('दै. पुण्यनगरी'च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी २०वा वर्धापनदिन... या निमित्ताने 'इंटरनेट क्रांतीची पंचपदी' ही फाईव्ह-जी युगाचा वेध घेणारी विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला लेख खास माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)
‘बिग डाटा हे मानवी इतिहासातील पुढचं पाऊल खरंच, पण... पण डाटाची
उपलब्धता ही आपली समस्या नाही, तर त्याला (बिग डाटा) समजून घेणं, हा आपल्यासमोरचा
खरा प्रश्न आहे.’ – नोआम
चॉम्स्की
नोआम चॉम्स्की हे आजच्या काळातील एक महान चिंतनशील विश्लेषक. त्यांनी
अमेरिकेतील एमआयटी येथे झालेल्या ‘एन्गेजिंग
डाटा’ या विषयावरील परिषदेमध्ये उपरोक्त उद्गार
काढले आहेत, जे आज आपण फाईव्ह-जीच्या युगात प्रविष्ट करीत असताना मानवी समुदायाला
तंतोतंत लागू पडणारे आहेत.
आजकाल डाटा एव्हरीव्हेअर अशी परिस्थिती आहे. आपला अखिल भोवताल डाटाने
व्याप्त आहे. ‘बिग डाटा’ उपलब्ध आहे, तो आपल्याला पूर्णतया एक्सेसिबल आहे. त्याचा वापर आपण
मानवी समुदायाच्या भल्यासाठी निश्चितपणानं करू शकतो. मात्र, चॉम्स्की यांनी याच
परिषदेमध्ये आणखी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणतात- कोणतीही राजसत्ता असो
की गुगल, अॅमेझॉनसारखी अर्थसत्ता, त्या या काळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा
पुरेपूर वापर करून लोकांवर नियंत्रण ठेवणं, आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि ते
अधिकाधिक मजबूत करत नेणं, यासाठी त्याचा निश्चितपणानं वापर करतील.
बिग डाटा समजून घ्यायचं तर आपल्याला एका भव्य अशा ग्रंथालयाचं उदाहरण
घेता येईल. या ग्रंथालयातील ग्रंथांमध्ये ज्ञानाचा प्रचंड साठा आहे. मात्र, जर
आपल्याला नेमकी कोणती माहिती हवी आहे, याविषयीच जर आपण अनभिज्ञ असू अगर संभ्रमित
असू, तर सभोवताली असणारा प्रचंड ज्ञानसाठाही तिथं निरुपयोगी ठरेल. नेमकी हीच गोष्ट
आपली डाटा वापराच्या बाबतीत होते आहे.
आज फाईव्ह-जी डाटावहन तंत्रज्ञान येत असताना त्याच्या क्षमतांची
जाहिरात कशा पद्धतीनं केली जाते, हे पाहिलं तरी वरील गोष्ट स्पष्ट होईल.
फाईव्ह-जीची डाटावहन क्षमता ही साधारण २० जीबी प्रति सेकंद इतकी आहे. आता हे
स्पष्ट करताना असं सांगितलं जातं की, ८-के (साधारण ३५ मेगापिक्सल) रिझॉल्युशनचा
चित्रपट तुम्ही एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल किंवा ४-के क्षमतेचे चार चित्रपट
किंवा फुल्ल-एचडी क्षमतेचे आठ चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल.
१९८०च्या दशकापासून आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे एकेक टप्पे
सर करीत आज फाईव्ह-जी तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. त्यामध्ये पहिल्या
पिढीत (१९८०) अॅनालॉग आवाज तंत्रज्ञान, दुसऱ्या पिढीत (१९९०) डिजीटल आवाजाचं
तंत्रज्ञान (सीडीएमए), तिसऱ्या पिढीत (२०००) मोबाईल डाटावहन (सीडीएमए-२०००),
चौथ्या पिढीत (२०१०) मोबाईल ब्रॉडबँड तंत्रज्ञान (४-जी एलटीई) आणि आता पाचव्या
पिढीतील तंत्रज्ञान या सर्वांपेक्षा डाटावहनाची प्रचंड गतिमानता घेऊन अवतरले आहे.
चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे राजसत्ता आणि भांडवलदार नफेखोर अर्थसत्ता
त्यांच्या स्वार्थासाठी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेणार आहेतच. किंबहुना,
फोर-जी आणि फाईव्ह-जीच्या सीमारेषेवर असतानाच आपण त्याचा अनुभव घेतो आहोत.
या काळात व्हिडिओ स्ट्रिमिंग व गेमिंग या क्षेत्रांतील कंपन्या आणि अॅप्सनी
आपला खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली लोकांना,
विशेषतः नव्या तरुण पिढीला अक्षरशः वेठीला धरले आहे म्हणावे, अशा पद्धतीचे जाळे
त्यांनी आपल्यावर टाकले आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण त्या जाळ्यात कमीअधिक अडकलेला
आहे. सर्जनशीलतेला कमी आणि लिपसिंक व मिमिकींगला अधिक प्राधान्य देत रिल्स तयार
करण्याच्या सुविधा प्रदान करीत त्यामध्ये या पिढीला गुरफटून टाकले आहे. खरे तर,
तंत्रज्ञानाने माणसाच्या सर्जनशीलतेला अधिकाधिक संधी देऊन त्याच्या सर्वंकष
विकासामध्ये योगदान द्यावे, अशी अपेक्षा करणे रास्त आहे. मात्र, प्रत्यक्षात
माहिती तंत्रज्ञानाची क्रांती हे माणसाचे जगणे सुलभ करण्याच्या नादामध्ये त्याच्या
बुद्धिमत्तेलाच आव्हान देते आहे की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती सध्या निर्माण
झाली आहे.
पूर्वी जेव्हा टेलिफोनचे आगमन झाले होते, तेव्हा प्रत्येक माणूस किमान
शंभर ते दीडशे फोन नंबर लक्षात ठेवू शकत असे. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये
स्वतःच्या कुटुंबियांचा नंबरही लक्षात ठेवण्याची गरज भासेनाशी झालेली आहे. हेच इतर
बाबतीतही होऊ लागले आहे. आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे युग सुरू झालेले आहे.
क्षणोक्षणी सभोवताली निर्माण होणाऱ्या आपल्या डाटाचे प्रोसेसिंग हे ए.आय.
तंत्रज्ञान करू लागले आहे. भांडवलदार कंपन्यांच्या नफ्यासाठी त्याचा वापर करून
घेतला जातो आहे. तुम्ही-आम्ही आज व्यक्ती अगर माणसे न राहता त्यांच्या दृष्टीने
डाटाचे तुकडे आहोत. माणसापेक्षा त्याच्या डाटाला आणि त्या डाटाच्या माध्यमातून
त्याच्या क्रयशक्तीला मोठे महत्त्व आलेले आहे. माणसाच्या माहितीच्या
खरेदी-विक्रीचा हा जमाना आहे. आणि ऑनलाईन माहिती देवाणघेवाणीच्या या जमान्यात
आपल्या स्मार्टफोनमध्ये जितकी म्हणून अॅप्लीकेशन्स असतील, त्या सर्वांकडे आपल्या
फोनमधील सर्वच प्रकारची माहिती जसे की, फोन नंबर, फोटो, व्हिडिओ आणि लोकेशन
इत्यादी वापरण्याचे अधिकार देऊन टाकलेले असतात. म्हणजेच आपण एखादे अॅप्लीकेशन
वापरण्यासाठी म्हणून डाऊन लोड करतो. ते आपण किती वापरतो, माहीत नाही; पण, संबंधित अॅप्लीकेशन निर्माता मात्र आपली माहिती हरघडी वापरत
असतो, ती त्याच्या फायद्यासाठी. महत्त्वाचे म्हणजे आपण विविध पेमेंट अॅप्स वापरतो,
त्या अॅप्सना आपली समग्र आर्थिक स्थिती आपण माहिती करून देत असतो. अॅमेझॉन,
फ्लिपकार्टसारख्या ई-कॉम अॅप्सना आपल्या खरेदी-विक्रीच्या सवयी, आवडी-निवडी माहिती
असतात. त्यानुसार आपल्याला विविध प्रकारच्या खरेदीला उद्युक्त करणाऱ्या, गरज
नसतानाही भरीला पाडणाऱ्या जाहिराती आपल्यासमोर सातत्याने सादर केल्या जातात.
आपल्या खिशातील पैसा हा जणू काही या भांडवलदार कंपन्यांचे अर्थकारण खेळते
राहण्यासाठीच आहे की काय, असे वाटायला लावणारी परिस्थिती हे आजचे वास्तव आहे.
मानवी बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे. मात्र, याच बुद्धिमत्तेने निर्माण
केलेल्या ए.आय. तंत्रज्ञानाने आता त्या बुद्धीचाच जणू काही कमीत कमी वापर व्हावा,
असे चॅट-जीपीटीसारखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. माहितीच्या महाजालामध्ये प्रचंड
असा डाटा आहे. त्याचा वापर करून एखादा लेख, एखादी कविता तयार करून तुमच्यासमोर
सादर करण्याची क्षमता या चॅट-जीपीटी तंत्रज्ञानात आहे. बिग डाटामध्ये क्राऊल करून
त्यातून आपण सांगितलेल्या विषयाला अनुरुप असे माहितीचे कैक तुकडे एकत्र जुळवून असा
एक लेख आपल्यासमोर सादर होतो, हे आजचे वास्तव आहे. मानवाची सर्जनशीलता त्यात नाही,
मात्र सर्जनशील माणसांनी यापूर्वी निर्माण केलेलीच माहिती जुळवून नव्याने सादर
करण्याची गतिमानता मात्र त्यामध्ये आहे. हेही मानवी सर्नशीलतेला एक प्रकारचे
आव्हानच आहे. आपण विचार, चिंतन, मनन करून एखादा लेख लिहावयाचा की तंत्रज्ञानाच्या
या गतिमान वारुवर स्वार होऊन बनचुके व्हायचे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
यातल्या दुसऱ्या प्रकाराचा लाभ घेणारेच अधिक असतील, हे वेगळे सांगावे लागणार नाही.
साधे गुगल ट्रान्सलेट आले, तर आपण आपली अनुवादाची क्षमता आणि त्यायोगे आपले
भाषाप्रभुत्व गमावायला सुरवात केली आहे. बिग डाटा आणि आणि तो वाहून नेणारी
फाईव्ह-जी तंत्रज्ञानाची गतिमानता ही अशा प्रकारे आपल्या सर्जनशीलतेला आव्हान
निर्माण करू पाहते आहे.
बिट डाटामुळे आपल्यासमोर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सामोरा ठाकला आहे,
तो आहे विश्लेषणाचा! आपल्या
सभोवताली प्रचंड अशी माहिती आहे. आणि हरक्षणाला ती वाढतेच आहे. अशा वेळी त्या
माहितीचे योग्य विश्लेषण करून त्यातून काही एक ठोस निष्कर्ष काढणे, ही जवळपास
अशक्यप्राय बाब बनून राहते. परिणामी, त्या डाटामधून ठोस असे काही आपल्या हाती
लागण्याची शक्यता उणावते. पूर्वी अगदी कमी, प्रमाणबद्ध डाटा हाती असायचा, मात्र
त्याचे विश्लेषण करणे आणि काहीएक निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य असायचे. आज मात्र
बिग डाटाच्या नादात त्याच्या विश्लेषणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्या
अर्थाने बिग डाटा हा आपल्यासाठी जवळपास ‘नो डाटा’ म्हणजे असून नसल्यासारखाच आहे. हे या बिग डाटाचे आजचे एक अपरिहार्य
वास्तव आहे. ते आपण समजून घ्यायला हवे. बिग डाटाला तितक्या मोठ्या प्रमाणात
विश्लेषित करणे ही अशक्यप्राय बाब असल्याने त्याचे सॅम्पलिंग आणि मग विश्लेषण
करण्याच्या पद्धती विकसित करणे ही आजघडीची गरज आहे. अन्यथा महाप्रचंड माहितीचा
महाजाल सभोवताली असूनही जर त्या माहितीचा योग्य विनियोग करण्यापासून आपण अनभिज्ञ
राहणार असू, तर कोष्ट्याच्या जाळ्यात सापडलेल्या सावजापेक्षा आपली अवस्था वेगळी
असणार नाही. आपल्याला फाईव्ह-जीसारख्या तंत्रज्ञानाची कितीही गतिमानता लाभली,
तरीही त्या गतीमुळे आपण त्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटूनच जात राहू आणि त्या
महाजालात आपण इतरच कोणाचे भक्ष्य झालेले असू, हे निश्चित!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा