सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

डॉ. ज.रा. दाभोळे स्मृतीलेख ४:

चिकित्सक, विवेकवादी समाजनिर्मितीसाठी तत्त्वज्ञान

(दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या गुरूवारी 'जागतिक तत्वज्ञान दिन' जगभर साजरा केला जातो. सन २०१७मध्ये १६ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक (कालकथित) डॉ. ज.रा. दाभोळे यांनी लिहीलेला लेख येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रकाशित करीत आहोत.- डॉ. आलोक जत्राटकर)

डॉ. ज.रा. दाभोळे


युनेस्कोने सन २००५ पासून 'जागतिक तत्वज्ञान दिन' साजरा करण्यास सुरवात केली. ज्यांना तत्वज्ञानाच्या उपयुक्ततेबददल खात्री वाटते, अशा प्रत्येकाचा हा दिवस आहे. मग ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठेही राहणारी असो! तत्वज्ञान ही अशी व्यवस्था आहे की, जिच्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. परस्पर सद्भाव, सहिष्णुता आणि जागतिक शांतता वृद्धिंगत करून एक चांगले जग निर्माण करण्यासाठी तत्त्वज्ञानाकडूनच प्रोत्साहन मिळू शकते.

संसाराच्या अव्याहत चालू असलेल्या प्रवाहाकडे स्थिर दृष्टीने पाहतो, तो तत्वचिंतक होय, असे प्लेटोने म्हटले आहे. जीवनाची चिकित्सा केल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही, असे सॉक्रेटीसने म्हटले आहे. ही जीवन चिकित्सा म्हणजेच तत्वज्ञान होय. आपण सर्व जीवन जगत आहोत. म्हणून ती चिकित्सा करणे आणि दुसऱ्याने केलेली चिकित्सा समजून घेणे, हे आपले महत्त्वाचे काम आहे.

सर्व प्रकारच्या चिकित्सेचा प्रारंभ युरोपिय देशात मध्य युगानंतर सुरू झाला. मध्य युगाच्या काळात म्हणजेच इ.स. १०९५ ते १२९१ या अवधीत सात धर्मयुद्धे झाली, अशी युरोपच्या इतिहासात नोंद झाली आहे. आम्ही म्हणतो तेवढेच सत्य आहे, अशी भूमिका त्या काळातील सनातन्यांनी घेतली. आम्ही ज्याचा निर्देश केला आहे, तेवढा एकच खरा ईश्वर आहे. ही गोष्ट ज्यांना मान्य झाली नाही, ते धर्मद्रोही ठरविले गेले. अशा लोकांना जगातून नाहीसे करावे, अशी भूमिका धर्म मानणाऱ्या सनातन्यांनी घेतली. त्यामुळेच युरोपात धर्मयुद्धे झाली. हजारो लोकांना ठार करण्यात आले. प्रचंड रक्तपात झाला.

पंधराव्या शतकाअखेर मध्ययुग संपले आणि हळूहळू युरोपात आधुनिक युग उदयास आले. अनेक वैज्ञानिकांनी नवनवीन शोध लावले. त्या शोधांमुळे माणसाच्या सृष्टीज्ञानात भर पडली. पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नसून सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, हे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले. गुरू या ग्रहाला उपग्रह आहेत, ही गोष्ट गॅलिलिओने सप्रमाण सिद्ध करून दाखविली.

ज्ञान हेच सामर्थ्य आहे, ही गोष्ट हळूहळू लोकांच्या ध्यानात येऊ लागली. युरोपात प्रबोधन युग अवतीर्ण झाले. शब्दप्रामाण्याची जागा बुद्धीप्रामाण्याने घेतली. बुध्दीचा उपयोग करून माणसे चिकित्सा करू लागली. चिकित्सा केल्याने सत्य काय, असत्य काय, मानवी हित कशात आहे, ते कसे साध्य करता येईल, यासंबंधी माणसे निर्णय घेऊ लागली.

इ.स. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांती झाली. या क्रांतीमागे उपरोक्तप्रमाणे वर्णन केलेली पार्श्वभूमी होती. या क्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूल्यवान रत्ने बाहेर पडली. ती मूल्ये जगभर मान्यता पावली. त्या पुढे जाऊन फ्रान्सने राज्यसंस्था आणि धर्म यांच्यात फारकत केली. धर्मसत्तेने राज्यकारभारात कोणतीही ढवळाढवळ करावयाची नाही. फ्रान्समध्ये आजदेखील ती व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे.

'मूल्य' म्हणजे जे असावयास पाहिजे असे काहीही! उदाहरणार्थ समता हे मूल्य घेऊ. संपूर्ण समाजाने अथवा कोणत्याही सामाजिक संस्थेने कोणाही व्यक्तीशी व्यवहार करताना ती व्यक्ती सारख्याच मोलाची आहे, असे मानून करावा, म्हणजे समता होय. सर्व माणसे निसर्गत: सारखीच असतात, हे मान्य करणे म्हणजे समता होय. स्वातंत्र्य हे व्यक्तिविकासासाठी आवश्यक असे मूल्य होय. सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी व सहजीवनासाठी बंधुता हे मूल्य आवश्यक आहे.

व्यक्तीला स्वातंत्र्य बहाल केले आहे. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्याला कर्तव्याचे कुंपण घातले आहे. सर्वांना धर्मस्वातंत्र्य आहे. तथापि राज्यशासन, विधिमंडळ, न्यायालय आदी सरकारी संस्थांचा कारभार धर्मनिरपेक्षतेने चालेल, असे आमच्या राज्यघटनेने स्पष्ट केले आहे. भारतीय समाज विषमतापूर्ण व्यवस्थेवर उभारला आहे. राज्यघटनेद्वारे राजकीय व आर्थिक उपाय योजिले जातील. त्यायोगे हळूहळू विषमतेचे निर्मूलन करून समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे एक उद्दिष्ट राज्यघटनेने आपल्यापुढे ठेवले आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतात गेल्या ६०-६५ वर्षांत आम्ही अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. लोकशाही मार्गाने सत्तांतरे झाली आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आम्ही बरीच प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांत अवकाश क्षेत्रात आम्ही उत्तुंग भरारी घेतली आहे. तथापि, या देशाचे नागरीक या नात्याने चिकित्सापूर्ण जीवनाची उभारणी करण्यात आम्ही कमी पडलो आहोत. व्यक्तिगत जीवनात आम्ही स्वच्छतेला महत्त्व देतो; परंतु, सार्वजनिक जीवनात स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करतो. आम्ही कुठेही थुंकतो. रस्त्यावर कचरा फेकतो. देशातील नद्या प्रदूषित करतो. गंगा नदीत अर्धवट जळलेले मृतदेह फेकून देतो. खून, मारामाऱ्या, आत्महत्यांना ऊत आला आहे. स्त्रियांवर अत्याचार करतो. स्त्रीभ्रूण हत्या करतो. त्या संदर्भात शासनाने केलेले कायदे आम्ही धुडकावून लावतो. धार्मिक बाबतीत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब आम्ही करीत नाही. आम्ही स्वत: स्वीकारलेले काम चोखपणे पार पाडीत नाही.

आजही जात पंचायती कायदा हातात घेऊ लागल्या आहेत. लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य असा अर्थ घेतला जातो. पण आमची वृत्ती कायदा मोडण्याकडे आहे. किमान कायद्याला धरून वागावे, असा आग्रह आपण धरायला हवा. आमच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील हिंसा टाळणे सर्वांना शक्य आहे. शांती सर्वांच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आवश्यक आहे, ही गोष्ट ध्यानात घेऊन सर्व प्रकारच्या हिंसक कृत्यांना दूर ठेवणे शक्य आहे. धर्मनिरपेक्षता, परस्पर सामंजस्य, सद्भावना व सहिष्णुता या तत्त्वांचा प्रत्येकाने आदर करावा व त्यानुसार आचरण करावे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी चिकित्सक दृष्टीने विवेकनिष्ठ जीवन जगण्याचा संकल्प करायला हवा. हा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्या समाजाचे शिक्षण व प्रबोधन करण्यासाठीही आपण कटिबद्ध होणे जरूरीचे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा