गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

बाबासाहेबांची प्रस्तुतता



(येत्या १४ एप्रिल २०१८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी तथा बी.आर. आंबेडकर यांना सारा देश बाबासाहेब म्हणून ओळखतो, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडतो. ज्यांना ती ओढ वाटत नाही, ते सुद्धा त्यांचे ईप्सित साध्य करण्यासाठी बाबासाहेबांशी जवळीक साधू पाहतात; ती जवळीक आपण साधतो आहोत, हे दर्शविण्याची अहमहमिका अशा दांभिकांत लागलेली असते. मात्र, या दांभिकांच्या तुलनेत बाबासाहेबांवर ओसंडून प्रेम करणाऱ्या जनतेची संख्या मात्र लक्षणीय. ही जनता महत्त्वाची व्होटबँक असल्यानं त्यांचं लांगुलचालन करणं, ही काहींची अपरिहार्यता बनलेली असते आणि त्या अपरिहार्यतेचा मार्ग बाबासाहेबांच्या नावापासून सुरू होतो.
अलीकडच्या काळात बहुतांश भारतीय समाजाला एक जाणीव होऊ लागली आहे, ती म्हणजे बाबासाहेबांना केवळ दलितांचे नेते ठरविणे अगर केवळ राज्यघटनेच्या शिल्पकारितेपुरतेच मर्यादित राखणे, हा इतिहासाने आणि वर्तमानाने त्यांच्यावर केलेला मोठा अन्याय आहे. नेत्यांच्या या संकोचीकरणाला सर्वप्रथम कारणीभूत ठरतात, ती म्हणजे आपली क्रमिक पुस्तके होय. या पुस्तकांतून महापुरूषांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे हा प्रधान हेतू असला तरी, त्यांच्या प्रतिमा एखाद्या विशेषणानं पार संकुचित करून टाकल्या जातात. त्यापासून बाबासाहेबांची तर सुटका नाहीच; पण, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदीही सुटलेले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर मग पुढच्या काळात जातीय राजकारणाच्या टोकदार अस्मितांचे इतके उदात्तीकरण केले जाते की, त्यापोटी या महापुरूषांना जातीच्या चौकटीतच करकचून बांधून टाकले जाते. एकदा का त्यांच्याकडे पाहण्याचा आणि अनुसरण्याचा दृष्टीकोनच संकुचित करून टाकला की, मग आमच्या नेत्यावर हक्क केवळ आमचाच; तुमच्या नेत्याशी आमचा काय संबंध?’ अशा प्रकारच्या भावनांतून या महापुरूषांना त्यांचे अनुयायीच सर्वप्रथम संकुचित करून त्यांचे विचार आणि कार्य यांना संपविण्याच्या कामाला हातभार लावायला सुरवात करतात. याच्या पुढची पायरी असते, ती म्हणजे दैवतीकरणाची! एखाद्या व्यक्तीला इतक्या महानपणाच्या बुरूजावर चढवून ठेवायचे की, त्याच्या कार्याची, विचारांची चिकित्सा केलेली सुद्धा खपवून घेतली जात नाही. सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांचे पुतळे आणि स्मारके उभारून अनुयायांना त्याच दांभिक अस्मितांच्या घेऱ्यात गुरफटून टाकले जाते. मुंबईत फिरोझशहा मेहता यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव समोर आला असताना त्यावर पुतळे, मूर्ती आदी स्मारक म्हणून उभारण्यापेक्षा त्यांच्या स्मरणार्थ उत्तम ग्रंथालये, वाचनालये उभारा, अशी सूचना बाबासाहेबांनी केलेली होती. ज्ञानसंपादन आणि ज्ञानप्रसार या कामी ग्रंथालयांचे महत्त्व बाबासाहेबांनी जाणले होते. म्हणून तशी सूचना ते करू शकले. ग्रंथालयांच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यान् पिढ्या घडत राहतील, असा त्यांना विश्वास होता. पण, आजकाल आपल्या अस्मिता भौतिक बाबींवर अधिक केंद्रिभूत झालेल्या आहेत. ज्ञानासारख्या अभौतिक पण चिरंतन बाबीपासून तात्कालिक लाभ मिळविता येणे अशक्य असते. पण, स्मारक, पुतळे यांच्याभोवती तथाकथित अस्मितांचे केंद्रीकरण करून त्याचा लाभ तत्परतेने उठविता येणे सहजशक्य असते. ज्या लोकांनी हयातभर विभूतीपूजेच्या विरोधात काम केले, त्यांच्या अनुयायांनाच विभूतीपुजेला प्रेरित करून त्यांच्या वंदनीय नेत्याबद्दल आपल्या मनातील ममत्व मोठ्या कौशल्याने त्यांच्या मनावर बिंबविले जाते. या विभूतीपुजेमध्ये एक बरे असते, उदबत्त्या, मेणबत्त्या पेटवून नमस्कार केला की, बाकी काही करण्याची गरज उरत नाही. यातून प्रेमाचे, आदराचे प्रदर्शनही होते आणि तथाकथित अस्मिताही जपली जाते. ही विभूतीपूजा नाकारायची म्हटले तर दोन गोष्टी कराव्या लागत असतात. पहिली म्हणजे या विभूतीपूजेसाठी नादावलेल्या लोकांच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवावा लागत असतो आणि दुसरी म्हणजे त्या नेत्याच्या विचारांचा, प्रबोधनाचा जागर घालावा लागत असतो; जी दीर्घकालीन, दूरगामी पण हमखास परिणाकारक प्रक्रिया आहे. पण, पहिल्या गोष्टीसाठी बहुसंख्य अनुयायांसमोर आपला आवाज क्षीण पडतो आणि दुसऱ्यासाठी चिकित्सक अभ्यासाची नितांत गरज असते. आजकाल अशा दुसऱ्या पद्धतीच्या नेतृत्वाची, चिंतनशील कार्यकर्त्यांच्या फळीची चळवळीला मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली आहे.
पण... नेमकी इथेही मोठी गोची करून ठेवण्यात आली आहे. भांडवलशाहीच्या बाजारपेठीय चक्रव्यूहात आज समस्त समाज हा केवळ ग्राहक मात्र बनून राहिलेला आहे. या भोवतालात, भांडवलदारांच्या जाहिरातींच्या भडिमारात या ग्राहकाला सर्व प्रकारच्या क्रय-विक्रयाचे अधिकार (?) आहेत, पण त्यासाठी या बाजारपेठीय व्यवस्थेची एकच पूर्वअट असते, ती म्हणजे ग्राहकाने आपले डोके अजिबात चालवायचे नाही. त्याने त्याचे डोके (न वापरता) सांभाळले की, बाकी सारे काही या व्यवस्थेमध्ये सांभाळून घेतले जाते. असा नागरिक या नव-भांडवलदारी व्यवस्थेत अत्यंत सुजाण गणला जातो. डोके वापरणारा, विचार करणारा ग्राहक मात्र या व्यवस्थेसाठी अत्यंत घातक, धोकादायक असतो. त्यामुळे अशा विचार करणाऱ्या, विचार देणाऱ्या अल्पसंख्य डोक्यांचा सद्यस्थितीत धोका नसला तरी, दूरगामी धोका ओळखून त्यांचा बंदोबस्त करण्याकडे या व्यवस्थेचा कल असतो. अशा व्यवस्थेपुढे अनुयायांनी शरणागत होणे, हे कोणत्याही चळवळीला परवडणारे नसते. आज देशात अशा डोके वर काढणाऱ्या चळवळींचे स्वरुप एखाद्या वळवळीपलीकडे जात नाही. माध्यमांतून त्यांचा आवाज मोठा केला जात असला तरी, पुन्हा त्यांनी उपस्थित केलेल्या सामाजिक-आर्थिक मुद्यांपेक्षा त्यातील राजकारणाचे उदात्तीकरण करून ते सादर करण्याकडे मोठा कल झुकू लागतो. त्यातून त्या आरोप-प्रत्यारोपात चळवळीचा मूळ हेतू मागे पडतो आणि आपोआपच तिचा दबावही कमी होतो. व्यवस्थेवर दबाव निर्माण होण्यापूर्वीच त्यातील हवा काढून घेण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जातात. कार्यकर्ते पुन्हा कोशात जातात. आजच्या भोवतालात असे चळवळींनी सातत्याने कोशात जाणे भारतीय समाजाच्या दृष्टीने हितावह नाही, परवडणारे नाही.
नेमकी याच वेळी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार व कार्याचे स्मरण करून कृती करण्याची गरज नव्याने अधोरेखित होते आहे. या तिघांचे नाव एकमेकांपासून भिन्न किंवा वेगळे करता येणारे नाही. कारण ही केवळ तीन व्यक्तींची नावे नाहीत, तर या देशात सामाजिक समतेचे वादळ निर्माण करणारी एक अखंड प्रवाहित झालेली ती विचारधारा आहे. या विचारधारेची सुरवात महात्मा फुले यांच्या कृतीशील सामाजिक, शैक्षणिक कार्यापासून होते. राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांची ही कृतीशीलता अधिक गतिमान करीत असताना आपल्या संस्थानासह बाहेरील प्रांतातही सुरू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या कार्याला बळ देण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील सामाजिक कार्याचे स्फुल्लिंग फुंकर घालून अधिक चेतवण्याचे मोठे कार्य राजर्षींनी केले. राजर्षींच्या या विश्वासाला सार्थ करीत असताना भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना राज्यघटनेच्या माध्यमातून करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी साध्य केले. भारताला एक देश म्हणून खऱ्या अर्थाने संघटित करीत असताना या राज्यघटनेच्या छत्राखालील प्रत्येक नागरिकाला भारतीय ही ओळख प्रदान करण्याचे काम बाबासाहेबांनी केले, ही बाब येथे लक्षात घ्यायला हवी.
विषमताधिष्ठित शोषण परंपरा असलेल्या भारतीय समाजाला लोकशाहीच्या व्यासपीठावर आणून एक व्यक्ती, एक मत अशी समता बाबासाहेबांनी प्रदान केली खरी, तथापि, अद्याप एक व्यक्ती, एक मूल्य हा प्रवास आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. भारतीयांच्या मनीमानसी उच्चनीचतेची बीजे खूप खोलवर रुजलेली आहेत. त्यांना खतपाणी घालून एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्यासाठी प्रेरित केले जाते. त्यांच्या या दांभिक अस्मितांना धुमारे फोडून धुमसत ठेवण्यामध्ये अनेकांचे अनेक प्रकारचे स्वार्थ दडलेले असतात. पण, खोट्या प्रतिष्ठेपायी त्या स्वार्थांकडे दुर्लक्ष करून आपल्यापेक्षा खालच्याला तुडविण्याचे काम करण्याकडे कल वाढू लागतो. खालच्याला हात देऊन वर उचलण्याचे समतेचे महत्त्वाचे तत्त्व या क्षणी पायदळी तुडविले जात असते, याचे स्वाभाविक भान सुटणे हे प्रगल्भ समाजाचे लक्षण नव्हे. या सामाजिक जाणीवांची रुजवात शंभर वर्षांपूर्वी जितक्या प्रगल्भतेने केली जात होती, त्या विचारांची स्वीकारार्हता शंभर वर्षांनंतरही आपल्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही, हे चांगले नव्हे. उलट, आपल्या मानसिक, सामाजिक अधोगतीचे ते द्योतक होय. या अधोगतीतून आपण एक राष्ट्र म्हणून कधीही एकदिलाने, खांद्याला खांदा लावून उभे राहू शकत नाही. विषमतेच्या पायावर कधीही समतेच्या मूल्यांची उभारणी होऊ शकत नाही, ही सहज स्वाभाविक बाब जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही, तोपर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता कमी होणार नाही. उलट, भारतीय समाजाला अधिक प्रकर्षाने त्यांची गरज भासत राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा