सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

निखळ-२ : ‘सत्यनारायणा’ची ‘क्रांती’कथा!




('दै. कृषीवल'मध्ये सुरू झालेल्या 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. ११ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला भाग माझ्या वाचक मित्रांसाठी इथं पुनर्प्रकाशित करीत आहे.)
 
वाचक हो, आपल्या देशाच्या विकासामध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावणाऱ्या एका महनीय व्यक्तीच्या भाषणातला छोटासा अंश पुढं देतो आहे. काळजीपूर्वक वाचा-
माझा जन्म ओरिसातल्या तोतलागढ या आदिवासी गावातल्या गुजराती कुटुंबातला. शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण गुजरातमधल्या बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात ए.एस्सी. केलं. एकवीस वर्षांचा असेन, त्यावेळी अमेरिका चंद्रावर माणूस पाठवणार असल्याची बातमी वाचनात आली. हा चंद्रावर जाणारा माणूस आपणच असलं पाहिजे, असा अतिशय धाडसी, तरुण वयाला साजेसा (अ)विचार माझ्या मनात आला. मागचा-पुढचा कोणताही विचार न करता तत्क्षणी अमेरिकेला जाणारी बोट पकडली. साधारण ४८ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. अमेरिकेत ज्यासाठी गेलो, ते काही साध्य झालं नाही. मग तिथल्या इलिनॉइस विद्यापीठातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग केलं. तिथंच छोटासा बिझनेस सुरू केला. बऱ्यापैकी चालला. स्थिरस्थावर होतोय, असं वाटताच भारतात असलेल्या मैत्रिणीला बोलावून घेतलं. तिच्याशी विवाह केला. भारतात परतावं असं वाटू लागलं. मग बिझनेस विकला. थोडा पैसा गाठीशी बांधला आणि १९८० साली भारतात आलो. इथं आलो खरा. पण परदेशात असलेल्या माझ्या पत्नीशी मी फोनवरुन संपर्कही साधू शकत नव्हतो, इतकी ही यंत्रणा प्राथमिक अवस्थेत होती. तेव्हाच मग या क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. सुदैवानं एका मित्राच्या मध्यस्थीनं तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना भेटलो. त्यांच्यासमवेत पहिल्यांदाच राजीव गांधी यांचीही भेट झाली. त्यांच्याशी विचार जुळले. दुर्दैवानं इंदिराजींची हत्या झाली. राजीव जी पंतप्रधान झाले. देशाच्या टेलिकॉम क्षेत्रात सुधारणा करण्याचा निर्धार आम्ही केला आणि तो क्रांतीकारकरित्या यशस्वी झाला. तेवढ्यात देशाला आणखी एक धक्का बसला. राजीवजींची हत्या झाली. मलाही हार्ट-ॲटॅक आला. बायपास झाली. जवळचा पैसाही संपला. पुन्हा अमेरिकेला गेलो. पुन्हा नवा बिझनेस सुरू केला. हा बिझनेस थोडा सेटल झाल्यावर सन २००४मध्ये पुन्हा देशात परतावंसं वाटू लागलं. परतलो. आणि देशाच्या शैक्षणिक क्षेत्राला नवतंत्रज्ञानाचे नवे आयाम देण्याच्या कामाला वाहून घेतलं. नॉलेज नेटवर्क विकसित करता आलं. दरम्यानच्या काळात कॅन्सर झाला, दोन बायपास झाल्या; तरीही माझं आयुष्य थरारक, रोमँटिक आणि फुल्ल ऑफ लाइफ आहे.
सूज्ञ वाचकांच्या आतापर्यंत ध्यानीही आलं असेल की, हे कोणाचे उद्गार असतील? बरोब्बर! डॉ. सॅम पित्रोदा ऊर्फ डॉ. सत्यनारायण गंगाराम पित्रोदा! भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात आणि त्या अनुषंगानं संपूर्ण दळणवळण क्षेत्रातच क्रांती घडविणारे, त्यानंतर एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच देशभरात नॉलेज नेटवर्क विकासासाठी नॅशनल नॉलेज कमिशनच्या माध्यमातून पाठपुरावा करणारे आणि ते नेटवर्क यशस्वीरित्या प्रत्यक्षात आणणारे, त्याचप्रमाणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येईल, यासाठी नेहमी विचार करणारे आणि त्याच गोष्टीमुळं सध्या पंतप्रधानांचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा हे मोठं अजब रसायन आहे. एक तर त्यांच्या वेगळ्या नावामुळं कित्येक भारतीयांना ते आपलेच आहेत, हे पहिल्यांदा सांगावं लागतं. त्यानंतर मग त्यांचं मोठेपण आणि वेगळेपण पटवून द्यावं लागतं. खरं तर आज भारतात झालेली संगणकीय डिजिटल क्रांती, दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेला मोबाईल आणि त्यावरुन सहजी करता येऊ शकणारे (सिक्युअर) आर्थिक व्यवहार या गोष्टींमागं राजीव गांधी यांची दूरदृष्टी जितकी कारणीभूत, तितकाच त्यामागचा डॉ. सॅम पित्रोदा नावाचा ब्रेनही, हे मान्य करायलाच हवं! आजही या क्षेत्रातलं त्यांचं संशोधन अव्याहतपणे सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. पित्रोदा यांना ऐकण्याचा योग आला आणि मी अक्षरशः चकित झालो. अतिशय साध्यासोप्या, ओघवत्या इंग्रजीत अगदी नेमक्या शब्दांत आशयगर्भ मांडणी करण्याचं त्यांचं कसब वादातीत होतं. मला त्यांचे आवडलेले स्वभावविशेष म्हणजे प्रचंड विनम्रता आणि अभिनिवेशविरहित मांडणी! मी त्यांच्या भाषणाचा परिच्छेद उधृत करण्याचं कारण म्हणजे जवळजवळ ५० वर्षांची प्रचंड कारकीर्द डॉ. पित्रोदा यांनी अवघ्या २५० शब्दांत बद्ध केलेली आपल्याला दिसेल. (तसं त्यांचं सॅम पित्रोदा: अ बायोग्राफी हे बेस्टसेलर चरित्र मुळातूनच वाचण्यासारखं आहे.) पण ही गोष्ट सहजशक्य नाहीय. आपलंच पाहा ना, करतो छोटंसं काम, पण आविर्भाव असा असतो की, प्रचंड महान कामगिरी आपल्या हातून झालीय. कोणत्याही कामात आपलाच वाटा सिंहाचा असतो, इतरांच्या योगदानाला खारीचा समजण्याइतकाही दिलदारपणा आपण दाखवत नाही. या पार्श्वभूमीवर, केवळ भारतच नव्हे, तर विकसनशील देशांच्या विकासाच्या पायाभरणीसाठी ज्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कनेक्ट, कम्युनिकेट ॲन्ड कोलॅबोरेट हा अभिनव मूलमंत्र दिला, रुजवला, अशा पित्रोदांनी आपलं योगदान केवळ २५० शब्दांत सांगितलं- ते सुद्धा कोणत्याही अभिनिवेशाशिवाय- अगदी जाता जाता! मग आपल्याच उथळ पाण्याला खळखळाट का असावा?, असा प्रश्न मनात येतो आणि त्या प्रश्नातच लपलेलं उथळपणाचं उत्तरही मिळतं. यावर उपाय एकच तो म्हणजे आपण अधिकाधिक खोल आणि विस्तीर्ण होत जाणं! या आपल्या सखोलपणाच्या ध्यासातून आणि विस्तारण्यातून आपला लगेच समुद्र होईल, अशी अपेक्षा बाळगणं भाबडेपणाचंच ठरेल. मात्र एक गोष्ट नक्की साध्य होईल, आपला किमान एखादा शांत, संयत तलाव होईल, ज्याच्यात कोणी दगड भिरकावला तरी नजाकतदार तरंगच उमटतील. किमान एखादी नदी होईल, जिथून वाहात जाईल, तिथला सारा परिसर समृद्ध, संपन्न आणि सुपीक होईल. आणि समजा, पुढं आपला समुद्र झालाच (प्रयत्न करायला काय हरकत आहे?), तर एखाद्या गर्जनेलाही अर्थ प्राप्त होईल- जो नित्य खळखळाटाला कधीच नसतो.

४ टिप्पण्या: