गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

टू माय व्हॅलंटाईन...!(‘व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं सर्व जग प्रेमाच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघत असताना मी सुद्धा माझ्या बायकोला- दीपालीला आज एक सरप्राइझ द्यायचं ठरवलंय- हे पत्र लिहून! पत्र पर्सनल असलं तरी भावना युनिव्हर्सल आहेत. आणि लग्नाच्या आठ वर्षांनंतरही बायकोवरच्या प्रेमाची जाहीररित्या कबुली देण्यात गैर काय? त्यामुळं हे पत्र आपणा सर्व मित्र-मैत्रिणींशी शेअर करतोय. होप, यू ऑल ॲग्री विथ मी!- आलोक)

Photo Courtesy: Anup Jatratkar
डिअरेस्ट दीपा,
आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तुला काही लिहावं असं मुळीच मनात नव्हतं. पण प्रेमाचा इजहार काय असा थोडाच ठरवून करायचा असतो. अचानक मनात आलं आणि म्हटलं, या निमित्तानं आज पुरी दुनिया के सामने बता दूँ- हाँ, हमको मोहब्बत है- मोहब्बत है- मोहब्बत है।
बघ ना, तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या गोष्टीला बघता बघता यंदा आठ वर्षं पूर्ण होताहेत. या काळात स्विनी-सम्यक सारखी दोन माणकं ही आपल्या आयुष्यात आली आणि आपल्या संसाराचा चौरस परिपूर्ण झाला. खरंच, काळ किती झरझर जातोय. आणि या संपूर्ण काळात तू माझ्याबरोबर आणि माझ्यासाठी सातत्यानं झटत आली आहेस. माझ्या संसाराची एक बाजू तू मोठ्या परिश्रमानं लावून धरल्यामुळं आयुष्यात आजवर मी जे काही करत आलोय, ते करू शकलो, हे दोनशे टक्के सत्य आहे.
तुला माहितीये, लग्नासाठी मुली पाहणं हा मला आजही कसातरीच वाटणारा विषय आहे. (रस्त्यात दिसणाऱ्या सुंदर मुली पाहणं, हा अपवाद!) मुली म्हणजे काय मंडईतला भाजीपाला आहे. मंडईभर पाहात फिरायचं आणि पसंत पडेल ती भाजी घ्यायची? ज्या मुलीच्या प्रचंड प्रेमात होतो, तिचं लग्न झालं होतं, तिला एक मुलगी झाल्याचंही ऐकून होतो. जे वय प्रेमाचं होतं, ते लग्नाचं नव्हतं आणि लग्नाच्या वयात जिच्यावर प्रेम केलं, तिचं लग्न झालं होतं. त्यामुळं प्रेमविवाहाचा मुद्दा बाजूला पडून नोकरीवरच प्रेम करणं सुरू होतं. त्यामुळं अरेंज्ड मॅरेजला पर्याय नव्हता. बाबांनी जेव्हा मुली पाहण्यासाठी मला चलण्याचा आग्रह केला, तेव्हा मी नाहीच म्हणून बसलो होतो. पण अखेर त्यांच्या समाधानासाठी दोन मुली पाहिल्या. त्यातली तू दुसरी. मी त्यानंतर बाबांना म्हटलं, दोन्ही मुली चांगल्या आहेत. नाही तरी, त्यांच्या आईबाबांनी फुलाप्रमाणं जपलेल्या आणि वाढवलेल्या या मुलींना केवळ नाकारण्यासाठी नावं ठेवण्याचा मला काय अधिकार होता? मुलगी निवडण्याचे सर्वाधिकार मी बाबांच्या स्वाधीन केले आणि आपलं लग्न ठरलं.
तुला पाह्यला आलो, तेव्हा बाबांनी तुझी किती फिरकी घेतली. पुरणपोळ्या येतात का? चुलीवरची भाकरी कधी केलीयस का? आमचा मुलगा,  खाण्याचा शौकिन आहे, त्याला सगळा स्वयंपाक व्यवस्थित लागतो, वगैरे वगैरे! मला वाटतं, त्यावेळी तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मम्मींना (सासूबाई) आलं होतं. त्यांनी त्याचवेळी सांगितलं होतं की, कामावरुन यायला तुला खूप उशीर होतो, त्यामुळं संपूर्ण स्वयंपाक असा तिनं कधी केलेला नाहीय. पण दीपा, तू लग्न होऊन माझ्या घरी आलीस आणि त्या पहिल्या दिवसापासून तू स्वयंपाकघराची सूत्रं एखाद्या सराईताप्रमाणं ताब्यात घेतलीस आणि आय कॅन प्राऊडली टेल एव्हरीबडी दॅट- त्या दिवसापासून आजतागायत तुझ्या हातचा एकही पदार्थ बेचव झाला नाही. पुरणपोळी, भाकरीच काय अगदी बिर्याणी, चायनीज सुद्धा एकदम चवदार! हे सगळं तू माझ्यावरच्या प्रेमापोटीच केलंयस, याची जाणीव मला आहे. मुलांच्या तोंडात घास घातल्याखेरीज आजही तू अन्नाला शिवत नाहीस, या तुझ्या डेडिकेशनची आणि वात्सल्याची तर कमालच वाटते मला!
मी सकाळमध्ये असताना रात्री एक-दोन वाजता एमआयडीसी ऑफिसमधून निघताना तुला फोन करायचो आणि त्यावेळी मी येईपर्यंत अर्ध्या तासात गरमगरम स्वयंपाक करायचीस, तोपर्यंत केवळ माझ्यासाठी जेवायची थांबायचीस. तेव्हा आपल्या घरी टीव्हीही नव्हता. तू खिडकीत बसून वाट पाहायचीस- फक्त माझी! आणि जेव्हा मी तुला विचारलं की, आपण टीव्ही घेऊ या की कम्प्युटर तेव्हाही तू कम्प्युटरलाच प्राधान्य दिलंस. कारण मला असलेली कम्प्युटरची गरज तुला माहीत होती.
लग्नाआधी पगारच्या पगार मैत्रिणींवर खर्च करणारी तू, माझ्यासाठी काटकसरीचा आदर्श बनलीस. मुंबईत शासकीय नोकरीत असूनही डेप्युटेशनची ऑर्डर न निघाल्यामुळं माझा सहा-सात महिने पगार नव्हता. घरात छोटी मुलगी होती. पण या सहा महिन्याच्या कालावधीत तू ज्या काटकसरीनं घर चालवलंस, त्याला तोड नाही. घरचे खर्च होते तेवढेच होते, पण आरडी, एफडी मोडाव्या लागल्या तरी तुझ्यामुळं मित्रांकडची माझी उधारी मात्र कमी झाली. याचं श्रेय निव्वळ तुलाच आहे.
स्वतःची हौसमोज बाजूला ठेवून मुलांसाठी आणि माझ्यासाठी खरेदी करण्यात तुला आनंद वाटतो. माझ्या मनाला मात्र त्याची बोचणी लागते. कित्येकदा मनात येतं, तुला कुठं तरी बाहेर घेऊन जावं- म्हणजे डिनरला वगैरे! पण त्यावेळीही कान पिरगाळून घरी सकाळचं शिल्लक आहे, असं सांगून मला तू घरी नेतेस आणि ताजं जेवण तयार करून वाढतेस! गेल्या आठ वर्षांत साधं कुठं फिरायलाही घेऊन नाही गेलो तुला- मुंबई-कोल्हापूर-निपाणी या पलिकडं. मुंबईत राहूनही मुंबई-दर्शन नाही घडवू शकलो. पण तू मात्र कधी त्याबद्दल तक्रार करत नाहीस की चिडत नाहीस. याच गोष्टीचा मला त्रास होतो. आपलं लग्न झालं आणि सोनंही पाच हजारांवरुन तीस हजारांवर गेलं. त्यामुळं दागिन्यांच्या हौसमौजेलाही मर्यादा पडल्या. पण त्याबद्दलही तुझी काही तक्रार नाही. तुला काही करावंसं वाटतं, तेही आपल्या भविष्याच्या दृष्टीनं. तुझ्या त्यागाला तोड नाही. तुझ्या निर्मळ भावनांचा त्यामुळं अनादर नाही करवत.
तुझी सर्वात जमेची बाजू म्हणजे, तू माझ्यासारख्या इम्पॉसिबल माणसाला झेलतेयस आणि आयुष्यभर तुला झेलावं लागणार आहे. त्याचीही तुझी तयारी आहे. तुझ्या डेअरिंगला सलाम आहे.
मला असं वाटलं होतं की, एकदा आपला प्रेमभंग झाला म्हणजे, पुन्हा आयुष्यात आपण कुणावर प्रेम करू शकणार नाही. तसंही तिचं लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं, असं थोडंच असतं; आणि तसं संपणारं ते प्रेम नसतंच मुळी! मात्र, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि पुन्हा माझ्या आयुष्यात प्रेमाचा गारवा परतला. आयुष्य बहरलं आणि त्याला दोन चिमुकली फुलंही आली. हे सर्व केवळ तुझ्यामुळं शक्य झालं. थँक्स फॉर बिईंग विथ मी, ॲक्सेप्टिंग मी विथ माय स्ट्रेन्थ्स ॲन्ड विकनेसेस. थँक्स फॉर बिईंग माय व्हॅलंटाइन!
फॉरेव्हर युवर्स,
आलोक

१७ टिप्पण्या:

 1. प्रिय आलोक,
  मी नेहमी म्हणतो, स्त्री-पुरुष संबंधांचा अवकाश ही कोणत्याही समूहाची लायकी सिद्ध करणारी एकमेव गोष्ट असते. बाकी, आपण आपल्या बापाच्या पिढीपेक्षा फार वेगळे आहोत, असे वाटते आपल्याला. पण, जेव्हा नवरा-बायको हा मुद्दा येतो तेव्हा आपण तसेच टिपिकल असतो ना! माझे वा तुझे वडीलही, कदाचित आजोबाही, हे असेच पत्र बायकोला लिहितील! अगदी असेच! टिपिकल ... पुरुषी! संसाराच्या शिष्टसंमत चौकटी भेदून पुढे जाणे वाटते तेवढे सोपे नाही. हे युनिव्हर्सल आहे, अपवाद मीही नाही फार. म्हणून सांगतोय. पण अंगावर आले हे पत्र. मग वाटले तुम्ही लिहिले ते बरे केले, त्यातून सर्वांनाच हा अवकाश तपासता येईल.

  - संजय आवटे

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. खरंय सर! ही चौकट भेदणं खरंच सोपं नाही. आणि एरव्ही पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणारे आपण लग्नाच्या बाबतीत एकदमच धार्मिक, आज्ञाधारक वगैरे होऊन जातो. त्यातही बायको म्हणजे तर अगदी (पुरूषी) हक्क गाजवण्याचं साधनच वाटत असते. म्हणूनच मग तिच्या कष्टांची जाणीव मनात जागृत राहण्यासाठी अशी कृतज्ञताही व्यक्त करावीशी वाटली. त्यातून किमान आपल्या संवेदना जागृत राहतील, अशी आशा वाटते.

   हटवा
 2. मित्रा ...... तुझं पत्र मनाला भिडलं . . . . !!!!
  बायकांचा त्याग आज पर्यंत घराच्या चार भिंतींत बंदिस्त असायचा. . . पिढीकडे वैचारिक प्रगल्भता आली आणि आता तो त्याग सार्वजनिकपणे बोलला जातो आहे, हाच काय तो फरक . अजूनही तिला नाव-याच्या कर्तृत्वात स्वतःचा सन्मान वाटतो, खचितच हे चांगलं आहे मात्र सशक्त नाही.
  hats off Friend....!!!!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद युवी! बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तिच्या कर्तृत्वाला मी बांध घालतोय, असं मात्र नाही. माझं नेहमीच तिला सांगणं असतं, जेव्हाही तुला काही करावंसं वाटेल, तेव्हा मला सांग. आपण दोघे मिळून प्रयत्न करू. मुंबईत मात्र मी तिला अडवलं, हे खरंय! मी तिला म्हणालो होतो, 'घरातला एक चेहरा तरी फ्रेश राहू दे. दोघेही बारा बारा तास काम करून, दमून घरी आलो तर कुणी कुणाकडे पाह्यचे?' आता इथं आल्यावर मात्र पुन्हा तिचा निर्णय ती नक्की घेईलच. सम्यकला आणखी वर्षभरात थोडं कळू लागलं आणि त्याचा आगाऊपणा थोडा कमी झाला की, ते शक्य होईल, असं वाटतं. लेट्स सी!

   हटवा
 3. KHUP SUNDAR...SWACHA...NIRMAL...PRAMANIK...BHAWANA WAKYTA KELYA AAHES...AWDHE HALWE HONARE HALLI KHUPACH KAMI...MAST....

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद प्रसाद. मला माहितीय, तुझंही असंच आहे. वहिनींशी तू सांभाळलेली मैत्रीपूर्ण रिलेशनशीप आदर्शवत अशीच आहे. त्यामुळं तुम्हा दोघांच्या सहवासात खूप बरं वाटतं मनाला. God bless you!

   हटवा
 4. प्रिय मित्रा, वाचून संपले अन उत्स्फुर्त प्रतिक्रिया आली व्वा सुंदर.. खरंच किती वेगळे असते नं मुलींच जीवन. मी, माझं करणारी,हटट करणारी ती जेव्हा लग्नानंतर आपण आपलं करतांना स्वत:च्या स्वभावाला मुरड घालते तेव्हा तीचा तो त्याग प्रशंसनीयच असतो. मित्रा तु दिपाचे मोठेपण ज्या मोठयामनाने आणि पुरूषी अहंभाव न दाखवता मान्य केलंस, हे कौतुकास पात्र आहे. असाच मोठेपणा दाखवत रहा. खूप खूप शुभेच्छा....

  उत्तर द्याहटवा
 5. :) Happy Valentines Day ! :) Really touching letter. I wrote those all before getting married, but doing that after 8 years too is really worth appreciating. :D Reading this I realise the power of the letters. I miss those in recent world of SMS, Tweets and Emails. :(
  -Vidya.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Very true! The letters have their own power of expressions and intimacy. They tell people that there are people who love you, care you and as they are taking out some time to write you, it makes you someone special. This feeling of a letter means a lot in one's life. Hence the difference. Thanks for the kind appreciation.

   हटवा