मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

नितळ-३ एक चेहरे पे कईं चेहरे...

    (मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये लिहीत असलेल्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत मंगळवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेला भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

गेल्या पंधरवड्यात व्याख्यानाची तीन-चार निमंत्रणं होती. विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यातलं एक व्याख्यान संपवून घरी परतलो. पत्नी-मुलांसमवेत चहा घेत असताना गंमतीनं बायकोला म्हणालो, या गतीनं व्याख्यानं देत सुटलो तर लोक मला विचारवंत वगैरेच ठरवून टाकतील. त्यावर बायको तिच्या स्पष्टवक्त्या स्वभावाला साजेसं उत्तरली, काही गरज नाही विचारवंत वगैरे म्हणवून घेण्याची. तुम्ही मूळ समाजभान असणारे पत्रकार आहात, तसेच राहा. आणि विचारवंत होण्यासाठी जो पल्ला आवश्यक असतो, तो गाठण्यासाठी तुम्हाला अजून खूप कष्ट करावे लागणार आहेत.

गार्डन गार्डन होऊ पाहणारं माझं मन बायकोच्या या फारच स्पष्ट बोलण्यानं आतून थोडंसं खट्टू झालं, पण क्षणभरच. पुढच्या क्षणी तिच्याविषयी अभिमानच दाटून आला मनी. म्हटलं, यार अशी आपले पाय कायम जमिनीवर टिकवून ठेवणारी जीवनसंगिनी आपल्याला लाभली, यापेक्षा आणखी दुसरं काय हवंय? पण, यातूनच मग पुढची विचारशृंखला मनात सुरू झाली. खरंच, आपण जगात वावरताना आपल्या चेहऱ्यावर असे कितीक मुखवटे लावून वावरत असतो. त्या मुखवट्यांच्या मांदियाळीमध्ये आपण आपला मूळ चेहराच जणू हरवून बसलेलो असतो. सुरवात माझ्यापासूनच केली. बायकोनं माझ्यातला पत्रकार मान्य केला होता, हे तर तिच्या बोलण्यातून आलंच. पण, मी तो तरी किती खरा? आणि मी आयुष्यात फुलटाईम पत्रकार म्हणून तरी किती राहू शकतो. पत्रकाराचाही मुखवटा जर मी उतरवला, तर त्याखालचा माझा चेहरा कोणता? आणि पुन्हा मग अगदी उगमाकडं गेलो. मी जन्मलो, तेव्हा मी काय कोणी पत्रकार म्हणून थोडाच जन्मलो होतो? माणसाचं एक पिल्लू म्हणून जन्माला आलो होतो. पुढं जसजसा मोठा होत गेलो वयानं, त्यात ज्ञानकणांचीही भर पडत गेली. पुढं आयुष्याच्या एका वळणावर चरितार्थासाठी काही काम करणं आलं आणि त्यातून मग मी नोकरीधंदा करू लागलो. तेव्हा ही वेगवेगळ्या पदांची पुटं माझ्या नावाच्या मागं चिकटू लागली. त्यांचेच मुखवटे मग चेहऱ्यावर चढवून मी तोच म्हणून वावरू लागलो. असली चेहरा कहीं खोता चला गया। हा असली चेहरा असतो माणूस असण्याचा. पण, नेमकं तेवढंच मागे पडत जातं आणि आपण कोणीच्या कोण म्हणूनच जगातला आपला वावर सुरू ठेवतो. मरतानाही आपण माणूस म्हणून कमीच आणि त्या मुखवट्यांचे म्हणूनच अधिक आपली ओळख मागे ठेवून जातो. मात्र, ही ओळख तेव्हाच चिरस्मरणीय बनते, जेव्हा कोणी म्हणतो, एक चांगला माणूस गेला!

जेव्हा आपल्या नावामागील वा पुढील पद, पदनाम राहात नाही आणि तरीही लोक तुमच्याभोवती जमत असतील, तर तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं आयुष्यात काही तरी मिळवलं, असं म्हणता येतं. सत्ता अगर पैसा या अशा गोष्टी असतात की, त्या असणाऱ्यांच्या भोवती गुळाला मुंगळे जसे, तशी भक्तांची मांदियाळी नित्य असते. मात्र, या गोष्टी जर काही कारणानं दुरावल्या, तर स्वार्थ साधण्यासाठी भोवतीनं गोळा झालेले हे लोलुप मुंगळे सर्वात आधी तुमच्यापासून दूर जातात. हे इथं काही नवीन सांगितलं जातंय, अशातला भाग नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी सत्तेत बसलेल्यांपासून ते पैशांच्या राशीत खेळणाऱ्यांनाही! मात्र, त्यांनाही या मुंगळ्यांचा सोस सोडवत नाही. त्यांचा हव्यास भागवित असताना स्वतःचाही मद गोंजारून घेताना त्यांना आनंद लाभत असतो. त्यांना माहिती असतं, ही सारी आपल्या या मुखवट्याचीच कमाल आहे. त्यामुळं ते कायमस्वरुपी या मुखवट्यांना जीवापाड जपत राहतात. कोणी सुहृदानं, हितचिंतकानं त्याची जाणीव करून दिली तर ते त्यांना आवडत नाही. या दिखावटी मुखवट्यावर, जगण्यावर एखादा सूक्ष्म ओरखडाही त्यांना सहन होत नाही. या भुलभुलैय्यामध्ये त्यांचं सारं जगणंच हरवून गेलेलं असतं किंवा आपण ज्या पद्धतीनं जगतो आहोत, ते कचकडी जगणंच त्यांना खरं वाटू लागतं. आपल्या आभासी दुनियेतून त्यांना बाहेर येववंत नाही. यांचा गोंधळ तेव्हा उडतो, जेव्हा परिधान केलेले हे मुखवटे काही कारणानं फाटतात किंवा फाडले जातात. त्यांना या जगण्याची सवयच नसते. त्यांचं असणं, दिसणं आणि दाखवणं या साऱ्याच बाबींत महदअंतर असतं. हे अंतर काही वेळा संपुष्टात येतं आणि ती खरी कसोटीची वेळ असते. त्या कसोटीस जो उतरला, तो जिंकला; जो नाही, तो संपला.

जगात जगत असताना माणसाला या मुखवट्यांची गरज का भासावी, याचा सूक्ष्मपणानं विचार केला, तर आपल्या मनीमानसी रुजलेल्या स्तरित मानसिकतेला जबाबदार धरावं लागतं. जगामध्ये धर्म, जात, वर्ण, वंश, प्रांत, भाषा, वेश आदी अनेक कारणांवरुन माणसं परस्परांशी भेदभाव बाळगून राहतात. त्यामध्येही आपण कोणाच्या तरी खाली आहोत, यापेक्षा आपण या उतरंडीमध्ये कोणाच्या तरी वर आहोत, या अहंकार माणसाला सुखावणारा असतो. सत्ता, पैसा, उच्चवर्ण या गोष्टी माणसाला या उतरंडीच्या सर्वाधिक वरच्या स्तरामध्ये नेऊन ठेवतात. आणि खालच्या स्तरांतील लोकांनाही या वरच्यांची तळी उचलण्यामध्ये, अगदी त्यांच्या लाथा खाण्यामध्ये सुद्धा कोण समाधान लाभत असते. वरच्या स्तरांतल्या लोकांची जशी ही उच्चवर्णीय मानसिकता घातक असते, त्याहूनही घातक ही गुलामगिरीची मानसिकता अधिक भयावह आणि समाजाला विषमतेच्या खाईत लोटणारी असते. अशा स्तरित मानसिकतेच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्य, समता अगर बंधुतेची भावना रुजू शकत नाही. किंबहुना, रुजू दिली जात नाही. कारण यामध्ये वरिष्ठ उच्चस्तरीय लोकांचे स्वार्थ दडलेले असतात. समता, समानता ही मूल्ये माणुसकीची आहेत, मात्र त्यातून एकत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते, जी या उच्चस्तरीयांच्या स्वार्थाआड येणारी असते. त्यामुळेच राहणीमानाच्या विविध आभासी संकल्पनांचे गारूड पसरवून त्यामध्ये खालच्या स्तरांनाही अडकविण्याचा चंग बांधला जातो. वरच्या स्तरांतल्या मुखवट्यांचे अनुकरण करत असेच एकावर एक अनेक मुखवटे चढवून प्रत्येकजण फिरताना दिसतो. सोयीस्कररित्या वापरतही असतो. जो एखादा मुखवट्याविना वावरण्याचा प्रयत्न करतो, तो अडचणीचा असतो प्रस्थापित व्यवस्थेच्या. कारण तो माणूस असतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा