सोमवार, ९ एप्रिल, २०१८

अठरा वर्षांनी झाली मित्रभेट...

श्रीमान पी.व्ही. देसाई विद्यालयाच्या प्रांगणात माझ्यासह (डावीकडून) केदार तेऊरवाडकर, मधुकर कांबळे आणि माझे बाबा डॉ. एन.डी. जत्राटकर.

सहाव्या पद्मश्री रणजीत देसाई युवा साहित्य संमेलनातील परिसंवादात सहभागी होण्याच्या निमित्ताने काल (दि. ८ एप्रिल २०१८) कोवाड (ता. चंदगड) येथे गेलो होतो. श्रीमान व्ही.पी. देसाई उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील संमेलनस्थळी दाखल झालो. सभामंडपात प्रविष्ट होणार तोच समोरुन एक हसतमुख वामनमूर्ती येताना दिसली. मी क्षणभर त्यांच्याकडं पाहिलं आणि फोकस करून आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. मला एवढंच आठवलं की, त्यांची ओळख ही केवळ तोंडओळख नाही, तर त्याहून अधिक घट्ट असं नातं आमच्यात होतं. पण, ते नेमकं कसं, ते मात्र आठवत नव्हतं. माझ्यासारखीच त्यांचीही अवस्था झाली असावी. मात्र, मी तिथं येतो आहे, याची माहिती असल्यानं माझ्याइतके ते ब्लँक नव्हते. ती व्यक्ती तेच निर्मळ हास्य घेऊन सामोरी आली, माझ्याशी घट्ट हस्तांदोलन करून म्हणाली, मी केदार... भवन!”
या दोन शब्दांनी काळाचा पडदा विरळ झाला आणि मी पोहोचलो थेट वीस वर्षांपूर्वीच्या विद्यापीठातील हॉस्टेल जीवनात... केदार तेऊरवाडकर... माझा हॉस्टेल मेट... म्हणजे मी हॉस्टेलमध्ये आणि केदार कमवा आणि शिका योजनेखालील डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमध्ये. त्यावेळी तीन नंबर हॉस्टेलची मेस भवनचे विद्यार्थी चालवित असत... केदार वाढपी असायचा. अत्यंत हसतमुख अशा केदारशी आमचं सूत एकदम मस्त जुळायचं. त्याचं बोलणं, आपुलकीचं हास्य यामुळं त्याच्याशी बहुतेक साऱ्यांचाच उत्तम स्नेह निर्माण झाला होता. किंबहुना, त्यावेळच्या भवनच्या कित्येक मित्रांशी जिव्हाळा जुळलेला होता.
हॉस्टेल सुटल्यानंतर केदारशी भेटीचा योग कधी आलाच नव्हता. आता भेटलो ते थेट अठरा वर्षांनंतरच. आज केदार कोवाडच्या त्या देसाई विद्यालयात शिक्षक आहे, ज्या विद्यालयाचा कधी काळी तो विद्यार्थी होता. त्याचबरोबर किटवाड या त्याच्या गावचा सरपंचही आहे. मधल्या काळात त्याच्या ग्रामपंचायतीचा शिपाई त्याच्या स्टाफरुमध्ये येऊन काही पत्रव्यवहारांवर त्याच्या सह्या घेऊन गेला. हे पाहात असताना त्याच्याबद्दल केवढा तरी अभिमान दाटून आला मनात. अत्यंत कष्टातून शिक्षण घेऊन उभ्या राहिलेल्या आमच्या या मित्रानं केलेली प्रगती ही किती तरी जणांसाठी प्रेरणादायक आहे. त्या काळात भवनमध्ये राहून शिकलेले अनेक मित्र आज शिक्षक, प्राध्यापक अशा किती तरी चांगल्या पोस्टवर काम करताहेत. या साऱ्यांबद्दलच अतीव आदर वाटतो मला. संमेलनाच्या निमित्तानं झालेली केदारची भेट ही आता कोवाडच्या संदर्भात आता मर्मबंधातली ठेव बनली आहे. काल दिवसभर त्याच्याशी बोलत असताना वीस वर्षांपूर्वीचा तो काळाचा पट उलगडत राहिला आणि अनेक आठवणी ताज्या झाल्या. आता पुन्हा भेटण्याचं, भेटत राहण्याचं आम्ही ठरवलंय.
ही भेट चिरस्मरणीय राहावी, यासाठी त्याच्या कॉलेजसमोर आम्ही हा फोटो घेतला. त्यात माझे वडील डॉ. एन.डी. जत्राटकर आहेत आणि सोबत मित्रवर्य मधुकर कांबळेही आहेत. मधुकर आणि केदारने संमेलनाच्या दरम्यान माझ्यापेक्षाही अधिक क्वालिटी वेळ माझ्या बाबांना दिला, हे विशेष नमूद करण्यासारखे!

२ टिप्पण्या: