मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

कंघा बुढा हो गईल बा..!

माझ्या लाडक्या राऊंडरला 'एआय'नं अशी छान बॅकग्राऊंड दिलीय.


गेल्या ३५ वर्षांची त्याची माझी साथ... मी जिथे जाईन, तिथे या सर्व काळात तो माझ्यासोबत आहेच. त्याचा मला आणि माझा त्याला स्पर्श झाला नाही, आम्ही एकमेकांकडे पाहिले नाही, असा एकही दिवस गेला नाही. माझ्या बऱ्यापैकी दिसण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा. मात्र, आता त्याच्या आयुष्याची उतरण सुरू झालीय. त्याचे केस आता पिकू लागलेत, गळू लागलेत, विरळ होऊ लागलेत. त्याच्या म्हातारपणाच्या चाहुलीने जीव अस्वस्थ झालाय. त्याची जागा घेईल, असा दुसरा जोडीदार मला यापुढील काळात लाभेल की नाही, अशी शंका अस्वस्थता वाढवतेय. त्याच्यापेक्षा भारी मिळतील कदाचित, पण त्याच्यासम भेटण्याची शक्यता फारच कमी वाटते आहे. त्यामुळेच त्याच्या वृद्धापकाळाने मी अधिक अस्वस्थ झालो आहे. त्याची साथसंगत जितकी लांबविता येईल, तितकी त्याचा प्रेमभराने सांभाळ करून वाढविण्याचा माझा प्रयत्न आहेच, पण विरहाचा तो दिवस कधी तरी येणारच, हा विचार क्लेषकारक आहे.

मित्र-मैत्रिणींनो, १९९२ साली माझ्या आयुष्यात आलेल्या राऊंडर-कम्-कंगव्याच्या दुराव्याच्या असहनीय कल्पनेपोटी वरील वाक्ये मनात येताहेत. आताच्या जेन-झी किंवा त्या आधीच्या एक-दोन पिढ्यांमध्ये मूव्ह-ऑनचा ट्रेंड असल्यानं त्यांना आम्हा एक्सवाल्यांची ही तगमग लक्षात येणार नाही. एका नजरेमध्ये प्रेम आणि एखाद्या वॉट्सअप मेसेजवर ब्रेकअप आणि पुन्हा भेटून ते ब्रेकअप सेलिब्रेट करण्याच्या काळामध्ये आम्हा गयागुजऱ्या पिढीची भावनिक गुंतवणूक पराकोटीची असते, याची कदाचित कल्पना तुम्हाला येणार नाही. अगदी प्रियकर-प्रेयसी ही खूपच मोठी गोष्ट झाली, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये (कदाचित विनाकारणही) जीव गुंतवून बसण्याची, जीव लावण्याची सवय (किंवा खोड) हा आमच्या पिढीचा अंगभूत गुण असावा, असं वाटतं. त्या काळात प्रेमात यशापेक्षा प्रेमभंगाचंच शल्य वाट्याला अधिक येत असे, त्यावेळी तू नहीं तो और सही, म्हणत बसण्यापेक्षा त्या प्रेमभंगाचं दुःख कुरवाळत बसण्यात, तिच्या अगर त्याच्या आठवणींत रमण्यात आम्हाला अधिक आनंद (?) वाटे. त्या जखमेवरची खपली सतत काढून त्या बोचऱ्या वेदना पुनःपुन्हा अनुभवण्यामध्ये अधिक सुख वाटे. तसंच आयुष्यात आलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या भौतिक-अभौतिक गोष्टींमध्येही जीव गुंतवण्यात आम्हाला कोण आनंद असे. म्हणजे सायकलच्या कीचेनपासून ते अखंड सायकलपर्यंत, एखाद्या शर्टापासून ते अगदी कंगव्यापर्यंत!

तर, अशाच माझ्या आयुष्यात एका अवचित क्षणी दाखल झालेल्या कंगव्याची ही गोष्ट. आजकाल मुलांचे केस लहानपणापासूनच लांब ठेवण्याकडे बहुतांश आईवडिलांचा कल दिसून येतो. पण, हमारे जमाने में... बाबा दर पंधरा दिवसांनी केस कापायला घेऊन जायचेच. कागलमध्ये असताना शिवाजी आणि शहाजी या बंधूंकडे तर नंतर निपाणीत नामांकित नामा यांच्याकडे... म्हणजे अगदी कसाबसा भांग पडेल, इतकेच, केस डोईवर असत. त्यामुळं केस लांब वाढवण्याचं एक प्रकारचं ऑब्सेशन मनात होतं. पण, धाडस होत नव्हतं. अखेरीस नववी-दहावीच्या टप्प्यावर अभ्यासाचं कारण पुढं करून पंधरा दिवसांचं कटिंग महिनाभरापर्यंत लांबवण्यात यश मिळवलं. आता या वाढत्या केसांची निगा राखायची तर एखादा राऊंडर हाताशी असावा, अशी भावना मनात मूळ धरून होती. त्यावेळी निपाणीत नव्यानं सुरू झालेल्या जनता बझारमध्ये एका ट्रेमध्ये मला हवा तसा राऊंडर दिसलाही. पण, इतर कंगवे एक-दोन रुपयांना मिळत असताना सतरा रुपये ही त्याची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळं बाबांना विचारायचं धाडस होत नव्हतं. असेच अनेक दिवस गेले.

त्यानंतर झालं असं की, बाबांना जोधपूर-राजस्थानला २१ दिवसांच्या रिफ्रेशर कोर्सला जायचं होतं. त्यामुळं त्या कालावधीत घरी लागणारं वाणसामान तसंच इतर घरखर्चासाठी बाबांनी काही रक्कम माझ्याकडं देऊन ठेवली. आईची शाळा कागलला असल्यामुळं तिला अप-डाऊन करावं लागत असे. त्यामुळं तिला घरी यायला उशीर होईल. तशात अनुपही लहान होता. त्याचं आजारपण, दवाखाना कधीही उद्भवत असे. असा सारा विचार करून बाबांनी ही खर्चाची जबाबदारी माझ्याकडं सोपवलेली. मी सुद्धा अगदी इमानदारीत खर्च केलेल्या प्रत्येक पै न पैचा हिशोब एका डायरीत अगदी दिवसनिहाय मांडून ठेवत असे. बाबांचा परत येण्याचा दिवस जवळ आला, तसा त्या पैशातून थोडा स्वार्थ साधण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि १९९२ मधल्या फेब्रुवारीमध्ये जनता बझारमधला १७ रुपयांचा पॉलिश्ड लाकडी चौकोनी मुठीचा तो राऊंडर माझ्या वाणसामानासोबत घरी आला. आणि हो, आपण इमानदारीत त्याची नोंद हिशोबात केली सुद्धा बरं! बाबा परतल्यानंतर त्यांच्यासमोर हिशोबाची वही सादर केली, शिल्लक रक्कम त्यांच्या हाती परत दिली आणि या राऊंडरच्या खरेदीची बाबही त्यांना सांगितली. त्यावर त्यांनी १७ रुप्पयाचा कंगवा!’ एवढीच प्रतिक्रिया दिल्याचं आठवतंय. बाकी काही बोलले नाहीत. ते समाजशास्त्राचे असल्यामुळं असावं, पण पोर आता वयात येतंय, अशा गोष्टी होणार, हे त्यांनी गृहित धरलं असावं.

तर, अशा तऱ्हेनं हे राऊंडर महोदय, माझ्या आयुष्यात दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत माझ्या केशभूषेची समग्र जबाबदारी त्यांनी एकहाती लीलया पेललेली आहे. आजवर आयुष्यात खोबरेल तेलाखेरीज इतर कुठलंही प्रसाधन मी वापरलेलं नाही. मात्र, आंघोळीनंतर पहिली केशभूषा या राऊंडरनं केल्याशिवाय मला केस विंचरल्यासारखं वाटतच नाही. गेली पस्तीसेक वर्षे हा राऊंडर माझा साथीदार म्हणून माझ्यासोबत सर्वत्र संचारकर्ता आहे. पुण्याला आयआयटीच्या क्लासला गेलो, तिथं सोबत होताच, कोल्हापूरला हॉस्टेलवर माझ्यासह अनेक मित्रमंडळींच्या डोक्यावर याचा मायेचा हात फिरलेला आहे. मुंबईला गेलो, तिथेही हा सोबत होताच, पुन्हा आता करवीरनगरीतही सोबत आहेच. माझ्या अगदी एखाद्या दिवसाच्या दौऱ्यामध्येही हा मला सोबत लागतोच. त्याशिवाय, अस्वस्थ व्हायला होतं.

मध्ये एकदा सम्यकच्या हातून पडून त्याच्या मुठीचे दोन तुकडे झाले. पण तोवर फेव्हीक्विक नावाचं जालीम अडेजिव्ह बाजारात आलेलं होतं. त्यामुळं लगोलग त्याची मलमपट्टी केली आणि पुन्हा तंदुरुस्त केलं याला. आणि हा माझा सेवेकरी पुन्हा सेवेसाठी सज्ज झाला.

आता मात्र, त्याचे डार्क ब्राऊन केस हळूहळू रंग सोडू लागले आहेत, ग्रे होऊ लागलेत. काही मोडून पडू लागलेत, तर काही मुळातून निसटू लागले आहेत. प्रत्येक गोष्टीला अंतःकाळ हा असतोच, या कंगव्यालाही तो नियम लागू आहेच. केवळ किंमतीवरुनच मोल करायचं, तर त्याच्यावर खर्च केलेले १७ रुपये कधीच फिटलेत. पण, मोहाचं काय करायचं? बाजारात अलिकडच्या काळात मी आता त्याला त्याच्यासारखा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक ब्रँडेड कंपन्यांचे भारीभारी राऊंडर बाजारात आहेत. त्यातला माझ्या बायको-मुलीकडंही आहे. पण, याच्यासारखा राऊंडर मात्र मला कुठं मिळत नाहीय, हे मात्र खरं! आताच्या राऊंडरचे ब्रिस्टल्स एकदम खरखरीत, डोक्याच्या त्वचेला घासून काढणारे आणि मग केसांना वळण लावणारे असतात. हा मात्र पहिल्यापासूनच अगदी हळुवार. कधीही खरखर नाही की रखरख. एकदम छानपैकी इमानेइतबारे आपलं काम करणारा! आता त्याच्या वयोमानाप्रमाणं तो निरोप घेण्याच्या अवस्थेकडं वाटचाल करतो आहे, पण त्याच्या आयुष्याचं हे अंतिमपर्व जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न मी करतोय- कदाचित आणखी काही वर्षे तरी!

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा