सोमवार, २८ मे, २०१२

मुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा!


पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील.

 दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला कोणता भारतीय नागरिक विसरू शकेल? या हल्ल्यात महाराष्ट्रानं, देशानं कित्येक शूर पोलीस अधिकारी-कर्मचारी, जवान आणि निरपराध नागरिक गमावले. पण, याच हल्ल्याच्या वेळी, जगाच्या इतिहासात कधीही झाली नाही, अशी घटना घडली. ती म्हणजे दहशतवादाचा चेहरा खऱ्या अर्थानं यावेळी प्रथमच साऱ्या जगासमोर आला. आणि ही कामगिरी केली होती, मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी! एके-47 मधून बेछूट गोळीबार करत सुटलेला दहशतवादी अजमल कसाब याला आपल्या हाती असलेल्या लाठीच्या सहाय्यानं आणि असीम धैर्याच्या जोरावर जेरबंद करणारे ओंबळे स्वतः शहीद झाले, मात्र आपल्या शेजारी देशाचा दहशतवादाला असणारा वरदहस्त प्रथमच पुराव्यानिशी सामोरा आला. तुकाराम ओंबळे यांचं हौतात्म्य हे मुंबई पोलीसांची कर्तव्यपरायणता, कामाप्रती अतीव निष्ठा आणि देशाप्रती अत्युच्च समर्पणशीलता यांचं सर्वोच्च प्रतीक ठरलं.
शहीद ओंबळे यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे या महिन्यात म्हणा, किंवा गेल्या दोन आठवड्यांत दोन अशा घटना घडल्या की, ज्यांच्यामुळं मुंबई पोलीसांची ही समर्पण वृत्ती पुन्हा एकदा झळाळून सामोरी आली. जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर असल्याचा दिलासा या घटनांतून मुंबईकरांना निश्चितपणे मिळाला आहे.

घटना पहिली :
            शिकलगर टोळीचे दरोडेखोर विरारमध्ये असल्याची खबर दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांना दि. 13 मे 2012 रोजी सकाळी मिळाली. ही शिकलगर टोळी म्हणजे दरोडेखोरीच्या बाबतीतली अतिशय निष्ठूर मानली जाते. दरोडा तर टाकायचाच, पण पुरावा मागे राहू नये, म्हणून संबंधित कुटुंबातल्या सर्वांनाच मारुन टाकायला ते मागेपुढे पाहात नाहीत. त्याचप्रमाणं अटक टाळण्यासाठी पोलीसांवरच उलटून प्रतिहल्ला करायलाही हयगय करत नाहीत. भूतकाळात पोलीसांच्या बाबतीत असे प्रतिहल्ले झालेलेही आहेत. त्यामुळं या टोळ्यांना पकडायचं, म्हणजे पोलीसांना जीवावर उदार होऊनच जावं लागतं.
तर.. पिरजादे यांना खबर मिळताच, त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर खटके यांना आपल्या टीमसह विरारला जाऊन दरोडेखोरांसाठी सापळा रचण्याचे निर्देश दिले. त्यानुसार श्री. खटके हे हवालदार चंद्रकांत माने, हवालदार शांताराम भुसार, पोलीस नाईक नामदेव भोगले, पोलीस नाईक प्रवीण जोपळे, पोलीस शिपाई शिवाजी भोसले, शिवराम बांगर आणि दिलीप वऱ्हाडी यांच्यासह पूर्ण तयारीनिशी बाहेर पडले.
ही टीम विरार पूर्वेला चंदनसार रोडवरच्या राहील पेट्रोल पंपाच्या जवळ सकाळी अकराच्या सुमारास पोहोचली. त्याचवेळी त्यांना समोरून एक टेम्पो येताना दिसला; मात्र, पोलीस वाहन पाहून त्या टेम्पोने यू-टर्न घेतला आणि अमित हाऊसिंग सोसायटीच्या गेटमध्ये थांबला. पाठोपाठ येणारा दुसरा टेम्पोही या टेम्पोच्या पाठीमागे थांबला.
कॉन्स्टेबल शिवराम बांगर यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील.
            या वाहनांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलीसांची टीम तातडीनं त्या टेम्पोच्या दिशेनं पुढं सरकली. सर्वांनी टेम्पोला घेरलं आणि टेम्पोतल्या संशयित व्यक्तींना खाली उतरायला सांगितलं. त्यानंतर काही क्षणांतच, टेम्पोमध्ये लपवलेल्या लोखंडी कांब (सळई) आणि तलवारी घेऊनच दरोडेखोर झपकन खाली आले आणि त्यांनी पोलीसांवर हल्ला चढवला. त्यातल्या एकानं पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांच्यावर लोखंडी कांबेनं वार केले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी दुसऱ्या दरोडेखोरानं कॉन्स्टेबल शिवराम बांगर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जमिनीवर कोसळलेल्या बांगर यांच्यावर तिसरा दरोडेखोर तलवारीचे वार करण्याचा प्रयत्न करत होता, आणि बांगर ते हातांवर झेलत चुकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना ठार करण्याचेच दरोडेखोरांचे प्रयत्न सुरू होते. आपला सहकारी जीवघेण्या संकटात असल्याची जाणीव गंभीर जखमी असलेल्या दिलीप वऱ्हाडी यांना झाली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोझिशन घेतली आणि आपल्याकडचं सर्व्हीस रिव्हॉल्व्हर हल्लेखोरांवर रोखलं आणि त्यांना हातातली शस्त्रं खाली टाकायला सांगितलं. मात्र, हा काय गोळी घालणार, अशा अविर्भावात त्या दरोडेखोरांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि बांगर यांच्यावर ते प्रहार करणार, इतक्यात वऱ्हाडी यांनी आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या हल्लेखोरावर एक राऊंड फायर केला. गोळी त्याच्या पायात घुसली आणि त्याच्या हातून तलवार गळून पडली. वऱ्हाडी यांच्या तत्पर हालचालीचा इतका जोरदार परिणाम झाला, की त्यामुळं दरोडेखोर गांगरले. त्यांच्या त्या गोंधळलेल्या स्थितीचा फायदा घेऊन पोलीसांनी त्या सहा गुन्हेगारांना अटक केली. कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांनी अतिशय बिकट परिस्थितीत प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आणि स्वतःच्या जीवालाही धोका असताना आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी जी कर्तव्यतत्परता आणि साहस दाखवलं, त्याला तोड नाही. त्यांच्या या दक्ष हालचालींमुळंच वीसपेक्षाही अधिक दरोड्याचे गुन्हे नावावर असलेली अतिशय जहाल दरोडेखोरांची टोळी मुंबई पोलीसांच्या ताब्यात आली.
--
घटना दुसरी:
गुणाजी पाटील यांचा सत्कार करताना मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनाईक.
दि. 19 मे 2012, दुपारी 12.45 वा.ची वेळ. वरळी पोलिस स्टेशनला एक कॉल येतो.. राजीव गांधी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एका महिलेनं उडी मारल्याचा! प्रकाराचं गांभीर्य लक्षात येऊन पोलीसांची टीम तातडीनं सायरन लावूनच घटनास्थळाकडं रवाना होते. पोलीस वाहनावर चालक असतात.. गुणाजी पाटील.. वय वर्षे 51.
ही टीम तीन ते चार मिनिटांतच सी-लिंकवर संबंधित ठिकाणी पोहोचते, तर तिथं बघ्यांची ही गर्दी जमलेली.. खाली पाण्यात गटांगळ्या खाणारी महिला तर दिसतेय, पण काय करावं कुणालाच सुचेनासं झालेलं! फायर ब्रिगेडला यायलाही किती वेळ लागेल, माहित नव्हतं; बरं, ते येईपर्यंत ती महिला जिवंत राहील की नाही, याचीही शाश्वती नाही. वरळी पोलीस स्टेशनमधून गेलेली टीमही संभ्रमात पडलेली! त्याचवेळी कुणाला काही समजायच्या आतच पोलीस हवालदार - ड्रायव्हर गुणाजी पाटील सी-लिंकच्या त्या 20-25 फुटांवरुन खाली खवळत्या समुद्रात उडी टाकतात आणि त्या गटांगळ्या खाणाऱ्या महिलेला हाताला धरून, लाटांवर तरंगत ठेवून महत्प्रयासानं किनाऱ्याला आणतात. त्या महिलेला सुरक्षितपणे किनारी आणणारे गुणाजी पाटील यांच्या पायाला मात्र जबर मार बसलेला! मात्र, त्या दुखापतीची चिंता वाटण्यापेक्षा एक जीव वाचवल्याचं समाधानच त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं.
जल्पा पुजारी असं नाव असलेली ती विवाहिता, कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी गेलेली! पाटील यांनी जीवावर उदार होत दाखवलेलं साहस आणि हिकमतीमुळं तिचा जीव तर वाचलाच, पण आत्महत्येचा विचारही तिच्या मनातून गेला. दोन-तीन दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पाटील यांना तिनं वाचवल्याबद्दल धन्यवादही दिले.
--
 मुंबई पोलीसांच्या या असीम शौर्याची राज्य शासन आणि पोलीस प्रशासन यांनी तातडीनं दखल घेतली. या सर्व शूर पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनाईक, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामराव पवार यांनी सत्कार करून कौतुक केलं. धाडसी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांच्या नावाची तर ‘राष्ट्रपती शौर्य पदका’साठी तर गुणाजी पाटील यांची ‘पंतप्रधान जीवनरक्षा पदका’साठी शिफारस करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अगदी अनपेक्षितपणे, ‘राज ट्रॅव्हल्स’नं दिलीप वऱ्हाडी आणि गुणाजी पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांसह मलेशिया-थायलंडची सहल ऑफर केली आहे. पोलीसांच्या कर्तबगारीची शासनाबरोबरच एखाद्या कंपनीनं दखल घेण्याचा हा प्रसंगही निश्चितच वेगळा आणि त्यांना आणखी चांगल्या कामगिरीसाठी बळ देणारा ठरणार आहे.
मुंबई पोलीसांच्या या कर्तबगारीला माझा एकदम कडक सॅल्यूट!!!

बुधवार, ९ मे, २०१२

आत्महत्येच्या विचारावर 'विजय'!


Vijay Gaikwad

मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री राज्यातल्या दुष्काळग्रस्त स्थितीबाबत केंद्र सरकारला अवगत करण्यासाठी व मदत मिळविण्यासाठी मा. पंतप्रधानांच्या भेटीला गेल्यानं तुलनेत कमी वर्दळीचा…  याच वर्दळीबरोबर कृष्णा दादाराव डोईफोडे हा आंतरवळी-खांडी (ता. पैठण, जि. औरंगाबाद) या गावचा एक तरुण मंत्रालयात दाखल झाला… मंत्रालयात आपली कामं होण्यासाठी किंवा करवून घेण्यासाठी येणाऱ्या गर्दीपेक्षा तो वेगळा होता… त्याला त्याचं काही काम करून घ्यायचं नव्हतं किंवा कुणाचं काम करवून द्यायचंही नव्हतं… तो आला होता मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला… निवेदनाचा विषय होता… आत्महत्या करणेबाबत…!
मित्रहो, आज कदाचित सारं मंत्रालय हादरून गेलं असतं, जर या तरुणानं त्याचा इशारा खरा करून दाखवला असता तर…! पण तो आत्महत्या करू शकला नाही, इतकंच नव्हे, तर तो त्याच्या या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्तही झाला… आणि या दोन्ही गोष्टींना कारणीभूत ठरला आपला एक सहृदय पत्रकार मित्र… त्याचं नाव विजय गायकवाड!
डोक्यावर अडीज लाख रुपयांचं कर्ज… परतफेड न करू शकल्यानं व्याजासह पावणेतीन लाखांवर गेलेला परतफेडीचा आकडा डोक्यात सतत भुणभुणत असलेला… तशात वृद्ध आईवडिलांची जबाबदारी… कृषी अनुदान मिळू न शकलेलं… कापसाच्या पॅकेजमधून काही लाभ नाही… अशा परिस्थितीत जगणं मुश्कील झालेला कृष्णा काल मंत्रालयात आला तोच मुळी अतिशय गांजलेल्या आणि दीनवाण्या अवस्थेत… हातात प्लॅस्टीकची एक पिशवी, त्यात कागदपत्रं आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन… उद्या (दि. 9 मे 2012 रोजी) मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा इशारा देणारं…!
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या टपाल शाखेत कृष्णानं आपलं निवेदन दिलं… पोच घेतली… आणि तो मुख्य सचिवांच्या कार्यालयाला निवेदन देण्यासाठी निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडं ओ/सी घेण्यासाठी झेरॉक्स नाहीय ते… कृष्णा झेरॉक्सच्या शोधात मंत्रालयाच्या तळमजल्यावरच्या प्रेस रुमकडं आला… तिथं 'ॲग्रोवन'चे मंत्रालय प्रतिनिधी आणि आमचा मित्र विजय गायकवाड याच्याकडं त्यानं झेरॉक्सबद्दल चौकशी केली… त्याच्या हातातलं थेट आत्महत्येचं निवेदन पाहून विजय सटपटला… दुसरा एखादा त्याच्या जागी असता तर पलीकडं न्यूजरुममधनं घ्या झेरॉक्स, असं सांगून मोकळा झाला असता… पण सामाजिक जाणीवा अद्याप शाबूत असलेल्या संवेदनशील मनाच्या विजयनं मात्र तसं केलं नाही… या शेतकऱ्यानं जर कदाचित आत्महत्या केली असती, तर त्याच्या दैनिकाला उद्या सनसनाटी मेन फीचर मिळालं… मिडियाला सुद्धा तुफानी बातमी मिळाली असती… पण विजयनं तसा विचार केला नाही… त्यानं कृष्णाला प्रेस रुममध्ये बसवून घेतलं… आणि समजावलं… आज मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक तर दिल्लीत आहेत, आणि त्याचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला असेल… किंगफीशरच्या मालकाला सुद्धा अडचणीतून जावं लागतंय, तिथं आपण सर्वसामान्य आहोत… अडचणींचा सामना करून त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे… मी स्वतः तुझ्यासाठी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटतो… संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो… काही तरी मार्ग काढू… पण आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाक… असं विजय त्याला समजावत होता… बोलता बोलता त्याची नजर कृष्णाच्या प्लॅस्टीक पिशवीतून बाहेर डोकावणाऱ्या, व्यवस्थित कागदात गुंडाळलेल्या एका वस्तूकडं गेली… कुतुहलापोटी विजयनं त्या वस्तूला हात लावला… तर कृष्णा त्याला हात लावू देईना… विजयनं बळेच त्याच्या हातून ती वस्तू घेतली… तिचं कागदी वेष्टन काढलं… आणि पाहतो तर काय… ती एका जहाल कीटकनाशकाची-मोनोक्रोटोफॉसची बाटली होती… ती पाहून आता मात्र विजयला घाम फुटला… यावेळी त्याच्या मदतीला तिथं आलेले पत्रकार संजीवन ढेरे धावले… त्यांनीही कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न केला… पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, असं दिसल्यावर पलीकडंच असलेल्या पोलीस कंट्रोल रुमकडं त्याला घेऊन गेले… कीटकनाशकाची बाटली… तीही एवढा बंदोबस्त असतानाही मंत्रालयात दाखल झाल्याचं पाहून पोलीस अधिकाऱ्यांची काय अवस्था झाली असेल… याची तुम्हीच कल्पना करा…! तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती बाटली आधी ताब्यात घेतली आणि कृष्णाला त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला… पण तरीही त्याच्या मनोवस्थेत काही फरक पडत नाहीसं दिसल्यानं त्याला मरीन ड्राइव्ह पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आलं… तिथं रात्री पोलीसांनी त्याची अवस्था लक्षात घेऊन त्याला व्यवस्थित जेवण वगैरे दिलं आणि बसवून ठेवलं… पोलीसांच्या गराड्यात अस्वस्थ झालेल्या कृष्णानं रात्री पुन्हा विजयला तिथून फोन केला… दादा, मला इथं भिती वाटतेय, तुम्ही या ना इकडं… असं त्याचं आर्जव ऐकून विजय पुन्हा रात्री त्याच्या साथीला जाऊन बसला… दरम्यानच्या काळात पोलीसांनी त्याच्या आईवडिलांना फोन लावून त्याला घेऊन जाण्यासाठी यायला सांगितलं… विजयनं आणि पोलीसांनी पुन्हा रात्रभर कृष्णाला समजावलं… औरंगाबाद विभागाच्या कृषी सह-संचालकांशी विजयनं संपर्क साधून कृष्णाला मदत करण्याबाबत विनंती केली… त्यांनीही ती मान्य केली… आपल्यासाठी सारे जण करत असलेल्या प्रयत्नानं एक नवी उमेद मनी जागलेल्या कृष्णानं अखेर… पुन्हा आपण आत्महत्येचा विचारही मनात आणणार नाही… असं विजयला सांगितलं… विजयच्या आणि पोलीसांच्याही मनावरचं मळभ दूर झालं… आणि एक नवी पहाट सूर्याची नवी किरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्येच नव्हे; तर, कृष्णाच्या आयुष्यातही दाखल झाली…!
असे कित्येक कृष्णा निराशेच्या गर्तेत बुडून आपल्या आयुष्याचा अंत करत असतात… त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या विचारापासून परावृत्त करणारा असा एखादा तळमळीचा विजय भेटेलच, असं नाही… पण आपण त्यांच्यासाठी 'विजय' होण्याचा प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे?
विजय, तुझं मनापासून अभिनंदन!!

(विजय गायकवाड यांचा संपर्क क्रमांक : 9870447750 आणि इ-मेल पत्ता vijay.agrowon@gmail.com)

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

जगण्याने छळले होते… मरणाने सुटका केली..!

(सोन्याचा दिवस : 2)

(हा लेख वाचण्यापूर्वी शुक्रवार, दि. 6 मे 2011 रोजी अपलोड केलेला 'सोन्याचा दिवस' हा लेख वाचावा. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://priydarshan.blogspot.in/2011/05/blog-post_06.html)

आज पुन्हा अक्षय्य तृतीया… गेल्या वर्षी या दिवशी मी केवढा खूष होतो. पण आज वर्षानंतर माझा प्रिय मित्र प्रशांत आंबोले याच्या आठवणीनं दुःखाचा उमाळा दाटून येतो आहे. अक्षय-तृतीया ते अक्षय तृतीया… हा एक वर्षाचा कालावधी फारसा काही मोठा नसला तरी गेल्या वर्षी माझा मित्र (हयात) होता.. तो आनंदात होता… मात्र आज एक वर्षानंतर तो आपल्यात नाहीय.. आणि मी दुःखात आहे.
गेल्या वर्षी या दिवशी प्रशांतनं मला त्याचं (दुसरं) लग्न ठरल्याची बातमी दिली आणि त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाला आता तरी पूर्णविराम मिळेल आणि त्याचं उर्वरित आयुष्य सुखात जाईल, या विचारानं मी आनंदून गेलो होतो. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आम्हा दोघांवर ती अधिक खदखदून हसत होती. मला मात्र त्याची काहीच कल्पना नव्हती.
प्रशांतचं लग्न ठरल्याप्रमाणं झालं. माझ्या सर्व मित्रांनीच पुढं होऊन त्याचं लग्न लावून दिलं. सांगावकर बंधूंचं योगदान त्यामध्ये अधिक महत्वाचं होतं. जयू, गजा, संतोष, बबलू अशा सर्वांनीच प्रशांतचं भलं व्हावं, म्हणून कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता लग्नाच्या जेवणासह सर्व खर्च केला. त्या सर्वांच्या पत्नी सुद्धा प्रशांत भाऊजीच्या लग्नात नुसत्या सहभागीच झाल्या नाहीत, तर घरचं कार्य असल्यासारखं सर्व कामं पुढाकार घेऊन केली. सर्वांची एकच भावना होती की, प्रशांतचं भलं व्हावं. त्या लग्नाला मी जाऊ शकलो नाही, पण आई, बाबा आणि भाऊ अनुप आवर्जून सहभागी झाले.
त्यानंतरच्या रविवारी मी घरी गेलो, तेव्हा प्रशांतला त्याच्या नूतन पत्नीसह घरी जेवायला बोलावलं. त्यावेळी, प्रशांतनं माझ्यावर बॉम्बच टाकला. तो म्हणजे, त्याच्या या नव्या पत्नीला पूर्वीच्या विवाहातून दोन-तीन वर्षांची एक मुलगी होती. काहीतरी कारणानं पहिल्या नवऱ्याशी फारकत घेऊन ती माहेरीच राहात होती. प्रशांतनं तिच्या मुलीसह तिला स्वीकारण्याएवढं मन मोठं केलं होतं. हे त्यानं मला आधी सांगितलं नव्हतं. पण, आता ही गोष्ट समजल्यानंतर मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. "तू एक अतिशय धाडसी निर्णय घेतला आहेस. दुसऱ्याच्या मुलाचं पितृत्व स्वीकारण्यासाठी फार मोठं काळीज असावं लागतं. पण तू आता निर्णय घेतलाच आहेस, तर तो निभावण्याचं बळ तुला लाभो," असं मी त्याला स्पष्ट सांगितलं.
जेवणानंतर त्याच्या बायकोलाही प्रशांतनं आजवर सोसलेल्या यातना, त्याच्या आईच्या आजारपणाचं गांभिर्य आणि त्या दोघांच्या दृष्टीनं असलेलं तिचं महत्त्व व जबाबदारी या दोन्ही गोष्टींबद्दल अगदी पोटतिडकीनं समजावून सांगितलं. एक मुलगी होऊनही ती तशी अल्लडच वाटली. त्यामुळं माझ्या मनातली शंका आणखीच दाट झाली. पण कुठंतरी आशेचा किरण होताच!
पुढच्या वेळी गावी गेलो, तेव्हा प्रशांतच्याच रिक्षातून घरी निघालो होतो. वाटेत, त्यानं भाजीपाला विकत घेतला. मनात म्हटलं, पठ्ठ्याच्या संसाराची 'रिक्षा' चांगली मार्गाला लागलेली दिसतेय. तो आनंदातही दिसला.
मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. महिना- दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा काही कारणानं मी गावी गेलो, तर तेव्हा मला बबल्या भेटला. प्रशांतच्या घरी बायकोशी कुरबुरी सुरू झाल्याचं त्यानं सांगितलं. मी प्रशांतला भेटलो, त्याला थेटच विचारलं, काय झालं ते सांग, म्हणून. ब्रेन हॅमोरेजनं आंधळ्या-लुळ्या झालेल्या त्याच्या आईला ती अजिबातच पाहात नव्हती. प्रशांत घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिचं सारं आवरत होताच. पण तो रिक्षा घेऊन बाहेर पडल्यापासून ते संध्याकाळी जेवायला परतेपर्यंत आईकडं अजिबातच लक्ष दिलं जात नव्हतं- तिचं खाणं, पिणं, औषधपाणी आणि स्वच्छता- कशाकशाकडंही! आईचं बोलणंही अस्पष्ट झाल्यानं घशातून चित्रविचित्र आवाज काढून ती काही सांगायचा प्रयत्न करायची, पण सून अजिबात ऐकतच नव्हती. एकदा तर वैतागून तिनं सासूच्या कमरेतच लाथ घातली. ही गोष्ट प्रशांतला समजली मात्र, त्याच्या मनानं पुन्हा हाय खाल्ली.
आईसाठी म्हणून पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतल्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला होता. बायकोला समजून सांगायचा प्रयत्न त्यानं केला तरी ती काही ऐकतच नव्हती. तिच्याबद्दलच्या आपुलकीचा प्रशांतच्य मनातला झरा आपोआप आटू लागला. त्याचा स्वभाव हा कधी मनमोकळं बोलण्याचा नव्हताच. पुन्हा मनातल्या मनात कुढणं सुरू झालं. पुन्हा त्याची पावलं ड्रिंक्सकडं वळू लागली. बबल्याचे अधूनमधून फोन यायचे. मी फोनवरुनच प्रशांतची समजूत काढायचा प्रयत्न करायचा. पण सारं व्यर्थ ठरत होतं. 'तुझ्या बायकोला आपण माघारी पाठवू; मात्र, तू स्वतःला सावर,' इथंपर्यंत समजावून सांगितलं. पण विकल हसण्यापलिकडं त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता.
दि. 29 सप्टेंबर 2011… सायंकाळी साडेसहा-पावणेसातचा सुमार असेल… मंत्रालयात माझ्या ऑफिसमध्ये बसून मी एक भाषण तयार करत होतो. एवढ्यात माझा भाऊ अनुपचा फोन आला. तो निपाणीपासून जवळच असलेल्या शेंडूरला त्याच्या मित्राकडं गेला होता. तिथनंच तो बोलत होता. "दादा, अरे प्रशांतदादानं घरात कोंडून घेऊन फास लावून घेतलाय म्हणे. मला नितीनचा आताच फोन आला होता." अनुपचा स्वर रडवेला झाला होता. मी त्याला म्हटलं, "घाबरु नको. तसं काही नसेल. तू लगेच तिकडं जा आणि नक्की काय झालंय ते मला सांग. टेन्शन घेऊ नको." अनुपला तसं सांगत असताना, माझ्या मनाची घालमेल मात्र प्रचंड वाढली होती.
कसंबसं भाषणाचा मजकूर मी पुढं रेटत राहिलो. पंधरा ते वीस मिनिटांतच अनुपचा पुन्हा फोन आला. "दादा, आपला प्रशांतदादा गेला रे.." असं मला सांगतानाच त्याला रडू आवरेना. आता त्याला मी आवरणार तरी कसा होतो? प्रशांतही त्याला माझ्याइतकाच प्रिय होता. अशा प्रिय व्यक्तीनं घरातल्या पंख्याला गळफास लावून घेतल्याचं भीषण दृष्य जर त्याला खिडकीतून दिसलं असेल तर सावरणं कदापि शक्य नव्हतं. तरीही मी त्याला विचारलं, "काही आशा आहे का रे?" "दादा, सगळं संपलंय रे…" माझ्या मनातली उरलीसुरली आशाही संपली. अंगातलं त्राणच संपलं. बसल्या जागी मी सुन्नबधीर झालो. किती तरी वेळ मी तसाच बसून होतो.  भाषणावर यांत्रिकपणे अखेरचा हात फिरवला. पीएसना फोन केला. त्यांना परिस्थिती सांगितली आणि त्यासाठी गावी जात असल्याचं सांगितलं. आता एकच आशा होती, मित्राच्या 'अंत्यदर्शनाची'! ट्रॅव्हलवाल्या मित्राला फोन करून एक जागा ठेवायला सांगितली आणि निघालो. दरम्यानच्या काळात घरी बाबा, अनुप आणि इतर मित्रांशीही बोलणं सुरू होतं. या अखेरच्या क्षणीही पुन्हा सांगावकर बंधू धावून आले. त्यांच्या दबदब्यामुळं पंचनामा, पोस्ट मॉर्टेम या गोष्टी पटापट पार पडल्या आणि रात्री साडेबाराच्या सुमारास मला बाबांचा फोन आला- अंत्यसंस्कार झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशीच राख सावरण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मित्राचं अंत्यदर्शन नसलं तरी त्याची राख पाहावी लागणार होती मला!
सकाळी घरी पोहोचलो. सकाळी साडेआठची वेळ ठरली होती, पण प्रशांतचं दुर्दैव पाहा. त्याच्या भाच्यानं जाऊन पाहिलं, तर प्रेत व्यवस्थित जळालेलं नव्हतं. त्यामुळं पुन्हा चिता पेटवावी लागली. आयुष्यभर जळल्यानंतर मेल्यावरही दोनवेळा जळणं, माझ्या मित्राच्या नशिबी आलं होतं.
स्मशानात गेलो, राख अजूनही धुमसत होती. प्रशांतनं ज्यांच्यावर आणि ज्यांनी त्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, असे त्याचे सारे मित्र या वेळी त्याच्या राखेभोवती गोळा झाले होते. आतल्या खोलीत आपल्या मुलानं फास लावून आत्महत्या केली आहे, याची बाहेरच्या खोलीत असलेल्या त्याच्या अधू आईला काहीच कल्पना नव्हती. बाहेरचं काहीच तिच्या आतपर्यंत पोहोचत नव्हतं. ज्या आईसाठी प्रशांतनं आयुष्यभर आटापिटा केला, त्या आईला आपला मुलगा गेल्याचं समजलंच नव्हतं, हे सुद्धा माझ्या मित्राच्या नशिबी आलेलं आणखी एक प्राक्तन! त्याची बहीण आणि भाचा, नात्यामुळं केवळ पर्याय नव्हता, म्हणून तिथं उपस्थित होते, इतकंच. स्मशानातल्या विधी दरम्यान, त्याच्या बायकोनं बांगड्या फोडायला नकार दिला. तिला सक्ती करण्यात काहीच अर्थ नव्हता. आमचा मित्र गेला आणि आमच्या दृष्टीनं सारंच संपलं होतं. अक्षयतृतीयेपासून प्रशांतच्या आयुष्यात आलेल्या त्या मुलीनं त्याला त्या वर्षीचा दसराही पाहू दिला नव्हता, असं माझ्या मनानं घेतलं. दोन सोन्याच्या दिवसांदरम्यान माझा मित्र होत्याचा नव्हता झाला होता.
माझ्या मुलाच्या बारशाच्या नियोजनात त्याला महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची होती. अनुपनं त्याच्या मृत्यूच्या दिवशीच त्याला ही गोष्ट सांगितली होती. प्रशांत अनुपशी, बबलूशी दुपारी बोलला होता आणि सायंकाळी घरी जाऊन शांत चित्तानं त्यानं आत्महत्या केली होती. एका शब्दानंही कुणाला काही बोलला नव्हता. कदाचित, त्यानं मला फोन केला असता तर.. मी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न तरी केला असता. पण, या जर - तर ला काहीच अर्थ नसतो.
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना, घडामोडींचा, माझ्या पहिल्या लेखाचा, कथेचा, कवितेचा, कादंबरीचा, प्रेमाचा, प्रेमभंगाचा, पहिल्या नंबरचा, विजयाचा, पराजयाचा अशा सर्वच गोष्टींचा साक्षीदार असलेला प्रशांत आज माझ्यासोबत नाही. एखादा लेख लिहिताना त्याचं पहिलं वाचन करणारा प्रशांत आता नाहीय, ही कल्पनाच सहन होत नाही. आजही निपाणी स्टॅन्डवर पोहोचण्यापूर्वी "आहेस का स्टॅन्डवर?" असं त्याला विचारण्यासाठी माझा हात मोबाईलकडं जातो. मग अचानक, प्रशांत आता आपल्याला कधीही पिकअप करणार नाही, ही गोष्ट लक्षात येऊन मी स्टॅन्डला उतरून रिक्षा स्टॉपकडं न जाता सरळ चालायला सुरवात करतो.
प्रशांतचा मृत्यू म्हणजे भीमराव पांचाळे यांच्या गझलेतल्या 'जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली', या जळजळीत वास्तवाचं प्रत्यंतरच ठरला. प्रशांतनं त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या आत्महत्येनं एक 'मास्टर' उत्तर देऊन टाकलं होतं. त्याच्यापुरते सारे प्रश्न सुटले होते; नव्हे, मागच्यांचेही कित्येक प्रश्न त्यानं जाता जाता सोडविले होते. आता ताईला त्या संपूर्ण घराचा ताबा मिळेल, आई मरेपर्यंत तिला ती पाहील, बायकोला पुन्हा माहेरी जाऊन पुढचा निर्णय घेण्यासाठी मोकळीक, भाच्याला कायमस्वरुपी रिक्षा, असे किती तरी प्रश्न सुटले होते. त्यामुळं आता त्याच्या जाण्याचं कुणाला दुःख वाटण्याचंही कारण नव्हतं.
त्या दिवशी स्मशानातून परत फिरल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत आजतागायत मी प्रशांतच्या घरी गेलेलो नाही. जाण्याचं कारणच संपलं होतं. परवा आत्याच्या घरून स्कूटरवर परतताना वाटेत त्याचं घर लागलं. भर ग्रीष्मातल्या दुपारी आभाळ भरून आलं आणि पावसाचे टपोरे थेंब माझ्या अंगावर पडले. जणू, प्रशांत मला त्याच्या आईचा हालहवाला विचारण्यासाठी जायला सुचवत होता. मी मनातल्या मनात त्याची माफी मागितली. माझ्या मित्राचा काळ ठरलेल्या त्या घरात पाऊल न ठेवण्याचा माझा निश्चय मी मोडणार नाही, असं त्याला स्पष्ट बजावलं. पावसाची तीव्रता वाढली. घरी पोहोचेपर्यंत चिंब भिजलो होतो- वरुनही आणि आतूनही!

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

शिवरायांचं मोठेपण!


छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. नुकताच 'राजा शिवछत्रपती' या मालिकेवरुन निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटाबद्दल माझ्या एका मित्रानं फेसबुकवर हा चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केलं आहे. अतिशय सुरेख आणि सळसळतं असं आवाहन आहे, त्यात त्यानं म्हटलंय की, "तलवारी तर सगळ्याच्यांच हातात होत्या. ताकत ही सगळ्याच्यांच मणगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची उत्तुंग इच्छा फक्त 'मराठ्यांच्या' रक्तातच भिनलेली होती. ही शक्ती छ.शिवाजी महाराजांनी जानली होती, म्हणून तर अफजल खानाच्या रक्ताने प्रतापगडाची पायरी धूतली होती... मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान, ‘मी मराठी…’ या दोन शब्दातच माझी ओळख आहे... मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही" आता आमचा मराठी बाणा- "मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही ", "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा"
- यासाठी नुकताच प्रदर्शित झालेला “राजा शिवछत्रपती” हा चित्रपट प्रत्येक शिवभक्त मराठ्याने सहकुटुंब-मित्रपरिवारासह जाऊन आवर्जून पहावा. दबंग-बॉडीगार्ड यासारखे टुकार चित्रपट जर सुप्परहिट्ट होत असतील तर मग आपले आराध्य दैवत 'शिवछत्रपती' वरील चित्रपटाने तर विश्वविक्रम केला पाहिजे. तेंव्हा निर्धाराने बाहेर पडा...."
मित्राच्या आवाहनात सकृतदर्शनी गैर असं काही नाही. चित्रपट पाहावा आणि त्या माध्यमातून आपलं शिवप्रेम व्यक्त करावं, यालाही कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. पण हा चित्रपट असो की मालिका, या दोन्ही बाबींचा शेवट शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगानं करण्यात आलाय. किंबहुना, माझ्या पाहण्यात आलेल्या शिवाजी महाराजांवरील बऱ्याच चित्रपटांचा शेवट हा याच प्रसंगानं झाल्याचं मला दिसलं. हिंदी चित्रपटात जसं नायक-नायिकेच्या विवाहानं '...ॲन्ड दे लिव्ह्ड हॅप्पीली फॉरेव्हर!' असा शेवट केला जातो, तसा शिवरायांवरील चित्रपटांचा तद्दन सिनेमॅटिक शेवट केल्याचं दिसतं. पण प्रत्यक्षात शिवरायांनी राज्याभिषेकानंतरच्या कालखंडात अतिशय झंझावाती पद्धतीनं, प्रजाहिताच्या दृष्टीनं असा कारभार केलेला आहे. फक्त त्यामध्ये कुठं फारसं चमत्कृतीपूर्ण असं काही घडलं नाही. त्यामुळं त्या कारभाराशी आम्हाला काही देणंघेणं नसावं कदाचित!
पण माझ्या मते, शिवरायांचं मोठेपण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चमत्कृतीपूर्ण घटनांत नाहीयेच मुळी. स्वराज्य प्रस्थापनेबरोबरच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या रयतेची ज्या पद्धतीनं काळजी वाहिली, त्यामध्ये त्यांचं मोठेपण सामावलं आहे. राज्याभिषेकानंतरच्या काळात त्यांनी ज्या लोकाभिमुख पद्धतीनं कारभार केला, त्याला तोड नाही. रयतेच्या शेतातल्या पिकाच्या देठालाही धक्का न लावता जाण्याचा आदेश बजावणारा हा 'जाणता राजा', त्या काळातल्या इतर साम्राज्यविस्तारवादी राजा-बादशहांच्या मांदियाळीत वेगळा न ठरता तरच आश्चर्य!
छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर अतिशय महान असा 'लोकराजा' होते. तसं पाहता, त्या काळातील राजकीय गरजेपोटी त्यांना काही धाडसी पावलं उचलावी लागली. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, तोरण्याची जीत, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोट छाटणी, मिर्झाराजे जयसिंहांशी तह, आग्र्याहून सुटका, सूरतेची लूट या आणि अशासारख्या घटनांनी त्यांच्या जीवनचरित्राला एक वेगळं क्षात्रतेज प्रदान केलं. वीररसानं भारलेलं असल्यानं सर्वसामान्य जनतेलाही ते आजतागायत भारावून टाकणारं ठरतंय. पण या घटना म्हणजेच शिवरायाचं मोठेपण, असं मानणं यासारखा दुसरा कोतेपणा नाही. खरं तर, या घटनांना समांतर आणि शिवराज्याभिषेक झाल्यानंतरही शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपल्या रयतेची काळजी वाहिली आणि सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या मनात जे आदराचं स्थान प्राप्त केलं, ते अढळस्थान हेच शिवरायांचं खरं सिंहासन ठरलं.
ज्येष्ठ विचारवंत ॲड. गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' या छोटेखानी पुस्तिकेत शिवरायांचं खरं मोठेपण आणि राजेपण कशात आहे, याचा अतिशय सुरेख आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे.
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्याला प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.
शिवाजी महाराजांविषयी प्रसृत केलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे `महाराज हे केवळ हिंदूंचे राजे होते आणि त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराचीच भावना होती.' अर्थात हा असा गैरसमज समाजात पसरवण्यामागचं 'राजकारण' काय आहे, ते सांगण्याची गरज नाही. पानसरे यांनी आपल्या लेखनातून हा गैरसमज ठामपणे खोडून काढला आहे.
पानसरे लिहितात : "शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असं म्हणावं, तर मग राणा प्रताप वा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत?... शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते... मग असं का व्हावं?...''
त्याचं उत्तरही पानसरे यांनी देऊन टाकलं आहे. त्यांच्या मते 'हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजी महाराजांना यश प्राप्त झालं, हे खरं नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी महाराज आणखी काहीतरी चांगलं करायला निघाले होते, असं दिसतं...'' काय होतं हे चांगलं काम?
तर, महाराजांच्या मनात आपलं राज्य, सत्ता वा अंमल प्रस्थापित करायची गोष्ट आली, त्याचं कारण त्या काळातले, वतनदार, जमीनदार, सुभेदार आणि पातशहा यांच्याबरोबरच पाटील-कुलकर्णी आदी मंडळींनी गोरगरीब रयतेवर चालवलेले अत्याचार हे होतं. त्या अत्याचाराच्या विरोधात महाराजांनी मोठा लढा दिला आणि आपला अंमल प्रस्थापित केला. असा लढा देऊन उभ्या राहिलेल्या सत्तेला दुसऱ्या कोणावर अन्याय करण्याचा नैतिक हक्क तर नव्हताच शिवाय, या लढ्यासाठी समाजाच्या तळागाळातून उभी राहिलेली जनताही, त्या सत्तेला म्हणजेच- महाराजांना सोडून गेली असती.
अर्थात, केवळ राज्य जाईल म्हणून महाराजांनी रयतेला प्रेमानं वागवलं, असं नाही तर त्यांच्या मनातच `आम आदमी'विषयी कशी जिव्हाळ्याची भावना होती, ते अनेक उदाहरणांनिशी पानसरे यांनी दाखवून दिलं आहे. महाराजांच्या सैन्यात केवळ मुस्लिम सरदारच नव्हे तर सैनिकही होते. त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराची भावना असती, तर असा धोका त्यांनी पत्करला असता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याचा अर्थ शिवाजी महाराज हे धर्मच मानत नव्हते वा ते निधर्मी होते किंवा त्यांनी आपलं राज्य निधर्मी म्हणून घोषित केलं होतं, असा मात्र नाही. महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत होते... पण याचा अर्थ ते मुस्लिम धर्माच्या विरुद्ध होते, असा मात्र घेता उपयोगाचा नाही. सभासदाच्या बखरीत बखरकार म्हणतात : ``मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालवले...'' यावरुनच त्यांची धर्मनिरपेक्षता सिद्ध होते.
महाराजांविषयी असलेला किंवा काही मतलबी मंडळींनी पसरवलेला आणखी एक गैरसमज म्हणजे महाराज हे फक्त मराठ्यांचेच राजे होते. प्रत्यक्षात चित्र काय होतं? शिवाजीच्या सहकाऱ्यांमध्ये सर्व जातिधर्माचे लोक होते. न्हाव्यांपासून मराठ्यांपर्यंत आणि ब्राह्मणांपासून प्रभू-शेणवींपर्यंत सर्वांचा गोतावळा शिवाजी महाराजांनी उभा केला होता... शिवाजी महाराजांच्या यशाचे रहस्य या सर्वसमावेशकतेत आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची शिवरायांनी घेतलेली काळजी सुद्धा त्यांच्या मोठेपणाचं द्योतक आहे. राजांनी प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना लिहिलेले ५ सप्टेंबर १६७६ चे पत्र आजही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. "पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे कर्ज द्यावे. पीक आल्यावर त्यांच्याकडून मुद्दल तेवढे घ्यावे, व्याज घेऊ नये. यासाठी सरकारी खजिन्यातून दोन लाखांपर्यंत रक्कम खर्च पडली तरी हरकत नाही. शेतकऱ्याला जर मुद्दलही फेडणे शक्य नसेल तर त्याला तेही माफ करावे," असे शिवाजी महाराजांनी त्या पत्रात म्हटले होते. याचा अर्थ शेतकऱ्यांची गरज बघून त्याला शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफी द्यावी, असा हुकूम शिवाजी महाराजांनी केला होता. महाराजांचा जयजयकार करत असताना त्यांच्या या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श आपण घेण्याची गरज आहे.
याच कारणामुळं महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपतींचा जो पोवाडा लिहिला, त्यामध्ये 'कुळवाडी भूषण' असा त्यांचा सार्थ गौरव केला आहे.
हे होतं शिवरायांचं खरं मोठेपण; पण आपण अफझलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाच्या फजितीमध्ये ते शोधतो आणि इथंच खरी गल्लत होते, असं माझं स्पष्ट मत आहे.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी

(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' विशेषांकामध्ये प्रकाशित झालेला माझा लेख याठिकाणी पुनर्मुद्रित करीत आहे. आपल्या प्रेमळ फीडबॅकच्या प्रतिक्षेत...)

मला नेहमीच असं वाटत आलंय, की प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ यावी लागते. बाकी गोष्टींचं जाऊ द्या, पण या लेखाची सुद्धा वेळ येण्यासाठी जवळ जवळ सव्वा वर्षाचा कालावधी लोटलाय. गंमत अशी झाली की, गेल्या वर्षी म्हणजे बरोब्बर 15 ऑगस्ट 2010 रोजी माझा मित्र धर्मेंद्र पवार याच्या आग्रहानं आणि पुढाकारानं आम्ही दहा वर्षांपूर्वीच्या आमच्या एमजेसीच्या ग्रुपचं गेट-टुगेदर लोणावळ्यात करायचं ठरवलं. सातातले पाचजण आले, म्हणजे कोरम चांगला होता. त्यावेळी आम्ही कार्ल्याची लेणी पाह्यचं ठरवलं, पण सुटीचा दिवस असल्यानं एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाड्यांचं पार्किंग डोंगराच्या पायथ्यापर्यंत आलं होतं. वर गाडी न्यायची सोयच नव्हती. तेव्हा परत फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता करायचं काय? त्यावेळी तिथून विरुद्ध दिशेला पण जवळच भाजे लेणी असल्याची माहिती मिळाली. तोपर्यंत मला फक्त कार्ले लेणीच ऐकून माहिती होती. अशा तऱ्हेनं गेल्या वर्षी आम्ही भाजेची लेणी पाहिली. कार्ल्याची लेणी पाहण्यासाठी पुन्हा मध्ये जवळजवळ सव्वा वर्षाचा काळ जावा लागला. आमच्या मंत्री कार्यालयातल्या स्टाफनं गेल्या 20 नोव्हेंबर 2011 रोजी एक दिवसाची ट्रीप लोणावळ्याला आयोजित केली. त्यावेळी हा कार्ले लेणी पाहण्याचा योग जुळून आला. दोन्ही वेळा या लेण्यांवर काही लिहावं, असं वाटलं, पण काही कारणानं राहून गेलं. काढलेले फोटो मात्र मित्रांसोबत शेअर केले. आता हा लेख लिहण्याचं कारण सुद्धा धर्मेंद्रच आहे. 'अमृतवेल'च्या पर्यटन विशेषांकासाठी काही देतोस का, असं त्यानं विचारलं आणि आपसूकपणे मी त्याला कार्ले आणि भाजेच्या लेण्यांविषयी लेख देतो, असं सांगितलं. म्हणजे लेणीदर्शनाला कारणीभूत ठरलेला माझा मित्रच पुन्हा या लेखामागची देखील प्रेरणा ठरला.

वाचक हो, इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात आपल्या देशात कित्येक लेणी खोदल्या गेल्या. त्यातील जवळपास बाराशे ज्ञात आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या बाराशे पैकी हजारभर लेणी तर केवळ आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कऱ्हाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची लेणी असं हे लावण्य-लेणं आपल्या राज्यभरात विखुरलं आहे. त्यापैकी लोणावळा परिसरातील कार्ले आणि भाजे ही लेणी आपल्याला प्राचीन वारशाची प्रकर्षानं जाणीव करून देतात आणि आपण त्यांचं जतन करण्यात कमी पडतो आहोत, याची टोचणीही मनाला लावतात. उपासनेच्या या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपली प्राचीन कला, संस्कृती, इतिहास, व्यापार-उदीम अशा एक ना अनेक ठेव्यांची महती आणि माहिती या लेणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. गरज असते ती फक्त आपुलकीनं त्यांच्याकडं पाहणाऱ्या नजरेची!

दि. 15 ऑगस्ट 2010 :

कार्ल्याला जाता येत नाही, असं दिसल्यानं तुलनेनं कमी गर्दी असलेल्या भाजे लेणीसमूहाकडं आम्ही मित्रमंडळींनी मोर्चा वळवला. वेळ भरपूर असल्यानं नेहमीच्या वाटेनं चढण चढण्याऐवजी आम्ही विरुद्ध दिशेनं थोडंसं ट्रेकिंग करत डोंगर चढण्याचं ठरवलं. मस्त हिरवागार परिसर, ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि त्याखाली सुटीचा आणि तारुण्याचा आनंद लुटणारी तितकीच हिरवीगार तरुणाई अशा मस्त वातावरणाचा अनुभव घेत आम्ही डोंगर चढलो. बाय द वे, हा डोंगर म्हणजे लोहगड-विसापूर जोडीपैकी विसापूरचा!

अर्धा एक किलोमीटरची चढण चढून आल्यानंतर हळूहळू भाजे लेण्यांची झलक आम्हाला दिसू लागली. आम्हाला सर्व प्रथम दिसला तो स्तूपसमूह! काही स्तूप डोंगरांच्या खोबणीत तर काही खोबणीबाहेर. डोंगरावरुन येणारे हलके झरे त्यांच्यावर जणू अभिषेक करत होते. अगदी पहात राहावं, असं दृष्य. मी त्याचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केला. इथं एकूण चौदा स्तूप आहेत. भाजे इथं राहिलेल्या काही मान्यवर बौद्ध भिक्षूंची ही स्मारकं आहेत. त्यावर त्यांचे काही लेखही कोरलेले पुसटपणे दिसतात.

या स्तूपसमूहाच्या उजव्या बाजूला असलेल्या धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटणारे लोक पाहून आमची पावलं तिकडं वळली. धबधब्याकडं पाहात असतानाच आमच्या नजरेला पडली, ती पाठच्या सूर्यगुंफेकडं! इथं इतकी उत्कृष्ट शिल्पं आमच्या नजरेस पडली की पाहताना अगदी भान हरपलं. व्हरांडा, आत दालन आणि त्यात आणखी काही खोल्या अशी विहारसदृश रचना. पौराणिक प्रसंग, शस्त्रसज्ज द्वारपाल, उत्कृष्ट कोरीव प्राणी-पक्षी आणि बरंचसं नक्षीकाम. इंद्र आणि सूर्याचा देखावा तर पाहात राहावा असाच. चार घोड्यांच्या रथावर आपल्या दोन पत्नींसह आरुढ झालेला सूर्य, त्यांच्यावर छत्रचामरे ढाळणारे सेवक-सेविका आणि त्या रथाखाली तुडविला जाणारा राहू, असा प्रचंड शिल्पपट इथं कोरला आहे. अन्य एका शिल्पामध्ये ऐरावतावर स्वार असलेला इंद्र कोरला गेल्याची माहिती सांगितली जाते. त्याखाली वादक, देवदेवता यांचीही शिल्पं आहेत. पण या शिल्पांचा नेमका हाच अर्थ आहे का, याची मात्र अभ्यासकांनीच योग्य शहानिशा केलेली बरी! ही शिल्पं आपल्या मनावरही कोरली जातात, एवढं मात्र नक्की. याच सूर्यगुंफेच्या व्हरांड्यातल्या ओट्यांवर तसंच कोरीव खांबाच्या वरच्या बाजूलाही काही विस्मयचकित करणारी शिल्प पाहायला मिळाली. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. त्या काळच्या कला-संस्कृतीवर पडलेला पर्शियन संस्कृतीच्या प्रभावाची कल्पना कदाचित ही शिल्पं आपल्याला करून देत असावीत, असं वाटलं.

तिथून मग आम्ही या भाजे लेण्याचं प्रमुख वैभव असलेल्या मुख्य चैत्यगृहाच्या दिशेनं चालायला सुरवात केली. स्तूपसमूह मागे टाकून आम्ही पुढे आलो आणि भव्य पिंपळपानाच्या आकाराचं मुख्य चैत्यगृह आणि त्याच्या आजूबाजूचे विहार एकदम दृष्टीपथात आले आणि हे दृश्य नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवत आम्ही तिथंच उभे राहिलो. स्तंभित व्हावं, असाच हा सारा नजारा होता. साधारण इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून कोरण्यास सुरवात झालेल्या भाजे लेण्यांच्या निर्मितीची आणि तिथल्या बदलांची प्रक्रिया ही पुढं इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे सातशे ते आठशे वर्षं सुरूच होती. या सर्व कालखंडाचं प्रतीक जणू आमच्यासमोर उभं होतं.

पिंपळपानाच्या आकाराची चैत्यकमान, चैत्यगवाक्षं, कोरीव सज्जे, कातळात खोदलेल्या कड्या, जाळीदार नक्षी, यक्ष आणि युगुलं असा सारा उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना इथं पाहायला मिळतो. मुख्य चैत्यगृहाचा थाट तर काही औरच आहे. पूर्ण खुलं असल्यानं अत्यंत प्रकाशमय अशा या चैत्यगृहाचं देखणेपण पाहात राहावं असं आहे. १७.०८ मीटर लांब-खोल, ८.१३ मीटर रुंद आणि ७.३७ मीटर उंच अशा या चैत्यगृहात ओळीनं सत्तावीस अष्टकोनी खांब आहेत आणि मधोमध अत्यंत गुळगुळीत स्तूप! (आजच्या प्रेमीयुगुलांनी या स्तुपावर देखील आपली नावं कोरल्याचं पाहून वाईट वाटल्याशिवाय राहिलं नाही.) चैत्यगृहाचं गजपृष्ठाकृती छत आतून लाकडी तुळयांनी सांधलेलं आहे. आज 2200 वर्षानंतर सुद्धा या लाकडी तुळया शाबूत असल्याचं पाहून आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही. इथल्या खांबांवर कमळ-चक्रादी शुभचिन्हंही कोरलेली आढळतात तर स्तुपामागच्या काही खांबांवर ध्यानस्थ भगवान बुद्धाच्या चित्रप्रतिमाही, अगदी अस्पष्ट का होईना, पण दिसतात.

या चैत्यगृहाच्या आजूबाजूला एकूण एकवीस विहार आहेत. मुख्य चैत्यगृहाला लागून तर अनेक दालनांना पोटात घेणारा दुमजली विहार आहे. दरवाजे, खिडक्या, झोपण्याच्या बाकांनी युक्त अशा विहारांची मालिकाच इथं आहे. काही बाकांच्या खाली तर सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसतात. भाजेच्या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले सुमारे बारा शिलालेख सापडले आहेत. त्यातल्या काहींमध्ये दान देणाऱ्यांचा नामोल्लेख आढळतो. या विहारांसमोर स्वच्छ पाण्याचे जुळे टाकही दिसतात. या टाक्यावरही 'महारठी कोसिकीपुत विण्हुदत' या दात्याचं नाव कोरल्याचं दिसतं. त्याच्याशेजारच्या टाक्याजवळ एक शिवलिंगही दिसतं.

चैत्यगृहाच्या समोर भारतीय पुरातत्त्व विभागानं या लेण्यांची माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. 'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या 29 गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखलचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण 12 शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. 2704-ए दि. 26-5-1909 नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'

ही माहिती देण्याचं कर्तव्य शासनानं बजावलं असलं तरी, या संरक्षित स्मारकाचं खरं संरक्षण तेव्हाच होईल, जेव्हा या अमूल्य ठेव्याच्या संरक्षणाची व संवर्धनाची खरी जाणीव या मातीतल्या मनामनात निर्माण होईल, अशी भावना दाटून आली. त्या प्राचीन शिल्पकारांना मनोमन धन्यवाद देऊन आम्ही सर्व मित्रांनी मुख्य वाटेनं डोंगर उतरायला सुरवात केली- धबधब्याखाली भिजणारी सुंदर पण मर्त्य शिल्पं पाहात!

दि. 20 नोव्हेंबर 2011 :

एखाद्या सुटीच्या दिवशी कुठंतरी छोटीशी ट्रीप काढण्याचं पर्यटन मंत्री कार्यालयातल्या आमच्या सर्व स्टाफनं ठरवलं होतं. आता मुंबईपासून सिंगल डे ट्रीप म्हटल्यानंतर लोणावळ्याचाच पर्याय सर्वांनी उचलून धरला. शनिवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर रात्री लोणावळ्याला पोहोचायचं, दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारपर्यंत थोडी मौजमजा करायची आणि संध्याकाळी मुंबईत रिटर्न, असा थोडक्यात कार्यक्रम ठरला. शनिवारी रात्री कार्ला इथल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टला पोहोचलो. सर्वांनी एकत्रितपणे मस्त खानपान केलं, झक्कास गप्पागोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी काय करायचं, याचा ठोस असा कार्यक्रम काही ठरला नव्हता. तेव्हा माझ्या मनानं उसळी मारली. गेल्या वर्षी आपल्या कार्ल्याच्या लेणी पाहायच्या राहून गेल्या आहेत. तेव्हा या सर्व ग्रुपला घेऊन तिथं जावं, असा विचार मनात आला. भाविक मंडळी एकवीरेचं दर्शन घेतील आणि मला लेण्या पाहता येतील, असं वाटून मी तो प्रस्ताव माझ्या सहकाऱ्यांसमोर मांडला आणि सर्वांनीच त्याला अनुमोदन दिलं. फक्त सकाळी लवकर निघणं आवश्यक असल्याचं गतानुभवावरुन सर्वांना सांगितलं.

रविवारी सकाळी नाष्ता करून आम्ही कार्ले डोंगराकडं निघालो. पहाटे लवकर आलेल्या भाविकांच्या गाड्या परतताना दिसल्या. डोंगराकडं जाणाऱ्या वाहनांची वर्दळ होतीच. पण यावेळी आम्ही डोंगरावरच्या पार्किंग लॉटपर्यंत बऱ्यापैकी व्यवस्थित पोहोचलो. (बऱ्यापैकी व्यवस्थित यासाठी की, वळणावळणाच्या या सिंगल रोडवर समोरुन एखादं मोठं वाहन आलं तरी वाट करून देताना अडचण होते. त्यात चढही तीव्र होता.) वाहनं पार्किंग करून आम्ही डोंगर चढायला सुरवात केली. वाटेत दोन्ही बाजूला एकवीरा देवीसाठी साड्या, नैवेद्य आणि प्रसादांची अगणित दुकानं दुतर्फा ओळीनं मांडलेली. वरती चढून आलो तर एकवीरा देवीच्या मंदिरानं झाकोळलं गेलेलं मुख्य शैलगृहाचं प्रवेशद्वार दिसलं. तरीही लेणीचं मूळचं सौंदर्य लपत नव्हतं, ही गोष्ट अलाहिदा.

देवीच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली. आता या रांगेत उभं राहून किती वेळ जाणार, या विवंचनेत पडलो. अखेर एक निर्णय घेतला. ज्यांना दर्शनासाठी जायचंय, त्यांनी जावं. मी आणि माझे सहकारी दत्तात्रय खिल्लारी, आम्ही दोघांनी लेणी पाहायला जायचं ठरवलं. दर्शनाला गेलेली टीम आम्हाला मागाहून जॉइन होणार होती. आता हाताशी वेळ मुबलक होता.

आम्ही रांग सोडून मुख्य शैलगृहाच्या प्रवेशद्वाराशी आलो. कार्ल्याच्या या लेणी समूहात एक चैत्यगृह आणि उर्वरित विहार अशा एकूण सोळा लेणी आहेत. इ.स. पूर्व पहिले शतक ते इ.सन पाचवे शतक या दरम्यानच्या काळात ती खोदण्यात आलीत. एक ते तीन मजल्यांच्या या विहारांमध्ये जाण्यासाठी डोंगरातच अंतर्गत जिने खोदल्याचे दिसतात. काही विहारांकडे जाण्याचे जिने तुटल्यानं तिकडं प्रवेश बंद केला आहे. एका जिन्यावरुन मात्र पहिल्या मजल्यापर्यंत जाऊन ध्यानगृह व विहार पाहता येतात. आम्ही तसं ते नंतर पाहिले.

तर, मुख्य चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराशीच एकवीरा देवीचं मंदिर मध्ययुगात कधीतरी निर्माण करण्यात आलंय. (त्या काळी बौद्ध आणि हिंदूंचा संघर्ष आणि परस्पर विद्वेष किती पराकोटीला पोहोचला असेल, याचं प्रत्यंतरच जणू लेण्यांच्या पार्श्वभूमीवरील हे मंदिर पाहिलं की येतं. हिंदू आणि बौद्ध संस्कृतीच्या मिलाफाचं प्रतीक म्हणून मात्र या मंदिराकडं नक्कीच पाहता येणार नाही. हा धार्मिक अधिक्रमणाचा भाग आहे. आणि ज्या काळात ते घडलं, ते पाहता त्याला स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. वेरुळमध्ये जो लेणीसमूह आहे, तिथं मात्र बौद्ध, जैन आणि हिंदू संस्कृतीचं एकत्रित प्रतिबिंब पाहता येतं. असो!) या मंदिरामुळं कार्ल्याच्या लेणी समूहाला भेट देणाऱ्यांची संख्या आपोआपच मोठी असते, पण त्यात ती खऱ्या अर्थानं 'पाहणाऱ्यांची' संख्या मात्र नगण्यच! (पुन्हा एकदा असो!)

आम्ही मंदिराच्या मागे थेट मुख्य चैत्यगृहासमोर आलो, आणि तिथलं दृश्य पाहून थक्कच झालो. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला सुमारे 45 फूट उंचीचा एकसंध सिंहस्तंभ नजरेच भरला. सारनाथच्या धर्तीवर उभारलेला हा सोळा कोनी स्तंभ आपल्या प्राचीन वास्तुकलेची साक्षच देतो. स्तंभाच्या अग्रभागी एक वाटोळा कळस, त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आणि त्यावर बसलेली सिंहाची चौकडी पाहताच आत काय पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता लागते. या स्तंभावर त्याचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक’ याच्याबाबतचा ब्राह्मी लेखही दिसतो. या चैत्यगृहाच्या उजव्या बाजूलाही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावं. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आढळते. तिथं सिंह आणि चक्र असलेल्या खांबांच्या मध्ये स्तूप दाखवलेला आहे.

कार्ल्याच्या चैत्यगृहाबाहेर व्हरांडा खोदलेला दिसतो. व्हरांड्यात शिल्पाकृतींचं वैभवच जणू साकार झालं आहे. मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्ती, भगवान बुद्धाचे शिल्पपट, चैत्यकमानी आणि गवाक्षांमध्ये सजलेले मजले यांनी हा व्हरांडा खालपासून वरपर्यंत भरून गेला आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर दिसतात.

व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला अनेक मजली प्रासादांचे देखावे कोरले आहेत. त्यांच्या तळाशी सोंडा उध्वस्त झालेले प्रत्येकी तीन हत्ती दोन्ही बाजूला दिसतात. पुढं महायान पंथाच्या काळात इथं भगवान बुद्धाच्या मूर्तीही खोदण्यात आल्याचं दिसतं. इथल्या चैत्यकमानी, गवाक्ष आणि सज्जे यांची रचना तर जणू एखाद्या प्राचीन नगरीचाच देखावा उभा करतात. हा देखावा डोळ्यांतही मावत नाही की कॅमेऱ्याच्या एका फ्रेममध्येही! आपण अचंबित होऊन टप्प्याटप्प्याने हे वैभव नजरेत साठवतच राहतो. काय पाहू अन् काय नको, अशी द्विधा मनःस्थिती होत असतानाच, आपण समोर दिसणाऱ्या प्रत्येक शिल्पाचा अर्थ लावण्याचाही प्रयत्न करू लागतो. हे अर्थ लावणं नाही साधलं तरी हा अद्भुत ठेवा पाहिल्याचं समाधान निश्चित लाभतं.

भाजे इथल्या चैत्यगृहाप्रमाणंच या चैत्यगृहालाही पिंपळपानाकृती कमान कोरलेली दिसते. आम्ही चैत्यगृहात प्रवेश केल्यानंतर आणखीच स्तंभित झालो. तब्बल १३.८७ मीटर रूंद, ३७.८७ मीटर खोल आणि १४.०२ मीटर उंच असं हे बहुधा सर्वात मोठं चैत्यगृह असावं. आत गेल्यानंतर नजरेत भरतात ते दुतर्फा असलेले 37 कोरीव खांब आणि छताच्या लाकडी तुळया. ते पाहता पाहताच आपली नजर भव्य अशा स्तुपावर स्थिरावते. भाजे इतका लख्ख प्रकाश या शैलगृहात येत नाही (कदाचित मंदिरामुळं असेल). त्यामुळं आतल्या अंधुक प्रकाशात एक गूढता निर्माण झाल्यासारखं वाटतं. इथल्या दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 15 अष्टकोनी खांबांवर हत्तीवर आरुढ अशा स्त्री-पुरूषांच्या जोड्या कोरलेल्या दिसतात. निरखून पाहिल्यावर असं दिसतं की, या प्रत्येक खांबावरची कलाकृती वेगवेगळी आहे. त्या प्रत्येकावर कलाकारांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. दोन खांबांवर तर आपल्याला 'स्फिंक्स'सारखी आकृती पाहून आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही.

इथला स्तूपही उत्तुंग आणि उत्कृष्ट असा आहे. स्तुपावरचे लाकडी छत्र, त्यावरच्या नक्षीसह आजही शाबूत असल्याचं दिसतं. कार्ल्याच्या या लेणीत ब्राह्मी लिपीतले एकूण ३५ शिलालेख सापडले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राचीन काळासंदर्भातली बरीचशी माहिती अवगत झाली आहे. 'वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे,' अशा अर्थाचा एक शिलालेख इथं आहे. आणि आजही तो या लेण्यांना लागू पडतो.

या चैत्यगृहाच्या बाजूला असलेल्या एकमजली-दुमजली विहारांमध्ये आम्ही गेलो. तळमजल्यावर एकमेव बऱ्यापैकी सुस्थितीतील असे शिल्प पाहायला मिळाले. इथं पूर्वी काही शिल्पं असावीत, असा अंदाज येईल न येईल, अशा पद्धतीनं ती उध्वस्त झाल्याचं दिसतं. स्तुपावर असतो, त्याप्रमाणे एक कोरीव घुमटही याठिकाणी दिसला. पण त्याच्याबद्दलही अंदाज करण्यापलिकडं आम्ही काहीच करू शकलो नाही. इथून बाहेर पडताना सुद्धा तशाच संमिश्र भावना पुन्हा मनात दाटून आल्या- एक उत्तम ठेवा पाहिल्याबद्दलचा आनंद आणि त्यांचं महत्त्व जाणण्यात तसंच जपण्यात आपण कमी पडत असल्याबद्दलचं दुःख!

--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--

'देवीचा कोप झाला तर..?'

आम्ही कार्ला इथल्या मुख्य चैत्यगृहात प्रवेश केला, त्यानंतर थोड्याच वेळात तिथं एक कुटुंब आलं. त्या कुटुंबातली लहान मुलगी काही आजारी असावी. त्या लोकांनी अतिशय झटपट स्तुपासमोरच काही अंतरावर पुजेची मांडणी केली. एक पुजेचा तांब्या, कापूर, अगरबत्त्या, नारळ वगैरे-वगैरे. एवढ्यात त्यातल्या एका वयस्कर बाईच्या अंगात आलं, ती घुमू लागली. तिनं घुमतंच त्या मुलीला आईच्या हातून खेचून घेतलं आणि कपाळाला उदी लावली. त्यानंतर तिच्यासोबतच्या महिलांनीही नैवेद्य वगैरे दाखवून यथासांग पूजा पार पाडली. यावेळी तिथं पुरातत्त्व खात्याचा एक सुरक्षा रक्षकही तिथं होता. त्याला मी विचारलं, 'हे तुम्ही इथं कसं करू देता?' तो उत्तरला, 'साहेब, इथं असले प्रकार नित्याचेच आहेत. मंदिरात एवढी पूजा करण्यासाठी वेळ मिळत नसल्यानं ते चैत्यगृहात करतात. आता देवी अंगात आलेल्या बाईला इथनं हटकायचं तरी कसं? देवीचा कोप झाला तर..?' त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नव्हतं! (या सर्व घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मी करून ठेवलं आहे.)

एवढंच नव्हे, तर; चैत्यगृहाच्या बाहेरही लेणी परिसरात जिथे मिळेल तिथे डोंगरांच्या खोबण्यांत दगडाला शेंदूर फासून भाविक जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या 'दुकान'दारांचीही उपस्थिती इथं पाह्यला मिळाली.

'नाणे'श्रद्धा!

कार्ल्याच्या मुख्य चैत्यगृहात काही शाळा-कॉलेजचे विद्यार्थीही होते. काही पाहण्याऐवजी तिथं उभं राहून फोटो काढून घेण्यात त्यांना अधिक स्वारस्य होतं. तेही ठीक आहे. पण खरा कहर तर पुढंच झाला. काही जण स्तुपावर सुटे पैसे फेकत होते. ते कशासाठी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर असं समजलं की, ज्याचं नाणं तीन प्रयत्नांत स्तुपावर राहील (किंवा घरंगळणार नाही), त्याची मनोकामना पूर्ण होते. आता बोला! बुद्धिदेवता भगवान बुद्धाच्याच डोक्यावर नाणं फेकून मनोकामना पूर्ण करण्याच्या मागे लागलेल्या या तरुणांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटूनही मी ती केली नाही. कारण जमानाच अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधाचा आहे!

कार्ले-भाजे इथे कसे जावे?

लोणावळा हे केंद्र ठेवून कार्ले आणि भाजे या दोन्ही लेण्यांकडे जाता येते. मळवली रेल्वे स्थानकापासून कार्ले लेणी साधारण नऊ किलोमीटरवर तर भाजे लेणी साधारण एक ते दीड किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत. लोणावळ्याला मुंबई किंवा पुणे येथून बस अथवा रेल्वेने जाता येते. दोन्ही बाजूंनी सरासरी दोन तासांच्या अंतरावर हे हिल स्टेशन आहे.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

...वो 'नजर' कहाँ से लाओगे?

गेले दोन दिवस (कालचा आणि आजचा) हे माझ्या फोटोग्राफीमधील आयुष्याच्या दृष्टीनं अतिशय (आनंदाचे आणि दुःखाचे) संमिश्र स्वरुपाचे ठरले.

काल दुपारी ज्येष्ठ एरियल फोटोग्राफर गोपाळ बोधे हे आमच्या कार्यालयात, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं निमंत्रण भुजबळ साहेबांना देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची भेट झाली, त्यांच्याशी चांगला संवाद झाला, ही आनंदाची घटना. त्यांच्या भेटीची बातमी रात्री उशीरापर्यंत माझ्या छायाचित्रकार मित्रांशी आणि छायाचित्रण कलेतील माझे गुरू शशिकांत मुळे यांच्याशी शेअर केली. आनंद द्विगुणित झाला.

आज सकाळी आवरुन ऑफिसला यायला घरातून बाहेर पडतो न् पडतो, तोच थेट भुजबळ साहेबांकडून अत्यंत दुःखद असा मेसेज आला ('चिंतन'च्याही आधी!)- ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष गेल्याचा! विश्वास ठेवण्यासारखी बातमी नव्हतीच! मी स्टेशनवरूनच आणखी दोघा-तिघांना फोन करून बातमी कन्फर्म केली. साहेबांचा कन्डोलन्स मेसेज तयार करायलाही धीर गोळा करावा लागला. कालच्या आनंदावर आजचं दुःख भारी पडलं.

गोपाळ बोधे आणि गौतम राजाध्यक्ष हे दोघेही छायाचित्रणाच्या क्षेत्रातलेच असले तरी या क्षेत्रातल्या दोन भिन्न प्रकारच्या प्रांतात त्यांनी आपापलं प्रभुत्व सिद्ध केलेलं आहे. भारतातले पहिले एरियल फोटोग्राफर असलेल्या किंबहुना, ज्यांच्या प्रयत्नानं देशात एरियल फोटोग्राफी करण्यास परवानगी मिळाली, त्या गोपाळ बोधे यांचे आम्ही फोटोग्राफीचे विद्यार्थी सुरवातीपासूनचे फॅन होतो. गेटवे ऑफ इंडियाचे तीन 'डोम' आम्ही 'बेटर फोटोग्राफी'मध्ये त्यांच्याविषयीच्या आर्टिकलमध्ये पहिल्यांदा पाहिले. आणि अशीही काही फोटोग्राफी करता येऊ शकते, हे आम्हाला त्यावेळी पहिल्यांदा समजलं. बोधेंविषयी एक आदराचं स्थान हृदयात कायमचं निर्माण झालं.

आमची तीच अवस्था गौतम राजाध्यक्ष यांच्या बाबतीत सुद्धा झालेली असायची. वेगवेगळ्या ग्लॅमर मॅगेझिनमध्ये त्यांनी काढलेली छायाचित्र नुसती पाहात राहावीत, असं वाटायचं. यात त्या चेहऱ्याचा किती वाटा आणि छायाचित्रकाराचा किती, हे त्यावेळी समजत नव्हतं. आणि आज समजतंय की या दोन्ही गोष्टी परस्परांहून वेगळ्या जरी करता आल्या नाहीत, तरी सौंदर्य टिपणाऱ्या फोटोग्राफरच्या नजरेचं महत्त्वच अधिक आहे. गौतमजींनी नट-नट्यांची कितीतरी छायाचित्रं काढली, पण त्यात झळकणाऱ्या सौंदर्यावर त्यांनी कधीही अश्लीलतेची सावलीही पडू दिली नाही, हे त्यांच्या कॅमेऱ्यामागच्या नजरेचं मला जाणवलेलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य! गौतम राजाध्यक्षांची फोटो काढण्याची स्टाईल, त्यांचं लाइटिंग माझ्या एवढं परिचयाचं झालं की, एखादा फोटो पाहिला की, वाटतं, 'अरे, हा डेफिनिटली गौतम राजाध्यक्ष टच!' केसरी पाटील यांच्या 'प्रवास...एका प्रवासाचा...' या चरित्रात्मक पुस्तकाच्या कव्हरवर केसरी पाटलांचा फोटो पाहिला की जाणवतं, 'येस, इट्स गौतम!'

सन 2001मध्ये गौतम राजाध्यक्षांनी कोल्हापूरमध्ये 'चेहरे' या त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यावेळी आमचे पत्रकारितेतील उमेदवारीचे दिवस होते आणि मी 'निपाणी-दर्शन' हे स्थानिक केबल न्यूज चॅनल चालवायचो. त्यावर कोल्हापूरपासून बेळगावपर्यंतच्या आणि चिकोडीपासून ते गडहिंग्लज-गारगोटीपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या दाखवण्याचा माझा प्रयत्न असायचा. साहजिकच गौतम राजाध्यक्षांना भेटण्याची संधी मी दवडणार नव्हतो. मी कॅमेरा युनिटसह प्रदर्शनस्थळी पोहोचलो. गौतमजींनी नेहमीप्रमाणं एक सुंदरसा झब्बा आणि एका खांद्यावर व्यवस्थित घडी घातलेली शाल घेतली होती. त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचं ट्रेडमार्क स्माईल, जे कधीही त्यांच्या चेहऱ्यावरुन ढळलेलं दिसलं नाही. मी आधी प्रदर्शनाचं मिळेल तेवढं फुटेज कॅमेरामनला घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर गौतमजींचा इंटरव्ह्यू घेतला. 'चेहरे'पासून ते त्यांचं करिअर आणि एकूणच करिअरग्राफ असं या इंटरव्ह्यूचं स्वरुप होतं. त्यांना त्यावेळी मी त्यांच्या फोटोग्राफीतल्या यशाचं रहस्य काय, असा सरधोपट आणि बाळबोध प्रश्न विचारला होता. त्यांनी मात्र तसं न समजता मला दिलेलं उत्तर आजही जसंच्या तसं मला लक्षात आहे. गौतमजी म्हणाले होते,

'मी कधीही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फोटो काढत नाही. तर मला त्याचं व्यक्तिमत्त्व माझ्या छायाचित्राच्या माध्यमातून रेखाटायचं असतं. त्यामुळं माझ्याकडं कोणी फोटो काढायला आला तर मी 'बसवा समोर आणि काढा फोटो', असं कधीही करत नाही. त्या व्यक्तीशी संवाद साधत साधत त्याचे मूड्स टिपणं मला अधिक आवडतं आणि साहजिकच माझ्याबरोबरच माझ्या फोटोंमधूनही त्याचं व्यक्तिमत्त्व उलगडतं, हेच माझ्या यशाचं रहस्य!'

गौतमजींचं आज अकाली निधन झाल्यामुळं त्यांच्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबईत एक-दोन कार्यक्रमांत त्यांची भेट झाली, मात्र बोलणं काहीच झालं नव्हतं. पण त्यांनी सांगितलेलं त्यांच्या यशाचं रहस्य समजून सुद्धा पुन्हा दुसरा गौतम राजाध्यक्ष होऊ शकणार नाही, अशी फार मोठी पोकळी जाणवतेय. शेवटी गौतमजींचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण सांगण्यासाठी मला 'चायना गेट'मधल्या मुकेश तिवारीच्या डॉयलॉगचा आधार घ्यावासा वाटतोय. तो म्हणाला होता, 'हमसे भिडने की हिम्मत तो जुटा लोगे, लेकिन वो कमीनापन कहाँ से लाओगे?' हाच डायलॉग बदलून गौतमजींच्या बाबतीत म्हणावंसं वाटतंय की,

'गौतम राजाध्यक्ष बनने की कोशिश तो जरुर करोगे, लेकिन वो 'नजर' कहाँ से लाओगे?'
हॅट्स ऑफ टू यू गौतम जी! वुई विल मिस यू फॉरेव्हर!!!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

संत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा!

'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट 2011) सायंकाळी 6 वाजता नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.ब. देगळूरकर असतील तर श्री. अरुण खोरे आणि श्री. वा.ल. मंजूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या या गाथेमध्ये संत चोखामेळा यांच्या नव्याने उपलब्ध झालेल्या नऊ अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे, हे या पुस्तकाचे अत्यंत महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे.
अभंगगाथेचे संपादक प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना याठिकाणी देत आहे.

चोखोबांनी मराठी सारस्वताला दिलेली देणगी ही अतुलनीय व अलौकिक स्वरूपाची आहे. चोखोबांनी आपल्या हयातीत अभंगाव्यतिरिक्त इतरही रचना केल्याचे आज तरी स्पष्ट खुलासा होत नाही. आज त्यांचे केवळ 349 + 9 एवढे अभंग वाचकांना उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखकाने चोखोबांचे नव्याने उपलब्ध झालेले 9 अभंग या गाथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही ग्रंथालयांतील जुनी बाडे तपासली तर आणखी काही अभंग हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
अनेक संदर्भ ग्रंथांचा आढावा घेता, चोखोबांनी 'विवेकदीप' नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा वारंवार उल्लेख येतो, परंतु आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो काही दृष्टीस पडलेला नाही. तो ग्रंथ जर उपलब्ध झाला तर चोखोबांच्या साहित्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. चोखोबांच्या साहित्य निर्मितीसंबंधी आज अनेक प्रश्न निर्माण होतात. चोखोबांना मुळात लिहिता-वाचता येत होते का? एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत? ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील? सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता चोखोबांना यातिहीन म्हणून सतत दूर ढकलत असताना समाजाच्या अंतरंगाचे दर्शन आपल्या अभंगवाणीतून ते कसे करू शकले?

एवढया प्रतिकूल परिस्थितीत देखील कसदार व अमरत्व प्राप्त झालेले साहित्य चोखोबांनी कसे निर्माण केले, हाही एक मोठा प्रश्नच आहे. सातशे वर्षांपासूनचे जे साहित्य आजही अमर अशा स्वरूपात आहे ते साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकाकडे-चोखोबांकडे-अगाध व अफाट प्रतिभाशक्ती होती हे निर्विवाद. त्या व्यतिरिक्त त्यांचे चिंतन व मनन हे अधिक महत्त्वाचे वाटते. समाजातील उच्च स्तरातील लोकांच्या बोलण्यातील व वागण्यातील विसंगती त्यांना सतत सलत असावी. तेच त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय होते. चोखोबांच्या ज्ञानेंद्रियाची बाजू अधिक सशक्त होती, असे वाटते. कारण त्यांच्या अभंगांचे विश्लेषण करतेवेळी याचे दर्शन प्रकर्षाने झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानार्जनासाठी चोखोबांनी ज्ञानदेव व नामदेव आदी संतांच्या सोबतीने पुष्कळसे देशाटन व तीर्थाटन केले. त्यामुळे अनेक संतांचा व सज्जनांचा सहवास त्यांना लाभला. चोखोबांची श्रवणशक्ती देखील मोठी होती, असे वाटते. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते हे गृहीत धरून पुढे लिहावयाचे झाले, तर समकालीन संतांच्या रचना एकांतात वाचण्यासाठी चोखोबांना त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. ज्यावेळी स्वत: त्या संतांच्या वा इतरांच्या मुखातून बाहेर पडेल त्याच वेळी त्याचा अर्थ व मर्म चोखोबांच्या काळजाला जाऊन भिडत असे आणि अगाध अशा स्वरूपातील श्रवण शक्तीच्या आधारेच त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.
चोखोबांना आपल्या साहित्य निर्मितीत संतांचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तत्कालीन वर्णाश्रम पध्दतीत समाजातील कर्मठांनी चोखोबांना जरी दूर लोटले असले तरी संतांनी मात्र त्यांना जवळ केले होते. त्यामुळे आपल्या निष्ठापूर्व भक्तीने संत मेळयात त्यांनी फार मोठे स्थान प्राप्त करून घेतले होते.
ज्ञानदेव व नामदेवांच्या अभंग रचनेच्या संख्येच्या मानाने आज उपलब्ध असलेल्या चोखोबांच्या अभंगांची संख्या अगदीच मर्यादित आहे. चोखोबांनी आपली अभंग रचना करण्यास कधी सुरुवात केली आणि किती काळ हे व्रत चालू होते, याचाही अंदाज लागत नाही. त्यांनी दीर्घकाळ अभंग रचना केली असावी असे गृहीत धरले तर आज उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक अभंगरचना त्यांनी केली असावी असे वाटते; परंतु आज उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या पाहता व त्यांच्या व्यासंगाचा आढावा घेता आजची त्यांच्या अभंगांची संख्या अपुरी आहे, असे वाटते. एका वाचनात हे सर्व अभंग नजरेखालून घातले तर अभंगरचना खंडित झाल्याची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही.
चोखोबांच्या अभंगांचा दर्जा संतश्रेष्ठाचा आहे. नैसर्गिकपणा, सहजसुंदरता, सामाजिक आशय, बांधीव रचना, इत्यादी साहित्यिक गुणांनी चोखोबांच्या अभंगांना मराठी सारस्वतात मानाचे स्थान आहे. चोखोबांची वाणी चोख होती. 'वाणी नाही शुद्ध धड न ये वचन' असे त्यांचे मत होते. यावरून असे दिसते की, त्यांना आत्मप्रौढीचा तिटकारा होता. आपला विचार, सिध्दांत आणि अभंगांबाबत त्यांना पराकोटीचा आदर होता.
चोखोबांच्या अभंगात भक्तीविषयक व पारमार्थिकविषयक आशय तर आहेच, परंतु त्यांच्या मनातील दु:ख व्यक्त करणारे अभंगही आहेत. याही पुढे जाऊन द्वैत-अद्वैत, गीता यातील अनेक तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अत्यंत समर्थपणे आपल्या अभंगातून मांडल्या आहेत. भगवंताच्या रूपाचे, त्याच्या भक्ती, त्याच्या सामर्थ्याचे, करुणा स्वभावाचे गुणगान करण्यासाठी चोखोबांनी जशी अनेक अभंगांची निर्मिती केली, तसेच गुरुपरंपरेतील ज्ञानेश्वर व नामदेवांचे वर्णन करण्यासाठी देखील अनेक अभंग खर्ची टाकले आहेत.
माणसाचा व पर्यायाने समाजाचा विकास काही प्रमाणात त्याच्या आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असतो, परंतु त्या विकासाच्या परिपूर्णतेला नैतिक व आध्यात्मिकतेचीही जोड द्यावी लागते. तेव्हा संतसाहित्य हे टाळकुटे साहित्य नसून त्याचा गाभा उलगडून पाहिला तर सुखी व सुसंस्कृत जीवनासाठीचे अनेक मौलिक विचार व मार्ग त्यात सापडतात. या संदर्भात कदम यांनी दिलेला दृष्टांत मला मनापासून आवडतो. ते म्हणतात, एके ठिकाणी आग लागली असता त्याकडे धावून गर्दी करणारे लोक आग विझविण्यासाठी काहीच करू शकत नाहीत, परंतु आग विझवण्यासाठी पाण्याच्या साठयाकडे धावणारेच अखेर ती आग विझवू शकतात. हे जसे खरे आहे त्याप्रमाणे संतांच्या कार्याचे व संतसाहित्याचे महत्त्व आहे. प्रथमदर्शनी टाळकुटे वाटत असले तरी अखेर जीवनाचे खरे मर्म त्यातच आहे.
ज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी समाजात आध्यात्मिक लोकशाही रुजविण्यासाठी जे शतकोटी प्रयत्न केले त्यातील मूर्तिंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होय. प्रस्तुत समाजाने हीन मानलेल्या चोखोबांना नामदेवांनी गुरूपदेश दिले. आपल्या प्रभावळीतील संतमंडळीत चोखोबांना संतश्रेष्ठत्वाचे स्थान देऊन, त्यांच्या हीन कुळाचा कलंक धुऊन त्यांच्या अभंगवाणीचे मुक्त कंठाने गुणगान करून आध्यात्मिक लोकशाहीची पताका त्यांनी चोखोबांच्या खांद्यावर ठेवली.

ज्ञानेश्वरांच्या समकालीन अभंग रचनाकार आपले अभंग रचावयाचेच म्हणून एकांतात बसून स्वत: लेखन करण्याची पध्दती नव्हती. विठ्ठलभक्तीच्या धुंदीत न्हाऊन निघालेले हे संत भजन-कीर्तनातच आपले विचार अभंगांच्या माध्यमातून मांडत असत. कालांतराने त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी व लेखनिकांनी ते अभंग (साहित्य) उतरून घेतलेले असे. चोखोबांच्या बाबतीत देखील हेच घडले आहे. त्या काळी बिंदाुधवाचार्य नावाचे मूळचे कन्नड भाषिक सद्गृहस्थ मंगळवेढा किंवा पंढरपूरच्या दरम्यान रहात होते. त्यांचा मुलगा अनंतभट्ट यांनी चोखोबांच्या साहित्याचे (अभंगांचे) लेखन केल्याचा जनाबाईच्या एका अभंगात उल्लेख आढळतो.
चोखोबांच्या मरणोत्तर 700-750 वर्षांनंतर देखील त्यांचे (358 च्या आसपास) अभंग आज ग्रंथरूपाने शिल्लक आहेत, हे मराठी वाचकांचे मोठे भाग्य समजावे. एवढया प्रदीर्घ काळात त्यांच्या सर्व अभंगांचे वारंवार लेखन झाले नसावे. ज्ञानदेवाच्या, नामदेवाच्या, तुकारामाच्या एकत्र साहित्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु चोखोबांच्या अभंग रचनेच्या संदर्भात असे घडले नसावे, असे वाटते. म्हणून काळाच्या ओघात काही अभंग नष्ट देखील झाले असावेत. अनेक वेळा अभंग उतरून घेत असताना त्यात बदल देखील झाले असतील. (मला मिळालेल्या एका हस्तलिखितात-चोखामेळा हे नाव चोखामेला असे लिहिले आहे.) याच प्रक्रियेत काही अभंग नष्टही झाले असतील, तर काही भाष्यकारामुळे अधिक सुस्पष्टही झाले असतील.
चोखोबांचे अभंग उतरून घेणारे अनंतभट्ट यांच्या निष्ठेविषयी थोडी शंका घेतली जाते, ती म्हणजे चोखोबांना नेमके काय सांगावयाचे होते तेच अनंतभट्टांनी उतरून घेतले कशावरून? त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून? वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते! या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का? इतक्या शतकांनंतर देखील चोखोबांचे अभंग अमर झाले त्यात अनंतभट्टांचे देखील योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.
प्रत्येक महापुरुषाने आपापल्या काळात महान काम केले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष झाले. त्यांच्या काळात जी आव्हाने होती, त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे ते गेले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष ठरले. काही वेळा या महापुरुषांना, त्यांच्या कार्याला सध्याच्या काळात जोखले जाते व काही प्रमाणात प्रतिकूल मतही व्यक्त केले जाते, परंतु असे होऊ नये. कारण काळाच्या ओघात जशी परिस्थिती पलटते तसे समाजासमोरील आव्हाने देखील बदलतात. चोखोबांच्या बाबतीत असेच काहीसे झाल्यासारखे वाटते. चोखोबांच्या काळी आव्हान होते ते समाजातील उच्च-नीचतेचे, सामान्य जातीतील लोकांना उच्च कुळाचे समजणाऱ्यांकडून होणाऱ्या अमानुष छळाचे आणि मुख्य प्रश्न होता तो कमालीच्या दारिद्रयाचा. या सर्व प्रश्नांविषयी चोखोबांनी समर्थपणे जाब विचारून पाटला (आजच्या भाषेत सरकार) समोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. प्रसंगी विरोधही केला आहे, परंतु हे सर्व त्या काळातील रूढ परिस्थितीला धरून होते हे महत्त्वाचे. चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांचे हे कृत्य सातशे वर्षांनंतरच्या आजच्या कसोटीवर मोजले तर कदाचित ते अन्यायाचे ठरेल. नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई यासारख्या बहुजन समाजातील या संतांच्या समर्थ फळीत आपल्या कुटुंबासहित सामील होणे व अन्यायाविरुध्द लढा देणे ही चोखोबांची त्या काळातील अनन्यसाधारण कामगिरी होती, एवढेच म्हणावे लागेल.
देव बाटविला म्हणून चोखोबांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची स्वत: चोखोबा आपल्या अभंगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. सोयरा व कर्मेळा यांनी देखील या संदर्भात केवळ खंतच व्यक्त केली नाही, तर भगवंतांना सणसणीत जाबही विचारला आहे. त्या काळातील सामाजिक स्थितीचे हे कुटुंब बळी होते, असेच म्हणावे लागेल. चोखोबा हीन यातीतील म्हणून तर छळ होत होताच, परंतु त्यांची विठ्ठलासोबत असलेली प्रेमपूर्ण मैत्री, अफाट प्रे व भक्ती ह्यामुळे छळाची तीव्रता अधिक होती. याचे दाखले आपणास अनेकांच्या अभंगातून अनेक वेळा मिळतात. विठ्ठल स्वत: चोखोबांच्या झोपडीत जाऊन दहिभात खाऊन आला. त्यावेळी चोख्याने देव बाटविला म्हणून मारले. एकदा तर मध्यरात्री विठ्ठलाने आपल्या दर्शनासाठी चोखोबांना आपल्या गाभाऱ्यात बोलाविले आणि आपल्या गळयातला कंठा दिला. त्यावेळी कंठा चोरल्याच्या आरोपावरून चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपून छळले. असे अनेक प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात चोखोबांची काहीच चूक नव्हती. चूक होती ती फक्त विठ्ठलाच्या लेखी चोखोबांचे असलेले महत्त्व. हेच छळामागील मुख्य कारण असले पाहिजे.
आपल्या ज्ञानाचे सामर्थ्य सिध्द करीत चोखोबा संतमंडळीत वावरू लागले. हळूहळू मानाचे स्थान मिळवू लागले. याचीही पोटदुखी काही प्रस्थापित लोकांची वाढली असावी. ज्या ज्या वेळी या समूहाच्या संतापाचा उद्रेक झाला त्या त्या वेळी काही ना काही कारणे पुढे करून चोखोबांचा छळ (मनगटातील दंडुकेशाहीच्या आधारे) केला. प्रस्थापितांच्या विरुध्द बंड केल्याने अशीच वागणूक अनेकांना मिळाल्याचे दाखले या समाजात रग्गड सापडतात. प्रस्थापितांच्या विरोधात भागवत धर्माची पताका तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी फडकाविली आणि या झेंडयाखाली बंडाच्या भूमिकेत अनेक संत येऊन दाखल झाले. त्यात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई आदी अनेक संत होते, परंतु चोखोबा देखील या बंडाच्या निशाणाखाली सरसावले होते, हे विशेष. कारण एक तर समाजाने मानलेल्या उच्च कुळात चोखोबांचा जन्म झाला नव्हता. कोणतीच शैक्षणिक वा आध्यात्मिक परंपरा चोखोबांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होती ती प्रस्थापितांचे प्रस्थ मोडून काढण्याची अदम्य इच्छा. त्यांच्या या सुप्त इच्छेला ज्ञानदेव व नामदेवांनी खतपाणी घातले, हे कौतुकाचे आहे. त्यांचा सहवास, प्रेरणा व आपुलकी निश्चितच चोखोबांना लाभली. आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चोखोबा धाडसाने व जिद्दीने सामील झाले होते. हीन जातीत जन्मलेल्या चोखोबांना त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन भागवत धर्माच्या छताखाली आणण्याचे जे धाडस ज्ञानदेव, नामदेवांनी केले तितकेच धाडस समाजाचा कडवा विरोध पत्करून, माणुसकीला काळिमा लावणारे छळ सोसून देखील या संतांच्या कार्यात मनोभावे सामील झाले, हे चोखोबांचे सर्वात मोठे धाडसच होते. भागवत धर्माचा मोह चोखोबांना या कारणासाठी झाला असावा की त्यात समतेची शिकवण आहे. भगवंतापुढे उच्चनीच असा कोणताच भेदभाव नाही.
चोखोबांचे व्यक्तिमत्त्व हे अलौकिक स्वरूपाचे होते. प्रस्थापित समाजाने त्यांना कितीही छळले तरी उच्चवर्णीय समाजाविषयी त्यांच्या मनात कोठेही तिटकारा नव्हता. सूडाची भावना नव्हती. तशा प्रकारचा विचारही त्यांच्या वाणीतून कोठेही डोकावत नाही. क्षमा हा देवांच्या नंतर संतांचाही स्थायिभाव आहे. तेव्हा चोखोबा केवळ संत नव्हे, तर संतश्रेष्ठ होते. म्हणूनच क्षमा ही भावना त्यांच्या नसानसात संचारत असली पाहिजे. त्यांच्या या उदार अंत:करणाच्या हृदयातून उमललेली ही अभंगवाणी इतक्या वर्षांनंतर देखील आजही टवटवीत वाटते.
संतश्रेष्ठ यांना शोभेल अशी अविचल व शांत वृत्ती चोखोबांची होती. त्यामुळे समाजातील काही
वर्गाकडून होणाऱ्या छळाला अत्यंत शांत चित्ताने व सहनशीलतेने सामोरे गेल्यामुळे समकालीन संतांच्या लेखी चोखोबा उच्चपदस्थ झाले होते. त्यांच्याविषयीचा आदर हा वाढत होता. चोखोबांच्या चरित्रात असे दिसते की लोकांनी त्यांना ज्या ज्या वेळी छळण्याचा प्रकार केला त्या त्या वेळी चोखोबा सहिसलामत सुटले व त्यांनी छळणाऱ्यांनाच तोंडावर आणले. तेव्हा जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणते की, चोखोबांनी देवालाच ऋणी करून घेतले.
चोखामेळे संत भला। तेणे देव भुलविला॥
भक्ती आहे ज्याची मोठी। त्याला पावतो संकटी॥
चोख्यामेळ्याची करणी। त्याने देव केला ऋणी॥

असेच उद्गार सोयराबाईचे देखील आहेत.
पंढरिचे ब्राह्मणें चोख्याशी छळिलें। तयालागीं केलें नवल देवें॥
सकळ समुदाव चोखियाचे घरीं।ऋद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती॥

परंतु चोखोबांची ही क्षमाशीलता काहींना पळपुटेपणाची वाटत असावी. त्या अन्यायाविरुध्द बंड पुकारण्यासच हवे होते, असेही मत व्यक्त केले जाते; परंतु चोखोबांना समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो की काय, असे वाटते. कारण बारकाईने चोखोबांचे एक एक अभंग वाचून काढले तर अन्यायाविरुध्द त्यांची संस्कारित प्रतिक्रिया कोणत्याही बंडखोरी वृत्तीला मागे टाकणारी आहे. क्षमागुणातून कोणत्याही बलाढय ताकदीला सहज जिंकता येते ह्या समजुतीचीच चोखोबांची बंडखोरीची वृत्ती होती.
कै. शंकरराव खरात यांच्या एका पुस्तकाचे नाव 'चोखोबांचा विद्रोह' असे आहे. यातील चोखोबांची बंडखोरी आणि चोखोबांचा धर्मशास्त्राशी विद्रोह ही दोन प्रकरणे महत्त्वाची वाटतात. 'संत चोखामेळा आणि मी' या दलित नाटककार भि. शि. शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथात चोखोबांचा विद्रोह कालसापेक्ष दृष्टिकोनातून जाणून घ्यायला हवा, त्यावेळचे त्यांचे कार्य आजच्या काळाच्या निकषावर तपासायला नको, असे म्हटले आहे.
''आधुनिक काळात क्रांती शब्दाचा अर्थ इतका कडवा बनला आहे आणि त्यात हर्षविषादांची एवढी कडवट खेचाखेच असावी लागते की, महाराष्ट्रीय संतांनी तेव्हाच्या समाजात परमार्थ पीठावरून ही एक क्रांती केली असे म्हटले, तर केवळ आधुनिक पध्दतीने विचार करणाऱ्यांना ते खरे वाटत नाही आणि विशेष म्हणजे त्यात काही गोडी वाटत नाही. आपल्या उच्च शिक्षणात ऐतिहासिक रसिकता या नावाचा विषय स्वतंत्रपणे शिकवावयास हवा असे वाटते. आपल्याला आपल्या काळाच्या संबंधाने जेवढी रसिकता दाखविता येते, तेवढी ऐतिहासिक काळासंबंधाने दाखविता येत नाही, ही मोठी दु:खाची गोष्ट आहे.''
चोखोबा, सोयराबाई आणि कर्मेळा यांच्या अभंग वाड्.मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ''इतक्या पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱ्यांनी सुध्दा अस्पृश्यतेविरुध्द केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते असे समजणे अगदी साफ चूक आहे. या संतांच्या मनाचे हे दुखणे अगदी स्पष्टपणे सामाजिक होते; आणि त्यामुळे भक्तिरसात डुंबत असताना सुध्दा त्यांच्या मनाचे समाधान समूळ नष्ट झालेले होते. कर्ममेळयाने केलेली तक्रार तर उघड उघड सामाजिक आहे; आणि त्याने दाखविलेल्या तुसडेपणाच्या भावनेला सामाजिक धार उत्पन्न झालेली आहे. देवापुढे वागत असतानासुध्दा तुझा मला काय उपयोग आहे, असे तो बिनमुर्वतीने म्हणतो. सध्याच्या काळातील त्या समाजातील सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. आंबेडकर हे राष्ट्राच्या संगतीत नांदत असतानाच आणि हिंदू धर्माच्या पोटीच जन्माला आलेले असताना तुमचा आम्हाला काय उपयोग आहे? असे त्वेषाने विचारीत असत. विचारण्याची भूमिका बदललेली आहे इतकेच, परंतु सामाजिक दु:ख आणि सामाजिक त्वेष तोच आहे. याचा अर्थ असा की, कर्ममेळा आणि आंबेडकर यांच्या भावना एकमेकाशी सुसंगत आहेत. आज जी तक्रार अस्पृश्य लोक करीत आहेत तीच सामाजिक तक्रार सातशे वर्षांपूर्वीचे महार पुढारी करीत होते, हे अनंतभट्टाने लिहून ठेवलेल्या वाड़्.मयावरून स्पष्ट दिसते. हे वेड त्यांच्या डोक्यात कोणी आधुनिकांनी शिरकविलेले नाही.''
''चोखामेळयाने सात्त्विक संतापाने विचारलेले प्रश्न त्यांच्यानंतरच्या पिढीतल्या कर्ममेळयाने उघड उघड मराठी समाजाला आव्हान देऊन अधिक स्पष्ट केले. ह्या सर्वच कुटुंबीयांनी शोषित वर्गाची नवी आविष्कारशैली मराठी कवितेच्या सुरुवातीलाच अमोघ करून ठेवली. प्रत्यक्ष विठ्ठलाला लाज वाटेल असे प्रश्न विचारून ठेवले. त्यामुळे चोखामेळयाच्या कुटुंबीयांचे मराठी परंपरेत अढळ स्थान आहे. कारण ह्या सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे इशारे देऊन ठेवले. 'पंचहि भूतांचा एकचि विटाळ' म्हणून घटापटाची चर्चा करणाऱ्यांची तोंडे बंद करून टाकली. ह्या सर्व विद्रोही गोष्टी त्यांनी साहित्यिक चर्चा म्हणून केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष स्वत:च्या जगण्यातून विकसित केल्या आणि मग कवितेत मांडल्या.''
जातीभेद, वर्णभेद समूळ खणून काढण्यासाठी संतांनी शतकोटीचे प्रयत्न केले. ज्ञानोबा, नामदेवापासून ते तुकारामापर्यंत अगदी अलीकडच्या काळात गाडगेबुवा, महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देखील पराकोटीचे प्रयत्न केले. तरीही हा रोग बरा होताना दिसत नाही. उलट आजच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार करता नव्या रूपात जातीभेदाची आवश्यकता आहे की काय, असे वाटू लागले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चोखामेळा यांच्याविषयी अत्यंत आदराचे उद्गार काढले आहेत. त्यांनी आपले The untouchables नावाचे इंग्रजीतील एक पुस्तक चोखामेळा, नंदनार व रविदास यांना अर्पण करून त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त केला आहे. त्यात ते लिहितात- ''चोखामेळा, नंदनार व रविदास हे अस्पृश्य समाजात जन्मले. आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संतांच्या स्मृतीस अर्पण.'' 1936 साली, हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत भाषण करताना आंबेडकर श्रोत्यांना म्हणाले - If someone asks you - what your caste is, you say that you are a Chokhamela or Harijan; but you do not say you are a Mahar.
मराठीत असे म्हणता येईल की, तुम्हाला कोणी तुची जात विचारली तर महार म्हणून सांगू नका तर चोखामेळा किंवा हरिजन म्हणून सांगा; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आणि भागवत धर्म, हिंदू धर्मात विश्वास ठेवून असणाऱ्या चोखोबांना अनुयायांचा मोठा वर्ग मिळाला नाही. म्हणून चोखोबा जिवंत असताना त्यावेळच्या समाजाने त्यांना उपेक्षिले आणि आज मेहुणपुरा येथील त्यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पंढरपुरातील वास्तव्याचे त्यांचे एकमेव निशाण ती उद्ध्वस्त झालेली दीपमाळा, मंगळवेढा व पंढरपुरातील त्यांच्या समाध्या पाहिल्या तर दुर्लक्षितच आहेत हे निश्चित. ही खंत व्यक्त करीत असताना भालचंद्र नोडे म्हणतात, ''बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्यांची वारकऱ्यांना पर्वा नाही आणि भरभराटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठलभक्त चोख्याला प्रतिगामी ठरविले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतांनाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते, परंतु केवळ स्वत:च्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो, हाही एक नवा वारसा ह्यापुढील साहित्यप्रेमिकांना सांभाळावा लागेल. चोखामेळा सतत स्फूर्तिदायक वाटत राहील, असे वाटते.''
- प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (मोबाइल क्र. 9960125015)