतर इंटरनेटच्या शोधानं या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला एक नवा आयाम मिळवून दिला. किंबहुना, या दोन गोष्टींच्या आस्तित्वाखेरीज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रच अस्तित्वात येऊ शकलं नसतं. काळानुरुप होत गेलेलं माध्यमांतर हा मानवजातीच्या प्रगतीमधील, विकासामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्तीचं ठरणार नाही. परंतु, गुटेनबर्गनंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमं आस्तित्वात येण्याच्या दरम्यान सुमारे साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला, पण त्यानंतर अवघ्या साडेतीन दशकांमध्ये माध्यमांनी ज्या गतीनं आपलं रुप पालटलं आहे, ती गती अचंबित करणारी आहे. आणि हे गतिमानतेचं चक्र केवळ इंटरनेट, डिजिटलायझेशन आणि त्यांच्याशी संबंधित अनेकविध शोधांमुळंच तसं राहू शकलेलं आहे.
आजघडीला इंटरनेटशी निगडित आकडेवारीवर नजर टाकली तरी त्याच्या व्याप्तीची आपल्याला कल्पना येऊ शकेल. आज लोकसंख्येच्या दृष्टीनं विचार केला तर चीनमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ६४ कोटी लोक इंटरनेट वापरतात. त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत हे प्रमाण ४६.०३ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. अमेरिकेतील २८ कोटी लोक इंटरनेट वापरतात, त्यांची टक्केवारी आहे ८६.७५ टक्के. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत. भारतातील साधारण २४ कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात, त्यांचं प्रमाण आहे १९.१९ टक्के. (आकडेवारी स्रोत: इंटरनेट लाइव्ह स्टॅट्स डॉट कॉम) सन २०११च्या जनगणनेनुसार हे प्रमाण तीन टक्के घरांमध्ये केंद्रित झालेलं आहे. एकूण जागतिक इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये भारतीय वापरकर्त्यांचे प्रमाण ८.३३ टक्के इतके आहे. तर सन २०१३-१४ या एका वर्षात वापरकर्त्यांची संख्या सुमारे १४ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या बरोबरीनं आज मोबाईल वापरणाऱ्यांची आकडेवारीही देशात वाढतेच आहे. मोबाईल वापरकर्त्यांची संख्या सन २०१४अखेरीस ५८१ दशलक्ष होती. ती या वर्षअखेरीस ६३८ दशलक्षांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गतवर्षी (२०१४) भारताची एकूण टेलिडेन्सिटी ७६.७५ टक्के इतकी होती. त्यात केवळ मोबाईल टेलिडेन्सिटी ७४.७५ टक्के इतकी आहे.
गेल्या पाच वर्षांत स्मार्टफोननं मोबाईल क्षेत्रात आणखी क्रांती घडविली आहे. हातातला मोबाईल आता बोलण्यापलिकडं ई-मेल, सर्फिंगखेरीज एम-बँकिंग आणि एम-कॉमर्ससाठीही वापरात येऊ लागला आहे. जीपीआरएस तंत्रज्ञानानं ही गोष्ट शक्य केली तर टू जी, थ्री जी आणि आता फोर-जी यांनी या डाटावहनाला अधिक गतिमानता प्रदान केली, ज्यामुळं खरं तर स्मार्टफोनची लोकप्रियता वाढत चालली आहे. आज इंटरनेटसाठी केवळ ब्रॉडबँड लाइन्सवरच अवलंबून राहण्याचा जमाना इतिहासजमा झाला आहे. टॅब्लेट पीसी, स्मार्टफोनमुळं हे सारं जग जणू आपल्या हातात नव्हे, मुठीत सामावलं आहे. डेस्कटॉप पीसी आणि लॅपटॉपवरुन जसं इंटरनेटचं स्मार्टफोनवर आगमन होऊ लागलं, त्यावेळी खऱ्या अर्थानं सोशल मिडियाच्या लोकप्रियतेचा आलेखही चढता बनण्यास सुरवात झाली.
सोशल मिडिया म्हटलं की, आजकाल सर्वाधिक पॉप्युलर असलेल्या फेसबुकचं नाव आपल्या तोंडी येतं. किंबहुना फेसबुक हे जणू सोशल मिडियाचं प्रतिनामच बनलं आहे. तथापि, आद्य सोशल मिडियाचा मान हा आपल्याला ऑर्कुटला द्यावा लागेल. ऑर्कुटवर अकाऊंट असणं, हा तेव्हा कैक ‘ऑरकुट्यां’चा  प्रेस्टीज पॉईंट बनला होता. आम्हीही होतो त्यामध्ये. ई-मेलच्या पुढं जाऊन अन्य काही गोष्टींचं शेअरिंग करता येऊ शकतं, याची प्रचिती तेव्हा आली. पण, काळाच्या गतीशी जुळवून न घेता आल्यामुळं म्हणा किंवा ती गती वेगळ्या स्वरुपात प्रवाहित करण्याच्या नादात म्हणा, ऑर्कुटचा खेळ संपला. फेसबुकनं प्रचंड गतीनं त्याची लोकप्रियता टेकओव्हर कधी केली, हे कोणालाही समजलं नाही. त्या व्यतिरिक्त गुगल प्लस, ट्विटर, यू-ट्यूब, लिंक्ड-इन, हाय फाइव्ह, स्टंबल अपॉन, टम्बलर, पर्फस्पॉट अशा सोशल नेटवर्किंग साइट्सनीही आपापला वेगळा युझर वर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं. त्याखेरीज फ्लिकर, पिकासा, शटरफ्लाय, फोटोबकेट, इमेजशेक, स्मगमग इत्यादी फोटो शेअरिंग साइट्सवरुनही खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते, तीही प्रचंड गतीनं! त्याशिवाय अभिव्यक्तीचं एक उत्तम माध्यम म्हणून वेबलॉगिंग उर्फ ब्लॉगिंगच्याही अनेक साइट्सचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याद्वारे होणारी विचारांची देवाणघेवाण, विचारांची घुसळण हा सुद्धा अतिशय क्रांतीकारक प्रकार आहे.
अशा या सोशल मिडीयाचा आपण आतापर्यंत तरी खूप गांभीर्यानं विचार केला आहे, अशातला भाग नाही. पण तो केला गेला पाहिजे, याला कारण आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मिडियाच्या ताकतीचा आपल्याला बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे, पण पूर्णपणे नाही. भारतानं सोशल मिडियाला गांभीर्यानं घ्यावं असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्यामागं आकडेवारीचं वास्तव आहे. सुमारे १२५ कोटींच्या आपल्या देशात आजघडीला ४३ कोटी लोकसंख्या युवा आहे. सन २०२१पर्यंत हा आकडा ४७ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तेव्हा भारत जगातील सर्वाधिक तरुण देश असेल. आज आपली एक तृतिअंश लोकसंख्या किंवा तीनपैकी एक भारतीय आज तरुण आहे. आणि ही युवा पिढी आज इंटरनेट, मोबाईल किंवा टॅब्लेटमय झालेली आहे. संपूर्णतया नसेल, पण आज ना उद्या या नव्या तंत्रज्ञानाला त्यांना स्वीकारावं लागेल किंवा या तंत्रज्ञानानंच त्यांना कवेत घेतलेलं असेल. म्हणजे कोणाचीही यातून सुटका नाही.
या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाचा विचार केला जाणे गरजेचे आहे. कमी खर्चिक आणि सर्वाधिक वेगवान, प्रसिद्धीसाठी अथवा अभिव्यक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची नसलेली गरज, तुमच्या अकाऊंटचे तुम्हीच राजे आणि मालक, तुमच्यावर ना कोणी मालकी गाजवू शकतो, ना तुम्हाला अंकित करू शकतो, तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही फॉलो करू शकता, नको त्याला अनफ्रेंड करू शकता, पटला तो विचार स्वीकारला, न पटला त्याला प्रतिवाद केला किंवा सोडून दिला, असे एक ना अनेक फायदे सोशल मिडियाचे आहेत. वैयक्तिक अभिव्यक्तीचं इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीही उपलब्ध नव्हतं, याची जाणीव आजच्या पिढीला झालेली आहे. त्यामुळंच अत्यंत निर्भयपणानं, निर्भिडपणानं ती या व्यासपीठावर व्यक्त होताना दिसते- अगदी व्यक्तिगत, स्थानिक समस्यांपासून ते जागतिक प्रश्नांपर्यंत! या माध्यमातून खूप मोठी वैचारिक घुसळण अगदी क्षणाक्षणाला होत असते. त्यातून या पिढीची आत्मविश्वासपूर्ण ठाम मते आपल्याला तयार होताना दिसतात. हां, त्यामध्ये एक गल्लत होऊ शकते की, हा ठामपणा पूर्वग्रहदूषित असू शकतो किंवा कदाचित चुकीच्या दिशेला झुकलेलाही असू शकतो. पण एकदा माध्यम स्वीकारले म्हटले की, त्याच्या बरोबरीने ते स्वतःचे फायदे-तोटे घेऊन येत असते आणि ते माध्यम आपल्याला त्यांच्यासहच स्वीकारावे लागते, हे ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅक्लुहान यांनी सांगून ठेवलेलेच आहे. त्यामुळे हे वास्तव स्वीकारण्याची आणि ती मते सकारात्मक विचारसरणीमध्ये बदलण्याची जबाबदारीही प्रतिवाद करत असताना स्वीकारण्याची गरज आहे.
आजच्या धामधुमीच्या, धावपळीच्या, स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला एकमेकांशी संवाद साधायला फुरसत नाहीय, असं आपण म्हणायचो. पण, या सोशल मिडीयामध्ये जगभरात दर क्षणाला जी काही संवादांची देवाणघेवाण सुरू असते, ती पाहिली की या माध्यमाला धन्यवाद दिल्याखेरीज राहवत नाही. आता प्रत्यक्ष फोन लावून बोलण्यापेक्षा वॉट्सॲपवर शेअरिंग हे अधिक होताना दिसतं आहे. फेसबुकवर तर विविधरंगी शेअरिंगची बरसातच सुरू असते. ट्विटरवरही अत्यंत मोजक्या म्हणजे कमाल १४० शब्दांत अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होताना लोकांना काहीही अडचण येताना दिसत नाही. कमीत कमी शब्दांत आणि जास्तीत जास्त शब्दांत अशा दोन्ही प्रकारच्या अभिव्यक्ती या विविध प्लॅटफॉर्मवरून होताना दिसतात, ज्याने त्याने आपापल्या वेळेनुसार, आवडीनुसार, आवश्यकतेनुसार किंवा केवळ टाइमपास म्हणूनही ते वाचावे, पाहावे, अशी ही व्यवस्था आहे. त्यासाठी कोणावरही काही बंधन नाही किंवा निर्बंधही नाहीत, हेही महत्त्वाचे! सुरवातीला म्हटल्याप्रमाणं कनेक्ट होणं किंवा शेअरिंग करणं या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यांचा विस्तार करणं, ही या माध्यमानं निर्माण केलेली उपलब्धी आहे. तिचा लाभ घेऊन आपल्या नेटवर्कमध्ये अधिकाधिक लोकांना सामावून घेणं, स्वतः अनेकांच्या नेटवर्कमध्ये सामावून जाणं, या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. जात, धर्म, प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडून मैत्रीचे बंध जोडले जातात, विचारांचे पूल बांधले जातात आणि हे केवळ या सोशल मिडियामुळंच शक्य होत आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.
मघा म्हटल्याप्रमाणं, सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. या व्यासपीठाच्या ताकतीवर गेल्या काही वर्षांमध्ये जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली, क्रांती घडवून आणली. या सर्वसामान्यांच्या ताकतीचा आणि या माध्यमाच्या अफाट क्षमतेचा अंदाज आल्यानंच त्या सर्व लोकांशी कनेक्ट होण्यासाठी अनेक पत्रकार, उद्योजक, व्यावसायिक, सेलिब्रिटी, नेते, कार्यकर्ते या साऱ्यांना सोशल मिडियाच्या व्यासपीठावर येणं भाग पडलं. एरव्ही, सर्वसामान्यांना केवळ रुपेरी किंवा टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे हे लोक गावाकडं शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये दिसू लागले. आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये अशा चाहत्यांना सामावून घेण्यात सेलिब्रिटींनाही धन्यता वाटू लागली. त्यांच्या फॉलोअर्सच्या आकड्यांच्या बातम्या होऊ लागल्या, रेकॉर्ड प्रस्थापित होऊ लागले, हे खरोखरीच अपूर्व आहे.
थेट प्रतिक्रिया, थेट फिडबॅक हा सुद्धा या माध्यमाचा फायदा आहे. त्यासाठी तुम्ही कोणावर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. किंवा आज अन्य कोणत्याही प्रस्थापित माध्यमापेक्षाही अधिक जलदगतीने बातमी मिळण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सोशल मिडिया आहे. सध्याच्या माध्यमांचा पुढील विस्तारित अवतार जर कोणता असेल तर तो या सोशल मिडियाच्या स्वरुपातच असेल, हे नक्की. कारण आज मल्टीमिडिया ॲप्रोच हा 'माध्यम ते माध्यम' असा वेगवेगळा राहिला नसून तो आंतरक्रियात्मक आणि एकमेकांना छेदणारा बनला आहे, यालाही इंटरनेटचे माध्यम कारणीभूत आहे. आज मुद्रित माध्यम असो की इलेक्ट्रॉनिक माध्यम, या साऱ्यांचे अस्तित्व साइटच्या रुपात, ब्लॉगच्या रुपात किंवा आता तर थेट सोशल मिडियामध्ये त्यांचे स्वतःचे अकाऊंट असते आणि त्यावरुनही त्यांचे बातम्यांचे शेअरिंग सुरू असते. म्हणजे प्रिंट मिडियातली बातमी जशी सोशल मिडियावर आहे, तशीच टीव्हीवरील बातमीची क्लीपही इथं उपलब्ध आहे. त्यामुळं माध्यमभेद दूर करून एक नवी माध्यम संस्कृती, माध्यमांतर संस्कृती सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर आकाराला येते आहे. टॅब्लेट आणि स्मार्टफोनमुळं त्यांचे अनेकविध ॲपही अगदी मोफत किंवा अल्प दरात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणं आता नवी आयपीटीव्ही किंवा स्मार्ट टीव्हीची पिढी आपल्या घरात येण्यास सज्ज झाली आहे. या तंत्रज्ञानामुळं तर अक्षरश: सर्वच गोष्टी एकाच स्क्रीनवर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही माध्यमांतराच्या संस्कृतीला चालना देणारी बाब आहे. अमेरिकेतलं आघाडीचं आणि जगप्रसिद्ध दैनिक असलेल्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ला ॲमेझॉन डॉट कॉम समूहानं दोन वर्षांपूर्वी टेकओव्हर केलं, तेव्हा साऱ्या जगाच्या भुवया उंचावल्या. 'हिमनगानं टायटॅनिकला आधार दिला,' अशा स्वरुपाच्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पण, ही या माध्यमांतराची सुरवात आहे. टप्प्याटप्प्यानं ती साऱ्या जगात घडून येणार आहे. त्यासाठी साऱ्या जगानं तयार असलं पाहिजे, ही या माध्यमांतराची पूर्वअट आहे आणि सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्ममुळं ती अधिक प्रकर्षानं अधोरेखित होते आहे. प्रसारमाध्यमांसमोर समाजमाध्यमांचे किंवा या नवमाध्यमांचे आव्हान उभे ठाकले असले तरी, या प्लॅटफॉर्मना स्पर्धक न समजता पूरक म्हणून पाहण्याचा एक विधायक दृष्टीकोन प्रसारमाध्यमांनी स्वीकारला आहे. त्यामुळे बहुतांश प्रसारमाध्यमकर्मी समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरही अभिव्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमांमुळे सिटीझन जर्नालिस्ट चळवळीला अधिक व्यापक स्वरुप आले आहे. पूर्वी केवळ दूरध्वनी अथवा लिखित स्वरुपात माहिती देण्यापुरती मर्यादित असलेली सिटीझन जर्नालिस्टशीपची व्याख्याच नवमाध्यमांनी बदलून टाकली आहे. ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्ससह प्रसारमाध्यमांना इनपुट देण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनाही अधिक विश्वासार्ह वार्ता प्राप्त होण्याची शक्यता व प्रमाण वाढले आहे. हा सोशल मीडियाचा मोठा लाभ आपल्या माध्यमांना झालेला आहे.
सोशल मिडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीही दिवसागणिक निर्माण होत आहेत. विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स, ॲप्स, साइट्स यांच्या निर्मितीचा आणि तद्अनुषंगिक उत्पादनांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. इथं कुशल आणि प्रयोगशील तरुणांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. त्यांचा लाभ घेऊन प्रगती साधण्यासाठीही तरुणांची मोठी फळी आपल्या देशात आकाराला येण्याची गरज आहे. सिलीकॉन व्हॅलीमध्ये जो ठसा भारतीय माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञ अभियंत्यांनी उमटवला, तेच आता सोशल मिडियाच्या नव्या संधींच्या संदर्भातही होण्याची गरज आहे.
सोशल मिडियावर आपल्याला नवनवे तसेच खूप जुने-जुने मित्र-मैत्रिणी भेटतात, वयाच्या सीमारेषा पुसल्या जाऊन निखळ मैत्रीचे बंध इथं जोडले जातात, देश-प्रांत-भाषा इत्यादींच्या सीमारेषा पुसल्या जाऊन जन्मजन्मांतरीच्या लग्नगाठी इथं जुळल्या जातात, वीस वर्षांपूर्वी घरातून हरवलेला मुलगा, जो आता मेल्यातच जमा आहे, तो ही या माध्यमामुळंच आपल्या आईला प्रत्यक्ष सापडतो, हाही या नवमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मचाच चमत्कार आहे. असं जरी असलं तरी मॅक्लुहान यांनी म्हटल्याप्रमाणं त्याचे काही तोटेही आहेत. त्यांचाही थोडक्यात परामर्ष याठिकाणी घेतला गेला जाणे गरजेचे आहे.
सोशल मिडियामध्ये सर्वाधिक वावर हा पौगंडावस्थेतील आणि विशी-पंचविशीतल्या तरुणाईचा आहे. या व्हर्चुअल जगतामध्ये त्यांचा अतिशय सुरक्षित वावर आहे. त्यांना इथे थेट कोणताही धोका उद्भवण्याची शक्यता नसते. तथापि, या आभासी जगताची सवय झालेल्या मनाला वास्तव जगामधील अनुभव कदाचित खूप वेदनादायी, भयंकर वाटण्याची शक्यता अधिक निर्माण होते. त्यातून त्याला बसणारा मानसिक धक्का खूप मोठा असू शकतो आणि त्यातून सावरण्याचं बळ, उपाय किंवा आधार हा त्यांना आभासी जगतात मिळण्याची शक्यता फार कमी असते. तिथे फार फार तर सहानुभूती मिळू शकेल, पण त्यातून अंतिम साध्यता काही होण्याची शक्यता नसते. मानसिकदृष्ट्या कोलमडून पडण्याची शक्यता इथे वाढते. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक गोष्ट विनाकारण सोशल मिडियावर शेअर करायची आणि त्यावर प्रतिक्रिया आजमावण्याची, तसंच तिथल्या लाइक्स आणि कॉमेंट्सवर आपलं सोशल स्टेटस ठरवण्याची अत्यंत चुकीची सवय इथं लागते. अभ्यास करण्याच्या वयामध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांचं लक्ष स्मार्टफोन किंवा टॅबवरल्या सोशल मिडिया साइट्सकडं लागून राहणं याचा दुसरा अर्थ म्हणजे त्याचं अभ्यासावरचं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण कमी होणं, असा आहे. अभ्यासामधली प्रगती कमी म्हणजे भविष्यातल्या इतर शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधींचीही कमी, असा थेट परिणाम होण्याची शक्यता वाढते. या सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे भेडसावणाऱ्या व्यसनाधिनतापूर्ण मानसिक रोगालाही 'फेसबुक फोबिया' असं नाव मानसोपचार तज्ज्ञांनी दिलं आहे. या रोगाने ग्रस्त असणाऱ्या युवा वर्गाचं प्रमाण जागतिक स्तरावर चिंताजनकरित्या वाढू लागलं आहे. अत्यंत पराकोटीची नैराश्यग्रस्तता हा या रोगाचा अल्टिमेट अंतिम परिणाम आहे.
व्यक्तिगत पातळीवर होणाऱ्या या रोगाबरोबरच आपण मांडलेली अतिरेकी, टोकाची मतेही दुराग्रही पद्धतीने रेटण्याची मानसिकता या माध्यमामुळे निर्माण होत असल्याचेही अलीकडे निदर्शनाला येऊ लागले आहे. व्यक्तिगत अजेंडा राबवायला कोणाची हरकत असण्याचं कारण नाही, परंतु ते विधायक असलं पाहिजे, समाजाचं, राष्ट्राचं आणि अखिल मानव जातीचं व्यापक हित त्यातून जपलं, जोपासलं गेलं पाहिजे. प्रत्यक्षात बऱ्याच जणांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. समाजविघातक, देशविरोधी कारवायांची किंवा व्यक्तिद्वेषमूलक आक्रमक आरोपणांची पेरणी इथं होताना दिसते आहे. असे विघातक समानधर्मी लोकांचे समूह इथं स्थापन होताहेत. रेव्ह पार्टीची आमंत्रणं इथून वाटली जाताहेत, दहशतवादी हल्ल्यांचे कट इथं आखले जाताहेत, हे भयावह आहे. त्यामुळं सायबर गुन्हे शाखेचं कामही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आणि केवळ देशातच नव्हे; तर, एकूणच जगभरात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मैत्रीच्या आवरणाखाली फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. फेक अकाऊंट उघडून त्या माध्यमातून तरुण तरुणींची फसवणूक आणि चारित्र्यहननही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं आहे. नकळत्या वयामध्ये नको त्या पद्धतीने सेक्शुअल मटेरिअलचा मारा तारुण्यात येऊ घातलेल्या युवक-युवतींवर सुरू आहे. त्यातून एकूणच निकोप स्त्री-पुरूष संबंधांपेक्षा लिंगभेदसापेक्ष, लिंगवर्चस्ववादी विचारसरणीचा भडिमार त्यांच्यावर होतो आहे. त्यातूनही अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती आणि गुन्हेगारीला खतपाणीही इथूनच मिळत आहे. आणि या माहितीच्या या प्रस्फोटाला नियंत्रित करणं, ही आवाक्याबाहेरची गोष्ट आहे- साऱ्यांच्याच!
या पार्श्वभूमीवर सोशल मिडिया किंवा एकूणच नवमाध्यमे आपल्या जीवनशैलीमध्ये मूलभूत बदल घडविण्यास कारणीभूत ठरत आहेत. ती आपलं वर्तमान जसं आहेत, तसंच भवितव्यही आहेत, हे नाकारता येत नसलं तरी त्याचा संयमित, नियंत्रित आणि व्यापक सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून  वापर केला जाणे ही खूप आवश्यक बाब आहे. आणि ती केवळ सेल्फ रेग्युलेशनच्या माध्यमातूनच शक्य आहे. तरुणांनी जसा या माध्यमाला ॲक्सेप्टन्स दिला आहे, त्याच प्रमाणे सेल्फ रेग्युलेशन मेथडही त्यांनीच ॲडॉप्ट करणे, डेव्हलप करणे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि विधायक वापराला प्रेरित करणे ही आपणा सर्वांचीच एकत्रित जबाबदारी आहे.

केवळ वॉट्सअप, फेसबुक म्हणजे सोशल मीडिया नव्हे!
सोशल मीडियाचा वापरकर्ता असो वा अन्य कोणी, प्रत्येकाला वॉट्सअप, फेसबुक किंवा ट्विटर म्हणजेच सोशल मीडिया असे वाटते. यामुळे प्रत्यक्षात ते खूपच संकुचित अर्थाने याचा उल्लेख अथवा वापर करतात, असे जाणवते. खरे तर सोशल मीडियाचे सोशल नेटवर्किंग साइट्स, ब्लॉग्ज, मीडिया शेअरिंग, व्हॉइस ओव्हर आय पी, डॉक्युमेंट शेअरिंग तसेच सोशल बुकमार्किंग असे सर्वसाधारणपणे पाच प्रकार पडतात.
·         सोशल नेटवर्किंग साइट्स या प्रत्यक्षात सोशल नेटवर्क वाढविण्यासाठी वापरल्या जातात. यामध्ये मायस्पेस, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आदींचा समावेश होतो.
·         वेबलॉग किंवा ब्लॉग हा एक अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे, जिथे व्यक्ती, संघटना किंवा संस्था विचार, माहितीच्या आदान प्रदानासाठी ब्लॉगलेखन करू शकतात. उपयुक्त ऑनलाइन माहितीचा खजिना या द्वारे निर्माण करता येऊ शकतो. वर्डप्रेस, ब्लॉगर, टंबलर असे मोफत प्लॅटफॉर्म त्यासाठी उपलब्ध आहेत. खरं तर ट्विटर हा सुद्धा प्रत्यक्षात मायक्रोब्लॉगिंगचाच (१४० शब्दमर्यादा) प्रकार आहे.
·         मीडिया शेअरिंग हा आणखी एक महत्त्वाचा प्रकार आहे. फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासाठी पिकासा, यूट्यूब अशा साइट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे.
·         रिअल टाइम इंटरॅक्टीव्ह माध्यम म्हणून व्हीओआयपी या यंत्रणेचा वापर करतात. याहू मेसेंजर, स्काइप अशा काही प्लॅटफॉर्मची नावे वानगीदाखल सांगता येतील.
·         वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्युमेंट्सचे आदानप्रदान, शेअरिंग करण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण क्लाऊड बेस्ड सुविधा निर्माण केल्या आहेत. यामध्ये स्लाइड शेअर, गुगल ड्राइव्ह, आय-क्लाऊड आदींचा समावेश होतो.
·         न्यूज व बुकमार्किंग साइट्सही भारतात नसल्या तरी पाश्चात्य देशात खूपच लोकप्रिय आहेत. सोशल मीडियाविषयक बातम्यांसाठी डिग असो, किंवा बुकमार्किंगसाठी डिलिशिअस किंवा पिंटरेस्ट असो, त्यांचा एक विशिष्ट वापरकर्ता वर्ग आहे.
·         यापुढे जाऊन आता एज्युकेशनच्या संदर्भातही अनेक उपयुक्त ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध होत आहेत. त्यांचा अतिशय चांगला उपयोग तरुणांना त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीसाठी करून घेता येतो. मूडल, मूक तसेच व्हर्चुअल क्लासरुमसारखे काही उत्तम प्लॅटफॉर्म त्यासाठी विकसित करण्यात आलेले आहेत.

... अन्यथा फ्री वाय-फायही ठरेल 'फुकट'च!
स्मार्ट सिटीसारख्या योजना राबवित असताना त्या शहरांमधून राहणाऱ्या समाजातील कनेक्टीव्हीटी खूप महत्त्वाची असते. त्या दृष्टीने वाय-फाय सारख्या सुविधांचे महत्त्व मोठे आहे. ही सुविधा मोफत देण्यालाही कोणाची हरकत असण्याचं कारण नाही. तथापि, त्या सुविधेचा वापर कशासाठी करावयाचा, याची जाणीव आणि भान संबंधित वापरकर्त्यांत नसेल, तर ही मोफत प्रदान केलेली सुविधा 'फुकट' जाण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे समाजात आधी इंटरनेट, सोशल मीडियाच्या विधायक वापराबद्दलची जाणीवजागृती करणे, त्यांच्या वापराची योग्य संस्कृती निर्माण करणे आणि त्यानंतर त्या सुविधा टप्प्याटप्प्याने मोफत पुरविणे योग्य ठरेल. अन्यथा, केवळ पॉप्युलॅरिस्टीक योजना इतकेच काय ते या योजनांचे अस्तित्व उरेल.

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

डिजिटल इंडिया व उच्च शिक्षण



(भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.), नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा सविस्तर वृत्तांत...)
 
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आयोजित ए.आय.यू.च्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन करताना बिट्स पिलानीचे माजी संचालक प्रा. जी. रघुरामा. (डावीकडून) बेळगावच्या व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. एच. महेशप्पा, ए.आय.यू. चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील आधुनिक प्रवाहांची दखल घेत असतानाच सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी व समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने 'डिजिटल इंडिया व उच्च शिक्षण' या विषयावर शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद नुकतीच दि. २६ व २७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पार पडली. या परिषदेचा सविस्तर कार्यवृत्तांत...
ज्ञानाच्या सृजनात्मकतेमध्ये आघाडीवर असणाऱ्या देशाचे भवितव्यच उज्ज्वल: प्रा. फुरकान कमर
ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांनी परिषदेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेस संबोधित केले. ते म्हणाले, उच्चशिक्षण संस्थांच्या संख्यात्मक पातळीवर भारतात जगातील सर्वाधिक शिक्षण संस्था आहेत. अमेरिका व युरोपमध्ये जिथे केवळ पाच-पाच हजार विद्यापीठे आहेत, तिथे भारतात ८०० विद्यापीठे आणि ४० हजारहून अधिक महाविद्यालये आहेत. भारतातील विद्यार्थी संख्या तीन कोटींच्या घरात आहे. चीननंतर आज आपला विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ ते २३ टक्क्यांच्या घरात आहे. हा आकडा किमान ३० ते ३५ टक्क्यांच्या घरात नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्याचबरोबर रोजगार संधीच्या बाबतीतही मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यामध्येही मोठी तफावत आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी उच्चशिक्षणाच्या पातळीवर धोरणात्मक दिशादर्शन करण्याचा प्रयत्न ए.आय.यू. करीत आहे. ए.आय.यू.तर्फे विभागीय तसेच मध्यवर्ती स्तरावर देशाच्या शैक्षणिक धोरणांसंदर्भात तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातील नवनवीन आधुनिक प्रवाहांचा वेध घेऊन त्यांचा भारतीय शिक्षण पद्धतीत समावेश करण्याच्या अनुषंगाने कुलगुरू परिषदांचे आयोजन करण्यात येते. या परिषदांमधील विचारमंथनातून निघणाऱ्या निष्कर्षांचा सविस्तर अहवाल तयार केला जातो. तो केंद्र सरकारला सादर करण्यात येतो. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा मध्यवर्ती विषय 'डिजिटल इंडिया ॲन्ड हायर एज्युकेशन' असा असून केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया' आणि 'स्कील इंडिया' या धोरणांचा उच्च शिक्षणात समावेश आणि या धोरणांना पूरक उच्च शिक्षण पद्धतीचा विकास या अनुषंगाने विचारविमर्श करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी परिषदेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या परिषदेस राजस्थान, गुजरात, गोवा व महाराष्ट्रातील विद्यापीठांचे साधारण तीस कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. देशाच्या विविध भागांतील कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठास भेट द्यावी आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या शैक्षणिक, संशोधकीय कार्याची त्यांना माहिती व्हावी, हा या परिषदेचे यजमानपद स्वीकारण्यामागील प्रमुख हेतू आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्या सकाळी ९.३० वाजता बिट्स पिलानीचे माजी संचालक व के.के. बिर्ला गोवा कॅम्पसचे प्राध्यापक जी. रघुरामा यांच्या हस्ते करण्यात येईल. ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर अध्यक्षस्थानी असतील, तर बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित असतील. कार्यक्रमात ए.आय.यू.च्या 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत चार चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये 'मेक इन इंडिया फॉर डिजिटल पॅराडाइम', 'सेक्टर स्कील्स इनिशिएटीव्ह्ज अंडर डिजिटल इंडिया', 'डिजिटल इंडिया ॲन्ड हायर एज्युकेशन: रोल ऑफ कॉर्पोरेट सेक्टर' व 'आयसीटी बेस्ड फ्युचरिस्टीक टेक्नॉलॉजी ॲन्ड पोटॅन्शियल रोल ऑफ इंडिया इन हॉरिझॉन २०२०' या विषयांवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ए.आय.यू.चे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड,  सहसचिव डॉ. वीणा भल्ला, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, अवर सचिव प्रदीप कुमार, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. आर.के. कामत, डॉ. निशा मुडे-पवार उपस्थित होते.
'डिजिटल इंडिया'ला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच - प्रा. रघुरामा

कोल्हापूर: ए.आय.यू.च्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या निमित्ताने 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, ए.आय.यू. चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर, बेळगावच्या व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. एच. महेशप्पा, बिट्स पिलानीचे माजी संचालक प्रा. जी. रघुरामा.
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच आहे, असे प्रतिपादन 'बिट्स पिलानी'चे माजी संचालक व गोव्याच्या के.के. बिर्ला कॅम्पसचे प्रा. जी. रघुरामा यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटक या नात्याने 'डिजिटल इंडिया व उच्चशिक्षण' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर होते. बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित होते.
Prof. G. Raghurama
डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेमध्ये आर्थिक व पायाभूत तांत्रिक बाबींचा अडथळा असला तरी भारताच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहण्याची गरज असल्याचे सांगून प्रा. रघुरामा म्हणाले, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्रांती यांमुळे सुविधांचा होणारा गतिमान विकास या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रात अनेकानेक उपयुक्त व्यासपीठे निर्माण होत आहेत. त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी तत्परतेने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठे डिजिटल इंडिया अभियानामध्ये व्यापक सहभाग नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे त्याचे लाभही घेऊ शकतात. डिजिटल इंडिया अभियानातील डिजिटल लॉकर सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे ऑनलाइन प्रमाणपत्रे, पदवी कशा प्रकारे प्रदान करता येऊ शकतील, याचा विचार करता येईल. ऑनलाइन परीक्षा, असेसमेंट, प्रवेश प्रक्रिया, सुपर फॅकल्टी किंवा मॅसिव्ह ऑनलाइन अभ्यासक्रम त्याचप्रमाणे नवनिर्मिती व उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास आदींबाबतही या अभियानाचा चांगला वापर करवून घेता येऊ शकतो. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी समाजमाध्यमांचा उपयुक्त वापर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अद्ययावत अभ्यासक्रम निर्मिती यांच्यासाठीही ऑनलाइन व्यासपीठांचा प्रभावी वापर करता येईल. ऑनलाइन माध्यमांमुळे आता विद्यापीठांनी अधिक स्वतंत्र, स्वायत्त व गतिमान होण्याची वेळ आली आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनी केवळ 'प्रो-भारत' किंवा 'प्रो-इंडिया' विचारसरणी अवलंबण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. फुरकान कमर म्हणाले की, उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. सातत्याने होणारे बदल स्वीकारणे, त्यांना सामोरे जाणे आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची प्रमुख जबाबदारी विद्यापीठांवर आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात उलट चित्र दिसते. हे चित्र नव तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील जास्तीत जास्त तरुणांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्यस्थितीत विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये प्रचंड लवचिकता आणण्याची गरज आहे. स्वतःच्या वेळेनुसार व गरजेनुसार ऑनलाइन स्वरुपात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांवर त्यांचे शंका निरसन करण्यासाठी तयार राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे शिक्षकांनीही नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यावरील अतिरिक्त भार कमी करून नव अध्यापन तंत्रांचा अंगिकार केला पाहिजे. संशोधन व नवनिर्मितीच्या नवसंकल्पनांना आविष्कृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाला पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेच्या निमित्ताने ए.आय.यू.चे साप्ताहिक 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी आभार मानले. यावेळी शहीद दिनानिमित्त शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले; तर, संविधान दिनानिमित्त प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रा. सोहन तिवडे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या चार राज्यांतील कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींसह ए.आय.यू.चे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड, सहसचिव वीणा भल्ला, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह विविध अधिविभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवस पहिला
डिजिटल साधनसुविधांमुळे परीक्षा पद्धतीत क्रांतीकारक बदल शक्य - डॉ. एच. महेशप्पा
Dr. H. Maheshappa
ऑनलाइन व डिजिटल साधनसुविधांच्या सहाय्याने विद्यापीठीय परीक्षा पद्धतीत क्रांतीकारक बदल घडवून आणता येऊ शकतात, असे प्रतिपादन बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाचे (व्ही.टी.यू.) कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा यांनी केले. ए.आय.यू.च्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेत पहिल्या सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. एन.के. गोयल होते.
व्ही.टी.यू.ने गेल्या दोन वर्षांत परीक्षा पद्धतीत नवतंत्रज्ञानाच्या आधारावर अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. याची दखल घेऊन सन २०१३मध्ये त्यांना देशातील सर्वाधिक नवनिर्माणकर्ते विद्यापीठ म्हणून गौरविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या यशस्वी प्रयोगांची माहिती देताना कुलगुरू डॉ. महेशप्पा म्हणाले, परीक्षा यंत्रणा हा विद्यापीठीय यंत्रणेमधील सर्वात महत्त्वाचा व विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्यांच्या भवितव्याची दिशा येथील मूल्यमापनावर अवलंबून असते. विद्यापीठावर परीक्षा सुरळीत घेण्याचा आणि वेळेत निकाल लावण्याचे सर्वात महत्त्वाचे आव्हान असते. या ठिकाणी ऑनलाइन व डिजिटल साधन सुविधांचा वापर करून विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच वेळेची, श्रमाची तसेच कागदाचीही बचत करणे शक्य आहे. प्रश्नपत्रिकांचे सुरक्षितरित्या ऑनलाइन वाटप करण्याबरोबरच उत्तरपत्रिकांची डिजिटल तपासणी करणेही शक्य आहे. व्ही.टी.यू.मध्ये या पद्धतीने परीक्षा घेऊन केवळ २१ दिवसांत निकाल लावणे शक्य असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन संलग्नता प्रक्रियाही पूर्णतः ऑनलाइन करता येऊ शकते. पीएच.डी. सह विविध परीक्षांतर्गत शोधनिबंध व शोधप्रबंधांच्या बाबतीत वाङ्मयचौर्य तपासणे व रोखणेही ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे. तसेच ई-रिसोर्स म्हणजे ऑनलाइनरित्या विविध माहिती स्रोतांचे एकत्रीकरण करून ते संशोधकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येणेही शक्य आहे.
कौशल्याधारित अभ्यासक्रमांची कळीची भूमिका: युधिष्ठिर यादव
Yudhisther Yadav
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात नॅसकॉम (मुंबई)च्या सेक्टर स्कील कौन्सिलचे प्रादेशिक प्रमुख युधिष्ठिर यादव यांनी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योग व्यवसायांत असलेल्या संधींची आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबई येथील डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी व बायोइन्फॉर्मेटिक्सच्या प्रा. देबजानी दासगुप्ता सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.
'सेक्टर स्कील्स इनिशिएटीव्ह्ज अंडर डिजिटल इंडिया' या विषयावर बोलताना श्री. यादव म्हणाले, सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योगांत सर्वाधिक मनुष्यबळ रोजगारात सामावून घेतले जाते आहे. सध्या भारतात या उद्योगांची उलाढाल २२५ अब्ज डॉलरच्या घरात असून सन २०२०पर्यंत ती ३०० अब्ज डॉलरच्या घरात जाणार आहे. तसेच सध्या साडेतीन दशलक्ष विद्यार्थी या क्षेत्रात सामावून घेतले जात आहे, ही संख्या सहा टक्के दराने वाढते आहे. केवळ देशातल्या टॉप-२० कंपन्यांमध्येच त्यातले १.२५ दशलक्ष लोक कार्यरत आहेत. यावरुन या क्षेत्राची व्याप्ती लक्षात येईल. यामुळे विद्यापीठांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण विविध तांत्रिक व सॉफ्ट स्कील्स असलेल्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीधारक विद्यार्थ्यांच्या तुलनेत रोजगार मिळण्याची संधी अधिक आहे. कौशल्याधारित अभ्यासक्रम हा सध्याच्या काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचे लाभ पोहोचविण्यासाठी 'नॅसकॉम' सातत्याने प्रयत्नशील असून इंडस्ट्री-रेडी व जॉब-रेडी अभ्यासक्रम अशा दोहोंच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञान उद्योग व शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्यास, सहकार्य करण्यास सर्वतोपरी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आऊटकम बेड्स एज्युकेशन ठरणार महत्त्वाचे: प्रा.डी.एच. राव
Prof. D.H. Rao
तिसऱ्या सत्रात बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे प्रा. डी.एच. राव यांनी 'आयसीटी आऊटकम बेस्ड एज्युकेशन' या विषयावर मार्गदर्शन केले. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए.एम. महाजन अध्यक्षस्थानी होते.
शिक्षककेंद्री ते विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धतींना जोडणारा दुवा म्हणजे आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) असल्याचे सांगून प्रा. राव म्हणाले, यामध्ये ई-आर-आर-सी मॉडेल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे मॉडेल म्हणजे इलिमिनेट-रिड्युस-रेज-क्रिएट असे आहे. विद्यार्थ्यांमधील उदासीनता दूर करणे, पारंपरिक शिक्षण पद्धतीत नवतंत्रज्ञानाचा अंगिकार करून त्यातील पारंपरिकता कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, संवाद, समस्या सोडविण्याची क्षमता व चिकित्सक विचारसरणीचा विकास करणे आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणे यासाठी विद्यापीठीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांत अधिक अभ्यास करण्याची, त्या अभ्यासाचे उपयोजन करण्याची आणि विविधांगी कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता विकसित करणे हे आधुनिक शिक्षण पद्धतीचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आऊटकम बेस्ड शिक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
दिवस दुसरा
बॉश कंपनीचे सादरीकरण
Smt. Sumita Ramesh & Sriram S.
कुलगुरू परिषदेत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात बॉश या मल्टिनॅशनल कंपनीच्या वतीने श्रीमती सुमिता रमेश व श्रीराम एस. यांनी सादरीकरण केले. शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्या सहकार्य वृद्धीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बॉश कंपनीतर्फे विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये चालविलेल्या अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी दिली. टेलर-मेड अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कंपन्यांना आवश्यक असणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते. त्यामुळे असे व्यावसायिक अभ्यासक्रम बी.व्होक. व टेक्विपच्या माध्यमातून विद्यापीठांतून राबविले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आयसीटी प्रणाली शिक्षकाला पर्यायी नव्हे; पूरकच! - 'सी-डॅक'चे सहसंचालक महेश कुलकर्णी
Mahesh Kulkarni
आयसीटी बेस्ड शिक्षण प्रणाली शिक्षकाला कधीही पर्याय ठरू शकत नाही; तर, अधिक पूरकच ठरेल, असे प्रतिपादन सी-डॅकचे सहसंचालक व 'डब्ल्यू-थ्री-सी इंडिया'चे कंट्री मॅनेजर महेश कुलकर्णी यांनी केले. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. एस.एम. सोनी होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, माहिती संवाद तंत्रज्ञानाधारित साधने व सुविधा या अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रवाही करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांच्या मुळे शिक्षकाचे महत्त्व कमी होत नाही. उलट माहितीचा ओघ विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत असल्यामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्यांना अधिक प्रगल्भ बनविण्याची जबाबदारी शिक्षकच यथार्थपणे पार पाडू शकतात.
श्री. कुलकर्णी यांनी आपल्या सादरीकरणा दरम्यान भविष्यातील शैक्षणिक साधनांची व्याप्ती स्पष्ट केली. ते म्हणाले, ई-बुक्स, ई-पब सारख्या इंटरॅक्टीव्ह माध्यमांबरोबरच वेब व टीव्ही बेस्ड लर्निंग, टी-गव्हर्नन्स यांचा वापर शिक्षण पद्धतीत अनिवार्य आहे. आपल्याकडे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची कमी नाही. त्यांना संशोधनासाठी आणि त्यापेक्षाही पेटंट मिळवून देणाऱ्या संशोधनासाठी प्रेरित करण्याची गरज आहे. आपल्या विद्यापीठांतून भरीव संशोधन सुरू आहे. मात्र पाश्चात्य देशांच्या तुलनेत पेटंटिंगच्या बाबतीत आपण मागे पडतो. ही उणीव भविष्यात भरून काढण्याची गरज आहे.
भविष्यात शिक्षण पद्धतीवर प्रभाव टाकतील अशा अभिनव क्षेत्रांची माहितीही त्यांनी आपल्या व्हीजन-२०३५च्या माध्यमातून दिली. यामध्ये थ्री-डी प्रिंटीग, प्लास्मॉनिक्स, फोटोनिक्स, सिमँटेक वेब, सिंथेटिक बायॉलॉजी, सोलार टेक्नॉलॉजीज, स्मार्ट फॅब्रिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, रिअल टाइम स्पीच टू स्पीच ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी, ऑप्टो-जेनेटिक्स, ॲडव्हान्स्ड जिनॉमिक्स, बायो-मिमॅटिक्स, नेचर इन्स्पायर्ड रोबोटिक्स इत्यादी अनेक नवीन शाखांचा उदय माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे होतो आहे. त्याला पूरक व पोषक अशा प्रकारचे कुशल मनुष्यबळ विद्यापीठीय स्तरावर विकसित करण्याची गरज आहे. ऑनलाइन कम्प्युटिंगच्या क्षेत्रात नैसर्गिक भाषा प्रोसेसिंग (एन.एल.पी.) हे भविष्य आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, सायबर सिक्युरिटी, डाटा जनरेशन व मेंटेनन्स यांसारख्या आव्हानांवर मात करून आपल्याला या नवतंत्रज्ञानासह पुढे जाण्याची जाणीवही त्यांनी करून दिली.
समारोप सत्र:
देशाला धोरणात्मक दिशा देण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रातील धुरिणांवर - प्रा. फुरकान कमर
Prof. Furqan Qamar
देशाला धोरणात्मक दिशा देण्याची आणि केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याचे उत्तरदायित्व शिक्षण क्षेत्रातील धुरिणांवर आहे, असे प्रतिपादन भारतीय विश्वविद्यालय संघाचे (ए.आय.यू.) सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांनी केले. शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
      परिषदेतील चर्चासत्रांत कुलगुरूंचा सहभाग उत्साहवर्धक होता आणि त्यांमध्ये अत्यंत उच्च दर्जाची चर्चा झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रा. कमर म्हणाले, समाजात काही चुकीचे घडू लागले तर, त्यासाठी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले जाते. त्यामुळे योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कुलगुरू हे केवळ विद्यापीठाचेच प्रमुख असतात, असे नव्हे; तर, त्यांच्या उच्च विद्याविभूषिततेमुळे समाजाचे दिग्दर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आपले विद्यापीठ, आपली महाविद्यालये यांच्या पलिकडे जाऊन आपल्यावरील व्यापक सामाजिक जबाबदाऱ्या निभावण्यात आपण सर्वांच्या पुढे असले पाहिजे. देशाच्या विकासाला धोरणात्मक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उच्चशिक्षण क्षेत्रावरच आहे.
    दरम्यान, सदर पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या अहवालातील शिफारशींवर विचारविमर्श होऊन त्या पुढे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच ए.आय.यू.ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणंद येथील सरदार पटेल विद्यापीठात ५ ते ७ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
 अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ए.आय.यू. आणि उपस्थित कुलगुरूंना विद्यापीठात या परिषदेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले, सदर परिषदेत अतिशय उत्तम चर्चा झाली. त्यातील निष्कर्षही खूप सकारात्मक आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात ए.आय.यू. ने 'स्मार्ट युनिव्हर्सिटी' या विषयावर परिषद आयोजित करावी. कारण विद्यापीठे स्मार्ट झाली, तरच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीसारख्या योजना यशस्वी होण्यास चालना मिळेल.
विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक तथा परिषदेचे नोडल ऑफिसर डॉ. डी.आर. मोरे यांनी दोनदिवसीय परिषदेतील चर्चासत्रांचा आढावा घेऊन अहवाल वाचन केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते सदर अहवाल प्रा. कमर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. एस.एम. सोनी आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एच. पवार यांनी या परिषदेत झालेल्या चर्चासत्रांबद्दल प्रातिनिधिक प्रतिक्रिया नोंदविल्या. प्रा. आर.के कामत यांनी सत्र संचालन केले. यावेळी ए.आय.यू.च्या वतीने सहसचिव सॅम्पसन डेव्हीड यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिवकालीन युद्धकला पाहून भारावले पाहुणे!
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आज सायंकाळी सादर झालेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके पाहून आज देशाच्या विविध ठिकाणांहून आलेले कुलगुरू अक्षरशः भारावले. कुलगुरू परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्र समाप्तीनंतर सायंकाळी पाहुण्यांसाठी कोल्हापूरची अस्मिता असलेल्या शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. स्व. वस्ताद ठोंबरे ग्रुपने ही प्रात्यक्षिके सादर केली. चार वर्षांच्या बालक-बालिकांपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणारी ही प्रात्यक्षिके पाहून सारेच पाहुणे मंत्रमुग्ध झाले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी फिरविणे यांच्यासह अनेक थरारक प्रात्यक्षिके कित्येकदा काळजाचा ठोकाही चुकला. सुमारे दीड तासांच्या या प्रात्यक्षिकांनंतर सर्व सादरकर्त्या कलाकारांवर पाहुण्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तसेच कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन त्यांना सन्मानितही करण्यात आले.
कुलगुरूंचा सन्मान कोल्हापुरी फेट्यांनी!
Vice Chancellors from Rajsthan, Gujrat, Maharashtra & Goa wearing Kolhapuri Phetas at Shivaji University, Kolhapur in front of the statue of Chh. Shivaji Maharaj.
या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहिलेले ए.आय.यू.चे पदाधिकारी, कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आवर्जून कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले. तसेच, यावेळी प्रत्येक कुलगुरूंचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिवपुतळ्यासमोरील उद्यानात फेट्यांसह फोटो काढून घेण्याचा मोह पाहुण्यांना आवरता आला नाही. शिवाजी विद्यापीठाचा परिसर प्रेमात पडावा असा आहे आणि प्रांगणातील शिवपुतळा देशप्रेमाने भारावून टाकणारा आहे, अशी प्रतिक्रियाही पाहुण्यांनी व्यक्त केली.