मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

गौडबंगाल ऑफ सिनौली..?











('दै. पुढारी'च्या यंदाच्या 'दीपस्तंभ' दीपावली विशेषांकामध्ये 'सिनौली' उत्खननाच्या अनुषंगाने सविस्तर लिहीले आहे. हा लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर) 


फेब्रुवारी २०२१मध्ये एका इन्फोटेनमेंट वाहिनीवर ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’ ही साधारण ५५ मिनिटांची डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. उत्तर प्रदेशातील गंगा-यमुनेच्या दोआबातील बागपतजवळील सिनौली येथे सन २००५-०६ आणि सन २०१८ अशा दोन टप्प्यांत करण्यात आलेल्या पुरातत्त्वीय उत्खननामध्ये सापडलेल्या दफनभूमी, त्यांमधील मानवी अवशेष, त्यासोबत आढळलेल्या वस्तू आणि त्यांच्या आधारे काढण्यात आलेले निष्कर्ष या बाबींवर हा माहितीपट आधारित आहे. नीरज पांडे यांच्यासारखा उत्तम निर्माता-दिग्दर्शक, मनोज वाजपेयी यांच्यासारखा मुरब्बी अभिनेत्याचे सूत्रसंचालन आणि दर्जेदार ग्राफिक्स यांमुळे हा माहितीपट निश्चितपणे प्रेक्षणीय झालेला आहे. जोडीला सिनौलीच्या सन २००५मधील उत्खननाचे प्रमुख माजी संचालक डी.व्ही. शर्मा, सन २०१८च्या उत्खननाचे संचालक आणि एएसआयचे सहाय्यक महासंचालक डॉ. संजय कुमार मंजुल, एएसआयचे माजी सहाय्यक महासंचालक पद्मश्री डॉ. आर.एस. बिश्त, माजी महासंचालक पद्मभूषण बी.बी. लाल, माजी सहाय्यक महासंचालक प्रो. के.एन. दीक्षित आणि संचालक डॉ. (श्रीमती) अर्विन मंजुल इत्यादी पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ आजी-माजी पदाधिकाऱ्यांची फौज विश्लेषण करताना, निष्कर्ष प्रतिपादित करताना दिसते. मात्र, त्यांच्याकडून मांडले गेलेले निष्कर्ष राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर वादग्रस्त ठरलेले आहेत.

सिनौली येथील उत्खननामुळे आर्य हे स्थलांतरित नव्हे, तर इथलेच आहेत आणि वैदिक संस्कृती येथे सनपूर्व २२०० पासून आहेच; त्याचप्रमाणे सिनौली येथे सापडलेले रथांचे अवशेष आणि शस्त्रास्त्रे ही महाभारत युध्द खरेच घडले असावे याचा पुरावा आहेत, अशा प्रकारचे दावे खरे मानून सदर माहितीपट बनविण्यात आला, जिने हे दावे बळकट करायला हातभार लावला आहे, असे या संदर्भातील संशोधन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. सिनौली येथील उत्खननाबाबत काढण्यात आलेले निष्कर्ष अत्यंत अशास्त्रीय स्वरुपाचे आहेत, असा प्रमुख आक्षेप घेण्यात येतो आहे. त्याबाबत चर्चा करण्यापूर्वी नेमकी ही उत्खनने काय आहेत, हे जाणून घ्यायला हवे.

सन २००५-०६मधील उत्खनन:

सिनौली हे उत्तर प्रदेशातील छोटेसे गाव. दिल्लीपासून साधारण ७५ किलोमीटरवर वसलेले. येथील रहिवाशांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सन २००५मध्ये सत्तार अली (दि. १ जुलै २००६ रोजीच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये हे नाव देण्यात आले आहे. अलीकडच्या विविध दैनिकांमध्ये मात्र शेतकऱ्याचे नाव श्रीराम शर्मा असे सांगितले जाते. असो!) हा शेतकरी आपल्या उसाच्या शेतात नांगरट करीत असताना त्याला अचानकपणे काही वस्तू सापडू लागल्या. त्यामध्ये काही बिडाचे मणी, सोन्याच्या बांगड्यांचे तुकडे, मडक्यांच्या फुटक्या खापऱ्या आणि काही मानवी हाडांचे अवशेषही होते. स्थानिकांची ते पाहण्यासाठी आणि पळवण्यासाठी गर्दी होऊ लागली. ताहीर हुसैन (याचे नावही केवळ ‘टाइम्स’च्या वार्तांकनात आहे, अन्यत्र नाही.) या तरुणाने या प्रकाराची माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाला त्यावेळी दिली, म्हणून पुढील उत्खनन होऊ शकले.

ऑगस्ट २००५पासून पुढे सुमारे वर्ष- दीड वर्ष या परिसरात बारतीय पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) डी.व्ही. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन करण्यात आले. हे ठिकाण आणि उत्खनन वैशिष्ट्यपूर्ण ठरले याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात सापडलेली ही हडप्पाकालीन एकमेव दफनभूमी आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे दफन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या सांगाड्यांशेजारी सापडलेल्या तांब्याच्या दोन दुधारी तलवारी (अँटेना स्वॉर्ड) होय. त्यांना पकडण्यासाठी तांब्याच्याच मुठी होत्या. या उत्खननात १२६ सांगाडे सापडले. त्यातील बरेचसे चांगल्या स्थितीत, तर काही विस्कळीत होते. अर्थातच येथील तत्कालीन वस्ती चांगलीच दाट असल्याची खात्री त्यातून होते. येथील एका सांगाड्याच्या दोन्ही हातांत तांब्याचे कडे आढळले. त्यापासून काही अंतरावरील एका दफनात एका प्राण्याचे अवशेष आढळले. मृतासोबत बळी देण्याचा हा प्रकार असावा. उत्खननातील अन्य वस्तूंमध्ये बीडाच्या मण्यांचे हार, सोन्याचे दागिने, तांब्याचे भाले, मृण्मयी प्रतिमा, मृताच्या डोक्याकडील बाजूला काही मातीची भांडी आढळली, ज्यामध्ये यमासाठी नैवेद्य म्हणून धान्य, दही, तूप, सोमरस इत्यादी पदार्थ ठेवले असावेत. (असा तज्ज्ञांचा अंदाज.) दफनभूमीला घेरणाऱ्या भाजलेल्या विटांच्या भिंतीचेही अवशेष मिळाले. मृतावशेषांचे कार्बन डेटिंग केले असता त्यांचा कालावधी इसवी सन पूर्व २०००च्या आसपास (इ.स.पू. २२०० ते इ.स.पू. १८००) असल्याचे आढळून आले. या दफनांचे हडप्पा येथे मिळून आलेल्या उत्तरकालीन दफनांशी साधर्म्य असल्याचे पुरातत्व खात्याचे सिनौली उत्खननाचे प्रमुख डी. व्ही. शर्मा यांनी घोषित केले.

मृताच्या दफनाची दिशा ही ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे दक्षिणोत्तर आहे आणि नैवेद्याची प्रथा शतपथ ब्राह्मणात वर्णिल्याप्रमाणे आहे, असेही शर्मा यांचे म्हणणे. मात्र, याबाबत इतक्या तातडीने कोणत्याही निष्कर्षाला जाणे योग्य नाही, असे अन्य इतिहासतज्ज्ञांचे मत आहे.

ही सन २००५-०६ची उत्खनने होताहेत, तोपर्यंतच उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला महाभारताच्या पर्यटन सर्किटमध्ये सिनौलीच्या समावेशाची घाई लागलेली. महाभारताच्या पानिपत, सोनपत, हस्तिनापूर आणि बागपत या जोडीने सिनौलीचाही समावेश करण्याचा प्रस्ताव राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री ख्वाब हमीद यांनी केंद्र सरकारला दिला सुद्धा होता.

तेरा महिन्यांच्या उत्खननानंतर ‘एएसआय’ने त्यावेळी हे उत्खनन थांबविले. नंतर बराच काळ सिनौली येथे नवे उत्खनन झाले नाही.

सन २०१८मधील उत्खनन:

सन २०१८ मध्ये या प्राचीन दफनभूमीजवळच उत्खननाचा दुसरा टप्पा डॉ. संजय कुमार मंजुल यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला. सन २००५-०६च्या उत्खनन क्षेत्रापासून साधारण १०० मीटर अंतरावर मार्च ते मे २०१८ या काळात प्रायोगिक उत्खनन घेण्यात आले. यावेळी येथे आणखी काही दफने सापडली. विशेष म्हणजे या उत्खननात शवपेट्या आणि पूर्ण आकाराचे छकडेसदृश गाडे सापडले. त्या जोडीलाच गेरू रंगाची मातीची भांडी, तांब्याची शिरस्त्राणे, चिलखत, तांब्याच्या तलवारी व ढाल, टेराकोटाची मोठी भांडी, भडक काठाची तांबडी भांडी, तांब्याचे खिळे आणि बीडाचे मणी अशा बाबीही सापडल्या. या पूर्वी हडप्पा (पंजाब) येथे आणि ढोलावीरा (गुजरात) येथे अशा प्रकारच्या लाकडी शवपेट्या सापडल्या होत्या.

या उत्खननात सापडलेल्या लाकडी शवपेट्या तांब्याच्या नक्षीदार पत्र्याने आच्छादित केलेल्या होत्या. मृतांसोबत पुरलेल्या छकडेसदृश गाड्यांचेही अवशेष मिळाले. एका शवपेटीवरील तांब्याच्या पत्र्यावर पिंपळपान आणि बैलाच्या शिंगांचे शिरस्त्राण-सदृश अथवा बैलाचे मस्तक सूचित करणारी आकृती कोरलेली मिळाली. एका शवपेटीत स्त्रीचे शव असून तिच्या हातावर गोमेद जडवलेला बाजूबंदही सापडला.

या शवपेट्यांच्या दफनामध्येही तीन प्रकार आढळले. पहिला प्रकार म्हणजे प्राथमिक दफन. यामध्ये पूर्ण मानवी दफन आहे. अर्थात शवपेटीत एकाच व्यक्तीचे दफनकर्म येथे केले आहे. दुसरा प्रकार हा विखंडित दफनाचा आहे, ज्यामध्ये अनेक व्यक्तींचे सांगाडे त्या शवपेटीत एकत्रित आढळले. तिसरा प्रकार हा केवळ सांकेतिक दफनाचा आहे. इथे शवपेटीत कोणताही सांगाडा आढळला नाही. एका शवपेटीत महिलेचा सांगाडाही आढळला. विशेष म्हणजे तिच्यासमवेत अन्य वस्तूंबरोबरच तांब्याच्या तलवारीचेही दफन करण्यात आले आहे. याचा अर्थ ती सुद्धा एक योद्धा होती. मात्र, तिच्या पायाचा खालील म्हणजे घोट्यापासून खालचा भाग मात्र गायब आहे. हा एखाद्या प्रथेचा भाग आहे की अन्य काही, हे कळायला मार्ग नाही. या महिलेच्या मृतदेहाचे डीएनए विश्लेषण केले असता, तिचा कालखंडही इ.स.पू. २१०० ते १९०० इतका निष्पन्न झाला आहे.

या लाकडी शवपेट्या संरक्षित राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर केलेले तांब्याचे नक्षीकाम. लाकडी पायांवर स्थित या शवपेट्यांच्या सर्व बाजूंनी आणि अगदी पायांवरही तांब्याचे नक्षीकाम केले आहे. त्यामुळे लाकूड जरी पूर्णतः कुजून नष्ट झाले तरी या तांब्यामुळे शवपेट्या सुरक्षित राहू शकल्या.

पहिल्या प्रकारच्या दफनभूमीत गाडा आढळला, मात्र तेथे बैल अगर घोडा अशा कोणत्याही प्राण्याचे अवशेष आढळलेले नाहीत. एका दफनभूमीत एक आणि अन्य एका दफनभूमीत एकाच ठिकाणी दोन असे एकूण तीन गाडे या उत्खननात आढळले.

‘एएसआय’चे विश्लेषण, वादाचे मुद्दे आणि वास्तव:

सिनौली येथील दुसऱ्या टप्प्यातील या उत्खननाचे वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे शवपेट्या आणि त्याहून अधिक आकर्षणाचा बिंदू राहिला तो म्हणजे सापडलेले गाडे. हे गाडे म्हणजे इंडो-आर्यन तंत्रज्ञानाप्रमाणे युद्धात वापरले गेलेले रथ आहेत आणि ते घोड्यांकरवी खेचले जात होते, असा निष्कर्ष संचालक मंजुल मांडतात. त्यांच्या मते, "भारतीय उपखंडात प्रथमच उत्खननात अशा प्रकारे घोड्यांनी खेचले जाणारे रथ सापडले आहेत. सिनौली येथील दफनविधी वैदिक विधींशी घनिष्ट संबंध दर्शवितात. तसेच, महाभारताचा कालावधीही ई.स.पू. १७५०च्या आसपास आहे." असे अनेक निष्कर्ष मंजुल मांडतात. त्यांचे माहितीपटातले सारे तज्ज्ञ समर्थन करताना दिसतात, मात्र कोणत्याही ठोस पुराव्याअभावी.

एका स्थानिक दंतकथेनुसार, श्रीकृष्णाने कुरूक्षेत्राचे युद्ध टाळण्यासाठी ज्या पाच ठिकाणी कौरवांशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी एक सिनौली हे आहे. महाभारतात वर्णन केलेल्या रथाशी येथे सापडलेल्या गाड्याची संरचना मिळतीजुळती आहे, असाही एक प्रवाद आहे. महाभारत हे महाकाव्य नसून घटित इतिहास आहे आणि ते सप्रमाण सिद्ध करण्याचे जे खटाटोप सद्यस्थितीत चालले आहेत, ते पाहिले की या साऱ्याचा हेतू लक्षात यायला वेळ लागत नाही. अघटिताशी तथ्यांशी तुलना करणे अगर त्या तुलनेचा वापर तथ्यांच्या सिद्धतेसाठी करणे शास्त्रीयदृष्ट्या किती गैर आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र, तसा प्रयत्न येथे होताना दिसतो खरा!  

त्याचप्रमाणे माहितीपटात एएसआयचे तज्ज्ञ डी.व्ही. शर्मा अंत्यसंस्काराविषयी ऋग्वेदातल्या पुरूषसुक्ताच्या एका ऋचेचा दाखला देतात. मात्र, या ऋचेमध्ये दफन केलेल्या मृत शरीराचा नव्हे, तर अस्थि-कलशाचा (दहन केल्यानंतर उर्वरित अवशेष ठेवलेल्या) संदर्भ असल्याचे मात्र ते सांगत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे या दफनांचा काळ हा ताम्रयुगीन दिसतो. ऋग्वेदाचा अर्थात वेदांचा कालखंड हा त्यानंतरचा आहे, हेही येथे सोयीस्करपणे दुर्लक्षित केले आहे.

इंडो-आर्यनांच्या आगमनापूर्वी भारतात घोड्यांची उपस्थिती सुचवणे, याकडे काहींनी इंडो-आर्यन स्थलांतर सिद्धांताला आव्हान म्हणून पाहिले. तथापि, सापडलेल्या गाड्याची "रथ" म्हणून ओळख करून देणे यामध्ये अडचण आहे. सापडलेल्या गाड्याची चाके घन अर्थात भरीव आहेत. त्याला रथाप्रमाणे आरे नाहीत. अशा भरीव गाड्या ओढण्यासाठी बैलांची आवश्यकता असते. मात्र, युद्धात वापरण्यास ते कुचकामीच ठरणारे आहेत. आणि घोड्यांच्या अस्तित्वाचे तर कोणतेही पुरावेच नाहीत.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या इतिहासतज्ज्ञ रुचिका शर्मा यांच्या मते, ‘एएसआय’ या उत्खननातील गाड्यांना रथ का म्हणते, याचे स्पष्टीकरण व्हायला हवे. हडप्पाकालीन परिसरात बैलगाड्या असणे ही काही असाधारण बाब नाही. टेराकोटाच्या अशा गाड्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. ‘एएसआय’ला त्यांच्या शोधांना हिंदुत्वाचा रंग देण्याची सवय आहे. त्यांनी यापूर्वीही काही स्त्री आकृत्यांचा अर्थ 'मातृदेवता' असा लावला होता. मात्र, ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते.

पुरातत्त्वज्ज्ञ प्रा. मायकल विट्झेल यांनीही या गाड्याला रथ म्हणणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचा शोध उत्तर-हडप्पाकालीन संघटित समाजाच्या अस्तित्वाकडे निश्चितपणे निर्देश करू शकतो, असे ते म्हणतात. आणखी एक तज्ज्ञ असको पारपोला यांच्या मते, या गाड्या बैलांकरवीच ओढल्या जात असाव्यात आणि त्याद्वारे सिंथास्ता संस्कृतीमधून इंडो-इराणीपूर्व भाषिक लोकांचे भारतीय उपखंडात झालेल्या स्थलांतराचे संकेत निश्चित प्राप्त होतात. उत्तर-हडप्पा संस्कृतीचा सत्ताधारी वर्ग म्हणून तो येथे उदयास आला असावा. आद्य ऋग्वेदिक किंवा पूर्व वैदिक लोकांच्या स्थलांतराचे संकेत यातून मिळतात. सिनौलीतील गाड्यांच्या या शोधामुळे पूर्व-ऋग्वेदिक काळातील आर्यनभाषिकांच्या स्थलांतराच्या लाटेविषयी आपल्या सिद्धांताला बळकटीच मिळते, असेही पारपोला यांचे म्हणणे आहे.

इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्यांचे भारतातले आगमन हा विषय एवढा संवेदनशील का असावा, याचे स्पष्टीकरण टोनी जोसेफ यांच्या ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकामध्ये आपल्याला मिळते. या प्रश्नाचे उत्तर देताना जोसेफ यांनी म्हटले आहे की, त्यामागे असलेले एक अलिखित गृहितक त्यासाठी जबाबदार आहे. ते गृहितक म्हणजे ‘आर्य’, ‘संस्कृत’ आणि ‘वेद’ हे एवढे तीनच शब्द भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यास पुरेसे आहेत. त्यामुळेच इंडो-युरोपीय भाषा बोलणारे भारतात कधी आले, हा प्रश्न विचारणे म्हणजे आपण आपली संस्कृती कधी आयात केली?, असे विचारण्यासारखे आहे. जोसेफ पुढे म्हणतात, परंतु हा दृष्टीकोन हास्यास्पद आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भारतीय संस्कृती ही फक्त आर्य, संस्कृत किंवा वैदिक संस्कृती नव्हे. आजच्या अनन्यसाधारण अशा भारतीय संस्कृतीच्या प्रवाहातली ‘वैदिक संस्कृती’ ही एक महत्त्वाची धारा आहे; पण कोणत्याही दृष्टीने ती धारा एकमेव नाही. इतर अनेक धारा भारतीय संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात मिसळल्या आहेत. दुसरे म्हणजे कोणत्याही अमूकच एका कालखंडात इंडो-युरोपीय भाषा भारतात येऊन पोहोचल्या, असे म्हणणे म्हणजे वेद, संस्कृत आणि आर्य संस्कृती जणू काही एका खोक्यातून आणवून, दिलेल्या तयार आराखड्यानुसार त्यांची इथे फक्त पुनर्बांधणी करण्यात आली, असे सुचविल्यासारखे आहे. प्रत्यक्षात मात्र वैदिक भाषा स्वतःबरोबर इथे घेऊन आलेले लोक, त्यांच्या येण्यापूर्वीचे इथले रहिवासी यांच्यातील परस्पर संपर्क, त्यांनी आत्मसात केलेली एकमेकांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि इथलेच होऊन राहण्यासाठी केलेले सांस्कृतिक-सामाजिक बदल या सर्व घटकांची घुसळण होऊन ‘आर्य/वैदिक’ संस्कृती घडत गेली असावी.

त्यापुढे जाऊन जोसेफ सांगतात की, वैदिक संस्कृत बोलणारे भारतातले जनसमूह त्यांची भाषा त्यांच्याबरोबर जगभर घेऊन गेले की, ती भाषा बोलणारे लोक बाहेरून भारतात आले, या प्रश्नावर उलटसुलट चर्चा करायला आतापर्यंत वाव होता; परंतु जनुकीय संशोधनामुळे, विशेषतः प्राचीन डीएनएवर आधारित संशोधनामुळे आता या वादावर पडदा पडण्याची ठोस शक्यता निर्माण झाली आहे.  

आर्यांच्या जनुकीय पूर्वजसाखळीच्या अनुषंगाने ‘अर्ली इंडियन्स’मध्ये ते लिहीतात, “इंडो-युरोपीय भाषकांच्या भारतातील आगमनाविषयी अधिक काही जाणून घेण्यापूर्वी एक पाऊल मागे जाऊ या आणि भारतातून बाहेर गेलेल्या लोकांविषयीच्या गृहितकाच्या संदर्भात चर्चा करताना उद्भवलेल्या एका उपप्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या : जर इंडो-युरोपीय भाषेचा प्रसार युरेशियाच्या विस्तृत प्रदेशात झाला होता, तर त्या भूप्रदेशात त्या भाषा बोलणाऱ्यांचे जनुकीय अंश आढळतात का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. ‘वाय’ गुणसूत्राचा हॅप्लोग्रुप R1a किंवा अधिक तपशीलानं सांगायचं तर त्याचा उपगट R1a-M417, हा जगभरातल्या जवळजवळ सर्व R1a हॅप्लोग्रुपमध्ये दिसतो. R1a-M417 या R1aच्या उपगटाच्या विस्ताराचा नकाशा पाहिला तर त्यामध्ये स्कॅन्डीनेव्हियापासून दक्षिण आशियापर्यंत म्हणजेच इंडो-युरोपीय भाषा ज्या प्रदेशात बोलल्या जातात, ते सर्व प्रदेश त्या नकाशात सामावलेले दिसतात.

आपण R1a-M417चा आणखी खोलात जाऊन विचार केला आणि जगभरात तो कसा पसरत गेला, हे पाहू शकतो का? हो, नक्कीच पाहू शकतो. ते असं आहे: इसवी सन पूर्वी ३८००च्या सुमारास R1a-M417चं दोन गटांमध्ये विभाजन झालं. ते गट आहेत R1a-Z282 आणि R1a-Z93. हे गट वेगळे होऊन दोन वेगवेगळ्या मार्गांनी जगात पसरले. यातला R1a-Z282 हा फक्त युरोपमध्ये आढळतो आणि R1a-Z93 हा मध्य आणि दक्षिण आशियात आढळतो. भारतातील सर्व ‘R1’ पूर्वजसाखळ्या R1a-Z93 या उपगटातल्याच आहेत. या दोन उपगटांतला फरक लक्षणीय आहे. ‘फायलोजेनेटिक अँड जिऑग्राफिक स्ट्रक्चर ऑफ वाय क्रोमोजोम हॅप्लोग्रुप R1a’ हा शोधनिबंध २०१४ साली प्रसिद्ध झाला आणि त्याचे प्रमुख लेखक आहेत, डॉ. पीटर ए. अंडरहिल. ‘वाय’ गुणसूत्राच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अंडरहिल यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. आपल्या शोधनिबंधात ते म्हणतात: R1a-M417च्या १६९३ युरोपीय नमुन्यांमधून ९६ टक्क्यांपेक्षा जास्त नमुने R1a-Z282चे ठरले, तर आशियातल्या ४९० R1a हॅप्लोग्रुपमधले ९८.४ टक्के नमुने R1a-Z93मधले सिद्ध झाले. हे पूर्वीच्या पाहणीत सूचित झालेल्या पठडीशी सुसंगतच होतं. R1a-M417 हा इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्या लोकांचा जो अत्यंत विस्तृत प्रदेश आहे, त्या प्रदेशात त्याचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि तो ‘वाय’ गुणसूत्राच्या हॅप्लोग्रुपचा उपगट आहे. त्याचा R1a-Z93 हा उपगट भारतातील जवळजवळ सर्व पूर्वजसाखळ्यांमध्ये उपस्थित आहे. तर R1aमधून निर्माण झालेला R1a-Z282 हा उपगट युरोपमधल्या जवळजवळ सर्व पूर्वजसाखळ्यांमध्ये उपस्थित आहे.

मग R1a-M417चा आणि R1a-Z93 यांचे जगातले सर्वांत आधीचे पुरावे कोठे सापडले, याची माहिती २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘द जिनोमिक हिस्टरी ऑफ साऊथ ईस्टर्न युरोप’ या शोधनिबंधात आहे. त्यानुसार, R1a-M417चा इसवी सन पूर्व ५००० ते इसवी सन पूर्व ३५०० दरम्यानचा सर्वात जुना पुरावा युक्रेनमध्ये सापडला, तसेच इसवी सन पूर्व २५००च्या सुमाराचे पुरावे पूर्व युरोपमधल्या अनेक ठिकाणी आढळले आहेत. भारतात सर्वत्र दिसून आलेला R1a-Z93 हा उपगट, मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातील इसवी सनपूर्व२५००च्या सुमाराच्या सर्वाधिक प्राचीन नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. खरं तर, कांस्य युगाच्या मध्यापासून अखेरपर्यंत (इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १४००), मध्य आशियातील गवताळ प्रदेशांमध्ये R1a-Z93चं प्रमाण बरंच जास्त म्हणजे ६८ टक्के इतकं आढळून आलं. यातून भारतातील R1a-Z93 असलेले जनसमूह, युरेशियन गवताळ प्रदेशातून आले असावेत, एवढा एकच निष्कर्ष निघू शकतो.”

R1 आणि त्याचे उपगट भारतातील इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्यांशी निगडित आहेत, हे तपासून पाहण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. R1 भारतातील कोणत्या सामाजिक घटकांमध्ये आढळतो, ते पाहायचं आणि ते घटक संस्कृत भाषा आणि वैदिक परंपरा यांच्याशी निगडित असलेल्या उच्चवर्णियांशी, त्यातही विशेषत्वानं पुरोहित वर्गाशी संबंधित आहे का, ते तपासून पाहायचं. अनेक संशोधनांतून हे दिसून आलं आहे की, R1चं प्रमाण उच्चवर्णीय वर्गांमध्ये अधिक आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या तुलनेत पुरोहित वर्गामध्ये ते दुपटीनं अधिक असल्याचं आढळलं आहे. म्हणजे आपल्याला आता हे माहीत आहे की, ज्या प्रदेशांमध्ये प्रामुख्यानं इंडो-युरोपीय भाषा बोलल्या जातात, त्या प्रदेशांमधल्या जनसमूहांना एकाच पूर्वजसाखळीशी जोडणारा एक विशिष्ट जनुकीय दुवा मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. विशेष म्हणजे इंडो-युरोपीय भाषांमधल्या प्राचीन असणाऱ्या संस्कृत भाषेचं जतन करण्याचं काम भारतीय समाजातील ज्या घटकांकडं परंपरेनं आलं होते, त्या घटकांमध्ये या विशिष्ट जनुकीय दुव्याचं प्रमाण लक्षणीयरित्या अधिक आहे.

सिनौलीच्या अनुषंगानं घोडे आणि वेद यांविषयीही उलटसुलट चर्चा आहे. या चर्चेत, ऋग्वेद हा हडप्पा नागरी संस्कृतीनंतरचा आहे, या बाबत पुरातत्त्वज्ञ म.के. ढवळीकर यांचं मतही विचारात घेणे आवश्यक आहे. ते म्हणतात, आपण एखादी कादंबरी वाचत असू, तर त्या कादंबरीचा काळ आपण कसा ठरवू? त्या कादंबरीमध्ये मोबाईल फोनचा उल्लेख असेल तर ती विसाव्या शतकात किंवा त्यानंतर लिहीलेली असावी, असं आपण समजू. त्याचप्रमाणे ऋग्वेदामध्येही दोन खुणा आहेत. एक म्हणजे घोड्याचं अस्तित्व. ही खूण फारच महत्त्वाची आहे. कारण, घोडा हा आर्यांच्या खास आवडीचा प्राणी होता. त्यांच्या धार्मिक परंपरांमध्येही घोड्याची भूमिका महत्त्वाची होती. दुसरी खूण म्हणजे ऋग्वेदामध्ये नेहमी ‘अयस’चा उल्लेख येतो. त्याचा शब्दशः अर्थ ‘तांबे’ असा आहे. कारण त्यानंतर लोखंडाचा शोध लागल्यावर त्यांना ‘कृष्ण अयस’ किंवा ‘काळे तांबे’ असा नवा शब्दप्रयोग तयार करावा लागला.

आता शुद्ध पुरातत्त्वीय पुराव्यांचा विचार केला तर पाळीव घोड्यांचे अस्तित्व इसवी सनपूर्व १९००पासून दिसून येतं. हा काळ हडप्पा नागरी संस्कृतीच्या अखेरचा म्हणजे इसवी सनपूर्व १९०० किंवा इसवी सनपूर्व १५०० दरम्यानचा काळ आहे. त्यामुळे आपल्याला इसवी सनपूर्व १९०० ते इसवी सनपूर्व १८०० हा एक निश्चित कालबिंदू मिळतो. उत्तर भारतात लोखंडाचा वापर इसवी सनपूर्व १५०० ते इसवी सनपूर्व १४०० पर्यंत सुरू झालेला होता. यावरुन आपण इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १४०० दरम्यानचा कालखंड ऋग्वेदाचा काळ मानू शकतो. थोडक्यात, ऋग्वेद हा हडप्पा नागरी संस्कृतीनंतरचा आहे. प्रा. विट्झेल यांच्या मतानुसारही भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशांत (आर्य जिथे प्रथम स्थिरावले तो प्रदेश) इसवी सनपूर्व १०००च्या सुमारास लोहाचा शोध लागलेला आहे, त्यामुळे ऋग्वेदाची रचनाही साधारण त्याच सुमारास झाली असावी.

खरे तर पुरातत्व खाते ज्ञानात निष्पक्ष भर घालण्यासाठी असते, याचा विसर पुरातत्त्व खात्याला पडला आहे, हे राखीगढी येथे झालेल्या उत्खननापासून ते घग्गर नदीला सरस्वती घोषित करण्यापर्यंतच्या उपद्व्यापातून आपण पाहू शकतो. सिनौली येथील उत्खनन आणि त्यावरून काढले गेलेले अशास्त्रीय निष्कर्ष यावरून तीच बाब पुन्हा सिद्ध होते, असे अभ्यासक संजय सोनवणी मांडतात. सोनवणी सांगतात की, पहिली बाब म्हणजे दफनपेटीवर बैलाच्या मस्तकाचे चिन्ह आहे, घोड्याचे नाही. म्हणजेच सिनौलीतील लोकांना बैल माहित होते, घोडे नाहीत. आणि रथ घोडे ओढतात, बैल नाही. आर्यांच्या दफनांत प्रेतासोबत रथ व त्याला जुंपलेले घोडेही दफन केले जात, असे पुरावे अन्द्रोनोवो, सिंथास्ता संस्कृती व लुयोंग येथील आर्य दफनांत मिळाले आहेत. या दफनांत प्रेते ही रथाच्या बैठकीच्या जागेवर ठेवलेली असून त्यात शवपेट्यांचा वापर नाही. ही सर्व स्थाने मध्य आशियात मोडतात, जेथून इंडो-युरोपियन म्हणजे आर्य इराणमध्ये व तेथून भारतात आले, असे मानले जाते. ही दफने इसवी सनपूर्व २००० नंतरची आहेत.

सिनौली येथे दफनासोबत छकडा आहे, पण घोडा (अथवा बैलही) पुरलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे मध्य आशियातील दफनांतील रथांची संरचना सिनौलीच्या छकड्यांप्रमाणे नसून सर्वस्वी वेगळी तर आहेच; पण, चाकेही भरीव नसून आरे असलेली आहेत. भरीव चाकांचे रथ जगात कोठेही नसतात कारण त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे सिनौली येथील सापडलेल्या भरीव चाकाच्या गाड्यांना युद्धातील वेगवान रथ ठरवायचा प्रयत्न करणे दिशाभूल करणारे आहे.

सिनौली येथील दफने वैदिक पद्धतीची आहेत, हे मंजुल यांचे म्हणणे धादांत असत्य असल्याचे सोनवणी सांगतात. ते म्हणतात की, शवपेटीत दफन करण्याचा एकही उल्लेख वैदिक साहित्यात नाही. मात्र उत्तरसिंधू काळात अशी दफने आढळलेली आहेत. ऋग्वेदात रथांचे जेही उल्लेख आहेत, ते आऱ्यांच्या चाकांच्या रथांचे आहेत, भरीव चाकांचे नव्हेत. सिंधू संस्कृतीत इसवी सनपूर्व ३१०० पासून भरीव चाकांच्या बैलगाड्यांचाच वापर होत असल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिनौली येथे जी मृद्भांडी, अलंकार, बैलाचे मस्तक व पिंपळपानाच्या आकृती मिळाल्या आहेत, त्याही सिंधू संस्कृतीत मिळणाऱ्या अवशेषांशी मेळ खातात. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा विस्तार गंगेच्या खोऱ्यापर्यंत झाल्याचा पुरावा सिनौली येथील अवशेष देतात; तेथे वैदिक संस्कृती अस्तित्वात असल्याचा नव्हे, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

दुसरी बाब म्हणजे सिनौली येथील मृतांचा महाभारत युद्धाशी संबंध असल्याबद्दलचा दावा. या दाव्याबद्दल सोनवणी सांगतात की, हे अवशेष सापडले तो परिसर कुरुक्षेत्राचा भाग मानला जातो. महाकाव्यातील युद्धाची आणि या अवशेषांची सांगड घालून युद्ध ‘खरे’ करण्यात आलेच. त्याचप्रमाणे ही क्षत्रियांची शाही दफने आहेत, असा दावा वैदिक धर्माभिमान्यांनी करणे स्वाभाविक मानले तरी ते हे विसरतात की या दफनांतील सांगाडे हे युद्धात मेलेल्यांचे नसून नैसर्गिक मरण आलेल्यांचे आहेत. या दफनांत एक वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांचेही सांगाडे सामाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे दफनात तलवारी वगैरे शस्त्रे सापडली असली तरी धनुष्यबाणाचा एकही पुरावा सापडलेला नाही. महाभारत युद्धात तर धनुष्य हेच मुख्य साधन वापरल्याचे उल्लेख आहेत. मग त्या मृतांचा संबंध महाभारत युद्धातील मृतांशी कसा बरे लावता येईल? सिनौली येथील दफनभूमी ताम्रयुगीन आहे. लोखंडाचा शोध तोवर लागलेलाच नव्हता. पण ऋग्वेदाला लोखंड माहित होते म्हणजे ऋग्वेद लोहयुगात (इसपू १५०० नंतर) लिहिला गेला. तरीही सिनौली येथील अवशेषांचा संबंध वैदिक आर्यांशी जोडत त्यांना येथलेच ठरवायचा प्रयत्न करणे अशास्त्रीय व वर्चस्वतावादी धोरणाचा परिपाक आहे. उलट सिनौली येथील अवशेष आपल्याला ओरडून सांगत आहेत की सिंधू संस्कृतीचा विस्तार समजला जातो तेवढाच नसून ती गंगा-यमुनेच्या खोऱ्यापर्यंत किंवा त्याही पलिकडे पसरलेला होता. तीत काही स्थानिक वैशिष्ट्येही होती. गंगा-यमुनेच्या दोआबात राहणाऱ्या पुरातन जमातींनी ती आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आपल्या दफनपद्धतीत कायम ठेवली. त्या काळात जगभरातील सर्व जमातींना संरक्षण-आक्रमणासाठी युद्धसज्ज राहावेच लागे. किंबहुना तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे. दफनांत शस्त्रे सापडली म्हणून त्यांना लगेच वैदिक क्षत्रिय ठरवायचा बादरायणी प्रयत्न संघीय विद्वान करू धजत असले तरी तज्ज्ञांनी तसे करणे अक्षम्य आहे. यामुळे सिनौलीच्या अवशेषांचा खरा अन्वयार्थ समजून घेतला जाणार नाही. आपले प्राचीन पूर्वज आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर खरा प्रकाश पडणार नाही. लबाड्या करून वर्चस्ववादी बनता येईल; पण त्यातून ज्ञानपरंपरेची अक्षम्य हानी होईल, हा त्यांचा इशारा निश्चितच दुर्लक्षिता येणार नाही.

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

‘वचन’दाता गेला...

रवींद्र जत्राटकर


 

‘भोगत यातना चढलो मी

शाळेची पायरी

शिकलो नाही मी

ग ग गणपतीचा

भ भ भटजीचा

त्याच्याही पुढे शिकलोय मी

ग ग गतकाळाचा

भ भ भविष्याचा

ब ब बुद्धाचा, बाबासाहेबांचा

शाळेची एक एक पायरी चढताना

मी वचन दिलंय बाबासाहेबांना

मी वचन दिलंय क्रांतीबा फुल्यांना

मी वचन दिलंय संत कबीरांना

मी वचन दिलंय गौतम बुद्धांना

त्यांची प्रज्ञाज्योत तेवत ठेवण्याचं!’


कवी रवींद्र जत्राटकर यांची ‘मी वचन दिलंय...’ या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेच्या या काही ओळी... रवींद्र हे खरं तर सख्खे नसले तरी नात्याने माझे काका... माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, माझ्याबद्दल अतीव आदरभाव असणारे... ‘जन्मदात्यांनी जन्माला घातलं, चळवळीनं घडवलं आणि साहित्यानं जगवलं,’ असं त्यांनी स्वतःच त्यांच्या जगण्याचं वनलाइनर सूत्र सांगितलेलं आणि ठरविलेलं... ते खरंही होतं... बाबासाहेबांच्या निपाणीतील १९५२ सालच्या सभेतील उपदेशानं भारावलेल्या गरीब परिस्थितीतल्या आईवडिलांनी आपल्या लेकरांना कष्टानं शिकविण्याचं ठरवलं... त्या भावंडातला रवीकाका एक... प्राथमिक शाळेत शाळा सुटली, पण शिकण्याची आस नाही सुटली... कष्ट करीत, सूतगिरणीत कामं करीत, आईवडिलांना हातभार लावत, जमेल तसं, जमेल त्या वेळेला शिक्षण घेत मुक्त विद्यापीठातनं त्यांनी एस.वाय. पर्यंतचं शिक्षण घेतलं... पण, शाळा-कॉलेजातल्या शिक्षणापेक्षाही जगातल्या आणि ग्रंथालयातल्या शाळेत त्यांचं जीवन घडलं... खूप वाचलं त्यांनी... बंधू सुरेश जत्राटकर यांचा आदर्श घेऊन लिहीण्याचाही छंद जडला त्यांना... सूतगिरणीत काम करताना

‘सटाSSक पटाSSक सटाSSक पटाSSक

एकतेचं, समतेचं गाणं गाणाऱ्या

पॉवरमागला अन् विणकरांना काय माहीत

देशाची लाज अब्रू

विषमतावादी वेशीवर टांगतायत म्हणून...’

हा समतेचा विचारच त्यांच्या मनात सुरू असायचा...

किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधता बांधता कागदांवर कविता उतरायची-

‘सांभाळताना दुकान चांगले वाईट अनुभव यायचे

अगरबत्तीप्रमाणे विचार धुपायचे

नि कापराप्रमाणे मन जळायचे

चालू केलं दुकान मी अनिच्छेनं

कविता मात्र करतोय स्वइच्छेनं

बुद्ध भीमाच्या प्रेरणेनं...’

वाचनातून, जगण्यातून आलेले अनुभव त्यांच्या कवितांचा विषय व्हायचे; बुद्ध, फुले, आंबेडकरांची प्रेरणा त्यातून प्रकटत राहायची... ती प्रेरणा हे त्यांच्या जगण्याचं मर्म होतं... त्या प्रेरणेचा प्रसार हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं... विविध क्षेत्रांतील उत्तम जाणकारांचा लोकसंग्रह करणं, हा त्यांचा छंद होता... लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जाणून घेणं, याची गोडी त्यांना होती... त्यातूनच कुटुंब, नातेवाईकांच्या पलिकडंही खूप मोठा गोतावळा त्यांना लाभलेला होता... लौकिक शिक्षण त्यांनी सांगितलं तरच समजायचं... पटायचं नाही ते, इतके वेगळे विषय, ताजे संदर्भ त्यांच्या बोलण्यात येत असत... ओथंबून बोलत असत... अक्षर तर सुलेखनाच्या वहीत छापल्यासारखंच... अशी उच्च दर्जाची प्रज्ञा लाभलेला हा माणूस... नुकताच अकाली गेला... कर्करोगानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं... सूतगिरणीत तीस वर्षांहून अधिक केलेल्या कामानं त्यांच्या जीवनाचा धागा मात्र कमकुवत करून टाकला... निर्व्याज, दिलखुलास आणि चेहऱ्यावर सदैव मंदस्मित घेऊन माझ्यासमोर येऊन उभा ठाकणारा हा काका येथून पुढे भेटणार नाही; काही लिहीलेलं वाचलं, रेडिओवर ऐकलं की आवर्जून येणारा त्यांचा फोन आता येणार नाही, ही कल्पनाच साहवत नाहीय... एक अत्यंत प्रेमाचं माणूस गमावल्याची भावना आणि आयुष्यभराची पोकळी निर्माण झालीय त्यांच्या जाण्यानं...


रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

माकडाचं घर..!










(सन्मित्र श्री. सुभाष सूर्यवंशी यांचा 'अक्षरभेट' हा दिवाळी विशेषांक हा जणू माझे हक्काचे लिहीण्याचे ठिकाण. त्यांनी हक्कानं विषय सांगून लेख मागायचा अन् मी तो द्यायचा, असं हे गेली कित्येक वर्षे चाललेलं आहे. यंदाही 'अक्षरभेट'साठी लिहीलंय. ते माझ्या वाचकांना सादर करतोय, आपल्याला आवडेल, या अपेक्षेसह अन् दिपावलीच्या शुभेच्छांसह! - डॉ. आलोक जत्राटकर)



दुसरी-तिसरीतली आपल्यातल्या बहुतेकांना माहिती असलेली एक गोष्ट... माकडाचं घर... एक माकड. अत्यंत स्वच्छंद. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारायच्या. मनसोक्त फळं खायची. मजा करायची. मस्त आनंदात राहायचं. हेच त्याचं जीवन. अशातच पावसाळा सुरू झाला. पावसात भिजून माकड चिंब झालं. पाऊसपाणी आणि बोचऱ्या वाऱ्यात थंडीनं काकडून गेलं. त्यानं ठरवलं. आता पावसाळा संपला की पहिल्यांदा आपण एक चांगलं घर बांधायचं. मग आपल्याला पावसाचा त्रास होणार नाही. पावसाळा संपला. ऊन पडलं. माकड पुन्हा आनंदानं या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत राहिलं. थोड्याच दिवसांत हिंवाळा सुरू झाला. थंडीचा कडाका वाढला, तसं माकड गारठलं. त्याचं फिरणंच काय, खाणंपिणंही जणू गोठलं. थंडीनं थरथर कापत एका झाडाच्या फांदीला बिलगून बसलेल्या माकडानं ठरवलं, आता काही नाही, एकदा का हा हिंवाळा संपला की पहिलं काम- घर बांधायचं. म्हणजे ऊबदार घरात थंडीची कटकटच होणार नाही. थोड्याच दिवसांत हिंवाळा सरला. फिरून ऊन पडू लागलं. माकड पुन्हा आनंदानं इकडून तिकडं उड्या मारत राहिलं. उन्हाळ्याच्या झळा हळूहळू वाढू लागल्या. माकडाला उन्हानं जीव नकोसा झाला. झाडांच्या फांदीवरही उन्हाचे चटके बसू लागले. तेव्हा त्यानं पुन्हा एकदा ठरवलं. ते काही नाही, उन्हाळा संपला की घर बांधायचंच. पण, अशा सर्व ऋतूंत ठरवून देखील शेवटपर्यंत माकडाचं घर काही बांधून झालं नाही.

आज ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे आपण माणसं जणू काही या माकडाचेच वंशज असल्याचा दाखला देण्यासाठीच जन्मलो आहोत, अशा रितीनं वागत आहोत, हे होय. माकडाच्या बाबतीत त्याच्या आळसामुळं का असे ना, फक्त एकच गोष्ट चांगली म्हणजे त्याला घर बांधता आलं नाही. तसं झालं असतं, तर माकड त्या घराच्या भोवतीच गुरफटलं असतं. त्याच्या गरजा वाढत गेल्या असत्या. त्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी माकडानं आजूबाजूच्या पर्यावरणावर डल्ला मारायला सुरू केला असता आणि एक दिवस ते पर्यावरण आणि त्या पर्यावरणाबरोबर ते स्वतःही नष्ट झालं असतं. महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या धबडग्यात माकडाचा आनंद, त्याचा स्वच्छंदपणा हे सारं नष्ट झालं असतं. ते उड्या मारायलाही विसरलं असतं. असो!

अलिकडंच महाराष्ट्राच्या काही भागांत खूप मोठा महापूर आला. सन २००५, २०१९ आणि २०२१ या तीनही वर्षी आलेल्या महापुरांचा मी एक साक्षीदार. विशेषतः कोल्हापूरमध्ये या पुराची तीव्रता आणि वाढता प्रकोप यांचा अनुभव घेतलेला. सन २००५ साली आम्ही पुराच्या तीव्रतेचा दोष थोपला तो थेट कर्नाटकनं बांधलेल्या अलमट्टी धरणावर. तेथपासून ते अगदी सन २०१९पर्यंत इथल्या महापुरासाठी आम्ही त्याच्यावरच दोष टाकून आपली जबाबदारी मात्र झटकत होतो. कर्नाटक सरकारवर प्रादेशिक वादातून आमचा रोष होताच. त्यात भर पडली अलमट्टीची. हा रोष इतका होता की, त्या धरणाच्या पलिकडं कर्नाटक राज्यातही आपले भारतीय बंधू-भगिनी राहतात, याचं भान आपण कधीच बाळगलं नाही. आमच्या बाजूच्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे, यासाठी झगडताना पलिकडच्यांचा तो जीवनाचा अधिकार धोक्यात घालण्याबद्दल मात्र आम्हाला खंत वाटली नाही. सन २०१९मध्ये अलमट्टीतून सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटकातील किमान १६ ते १९ नागरिकांचा वाहून जाऊन मृत्यू झाला तर काही जण बेपत्ताही झाले. या गोष्टीचा आपल्याकडच्या किती लोकांना पत्ता होता? किती जणांना त्याची दखल घ्यावीशी वाटली अगर किती जणांना खंत वाटली? माझ्या मते, नाहीच वाटली.

यंदा सन २०२१च्या महापुराच्या वेळी मात्र आपल्या धरणांवरच्या अभियंत्यांनी धाडसी निर्णय घेऊन पावसाळ्यापूर्वी जादा पाणी सोडून अतिरिक्त पाऊस झाला, तरी धरणांतून लगोलग पाणी सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठीचे नियोजन केल्यामुळे अलमट्टी धरणावर आजवर चालत आलेला ब्लेमगेम यंदाच्या महापूर काळात चालला नाही, किंबहुना, फोलच ठरला. काही अभ्यासकांशी चर्चा केली असता त्यांनीही यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. इतक्या दूरवर अलमट्टीचे बॅकवॉटर मागे येऊ शकत नाही, हे त्यांनी ठामपणाने सांगितले. अवघ्या काही तासांत २० ते ५० सेंटीमीटर पाऊस झाल्याने पंचगंगा, कृष्णेच्या सर्वच उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे पाण्याचा फुगवटा ४५ ते ५५ फुटांच्याही वर गेला. अलमट्टीचा फुगा फुटला.

मग इतर कारणांचा शोध सुरू झाला. एक सापडलंही. राष्ट्रीय महामार्गावर बांधलेला बंधारावजा पूल हे पाणी साचण्याचं आणि हळू ओसरण्याचं कारण म्हणून पुढं आणलं गेलं. त्यात काही अंशी तथ्य आहे, मात्र पूर्णतः नाही. कारण केवळ पूलच नाही, तर मग रेड झोनमध्ये झालेली सर्वच बांधकामं त्यासाठी दोषी आहेत. अगदी २०१९च्या पुरानंतरही शहाणे न होता उलट अधिक गतीनं फर्निचरच्या भव्य शोरुम्सपासून ते मंगल कार्यालयांपर्यंत अनेक बांधकामं नदीपात्राच्या सभोवतीनं झाली. त्यामुळं एकट्या पुलावर जबाबदारी ढकलणं हेही चुकीचं.

या बाबतही तज्ज्ञांशी बोललो असताना त्यांनी कोल्हापूरपेक्षा नृसिंहवाडीची समुद्रसपाटीपासूनची उंची ही पाच मीटरनं कमी आहे. त्यामुळं तिकडं गुरुत्वाकर्षणानं पाण्याचा ओढा आहेच. मात्र, ज्या कोनामध्ये पंचगंगा कृष्णेला तिथं मिळते, त्या कोनामुळे पंचगंगेचे पाणी गतीने तिच्या प्रवाहात मिसळू शकत नाही. त्याचप्रमाणे कृष्णेमध्ये जर आधीच महापूर असेल, तर पंचगंगेचे पात्र तेथून मागेपर्यंत बॅकवॉटर साठवित जाते. त्याचा फटका शिरोळ परिसराला बसतो. यासाठीचा उपायही तज्ज्ञ सुचवितात, तो असा की एक अतिरिक्त चॅनल पंचगंगेमधून काढायचा आणि त्याद्वारे पंचगंगेचे अतिरिक्त पाणी कृष्णेच्या पात्रामध्ये अन्यत्र सोडावयाचे. म्हणजे पाणी फिरेलही आणि ते कृष्णेत समाविष्ट होईलही. मात्र, अतिरिक्त पावसाच्या वेळी मात्र त्यालाही मर्यादा पडतील.

आपल्या वर्तनाची मी माकडाच्या घराशी तुलना करतो आहे, याचे कारण म्हणजे या काळात आणखी काही भन्नाट अशास्त्रीय आणि अनैसर्गिक उपाययोजना पुढे चर्चेत आणल्या गेल्या. त्यामध्ये एक म्हणजे शहर परिसरात नदीपात्राला भिंत बांधायची आणि दुसरी म्हणजे नदीचा प्रवाह वळवायचा. या दोन्ही गोष्टी म्हणजे निसर्गाची अफाट क्षमता आणि मानवाची त्यापुढील मर्यादा यांचे आकलन अजिबातच न झाल्याची प्रचिती देणाऱ्या म्हणाव्या लागतील. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपले काही चुकलेच नाही आणि सारा दोष जणू काही निसर्गाचाच आहे, हा त्यामागे दडलेला सुप्त अहंभाव होय.

मुळात या सूचना करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलेलीच नाही, ती म्हणजे समपातळीत वाढत जाणे हा पाण्याचा नैसर्गिक स्थायीभाव आहे. भांड्यात पाणी ओतले जात असताना भांडे कमी-अधिक तिरके असले तरी पाणी त्याची समपातळी सोडत नाही, हा अनुभव आपल्याला आहेच. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी म्हणून नैसर्गिक तसेच मानवी नितीनियमांना धाब्यावर बसवित आपण नदीपात्रांच्या सभोवताली, त्याचप्रमाणे अगदी नदीपात्राच्या लगतही जिथे रेडझोन, ऑरेंज झोन घोषित केले आहेत, अशा ठिकाणीही केवळ पैशासाठी भव्य इमारती, संकुले उभ्या करण्यास परवानगी दिल्या. स्थानिक नेते, नगरसेवक आणि बिल्डर लॉबी यांच्या भ्रष्ट युतीने दणादण तिथे बांधकामे उभारली. लाखो रुपये घेऊन नागरिकांनी त्यात फ्लॅट खरेदी केले. अगदी २०१९मध्ये ज्या ओढ्याच्या पात्रामध्ये पाणी ओसंडून वाहात होते. तेथे पाणी ओसरताच भराव घालून, कॉलम टाकून एक भव्य संकुल उभे राहिले. वैशिष्ट्य म्हणजे ओढ्यातल्या त्या संकुलात फ्लॅट घेणारे ग्राहकही त्या बिल्डरला भेटले, ही आणखी एक चिंतेची आणि दुर्दैवाची बाब. २०२१मध्ये तिथल्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले, हे सांगायला नकोच. आपण बोलत होतो, ते पाण्याच्या समपातळीविषयी. अतिवृष्टीमुळे पाण्याचा फुगवटा वाढत जाईल, तसतसे ते आजूबाजूच्या शेती, रस्ते, घरे, रिकाम्या जागा अशा समस्त परिसरात त्याच समपातळीमध्ये पसरायला सुरवात करते. नदीपात्राची अधिकतम उंची ओलांडल्यानंतर त्या पातळीत बाजूला जितके पसरता येईल, तितके ते पसरत राहते आणि आपली पातळी कायम राखते. पाऊस कमी झाला आणि ओसरण्यास सुरवात झाली की आपली सिमेंट काँक्रिटची घरे या सर्वत्र पसरलेल्या पाण्याला अडवणाऱ्या बंधाऱ्यांचे अथवा भिंतींचे काम करतात. नदीपात्राला वेढून पसरलेल्या आपल्या नागरी वस्त्या ते पाणी रोखून धरतात. त्याला नदीपात्राकडे परतण्यास अटकाव करतात. त्यामुळे ते पाणी लवकर ओसरू शकत नाही. ही बाब आपल्याला माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. कारण पुन्हा तेच. भ्रष्टाचारामुळे उभारलेल्या या भिंतींची जबाबदारी कोण घेणार? पण, यांच्यातल्याच कोणाच्या सुपीक डोक्यातून नदीलाच भिंत घालण्याची कल्पना आली. ठीकाय. काही क्षण ही कल्पना मान्यही करू. पण, त्या भिंतीची उंची किती असेल? ५५ फूट, ६० फूट की आणखी उंच? आणि तिची लांबी? ती किती असेल? डोळ्यांसमोर चित्र आणा आपल्या परिसरातील कोणत्याही नदीचे. आणि मनातल्या मनात बांधा तिच्या दोन्ही बाजूला अशा उंच आणि लांब भिंती. भीषण चित्र येतं ना डोळ्यासमोर. आणि समजा, अतिवृष्टी अशी झाली की आपण बांधलेल्या भिंतीवरुनही पाणी ओसंडलं नागरी वस्तीत. तर ते पुन्हा नदीत जावं कसं? त्यावेळी आपल्या वस्त्यांची अवस्था काय होईल? या भिंतींच्याच आधारे झोपडपट्ट्या वाढण्याची साधार भितीही येते मनात. मुंबईत पाहा. वस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांच्या बाजूनं बांधलेल्या भिंतींचीच एक बाजू करून तीन तीन मजली झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत तिथं. मग, आपल्या शहरात अशा ५० फुटी भिंतीचा आधार घेऊन साधारण पाच-सहा मजली झोपडपट्टी तर सहज ओळीनं उभी राहू शकते. हा पर्याय जलदीनं मागं पडला, हे एक बरं झालं.

नदीचा प्रवाह वळवण्याचा प्रस्ताव पुढं आणणाऱ्या ‘बलरामां’बद्दल तर काय बोलावं? जगभरात झालेल्या अशा प्रयत्नांना निसर्गानं कशा पद्धतीनं पाणी दाखवलं आहे, याची अनेक उदाहरणं आहेत. असा प्रस्ताव येतो, त्यावेळी आपण स्वतःला निसर्गापेक्षाही खूप बलवान समजतो आहोत आणि हा आपला गैरसमज निसर्ग एका फटकाऱ्यानिशी पाण्यात घालविण्यास सक्षम आहे, एवढं त्यांनी वेळीच लक्षात घ्यावं.

पावसामुळं कोसळणाऱ्या दरडी आणि त्यातून होणारी जिवित व वित्त हानी, हा आणखी एक चिंतेचा विषय. मात्र, माळीणसारखी प्रचंड दुर्घटना होऊनही आपण त्यापासून काहीच बोध घेत नाही. पुनःपुन्हा काय होणाराय, म्हणून अशा डोंगरांच्या पायथ्यांशी वस्त्या करून राहू लागतो आणि दुर्घटना घडली की शासनाला बोल लावीत राहतो. त्यांचं राजकारण करीत राहतो. आज या बाबतीत पूर्वराजकारण करण्याची गरज आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर प्रशासनाच्या माध्यमातून अशा वाड्या-वस्त्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसित करणं शक्य आहे. मात्र, ते होत नाही. नागरिकही आपली जागा सोडायला तयार होत नाहीत. उदाहरणच द्यायचं, तर कोल्हापूरशेजारच्या चिखली गावाचंच देता येईल. राजर्षी शाहू महाराजांनी तिथल्या जवळजवळ सर्वच कुटुंबांचं पुनर्वसन त्यांच्या राजपूतवाडी कॅम्पच्या परिसरात त्यांच्या काळातच केलं होतं. लोकांना जमिनी देऊन घरंही बांधण्यात आली. मात्र, नागरिकांचा मूळ घर आणि शेतीतला मोह काही सुटला नाही. सन २०१९च्या महापूर काळात इथल्या नागरिकांच्या सुटकेचा मोठा दबाव प्रशासनावर राहिला. सन २०२१मध्ये नागरिक पुराची शक्यता वाटताच स्वतःहून राजपूतवाडीच्या त्यांच्या ‘सेकंड होम’मध्ये स्थलांतरित झाले. पण तिथे एकदा गणेशोत्सव साजरा केला की पुन्हा ते आपल्या इथल्या मूळ घरांकडे परततील. हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही इथल्या नागरिकांना मूळ जागेचा, जमिनीचा, घराचा मोह सुटत नाही, तर अशा दरडींच्या पायथ्याशी, डोंगरउतारांवर वाड्यावस्त्या थाटून राहणाऱ्या आणि अन्य कोणताही पर्याय नसलेल्या लोकांकडून ती अपेक्षा कशी बरे करावी? आपल्या प्रशासनासमोरची ही एक मोठी डोकेदुखी असणार आहे. माणूस शहाणा होऊन स्वतःहून जोपर्यंत अशा जागा सोडणार नाही आणि प्रशासन त्यांना योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत माळीण, रायगडसारख्या दुर्घटना होतच राहणार.

या पद्धतीने डोंगरमाथ्यावरील विकासकामांच्या, बांधकामांच्या वाढलेल्या भारामुळे आणि त्यात अतिवृष्टीमुळे जमीन कमकुवत होऊन तसेच पायथ्याची जमीनही भुसभुशीत होऊन घसरण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. पूर्वी दुर्गम भागामध्ये असलेले हे प्रमाण आता पन्हाळ्यासारख्या किल्ल्यांच्या परिसरातही प्रचंड वाढले आहे. कडे कोसळू लागले आहेत, रस्ते खचू लागले आहेत. निसर्गाने दिलेले हे सारे संकेत आहेत. ते आपण समजून घ्यायला हवेत.

समतल, शहरी, गावठाण भागाच्या परिसरातील, नदीच्या परिसरातील शेतजमिनी एन.ए. करून तिथे एकीकडे प्लॉट पाडून त्यातून पैसा पैदा करायचा आणि दुसरीकडे डोंगरमाथ्यापासून ते पायथ्यापर्यंत मातीला घट्ट धरून ठेवून जमिनीची धूप रोखणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करून तेथे शेती करायची, या दोन्ही बाबी मानवी विकासाच्या दृष्टीने तात्कालिक पूरक वाटत असल्या दूरगामी मानवी अस्तित्वाला घातक आहेत, हे एव्हाना लक्षात येऊ लागले आहे. अतिवृष्टीमध्ये शेतीमुळे भुसभुशीत झालेले डोंगर शेतीसह वाहून जाऊ लागले आहेत. तर नदीकाठच्या एन.ए. प्लॉटमधील बांधकामे ही विकासाचे दुष्परिणाम सिद्ध करणारी ठिकाणे बनली आहेत.

खनिज उत्खनन हा त्याचा आणखी एक वेगळा पैलू. या उत्खननादरम्यान हव्यासापोटी मान्यतेपेक्षा अधिक केली जाणारी खोदाई, त्यासाठी वापरली जाणारी स्फोटके यांमुळे भूसंरचनेला मोठ्या प्रमाणात हादरे बसतात. ती उद्ध्वस्त होते. जमीन आत खोलवर पोखरली जाते. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, शिवाय भूस्खलनाचा धोका वाढतो. सातारा परिसरात दगड-वाळूच्या खाणी आहे. महामार्गावरून दिसणाऱ्या डोंगरांच्या दर्शनी बाजू तेवढ्या पोखरणाऱ्या उंदरांनी उभ्या ठेवल्या आहेत. मागील बाजूने संपूर्ण डोंगर संपवले आहेत. डोंगर संपवून ते थांबलेले नाहीत, आता तिथे खोदून जमिनीच्या पोटातही घुसले आहेत. पुढे या मार्गावर कधी काळी दुतर्फा किती तरी डोंगरांच्या रांगा होत्या, हे सांगूनही कोणाला पटणार नाही. त्यांच्या ठिकाणी केवळ मोठमोठे खड्डे आणि पाणी साचलेल्या खणीच काय त्या उरतील. हा हव्यास कोणता विकास घडविणार आहे, ठाऊक नाही.

मान्य आहे, निसर्गाचा समतोल बिघडला आहे. पण, तो कोणामुळे, हेही लक्षात घ्यायला हवे ना! पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक स्तरावर जे जे करार करण्यात आले, त्या करारांमधून विकसित राष्ट्रांनी आपले अंग काढून घेण्यास सुरवात केली आहे. जागतिक तापमानवाढ, कार्बन क्रेडिट्स, हरितगृह वायू उत्सर्जनापासून ते अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरास प्राधान्य देण्यापर्यंत पर्यावरण रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधूनही विकसित राष्ट्रे माघार घेत आहे. नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर रोखून जगाला आगामी पर्यावरणीय संकटांपासून वाचविण्याच्या जबाबदारीपासूनही ते पलायन करीत आहेत. सारी जबाबदारी जणू काही विकसनशील राष्ट्रांचीच असल्यासारखे त्यांचे वर्तन सुरू झाले आहे. अंतिमतः हे सारे काही मानवी अस्तित्वाच्या मुळावरच उठणारे आहे, याची जाणीव जागतिक स्तरावरही दुर्लक्षिण्याचे प्रकार होत आहेत.

या साऱ्या बाबींमुळेच मला राहून राहून माकडाच्या घराची गोष्ट आठवत राहते. संकट आले की, तेवढ्यापुरते आक्रोश करायचा, त्यावर मात करण्यासाठीच्या उपायांची चर्चा करायची आणि संकट ओसरले की, पुन्हा व्यापक मानवी हित विसरून व्यक्तीगत स्वार्थ साधण्याच्या मागे लागायचे, हे वरचेवर, वारंवार दिसून येते आहे. किंबहुना, आपण इतिहासापासून धडे घेत नाही, म्हणूनच नेहमी आपल्या अस्तित्वासमोरची आव्हाने अधिकाधिक गडद होत जात आहेत. मानवी समुदाय म्हणून आपण एक आहोत, ही वसुंधरा जपणे, यावरील पर्यावरण जपणे, पर्यावरणातील अन्य पशु, पक्षी, कीटक, वनस्पती हे सारे आपले सहचर, सहोदर आहेत. बुद्धीच्या बळावर या साऱ्यांचे मोठेपण आपण स्वतःकडे घेतले खरे, पण आता खऱ्या अर्थाने त्या मोठेपणाचे भान ठेवून आपण त्यांच्याही अस्तित्वाची काळजी वाहिली पाहिजे. मात्र आपण ते आपल्या भौतिक सुखसोयींच्या, आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी बासनात गुंडाळून ठेवले आहे. स्वार्थापुढे सर्व हिताहिताचे आपल्याला विस्मरण होते किंबहुना आपण जाणीवपूर्वक त्या विसरून जातो. म्हणून माकडाचे घर हे दिवास्वप्नच राहते.