![]() |
| 'सुधागड ०७' चित्रपटाचे पोस्टर |
![]() |
| दिलीप रायण्णावर |
(माझे मित्र दिलीप रायण्णावर यांनी आपल्या शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच ‘सुधागड ०७’ हा चित्रपट बनवला आहे. कोळशाच्या भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या शोषणाला वाचा फोडणारा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साद घालणारा हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास अद्याप काही अवधी जाणार आहे. कारण सध्या तो विविध चित्रपट महोत्सवांतून फिरतो आहे. पुरस्कार मिळवतो आहे. दिलीपनं, ज्याला मी प्रेमानं दिल्पा म्हणतो, मला हा चित्रपट खाजगीरित्या पाहण्यासाठी पाठवला. आज तो पाहिला. त्या निमित्तानं माझ्या भावना अनावृत पत्रस्वरुपात इथं व्यक्त करीत आहे.)
प्रिय दिल्पा,
मित्रा, आज तुझा चित्रपट ‘सुधागड-०७’ पाहिला. खरं सांगतो, अगदी स्पीचलेस झालोय. त्याहूनही सुन्न झालोय. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट हृदयाला हात घालणारा तर झालाच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अत्यंत थरारक, रोमांचक बनला आहे.
मला ती संध्याकाळ आठवते आहे, जेव्हा तू या स्क्रीप्टचा पहिला मसुदा फायनल केला होतास आणि थेट कोल्हापूरला माझ्या ऑफिसमध्ये पोहोचला होतास. त्या संध्याकाळी सहाच्या पुढे जवळजवळ दोनेक तास तू मला स्टोरी सांगत होतास आणि मी तल्लीन आणि थक्क होऊन तुझं नॅरेशन ऐकत होतो. सगळ्या लोकेशन्ससह तू मला हा चित्रपट 'ऐकवला' होतास. तेव्हा तू सांगतोयस तसा हा चित्रपट झाला तर जबरदस्त होईल, असं मी तुला म्हणालो होतो. प्रत्यक्षात चित्रपट त्याहूनही अधिक जबराट आणि देखणा झाला आहे, यासाठी तुझं मनापासून अभिनंदन!
इथं एका गोष्टीची कबुली मला द्यायला हवी, ती अशी की, जेव्हा तू हे सारं मला सांगत होतास, तेव्हा मित्र म्हणून तुझ्या आत्मविश्वासाचा अभिमान वाटत असला तरीही एक प्रकारची साशंकताही माझ्या मनात होती, ती म्हणजे, तुझी दिग्दर्शकीय पाटी कोरी असल्यानं आणि चित्रपटाच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक असल्यानं कशा प्रकारचं प्रोडक्ट असेल, अशी भीती वाटत होती. वेळोवेळी तू चित्रपटाच्या प्रगतीविषयी कळवित होतास, खूष होतास, पण तरीही चित्रपटाची गाणी पाहीपर्यंत माझ्या मनातली शंका कायमच होती. पण गाणी पाहिली, त्यांचे लिरिक्स ऐकले, टेकिंग पाहिलं आणि चित्रपटाविषयीच्या आशाअपेक्षा पुन्हा पल्लवित झाल्या. आज पिक्चर बघितला आणि तुला सांगतो, एकटाच असूनही डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एक तर, तुझ्या हातून एक उत्तम कलाकृती साकार झाली आहे, याचा मित्र म्हणून अभिमान दाटून आल्यानं आलेले अश्रू होते आणि दुसरे अश्रू तुझ्या कलाकृतीसाठी होते. कारण, शोषणातिरेकाच्या ज्या विश्वाचं दर्शन तू घडवलं आहे, त्यापासून आपला समाज केवळ अन् केवळ अनभिज्ञच नव्हे, तर खूप दूर आहे. त्या विश्वाशी दुरान्वयेही आजच्या समाजाला काही देणंघेणं नाही. समाजाच्या एका व्यापक घटकाचं शोषण करणारी एक यंत्रणा कशी पद्धतशीरपणे आपल्या भोवतालातच काम करते आणि ते विश्व, ती यंत्रणा आपल्या आसपास असूनही आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मग तू दाखवलंस त्याप्रमाणं आदिवासींचं कोळशासाठीचं शोषण असेल, किंवा ऊसतोड मजुरांचं जीणं असेल. त्यांच्या जगण्याशी, जीवनमरणाशी कसलंही देणं घेणं नसलेला उदासीन, आत्ममग्न समाज सर्वव्याप्त आहे.
या पार्श्वभूमीवर, मित्रा, तुझ्यासारखा वरिष्ठ महसुली अधिकारी समाजाच्या शोषणदुःखानं अस्वस्थ होतो आणि त्याला वाचा फोडण्यासाठी, त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एका अत्यंत देखण्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजाला साद घालण्यासाठी सिद्ध होतो, यातूनच तुझ्या उदात्त सामाजिक जाणिवेची प्रचिती येते.
मला महत्त्वाचं काय वाटतं, सांगू? शोषणाची व्याप्ती आणि खोली दाखवून देत असतानाच व्यवस्थेमधील चांगुलपणावरचा, माणूसपणावरचा आणि सांविधानिक मूल्यांवरचा विश्वास तू कोठेही ढळू दिलेला नाहीस. आज हिंसा किती पराकोटीची असते, हे दाखवण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांची चढाओढ लागलेली असण्याच्या काळात तुझं हे वेगळेपण ठसठशीतपणे उठून दिसणारं आहे. कथेवरची पकड कोठेही सुटू न देता, एका विशिष्ट गतीनं चित्रपटाला पुढे नेत असताना त्यातली थरारकता अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यात तू यशस्वी झालेला आहेस. डॉ. मिलींद शिंदे वगळता बऱ्यापैकी सारेच नवखे कलाकार आहेत. अशा रॉ कलाकारांकडून अभिनय करवून घेणं आणि आवश्यक परिणाम मिळवणं, ही बाब मोठी अवघड असते. पण एका कसलेल्या दिग्दर्शकाप्रमाणं तू ते साध्य केलं आहेस, याचं मला कोण कौतुक वाटतं! स्क्रीनप्लेसाठी तुला ज्येष्ठ लेखक सन्मित्र विद्यासागर अध्यापक आणि सुषमाताई शितोळे यांची उत्तम साथ लाभलेली दिसते. बप्पी लहरी यांचं संगीत लाभलेला हा कदाचित अखेरचाच चित्रपट असेल. त्यांचे चिरंजीव बाप्पा यांनीही संगीताचा गोडवा आणि पार्श्वसंगीताचा थरार अतिशय उत्तम जमवून आणला आहे. भावाच्या पिक्चरसाठी सोनू निगमनं गाणं म्हटलंय, याचाच मोठा आनंद आहे. ते त्यानं भारीच म्हटलंय. प्रत्येक गाण्याचे बोल आशयपूर्ण आणि चित्रपटाच्या कथेला साजेसे, पुढे घेऊन जाणारे आहेत. पोलीस अधीक्षक सन्मित्र महेश सरतापे यांचे तुझ्या चित्रपटात सुखद दर्शन झाले. त्यांना पाहूनही छान वाटलं. तुमच्यासारखे मित्र व्यवस्थेमध्ये सजग मानवतावादी भावनेतून योगदान देत आहेत, आपल्या परीघाबाहेर जाऊन कला, संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक न्याय, प्रबोधन जाणिवा विकसित करण्यासाठी काम करत आहेत, याचाही खूप अभिमान वाटतो.
बऱ्याच वर्षांनी असं कोणाला तरी पत्र लिहीतोय. अलीकडं एका शब्दाच्या अगर ओळीच्या पलिकडं आपण मित्राला सोडूनच दे, आईबापालाही लिहीत नाही. ते तुला लिहीतोय. फार संवेदनशीलतेनं तू ‘सुधागड ०७’ तयार केला आहेस. त्याला महोत्सवीय यश मिळेलंच. पण, चित्रपटगृहांतूनही त्याला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. आपला मराठी प्रेक्षक तितका सुजाण आणि चोखंदळ निश्चितच आहे.
दिल्पा, पदार्पणातच तू ठोकलेल्या शड्डूचा आवाज चित्रपटसृष्टीत निश्चितपणानं घुमणार आहे, याची खात्री बाळग. जिकलाईस भावा...
तुझाच,
आलोक

















