रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

डॉ. ज.रा. दाभोळे स्मृतीलेख-३ :

डॉ. ज.रा. दाभोळे यांना प्रदान करण्यात आलेले मानपत्र

(कालकथित ज्येष्ठ विचारवंत तथा तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे यांना कोल्हापुरात त्यांचे कार्य आणि योगदान याबद्दल मानपत्र देण्यात आले होते. सदर मानपत्र येथे देत आहोत...)


डॉ. ज.रा. दाभोळे यांना प्रदान करण्यात आलेले मानपत्र

आदरणीय 

डॉ. ज. रा. दाभोळे,

फिनिक्स या पक्षाची दंतकथा तुमची सत्यकथा पाहून फिकी पडते. शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेक आहेत. आपणाकडे तर शून्यदेखील नव्हते. तरीदेखील आपण निर्माण केलेल्या कार्याला क्रांतिकारी सलाम!

जगन्नाथ रामचंद्र दाभोळे नाव संपूर्ण महाराष्ट्राला किंबहुना उभ्या भारताला भारतीय संस्कृतीचे, तत्त्वज्ञानाचे, बौद्धधम्माचे गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहे. आपली ओळख ही ज. रा. दाभोळे म्हणून सुपरिचित आहे. पाटण तालुक्यातील तारळे या छोट्या खेड्यातून आपण आलेले आहात, अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून शिक्षण घेवून कर्मवीर अण्णांच्या आज्ञेनुसार आपण रयत शिक्षण संस्था आपली मानून हजारो विद्यार्थी आपण घडवले आहेत. कर्मवीर अण्णांनी तुमची केलेली पारख ही हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश देणारी ठरली, यात शंका नाही.

ज्या विद्यार्थ्यांच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य नांदत होते, त्यांना पोटाशी धरून, सोबत घेवून आपण अण्णांसारखेच आधारवड बनलात. फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, कर्मवीर अण्णा यांनी घालून दिलेल्या वाटेवरून आपण चालत आहात. अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व किंबहुना बाप म्हणून आपण जे कार्य केले, ते क्रांती इतिहासाचा भाग बनून राहील.

आपण शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते अतुल्य आहे. विद्यावाचस्पती ही पदवी अनेकांना मिळते, परंतु आपण तसा कोणताही वारसा नसताना विद्यावाचस्पती ही पदवी मिळवून एक इतिहास निर्माण केलात. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण केलेल्या संशोधनाची दखल अनेकांना घ्यावी लागली आहे. याचमुळे आपणाला अनेक मानसन्मान मिळाले. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात तसेच महाराष्ट्रभर आपण केलेल्या प्रयत्नामुळे तत्त्वज्ञान हा विषय रुळला, वाढला.

वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेली एक व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये किती मोठे आणि किती प्रकारचे काम करू शकते, याचा अंदाज बांधायचा असेल, तर डॉ. ज. रा. दाभोळे यांच्या जीवन प्रवासाकडे पाहावे लागेल. अतिशय सुखी जीवन जगता येणे शक्य असताना ते नाकारून अविरतपणे समाजसेवेचे काम प्रामाणिकपणे स्वीकारणे हे जणू आपण आपले कर्तव्य समजले होते. शिक्षण क्षेत्राच्या विकासामध्ये तुमचे योगदान मोलाचे तर आहेच, पण त्याहीपेक्षा जे विद्यार्थी तुम्ही घडवले त्यांनी देखील तुमच्यासारखाच एक वेगळ्या प्रकारचा इतिहास निर्माण केला आहे. एका हातामध्ये लेखणी आणि दुसऱ्या हातामध्ये व्यावहारिक जगण्याचे संदर्भ घेऊन विचार आणि कृती यांची सांगड घालणे, हे याही वयाच्या टप्यावर तुम्हास चांगले जमले आहे, हे तुमच्या आजच्या कृतीशील व्यक्तीमत्त्वाकडे पाहून वाटते.

शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात वाढलेले व त्यांच्या कार्याला आपले काम समजून अविरतपणे शिक्षण क्षेत्रातील नवी वाट निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न आपण आयुष्यभर केला आहे. पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, बुद्ध, शिवाजी, बसवण्णा, फुले, शाहू, आंबेडकरवादी आणि स्त्रीवादी विचारांनीच जग बदलू शकते, नवा समाज निर्माण होऊ शकतो, समाजातील लहानसहान प्रश्न सुटू शकतात, समाजात होणारा अन्याय, भेदभाव संपू शकतो, असा प्रगाढ विश्वास तुम्हास आहे. वर्ण-वर्ग जात स्त्रीदास्य मुक्तीसाठीचे नवे आंदोलन उभे केले पाहिजे, अशी तुमची सततची भूमिका आहे. यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म विचारांचा तुम्ही खोलवर जाऊन अभ्यास केला आहे. तुमचा हा अभ्यास पुस्तक रुपानेही प्रसिद्ध झाला आहे.

सामाजिक पुनर्रचनेसाठीचे तत्त्वज्ञान काय असायला पाहिजे, हा तुमचा जीवनभराच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. यासाठी तत्त्वज्ञानाचा खोलवर जाऊन अभ्यास आपण केला आहे. हे जग बदलायचे असेल, समताधिष्ठीत समाज निर्माण करायचा असेल तर त्यासाठी एका क्रांतीकारी तत्त्वज्ञानाची गरज असते, ही भूमिका आपण प्रामाणिकपणे मांडत आलेले आहात. आज महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही आपण काम पाहात आहात. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारी आख्खी पिढी तुम्ही निर्माण केली आहे. सहसा या विषयाकडे न वळणारे लोक खूप असताना व हा विषय जड असल्याच्या कारणामुळेच आपण हे आव्हान स्वीकारून तत्त्वज्ञान हा विषय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तत्त्वज्ञानाचा अनेक अंगाने अभ्यास करणारे गृहस्थ म्हणून आपणास ओळखले जाते. तत्त्वज्ञान कोणाच्या बाजूने भूमिका घेणारे असावे, यावरही आपले चिंतन अतिशय महत्त्वाचे आहे. भारताच्या पातळीवर तत्त्वज्ञानाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, यावरही आपण सखोल भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. बौद्ध तत्त्वज्ञान हा तर आपल्या अतिशय आवडीचा विषय. या विषयावर जणू तुमचे प्रभुत्व आहे, असे आम्हाला दिसून येते. महाराष्ट्रभर नव्हे, तर देशभर या विषयावर अनेक परिषदा, परिसंवाद, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग अशा अनेक ठिकाणी आपण खोलवर चिंतन आपल्या भाषणातून जनतेसमोर ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण अनेक देशातील विद्यापीठांमध्ये जाऊन आपल्या ओघवत्या भाषेमध्ये वरील विषयावर भाष्य केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तत्त्वज्ञानी म्हणून आपली ओळख जगाला झाली आहे.

आपले सर्वच क्षेत्रातील ज्ञान पाहून आम्हास धन्यता वाटते. आपल्या ज्ञानाची उंची तर मोजूच शकत नाही. आपण समाजातील दुबळ्या घटकांना सोबत घेवून जी वाटचाल करीत आहात, त्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आम्ही वाटचाल करीत आहोत. यामुळेच आम्ही आज आपला सन्मान करीत आहोत.

आपले नम्र,

डॉ. ज. रा. दाभोळे गौरव समिती 

(शब्दांकन : प्रा. अमोल महापुरे / अस्मिता दिघे)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा