रविवार, २९ मार्च, २०१५

प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा!


(रविवार, दि. 29 मार्च 2015 रोजी दै. पुढारीच्या साप्ताहिक बहार पुरवणीमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील 66-अ कलम वगळल्यासंदर्भात 'बहार विशेष' कव्हर स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे. माझ्या ब्लॉग वाचकांसाठी मूळ लेख दै. पुढारीच्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)




गेल्या मंगळवारी (दि. २४ मार्च) सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या १९(१)(अ) कलमाला छेद देणारे असलेल्या, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ (अ) हे कलम रद्द केले. समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरुन व्यक्त होणाऱ्या, अभिव्यक्त होणाऱ्या नागरिकांसाठी हा दिलासादायक निर्णय असला, तरी 'माहिती तंत्रज्ञान कायदा-२०००'मध्ये सन २००८मध्ये सुधारणा करून ६६(अ) कलम या कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आले होते. हे कलम असे-
"संगणक किंवा संवाद उपकरणांचा वापर करून पाठविलेला संदेश ज्यात;
* कोणतीही माहिती जी ढोबळमानाने आक्षेपार्ह आहे किंवा जी धमकीच्या स्वरूपात अथवा हानीकारक आहे किंवा
* कोणतीही माहिती जी खोटी आहे हे त्या व्यक्तीला ठाऊक आहे, मात्र आफत ओढविण्याच्या उद्देशानेच किंवा त्रासदायक किंवा धोका निर्माण व्हावा, अडथळा निर्माण व्हावा, अपमान व्हावा, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळावे, तेढ निर्माण व्हावी या वाईट उद्देशानेच संगणकीय स्रोताचा किंवा संवाद उपकरणांचा वापर करण्यात आलेला असेल किंवा
* कोणतेही इलेक्ट्रॉनिक मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल संदेश ज्यामध्ये थेट आफत ओढविणे किंवा अडथळा निर्माण व्हावा, हाच उद्देश आहे किंवा त्या माध्यमातून चुकीचा संदेश किंवा चुकीच्या (व्यक्ती किंवा संस्थेस) किंवा ज्याला तो संदेश मिळणार आहे, अशा (व्यक्ती किंवा संस्थेस) पाठविणाऱ्यास  या कलमान्वये तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.
*  नोंद - इलेक्ट्रॉनिक संदेश यामध्ये मेल, टेक्स्ट मेसेज, इमेज म्हणजे चित्र किंवा फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड या साऱ्याचा समावेश होतो."
मोठ्या प्रमाणावर फोफावणाऱ्या सायबर गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी तसेच, समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरुन विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या चारित्र्यहननाचे प्रकार वाढीस लागल्याने ६६(अ) या कलमाच्या समावेशाची गरज भासलेली होती. तथापि, या कलमामधील ॲनॉइंग (त्रासदायक), इनकन्व्हिनियंट (गैरसोयीचे) आणि ग्रॉसली ऑफेन्सिव्ह (ढोबळमानाने आक्षेपार्ह) या संज्ञा अस्पष्ट असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
आता हे कलम रद्द झाल्याने समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या वर्गाला काहीही पोस्ट करायला रान मोकळे झाले आहे, अशातला मात्र भाग नाही. सायबर गुन्हे कायदा, भारतीय दंड संहिता आदींच्या विविध कलमांद्वारे ती बंधने आपल्यावर आहेतच. मात्र, मुळात समाजमाध्यमांचा प्रचंड आवाका, विस्तार आणि राज्य-राष्ट्रांच्या सीमा भेदून पार करण्याची असलेली या माध्यमांची क्षमता पाहता, त्यावरील प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे हे कोणत्याही यंत्रणेच्या आवाक्याबाहेरचे काम आहे, हे याठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. मग, यावर उपाय काय? असा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर देण्यापूर्वी, माध्यमांचे महान भाष्यकार मार्शल मॅक्लुहान काय म्हणतात, ते पाहू. मॅक्लुहान म्हणतात, "कोणतेही नवे माध्यम उदयास येत असताना ते स्वतःचे लाभ व तोटे घेऊन येत असते. या दोहोंसह त्यांचा स्वीकार करण्याखेरीज आपणास पर्यवाय नाही." हे उद्गार त्यांनी मुद्रित माध्यमांच्या पार्श्वभूमीवर उदयास येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना अनुलक्षून काढले होते. तथापि, आजच्या काळात उदयास आलेल्या नवीन डिजिटल माध्यमांना, पर्यायाने समाजमाध्यमांनाही ते तंतोतंत लागू पडतात. याच ठिकाणी माध्यम सम्राट म्हणून ज्यांना जग ओळखते, त्या रुपर्ट मरडॉक यांचेही म्हणणे उद्धृत करणे अनुचित ठरणार नाही. मरडॉक म्हणतात, "आज नवतंत्रज्ञानामुळे माध्यमांचे नियंत्रण हे कोणत्याही संपादक, प्रकाशक अथवा समूहाकडे किंवा त्यांच्यापुरते राहिलेले नाही. तर, आता सारे नियंत्रण नागरिकांच्या हाती सरकलेले आहे."
मॅक्लुहान आणि मरडॉक या दोघांचे उपरोक्त उद्गार समाजमाध्यमांच्या संदर्भात विचारात घेता, समाजमाध्यमांवर प्रत्येक नागरिकाचे अस्तित्व व नियंत्रण आहे, हे लक्षात येईल; तसेच, त्यांना आपण त्यांच्या लाभ-तोट्यांसह स्वीकारायलाच हवे, हेही लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर मग समाजमाध्यमांचा वापर प्रत्येकाने अत्यंत जबाबदारपूर्वक करायला हवा, हे स्पष्ट होते.
मुळातच समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांना या माध्यमांच्या क्षमतेची पूर्णांशाने जाणीव झालेली आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. फेसबुक असो, ट्विटर असो किंवा आज लोकप्रियतेच्या आघाडीवर असणारे वॉट्सॲप असो, या सर्व समाजमाध्यमांच्या व्यासपीठांचा जबाबदार वापर करण्यामध्ये कमी पडल्यामुळे किंवा अतिरेकी, अविवेकी वापर केल्यामुळे वापरकर्त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयापुढे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६(अ) कलमाविरोधात दाखल झालेल्या याचिका पाहता, अधिकतर राजकीय प्रकरणांतून वापरकर्त्यांवर कारवाई झाल्याचेही सामोरे आले. अशा राजकीय प्रकरणांमध्ये तमिळनाडूचे राज्यपाल के.रोसैय्या व आमदार प्रकाश मोहन यांच्यासंदर्भात हैदराबाद येथील जया विंध्यावाल या महिलेने फेसबुकवर केलेल्या टिप्पणीचा समावेश होता. त्यांना ६६(अ) अन्वये अटक करण्यात आली होती. पाँडिचेरीमधील रवी श्रीनिवासन यांनी पी.चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती यांच्यावर ट्विटरवरुन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनाही अटक करण्यात आली होती. जाधवपूर विद्यापीठातील प्रा. अंबिकेश महोपात्रा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. त्यांनाही अटक झाली होती. बरेलीतल्या विकी नावाच्या विद्यार्थ्याने तर थेट उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांच्याच नावाने धार्मिक तेढ वाढविणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. त्यालाही या कलमान्वये अटक झाली होती. ज्या श्रेया सिंघल या कायद्याच्या विद्यार्थिनीमुळे ६६(अ) रद्द झाले, तिने पालघर (ठाणे) येथील शाहीन धादा व रीनु श्रीनिवासन या दोघींना सदर कलमान्वये झालेल्या अटकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदच्या अनुषंगाने त्यांनी फेसबुकवर टिप्पणी पोस्ट केली होती. त्या पोस्टला लाइक करणाऱ्यांवरही कारवाईचे संकेत देण्यात आले होते. कायद्यातील तरतुदीच्या गैरवापराकडे याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. त्यामुळे ६६(अ) कलम रद्द करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने अशी कारवाई करावयाची असल्यास जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त आणि मेट्रो शहरांमध्ये पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीने केली जाणे आवश्यक असल्याचे सूचित केले आहे.
या पार्श्वभूमीवर, एकूणच समाजमाध्यमांचे वापरकर्ते आणि त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा मुद्दा पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाचा अर्थ जर कोणी सोयीस्कर लावत असेल, तर ते चुकीचेच आहे. जागतिक मानवी हक्क जाहीरनाम्यामध्ये उल्लेखित आणि भारतीय संविधानाने नागरिकांना प्रदान केलेल्या अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्याचा अर्थ व्यापक आहे. त्यामध्ये स्व-परिपूर्ती, सत्यशोधनास सहाय्य, निर्णयप्रक्रियेत सक्षम सहभाग, स्थैर्य व सामाजिक सुधारणांमध्ये समतोल, सर्व समाजघटकांमध्ये सुसंवादाची व मुक्तसंवादाची प्रस्थापना अशी काही ठळक विशेष उद्दिष्ट्ये बाळगलेली आहेत. त्याचप्रमाणे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अनियंत्रित वा निरंकुश आहे, असे मात्र नाही. त्या स्वातंत्र्यामध्येच कर्तव्येही अनुस्यूत आहेत. तसेच, देशाचे सार्वभौमत्व एकात्मता, राष्ट्राची सुरक्षितता, इतर देशांशी असलेले मैत्री संबंध, कायदा सुव्यवस्था, नैतिकता, सभ्यता या कारणांसाठी तसेच व्यक्तीची बेअब्रू न्यायालयाचा अवमान यांचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारला या हक्कावर कायद्याने वाजवी मर्यादा घालता येतात. मर्यादा वाजवी आहेत की नाही, हे ठरविण्याचा अंतिम अधिकार मात्र न्यायालयांचा असतो. सर्वसाधारणपणे सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था, सभ्यता व नैतिकता यांचे सार्वजनिक जीवनात अथवा कोणत्याही आभासी माध्यमात उल्लंघन केले जाणे अनुचित आहे. याला समाजमाध्यमांचे व्यासपीठही अपवाद असण्याचे कारण नाही.
समाजमाध्यमांचा आजचा वापरकर्ता अधिकतर तरुण आहे. आजकाल कोणत्याही ओपिनियन लीडरसाठी आपले फॉलोअर्स किंवा पाठीराखे तयार करण्यासाठी समाजमाध्यमांसारखे सहज आणि व्यापक प्रमाणात उपलब्ध होणारे दुसरे व्यासपीठ नाही. त्यात खर्चही कमी. त्यामुळे याठिकाणी बऱ्यावाईट, चांगल्या, उत्तम, दर्जाहीन अशा सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचे, शेअरिंगचे, फॉरवर्डिंगचे पेव फुटलेले दिसते. वॉट्सॲपसारखे अतिशय गतिमान आणि उपयुक्त माध्यम आपण अक्षरशः वाया घालवतो आहोत. विचारहीन फॉरवर्डिंगचे असे ते माध्यम बनू पाहते आहे. या माध्यमाद्वारे एकीकडे अतिरेकी म्हणावे इतक्या मोठ्या प्रमाणावर संदेशांची देवाणघेवाण होत असतानाच त्यात निरुपयोगी अशा संदेशांचा भडिमार हा अतिशय मोठा आहे. देशात एकीकडे सद्विचार देणाऱ्या व्यक्तींची संख्या रोडावत चाललेली असताना या समाजमाध्यमांतून निराधार अशा अफवा, अतिरेकी विचार प्रसार करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ज्याला असे संदेश प्राप्त होतात, त्याच्याकडेही तो वाचून विचार करण्याइतका वेळ नाही. त्यामुळे झटपट लाइक, कॉमेंट किंवा फॉरवर्ड करण्यात अधिक धन्यता मानली जाते आहे. अत्यंत अभिरुचीहीन आणि बरेचदा अश्लीलतेकडे झुकणारे, कीळसवाणे संदेश, छायाचित्रे, व्हिडिओही प्रसारित केले जाताहेत. गतवर्षी झालेल्या सार्वजनिक निवडणुकांत समाजमाध्यमांद्वारे उमेदवारांचे व्यक्तिगत चारित्र्यहनन करणारे संदेश पाठविण्याचे प्रमाण लक्षणीय होते. यातून कोणाही नेत्याची सुटका झाली नाही. अत्यंत बेपर्वा पद्धतीने समाजमाध्यमांचा वापर होऊ लागल्यानेच ६६(अ) कलमाची माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करून तरतूद करावी लागली होती, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न झाला, हा भाग अलाहिदा! त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाल्याच्या मुद्द्यावरुन हे कलम रद्दबातल ठरविण्यात आले.
आता प्रश्न आहे तो आपल्या जबाबदारीचा. समाजमाध्यमांचे वापरकर्ते म्हणून आपल्या हातात एक अत्यंत दुधारी अस्र डिजिटल नवतंत्रज्ञानाने प्रदान केलेले आहे. त्याचा आपण किती विधायक वापर करतो, त्यावर पुढील भवितव्य निश्चित होणार आहे. शेवटी कायद्यांची गरज केव्हा भासते, जेव्हा आपण भारतीय संविधान, मानवी हक्क, नितीमूल्ये यांचे उल्लंघन करतो, त्याच वेळी. पण, सामाजिक नितीसंकेतांच्या, उच्च मानवी मूल्यांच्या, मानवी हक्क्यांच्या तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आपण आपल्या अभिव्यक्तीचा उदात्त हेतूने व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय प्रगतीसाठी वापर केला तर त्याला कोणत्याही कायद्याच्या बडग्याची आवश्यकता भासत नाही, भासणार नाही. पण, हे इतके सहज आणि सोपे नाही. त्यामुळे समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होणारच नाही, याची शाश्वती देता येत नाही. आणि असे गुन्हेगार भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान, सायबर कायद्यातील अन्य तरतुदींनुसार शिक्षेस पात्र ठरणारच आहेत- ६६(अ) कलम रद्द झाले तरीही! त्यामुळे सेल्फ रेग्युलेशन अर्थात स्वयं-नियंत्रण हाच समाजमाध्यमांच्या जबाबदार वापरासाठीचा अत्यंत प्रभावी मूलमंत्र आहे.

अमिताभ: समाजमाध्यमांचा आदर्श वापरकर्ता
समाजमाध्यमांचा स्वयंनियंत्रित तरीही मुक्त वापर करणाऱ्यांची नावे आठवायचा प्रयत्न केला, तेव्हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांची तसेच माध्यम समूहांचीही नावे नजरेसमोर आली. पण, समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत अत्यंत आदर्श वापरकर्ता म्हणून कोणाचे नाव ठळकपणाने घ्यायचे झाले, तर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे नाव आघाडीवर राहील.
अमिताभ बच्चन यांचा उल्लेख मी जेव्हा समाजमाध्यमांचा आदर्श वापरकर्ता म्हणून करतो, तेव्हा त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करणे आवश्यक आहे. अमिताभ हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्ती आहेत. जगभरात त्यांचे चाहते पसरलेले आहेत. या क्षेत्राचे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण हे आहे की, तिथे गॉसिपिंगला प्रचंड मोठी संधी आहे. आजच्या २४x७ वृत्तवाहिन्यांच्या काळात एक छोटे वाक्य किंवा एखादा फोटो सुद्धा किती गहजब माजवू शकतो, याचे अनेक दाखले आपल्या नित्य वाचनात, पाहण्यात येतात. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील एक अतिशय जबाबदार व्यक्ती असल्याची जाणीव आणि भान यांचे प्रतिबिंब अमिताभ यांच्या समाजमाध्यमांवरील अभिव्यक्तींमधून पाहावयास मिळते. केवळ फेसबुक आणि ट्विटरच नव्हे, तर ब्लॉग लेखन आणि इन्स्टाग्रामवरही त्यांचे अस्तित्व अत्यंत दखलपात्र बनले आहे. आज वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांची कारकीर्द चित्रपट, जाहिरात, सिरिअल्स, प्रमोशन्स, सार्वजनिक कार्यक्रम अशा अनेकांगांनी अव्याहतपणे सुरू आहे. या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून अमिताभ यातल्या प्रत्येक समाजमाध्यमावर व्यक्त होताना दिसतात. 'बच्चन-बोल' या त्यांच्या ब्लॉगवर ते दैनंदिनी लिहील्याप्रमाणे दररोज आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. आज (दि.२६) हा लेख लिहीत असताना त्यांच्या ब्लॉगलेखनाचा २५३६वा दिवस आहे. म्हणजे जवळपास सुमारे सात वर्षे ते नित्यनेमाने ब्लॉग लिहीत आहेत. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी या लेखनाला सुरवात केली आणि त्यातील सातत्य जपले आहे, हे जसे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे; त्याहूनही महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे हे लेखन कधीही वादग्रस्त बनले नाही- बनण्याची, बनवले जाऊ शकण्याची शक्यता असताना सुद्धा! हीच गोष्ट त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट्सची आणि ट्विटरवरील ट्विट्सच्या बाबतीतही लागू होते. फेसबुकवरही ते रोज व्यक्त होतात. कधी गंभीर, कधी रंजक माहिती देण्याबरोबरच विविध घडामोडींसंदर्भात ते व्यक्त होतात, ते अत्यंत संयतपणे आणि अत्यंत जबाबदारपूर्वक! विविध छायाचित्रेही ते शेअर करतात. त्यातही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे फोटो टाकून चाहत्यांचे कुतूहल वाढविण्याचे कौशल्यही त्यांनी साधले आहे. कधी व्यक्तीगत आठवणींतील छायाचित्रे, कधी पूर्वीच्या चित्रपटांच्या सेटवरील सोनेरी आठवणी जागविणारी छायाचित्रे, कधी चाहत्यांनी पाठविलेली छायाचित्रे, सणावारांची तसेच महत्त्वाच्या दिवसांची छायाचित्रे तर रविवारी आपल्या घरासमोर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीच्या छायाचित्रांनी अमिताभ आपली फेसबुक वॉल सजवित असतात. ट्विटरवरही ते सुमारे १८११ दिवसांपासून आहेत, म्हणजे साधारण सहा वर्षांपासून! या काळात त्यांनी ३६ हजार ५००हून अधिक ट्विट्स केलेली आहेत. ती सुद्धा पूर्णतः वादग्रस्ततेला फाटा देऊन! या उलट जया बच्चन यांनी प्रसारमाध्यमांशी एक दोनदाच संवाद साधला. त्यात त्यांनी शाहरुखच्या संदर्भात केलेले विधान खूपच वादग्रस्त ठरले. इथेही अमिताभनीच पुढाकार घेतला आणि समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरुनच शाहरुखची जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा पाडला. समाजमाध्यमांचा सकारात्मक बाबींसाठी किती अप्रतिम वापर करून घेता येऊ शकतो, याचे अमिताभ हे मूर्तीमंत आदर्श उदाहरण ठरले आहेत.

६६(अ) व्यतिरिक्त अन्य महत्त्वाची कलमे
'माहिती तंत्रज्ञान कायदा-२०००'मधील कलम ६६(अ) वगळले गेल्यानंतरही या कायद्यात तसेच भारतीय दंड संहितेमध्ये सायबर गुन्हेगारांवर कारवाई करता येण्यासारखी अनेक कलमे आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६५, ६६, ६६(ब), ६६(क), ६६(ड), ६६(ई), ६६(फ), ६७, ६७(अ), ६७(ब), ६७(क), ७२, ७२(अ), ७४ व ७४ या कलमांन्वये कारवाई करता येते. ज्यामध्ये किमान तीन वर्षांपर्यंत कारावास व किमान एक लाख रुपयांच्या दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.

भारतीय दंड संहितेचे कलम ५०३, ४९९, ४६३, ४२०, ३८३, ५०० यानुसारही कारवाई करता येते. याखेरीज ऑनलाइन ड्रग्ज विक्री व ऑनलाइन शस्त्र विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अनुक्रमे नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा-१९८५ व आर्म्स ॲक्ट-१९५९ या अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे.

सोमवार, २३ मार्च, २०१५

ऊर्जा-2: स्वतःच्या जगण्याच्या व्याख्या स्वतःच निर्माण करा: अतुल कुलकर्णी



('ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमांतर्गत मुलाखतीचे दुसरे पुष्प अत्यंत गुणी व सहृदयी अभिनेते श्री. अतुल कुलकर्णी यांनी गुंफले. त्यांनी साधलेल्या संवादाचे शब्दांकन...)


सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' ही संकल्पनाच मला खूप आवडली. स्वतः अभिनेता असून अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टींच्या बाबतीत विद्यार्थ्यांशी, उपस्थितांशी संवाद साधायचा, ही माझ्यासाठी एक वेगळी पण आकर्षणाची बाब ठरली. त्यामुळंच मी आज याठिकाणी उपस्थित आहे.
खरं तर ऊर्जा हे एकूणातच विश्वाच्या अस्तित्वाचं खरं स्वरुप आहे. ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही. केवळ एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये तुचं रुपांतरण होत असतं. त्यामुळंच ही अक्षय ऊर्जा विश्वाचं अस्तित्व टिकवून ठेवते, विश्व प्रवाहित ठेवते, असं म्हणता येईल. मानवाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टी मिळविण्यासाठी त्याला प्रेरित करणारा 'बेसिक फोर्स' म्हणजे ऊर्जा, असं म्हणता येईल. आपल्या अस्तित्वासाठीची, स्वतःला सिद्ध करण्यासाठीची धडपड ही त्यातूनच निर्माण होते. पण, हे केवळ तितकंच आणि तेवढ्यासाठीच आहे, हे मात्र मानवाच्या बाबतीत खरं नाही. अन्य प्राण्यांपासून मानवाला वेगळं ठरविणाऱ्या इतर कला, क्रीडा, छंद यांच्या समावेशानं जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी करण्याची प्रेरणा ही खरी मानवी आस्तित्वाची ऊर्जा आहे, असं मला वाटतं.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही या प्रेरणा खूप महत्त्वाच्या ठरल्या. तसं पाहता मी एक बारावी नापास विद्यार्थी. घासून कसाबसा पास झालो. तिथून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. पण, मुळातच आवड नसल्यानं तिथं पास व्हायची शक्यता नव्हतीच. झालंही तसंच. नापास झालो आणि सोलापूरला घरी परतलो. अत्यंत निराश, आत्मविश्वासरहित अवस्थेत तिथंच बीएला प्रवेश घेतला. ढकलल्यासारखं शिक्षण सुरू होतं. मात्र, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एका एकांकिकेत अभिनय केला. आणि दुसऱ्या दिवसापासून कॉलेजमध्ये विद्यार्थी, शिक्षक मला ओळखू लागले. तोपर्यंत खांदे पाडून चालणाऱ्या माझी मान आपोआपच वर झाली आणि छाती पुढे आली. जगण्याला नवी उभारी देणारा, नवी ऊर्जा प्रदान करणारा तो प्रसंग होता. मी सुद्धा कोणीतरी आहे. काही तरी करू शकतो, हा आत्मविश्वास त्या प्रसंगानं माझ्यात पेरला आणि ही ऊर्जा मनाशी घट्ट धरून ठेवतच मी नाटकाला आपलंसं केलं. एकदा ठरवल्यानंतर मग त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं आणि दिल्लीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि करिअरला सुरवात केली. तिथल्या प्रशिक्षणानं प्रत्येक भूमिकेचा, तिच्या प्रत्येक पैलूचा मानवी स्थायीभावाच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची सवय लावली.
काही लोकांना मी उद्धट वाटतो. हो, आहे मी उद्धट. पण, माझा हा उद्धटपणा- सकारात्मक उद्धटपणा आहे. आणि तो प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे, असं माझं मत आहे. जगाच्या प्रचलित व्याख्या मान्य न करता माझं जगणं, जर मला योग्य वाटेल त्या पद्धतीनं मी जगायचं ठरवलं असेल; माझ्या जगण्याची, वागण्याची चांगली व्याख्या जर मी ठरविली असेल, तर त्यात गैर काय? कोणाला पटो, अगर न पटो, मी स्वतः माझ्या वागण्याशी, भूमिकेशी शंभर टक्के प्रामाणिक असेन, तर त्यात चुकीचे काहीच नाही. कदाचित, त्यामुळेच मी एक चांगला अभिनेता, माणूस म्हणून स्वतःला घडवू शकलो, असं मला वाटतं. जगाच्या व्याख्येनुसारच जर करायचं ठरवलं असतं, तर ते शक्यही झालं नसतं, कदाचित.
शून्यातून एखादी गोष्ट निर्माण करण्याची प्रक्रिया मुळातच खूप गंमतीची असते. ही प्रक्रियाच खऱ्या अर्थानं आपल्याला जगायला शिकवते. या साऱ्या प्रवासात कित्येकदा निराशाही वाट्याला येते. पण, तुम्हाला सांगतो, जगात इतकी सॉलिड, फँटॅस्टिक आणि कमाल माणसं आणि सुंदर पुस्तकं आहेत की, या साऱ्या निराशेतून तुम्हाला सावरायला मदत करतात; पुन्हा उभं राह्यला शिकवतात. एक उदाहरण देतो, 'गांधी विरुद्ध गांधी'च्या वेळी मी सर्वप्रथम गांधी वाचायला हातात घेतले. तुम्हाला खरं सांगतो, इतका महान विचारांचा आणि कृतीचा माणूस जगात आजतागायत दुसरा झाला नाही. आजकाल तर गांधींना नावं ठेवून मोठे व्हायचे दिवस आलेत, तेही पुन्हा त्यांचं प्रत्यक्षात काहीही न वाचता आणि कोणी तरी सांगतो म्हणून. हे चुकीचं आहे. तो माणूस काय म्हणतो हे आधी वाचाल तरी?, त्याचं सांगणं काय आहे, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे, हे समजून तरी घ्याल? पण नाही. आपण अख्ख्याच्या अख्खा माणूसच नाकारुन रिकामे होतो. ठीक आहे, त्यांच्या काही भूमिका, काही तत्त्वं पटत नसतीलही एखाद्याला. पण, तेवढे दोन मुद्दे ठेवा ना बाजूला. बाकीचं चांगलं आहे, ते तरी स्वीकाराल की नाही? हा स्वीकार, आपली स्वीकारार्हता किती अत्युच्च कोटीची आहे, यावरुन तुमची संवेदनशीलता आणि तरलता किती आहे, हे निश्चित होते.
आजकाल तर पालकच आपल्या मुलांना रेसच्या घोड्याप्रमाणं पळवायला लागले आहेत. मान्य आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. पण, तुम्ही कशाला आणखी त्या मुलांचा जीव घेताय? सातवी-आठवीपासूनच 'आयआयटी'च्या ट्रेनिंगला पाठवणारे पालक आहेत. काय म्हणावं त्यांना, मला कळत नाही? मान्य आहे, जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. मी नाकारत नाही. आयुष्यात स्थैर्यही हवं. पण, केवळ या भौतिक सुखांच्या मागं लागणं, हा त्यावरचा उपाय नाही, नक्कीच.
व्यक्तिगत आयुष्यात आपल्या गरजा मर्यादित राखता आल्या तर, या भौतिक सुखांची गरज आपोआपच कमी होते. माझ्या मुंबईतल्या फ्लॅटमध्ये आजही सोफा, टीव्ही, एसी, मायक्रोवेव्ह, अगदी डबलबेड सुद्धा नाही. त्यांची कधी गरजही भासत नाही आम्हाला. आमचा मामा कधी घरी आला की, 'आलो संताच्या घरी' असं म्हणत असतो. माझ्या घरी येणाऱ्याला आजही मांडी घालूनच जमिनीवर बसावं लागतं. त्यामुळं गुडघेही ठणठणीत आहेत आमचे. सकाळी झोपून उठलो की आम्ही सतरंजी घडी घालून कपाटात टाकून देतो की वापरायला प्रशस्त अशी जागा आम्हाला उपलब्ध होते. जगाचं खरं सौंदर्य हे मोकळेपणात, स्पेसमध्ये आहे, असं एक विचारवंत म्हणतो. ते खरंही आहे. आणि या सर्व गोष्टींशिवाय आमचं काही अडत नाही- अजिबातच. आज पंधरा वर्षानंतर माझ्या अनुभवातून मी सांगू शकतो की, जमिनीवरही आम्हाला अतिशय चांगली, गाढ झोप लागते. पुढं-मागं कधी गरज लागली तर पाहता येईल.
खरं तर, पालकांनी मुलांना ज्या त्या वयात, ज्या त्या गोष्टी करायला दिल्याच पाहिजेत. नाही तर ती मुलं लंगडीच होतील. कितीही डिग्र्या, कितीही पैसा मिळवला तरीही, ती मुलं जगणं काय असतं, हे आयुष्यात शिकणारच नाहीत. नोकरी, व्यवसाय हे जगण्याचं साधन आहे आणि ते मान्य करायलाच हवं. पण, तेच सर्वस्व आहे, असं समजण्याची चूकही करता कामा नये. तसं पाहता, माणसाचं पिल्लू हे जगातल्या सर्वांत बुद्धू आहे, असं म्हणावं लागेल. स्वतःच्या पायावर उभं राहायला ते वयाची एकवीस वर्षं घेतं. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर पालकांनी त्यांना बाहेरच्या जगात सोडलं पाहिजे- कोणत्याही अपेक्षांशिवाय. जगाचा अनुभव त्यांना घेऊ दिला पाहिजे. सुरक्षित कवचाबाहेर एक असुरक्षित जग आहे, याची जाणीव, अनुभव त्यांना यायला हवा. मुंबईतला लोकलचा प्रवास करा एकदा. म्हणजे आपली खरी जागा आपल्याला समजते. या जगातलं आपलं नेमकं आस्तित्व किती क्षुल्लक आहे, याची जाणीव होते. मोठ्या शहरांत राहण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अनेक प्रकारची माणसं आपल्याला पदोपदी भेटतात. आणि त्या सर्वांकडून काही ना काही सकारात्मक गोष्टी आपल्याला शिकता येतात.
माणूस कितीही टॅलेंटेड असला तरी त्या टॅलेंटला टेंपरामेंटची जोड असल्याखेरीज कोणतंही यश मिळवता येत नाही. नावं घेतली नाहीत, तरी अशी कितीतरी नावं आपल्या डोळ्यासमोर येतील की दोघांमध्येही समान प्रतीचं टॅलेंट खचाखच भरलेलं होतं. एकजण आपल्या टेंपरामेंटच्या बळावर टिकून राहतो. यशस्वी होतो, आणि दुसरा मात्र टेंपरामेंटअभावी वाहवत जातो. यशस्वी होण्यासाठी आणि त्या पेक्षाही ते टिकविण्यासाठी कष्ट, जिद्द आणि चिकाटी या गोष्टींची सदोदित साथ ठेवावी लागते. विजय तेंडुलकर हे खूप गंभीर आजारी होते. मात्र, अगदी निधनाच्या दोन दिवस आधीपर्यंत नवीन आलेला चित्रपट डाऊनलोड करून पाहात होते. किंवा अमिताभ बच्चन हे एखाद्या वाहिनीला चार ओळींच्या मराठीतून शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा घरात त्याचा सराव करताना दिसतात. ही उदाहरण आपल्यातलीच आहेत. त्यांच्याकडून आपण कधी शिकणार?
मायकल एंजेलोच्या अप्रतिम मूर्ती पाहून एकानं त्यांना विचारलं, या ओबडधोबड दगडांतून इतक्या सुरेख मूर्ती आपण कशा काय बरं घडवता?, त्यावर त्यानं खूप मार्मिक उत्तर दिलं. म्हणाला, त्या दगडात ती मूर्ती आधीच असते. मी फक्त तिच्यावरचा अनावश्यक भाग बाजूला करतो, इतकंच!
आपल्या सर्वांच्यात सर्व गोष्टी असतात. पण, त्यावरची आच्छादनं काढून त्या खुल्या मात्र करता आल्या पाहिजेत आपल्याला. आपल्यातलं जे हवं ते घेताना नको त्या गोष्टी काढून टाकण्याचं कसब मात्र आपल्यालाच आपल्यात विकसित करावं लागेल.
या पार्श्वभूमीवर आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं; ज्या निसर्गानं आपल्याला भरभरून दिलंय, त्या निसर्गाचं, काही तरी देणं लागतो आहोत. त्यासाठी काही तरी केलं पाहिजे, ही जाणीवही मनात ठेवली पाहिजे. या जाणीवांतूनच माझे मित्र नीलेश निमकर आणि इतर काही मित्रांच्या साथीनं आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी 'क्वेस्ट' या एनजीओची स्थापना केली. मुंबईसारख्या महानगरापासून अगदी दीडशे किलोमीटर असलेल्या या गावांत राहणारे आदिवासी आजही प्रगतीपासून कित्येक पिढ्या मागे आहेत. त्यांना मूलभूत शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. हे काम चांगल्या तऱ्हेनं करण्याचा, करत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातल्या वनकुसवडे या गावात आम्ही काही मित्रांनी मिळून २४ एकर नापीक जमीन विकत घेतली आहे. त्यावर जंगल उगवण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. त्यासाठी अथकपणे काम करीत आहोत. आमच्या हयातीत सुद्धा हे जंगल वाढेल, याची शक्यता नाही. मात्र, आम्ही आहोत, तोवर हे काम करत राहणारच. पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठी आपल्यातल्या प्रत्येकानं हे करायलाच हवं.
(शब्दांकन: आलोक जत्राटकर)

गुरुवार, १९ मार्च, २०१५

ऊर्जा-1: किताबों से ज्यादा जिंदगी सिखाती है। : सुभाष घई



(शिवाजी विद्यापीठ आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' हा विविध क्षेत्रांत संघर्षातून यश मिळविणाऱ्या तसंच माणूसपण जपणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखतीचा, संवादाचा उपक्रम गेल्या १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाच्या लोककला केंद्राच्या भव्य खुल्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा सातत्याने वाढता प्रतिसाद लाभला. त्यांचे शब्दांकन करून माझ्या ब्लॉग वाचकांना या मुलाखतींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याचा मानस होता. तो आजपासून सिद्धीस नेतो आहे. 
या उपक्रमामध्ये पहिले पुष्प गुंफले ते ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक श्री. सुभाष घई यांनी. त्यांचे मनोगत वाचा त्यांच्याच शब्दांत...)


कोल्हापूरकरांना सुभाष घईचा प्रेमपूर्वक नमस्कार. कलापूर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या नगरीत इतक्या मोठ्या संख्येनं आणि अत्यंत प्रेमानं आपण सर्वांनी माझं स्वागत केलंत, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी असलेल्या या कलानगरीनं अनेक दिग्गज, कसदार कलाकार घडविले आहेत, दिले आहेत. माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर महाराष्ट्राचा, मराठीचा खूप मोठा प्रभाव आहे. माझ्या अनेक चित्रपटांचं संवाद लेखन राम केळकर यांनी तर संकलन वामन भोसले यांनी केलं आहे. त्यांच्याखेरीज माझ्या टीममध्ये अनेक मराठी कलाकार-तंत्रज्ञ आहेत. व्ही.शांताराम यांचं योगदान आणि पु.ल. देशपांडे यांच्या लेखनाचाही माझ्यावर खूप मोठा प्रभाव राहिला आहे.
रसिक हो, माझ्यावर हा प्रभाव असण्याचं कारण म्हणजे माझा जन्म नागपूरचा. वडिल डेंटिस्ट असल्यानं त्यांच्याबरोबर पुढं आम्ही दिल्लीला गेलो. तिथंच माझं बहुतेक शिक्षण झालं. मला अभिनयाची सुरवातीपासून आवड होती, पण वडिलांना मात्र मी सीए व्हावं, असं वाटायचं. कॉलेजमध्ये मी अभिनयाबरोबर नाटकांचं दिग्दर्शनही करायचो, पण साराच हौसेचा मामला. वडिलांना हे काही पसंत नव्हतं. पण, एके दिवशी मनाचा निश्चय करून त्यांना माझ्या आवडीविषयी सांगितलं आणि याच क्षेत्रात काही तरी करण्याची इच्छा असल्याचंही सांगितलं. वडील काही बोलले नाहीत, पण त्यांनी अडवलंही नाही. मी अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी थेट पुण्यात एफटीआयआय गाठलं. तिथं रितसर प्रशिक्षण घेतलं. पण, केवळ प्रशिक्षण घेतलं म्हणून संघर्ष संपला, असं कुठाय? खरा संघर्ष त्यानंतर सुरू झाला. मुंबईत आलो. सात-आठ वर्षं स्क्रिप्ट लिहीणं आणि स्टुडिओच्या चकरा मारणं सुरू होतं. एकदा निर्माते एन.एन. सिप्पी यांना एक स्क्रीप्ट घेऊन भेटलो. त्यांनी ती पाहिली, म्हणाले, 'दिग्दर्शन कोणी करावं, असं वाटतं?' मी उत्तरलो, 'मलाच करायचंय.' त्यावर ते काहीसे चकित झाले. त्यांनी विचारलं, 'यापूर्वी कधी चित्रपटात काम केलंयत? कधी चित्रपटांशी काही संबंध?' मी उत्तरलो, 'नाही.' त्यांनी पुन्हा विचारलं, 'कधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तरी काम केलंयत का?' मी पुन्हा उत्तरलो, 'नाही.' यावर त्यांनी 'ठीक आहे. पाहू या,' असं म्हणून माझी बोळवण केली. त्यानंतर खूप दिवसांनी त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, 'आज संध्याकाळी एक सेलिब्रेशन पार्टी आहे. तिथं या.' असं म्हणून त्यांनी पत्ता सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणं मी ठरलेल्या वेळी पार्टीत पोहोचलो. सिप्पी साहेबांची काही लोकांची बातचीत चाललेली होती. मला पाहून त्यांनी जवळ बोलावलं आणि आपल्या पाहुण्यांना माझा परिचय करून देत म्हणाले, हे सुभाष घई. माझ्या पुढच्या चित्रपटाचे दिग्दर्शक!' या त्यांच्या वाक्यानं मी उडालोच. पण, त्यांनी गंमत केली नव्हती. सिरीयस होते. आणि अशा तऱ्हेनं माझ्या कन्व्हिन्सिंग पॉवरमुळं मला पहिला चित्रपट मिळाला.
कालांतरानं मी माझी पत्नी मुक्ताच्या नावानंच मुक्ता आर्ट्स नावाची कंपनी उघडली. त्या माध्यमातून एकापेक्षा एक उत्तम चित्रपट देण्याचा प्रयत्न केला. ओळीनं सिल्व्हर ज्युबिली चित्रपट देण्याचा विक्रम माझ्या नावावर जमा झाला. या चित्रपटांनी मला भरभरून दिलं. मीनाक्षी शेषाद्रीपासून ते माधुरी, मनिषा कोईराला ते अगदी महिमा चौधरीपर्यंत अनेक टॅलेंटेड गुणी अभिनेत्रींना, जॅकी श्रॉफसारख्या अभिनेत्याला माझ्या चित्रपटांतून मी लाँच करू शकलो.
पण, आयुष्यात सर्वाधिक समाधानाचा प्रसंग सांगावयाचा झाला, तर माझ्या एका चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला मी माझ्या वडिलांना आवर्जून घेऊन आलो होतो. प्रकृती बरी नसल्यानं शेजारच्या खोलीत त्यांची व्यवस्था केली होती. त्या पार्टीला दिलीप कुमार आणि राज कपूर आले होते. या दोघांनीही माझ्याकडं 'आपले वडील कुठायत?' अशी विचारणा केली. मी त्यांना वडिलांकडे घेऊन गेलो. दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला. माझ्या वडिलांनी त्यांच्या चेहऱ्यावर तसेही कधी भाव दर्शविले नव्हते. पण, त्याक्षणी एक अस्फुटशी स्मितरेषा उमटलेली आणि डोळ्यांत काहीसं पाणी तरळल्यासारखं मला वाटलं. हा क्षण माझ्या हृदयात कायमस्वरुपी बंदिस्त झालेला आहे.
मित्र हो, आपणा सर्वांनाच आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असतं, खूप काही मिळवायचं असतं. पण, केवळ पुस्तकं वाचूनच सारं मिळेल, या भ्रमात मात्र राहू नका. आयुष्यात येणारे निरनिराळे अनुभव आपल्याला खूप काही शिकवत असतात. त्यापासून धडा घ्यायला हवा. आमच्या काळी चित्रपट बनवित असताना सारा इमॅजिनेशनचा मामला असायचा. आकाशाकडे डोळे लावून आम्हाला प्रत्येक दृष्याचा विचार करावा लागायचा. पूर्वी दिग्दर्शक आणि अभिनेत्यांत गुरू-शिष्याचं नातं असायचं. पण, आता अभिनेताच दिग्दर्शकाचा गुरू होऊन बसलाय. काळाचा महिमा. दुसरं काय? पण, त्यामुळं माध्यमाचं मोठं नुकसान होतं आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
आता पूर्वीसारखी परिस्थिती नाहीय. स्मार्टफोन, टॅब्लेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला झालेला आहे. मात्र, त्याचा यथायोग्य वापर करून ज्ञानसंपन्न होण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागणार आहेत. विद्यापीठांनाही त्यांची पॉलिसी आणि पुस्तकं सुद्धा बदलावी लागणार आहेत. आपल्या पॉलिसी मेकर्सनाही याची जाणीव निर्माण होण्याची गरज आहे. एकदा एका नेत्याला मी विचारलं, 'सर, पॉलिटिक्स म्हणजे काय?' त्यावर ते उत्तरले, 'बडाही आसान है। इसको उठाओ, उस को गिराओ और उसको उठा के इस को गिराओ।' मी पाहातच राहिलो. मग मीच त्यांना सांगितलं, 'सर, पॉलिटिक्स म्हणजे पॉलिसी मेकिंग आहे. समाजाच्या कल्याणासाठी चांगल्या योजना बनविणं आणि त्या राबविणं, हे खरं पॉलिटिक्स'. पण लक्षात कोण घेतो? मित्र हो, म्हणून वाचत असताना, शिकत असताना कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. शब्दाशब्दाचा अर्थ समजून घ्यायला विद्यार्थ्यांचं प्राधान्य असायला हवं. ते समजून घेत पुढं गेलात, तर हळूहळू आयुष्याचाच अर्थ नव्यानं तुमच्यासमोर सामोरा आल्याशिवाय राहणार नाही.
मित्र हो, चित्रपटांकडं पाहण्याचा आजही आपला दृष्टीकोन हा खूप संकुचित आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार पावलेल्या या क्षेत्रात शास्त्रशुद्ध ज्ञानाची अद्यापही प्रचंड वानवा आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आणि आयुष्यात बरंच काही मिळविल्यानंतर मी माझी सारी मिळकत खर्ची घालून 'व्हिसलिंग वूड्स' ही चित्रपटविषयक हरतऱ्हेचं प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट उभी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॉप टेन संस्थांमध्ये या संस्थेचा अल्पावधीत समावेश झाला आहे. इथे शुल्क आकारले जातेच, पण केवळ फी भरू शकत नाही, म्हणून तळमळीनं शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला काढून टाकलं असं मात्र होत नाही.
आज याठिकाणी उपस्थित असलेल्या अमोल मांगे या माझ्या विद्यार्थ्याचंच उदाहरण देतो. जेमतेम कौटुंबिक परिस्थितीतला अमोल छत्तीसगडमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेला. कशीबशी पहिल्या वर्षाची फी त्यानं भरली. पुढच्या वर्षीची फी भरण्याची क्षमताच नव्हती. जड अंतःकरणानं त्यानं इन्स्टिट्यूट सोडण्याचा निर्णय घेतला. मला यातलं काहीच माहिती नव्हतं. त्यावेळी नसिरुद्दीन शाह शिकवायला येत असत. ते एकदा मला म्हणाले, 'सुभाष जी, एक बडाही टॅलंटेड लडका है- अमोल मांगे नाम का। वह इन्स्टिट्यूट छोडने की बात कर रहा है। जरा देखिए।' त्यावर मी अमोलला बोलावून घेतलं. त्याची अडचण माझ्या लक्षात आली. मी त्याला म्हणालो, 'कोई बात नहीं बेटा। तुम कुछ मत सोचो। सिर्फ अपनी पढाई पर ध्यान दो। और आज मुझे फक्र है, की वही अमोल आज फिल्म इंडस्ट्री में अपना मुकाम पाने की तरफ आगे बढ रहा है। और क्या चाहिए?' तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा तुमच्या अडचणींवर मात करायला मदत करते, ती अशी!
                                                                                                                     (शब्दांकन: आलोक जत्राटकर)