Daily Nav-Shakti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Daily Nav-Shakti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ मार्च, २०२३

नितळ-६: कुछ तो लोग कहेंगे...!

 


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

माणूस हा समाजशील प्राणी खराच; पण, त्याच्यामध्ये ही समाजशीलता इतकी भिनलेली आहे की त्याच्या प्रत्येक कृतीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाची प्रेरणा अथवा दबाव असतो. गंमतीचा भाग म्हणजे कृतीवर जसा हा प्रभाव असतो, तसाच किंवा त्यापेक्षाही अधिक एखादी कृती न करण्यामागे असतो. म्हणजे पाहा ना, एखादी साध्यात साधी कृती करण्याचा विचार जरी आपल्या मनात आला, तरी त्याच वेळेला ‘लोक काय म्हणतील?’ हा विचार आपल्या मनी ठाकतो. आणि शेकडा ९९ वेळा आपण मनात आलेला कृतीशील विचार कोणत्याही कृतीविना पाठीवर टाकून रिकामे होतो. कदाचित एक चांगलं काम आपल्या हातून होता होता मागं पडतं किंवा राहूनही जातं. लोकांनी काही म्हणू नये, या दृष्टीनं आपलं जीवनाचं रहाटगाडगं मग आपण फिरवित राहतो.

सौरऊर्जेच्या प्रचारासाठी दशकभराच्या भारतभ्रमण यात्रेवर असलेल्या चेतन सोळंकी यांची अलिकडेच भेट घेतली. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीनं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सध्या सुरू असलेली उर्जेची अनाठायी उधळण आणि बचत करण्यासाठी छोटे-छोटे उपाय त्यांनी सुचविले. बोलता बोलता ते म्हणाले की, आपण प्रत्येकाने घरगुती पातळीवर कपड्यांना इस्त्री न करता ते वापरले तरी आपण खूप बचत करू शकतो कारण इस्त्री जवळपास १००० वॅट वीज खाते. त्यांनी रेफ्रिजरेटर, गीझर वगैरे साधनांचाही वापर सहज टाळता येऊ शकतो, हे सांगितलं. यातल्या फ्रीज, गीझर यांसाठी कौटुंबिक संमती मिळवणं तत्काळ शक्य नव्हतं; मात्र, व्यक्तीगत स्तरावर स्वतः इस्त्री न केलेले कपडे वापरणं सहजशक्य आहे. म्हणून मी तिथून सुरवात करण्याचा निर्णय घेतला. अगदी शाळेत असतानाही स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म कुठे दर वेळी इस्त्री केला जात होता? धुतलेला ड्रेस रात्री छान घडी घालून उशाखाली किंवा अंथरूणाखाली ठेवला की सकाळी कडक नसली तरी चांगली दिसेल अशी इस्त्री झालेली असे. त्यामुळे मी धुतलेला शर्ट इस्त्री न करता चढवला अंगावर बाहेर पडताना. त्यावेळी बायकोचा पहिला प्रश्न हाच होता की, ‘लोक काय म्हणतील?’ मी उत्तरलो, ‘कोणी काही म्हणणार नाही, पण म्हणालं तर मी सांगेन ना!’ यावर तिचा तिरपा कटाक्ष पाठीवर घेऊन मी घरातून बाहेर पडलो.

पाहा ना, एक साधारण कृती, जिच्यामुळं कोणाला कसलाही त्रास होणार नाही की अन्य कोणाचंही जीवन कोणत्याही प्रकारे प्रभावित होण्याचं कारण नाही, अशा वेळीही जर ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा सामना करावा लागत असेल, तर लाखो, कोट्यवधी लोकांचं जीवन प्रभावित करण्यासाठी हयात वेचणाऱ्या लोकांना किती वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागत असेल? आधी व्यक्तीगत स्तरावर विचार आणि स्वीकार, यानंतर पुढे कुटुंब, नातेवाईक, स्थानिक भोवताल आणि त्यानंतर मग इतर समाजघटक असा त्या विचाराचा विस्तार व स्वीकार वाढविण्यासाठी कोण झगडा समाजप्रवर्तकांना, प्रबोधकांना करावा लागत असेल, याचा आपण कधी विचारच करीत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे इंग्लंडमधील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतले. उरलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत जायचे म्हणून त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. शिकवण्या घेतल्या, गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केले,शेवटी सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली. या समग्र काळामध्ये ते प्रचंड काटकसर करून पै न पै साठवित होते. यामध्ये माता रमाबाईंना ते अतिशय नेमकी रक्कम दरमहा खर्चाला देत. अगदी काडेपेटीच्या प्रत्येक काडीचाही हिशोब त्यात असे. बाबासाहेब परदेशी असतानाही या माऊलीने कोणतीही तक्रार न करता लोकांच्या घरची कामे करून आपला निर्वाह चालविला. आणि बाबासाहेब उच्चशिक्षित होऊन परतले, आता तरी आपल्यामागचे शुक्लकाष्ठ संपेल, या आशेवर असणाऱ्या रमाबाईंचे सांसारिक कष्ट कमी झाले नाहीत. उलट ही काटकसर करावी लागली. मात्र, त्यांनी बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी हे कष्ट विनातक्रार सोसले. एवढ्या प्रकांडपंडिताची बायको, पण ‘लोक काय म्हणतील?’ म्हणून त्यांनी कष्टत्याग केला नाही. उलट आरोग्याच्या अनेकविध तक्रारी असूनही अजिबात कुरकूर न करता त्यांनी साऱ्या झळा सोसल्या, म्हणूनच बाबासाहेबांच्या उत्कर्षामध्ये आणि असामान्यत्वामध्ये रमाबाईंच्या साधेपणाचा, सामान्यत्वाचा वाटा जगन्मान्य ठरला. महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई यांचा संघर्ष तर ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाला अजिबातच थारा न देण्यामध्ये आणि त्या पलिकडला आहे.

राजर्षी शाहू महाराजांचाही इथे दाखला देता येईल. राजर्षींनी ज्या कालखंडात त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हात घातला, प्रतिगामित्व ठासून भरलेल्या त्या काळात समाजमानसावर रुढी, परंपरांचा पगडा मोठा होता. राजर्षींनी स्वतःपुरत्या साऱ्या भेदभावांना तिलांजली दिलेली होती. त्यांनी आपल्या धार्मिकतेला तिलांजली दिलेली नव्हती, पण कोणताही धर्म विषमतेला थारा देत नाही, याविषयी त्यांची धारणा पक्की होती. आणि माणसा-माणसांत भेद मानणं, हा अधर्म आहे, याविषयी तर त्यांची खात्रीच होती. मात्र, ही मानसिकता राजघराण्यातल्या सर्वांचीच असेल, असे कसे म्हणता येईल? आपण केवळ या अंगाने विचार केला, तरी डोक्याला मुंग्या येतील की राजर्षींना मग त्या स्तरावर किती टोकाचा संघर्ष करावा लागला असेल. जितके मोठे कार्य तितका हा झगडा मोठाच. मात्र, त्यावरही मात करून अथवा ‘घरचे काय म्हणतील?’ वा ‘लोक काय म्हणतील?’ याची फारशी फिकीर न करता महाराजांनी आपलं सामाजिक कार्य जोमानं सुरूच ठेवलं आणि एक राजा म्हणून ते लोकांच्या गळीही उतरवलं. म्हणून तर ते 'लोकराजा' उपाधीला पात्र ठरले.

म्हणजे एखादं व्यापक, समाजहितैषि कार्य हाती घ्यायचं, तर झगडा मोठा आहेच. पण, छोट्या-छोट्या प्रभावहीन बाबींसाठी सुद्धा ‘लोक काय म्हणतील?’ हा अडथळा ओलांडणं अथवा झुगारून पुढं जाणं, ही फार महत्त्वाची, कसोटीची पहिली पायरी आहे. मुळात आपण आपल्या सामान्यत्वाच्या कक्षांमधून बाहेर पडून थोड्याफार तरी असामान्यत्वाच्या दिशेनं जाणार की नाही, याचा निर्णय, या प्रश्नाचं तुम्ही काय काय उत्तर देता, यावरच अवलंबून असतं. बापलेक आणि गाढवाची गोष्ट आपणा सर्वांना माहिती असूनही अकारण या प्रश्नाच्या बेड्या आपल्या पायबंद बनून राहणार असतील, तर आपण आपल्या सामान्यत्वाच्या कक्षेतून कधी बाहेरच पडणार नाही. ‘लोगों का काम है कहना...’ यारों, समझो!


मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

नितळ-३ एक चेहरे पे कईं चेहरे...

    (मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये लिहीत असलेल्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत मंगळवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेला भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

गेल्या पंधरवड्यात व्याख्यानाची तीन-चार निमंत्रणं होती. विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यातलं एक व्याख्यान संपवून घरी परतलो. पत्नी-मुलांसमवेत चहा घेत असताना गंमतीनं बायकोला म्हणालो, या गतीनं व्याख्यानं देत सुटलो तर लोक मला विचारवंत वगैरेच ठरवून टाकतील. त्यावर बायको तिच्या स्पष्टवक्त्या स्वभावाला साजेसं उत्तरली, काही गरज नाही विचारवंत वगैरे म्हणवून घेण्याची. तुम्ही मूळ समाजभान असणारे पत्रकार आहात, तसेच राहा. आणि विचारवंत होण्यासाठी जो पल्ला आवश्यक असतो, तो गाठण्यासाठी तुम्हाला अजून खूप कष्ट करावे लागणार आहेत.

गार्डन गार्डन होऊ पाहणारं माझं मन बायकोच्या या फारच स्पष्ट बोलण्यानं आतून थोडंसं खट्टू झालं, पण क्षणभरच. पुढच्या क्षणी तिच्याविषयी अभिमानच दाटून आला मनी. म्हटलं, यार अशी आपले पाय कायम जमिनीवर टिकवून ठेवणारी जीवनसंगिनी आपल्याला लाभली, यापेक्षा आणखी दुसरं काय हवंय? पण, यातूनच मग पुढची विचारशृंखला मनात सुरू झाली. खरंच, आपण जगात वावरताना आपल्या चेहऱ्यावर असे कितीक मुखवटे लावून वावरत असतो. त्या मुखवट्यांच्या मांदियाळीमध्ये आपण आपला मूळ चेहराच जणू हरवून बसलेलो असतो. सुरवात माझ्यापासूनच केली. बायकोनं माझ्यातला पत्रकार मान्य केला होता, हे तर तिच्या बोलण्यातून आलंच. पण, मी तो तरी किती खरा? आणि मी आयुष्यात फुलटाईम पत्रकार म्हणून तरी किती राहू शकतो. पत्रकाराचाही मुखवटा जर मी उतरवला, तर त्याखालचा माझा चेहरा कोणता? आणि पुन्हा मग अगदी उगमाकडं गेलो. मी जन्मलो, तेव्हा मी काय कोणी पत्रकार म्हणून थोडाच जन्मलो होतो? माणसाचं एक पिल्लू म्हणून जन्माला आलो होतो. पुढं जसजसा मोठा होत गेलो वयानं, त्यात ज्ञानकणांचीही भर पडत गेली. पुढं आयुष्याच्या एका वळणावर चरितार्थासाठी काही काम करणं आलं आणि त्यातून मग मी नोकरीधंदा करू लागलो. तेव्हा ही वेगवेगळ्या पदांची पुटं माझ्या नावाच्या मागं चिकटू लागली. त्यांचेच मुखवटे मग चेहऱ्यावर चढवून मी तोच म्हणून वावरू लागलो. असली चेहरा कहीं खोता चला गया। हा असली चेहरा असतो माणूस असण्याचा. पण, नेमकं तेवढंच मागे पडत जातं आणि आपण कोणीच्या कोण म्हणूनच जगातला आपला वावर सुरू ठेवतो. मरतानाही आपण माणूस म्हणून कमीच आणि त्या मुखवट्यांचे म्हणूनच अधिक आपली ओळख मागे ठेवून जातो. मात्र, ही ओळख तेव्हाच चिरस्मरणीय बनते, जेव्हा कोणी म्हणतो, एक चांगला माणूस गेला!

जेव्हा आपल्या नावामागील वा पुढील पद, पदनाम राहात नाही आणि तरीही लोक तुमच्याभोवती जमत असतील, तर तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं आयुष्यात काही तरी मिळवलं, असं म्हणता येतं. सत्ता अगर पैसा या अशा गोष्टी असतात की, त्या असणाऱ्यांच्या भोवती गुळाला मुंगळे जसे, तशी भक्तांची मांदियाळी नित्य असते. मात्र, या गोष्टी जर काही कारणानं दुरावल्या, तर स्वार्थ साधण्यासाठी भोवतीनं गोळा झालेले हे लोलुप मुंगळे सर्वात आधी तुमच्यापासून दूर जातात. हे इथं काही नवीन सांगितलं जातंय, अशातला भाग नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी सत्तेत बसलेल्यांपासून ते पैशांच्या राशीत खेळणाऱ्यांनाही! मात्र, त्यांनाही या मुंगळ्यांचा सोस सोडवत नाही. त्यांचा हव्यास भागवित असताना स्वतःचाही मद गोंजारून घेताना त्यांना आनंद लाभत असतो. त्यांना माहिती असतं, ही सारी आपल्या या मुखवट्याचीच कमाल आहे. त्यामुळं ते कायमस्वरुपी या मुखवट्यांना जीवापाड जपत राहतात. कोणी सुहृदानं, हितचिंतकानं त्याची जाणीव करून दिली तर ते त्यांना आवडत नाही. या दिखावटी मुखवट्यावर, जगण्यावर एखादा सूक्ष्म ओरखडाही त्यांना सहन होत नाही. या भुलभुलैय्यामध्ये त्यांचं सारं जगणंच हरवून गेलेलं असतं किंवा आपण ज्या पद्धतीनं जगतो आहोत, ते कचकडी जगणंच त्यांना खरं वाटू लागतं. आपल्या आभासी दुनियेतून त्यांना बाहेर येववंत नाही. यांचा गोंधळ तेव्हा उडतो, जेव्हा परिधान केलेले हे मुखवटे काही कारणानं फाटतात किंवा फाडले जातात. त्यांना या जगण्याची सवयच नसते. त्यांचं असणं, दिसणं आणि दाखवणं या साऱ्याच बाबींत महदअंतर असतं. हे अंतर काही वेळा संपुष्टात येतं आणि ती खरी कसोटीची वेळ असते. त्या कसोटीस जो उतरला, तो जिंकला; जो नाही, तो संपला.

जगात जगत असताना माणसाला या मुखवट्यांची गरज का भासावी, याचा सूक्ष्मपणानं विचार केला, तर आपल्या मनीमानसी रुजलेल्या स्तरित मानसिकतेला जबाबदार धरावं लागतं. जगामध्ये धर्म, जात, वर्ण, वंश, प्रांत, भाषा, वेश आदी अनेक कारणांवरुन माणसं परस्परांशी भेदभाव बाळगून राहतात. त्यामध्येही आपण कोणाच्या तरी खाली आहोत, यापेक्षा आपण या उतरंडीमध्ये कोणाच्या तरी वर आहोत, या अहंकार माणसाला सुखावणारा असतो. सत्ता, पैसा, उच्चवर्ण या गोष्टी माणसाला या उतरंडीच्या सर्वाधिक वरच्या स्तरामध्ये नेऊन ठेवतात. आणि खालच्या स्तरांतील लोकांनाही या वरच्यांची तळी उचलण्यामध्ये, अगदी त्यांच्या लाथा खाण्यामध्ये सुद्धा कोण समाधान लाभत असते. वरच्या स्तरांतल्या लोकांची जशी ही उच्चवर्णीय मानसिकता घातक असते, त्याहूनही घातक ही गुलामगिरीची मानसिकता अधिक भयावह आणि समाजाला विषमतेच्या खाईत लोटणारी असते. अशा स्तरित मानसिकतेच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्य, समता अगर बंधुतेची भावना रुजू शकत नाही. किंबहुना, रुजू दिली जात नाही. कारण यामध्ये वरिष्ठ उच्चस्तरीय लोकांचे स्वार्थ दडलेले असतात. समता, समानता ही मूल्ये माणुसकीची आहेत, मात्र त्यातून एकत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते, जी या उच्चस्तरीयांच्या स्वार्थाआड येणारी असते. त्यामुळेच राहणीमानाच्या विविध आभासी संकल्पनांचे गारूड पसरवून त्यामध्ये खालच्या स्तरांनाही अडकविण्याचा चंग बांधला जातो. वरच्या स्तरांतल्या मुखवट्यांचे अनुकरण करत असेच एकावर एक अनेक मुखवटे चढवून प्रत्येकजण फिरताना दिसतो. सोयीस्कररित्या वापरतही असतो. जो एखादा मुखवट्याविना वावरण्याचा प्रयत्न करतो, तो अडचणीचा असतो प्रस्थापित व्यवस्थेच्या. कारण तो ‘माणूस’ असतो.


मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

नितळ-२: अजीर्ण: खाणं आणि जगण्याचं...

 


(मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये लिहीत असलेल्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत आज दि. २४ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेला दुसरा भाग माझ्या वाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


संज्ञापनशास्त्राचे निवृत्त शिक्षक प्रा. ओमप्रकाश कलमे भेटावयास आले होते. विविध विषयांवर, विशेषतः संस्कृती आणि संज्ञापन या अनुषंगाने बोलताना त्यांच्या एका विधानानं माझ्या मनाचा ठाव घेतला. ते म्हणाले, “चवीसाठी खाणं आणि मनोरंजनासाठी जगणं, या दोन गोष्टी माणसानं सोडल्या, तर त्यातून उरेल ती केवळ सात्त्विकता, अन्नाचीही आणि जगण्याचीही!”

आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं, मार्गदर्शक असं हे विधान आहे. सध्याचा काळ हा आपल्या खाण्याचाही आणि जगण्याचाही अगदी अजीर्ण होण्याचा आहे. अन्नामध्ये एक मूलभूत चव असायला हवी, ही रास्त अपेक्षा आहे. मात्र, आपलं खाणं आज केवळ चवीसाठी आणि चवीसाठीच चाललेलं आहे. त्यातली सात्त्विकता कुठेतरी बॅकसीटवर बसली आहे. यंदाचं वर्ष आपण जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करीत आहोत. मुळात आपली संस्कृती ही भरडधान्याधारितच आहे. पाश्चात्य जगताच्या नादाला लागून आपण आपल्या या पोषक खाद्यसंस्कृतीकडं काणाडोळा करीत गेलो आणि आपल्या नसलेल्या खाद्यसंस्कृतीला जवळ करताना तिच्यासोबत येणारे लाइफस्टाईलची सारी आजारपणंही कवटाळून बसलो. कोविडच्या कालखंडानं थोडं या सात्विकतेकडे आपल्याला पुन्हा वळवलं, मात्र त्याच काळात वेगवेगळ्या चवींकडं आकर्षून घेणाऱ्या युट्यूब वाहिन्यांचाही सुळसुळाट झाला.

सुखासीन जीवनासाठीच सारं काही करणाऱ्या व्यक्तींचं हे चवीसाठीचं खाणं काही काळापुरतं मान्यही करता येईल. मात्र, आपण समाजाच्या निम्न अथवा मध्यमवर्गीय स्तरातले लोक अन्नाची मस्ती करून जी नासाडी करतात, त्यावरही या निमित्तानं आक्षेप घ्यायला हवेत. खरे तर, विविध समारंभांमध्ये अन्नाची अतिरिक्त नासाडी होऊ नये, लोकांनी हवे तेवढेच अन् तितकेच घ्यावे, यासाठी अस्तित्वात आली ती बुफे पद्धत. मात्र, आपण जणू काही त्यातला कोणताही पदार्थ ना कधी यापूर्वी खाल्ला आहे, ना नंतर कधी बघायला मिळणार आहे, अशा पद्धतीनं अन्नपदार्थांनी ताट ओसंडून वाहेस्तोवर भरून घेतो. मागच्यांचा विचारही करीत नाही आणि त्यातला जीभेला बरा लागेल तो पदार्थ खातो आणि उरलेलं सगळं टाकून देतो. हे बुफेचं एक उदाहरण झालं. मात्र, भारतात अशा प्रकारे जवळपास ४० टक्के अन्नाची नासाडी होते. जगभरात हेच प्रमाण १७ टक्के इतकं आहे. भारतात एकीकडं ८१ कोटी लोक एका वेळी उपाशीपोटी झोपत असताना आपल्या स्वयंपाकघरात दरवर्षी ६.८८ कोटी टन इतक्या अन्नाचा कचरा होतो. यानुसार आपल्या देशातली प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी ९४ किलो अन्न वाया घालवते. हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये दरडोई अन्नाची नासाडी ही सरासरी २८ किलो इतकी आहे.

मुळात पोट भरायला माणसाला लागतं किती अन्न? एखादी भाजीभाकरी, डाळभात आणि सॅलड. या पलिकडं जाऊन केवळ चवीसाठी खाण्याचा आणि त्याहूनही अन्न वाया घालवण्याचा सोस आपण टाळायला हवा. एखादा अन्नाचा कण टाकून देतानाही भुकेपोटी ज्याला कळवळत झोपावं लागतं, अशा व्यक्तीचा, मुलाचा चेहरा आपल्यासमोर यायला हवा. त्याच्या मुखात आपण घास घालत असू वा नसू, मात्र आपल्याकडून अन्नाचा एक कणही वाया जाणार नाही, एवढी किमान दक्षता तरी आपण निश्चितपणानं घेऊ शकतो.

जे अन्नातल्या चवीच्या बाबतीत होतं, तेच आज आपलं मनोरंजनाच्या बाबतीतही झालेलं आहे. मान्य आहे, आपल्या लाईफस्टाईलमुळे ताणतणावाचे प्रसंग वाढलेले आहेत. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, टिकवून ठेवायचं आहे. सारी दमछाक त्यासाठीच जणू काही सुरू आहे. त्या नादात आपण आपलं खरं जगणं विसरून गेलो आहोत. या धबडग्यातून मग थोडासा विरंगुळा म्हणून आपण मनोरंजनाचा आधार घेतो. मात्र, सध्या या मनोरंजनाचा इतका अतिरेक झाला आहे की, बोलता सोय नाही. तसे पाहता, संज्ञापनशास्त्रानुसार, माध्यमांच्या प्रमुख कार्यांमध्ये माहिती, मार्गदर्शन, प्रबोधन, मतनिर्मिती यानंतर मनोरंजनाचा क्रम लागतो. मात्र, आज बाकी सारे प्राधान्यक्रम गुंडाळले जाऊन सर्वच क्रमांवर जणू एंटरटेनमेंटनं आपलं बस्तान बसवलं आहे. अगदी सिरिअस जर्नालिझम करणाऱ्या वाहिन्या सुद्धा इन्फॉर्मेशनच्या ऐवजी स्वतःला इन्फो-टेनमेंट म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागल्या आहेत. आणि हे मनोरंजनही सर्वंकष, सकस असं नाही. तिथंही सात्त्विकतेचा अभावच अधिक दिसून येतो. एकसुरी, सपाट, कोणत्याही प्रबोधनाचा अभाव असणाऱ्या मालिका, अंगविक्षेपी विनोदांचा भडीमार असणारे कार्यक्रम आणि रिएलिटीच्या नावाखाली लोकांच्या, स्पर्धकांच्या भावनांशी खेळ मांडणारे कचकडी टॅलेंट शोज् यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. वृत्तवाहिन्यांवरील डिबेट चर्चांच्या कार्यक्रमांवर तर अगदी सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत, यातच सारे काही आले.

आता नव्या पिढीच्या हातात आलेल्या स्मार्टफोन्समुळे दिवाणखान्यातल्या दूरचित्रवाणी पाहण्याच्या परंपरेमध्ये ट्विस्ट येऊन पर्सनलाईज्ड कन्टेन्ट एक्सेस करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. या प्रेक्षकांना एन्गेज ठेवण्यासाठी ओटीटी कन्टेन्ट क्रिएटर आणि सप्लायर्स यांच्या बरोबरच विविध सोशल मीडिया कंपन्यांनीही कंबर कसली आहे. प्रत्येकाला आज त्याचा दर्शक अर्थात ग्राहक मिळवायचा आहे, तो आपल्याकडे राखायचा आहे. त्यासाठी मोठी यातायात सुरू आहे. केवळ लिपसिंक आणि ‘चेहरा’दर्शी स्युडो अभिनेते, अभिनेत्रींची निर्मिती घाऊक प्रमाणात करणाऱ्या रिल्सचं आता प्रचंड पेवच फुटलं आहे. हे रिल्स निर्माण करणारे जितके आहेत, त्यापेक्षा एक्सेस करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. गंमत म्हणजे एकापाठोपाठ एक रेल्वेप्रमाणं स्क्रीनवर येतच राहणाऱ्या या रिल्समध्ये आपण आपला किती तरी प्रचंड प्रमाणात अनावश्यक वेळ घालवू लागलो आहोत, याचं भानही राहात नाही. या अनाठायी मनोरंजनाची आपल्याला खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात गरज आहे का, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वापरकर्त्यानं आपापल्या स्तरावर याचा निर्णय घ्यायचा आहे. नाही तर, खाण्याचं जसं अजीर्ण होतं, तसंच या अतिरिक्त मनोरंजनामुळं आपल्या जगण्याचंही अजीर्ण होऊन जाईल. त्या नादात आपलं सात्त्विक जगायचंही राहून जाईल, कदाचित!


मंगळवार, १० जानेवारी, २०२३

नितळ-१: ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे...



(मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये या वर्षी पाक्षिक ललित लेखमाला लिहीतो आहे. या मालिकेचा पहिला भाग माझ्या वाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

एक व्यंगचित्र पाहण्यात आलं. यामध्ये एक दिग्दर्शक सांगतो आहे की, त्याचा पुढील चित्रपट हा ब्लॅक अँड व्हाईट असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तो मूकपट असेल! संदर्भ ताजा आहे. तो विस्कटून सांगण्याची गरज नाही, मात्र आपल्या अभिव्यक्तीने तथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिशा कोणती पकडली आहे, यावर नेमकेपणानं बोट ठेवणारं हे स्टेटमेंट!

का होतं आहे असं? का नाकारत चाललो आहोत आपण सगळं? अवघ्या शंभर-दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न्या. रानडे, लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आदी अनेकांनी या देशाच्या पुरोगामित्वाची जी पायाभरणी केली, तिला मजबूत करण्याचे राहोच, पण ठिसूळ करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या ७५ वर्षांत आपण चालविले आहेत. वादावर संवादानं विजय मिळवायचा, द्वेषाला प्रेमानं जिंकायचं, ही बुद्ध-गांधींची परंपरा या देशाला लाभलेली आहे. ती आपण विसरलो आहोत की काय, असे वाटायला लावणारा भोवताल आपल्याच भोवती फेर धरून गरगरतो आहे आणि आपणही त्यातच त्यात अधिकाधिक गुरफटत चाललो आहोत. चांगुलपणाचं भान सुटत चाललं आहे. एकाच एक चष्म्यातून या भोवतालाकडे पाहण्याची सवय आपल्याला लागलेली आहे. बरं, तो चष्मासुद्धा आपला नाहीच. इतरच कोणी तरी आपल्या डोळ्यावर तो चढविलेला आहे. आपलाच भाऊ, आपलीच भगिनी, आपलाच शेजारी अन् आपलाच मित्र, या सर्वांकडं अविश्वासदर्शक संशयाच्या नजरेनं आपण पाहू लागलो आहोत. या संशयानं आपलं अवघं आयुष्य व्यापत चाललं आहे. आपला सारासार विवेक, आपली विचारक्षमता, बुद्धीप्रामाण्यवाद या बाबी जणू काही आपलं बोट सोडून कुठं तरी अनोख्या बेटावर कायमच्या निवासाला निघून गेल्यात की काय, असं वाटण्यासारखी ही स्थिती.

काय कारण असेल बरं? कधी विचार केलात? आपण स्वतः सोडून इतर प्रत्येकाचं मूल्यमापन फार कठोरपणानं करू लागलो आहोत. त्या मूल्यमापनाचे निकषही आपले नव्हेतच. तेही दुसऱ्याच कोणी दिलेले. सप्तरंगांमध्ये नानाविध छटा असतात. त्या छटांमधील वैविध्यतेचा आनंद घेण्याऐवजी आपण साऱ्याच गोष्टी जणू ‘ब्लॅक’ आणि ‘व्हाईट’ या दोनच छटांमध्ये पाहू लागलो आहोत. काळोखासारखं कुळकुळीत काळं आणि नितळ हिमालयासम शुभ्रधवल पांढरं असं काही नसतंच मुळी. काळोखालाही चंद्र-चांदण्यांची शीतल धवलता उठाव देते; तर, हिमालयाची शुभ्रता खुलते ती आकाशी निळाईच्या पार्श्वभूमीवर!

मानवी आयुष्यालाही अशाच रंगच्छटा सौंदर्य बहाल करतात. अगदी करडेपणाच्याही अनेक छटा आयुष्याला व्यापत असतातच की. काळ्याकडून पांढऱ्याकडचा प्रवास हाच मुळी या करडेपणाच्या छटांमधून होत असतो. याच प्रवासाच्या टप्प्यावर काही रंग आपल्याला भेटतात- आयुष्याला गहिरेपण, अर्थ प्रदान करणारे.

निसर्गच जर असा रंगबिरंगी... तर, त्या निसर्गाचेच घटक असणारे आपण बेरंगी का होतो? एखाद्यावर सरसकट काळेपणाचे, धवलपणाचे आरोपण का करीत सुटतो? निसर्गाचे समस्त रंग आपल्यातही आहेत. त्यातही इतर प्राणीमात्रांपेक्षा एक अधिकचा रंग बाळगण्याची सक्षमता आपल्यामध्ये आहे, तो म्हणजे मानवतेचा रंग! विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा आदी भेदांच्या भिंती आपणच बांधल्या आणि त्या भिंतींना आपणच वेगवेगळ्या रंगांत रंगवलं. आपण आपला एक रंग ठरविलेला आहे. तो वगळता आता आपल्याला अन्य तमाम रंगांविषयी घृणा वाटू लागली आहे. त्या घृणेमध्ये मानवता, एकता-एकात्मता, समता, राष्ट्रभक्ती यांच्या आकर्षक नैकरंगी विविधतेवर मात्र एक प्रकारची कृष्णछाया दाटून आलेली आहे.

ही कृष्णछाया, औदासिन्याचे मळभ, विषमता व द्वेषाची भावना दूर करण्याची जबाबदारी कोणा दुसऱ्याची नाही. आपले घर आपणच आवरायचे अन् सावरायचे असते. हा देश आपले घर आहे. तो जपणे आपली जबाबदारी आहे. आतला घरभेदी असो वा बाहेरचा घुसखोर, या दोहो प्रवृत्तींना तोंड द्यावयाचे, तर आपले एकीचे बळ कायम जपण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठीचे मार्गदर्शक डॉक्युमेंटही आपल्याकडे आहे- ते म्हणजे संविधान! आज जगभरात सुरू असणारे कलह आणि अशांती यांच्या थेट भडिमारापासून भारताचे अन् प्रत्येक भारतीयाचे संरक्षण संविधान करते आहे. संविधान तुमच्या-माझ्या पाठी पहाडासारखे उभे आहे, म्हणून आपण ताठ कण्याने उभे आहोत. घटनेनेच प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण जिथे-तिथे वापर करतो आहोत. मात्र, तो सकारात्मक आहे की या देशाच्या स्वातंत्र्याच्या मुळावर उठणारा आहे, याचा विवेक आपण कधीही गमावता कामा नये. सृजनात्मक अभिव्यक्तीचे निर्माते आणि वाहक असणाऱ्या साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, संगीत आदी क्षेत्रांनी तर याची जाणीव ठेवणे आवश्यकच. या विविध क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्याची नवचेतना सदोदित प्रज्वलित राखण्यासाठी अभिव्यक्तीचे विविध रंग मुक्तपणाने उधळीत राहणे,  हे जसे प्रतिभावान सर्जकाचे काम; त्याचप्रमाणे त्या अभिव्यक्तीला कणखर प्रोत्साहनाचे पंख प्रदान करणे, ही गुणग्राहक व्यवस्थेची आणि ती व्यवस्था राबविणाऱ्यांची जबाबदारी! या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की, देशाच्या सर्वंकष प्रगतीला इंद्रधनुषी दिशा लाभण्याची शक्यता गडद होते.