शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

निखळ-१: ‘अनित्य’नेम..!

(मित्र-मैत्रिणींनो, माझ्या ब्लॉग-लेखनाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांशी अनियमितपणे का असेना, पण संपर्कात राहात असतो. आता श्री. संजय आवटे सरांच्या प्रेमळ आग्रहामुळं 'दै. कृषीवल'मध्ये माझं 'निखळ' हे पाक्षिक सदर दि. २८ जानेवारी २०१३पासून सुरू झालंय. या मालिकेचा पहिला प्रस्तावनापर भाग आपल्या अवलोकनार्थ सादर करीत आहे. नेहमीप्रमाणंच आपल्या प्रेमळ सूचनांचं स्वागत आहेच!- आलोक जत्राटकर)

 
कृषीवलच्या तमाम वाचकांना माझा मनापासून नमस्कार! यापूर्वी आपण काही लेखांच्या माध्यमातून अधूनमधून भेटलो, पण त्यात सातत्य नव्हतं. आता संजय आवटे सरांच्या स्नेहपूर्ण आग्रहामुळं आजपासून आपल्या पाक्षिक संवादाला सुरवात होतेय. माझं कसंय की, मी लिहितो पण मला वाटेल तेव्हा, आणि- त्या क्षणी वाटेल त्या विषयावर! लिखाणासाठी एखादा झटका यावा लागतो, आणि त्यातून जे कागदावर (आता कम्प्युटर स्क्रीनवर!) उतरतं, ते मनापासून आलेलं असतं. बऱ्याचदा ते मग एखाद्या विषयावरच्या प्रतिक्रियात्मक स्वरुपाचं असतं. माझ्या या (झटक्याच्या!) सवयीमुळं नित्यनेमानं लिहिणं फारसं जमेल, असा विश्वास अजिबात नव्हता. त्यामुळं ते मी (अनियमितपणे) माझ्या ब्लॉगवर लिहून मित्र-मैत्रिणींशी शेअर करत असतो. त्यांची मत आजमावतो, चर्चा करतो. पण मी सातत्यानं लिहू शकेन किंबहुना, लिहावं, यासाठी आवटे सरांचं प्रेम आणि आग्रह कारणीभूत आहे, हे मला प्रांजळपणानं नमूद करावंसं वाटतं.

आपल्या आयुष्यात काही व्यक्तींचं, मित्रांचं स्थान असं काही वेगळं असतं की, त्या रिलेशनशीपला काय म्हणावं, हेच समजत नाही. आवटे सरांचं आणि माझंही तसंच आहे. माझं पत्रकारितेतलं पीजी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरं तर ते माझे पहिले एम्प्लॉयर! पण पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या क्षणापासून आजतागायत आम्ही दोघं एकमेकांशी वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये सातत्यानं संपर्कात आहोत. फ्रेंड-गाईड-फिलॉसॉफर असं एक वेगळंच बाँडिंग आम्हा दोघांत आहे. त्यामुळं त्यांच्या सांगण्याला माझ्या आयुष्यात वेगळं स्थान आहे. एखाद्या क्षणी त्यांना वाटलं तर ते मला सांगू शकतात की, आता थांब, म्हणून! मग त्यावर मी सुद्धा त्यांना प्रेमानं सांगेन, मी लिहीणारचम्हणून! जोक्स अपार्ट! पण आम्हा दोघांच्या वाटा, जशा सातत्यानं एकमेकांशी कधी समांतर तर कधी छेद देत धावत होत्या, तसंच आपणा सर्वांच्याच आयुष्यात होत असतं, असं मला वाटतं. मानवी डीएनएची संरचना जशी गोलाकार शिडीसारखी असते, त्यात काही घटक समांतर असतात तर काही शिडीच्या पायऱ्यांनी सांधलेले, तसंच आपणा सर्वांचं आहे. आपली रिलेशनशीप ही या डीएनएच्या संरचनेप्रमाणं जशी मूलभूत आहे, तशीच युनिव्हर्सलही! या विश्वातला प्रत्येक घटक एकमेकांशी संबंधित आहे, त्यांचं वर्तन एकमेकांवर प्रभाव टाकत असतं आणि एकूणातच आपणा सर्वांचं वर्तन हे या विश्वाच्या एकूण पसाऱ्यावर प्रभाव टाकत असतं, त्याच्या नियंत्रित किंवा अनियंत्रित वर्तणुकीला कारणीभूत ठरत असतं. त्यामुळंच इथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही एक अर्थ आहे. आपला संवादही त्याचाच एक भाग आहे. तो अधिकाधिक अर्थपूर्ण होत राहील, अशी अपेक्षा मी या क्षणी बाळगून आहे, तसा माझा प्रयत्न राहील.

सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणं, विषयाचं बंधन असं काही माझ्यावर नाहीय. पण, तरीही मानवी नातेसंबंध, त्यांचं वर्तन-परिवर्तन, भावनिक गुंतवणूक आणि गुंतागुंत हा माझ्या चिंतनाचा विषय; तर भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर शिंदे यांचे विचार हा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय! त्यामुळं आपल्या संवादामध्ये या विषयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग असेल. जीवनाकडं पाहण्याचा माझा दृष्टीकोनही बराचसा सकारात्मक आहे. पण ते अगदीच जगणं सुंदर आहे, टाइपचंही नाही. कारण एकवेळच्या दोन घासांची ज्या पोटाला भ्रांत आहे, कडक तापलेल्या उन्हात ज्याला पहारीनं दगड फोडल्याखेरीज ते दोन घास मिळत नाहीत, अशा माणसाचं जगणं सुंदर आहे, असं कसं म्हणता येईल? पण त्याचं जगणं आपण सुंदर बनवू शकतो, त्याच्या आयुष्यातही आनंदाचा झरा निर्माण करता येऊ शकतो, त्याला दिलासादायक असं काही आपण करू शकतो, असा विश्वास माझ्या मनात नेहमीच असतो. अशा माणसाचं जगणं, हाच मग माझ्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होऊन जातो. त्या तळमळीतून काही लिहिलं जातं.

सध्याची आपल्या देशातली सामाजिक परिस्थितीही विचित्र आणि चिंताजनक वळणावर आहे. माणसाचं समंजसपण कुणाच्या तरी स्वार्थाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येकजणाचा काही छुपा तर काही थेट अजेंडा राबविला जातो आहे. यातून माणूसपणाच्या भिंती, ज्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात उभारण्याचं काम सुरू झालं, त्यांना भगदाडं पाडण्याचे उद्योग नव्या जोमानं आणि वेगानं सुरू आहेत. त्यामुळं माणसा-माणसामध्ये जातीपातीच्या भिंती मात्र अधिक भक्कम करण्याचं कामही दुसरीकडं सुरू आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली एकीकडं काहीही गोष्टी खपविल्या जात असताना, त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचं कामही सुरू आहे. या गोष्टीची खंतही सातत्यानं भेडसावत असते.

याखेरीज गेल्या बारा-पंधरा वर्षांत माझ्या पत्रकारिता आणि शासकीय नोकरीच्या काळात जे काही अनुभव आले, काही चांगले, काही वाईट! त्यातून बरंचसं काही चांगलं शिकता आलं, ते सुद्धा आपल्याशी शेअर करण्याचा मानस आहे. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय आहे? ते एक प्रकारचं शेअरिंगच आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत हे शेअरिंग सुरूच असतं, त्यातूनच नवनवे बंध निर्माण होत असतात आणि जगण्याला अर्थही प्राप्त होत असतो.

तर, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मला आपल्याशी शेअर करायच्यात. वाचकांना त्यातून काय मिळेल?, हे आताच नाही सांगता यायचं. पण माझा काही तरी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल. त्यात कधी माझ्यातला मी डोकावला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मानवी स्थायीभाव आहे तो! त्याला मी तरी अपवाद कसा? आम्ही पत्रकार ना, वाचकांना निर्बुद्ध ठरवून रिकामे होत असतो. आम्ही लिहू, छापू, त्यावर वाचक विश्वास ठेवतील, असा आमचा (गैर)समज असतो. पण, प्रत्यक्षात वाचक मुळात खूप सूज्ञ असतो. त्यामुळं माझ्या लिखाणातलं काय घ्यायचं, काय सोडायचं, याचा निर्णय आपण घेणारच आहात. फार त्रासदायक वाटू लागलो तर थांबवण्याचा अधिकारही आपलाच! पण तशी वेळ येणार नाही, असं मला (पुन्हा मी’! पाहा, सुरवात झालीच!) वाटतंय. सो, लेट्स स्टार्ट अवर क्वार्टरली शेअरिंग! कीप रिडिंग!!

२ टिप्पण्या:

  1. एक मित्र म्हणून सल्ला द्यावयासा वाटतो, निर्णय सर्वस्वी तुमचा आहे, भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर शिंदे या महान व्यक्तींच्या सोबत आपण ओशो रजनीशांचे तत्वज्ञान वाचले, तर निश्चितच आपल्या विचारांमध्ये व त्याद्वारे लेखणीमध्ये अधिक सखोलता, पुर्णता तसेच प्रगल्भता येईल, याचा मला विश्वास आहे. अनुभव घेण्यास काहीच हरकत नाही. .. .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Definitely Khillari ji. I have read Osho and whatever I read, on that basis I can say that Osho's thought line itself has been generated from that of Buddha, Jesus and Mohd. Paigambar. And Yes, from Bhagvadgeeta also. Anyway, thanks for suggestion. I'll again go through it.

      हटवा