(दि. ११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा
जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म झाला. उद्या त्यांची १९१वी जयंती साजरी होते आहे.
त्या निमित्ताने फुले दांपत्याच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण.)
महात्मा
जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे दांपत्य म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातलं एक अत्यंत अलौकिक असं दांपत्य आहे. सुमारे १६० वर्षांपूर्वी त्यांनी समतेची, स्त्री-पुरूष समानतेची आणि सामाजिक न्यायाची जी चळवळ उभारली तिला महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात तोड नाही. विद्येविना दलित-बहुजनांची, स्त्रियांची प्रगती शक्य नाही, ही बाब लक्षात घेऊन या दांपत्यानं शिक्षणाच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य वेचलं.
सन १८५४-५५ मध्ये मुलींसाठी पहिली एतद्देशीय शाळा स्थापन करून त्यांनी देशाच्याच शैक्षणिक चळवळीचा प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी हा ज्ञानयज्ञ आरंभला, त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं २१ वर्षांचं, तर सावित्रीबाईंचं होतं केवळ १८ वर्षं. घर सोडावं लागलं, प्रतिगाम्यांनी अंगावर चिखल टाकला, अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरी हाती घेतलेल्या व्रतापासून तसूभरही न ढळता या दांपत्यानं आपलं कार्य अखंड चालवलं. त्या काळात विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर महात्मा फुले यांनी भर दिला.
शाळांतून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी सुद्धा त्यांनी काही उपाय अंमलात आणले होते. गरीबी आणि शिक्षणात रस नसणे ही दोन प्रमुख कारणे या गळतीमागे असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याची योजना फुल्यांनी त्या काळात सुरू केली होती. त्याचप्रमाणं विद्यार्थ्यांना शिकण्यात गोडी वाटेल, अशा विषयांचा त्यांनी अभ्यासक्रमात समावेश केला. दलित आणि बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाटावा, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पालकांच्या प्रबोधनाची मोहीमही त्यांनी हाती घेतली होती.
शिक्षणाखेरीज अन्य सामाजिक कार्यासाठी महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी पुरोहितविरहित, हुंडाविरहित अल्पखर्चातील विवाह घडवून आणण्याचं विधायक कार्य आरंभलं. हजारो वर्षांच्या प्रथा-परंपरेला छेद देण्याचं मोठं काम यातून घडलं. आजची `रजिस्टर्ड मॅरेजेस` तरी याहून कुठं वेगळी असतात?
आपल्या गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड या पुस्तकांच्या माध्यमातून फुले यांनी अनेक समकालीन प्रश्नांचा, समस्यांचा इतका सूक्ष्मपणे वेध घेतला आहे आणि उपाय सुचविले आहेत की, आजच्या काळातील समस्यांवरही त्यांचे उपाय लागू पडतात. महात्मा फुले यांनी सांगितलेले `त्रि-भाषा सूत्र` तर आजसुद्धा आपल्या संपूर्ण देशात लागू असलेले दिसते.
महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एक समाजसुधारकाचेच नव्हते, तर अत्यंत बहुआयामी स्वरुपाचे होते. पुणे कमर्शियल ॲन्ड कॉन्ट्रक्टिंग कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. कॉन्ट्रक्टर म्हणून खडकवासला धरण, पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज बोगदा, पुणे-नगर रस्त्यावरील बंडगार्डन पूल अशी कामं त्यांच्या नावावर जमा आहेत.
सन १८७६ ते १८८२ या सहा वर्षांच्या कालावधीत पुणे शहराचे कमिशनर म्हणून काम करत असताना महात्मा फुले यांनी शहरातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, शाळा आदींविषयक समस्या दूर करण्यावर भर दिला.
महात्मा फुले यांना शेअर मार्केटचंही उत्तम ज्ञान होतं. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये सहभागी व्हावं, असं त्यांना वाटे. त्यामुळंच शेअर मार्केटमध्ये व्यवहार कसा करावा, याविषयीही त्यांनी आपल्या अखंडांतून मार्गदर्शन केल्याचं आपल्याला दिसतं.
एकूणच शाळांतून विद्यार्थी गळती, तंत्रशिक्षणाचं महत्त्व, महिला सक्षमीकरण, सिंचन सुविधा, जल व्यवस्थापन, सर्वांना सक्तीचं आणि हक्काचं शिक्षण अशा ज्या अनेक गोष्टी अंमलात आणण्यासाठी आज आपण धडपडतो आहोत, त्या फुले दांपत्यानं सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच कृतीत आणल्या होत्या, ही गोष्ट लक्षात घेतली तरी त्यांच्या क्रांतिकारक दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला येतो. महात्मा फुले केवळ समाजसुधारकच नव्हते, तर पायाभूत सुविधांचेही कृतीशील विकासक होते, हीच बाब उपरोक्त गोष्टींवरून अधोरेखित होते.
संदर्भ:
१.
महात्मा फुले समग्र
वाङ्मय: (संपा.) कीर
धनंजय, मालशे सं.ग., फडके य.दि., महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
मुंबई (सुधारित, सहावी आवृत्ती), नोव्हेंबर २००६
२.
प्रा. हरी नरके
यांच्याशी वेळोवेळी झालेली चर्चा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा