सोमवार, २ एप्रिल, २०१८

दोष कुणाचा?

(लघु-कादंबरी: भाग-२)(मागील भागावरुन पुढे चालू...)
प्रकरण पाच:
महेशच्या मनातील खळबळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.  पण तो मला इतकंच म्हणाला, 'उद्या आपली गाडी घेऊन जाऊन तिचं सर्व सामान घेऊन ये.  माडीवरची खोली तिला देवूया.'
प्रीतीला येऊन आता बरेच दिवस झाले होते.  महेश शक्यतो तिला टाळायलाच बघायचा.  प्रीतीही जास्ती ताणत नसे.  ती तर स्वत:ला अगदी झोकून देऊन पप्पांची सेवा करत असे.  अलिकडे त्यांची तब्येत वारंवार बिघडू लागली होती.  पण प्रीती त्यांची अगदी मनापासून देखभाल करीत असे.  महेशसुध्दा कितीदातरी ती अशी कामात असली की पहात रहायचा.
एक दिवस तो प्रीतीला म्हणाला,
'प्रीती, तु माझ्या वडीलांची अतिशय काळजी घेत्येयेस.  मीसुध्दा त्यांची एवढी काळजी घेतली नसती.  थैंक यू.  आय वील बी ऑलवेज ग्रेटफूल टू यू !' 
यावर प्रीती त्याला म्हणाली,
'महेश, मला कोणी नसताना पप्पांनीच माझी समजूत घातली.  मला आधार देऊन सावरलं.  त्यांची देखभाल करणं हे माझं आद्यकर्तव्य आहे. त्या माझ्याकडून काही कुचराई होणार नाही.  पण शेवटी परमेश्वराला जे मंजूर असेल तेच होईल.'
नंतर पप्पांची तब्येत फारच खालावत गेली.  त्यांना किडनीचा त्रास सुरु झाला.  दोन्ही किडनीज् निकामी झाल्या.  त्यामुळे त्यांना नियमित कालखंडाने डायलेसिससाठी न्यावे लागे.  पण प्रीती मात्र हे सर्व करत होती.  पण कृत्रिमरित्या तरी किती काळ मनुष्य तग धरणारअखेरीस पप्पा गेले.  अनंत आठवणी मागे ठेवून, पोरकेपणाची भावना मनाला देऊन !
पप्पांचे उत्तरकार्य पार पडले.  ताई, भावोजी आणि भाचा आले होते, ते सर्व परत गेले.  प्रीतीची अवस्था मात्र मला पाहवत नव्हती.  आठ दिवसांत किती निस्तेज झाली होती ती सर्व भावना मेल्याप्रमाणे एका ठिकाणीच ती बसून होती.  महेशही या दिवसात खोलीबाहेर काही पडला नव्हता.  सर्व कारभार मीच मग देखरेखीखाली ठेवला होता.  शेवटी बाकीची कामे बंद पडून चालणार नव्हते.  मी महेशला त्या दिवशी बळेच बाहेर काढले आणि गाडीत घालून त्याला ऑफिसच्या आवारात सोडले.  ऑफिसात त्याच्यासमोर कामाचा ढीग ठेवला.  मी बाहेर पडत असताना महेश एकच वाक्य पुटपुटला, 'पप्पा, अखेर तुम्हीही मला एकटंच सोडून गेलात ना?'  मी झटकन् बाहेर आलो.

****
             महेश आता व्यवस्थित सावरला होता.  पण प्रीती मात्र अजून उद्वीग्नावस्थेतच होती.  तिची समजूत कशी घालावी हेच मला कळेना.
            एक दिवस सकाळी सकाळी प्रीती तिचे सर्व साहित्य बॅगमध्ये भरत होती.  बहुतेक इथून जाण्याची तिची तयारी सुरु असावी, असं वाटून मी महेशला तसं सांगितलं.  हे ऐकून महेश तिच्या खोलीत गेला.  त्यानं तिला विचारलं,
'काय करत्येयेस प्रीती?'
'साहित्य बॅगमध्ये भरत्येय.'
'कुठे जाणार इथून?'  महेशचा प्रश्न.
'कुठं तरी जावंच लागेल.  केव्हातरी जायचंच होतं.  ज्यासाठी आले होते,  तेच काम नाही उरलं.  मग इथं थांबून काय करु?'
'प्रीती, तू जाणार असशील तर मी तुला अडवणार नाही.  पण तू कायम इथंच रहावंस अशीच पप्पांची इच्छा होती.  आणि...आणि आपल्यालाही एकमेकांच्या आधाराची गरज आहे.'
इतकं बोलून महेश झटकन निघून गेला. 
'वैनी', मी प्रीतीला महेश नसताना हीच हाक मारत असे, 'आता तुम्ही इथून जाऊच शकत नाही.  महेशला तुमची नितांत गरज आहे.आणि प्रीतीनेही आपली बॅग खोलीत नेवून ठेवली.

***
 पुण्यामध्ये कोथरुडच्या रम्य परिसरात एका बंगल्याचे कन्स्ट्रक्शनचे काम महेशने हाती घेतले होते.  पण तो मला त्या साइटवर कधीही पाठवत नसे.  अधूनमधून रसभरित वर्णने मात्र करीत असे.  तो बंगला कुणासाठी आहे.  हेही तो बोललेला नव्हता.  एकूणच या बंगल्यामुळे माझ्या मनात मात्र गैरसमज निर्माण झाला.  महेशचा माझ्याबद्दलचा विश्वास कमी झाला होता की काय माझ्या हातून अशी कोणती चूक घडली की आमच्यात असा दुरावा निर्माण झाला.  दुरावा म्हणता येणार नाही किंवा अविश्वासही म्हणता येणार नाही कारण एवढे एक बांधकाम सोडले तर इतर ठिकाणचे जवळजवळ सर्व बांधकाम मी माझ्या देखरेखीखाली करत होतो.  मग या बंगल्यातच असे एवढे काय होते की मी तिथे जायला अपात्र होतो ?
            सहा महिन्यानंतर त्या बंगल्याचे बांधकाम तसेच फिनिशींग झाल्याचे महेशने मला सांगितले.  पण मी मुद्दामच त्यात स्वारस्य दाखविले नाही.
            दुसऱ्या दिवशी महेशने मला त्याच्याबरोबर गाडीत घेतलं आणि गाडी कोथरुडकडे वळवली.  मी ओळखलं की, हा मला बहुतेक मला 'त्याच' बंगल्याकडे नेतोय.  पण मी काहीच न बोलता शांत बसलो.
            गाडी एका बंगल्यासमोर थांबली.  मी गाडीतून उतरलो आणि त्याकडे पहातच राहिलो.  'अप्रतिम' हा शब्दही तोकडा पडेल असेच बांधकाम झाले होते.  महेशचे एकूण यश हे त्याच्या अशा कामातच तर सामावलेले होते.  'जर हा बंगला मी घेतला असता तर' असा एक प्रश्न अवेळी माझ्या मनात डोकावला.
मी महेशला विचारले,
 'हा बंगला खरोखरच सुंदर झालाय.  पण मी जेव्हा तुला विचारायचो, तेव्हा तू मला टाळायचास.  आता तरी सांग की हा बंगला तू कोणासाठी बांधतोयस?'   
महेश मिस्कीलपणे हसत बोलला,
'साहेब, हा बंगला मी तुमच्यासाठीच बांधलाय..!'
'महेश का माझी थट्टा करतोयेस ? सरळ सांगणार असलास तर सांग नाहीतर राहू दे.'
'लक्ष्या, मी शक्यतो कोणाचीही थट्टा करीत नाही.  मी हा बंगला तुझ्या लग्नात तुला प्रेझेंट देणार आहे.'
'माझं लग्न?' मला आश्चर्याचा धक्का बसला.
या माझ्या प्रश्नावर महेशनं जे सांगितले त्यातलं मला काहीही माहित नव्हतं.  या पठ्ठ्याने नाशिकला माझ्या आई-वडिलांशी संधान साधले होते.  बाबांनी तिथलीच एक मुलगी - संगीता पसंत करुन घेतली होती, जी कधीकाळी माझी बालमैत्रीण होती. आता जवळजवळ ती विस्मरणातच गेली होती.  त्या स्मृती परत जाग्या झाल्या.  लहानपणीचा सर्व सुखाचा कालखंड डोळयासमोरुन गेला.  माझ्या वडिलांनी मात्र आयुष्यात पहिल्यांदाच मला अनुकुल असा निर्णय घेतल्याने मला त्यांचा अभिमान वाटला.  आईलाही मी केवळ मनातूनच भेटत होतो.  प्रत्यक्ष भेट नव्हतीच.
            माझ्या लग्नाचा एवढा निर्णय महश्याने घेतला होता पण मला कळूसुध्दा दिले नव्हते.  केवळ मैत्रीच्या एका धाग्यात बांधल्या गेलेल्या अशा माझ्यासाठी त्याने इतके काही केले होते.  हा एकच धागा जगातल्या इतर सर्व धाग्यांपेक्षा कितीतरी अतूट असा होता.  मी नकार दिला असता तर महेश फारच नाराज झाला असता.  म्हणून त्याने दिलेले प्रेझेंट मला नाकारावेसेही वाटेना !
           त्याने घरी गेल्यावर सर्व हकीकत प्रीतीला सांगितली.  तिलाही हे ऐकून आनंद झाला.  अलिकडे महेश प्रीतीशी व्यवस्थित बोलू लागला होता.  आपल्या पप्पांसाठी तिने घेतलेले कष्ट त्याला आठवत असल्याने तो तिचा कृतज्ञ होता.  तसेच, आपल्याशिवाय तिला कोणाचाही आधार नाही, याचीही जाणीव त्याने ठेवली होती.  पण म्हणून त्याने तिला कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवलेले नव्हते.  तिच्या मनाप्रमाणे तो तिला वागू देत होता.  तिला नर्सिंग करण्यापासूनही त्याने रोखलेले नव्हते.
      प्रीतीलाही याची जाणीव होतीच.  म्हणून तीसुध्दा महेश दुखावेल असे कधीही वागत नसे.  याप्रमाणे दोघेही आपापल्यापरीने एकमेकांना सांभाळत होते.  आणि मलाही तेच हवे होते.
       संगीताशी माझं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं.  लग्न नाशिकला झालं.  तिकडे ताईही आल्या होत्या.  त्या लग्न झाल्यावर लगेच परतल्या.  त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता मात्र मला सतत अस्वस्थ करीत होती.  एक ना एक दिवस ही अस्वस्थता संपून आनंद प्राप्त होणार आहे.  अशी आशाही मला होती. 
मी पुण्याला परतताना महेश वडीलांना म्हणाला,
'आता तुमचं वय झालंय.  तुम्ही आराम करायला पाहिजे.  इथलं सगळं विकून माझ्याबरोबर चला.  आणि उरलेलं आयुष्य समाधानात घालवा.  तुमच्या मुलाचं कर्तुत्व पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभेल.  तुमच्याकडून काहीही न घेता त्यानं तुमचं नांव मोठं केलं आहे.  तेव्हा तुम्ही चला.'
मला नव्हतं वाटलं की बाबा माझ्याबरोबर येतील.  पण महेशने त्यांच्यावर काय जादू केली होती कुणास ठाऊक बाबांनी तिथल्या दुसऱ्या एका व्यापाऱ्याशी बोलणी करुन घर आणि दुकान दोन्ही विकून टाकलं आणि ते, आईला घेऊन माझ्या घरी आले.  महेशने प्रेझेंट दिलेलं ते घर पाहून संगीता आणि आईबाबांना त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला.  कितीतरी वर्षानंतर मी माझ्या आईबाबांबरोबर रहात होतो.  त्यांचा सहवास अनुभवत होतो, ही सर्व केवळ महेशचीच कृपा होती.  माझ्या वडिलांचा स्वभाव बदलण्यालाही तोच कारणीभूत होता.  माझा नवा संसार मात्र व्यवस्थित सुरु झाला. माझ्या बायकोची आणि प्रीतीची आता चांगलीच ओळख झालेली होती.  त्या दोघी चांगल्या मैत्रिणीच बनल्या होत्या म्हणा ना !
            अशातच दुधात साखर पडली तशी गोड बातमी कोल्हापूरहून ताईंनी कळविली ती म्हणजे भावोजींची बदली पुण्याला झालेली होती.  त्यांना महेशने त्याच्याच घरी ठेवून घेतले.  आपली ताई आपल्याजवळ आल्याने तो निर्धास्त बनला होता.  प्रीतीनेही भावोजी आणि भाचरांचे मन जिंकून घेतले होते.  त्यांनाही आपली मामी पसंत होती.  लग्नाबद्दल मात्र कोणीच काही बोलत नव्हते.
            ताईंच्या सांगण्यावरुन 'आंतरराष्ट्रीय बालक दिना' निमित्त महेश 'आसरा' या लहान मुलांच्या अनाथाश्रमास कंपनीतर्फे मिठाई वाटण्यासाठी गेला होता.  तिथं तिथल्या प्रमुखांकडून त्याला त्या छोटया निरागस मुलांच्या वाईट परिस्थितीची कल्पना आली.  विना आई-बापांची पोरं कशी जगत असतील हीदोन महिन्यापासूनची ते बारा वर्षांपर्यंतची मुलं तिथं होती.  त्यांच्या विषयी महेशला अपार करुणा वाटू लागली.  यातल्या एका तरी मुलाला दत्तक घेऊन एक सामाजिक बांधीलकी राखावी, असा विचार करुन महेश घरी आला.  त्यानं ताईशी याबाबतीत चर्चा केली.  ताईंनीही आनंदानं त्याला पाठिंबा दिला.  मग ही गोष्ट त्यानं प्रीतीला सांगितली.  तिनंही त्याला होकार दिला.  पण महेशने त्यासाठी तिला नोकरी सोडून आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी राजी केले होते. 
            एक दिवस ते दोघं त्या अनाथालयात गेले.  तिथं ते एकच मूल घेणार होते.  पण मुलगा घ्यायचा की मुलगी या विषयावर त्यांचे काही एकमत होईना.  मग शेवई महेशने पाच वर्षांच्या अमितला तर प्रीतीने दोन वर्षांच्या साक्षीला पसंत केले.
            मी, संगीता, ताई, भावोजी आणि कुणाल (ताईंचा मुलगा) असे दारात त्यांच्या स्वागतासाठी उभे होतो.  बाहेर गाडीतून ही जोडगोळी जेव्हा एका ऐवजी दोन मुलांना घेऊन उतरली तेव्हाचे दृश्य मजेदार होते.  अमित जरी शांतपणे महेशच्या काखेत बसला होता.  तरी छोटया साक्षीला शांत करताना मात्र प्रीतीची धांदल होत होती.  त्यांना पाहून मी हळूच संगीताला म्हणालो,
'बघ. लग्न न करताच हे दोघं एकदम दोन मुलांचे आईबाप झालेत.  आता आमच्या नशीबात हे सुख केव्हा येणार देव जाणे!हे माझं वाक्य ऐकून संगीता अशी काही लाजली की सात जन्म त्या लाजण्यावर ओवाळून टाकण्याची माझी तयारी होती. 
            मुलांच्यात महेश आणि प्रीती दोघंही रमली होती.  साक्षी बोलण्याचा प्रयत्न करु लागली होती.  शिवाय ती बोट धरुन चालूही शकत होती.  अमित तर त्या दोघांना पप्पा, मम्मी म्हणूनच हाक मारीत असे.  त्यालाही महेशने बालवाडीत दाखल केले होते.
            यानंतरच महेशने आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला.  त्यानं मला आणि ताईंना बोलावून सांगितलं,
'ताई, पुढच्या आठवडयापासून मी ठाण्याच्या फाइव्ह स्टार हॉटेलचं काम सुरु करतोय.  कालच, तशी ऑर्डर मला मिळाली आहे.  हे काम माझ्या कारकीर्दीतलं सर्वात महत्त्वाचं आहे कारण प्रथमच मी पुण्याबाहेरचं एवढं मोठं काम हाती घेतोय.  एक दोन महिन्यात काम व्यवस्थित मार्गी लागलं की, मी आणि प्रीती विवाहबध्द होऊ.  नाहीतरी मुलांना आमचा लळा लागलाच आहे.  त्यामुळं लग्न ही फक्त एक फॉर्मेलिटी आहे.त्याच्या या निर्णयानं मी आणि ताई खरोखरच आनंदित झालो. 
 'देर से समझे लेकिन दुरुस्त समझे!' असा विचार करत ती आनंदाची बातमी संगिताला सांगण्यासाठी मी घराकडे जायला निघालो.
महेश ठाण्याच्या हॉटेलच्या बांधकामावर स्वत: हजर राहून काम व्यवस्थित चालवत होता.  त्याला पुण्याबाहेर करीअर करण्यासाठी या कामात काहीही कसूर ठेवून चालणार नव्हते.  त्याच्या गैरहजेरीत पुण्यातला कार्यभार मीच सांभाळत होतो.
            एक दिवस सकाळीच महेश दारी आला. म्हणाला, 'आज हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर स्लॅब टाकणार आहे.  त्यामुळं रात्री मी येऊ शकणार नाही.  सरळ उद्या रात्रीच येईन.  तू इकडे सर्व व्यवस्थित हैंडल कर, काही गरज लागलीच तर मी तुला ऑफिसमध्ये फोन करीनच.  उद्या भेटूच ! बाय.'   असे म्हणून त्याने त्याच्या फियाटमधून ठाण्याकडे कूच केले.
दुपारी ऑफिसमधला फोन घणघणला. 
'सर, ठाण्याहून असिस्टंट कॉन्ट्रॅक्टर मुल्ला यांचा फोन आहे.  तातडीने फोन द्यायला सांगताहेत.ऑपरेटरनं सांगितलं.
'लगेच जोडून दे.मी त्याला बोललो. 
'हॅलो, मॅनेजरसाहेब, मी मुल्ला बोलतोय.मुल्लाचा आवाज काहीसा थरथरत असल्यासारखं मला वाटलं.
'हो, बोला मुल्ला, भरदुपारी का फोन करताय? काही विशेष? साहेबांचा काही निरोप तर नाही ना?'
'सर, इकडं एक दुर्घटना घडली आहे.  स्लॅबचं काम पहात असताना साहेबांचा तिसऱ्या मजल्यावरुन तोल गेला.  काही समजायच्या आतच ते खाली पडले.  रक्तस्त्राव बराच झालाय.  त्यांना आम्ही इथल्या 'पाटील हॉस्पीटल' मध्ये दाखल केलं आहे.  डॉक्टरनी ऑपरेशनसाठी नेलं आहे.  पुढं काय करायचं ते तुम्हीच सांगा.'
मला काहीच सुचेनासं झालं...डोळ्यासमोर अंधारी येवू लागली...

  प्रकरण सहा
'मुल्ला, तुम्ही बांधकाम सुरु ठेवा.  मी पण लगेचच तिकडं यायला निघतोय.  मी येईपर्यंत तुम्ही हॉस्पीटलमध्येच थांबा.मी फोन ठेवला.
            पुढं काय करावं? हा विचार मला सतावू लागला.  आता लगेच तार्‌इंना, प्रीतीला काही सांगण्यात काही अर्थ नव्हता.  प्रत्यक्ष मी त्याला पाहेपर्यंत तसं करणं हिताचं होतं.  नाही तर सर्वजण विनाकारण काळजीत पडतील. 
            मी पटकन् घरी आलो.  संगीताला परिस्थिती थोडक्यात विशद केली.  तिला नंतर प्रीतीकडे जाऊन सर्व सांगायला सांगितलं.  मी घरी फोन करीनंच असंही सांगितलं.
            .     .    .    .    .

            संध्याकाळी मी ठाण्याच्या हॉस्पीटलमध्ये पोचलो.  तिथे मुल्ला माझी वाटच पहात होता.  त्यानं सांगितलं की ऑपरेशन जरी केलं गेलं असलं तरी महेश अजून शुध्दीवर आला नव्हता.  एक हात, एक पाय फ्रॅक्चर झाला होता.  डोक्याला जोरात मार बसला होता.  रक्तस्त्राव झाल्याने त्याला रक्ताची बाटली जोडण्यात आली होती.
            महेशला आय.सी.यु.मध्ये ठेवण्यात आले होते.  तिथे मी गेलो.  त्याचा तो किरकोळ देह मोठमोठया बैंडेजमध्ये गुंडाळून कॉटवर निपचित पडला होता.  कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठाही त्याला करण्यात येत होता.
            नंतर मी जाऊन डॉ.इंगळेंची भेट घेतली.  त्यांनीच मोठी रिस्क स्वीकारुन महेशचे ऑपरेशन केलेलं होते.  मी त्यांना माझा परिचय दिला आणि त्यांचे अगदी मनापासून आभार मानले.  मग डॉक्टर मला म्हणाले, 'मि.सुर्यवंशी, अहो कामगारांनी त्यांना इथे दाखल करण्यात थोडा जरी उशीर केला असता तर मात्र मी पेशंटची गॅरंटी देवू शकलो नसतो, नव्हे मी ही केस घेतलीच नसती.  पण डॉक्टरला पेशंटला वाचवण्याबद्दल एक टक्का जरी शक्यता वाटली तरी त्याने तिचा फायदा करुन घ्यायलाच हवा.  मि.पाटील यांच्याबाबत मला ती शक्यता जाणवली म्हणूनच मी तिचा पुरेपुर लाभ उठवला.  परिणाम तुमच्यासमोर आहे.'
'पण डॉक्टर, आता महेश अगदी धोक्याबाहेर आहे ना? म्हणजे काळजी करण्यासारखं तसं काही....'
'वेल्, तुम्ही एकदम तसंही म्हणू शकत नाही.  कारण त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.  ती बरी होईपर्यंततरी त्यांच्या मनावर कोणताही ताण येऊ द्यायचा नाही.'
'डॉक्टर, एक विचारलं तर रागावणार नाही ना तुम्ही?'
'विचारा, अवश्य विचारा.'
'समजा, डॉक्टर उद्या मी महेशला पुण्यात नेऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर चालणार नाही का? कारण तिथे त्याचे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी असल्याने त्याची देखभाल आम्हाला व्यवस्थित करता येईल.  बरोबर ना!मी विचारलं.
'मि.सुर्यवंशी, सध्या पेशंट बेशुध्दावस्थेत आहे.  उद्या पहाटेपर्यंत तो जर शुध्दीवर आला तर त्याचे चेकअप करुन मी काय तो निर्णय देईन, चालेल ना?'
'होय डॉक्टर, थैंक यू!  मी आता घरी फोन करुन कळवतो.'
'ओ.के. गुड नाईट !'
'गुड नाईट, डॉक्टर, जरुर लागली तर बोलवीन तुम्हाला.'
             मग मी तिथून महेशच्या घरीच फोन लावला.  सुदैवाने संगीता अजून तिथेच होती.  तिनेच फोन उचलला, मी तिला सर्व वृत्तांत सांगितला आणि काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले.  एवढयात प्रीतीने तिच्या हातून फोन काढून घेतला आणि मला विचारलं, 'भावोजी, कशी आहे महेशची तब्येतत्याला फार नाही ना लागलेलं?'  तिच्या बोलण्यातला कापरा मला स्पष्ट जाणवत होता.  मी मग मुद्दामच तिला जास्त काही न सांगता इतकंच बोललो,
'वैनी, तुम्ही पहिल्यांदा स्वत:ला सांभाळा, तुम्ही ताईंचीही समजूत घालून त्यांना धीर द्या.  इकडे महेश अजून शुध्दीवर जरी आला नसला तरी आता तो आऊट ऑफ डेंजर आहे.  त्यामुळे अजिबात काळजी करु नका.  उद्या सकाळी तो शुध्दीवर आला की मी डॉक्टरांना विचारुन त्याला घेऊन पुण्याला येईन.  मग तुमच्याच हॉस्पीटलमध्ये त्याला एडमिट करु.  आता शांपणे विश्रांती घ्या.  गुड नाईट !'
            मी जरी प्रीतीला धीर दिला असला तरी माझ्या मनात मात्र नाना बरेवाईट विचार येत होते.  हे मनही फार विचित्र असतं.  शत्रूचंही कधी अहित न पाहणारं पण आपल्या आप्तांबद्दल मात्र नेहमी ते वाईटच विचार करत असतं.
            रात्री नर्स महेशचा रिपोर्ट न्यायला आली.  तिनं तिथंच माझी व्यवस्था केली, मीच तिला सांगितलं तसं ! नर्सनं मला जेवणाबद्दल विचारलं पण माझी भूक केव्हाच उडून गेली होती.  मी तिला 'नको' म्हणून सांगितलं आणि 'आवश्यकता वाटल्यास हाक मारा' असं म्हणून निघून गेली.  नंतर दर दोन तासांनी येऊन ती रक्ताची बाटली बदलणार होती. 
            ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वांत मोठी रात्र होती.  प्रत्येक क्षण अगदी धीम्या पावलांनी पुढं सरकत होता.  ही रात्र कधी संपणारच नाही कायअसं मला वाटू लागलं होतं.  माझी अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती.  छातीत धडधड जोरात होत होती.  महेशच्या करुणामयी चेहऱ्यावरुन नजर हटत नव्हती.  त्याच्या छातीचा भाता अगदी हळूवारपणे खालीवर होत होता.  रात्रभर मी तिथे जागतच होतो.  पहाटे कधीतरी मला डुलकी लागली.
            नंतर महेशच्या तोंडून 'पाणी पाणी' अशा अस्पष्ट आवाजाने मला जाग आली.  मी धावतच डॉक्टरांकडे गेलो. 
'डॉक्टर, महेश शुध्दीवर आलाय, चला लवकर.
डॉक्टरही लगबगीने माझ्याबरोबर आले.  त्यांनी त्याचे पूर्ण चेकअप् केले. 
'थैंक गॉड' !  आता हा अगदी धोक्याबाहेर आहे.  तरीही तुम्ही त्याची काळजी घ्याच.  कोणताही स्ट्रेन यांना जाणवू देवू नका.  तुम्ही म्हटल्याप्रमाणे यांना घेऊन पुण्याला जाऊ शकता.

नंतर मी डिस्चार्ज घेतला.  डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानले.  माझ्या मित्राला मृत्युच्या दाढेतून त्यांनी वाचवलं होतं.  हॉस्पिटलच्या म्ब्युलन्समध्ये मग महेशला घालून मी पुण्याचा रस्ता धरला.  अजूनही तो गुंगीतच होता.  त्याला 'ससून' मध्ये दाखल करायचं होतं.
.     .    .    .    .

            आता महेश तसा नॉर्मल झाला होता.  डोक्याची जखम तशी भरत आलेली होती.  त्याला इथं दाखल केल्यापासून प्रीती त्याच्याजवळून जराही हलली नव्हती आणि ते स्वाभाविकच होतं.  तिचं त्याच्यावरचं प्रेम पाहून मी खरोखरच गहिवरलो.  महेशसुध्दा तिला आपली सेवा करताना पहात होता.  त्यालासुध्दा,
'आपण हिला किती त्रास दिला होता, पण तरीही तिचं आपल्यावरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही'
हे असं वाटून अपराधीपणा वाटत होता.  तो मला तसं बोललाही पण,
'झालं गेलं, गंगेला मिळालं, आता तू भविष्याकडे बघ.असं मी त्याला म्हटलं होतं.  त्यानंही मला होकार दिला.
            महेशला बरं वाटू लागलं तेव्हा प्रीती किंवा ताईंना मी त्याच्याजवळ बसवून ऑफिसमध्ये जायचो आणि तिथल्या कारभारात लक्ष घालायचो कारण महेशनेच काही झालं तरी दिलेल्या मुदतीमध्ये आपलं काम पूर्ण झालं पाहिजे असं मला बजावलं होतं.
            एकदा मी ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो.  तेव्हा फोन घणघणला.  मी रिसिव्हर उचलून कानाला लावला,
'हॅलो, मी महेश पाटलांचा मॅनेजर बोलतोय.'
'मी ठाण्याहून सुनिल शहा बोलतोय.'
हा सुनिल शहा म्हणजे त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक होता. 
'मी मुंबईला असल्यानं मला काही माहित नव्हतं, पण आज सकाळी आल्यावर माझ्या बायकोने मला घडलेली हकीकत सांगितली.  ऐकून वाईट वाटलं.  आता साहेबांची तब्येत ठीक आहे नापूर्ण विश्रांती घ्यायला सांगा.'
'आता साहेब ठीक आहेत.  तरीही डॉक्टरनी अजून निदान एक महिनातरी विश्रांती घ्यायला सांगितलंय.  आम्ही कबूल केल्याप्रमाणेच तुमचं काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करु.  तिथं मुल्ला असले तरी मी अधूनमधून येत जाईनंच.  तुम्ही निश्चिंत रहा.असं म्हणून मी फोन ठेवला.  या बडया लोकांना माणसापेक्षा आपलं कामच जास्त महत्वाचं वाटतं म्हणून मी सुध्दा त्याच्याशी व्यावहारिक भाषेतच बोललो.
            आणि माझ्या डोक्यासमोर तो दिवस दिसू लागला, ज्या दिवशी मी महेशला ठाण्याहून पुण्याला आणून एडमिट केले होते.  ताईंना आणि प्रीतीला वेळेतच घरी पोहचवून मी महेशजवळ आलो.  अद्यापही तो बेशुध्दच होता.  भर दुपारची वेळ होती.  इतक्यात नर्स आली, म्हणाली,
'कुणीतरी मिसेस शहा नामक स्त्री बाहेर आलीय.  मी तिला पेशंटला भेटण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं तरीही मग तिनं तुम्हाला भेटायला बोलावलंय
मी तिला वेटिंगरुममध्ये आलो.  तिथं साधारण मध्यम वयाची स्त्री बसली होती.  रंग गव्हाळ होता.
 'नमस्कार, मी 'अनुराधा कन्स्ट्रक्शन कंपनी' चा मॅनेजर, लक्ष्मण सुर्यवंशी.  आपण?'
'मी सुनिल शहांची पत्नी.  त्या फाइव्ह स्टार हॉटेलचे ते मालक आहेत.  सध्या ते कामानिमित्त मुंबईला गेलेत.  मला रात्री या दुर्घटनेबद्दल समजलं.  आज सकाळी मी 'पाटील हॉस्पिटल' मध्ये जाऊन विचारलं तर तुम्ही साहेबांना इकडं घेऊन आल्याचं समजलं.  म्हणून मी इकडे आले.  कसे आहेत आता ते? डॉक्टर काय म्हणतात?'
'अजूनतरी साहेब शुध्दीवर आलेले नाहीत आणि डॉक्टरही त्यांच्या दृष्टीने शक्त ते सर्व प्रयत्न करीत आहेत.
'प्लीज, मी त्यांना एकदा पहाते कारण ते शुध्दीवर येईपर्यंत मी इथे थांबू शकत नाही.  घरी काही न सांगता मी बाहेर आलेय.  सर्वजण काळजीत असतील.'
'ओ.के., चला.असं म्हणून मी तिला दुरुनच त्याला पाहू दिलं.  ती त्याच्याकडे पहातच राहिली.  पाहता-पाहता तिच्या डोळयात अश्रू उभे राहिले अन् खळकन् तिच्या गालावरुन खाली ओंघळले.  मला काही कळायला मार्ग नव्हता. कारण एखाद्या अनोळखी माणसाला आजारी पाहून आपल्याला दु:ख होते.  पण डोळयात पाणी नक्कीच उभे रहात नाही.  बऱ्याच वेळाने ती जेव्हा मागे वळून जायला निघाली, तेव्हा मी तिला माझ्याबरोबर पाच मिनिटांसाठी वेटिंग रुममध्ये यायला सांगितलं.  मी तिला म्हटलं,
'मिसेस शहा, जरा तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारु?'
'हो, विचारा.'
'तुम्ही मघाशी आमच्या साहेबांना पाहिलंत.  पण त्यांना बघताना तुमच्या डोळयात पाणी का आलं, सांगता?'
'हो, काही जुन्या पण कटू आठवणी मनात जागृत झाल्या.  तुमचे साहेब आणि माझ्या कॉलेज जीवनातील एका वेगळया व्यक्तिमत्वाच्या मनुष्याच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे, त्याचीच मला तीव्रतेने आठवण झालीय.  बाय द वे तुमच्या साहेबांचे नांव सांगाल?'
'महेश पाटील.'
नांव ऐकून मिसेस शहांना एकदम रडूच कोसळलं.  त्या स्वत:शीच बोलू लागल्या. 
'काय हे महेश, मी तुला पूर्वी कुठंकुठं नाही शोधलं.  मला तुझी माफी मागायची होती.  पण ती संधी तू मला मिळूच दिली नाहीस आणि आज दिसलास तोही या अवस्थेत? काय ते माझं दुर्देव!
मग तिनंच स्वत:ला सावरलं.  माझ्या मनात तिच्याबद्दल अनेक विचार आले. 
'हिनं, महेशची माफी मागावी, असा काय गुन्हा केला असेल?'  

प्रकरण सात
महेशच्या आयुष्यात स्त्रिया तरी होत्याच कुठेहोत्या त्या ताई, प्रीती, अनुराधा आणि दिव्या.  हो असली तर ही दिव्याच असणार होती.  पण तिला महेशची माफी माघण्याची वेळ का यावी ?   तिनं स्वत:च्या मनानंच त्याला नकार देऊन ठोकारलं होतं.मी तिला पुढं होऊन विचारलं, 'तु...तुम्ही दिव्या अगरवाल तर नव्हेत.'
'हो, मीच ती!माझ्या चेहऱ्यावर तिरस्काराची हलकीशी छटा उमटली.  पण तीही दिव्याच्या नजरेतून सुटली नाही.  ती विषादानेच मला म्हणाली, 'ज्याअर्थी तुमच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल तिरस्कार दिसतोय त्याअर्थी महेशनं तुम्हाला त्याच्या दृष्टीकोनातून माझी प्रतिमा तुमच्यासमोर उभी केली असणार आणि तुमच्या दृष्टीने मीही तशीच असणार.  पण वस्तुस्थिती तशी नाहीय.  या प्रकरणाची दुसरी बाजू मी अजून कोणासमोरही मांडलेली नाही.  कारण तसं मला कोणी भेटलंच नाही.  आज आता तुम्हाला एक बाजू माहितंच आहे.  त्यामुळे माझी बाजू ऐकून तुम्हीच काय तो न्याय द्या.'
माझं डोकंच सरकलं, 'माझ्या मित्राचं आयुष्य बरबाद करुन वर माझ्याकडेच न्याय मागताना हिला काहीच कसं वाटत नसावं.मी तिला म्हटलं, 'अशी काय बाजू मांडणार आहात तुम्ही?   महेशचं सारं जीवन फ्रस्टेड करुन टाकलंत.  आज ही त्याची जी स्थिती झालीय त्याला तुम्हीच कारणीभूत आहात.  केवळ तुम्ही.'
'पण त्यावेळी माझी काय अवस्था होती.  तुम्हाला ठाऊक आहे? नाही.  म्हणूनच तुम्हाला मी जे सांगत्येय ते इच्छा नसतानाही ऐकून घ्यावंच लागेल.एव्हाना मी सुध्दा भानावर आलो.  एका परस्त्रीशी बोलतो आहोत याची मला जाणीव झाली.  मित्रप्रेमामुळे मी अंध बनलो होतो.  मी तिला परवानगी दिली, 'ठीक आहे.  असं काय घडलं की तुम्ही महेशला ठोकरलंत?'
'मला परवानगी दिल्याबद्दल थैंक्यू तुम्हाला माझी पार्श्वभूमी सांगते म्हणजे एकूण सर्व परिस्थिती तुमच्या ध्यानी येईल.'
मी तशी एका श्रीमंत कुटुंबातीलच वडिलांची सांगली-मिरज भागात पाच हॉटेल्स् आहेत.  आणखीही वाढवतायत.  ते तसे अतिशय विक्षिप्त आणि तापट आहेत.  मी सहा वर्षांची असताना आईचं आणि त्यांचं भांडण झालं.  इतकं विकोपाला गेलं की अखेर त्यांनी डायव्होर्स घेतला.  ते भांडण का झालं हे मला समजलं नाही पण मी डॅडींकडे रहावं अशी कोर्ट ऑर्डर होती.  आईनं जाताना मला प्रेमानं जवळ घेऊन पप्पी घेतली आणि सांगितलं, 'बेटा, मी काय सांगत्येय ते लक्षपूर्वक ऐक अन् लक्षात ठेव.  आता जरी तुला माझं म्हणणं समजलं नाही तरी नंतर कळून येईल.  तुझे डॅडी तुला सर्व सुखं देतील.  पण ती पिंजऱ्यातल्या पोपटाला दिल्याप्रमाणे असतील.  तू नेहमी डॅडींच्या कक्षेबाहेर राहून स्वत:चं विश्व तयार कर.  त्यात मन रमव.  तेव्हाच तुला आयुष्याचा खरा आनंद प्राप्त होईल.  पण याचा अर्थ असा नाही की डॅडीनी सांगितलेलं काहीच ऐकायचं नाही.  ते जे सांगतील ते त्यांच्या दृष्टीने तुझ्या भल्याचंच असेल.  त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर पूर्ण विचार करुन मगच तू योग्य ते पाऊल टाकायला हवंस.  त्यांनाही तुझ्याशिवाय कोणीच नाही.  शक्य तेवढी त्यांची काळजी घे.  आता मी तुझ्यापासून दूर जात्येय कदाचित परत कधीच येणार नाही.  तेव्हा माझं एवढं बोलणं तू लक्षात ठेवावंस.  असंच मला वाटतंय.  बाय् बेटी!खरंच किती विचारी होती माझी आई पण तिनं डॅडीपासून दूर जाण्याचा कठोर निर्णय का घ्यावा हेच मला समजत नव्हतं.  नंतर आजपर्यंत मला आई कधीच भेटली नाही, मला ती हवी असूनसुध्दा !
आईनं म्हटल्याप्रमाणं डॅडी मला कशाचीही कमतरता भासू देत नव्हते.  कपडालत्ता, खेळणी, सर्व काही मागेल तेव्हा.  पण हे सर्व घराच्या चार भिंतींच्या आतच.  बाहेर गेले तर त्यांच्यासोबतच कारमधून.  माझ्या मित्र-मैत्रिणींना बागेत वगैरे खेळताना बघून मला खूप दु:ख व्हायचं, हेवा वाटायचा.  मी डॅडींना तसं सांगितलंही.  त्यांच्या तोंडून 'नाही' असं ऐकल्यावर मात्र पुढं बोलायचं धाडस काही मला होत नसायचं.
अशाच दडपणाच्या वातावरणात माझं शिक्षण सुरु होतं.  मैत्रिणी झाल्या होत्या.  पण त्या केवळ शाळेपुरत्या मर्यादित होत्या.  शाळा सुटायच्या वेळेला डॅडी गाडी घेऊन यायचे किंवा ड्रायव्हरला पाठवायचे.  एकदा ड्रायव्हर आला असताना त्याला चुकवून मी मैत्रिणींबरोबर खेळत राहिले.  त्यावेळी मला अतिशय आनंद मिळाला.  पण अखेर त्यानं मला पकडलंच आणि अक्षरश: फरफटत नेऊन गाडीत टाकलं.  जेव्हा घरी आले, तेव्हा ड्रायव्हरनं डॅडींना सर्वकाही सांगितलं.  डॅडींनी त्यादिवशी मला एकच जोरदार मुस्काटात भडकावली.  मी कळवळून कोलमडून पडले.  पण डॅडी माझ्याकडं न पाहताच निघून गेले, जाताना म्हणाले, 'असला तुझा फाजील लाड पुरवायला मी तुझी आई नाही, बाप आहे, समजलीस.  असा आगाऊपणा परत केलास तर याद राख.त्यानंतर मात्र मी डॅडी सांगतील तेच करु लागले.  जणू ते माझ्या अंगवळणीच पडलं.  सेल्फ डिसिजन मी घेऊच शकत नव्हते.  प्रत्येक निर्णयासाठी डॅडींचीच परवानगी घेत असे.  आता मला आईच्या बोलण्यातलं सत्य कळत होतं.  पण वळत नव्हतं.  मी खरोखरचं सोन्याच्या पिंजऱ्यातली कैदी बनले होते आणि इच्छा असूनही त्याच्याबाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची माझी हिंमत होत नव्हती.  मी फार दुबळी बनले होते.
माझ्या भीतीत भर घालणारी आणखी एक अशीच खबर मला पुढे समजली.  ती अशी की मी लहान असताना एका स्मगलिंगच्या केसमध्ये माझ्या डॅडींचं नांव होतं.  अशा अनेक प्रकारात त्यांचा हात असल्याचं बोलं जायचं.  त्यामुळं लोक त्यांना घाबरुनच असायचे.  पण पुराव्याअभावी कोणी त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नव्हते.  याच कारणावरुन आईचं आणि डॅडींच भांडण झालेलं होतं.  हे एेकून तर डॅडींबद्दल मनात अतिशय भीती निर्माण झाली.  पण मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हते.
अशा वातावरणात माझं मेडिकल कॉलेजचं पहिलं वर्ष सुरु झालं.  घर तसं अगदी कॉलेजजवळच होतं.  त्यामुळं मी चालतच जायला लागले.  पण डॅडींनी माझ्या नकळत त्यांची माणसं माझ्यावर नजर ठेवायला पेरुन ठेवली होती.  आई-सारखाच बंडखोरपणा अगदी सुप्तपणे माझ्यात लपलाय याची डॅडींना जाणीव झाली असावी.
            एक दिवस मला कॉलेजवर एक पत्र मिळालं, माझं नांव असलेलं.  मी वाचलं, पाठवणाऱ्यानं त्यात त्यांच नाव लिहीलं नव्हतं, पण त्या पत्रात त्यानं त्याचं माझ्यावर खूप प्रेम असल्याचं म्हटलं होतं.  आणि एक वेगळीच विनंती केली होती, ती अशी की मी मानेपर्यंत कापलेले केस वाढवून त्यांची वेणी घालावी.
             प्रेम! या शब्दालाच मी पारखी झाली होते, ज्या दिवशी आई मला सोडून गेली होती.  डॅडींनी तर शब्दाचा वेगळाच अर्थ लावला होता.  'मुलीला आपल्या धाकात ठेवणं हेच प्रेम' अशीच त्यांची धारणा असावी. माझ्या सोबत शिकणाऱ्या मुलांना मी कसल्या बापाची मुलगी आहे हे ठाऊक असल्याने ते माझ्याकडे पहायचंही टाळत.  न जाणो तिनं आपल्या बापाला सांगितलं तरअशी त्यांना भीती वाटत असावी.  अशा परिस्थितीत त्या पत्रलेखकाच्या धाडसाचं मला कौतुक वाटलं आणि त्याची ती किरकोळ इच्छा मी पूर्ण करायचं ठरवलं. मी केस वाढवून त्यांची वेणी घालू लागले.  त्यामुळे मी पूर्वीपेक्षाही सुंदर किंवा आकर्षक दिसत्येय अशी माझी मलाच जाणीव झाली.
            आणि त्याचं दुसरं पत्रही मला कॉलेजवर मिळालं.  त्यात त्यानं मी त्याच्या इच्छेला मान दिल्याबद्दल आभार मानले होते.  या पत्रात त्यानं आपली माहिती कळवली होती.  त्याचं नाव महेश पाटील होतं.  सिव्हील इंजिनिअरींगच्या थर्ड इयरला होता तो.  नंतर एका मैत्रिणीमार्फत तो राहतो कोठे वगैरे किरकोळ माहिती मी गोळा केली.  तो हॉस्टेलवरच रहायचा.  मी नंतर एकदा त्याला पाहिलं.  माझ्या मैत्रिणीनंच मला तो दाखवला.  अगदीच भरदार शरीरयष्टीचा नसला तरी आकर्षक मात्र होता तो.  तसेच, चेहऱ्यावर काही वेगळेच असे तेज असावेसे वाटत होते.  मला तो आवडला.  'का बरं मी त्याला होकार देऊ नये?'  मनातच मी विचार करीत होते.  आणि दररोज काही ना काही कारणाने त्याच्या समोरुन जाऊन त्याला डोळे भरुन पहायची.  तोही तितक्याच उतावीळपणे माझ्याकडे पहायचा.  पण मला त्याच्याशी बोलायचं मात्र धाडस होत नव्हतं डॅडींना समजलं तर....?
            माझी ही भीती केवळ पोकळ नव्हती. कारण डॅडींना यापूर्वीच त्यांच्या माणसांकडून सर्व माहिती समजली होती, पण त्यांची, कदाचित माझ्याकडूनच सर्व प्रकार समजावा, अशी इच्छा असावी.
            यानंतरही महेशची मला पत्र यायची.  त्यात त्यानं त्याच्या प्रेमाचा पुनरुच्चार केला होता.  मी ती सर्व पत्रं माझ्या ड्रॉवरमध्ये जपून ठेवली होती.  एक दिवस मी कॉलेजमधून घरी आले तर समोरच डॅडी ती पत्रे हातात घेऊन उभी होते, ती पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला.  माझ्या डोळयातून घळाघळा पाणी वाहू लागलं, 'सॉरी डॅडी' एवढंच मी कसंबसं बोलून तडक माझ्या खोलीत गेले.  मला अतिशय वाईट वाटलं, पण मी काय करु शकत होते?
            तेवढयात डॅडींनी त्यांच्या एका नोकराला बोलावून सांगितलं, 'हया पाटलाकडं जा आणि काय म्हणतो ते जरा विचारुन ये.'
            माझ्या छातीत जोरजोरात धडधडू लागलं.  आता हे लोक महेशचं काय करणार होते कोण जाणेमाझ्यामुळंच तो या संकटात सापडला होता.  पण महेशने या लोकांना आपल्या चतुराईनं परत पाठवलं होतं.  म्हणे 'तिला आवडत नसेल तर कधीही तिच्या वाटेला जाणार नाही.पण मला तर तो आवडत होताच.
            नंतर एकदा कॉलेजमध्ये माझी मैत्रिण पळत आली, तिनं माझ्या हातात एक कागद दिला 'महेशनं दिलाय' असं म्हणाली.  मी तो उघडून पाहिला तर त्यावर एकापेक्षा एक अशा सुंदर कविता होत्या.  महेशने त्या माझ्यासाठी केल्या होत्या.  माझा आनंद गगनात मावेना.  पण लगेच मी ताळयावर आले.  माझ्या अवतीभवती डॅडींची माणसं असतात याची मला जाणीव झाली.  मी कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते.  मी मैत्रिणीकडूनच महेशला बोलावणं पाठवलं.  तो येईपर्यंत मी त्याने पाठवला होता,  त्याच प्रकारच्या कागदावर माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना, त्याच्या माझ्या मार्गातील अडथळे याचं थोडक्यात वर्णन केलं होतं.  तेवढयात तो आला.  क्षणभर मला काय करावं कळेना.  पण पुढच्याच क्षणी मी सावध होऊन त्याला म्हटलं, 'मला तुमच्याबद्दल कोणतंही आकर्षण नाही.  मला इथून पुढं त्रास देऊ नका.आणि मी माझ्या हातातला 'तो' कागद त्याला देऊ केला.  पण त्यानंही तितक्याच जोरात उत्तर दिलं, 'या कविता मी तुझ्यासाठी केल्यात.  त्याचं वाटेल ते कर.एवढं बोलून तो निघूनच गेला.  माझ्या हातची एक संधी गेली होती.  आम्ही दोघांनी जास्त वेळ एकत्र थांबणंही धोक्याचंच होतं, पण त्याचं रागावणंही स्वाभाविकच होतं.  असं त्याचे नि माझं पहिलं बोलणं.
            त्यानंतर मात्र महेश कधीच माझ्यासमोर आला नाही.  मी लांब दिसले की तो मला चुकवून जायचा.  मला फार वाईट वाटायचं.  पण इलाज नव्हता.  त्याच्या आठवणींत मी होरपळत होते.  आमच्या दोघांमध्ये गैरसमजाची मोठी दरीच होती.  ती मिटवण्याची संधीच महेश मला देत नव्हता.  ते वर्ष तसंच संपलं.  मी सेकंड इयरला आणि महेश लास्ट इयरला गेला.
            रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी सकाळी डॅडींनी मला हाक मारली आणि सांगितलं, 'आज त्या पाटलाच्या काटर्याला सांग की तू उद्या त्याला राखी बांधणार आहेस म्हणून! आपल्या 'सिंगार' मध्येच बोलंव नाहीतर तूच त्याच्या हॉस्टेलवर येशील असंही सांग.'
            'डॅडी', माझ्या तोंडून अस्फुट किंकाळीच बाहेर पडली.  आजवर मी सर्व सहन केलं होतं पण हे माझ्या सहनशक्तीबाहेरचं होतं. 'डॅडी', तुम्ही काही केलंत तरी चालेल पण मी महेशला राखी बांधणार नाही.  मी.. मी..माझं प्रेम आहे त्याच्यावर.  तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल पण मी हे काम करणार नाही.  मला ते कदापि जमणार नाही.आज असं कोणतं बळ अंगात संचारलं होतं कोण जोण, पण डॅडींसमोर तोंडातून 'ब्र'ही न काढणाऱ्या मला हे असहय होऊन त्यांच्यावरचा रागच माझ्या तोंडून बाहेर पडत होता.  पण डॅडी मात्र हसत उभे होते, म्हणाले, 'बेटा, तुला काय वाटलं, मी माझ्या पोटच्या पोरीला मारीन.  छे! जर तू त्याला राखी बांधली नाहीस तर मात्र आपल्या प्राणाला मुकावं लागेल - तुला नव्हे - त्या पाटलाला.  तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर.  मग त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न मी आता तुझ्याच हातात सोपवतोय.  काय करायचं ते बघ.माझ्या वडिलांची ती क्रुरता पाहून मी मनोमन घायाळ झाले.  पण त्यांनी माझ्या असहाय्यतेचा अचूक फायदा घेतला होता.  मला महेश तर हवा होता.  त्याच्यापेक्षा या क्षणाला त्याचा जीव मोलाचा होता.  मी त्याच्या जवळ जाऊन त्याला मारण्यापेक्षा, दूर राहून त्याचा जीवच वाचवावा.  मी लांब गेले तरी तो जीवंत आहे, हीच एक सुखाची भावना राहणार होती.  मग मी डॅडींना होकार दिला.  त्याला हॉटेलमध्ये बोलावून राखी बांधली.  माझ्याबद्दलच्या तिरस्काराची आणि भयानक दु:खाची छटा त्याच्या नजरेत दिसत होती.  माझ्या या वृत्तीनं तोही आज मला दुरावला होता.  पण त्याच्यासाठीच मला हे सगळं करावंच लागणार होतं.  त्यासाठी मी माझ्या प्रेमाला तिलांजली दिली होती.  मी महेशला हे सर्व सांगूही शकत नव्हते.
            त्यानंतर डॅडींनी मला आणि त्याला एकदाही भेटू दिले नाही.  इतकंच काय पण माझं कॉलेजही बंद केलं.  महेश बी.ई. होऊन तिथून निघून गेल्याचंही समजलं.  एका निष्पाप माणसाची मी अपराधी होते.  हीच भावना आजपर्यंत मला सतावतेय.
            डॅडींनी मग माझं लग्न ठाण्यातील एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाशी ठरवलं.  लग्न कसलं सौदाच तो ! सासऱ्यांनी माझ्या वडलानां निवडणुकीचं तिकीट मिळवून द्यायचं अन् मोबदल्यात माझ्या वडलांनी जावयाला फाइव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठी भांडवल पुरवायचं, असा तो सौदा होता.  अखेर माझं लग्न झालं.  अर्थातच सुनील शहाशी.  माझा नवरा अतिशय खुशालचेंडू आहे.  बापाच्या पैशवर मजा मारतोय आणि आता सासऱ्याच्या जीवावर हॉटेल बांधतोय.  मला या सर्वांचा फार तिटकारा आलाय.  आता तुम्हीच सांगा या सर्व बाबतीत माझा काय दोष आहेमी जे केलं त्यात काही गैर होतं काआता तुम्ही मला काही म्हणालात तरी चालेल.  माझ्या अपराधाबद्दल मला काहीही शिक्षा द्या.  मी ती आनंदानं भोगायला तयार आहे.'
            दिव्यानं तिचं बोलणं संपवलं.  मी अगदी शांत राहून तिचं बोलणं ऐकत होतो.  ती जे सांगत होती त्यात जराही काही खोटं नव्हतं असं तिचा चेहरा मला सांगत होता.  मनुष्य तोंडानं कितीही खोटं बोलत असला तरी चेहरा कधीच खोटं बोलत नाही.  एखाद्या मुरब्बी कलावंतालाच हे साध्य होतं.  दिव्याची बाजू ऐकून माझी स्थिती मात्र अगदी दोलायमान झाली.  काय निर्णय द्यावा हे मला उमजेना.  पण मन घट्ट करुन मी तिला सांगितलं.  'तुम्हाला प्रायश्चित्तच करायचंय ना !  तर मग मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका.  इथून पुढं तुम्ही कधीही महेशला भेटायचा प्रयत्न करु नका.  महत्प्रयासानं तो तुम्हाला विसरला आहे, नव्हे आम्ही त्याला भाग पाडलं आहे.  प्रीतीच्या प्रेमानं ते साध्य झालं आहे.  तो आता बरा झाला की प्रीतीशी लग्न करणार आहे.  तुम्ही पुन्हा त्याच्यासमोर गेलात तर जुन्या आठवणी त्याला अस्वस्थ करुन सोडतील.  प्लीज माझं एवढंच म्हणणे तुम्ही मान्य करा.  साईटवर देखील जास्त येत जाऊ नका.  बस्स ! तुमच्या महेशसाठी तुम्ही एवढंच करा.'
            'ठीक आहे, मी नाही भेटणार महेशला.  आणि आता बेळ निघुन गेल्यावर भेटून तरी काय उपयोग?'  बरं 'नाही-नाही' म्हणून मला बराच उशीर झाला.  मी येते.  महेशची काळजी घ्या.  घरी फोननं त्याच्याविषयी कळवत चला.  माझं मन लागणार नाही.  फक्त तो बरा व्हावा.  बाकी मला काही नको.  येते मी.'
            'थांबा, मीही कारपर्यंत तुम्हाला सोडायला येतो.असे म्हणून मीही दिव्याबरोबर चालू लागलो.  तोच दवाखान्याच दरवाजातून प्रीती माझ्यासाठी जेवण घेऊन येत होती.  संगीता मुलांजवळ होती ना !
            'हया मिसेस शहा' मी प्रीतीला त्यांची ओळख करुन दिली.  'आणि ही प्रीती, माझी वहिनी.  आपल्या महेशची होणारी पत्नी.यावर दिव्या प्रीतीजवळ गेली.  प्रेमानं तिच्या खांद्यावर तिनं हात ठेवला.  म्हणाली, 'स्वत:ची आबाळ न होऊ देता महेशची काळजी घे.  तू खरोखरच भाग्यवान आहेस की तुला इतका चांगला पती मिळतोय.  तुमच्या भावी जीवनाला माझ्या शुभेच्छा ! येते मी.'
            आणि कारमध्ये बसून ती निघून गेली.  माझ्या मनात एक आदराचं स्थान मिळवून.  पण ज्याला हे खरं म्हणजे समजायला हवं होतं, त्याला मी हे कधीच कळू देणार नव्हतो.  आजचा हा प्रसंग माझ्या हृदयात अगदी खोलवर मी दफन करणार होतो.  काही झालं तरी त्याला बाहेर पडू देणार नव्हतो.  फक्त एवढंच बोलणार होतो की, 'फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची पत्नी महेशला पाहण्यासाठी आली होती !  बस्सं यापलिकडे दुसरं काहीच मला माहित नव्हतं.'

प्रकरण आठ:
त्या दिवशी महेश सकाळपासून उत्साही वाटत होता.  त्याला तसं पाहून मलाही बरं वाटत होतं.  महेशनं मला जवळ बोलावून सांगितलं,
'मी आज डॉ.जाधवांना बोलावलंय म्हणून सांग.  शक्य तितक्या लवकर आले तर बरं होईल.हे डॉ.जाधव म्हणजे आमच्या कंपनीचे खाजगी सल्लागार होते.  मी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं.
            थोडया वेळातच जाधव आपल्या ब्रीफकेससह दवाखान्यात आले.  वकील लोकं जिथं जातीत तिथं आपली ब्रीफकेस सोबत नेतातच,  हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे.
महेशनं हसून त्यांच स्वागत केलं.  जाधवांनी तब्येतीची वगैरे चौकशी केली मग म्हणाले,
'आज सकाळी-सकाळीच साहेबांनी आठवण काढली.  काही विशेष?'
'वकीलसाहेब मी माझं मृत्युपत्र तयार करावं म्हणतो.
'पण महेश याची आताच काही गरज आहे कायू वील बी ऑल राईट हे बघ तुला काहीही झालेलं नाही.  हे मृत्युपत्राचं काय मध्येच काढलंय?' मी विचारलं.
'हे बघ लक्ष्या, आज सुदैवानं हातपाय आणि डोक्यावर निभावलं म्हणून आज मी इथं आहे.  दुर्दैवानं माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झालं असतं तर?'
'पण आता तू ठीक आहेस नां?'
'आता ठीक आहे रे!  पण उद्या काही असंच घडलं तर मला कोणतीही रिस्क स्वीकारायची नाही.'
एखादा अपघात मनुष्याला किती खोलवर विचारात बुडवतो, याचंच साक्षात उदाहरण मी पहात होतो.  आणि मी त्याला तसं करण्यापासून परावृत्तही करु शकणार नव्हतो.
अखेर माधवांनी महेशच्या इच्छेनुसार त्याचं मृत्युपत्रं तयार केलं.  आपल्या संपत्तीची उत्तराधिकारी म्हणून त्यानं प्रीतीचं नांव लिहीलं.  तसेच, अमितचे उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत कंपनीचा कार्यभार मी सांभाळायचा आणि अमितच्या शिक्षणानंतर पन्नास टक्के भागीदारीत कंपनी सांभाळायची.  असं हे थोडक्यात मृत्युपत्र होतं.  पण महेशनं माझ्यावर इतका विश्वास टाकावा.  यानं मी गहिवरलो.  प्रीतीवरचं त्याचं प्रेमही स्पष्टच झालं होतं.
महेशनं माझ्याकडून आणि माधवांकडून असं वचन घेतलं की, त्याच्या मृत्युपर्यंत आम्ही दोघांनीही याविषयी एक शब्दही बाहेर पडू द्यायचा नाही.  आणखी एक रहस्य मी माझ्या पोटात दडवलं.
आता महेश लवकरच बरा होऊन घरी येईल.  या आनंदात आम्ही सर्वजण होतो.  त्याच्या प्रकृतीत किरकोळ चढउतार होत असले तरी 'त्यान काही घाबरण्यासारखं नाही' असं डॉक्टरांचं म्हणणं होतं.  अधूनमधून त्याच्या डोक्यात भयंकर कळा येतात असं तो सांगायचा.  त्या थोडयाच वेळात येऊन जाणाऱ्या कळांनी तो घामेघूम व्हायचा.  डॉक्टरनी चेकअप केलं होतं पण अजून रिपोर्ट आला नव्हता. 
 एक दिवस महेश तापानं अतिशय फणफणला डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला तो प्रतिसादही देईना.  आणि त्याच दिवशी त्याचा रिपोर्ट आला.  वरील सर्व लक्षणे ही 'ब्रेन-फेव्हर'ची होती.  डॉक्टर्स त्यांच्या परीने आटोकाट प्रयत्न करीत होते.  ठराविक कालावधीनं या आजाराची तीव्रता कमी होते, असं डॉक्टरांचं मत होतं.  पण तरीही आताचा महेशला होणारा त्रास मला पाहवत नव्हता.  एका आजारातून बरा होतोय तोवर हा दुसरा जणू त्याची वाटंच पहात होता.  म्हणजे त्या अपघातात महेशच्या डोक्यावर झालेला आघात हा अतिशय गंभीर होता.  बाहेरची जखम बरी होत आली असली तरी आतली जखम अजून बरी झाली नव्हती.
या सर्व प्रकारामुळे प्रीती फारच ढासळत चालली होती.  तिची फारच ओढाताण चालली होती.  मी जरी संगीताला तिच्या आणि ताईंच्या सोबतीला, मुलांची काळजी घ्यायला ठेवले होते, तरी त्यांच्या मनोवेदना ती काही कमी करु शकणार नव्हती.
पुन्हा एक दिवस सकाळी महेशला हुशारी वाटू लागली.  एव्हाना त्याच्या हातापायाची प्लॅस्टर्स काढण्यात आली होती.  उठून तो फ्रेश झाला.  आणि आज त्यानं प्रथमच दवाखान्याच्या आवारात फिरण्याची इच्छा प्रकट केली.  मी डॉक्टरांच्या परवानगीने त्याला घेऊन बाहेर आलो.  त्यानं लांबूनच प्रीतीला येताना पाहिलं, म्हणाला,
'प्रीतीनं म्हटलेला शब्द खरा केला.  शी वेटेड फॉर मी अ लौंग टाईम! आता मात्र मी तिला यापुढं काही त्रास पडू देणार नाही.  तिनं माझ्यासाठी जितका त्रास सोसलाय त्याची भरपाई किंवा परतफेड म्हणून मला तिला भरभरुन सुख द्यायचंय.
मीही त्याला पाठिंबा दिला.  तेवढयात प्रीती जवळ आली.  महेशला दरवाजात पाहून तिला बरं वाटलं.  तरीही तिनं हट्टानं त्याला बाहेर न पडू देता आधार देत त्याच्या कॉटवर आणून झोपवलं.  महेश अगदी थोडंच जरी चालला असला तरी त्याचं श्रम त्याच्या शरीराला जाणवत होतं.  त्याच्या कपाळावर घर्भबिंदू जमा झाले होते.  ते प्रीतीनं तिच्या पदरानं टिपले.  महेश तिला म्हणाला,
'प्रीती, तुझ्या हातचं जेवण घेऊन फार दिवस झालेत.  आज तू माझ्यासाठी जेवण करुन घेऊन ये.  आणि घरी गेलीस की ताईला इकडं पाठव.  मला तिच्याशीही बोलायचंय.'
'ठीक आहे,' म्हणून प्रीती आनंदानं घरी परतली. 
प्रीती गेल्यावर मी एकटक महेशच्या चेहऱ्याकडं पहात राहिलो.  मला त्याच्याशी झालेली पहिली भेट आठवली.  अजूनही तो तसाच किरकोळ होता, आता अशक्तपणामुळे बिछान्यावर उठून दिसत नव्हता.  त्याच्या चेहऱ्यावर तसाच शांत भाव होता पण हास्य मात्र विरले होते.  अद्यापही त्याचा ताप चढउतार करीत होता.  पण तरीही तो माझ्याकडं बघून हसू लागला, म्हणाला,
'काय पाहतोस एवढं माझ्याकडं!'
'तुझ्या चेहऱ्यावरचा हा शांत भाव मनात साठवून ठेवतोय.'
'लक्ष्या, एक वचन दे.त्याच्या बदललेल्या स्वरामुळं मला क्षणभर भीती वाटली.  तो पुढे बोलू लागला, 'मला तुझ्याबद्दल खात्री आहे कारण माझ्या जवळचा तू एकमेव मित्र आहेस.  तू माझ्या प्रीतीची, मुलांची, ताईची सर्वांची काळजी घे.  तुला आठवतं तू जेव्हा माझ्या खोलीत राहण्यासाठी आला होतास...'
'हो, आणि तू मला 'माफ करा' म्हटल्यावर मी मूर्खासारखा परत जाताना तू केवढया मोठयाने हसला होतास.मी महेशला सांगितलं, कारण मला आठवायची गरजच नव्हती. 
त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण माझ्या मनात अजून ताजातवाना होता.  या प्रसंगाची आठवण होऊन महेश पुन्हा तसाच हसला, खळखळून हसता हसता त्याला ठसक्याची उबळ आली.  मी डॉक्टरांना बोलावण्यासाठी उठणार तोच माझा हात त्यानं गच्च धरला, ठसका आवरुन धरत तो म्हणाला,
'लक्ष्या, कुणीतरी आठवण काढली की ठसका लागतो म्हणतात.  अनू तर आठवण काढीत नसेल ना रेकी दिव्या? छे!  ती काय आठवण काढणारखोऱ्यानं पैसा ओढण्यात गुंतली असेल.
दिव्याचं नाव काढताच माझ्या मनात एक बारीकशी कळ उठली.  पण मी तिला चेहऱ्यावर येऊ दिलं नाही.  महेश बोलतंच होता,
'मित्रा आजही मला अनूची आठवण येतेय रे ! फार वर्षे झाली तिला भेटून.एवढया बोलण्यामुळं महेशला जोराची धाप लागली होती.  तितक्यात ताईही तिथं आल्या.  त्यांनी महेशची ती अवस्था पाहिली.  तो फारच दमलेला दिसू लागला होता, ताई त्याच्याजवळ आल्या, त्यांना पाहून महेश म्हणाला,
'आलीस ताई, मला तुझ्याशी खूप बोलायचंय! ताई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवतो.'
'महेश आता तू तोंडातून एक शब्दही न काढता शांतपणे पड.  आपण नंतर सावकाश बोलत बसू.असं म्हणून त्याच्याजवळ बसल्या.  मी महेशचं मस्तक उलूनन त्यांच्या मांडीवर ठेवलं.  त्याचा माधा अगदी भाजत होता.  तार्‌इंच्या मांडीवर डोकं ठेवताच महेशला डोक्यात एक कळ आली, 'आई गं' असं म्हणून तो बेशुध्द पडला.  मी डॉक्टरना बोलावलं.  त्यांनी महेशला एक इंजेक्शन दिलं.
महेश कोमात गेला होता.  त्याच्या ओठांची हालचाल मला जाणवली, मी लक्ष देऊन ऐकू लागलो, तो काहीतरी असंबंध्द बडबडत होता.
'अरे... ताई इतक्या...घाईत कुठे जातेय?.....आणि तिच्या .....तिच्या हातात काय आहे ते?.... ओ हो ..... राखी आहे तर... लक्ष्याला बांधणार वाटतं...मलाही बांध बरं....अरे पण...ही दुसरी कोण येतेय?....आणि .....ताईच्या हातातल्या....राखीला का ओढतेय?.....अरेच्या ही दिव्याच की! ....पण दोघींच्या भांडणात.....राखी मात्र तुटली.....दोघी कशा पडल्या बघा....तुटलेल्या राखीतून....ही कोण आली?.....सोबत दोन....छोटी छोटी मुलं पण आहेत.....ही ती प्रीती....जिच्यातून....मूर्तीमंत प्रीतीचा झराच वाहतोय....पण....पण मला अनू कुठे दिसत नाही....अगं लबाडे.....इतक्या लांब ......क्षितिजावर उभी आहेस होय....पण मी.....मी तुला पकडणारच.....अगं जरा हळू पळ ना.....बघ मला किती धाप लागीय ते.....ए.... आता मात्र पुरे हे चेष्टा....मी इथं बसतो....तू माझ्याजवळ आलीस....तरच मी....तुझ्यासोबत येईन.....हां आता कशी आलीस.....आता आपण जाऊ या.....चल....बाय....ताई....दिव्या....प्रीती....छोटया बाळांनो.....बाय.....माझ्या मित्रा......परत आलो......तर....तुझी भेट....घेईनच....बाय!'
महेशची मान ताईंच्या मांडीवर कलंडली.  मी पळत डॉक्टरांकडे गेलो.  डॉक्टरनी सांगितलं सर्व काही आटोपलंच आहे.  आपल्या प्रेमळ ताईच्या कुशीत महेश विसावला होता.  याच हातांनी त्याला आधार दिला होता.  नवीन आश आकांक्षा दिल्या होत्या.  त्याचं सारं बालपण त्याच हातात गेलं होतं आणि आज प्राणही त्याच हातावर गेला होता.  ताईचीही शुध्द हरपली होती.
भूतकाळ झरझर माझ्या डोळयासमोरुन सरकू लागला.  वस्तुस्थिती स्वीकारायला माझं मन तयार होत नव्हतं.  माझ्या हातापायातलं अवसान संपलं.  मी मटकन् तिथेच बसलो.  माझ्या विषयी कोणतीही अधिक माहिती नसताना इतकी माया का लावलीस मलाअसं एक दिवस सोडून जाण्यासाठी.  काय अधिकार होता तुला माझ्या आयुष्यात एक मोठं स्थित्यंतर घडवण्याचा कारखान्यातल्या नोकरापासून एक
बिल्डर बनवण्याचा.  अरे, सगळं दुसऱ्यांनाच दिलंस.  स्वत:साठी काहीच घेतलं नाहीस.  ज्यांनी तुला ठोकरलं.  त्यांच्यासाठीसुध्दा तुझ्या तोंडून कधी वाईट शब्द आला नाही असं तुझं हे व्यक्तित्व खरोखरीच महान !'
विचार करता करता मी ताईंकडे पाहिलं.  त्यांची मुद्रा भावना विहीन शांत दिसत होती.  मी त्यांना शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करु लागलो.
ताई शुध्दीवर आल्या.  महत्प्रयासानं त्यांनी स्वत:ला सावरलं होतं.  त्यांचा तो दृढनिर्धार पाहून मला मात्र रडूच कोसळलं.  लहान मुलासारखा मी ओक्साबोक्शी रडू लागलो.  ताई माझ्या पाठीवरुन हात फिरवू लागल्या.  त्या हातांची भाषा काही न बोलताही मला समजत होती.  पण महेश आता आमच्यात राहिला नाही हे मात्र मन मानायला तयार नव्हतं.  ताईंनीही आपल्या अश्रूंना वाट करुन दिली.  नंतर त्या जड पावलांनी हॉस्पिटलच्या दाराकडे चालू लागल्या.  घरी जाऊन त्यांना प्रीतीची आणि तिच्या मुलांची समजूत घालायची होती.  देवा, ताईंना याक्षणी माझ्याही अंगातलं बळ प्राप्त होऊ दे.  प्रीतीला ही बातमी समजल्यावर तिची काय अवस्था होईलयाची मी कल्पनाच करु शकत नव्हतो.  मला मात्र ताई आता दमल्यासारख्या, थकल्यासारख्या वाटू लागल्या.  त्यांचा या क्षणीचा संयम एखाद्या देवीतच असू शकेल.
ताई खोलीतून बाहेर निघून गेल्या. त्यानंतर बराच वेळ त्याचा हात हातात घेवून मी वेड्यासारखा रडत होतो. राहून राहून मघाचे बोलणे आठवत होते,
लक्ष्या...तुला आठवतोय आपण दोघांनी एक अलिखित करार केला होता...?” तो सांगत होता
हो...आणि एकदा तू जेवण करायला नकार दिल्यावर रागारागाने जावून मी १०० रुपयांच्या बॉंडवर आपला करार लिहून त्यावर अरेरावीने तुझ्या सह्या घेतल्या होत्या...मी
अगदी लहान मुलांसारखा वागायचास कधी कधी ! मित्रा, असाच निरागस रहा...तो हसत पुढे म्हणाला, “कुठं आहे तो करार..?”
तो कागद नेहमी मी माझ्या बॅगेत घेवून फिरतो. तू कधी शब्द फिरवशील, याचा नेम नाही..मी हसत म्हणालो. तोही प्रसन्नपणे हसला होता.
            त्याच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात भरून राहिला होता. मी गडबडीने उठून माझ्या बॅगेकडे गेलो आणि त्यातून तो कराराचा कागद बाहेर काढला. त्या कागदावरच्या शेवटच्या करारावर नजर गेली आणि डोळ्यातून एक थेंब त्याच शेवटच्या करारावर ओघळला.
१०. तू आयुष्यभर माझी साथ देशील.
मला कांहीच सुचेनासं झालं. समोरचा कागद धुरकट दिसू लागला. माझ्या मित्रानं आज करार मोडला होता. मला एकटं पाडून, हात सोडून माझ्या डोळ्यासमोर निघून गेला होता. मी वळून महेशकडं पाहिलं. त्याचं ते पहिल्या भेटीतलं माझ्यावरचं हसू पुन्हा कानात घुमू लागलं. त्याच्यावरची नजर न हलवताच मी तो कराराचा कागद फाडू लागलो. आता त्या कराराला कांहीच अर्थ राहिला नव्हता. कागद फाडतच  खिडकीच्या दिशेनं गेलो आणि खिडकी उघडून त्या कराराचे कपटे वार्‍यात सोडून दिले. अजूनही त्याच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात भरून राहिला होता आणि, जसे ते कपटे दूरवर जातील तसा तो आवाज वाढत निघाला होता...
                                                                                                                      (समाप्त)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा