शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

डॉ. ज.रा. दाभोळे स्मृतीलेख-१:

तत्त्वज्ञानाचं चालतं-बोलतं विद्यापीठ हरपलं..!

 (दि. १ मे २०१९ रोजी ज्येष्ठ विचारवंत व तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त 'दै. महाराष्ट्र टाइम्स'मध्ये त्यांच्याविषयी छोटा लेख लिहीला होता. दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी दीर्घ आजाराने त्यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतीजागरासाठी हा लेख येथे संपादित स्वरुपात सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

डॉ. ज.रा. दाभोळे यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर (दि. १ मे २०१९)


मी गेली वीसहून अधिक वर्षे कोल्हापुरात असलो, तरी डॉ. ज.रा. दाभोळे यांच्याशी कधी संपर्क येण्याचा योग आला नव्हता, याची खंत असली; तरी सरांशी परिचय झाला, याचा आनंद त्याहून कितीतरी मोठा अन् अवर्णनीय आहे. 

साधारण दशकभरापूर्वी सन २०१४ साली बंधू अनुप यांच्या इपिफनी ऑफ गॅलिलिओ या लघुपटाचा सिक्वल असलेल्या स्मोकिंग झोन या लघुपटाच्या प्रिमिअर प्रसंगी या थोर व्यक्तीमत्त्वाशी माझा परिचय झाला. उपरोक्त दोन्ही लघुपटांमध्ये अनुप यांनी तत्त्वज्ञानाच्या अंगाने जी मांडणी केली, त्या मांडणीने दाभोळे सर भलतेच प्रभावित झाले होते आणि त्याच्या प्रेमातच पडलेले. त्यानंतर सर विद्यापीठात आले की, मात्र भेटल्याखेरीज जात नसत. या दरम्यानच ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. एन.ए. निकम यांच्या एनक्वायरी अँड डायलॉग या बृहत्-व्याख्यानाचा अनुवाद दाभोळे सरांनी केला आणि त्याचे प्रकाशन विद्यापीठात झाले. हे पुस्तक वाचल्यानंतर मी अक्षरशः भारावून गेलो. बुद्धाशी जोडणारं, मानवतेच्या जाणीवा निर्माण करणारं असं काही गवसल्यासारखं झालं आणि मी त्याबाबत चर्चेसाठी सरांच्या घरीच पोहोचलो. पुढचे दोनेक तास सर तत्त्वज्ञानाविषयी चिंतनपर मांडणी करीत राहिले आणि मी अक्षरशः भारावून ऐकत होतो. मध्येच प्रश्न विचारीत होतो. सर माझं समाधान करीत आपली मांडणी अधिक तपशीलवार करीत होते. खरं तर तत्त्वज्ञानासारखा अतिगहन विषय किती सोपा करून सांगावा, याची प्रचिती सरांच्या मांडणीतून येत होती. मात्र, त्यावरुन हा विषय सोपा आहे, असं मात्र समजण्याचं कारण नाही. सरांचं या विषयातलं चिंतनच इतकं सखोल आहे, त्यांनी तत्त्वज्ञानाच्या सागरात इतक्या खोलवर बुड्या मारलेल्या आहेत; की त्यामधून त्यांचे या विषयामधील विचारमोती निर्माण झालेले आहे. त्या मोत्यांचे कण ते असे माझ्यासारख्या कैक विद्यार्थ्यांवर असे मुक्तहस्ते उधळत असतात आणि तरीही त्यांची ओजळ कधीही रिती होत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य. सर्व भेदांच्या पलिकडल्या शुद्ध आणि सात्त्विक मानवतावादाचे जे आकलन सरांना झाले आहे, त्याची तुलना बुद्ध तत्त्वज्ञानाशीच करावी लागेल. त्यामुळे त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांच्या निष्कलंक व निष्कपट प्रेमाचा लाभार्थीच बनून जातो.

सरांना निवृत्त होऊन आता वीसहून अधिक वर्षे उलटली, पण शिक्षणाशी आणि ज्ञानदानाशी असलेली त्यांची बांधिलकी आजतागायत कायम आहे. आजही त्यांच्याकडे त्यांचे नवे-जुने विद्यार्थी वेळ मिळेल तसे येत असतात, भेटत असतात आणि त्या भेटीतून नवे ज्ञानमौक्तिक घेऊन पुनश्च मार्गस्थ होतात. वयोमानानुसार सरांना काही आजारांनी वेढलं आहे, पण सरांना नामोहरम करणं त्यांना जमलेलं नाही, जमणार नाही. आलेल्या विद्यार्थ्याला पाहून सरांच्या चेहऱ्यावर विलसणारं स्मित रोखणं त्या आजारांनाही अशक्य आहे. तसं पाहता, खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञान जगणारा, अंगिकृत तत्त्वज्ञान सांगणारा असा हा शिक्षक आहे; नव्हे, तत्त्वज्ञानाचं चालतं बोलतं विद्यापीठच आहे. या विद्यापीठाला कार्यरत ठेवणाऱ्या सौ. दाभोळे मॅडम यांचेही आभार मानायला हवेत.

आजच्या अस्वस्थ वर्तमानाच्या आवर्तात अशा प्रकारची निष्ठा, संयम आणि तत्त्वांप्रती अनिश्चलत्व ही अतीव दुर्मिळ बाब आहे. मात्र, त्यांचे दर्शन दाभोळे सरांच्या दर्शनामध्ये होत असते. दाभोळे सरांसारख्या वंदनीय व्यक्तीमत्त्वामुळे चांगुलपणावरचा विश्वास आणि योग्य दिशेने काम करीत राहण्याची प्रेरणा या दोन्ही बाबी सदोदित सोबत राहण्याची खात्री मिळते. त्यांचा आशीर्वादाचा हात डोक्यावर असणे, ही माझ्यासारख्या अनेक जणांसाठी आयुष्यभराची पुंजी आहे. त्याचं मोल आणि कृतज्ञता शब्दांतून व्यक्त करणे केवळ अशक्य!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा