How Data has changed the world? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
How Data has changed the world? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

‘बिग डाटा’चं करायचं काय?




('दै. पुण्यनगरी'च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी २०वा वर्धापनदिन... या निमित्ताने 'इंटरनेट क्रांतीची पंचपदी' ही फाईव्ह-जी युगाचा वेध घेणारी विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला लेख खास माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)


बिग डाटा हे मानवी इतिहासातील पुढचं पाऊल खरंच, पण... पण डाटाची उपलब्धता ही आपली समस्या नाही, तर त्याला (बिग डाटा) समजून घेणं, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.– नोआम चॉम्स्की

नोआम चॉम्स्की हे आजच्या काळातील एक महान चिंतनशील विश्लेषक. त्यांनी अमेरिकेतील एमआयटी येथे झालेल्या एन्गेजिंग डाटा या विषयावरील परिषदेमध्ये उपरोक्त उद्गार काढले आहेत, जे आज आपण फाईव्ह-जीच्या युगात प्रविष्ट करीत असताना मानवी समुदायाला तंतोतंत लागू पडणारे आहेत.

आजकाल डाटा एव्हरीव्हेअर अशी परिस्थिती आहे. आपला अखिल भोवताल डाटाने व्याप्त आहे. बिग डाटा उपलब्ध आहे, तो आपल्याला पूर्णतया एक्सेसिबल आहे. त्याचा वापर आपण मानवी समुदायाच्या भल्यासाठी निश्चितपणानं करू शकतो. मात्र, चॉम्स्की यांनी याच परिषदेमध्ये आणखी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणतात- कोणतीही राजसत्ता असो की गुगल, अॅमेझॉनसारखी अर्थसत्ता, त्या या काळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून लोकांवर नियंत्रण ठेवणं, आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि ते अधिकाधिक मजबूत करत नेणं, यासाठी त्याचा निश्चितपणानं वापर करतील.

बिग डाटा समजून घ्यायचं तर आपल्याला एका भव्य अशा ग्रंथालयाचं उदाहरण घेता येईल. या ग्रंथालयातील ग्रंथांमध्ये ज्ञानाचा प्रचंड साठा आहे. मात्र, जर आपल्याला नेमकी कोणती माहिती हवी आहे, याविषयीच जर आपण अनभिज्ञ असू अगर संभ्रमित असू, तर सभोवताली असणारा प्रचंड ज्ञानसाठाही तिथं निरुपयोगी ठरेल. नेमकी हीच गोष्ट आपली डाटा वापराच्या बाबतीत होते आहे.

आज फाईव्ह-जी डाटावहन तंत्रज्ञान येत असताना त्याच्या क्षमतांची जाहिरात कशा पद्धतीनं केली जाते, हे पाहिलं तरी वरील गोष्ट स्पष्ट होईल. फाईव्ह-जीची डाटावहन क्षमता ही साधारण २० जीबी प्रति सेकंद इतकी आहे. आता हे स्पष्ट करताना असं सांगितलं जातं की, ८-के (साधारण ३५ मेगापिक्सल) रिझॉल्युशनचा चित्रपट तुम्ही एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल किंवा ४-के क्षमतेचे चार चित्रपट किंवा फुल्ल-एचडी क्षमतेचे आठ चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल.

१९८०च्या दशकापासून आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे एकेक टप्पे सर करीत आज फाईव्ह-जी तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. त्यामध्ये पहिल्या पिढीत (१९८०) अॅनालॉग आवाज तंत्रज्ञान, दुसऱ्या पिढीत (१९९०) डिजीटल आवाजाचं तंत्रज्ञान (सीडीएमए), तिसऱ्या पिढीत (२०००) मोबाईल डाटावहन (सीडीएमए-२०००), चौथ्या पिढीत (२०१०) मोबाईल ब्रॉडबँड तंत्रज्ञान (४-जी एलटीई) आणि आता पाचव्या पिढीतील तंत्रज्ञान या सर्वांपेक्षा डाटावहनाची प्रचंड गतिमानता घेऊन अवतरले आहे. चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे राजसत्ता आणि भांडवलदार नफेखोर अर्थसत्ता त्यांच्या स्वार्थासाठी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेणार आहेतच. किंबहुना, फोर-जी आणि फाईव्ह-जीच्या सीमारेषेवर असतानाच आपण त्याचा अनुभव घेतो आहोत.

या काळात व्हिडिओ स्ट्रिमिंग व गेमिंग या क्षेत्रांतील कंपन्या आणि अॅप्सनी आपला खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली लोकांना, विशेषतः नव्या तरुण पिढीला अक्षरशः वेठीला धरले आहे म्हणावे, अशा पद्धतीचे जाळे त्यांनी आपल्यावर टाकले आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण त्या जाळ्यात कमीअधिक अडकलेला आहे. सर्जनशीलतेला कमी आणि लिपसिंक व मिमिकींगला अधिक प्राधान्य देत रिल्स तयार करण्याच्या सुविधा प्रदान करीत त्यामध्ये या पिढीला गुरफटून टाकले आहे. खरे तर, तंत्रज्ञानाने माणसाच्या सर्जनशीलतेला अधिकाधिक संधी देऊन त्याच्या सर्वंकष विकासामध्ये योगदान द्यावे, अशी अपेक्षा करणे रास्त आहे. मात्र, प्रत्यक्षात माहिती तंत्रज्ञानाची क्रांती हे माणसाचे जगणे सुलभ करण्याच्या नादामध्ये त्याच्या बुद्धिमत्तेलाच आव्हान देते आहे की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

पूर्वी जेव्हा टेलिफोनचे आगमन झाले होते, तेव्हा प्रत्येक माणूस किमान शंभर ते दीडशे फोन नंबर लक्षात ठेवू शकत असे. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये स्वतःच्या कुटुंबियांचा नंबरही लक्षात ठेवण्याची गरज भासेनाशी झालेली आहे. हेच इतर बाबतीतही होऊ लागले आहे. आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे युग सुरू झालेले आहे. क्षणोक्षणी सभोवताली निर्माण होणाऱ्या आपल्या डाटाचे प्रोसेसिंग हे ए.आय. तंत्रज्ञान करू लागले आहे. भांडवलदार कंपन्यांच्या नफ्यासाठी त्याचा वापर करून घेतला जातो आहे. तुम्ही-आम्ही आज व्यक्ती अगर माणसे न राहता त्यांच्या दृष्टीने डाटाचे तुकडे आहोत. माणसापेक्षा त्याच्या डाटाला आणि त्या डाटाच्या माध्यमातून त्याच्या क्रयशक्तीला मोठे महत्त्व आलेले आहे. माणसाच्या माहितीच्या खरेदी-विक्रीचा हा जमाना आहे. आणि ऑनलाईन माहिती देवाणघेवाणीच्या या जमान्यात आपल्या स्मार्टफोनमध्ये जितकी म्हणून अॅप्लीकेशन्स असतील, त्या सर्वांकडे आपल्या फोनमधील सर्वच प्रकारची माहिती जसे की, फोन नंबर, फोटो, व्हिडिओ आणि लोकेशन इत्यादी वापरण्याचे अधिकार देऊन टाकलेले असतात. म्हणजेच आपण एखादे अॅप्लीकेशन वापरण्यासाठी म्हणून डाऊन लोड करतो. ते आपण किती वापरतो, माहीत नाही; पण, संबंधित अॅप्लीकेशन निर्माता मात्र आपली माहिती हरघडी वापरत असतो, ती त्याच्या फायद्यासाठी. महत्त्वाचे म्हणजे आपण विविध पेमेंट अॅप्स वापरतो, त्या अॅप्सना आपली समग्र आर्थिक स्थिती आपण माहिती करून देत असतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉम अॅप्सना आपल्या खरेदी-विक्रीच्या सवयी, आवडी-निवडी माहिती असतात. त्यानुसार आपल्याला विविध प्रकारच्या खरेदीला उद्युक्त करणाऱ्या, गरज नसतानाही भरीला पाडणाऱ्या जाहिराती आपल्यासमोर सातत्याने सादर केल्या जातात. आपल्या खिशातील पैसा हा जणू काही या भांडवलदार कंपन्यांचे अर्थकारण खेळते राहण्यासाठीच आहे की काय, असे वाटायला लावणारी परिस्थिती हे आजचे वास्तव आहे.

मानवी बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे. मात्र, याच बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या ए.आय. तंत्रज्ञानाने आता त्या बुद्धीचाच जणू काही कमीत कमी वापर व्हावा, असे चॅट-जीपीटीसारखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. माहितीच्या महाजालामध्ये प्रचंड असा डाटा आहे. त्याचा वापर करून एखादा लेख, एखादी कविता तयार करून तुमच्यासमोर सादर करण्याची क्षमता या चॅट-जीपीटी तंत्रज्ञानात आहे. बिग डाटामध्ये क्राऊल करून त्यातून आपण सांगितलेल्या विषयाला अनुरुप असे माहितीचे कैक तुकडे एकत्र जुळवून असा एक लेख आपल्यासमोर सादर होतो, हे आजचे वास्तव आहे. मानवाची सर्जनशीलता त्यात नाही, मात्र सर्जनशील माणसांनी यापूर्वी निर्माण केलेलीच माहिती जुळवून नव्याने सादर करण्याची गतिमानता मात्र त्यामध्ये आहे. हेही मानवी सर्नशीलतेला एक प्रकारचे आव्हानच आहे. आपण विचार, चिंतन, मनन करून एखादा लेख लिहावयाचा की तंत्रज्ञानाच्या या गतिमान वारुवर स्वार होऊन बनचुके व्हायचे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. यातल्या दुसऱ्या प्रकाराचा लाभ घेणारेच अधिक असतील, हे वेगळे सांगावे लागणार नाही. साधे गुगल ट्रान्सलेट आले, तर आपण आपली अनुवादाची क्षमता आणि त्यायोगे आपले भाषाप्रभुत्व गमावायला सुरवात केली आहे. बिग डाटा आणि आणि तो वाहून नेणारी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाची गतिमानता ही अशा प्रकारे आपल्या सर्जनशीलतेला आव्हान निर्माण करू पाहते आहे.

बिट डाटामुळे आपल्यासमोर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सामोरा ठाकला आहे, तो आहे विश्लेषणाचा! आपल्या सभोवताली प्रचंड अशी माहिती आहे. आणि हरक्षणाला ती वाढतेच आहे. अशा वेळी त्या माहितीचे योग्य विश्लेषण करून त्यातून काही एक ठोस निष्कर्ष काढणे, ही जवळपास अशक्यप्राय बाब बनून राहते. परिणामी, त्या डाटामधून ठोस असे काही आपल्या हाती लागण्याची शक्यता उणावते. पूर्वी अगदी कमी, प्रमाणबद्ध डाटा हाती असायचा, मात्र त्याचे विश्लेषण करणे आणि काहीएक निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य असायचे. आज मात्र बिग डाटाच्या नादात त्याच्या विश्लेषणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्या अर्थाने बिग डाटा हा आपल्यासाठी जवळपास नो डाटा म्हणजे असून नसल्यासारखाच आहे. हे या बिग डाटाचे आजचे एक अपरिहार्य वास्तव आहे. ते आपण समजून घ्यायला हवे. बिग डाटाला तितक्या मोठ्या प्रमाणात विश्लेषित करणे ही अशक्यप्राय बाब असल्याने त्याचे सॅम्पलिंग आणि मग विश्लेषण करण्याच्या पद्धती विकसित करणे ही आजघडीची गरज आहे. अन्यथा महाप्रचंड माहितीचा महाजाल सभोवताली असूनही जर त्या माहितीचा योग्य विनियोग करण्यापासून आपण अनभिज्ञ राहणार असू, तर कोष्ट्याच्या जाळ्यात सापडलेल्या सावजापेक्षा आपली अवस्था वेगळी असणार नाही. आपल्याला फाईव्ह-जीसारख्या तंत्रज्ञानाची कितीही गतिमानता लाभली, तरीही त्या गतीमुळे आपण त्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटूनच जात राहू आणि त्या महाजालात आपण इतरच कोणाचे भक्ष्य झालेले असू, हे निश्चित!


रविवार, १ जानेवारी, २०२३

डाटा ‘ड्रिव्हन’ सोसायटी...

('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'युगांतर' ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली. या पुरवणीसाठी लिहीलेला लेख सदर दिवशी कोल्हापूर व बेळगाव आवृत्तींमध्ये प्रकाशित झाला. हा लेख येथे माझ्या वाचकांसाठी 'दै. पुढारी'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)





मानवप्राणी आणि अन्य जनावरे यांच्यामध्ये जर कोणता फरक असेल, तर तो बुद्धीमत्तेचा. मानवाने उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर त्याची विचार करण्याची क्षमता विकसित केली आणि तो इतर प्राण्यांपेक्षा स्वतःचे वेगळेपण अधोरेखित करत गेला. अंतिमतः तो जणू काही या धरातलाचा आणि तिच्यावरील सर्व प्राणीमात्रांचा स्वामी असल्याप्रमाणे त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागला. मानवाची विचारक्षमता, त्याचा विवेक, त्याचा बुद्धीप्रामाण्यवाद यांचा विकास होत असताना मूलभूत भौतिक गरजांच्या पलिकडे त्याच्या बौद्धिक गरजा वाढल्या. भौतिक गरजा भागविण्यासाठीची अनेकविध साधने, संसाधने त्याने विकसित केली. जीवन सुखकर बनविले. राहणीमान आरामदायी झाले. मात्र, त्याचबरोबर त्याची माहितीची (डाटा) गरजही वाढत गेली.

मानवाच्या वाढत्या आशाआकांक्षांच्या बरोबरीने माहितीची गरज ही वाढतच गेली. पूर्वी राजेरजवाड्यांच्या काळात त्यांच्याभोवती माहितीचे वलय फिरत असे. धर्मसत्ता, राजसत्ता यांच्यामध्ये हे माहितीचे वलय अधिक प्रभावीपणे फिरविले जात असे. आपापल्या सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेवरील आपला अंकुश कायम राखण्यासाठी या माहितीचा वापर, गैरवापर केला जात असे. त्याचप्रमाणे सत्ता बळकावण्यासाठीही तिचा वापर सोयीने केला जात असे. व्यापारउदीम करणाऱ्यांनी अर्थात अर्थसत्तेनेही या माहितीच्या प्रसारामध्ये आपला वाटा उचललेला दिसून येतो. तथापि, त्या काळात अर्थसत्तेचे केंद्र हे राजसत्ताच होते.

माहितीचे स्रोत हे पूर्वी मौखिक स्वरुपाचे होते. लेखन ही काही ठराविकांची मक्तेदारी होती. इतरेजनांना अर्थात व्यापक बहुजन समाजाला त्यापासून वंचित राखून ही मक्तेदारी बळकट करण्यात आली होती. तथापि, मुद्रणकलेचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी पंधराव्या शतकात लावला आणि माहितीच्या प्रसारासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग जगाला खुला केला. सुरवातीच्या काळात बायबलच्याच प्रती प्रिंटींग प्रेसवर छापण्यात आल्या. अर्थातच, धर्मसत्तेने मोठ्या प्रमाणात या तंत्राचा लाभ घेऊन आपले पाठीराखे वाढविण्यासाठी त्याचा वापर केला. तथापि, हळूहळू इतरही लोकाभिमुख साहित्य छापले जाऊ लागले आणि टप्प्याटप्प्याने छपाईकलेचे लाभ सर्वसामान्य वाचक-लेखकांपर्यंत येऊ लागले.

पुढे सतराव्या शतकाच्या प्रारंभी जर्मनीतूनच वृत्तपत्र निघण्यास सुरवात झाली. माहितीच्या प्रसाराचे पुस्तकांपलिकडले आणखी एक नियतकालिकीय प्रकाशन जगाला ठाऊक झाले आणि ते त्याच्या याच गतिमान माहितीप्रसारणाच्या बळावर यशस्वीही झाले. पुढे औद्योगिक क्रांतीच्या युगामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात अनेकविध प्रयोग होऊ लागले. मानवी श्रमाच्या ऐवजी यंत्रांकडून काम करवून घेऊन अधिक दर्जेदार उत्पादने काढण्यावर भर देण्यात येऊ लागला. यंत्रे राक्षसी वेगाने काम करू लागली. उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला. या राक्षसाकडून अधिकाधिक उत्पादन करवून घ्यावयाचे, तर कच्च्या मालाची उपलब्धता तितक्याच मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक ठरू लागले. जगाच्या पाठीवर अशा ठिकाणांचा शोध घेऊन भांडवलदारी राष्ट्रे तेथे आपल्या वसाहती स्थापन करू लागल्या. सुरवातीला गोड बोलून, स्थानिकांशी करारमदार करून, ऐकले नाही तर हल्ले अन् हत्या करून किंवा थेट त्यांच्यावर राज्य प्रस्थापित करून ही कच्च्या मालाची गरज भागविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याचप्रमाणे तयार झालेला माल खपविण्यासाठी उत्तम क्रयशक्ती असणाऱ्या विभागांत आपल्या बाजारपेठा वसवून किंवा स्थानिक बाजारपेठा ताब्यात घेऊन व्यापार वाढविला. व्यापारातून नफेखोरीलाही ऊत आला. पण, औद्योगिक क्रांतीने जगामध्ये भांडवलदारांचे बस्तान निर्माण केले.

याच कालखंडात माहिती प्रसारणाचेही अत्यंत महत्त्वाचे शोध लागले. रेडिओ हा त्यातील महत्त्वाचा क्रांतीकारक शोध. जगाच्या एका कोपऱ्यातील आवाज दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन पोहोचविण्याची अचाट क्षमता असणारा हा शोध होता. त्याच टप्प्यावर तारयंत्राचा आणि पुढे टेलिफोनचाही शोध लागला. जगाच्या दोन टोकांवरील व्यक्ती एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकल्या. टपाल पाठवून ते पोहोचून पत्रोत्तराची प्रतीक्षा करण्याच्या कालखंडात हा प्रत्यक्ष संवादाचा क्षण मानवी इतिहासात किती महत्त्वाचा ठरला असेल, याची कल्पनाच करावी. इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात संशोधकीय प्रगती होत चालली तसा संवाद आणि दळणवळणाच्या साधनांचा शोध लागतच राहिला. दूरचित्रवाणी, गणनयंत्र, संगणक हे त्याचे पुढील महत्त्वाचे टप्पे.

भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारत हा सातत्याने या माहिती साधनांचा आपल्या प्रगतीसाठी वापर करीत आलेला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या द्रष्टेपणाने येथील टेलिकॉम क्षेत्राचा गतीने विकास झाला. भारतामध्ये दळणवळणाचे एक नवे युग अवतरले. तत्कालीन विरोधाला न जुमानता त्यांनी संगणकाचाही विविध क्षेत्रांत अवलंब केला. संगणकामुळे नोकऱ्या जातील, असा आक्षेप घेतल्या जाण्याच्या काळात संगणकाचा स्वीकारही केला आणि त्या माध्यमातून नोकरीच्या नव्या संधींचे अवकाशही खुले झाले. डिजीटल तंत्रज्ञानाने आणि जगात नव्याने अवतरलेल्या इंटरनेट युगाने जगभरात क्रांतीला सुरवात केलेली होती. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात या नवतंत्रज्ञानाचा देशाने खुल्या दिलाने अंगिकार केला आणि डिजीटल टेलिफोनीचे युग देशात सुरू झाले. खिशात अगर हातात घेऊन कुठेही फिरता येईल असा टेलिफोन, इतकेच मर्यादित महत्त्व असणाऱ्या मोबाईलने स्मार्टफोनपर्यंत वाटचाल केली आहे. माहिती देणाऱ्या माध्यमांचे मल्टीमीडिया आविष्करण अचंबित करणारे ठरले. इंटरनेटमुळे लोकांना वसुधैव कुटुम्बकम्चा प्रत्यय येऊ लागला. डिजीटल क्रांतीमुळे आविष्कृत झालेल्या आणि मोठ्या संख्येने वाढलेल्या विविध माध्यमांच्या आगमनामुळे माहितीचा प्रस्फोट झाला. वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज' म्हणता म्हणता या खेड्यात इतक्या वार्तांची, माहितीची देवाणघेवाण सुरू झाली की त्या माहितीचे करावे काय, हेच कळेनासे झाले. एकविसाव्या शतकामध्ये प्रचलित पारंपरिक प्रसारमाध्यमांपेक्षाही वेगळी अशी समाजमाध्यमे अस्तित्वात आली. सुरवातीला केवळ एकमेकांशी संपर्कासाठी असणाऱ्या या माध्यमांनी या शतकाच्या पहिल्या अवघ्या दोन दशकांतच इतकी क्रांतीकारक वाटचाल केली आहे की आता प्रत्येक सर्वसामान्य नागरिक जणू माध्यमकर्मी बनला आहे. प्रत्येकाकडे माहिती आहे आणि ती माहिती त्याला समोरच्याला द्यावयाची आहे. अशी जगभरात क्षणोक्षणी अब्जावधी संदेशांची, माहितीच्या तुकड्यांची देवाणघेवाण सुरू आहे. तथापि, या प्रचंड माहितीचे करावयाचे काय, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आज उभी ठाकली आहे.

शासकीय यंत्रणांना विकासाभिमुख निर्णय घेण्यासाठी, त्यात पारदर्शकता राखण्यासाठी लोकांची विविध प्रकारची माहिती हवी असते. ती डिजीटल माध्यमांद्वारे सर्वेक्षणांच्या द्वारे गोळा केली जाते. आजकाल डिजीटल स्वरुपात ही माहिती गोळा केली जाते. आपल्या आधार क्रमांकापासून ते बँक अकाऊंटपर्यंतची सर्व माहिती यात असते. ती गोपनीय असते, तोपर्यंत ठीक; मात्र, जर कोणी वाईट हेतूने ती चोरली (हॅक), तर त्याचे कितीही टोकाचे दुष्परिणाम होऊ शकतात. शासनाला माहिती देणे ठीक आहे. पण, आपण विविध कंपन्यांनाही आपली खाजगी माहिती देऊन ठेवलेली असते. उदाहरणार्थ, गुगल-पे सुविधा वापरणाऱ्यांनी आपल्या बँक अकाऊंटची सर्व माहिती गुगलला देऊन आपल्या क्रयशक्तीचा अंदाज कंपनीला देऊन ठेवलेला असतो. ही माहिती संबंधित कंपनी स्वतःच्या उत्पादनाच्या प्रचारासाठी अगर अन्य कंपनीच्या लाभासाठी वापरणारच नाही, याची खात्री कोण देणार?

आपल्याकडील माहिती देणे, इथपर्यंतच ही बाब मर्यादित राहिली असती, तरी चालले असते. मात्र, आता त्यापुढे जाऊन भांडवलदार समाजमाध्यम कंपन्यांसाठी त्यांचा प्रत्येक वापरकर्ता हाच एक माहितीचा तुकडा बनला आहे. त्याची माहिती हा त्यांच्या भांडवली मिळकतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या समाजमाध्यम कंपन्यांनी आता तुमच्या माझ्या हातातल्या स्मार्टफोनचा आधार घेत तुम्हाला आणि मलाच एक उत्पादन, विक्रयवस्तू बनवून टाकले आहे. म्हणजे आपण आता ग्राहक राहिलो नाही, तर या कंपन्यांनी आपल्याला चांगलेच गिऱ्हाईक बनविले आहे. आपण आपली सारी खाजगी, सार्वजनिक माहिती या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतो. आपल्याला विविध प्रकारचा डाटा हवा आहे, असे म्हणत असताना आपणही त्याचवेळी त्या डाटाचा एक तुकडा बनत चाललेलो आहोत, याचे भान आपण बाळगायला हवे.

खरे तर, प्रत्यक्षात डाटा ही गोष्ट वापरून विश्लेषण करणे, तिचा मानवी जीवनाच्या भल्यासाठी वापर करणे हे अपेक्षित असताना डाटा ड्रिव्हन सोसायटीच्या नावाखाली मानवतेलाच ड्राईव्ह करीत भांडवलदारांच्या दावणीला बांधण्यात तर येणार नाही ना, अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आज आपल्या सभोवती निर्माण झाली आहे. तिची जाणीव या निमित्ताने करवून घेणे हीच आजच्या काळातील अगत्याची बाब आहे.