शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

डॉ. ज.रा. दाभोळे स्मृतीलेख-२ :

'स्मोकिंग झोन'चे मानसशास्त्रीय विश्लेषण (लेखक डॉ. ज.रा. दाभोळे)

 (माझे बंधू अनुप जत्राटकर यांच्या 'स्मोकिंग झोन' या लघुपटाचा प्रिमिअर शो कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात दि. ९ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला. हा लघुपट पाहून ज्येष्ठ विचारवंत व तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे खूप प्रभावित झाले. त्यांनी स्वतःहून या लघुपटाविषयी अतिशय सविस्तर लिहीले. हा लेख येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देत आहोत.- डॉ. आलोक जत्राटकर)

'स्मोकिंग झोन' लघुपटाच्या प्रिमिअर शो प्रसंगी अनुप जत्राटकर यांचे अभिनंदन करताना डॉ. ज.रा. दाभोळे. शेजारी डॉ. आलोक जत्राटकर

 

प्रास्ताविक - 'स्मोकिंग झोन' हा लघुपट मी दोनदा पाहिला. दोन्ही वेळेला माझ्यातील विचारशक्तीला चालना मिळाली. हा लघुपट, त्याची कथा, त्यातील एकूण पात्रे माझ्या परिचयाची आहेत, त्यांना मी माझ्या अवतीभोवती पाहात आहे, अशी जाणीव मला झाली. सर्वसामान्य प्रेक्षकाला हा लघुपट समजेलच असा दावा करात येणार नाही.  कारण, तो जसा मूर्त पातळीवर घडताना दिसतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने अमूर्त पातळीवर तो समजून घेण्यासाठी एक वैचारिक प्रगल्भता प्रेक्षकाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आजचे एकूण जीवन, तरुणाईचे भरकटलेपण दाखवून देण्याचे काम हया लघुपटाने अतिशय सूक्ष्मरीतीने केले आहे.

पार्श्वभूमी - 'स्मोकिंग झोन' समजण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतरचा कालखंड ही एकूणच मानवी जीवनाला लाभलेली एक मनोवैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. दुसरे महायुध्द १९३९ ते १९४५ या कालावधीत घडले. त्यानंतर संपूर्ण जगात अनिश्चिततेची भावना पसरली होती.  माणसाच्या आयुष्याची खात्री कुणालाही देता येत नव्हती. मानव जातीचे भवितव्य, मनुष्याचे अस्तित्व संपुष्टात येणार की काय, अशी भीती तरुणांच्या मनात डोकावत होती.  बेकारी, दारिद्रय, नैराश्य, भ्रष्टाचार, युद्ध, रक्तपात इत्यादींमुळे तरुण-तरुणी 'प्रॅक्टिकल' दृष्टीने जीवनाकडे पाहू लागली.  त्यातून तरुणाईच्या मनात निरर्थकता निर्माण झाली. या निरर्थकतेला आल्बेर कामूने Absurdity  असा शब्द वापरला आहे. Absurd या शब्दाचा कोशातील अर्थ Foolish अथवा Ridiculous असा आहे.  मूर्खपणा किंवा नसमंजस असा या शब्दाचा मराठीत अर्थ होईल. तथापि, कामू वगैरे लेखकांना अभिप्रेत असणारा अर्थ म्हणजे The perfect harmony of disharmony अथवा Out of Harmony असा घेतला पाहिजे.

कामूचे मानवी जीवनासंबंधीचे म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल. स्त्री आणि पुरुष संभोगासाठी एकत्र येतात. त्याक्षणी ते दोघेही कामवासनेने प्रेरित झालेले असतात. आपापली कामवासना शमविणे हीच त्यांची गरज असते. 'आपल्याला मूल जन्माला घालायचे आहे', असा विचार त्यांच्या मनात येत नसतो.  परंतु, या वासनापूर्तीतून पुढे मूल जन्माला येते.  कामवासना पूर्ती अपत्याचा जन्म हया दोन्ही गोष्टी नैसर्गिकच म्हटल्या पाहिजेत. त्यानंतर ते मूल हळूहळू मोठे होऊ लागते. जसजसे ते मोठे होऊ लागते तसतसे त्याच्या ध्यानात येते की, आपल्या जन्मामागे कोणताच उद्देश नाही. आता जर माझ्या जन्मामागे कोणताही उद्देश नाही आणि जो जन्मला आहे, तो केव्हा तरी मरतोच; त्या अर्थी माझ्या जगण्यालाही काही अर्थ नाही.  माझे जीवन निरर्थक आहे.  हे निरर्थक जगणे माझ्यावर लादलेले आहे. मी स्वत: अशा जीवनाची निवड केलेली नाही. त्यामुळे मी स्वतंत्र नाही. माझे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे.

आजच्या तरुणाईची मानसिकता अशीच बनलेली आहे. तथापि, थोडासा दृष्टिकोन बदललेला आहे.  'आताचा क्षण मी मला पाहिजे तसा जगणार. इतरांचा विचार करता मी तो जगणार आहे.  कारण कोणाला माहित आहे की, उद्या काय होणार आहे' हा विचार आजच्या तरुणांमध्ये वाढीस लागला आहे. परिणामी, आजच्या तरुणांमध्ये चंगळवादी वृत्ती वाढली आहे.  अशा तरुणांना कसलीच जबाबदारी नको. लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत झाला आहे. स्त्री ही एक भोगवस्तू आहे.  पैसा हेच सर्वस्व. त्यामुळे आता जो क्षण आपल्या हातात आहे, तो आपल्या मनाला आवडेल त्याप्रमाणे जगायचे आणि मोकळे व्हायचे. फार दूरचा विचार करायचाच कशाला? ही मानसिकता कमी अधिक प्रमाणात सर्वच तरुणांमध्ये पाहावयास मिळते. 

डॉ. फ्राईडचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत: माणसाच्या व्यक्तित्वाचा अभ्यास अनेक मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.  त्यामध्ये डॉ.सिग्मंड फ्राईडचे प्रतिपादन विचारात घेण्यासारखे आहे.  'स्मोकिंग झोन' हा लघुपट समजून घेण्यासाठीही फ्राईडचे म्हणणे उपयुक्त ठरणारे आहे.  मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून फ्राईडने व्यक्तित्वाचे तीन भाग केलेले आहेत.

. इदम् (Id)

. अहम् (Ego)

. श्रेष्ठअहम् (Super Ego)

या तिन्ही घटकांच्या परस्पर क्रियेतून व्यक्तीचे वर्तन प्रकट होत असते. 'इदम्' हा व्यक्तित्वाचा अबोध (Unconscious Mind) भाग आहे.  निसर्गसिद्ध अशा सहजप्रवृत्ती किंवा उपजत प्रेरणांच्या समुच्चयाला फ्राईडने 'इदम्' म्हटले आहे. हा अत्यंत मूलभूत घटक होय. तहान, भूक, लैंगिक प्रेरणा, विनाशन प्रवृत्ती (Death Instinct) यांचा समावेश इदम् मध्ये होतो. सुख समाधान प्राप्त करण्यासाठी इदम् सर्व ते प्रयत्न करीत असतो.  कोणत्याही प्रकारे सुख मिळविणे एवढेच इदम् ला ठाऊक असते.

'अहम्' हा व्यक्तित्वाचा जाणीव असलेला (Conscious) भाग आहे. व्यक्तित्वाचा हा दुसरा घटक बोधरुप विवेकी असून तो अबोधावस्थेवर नियंत्रण ठेवणारा आहे. सामाजिक मान्यता आत्मप्रतिष्ठा प्राप्त करणे हे अहम् चे कार्य होय. इदम् मुळे जे निसर्गसिद्ध सहज वर्तन केले जाते; त्यावर अंकुश ठेवणे, तारतम्य बुद्धीने समाजमान्य रीतीने त्याचे व्यवस्थापन करणे हे अहम् चे कार्य होय. व्यक्ती, तिच्याभोवतीची परिस्थिती यांच्यातील समतोल कायम ठेवण्याचे कार्य अहम् करीत असतो. त्याचप्रमाणे वास्तव परिस्थितीकडे लक्ष देऊन श्रेष्ठ अहम् च्या आदेशांना अनुसरुन अहम् सदैव 'इदम्'वर अंकुश ठेवतो. 'इदम्'चे कार्य सुखतत्त्वानुसार चालत असते, तर 'अहम्'चे कार्य वास्तव तत्वानुसार चालत असते.

व्यक्तित्वातील तिसरा घटक म्हणजे 'श्रेष्ठ अहम्' किंवा सद्सद्विवेकबुद्धी हा होय. अगदी लहानपणापासून मातापित्यांचा आदर्श, त्यांच्याकडून मिळालेली नैतिक शिकवण या सर्वांमुळे 'श्रेष्ठ अहम्' अस्तित्वात येत असतो. सदाचार, नैतिकता, समाजमान्यता, आदर्शात्मक वर्तन यासाठी श्रेष्ठअहम् कार्य करीत असतो.  नीतिविषयक मूल्यांची जपणूक तो करीत असतो.  त्याची 'अहम्'वर सत्ता असते. अहम् ची आदर्शाकडे वाटचाल होण्यासाठी व्यक्तीला प्रयत्न करावयास लावतो, तो 'श्रेष्ठ अहम्' हा घटक होय.

सुरुवातीला इदम् प्रवृत्तींना मुक्त समाधान मिळते. पुढे मूल मोठे होऊ लागते, तसतसे, अहम् चा एक चिकित्सक निरीक्षक म्हणून विकास होऊ लागतो.  अहम् हा नैतिक नियंत्रक आहे.  तो म्हणजेच 'श्रेष्ठअहम्' होय. या तीनही घटकांतील संघर्ष हे फ्राईडच्या मनोविश्लेषण सिद्धांताचे सार होय. श्रेष्ठअहम् च्या कार्यात इदम् कडून बऱ्याच अडचणी आणल्या जातात. इदम् नेहमीच श्रेष्ठ अहम् शी संघर्ष करीत असतो.  अशावेळी अहम् कडून मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली जाते.  मूलभूत शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी इदम् धडपडत असतो, तर श्रेष्ठअहम् व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.  यातून व्यक्तीच्या ठिकाणी विविध संघर्ष निर्माण होतात. अशा परिस्थितीत अहम् ला धोका निर्माण होतो.  म्हणून अहम् चे रक्षण करण्यासाठी व्यक्ति संरक्षण यंत्रणांचा वापर करु लागते. सध्याची तरुण पिढी इदम् च्या प्रभावाखाली वावरत असल्यानेच सैरभैर झाली आहे.  'स्मोकिंग झोन' या लघुपटातील पात्रे इदम् च्या प्रभावाखाली कसे वागत आहेत, ही गोष्ट दिग्दर्शकाने अतिशय कौशल्याने दाखवून दिली आहे. 

भारतीय नीतिशास्त्रातील पुरुषार्थ विचार -

भारतीय नीतिशास्त्रात एकूण चार पुरुषार्थ सांगितले आहेत.  धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.  मोक्ष हे प्राप्तव्य होय.  परंतु त्यासाठी आधीचे तीनही पुरुषार्थ व्यक्तीने साध्य करावयाचे असतात.  पैकी अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ साध्य करताना धर्माचे (नीतिचे) नियंत्रण मान्य करावेच लागते. कोणताही एकच एक पुरुषार्थ व्यक्तीने साध्य करायचा नसतो. याचा अर्थच असा की पहिल्या तीन पुरुषार्थांमध्ये संतुलन प्रस्थापित केले असता मोक्ष हा शेवटचा पुरुषार्थ व्यक्तीला साध्य करणे व्यक्तीला शक्य होते. यावरुनच 'पुरुषार्थ' विचार असे म्हटले आहे. हे चारही पुरुषार्थ व्यक्तीच्या अंतिम हितासाठी सांगितले आहेत. परंतु, आज परिस्थिती खूपच बदलली आहे.  भारतीय माणूस कोणत्या तरी एकाच पुरुषार्थ प्राप्तीसाठी धडपडत आहे.

'स्मोकिंग झोन' लघुपटात चार पात्रे आहेत. ती चार पुरुषार्थांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.  मोक्षाव्यतिरिक्त ही चार पात्रे आपापली बाजू मांडत आहेत. त्या सर्वांचे म्हणणे हे आहे की, त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे.  त्यांना कुणीच समजून घेत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.  ही भावना प्रबळ झाली असल्याने प्रत्येकजण एक टोक गाठताना दिसतो आहे.  ह्याला 'एक्स्ट्रीमिटी' म्हणू या.  परंतु, मनुष्य 'एक्स्ट्रीमिटी'कडे का धावतो?  कंटाळवाणेपण किंवा 'बोअरडम्' हे त्याचे मूळ कारण असते.  बोअरडमचे रुपांतर 'स्प्लिन'मध्ये होते, असे बॉदलेअरने म्हटले आहे.  'स्प्लिन' म्हणजे एक्स्ट्रीम बोअरडम्. या अवस्थेत व्यक्ती नेहमी टोकाचे निर्णय घेत असते. या पुढची अवस्था म्हणजे डॅन्डीझम. डॅन्डीझम म्हणजे 'To arrange ugly things in a beautiful manner' असा अर्थ आहे. या अवस्थेत मनुष्य आपल्या चुकांचे समर्थन करु लागतो. आपली कृती योग्य कशी होती, हे तो पटवून देऊ लागतो.  या लघुपटातील मोक्ष बाजूला ठेवल्यास इतर तीन पात्रे आपल्या चुकांचे समर्थन देत आहेत आणि त्यांच्या मते तेच योग्य असून जग त्यांना समजून घेण्यात चुकत आहे.

पुरुषार्थ विचारानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी व्यक्ती जीवनभर कार्यरत असते. अर्थ काम या दोन्हीवर धर्म म्हणजे नीतिचे नियंत्रण असले तरच मोक्ष म्हणजे मोकळीक अर्थात सुटका हे अंतिम साध्य गाठता येते.  याचा अर्थ- अर्थ आणि काम यांची प्राप्ती नीतिने मर्यादित राहिली पाहिजे.  अर्थ काम यांच्यावर नीतिचा अंकुश असला पाहिजे.  आज असा अंकुश राहिलेला नाही. अर्थप्राप्ती कामवासनेची तृप्ती या दोन गोष्टीच महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. तरुणांना हा भारतीय पुरुषार्थ नीटपणे उलगडून सांगणारे शिक्षणच दिले जात नसल्याने आजचा तरुण बहकलेला दिसतो.

'स्मोकिंग झोन' या लघुपटात मोक्षाचे पात्र साकारणारी एक मुलगी दाखविली आहे. ती काहीच बोलत नाही. कारण मोक्ष म्हणजे काय, हे कोणालाच माहित नाही.  आपण म्हणतो तोच मार्ग मोक्षाचा, अशी माणसांची धारणा झाली आहे.  सर्व प्राणीमात्रांबद्‌दलची करुणा म्हणजे मोक्ष नव्हे.  निसर्गावर प्रेम, परोपकार यांना मोक्षमार्गात काहीच किंमत राहिलेली नाही. चारधाम यात्रा करणे म्हणजे मोक्ष, गंगेत स्नान करणे म्हणजेच पापमुक्ती, मक्का, गया, रोम, जेरुसलेमला जाऊन येणे म्हणजे मोक्ष. अशा सर्व बाजारु संकल्पना माणसात रुजविल्यामुळे एका बाजूला भक्तीचा बाजार दुसरीकडे मोक्षप्राप्तीची दुकानदारी उदयाला आली आहे.  मोक्ष या संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेण्याची कुणालाच इच्छा नाही. लघुपटाच्या दिग्दर्शकाने ही गोष्ट फार मार्मिकपणे दाखविली आहे.  मोक्षाच्या पात्रासाठी लहान मुलगी निवडली आहे. मुलगीच का निवडली आहे? कारण स्त्रीकडे नवनिर्मितीची क्षमता असते. निसर्गातील शुद्ध आकाराची (Purest Form) निर्मिती स्त्रीच करू शकते.

या लघुपटात एक रखवालदार आहे. वर वर पाहता तो शांत आहे.  परंतु त्याच्या मनात खूप खळबळ माजली आहे. माणसाच्या अस्तित्वाबदलच त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.  कोण आहे हा रखवालदार? डॉ.फ्राइड यांच्या मनोविश्लेषणानुसार हा रखवालदार म्हणजे मनुष्याचे जागृत मन होय. या विरुध्द असते ते निद्रिस्त मन.  जागृत मन आपल्या वर्तन व्यवहाराचा वीस टक्के भाग व्यापत असते.  उरलेल्या ८० टक्के गोष्टी निद्रिस्त मनात जात असतात. जागृत मनाचे तीन भाग आपण या आधी सांगितले आहेत.  इदम्, अहम् आणि श्रेष्ठअहम हे ते तीन भाग होत.  समाजाने चुकीच्या अनैतिक ठरविलेल्या भावना आणि वासनांचे दमन करण्याचे काम श्रेष्ठअहम् करीत असतो.  मात्र त्यांचे संपूर्ण दमन कधीच होत नसते. स्वप्नावस्थेत त्या दमित इच्छा आणि वासनांची आपण पूर्ती करुन घेत असतो. अर्थात, हे सर्व स्वप्नातील मनोव्यापारामुळे घडून येत असते. अहम् हा आपला जागृत मनाचा घटक समाजमान्य पद्धतीने वागत असतो.  एका अर्थाने तो एक मुखवटाच असतो. प्रत्येकाचा मुखवटा हा नाटकी असतो. समाजाचा रोष ओढवून घेण्यासाठी मुखवटा उपयोगी पडतो. एवढे सर्व असूनही व्यक्तीकडून कधी तरी चुकीचे वर्तन घडते.  मग त्या चुकीच्या वर्तनाबदल आपल्या मनात बोचणी लागते.  'आपण तसे वागायला नको होते,' असे व्यक्तीला वाटते. हे बोचणी लागण्याचे कार्य व्यक्तीच्या श्रेष्ठ अहमकडून इदम् च्या आदेशाने होत असते.

'स्मोकिंग झोन' मधला रखवालदार नेमके हेच काम करीत आहे. तो रखवालदार प्रत्येकातील सुप्त मनाला डिवचत आहे. तिथे असलेला प्रत्येकजण बांधून घातलेला आहे. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. प्रत्येकाचे कान उघडे आहेत. येथे एक गोष्ट मान्य करावयास हवी. ती म्हणजे प्रत्येकाच्या मनात वेदना आहेत. काहीतरी चुकीचे घडल्याची बोचणी आहे. कुणी मान्य करो अथवा करो, कधी कधी आपण रानटीपणाने इदम् च्या प्रभावाखाली राहून वागत असतो. रखवालदार बोलतं करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुप्त मनाला टोचण्या देत आहे. प्रत्येकाचे जागृत मन मुखवटा धारण करुन 'झोन' मध्ये जाते. सुप्त मनात जळणारा श्रेष्ठअहम् कबुली देतो. परंतु ही कबुली सर्वांसमोर दिली जात नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. याचे कारण मुखवटा धारण करुन जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्या माणसात तेवढे धाडस नसते.

या लघुपटात एक मुलगा काहीतरी लिहित आहे.  विचार करीत आहे. हा मुलगा कोण आहे?  या प्रश्नाचे उत्तर प्लेटो हया ग्रीक तत्त्वचिंतकाच्या एका संवादात आढळेल. अडीच हजार वर्षापूर्वी ग्रीसमधील अथेन्स नगरीत सॉक्रेटीस हा प्रख्यात विचारवंत कार्य करीत होता.  सॉक्रेटीस हा पाश्चात्य तत्त्वज्ञानातील श्रेष्ठ विचारवंत म्हणून ओळखला जातो. प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्य होय.  सॉक्रेटीसने काही लिहून ठेवले नाही. प्लेटोने एकूण ३५ संवाद लिहिले आहेत. त्यातील  'रिपब्लिक' हा एक प्रसिद्ध संवाद होय.

या 'रिपब्लिक'मध्ये प्लेटोने आदर्श राज्याविषयीचे चित्र रंगविले आहे. त्याच्या मते, तत्ववेत्ते राज्याचे प्रमुख असतील तेव्हा ते राज्य आदर्श होईल. अशा या आदर्श राज्यात कवींना कोणतेही स्थान असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.  यामागे त्याची भूमिका अशी होती की, कवी हे नवीन काही सांगतच नाहीत. ते अंतिम सत्यापासून शेकडो मैल दूर असतात. या संदर्भात चंद्राचे उदाहरण त्याचे घेतले आहे. त्याच्यामते तळयातल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पडते. हे प्रतिबिंब पाहून कवीच्या मनात काव्य स्फुरते. तो कविता लिहितो. आता एकूण तीन चंद्र झाले. पहिला म्हणजे आकाशातील खरा-खुरा चंद्र.  त्या चंद्राचे प्रतिबिंब तळयातल्या पाण्यात पडते. हा दुसरा चंद्र.  तिसरा म्हणजे तळयातले प्रतिबिंब पाहून कवितेत त्याचे जे प्रतिबिंब पडते तो कवितेतला चंद्र. असे हे रुपक सांगून झाल्यावर प्लेटो म्हणतो की, Idea is twice removed from reality. Poetry is nothing but the imitation of imitation. अशा प्रकारे कवी हे अंतिम सद्वस्तूपासून दूर गेलेले असल्याने आदर्श राज्यव्यवस्थेत त्यांना कोणतेही स्थान देता कामा नये. सारांश, काव्य हे नवनिर्मिती असू शकत नाही. अंतिमत: जे सत्य आहे ते जाणणे अत्यंत महत्वाचे आहे.

'स्मोकिंग झोन' या लघुपटात वरील सर्व तात्विक, मानसिक संकल्पनांचा यथायोग्य उपयोग केला आहे. दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म पातळीवर जाऊन, खोलवर विचार करुन हया लघुपटाची निर्मिती केली आहे, ही गोष्ट पदोपदी जाणवते. या लघुपटाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यास विविध प्रकारची पारितोषिके जाहीर झाली आहेत. हे वाचून मला खूप आनंद झाला. त्याबद्दल दिग्दर्शक अनुप जत्राटकर त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि या क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीस घवघवीत यश लाभो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा