![]() |
| ('दै. सकाळ'चे ६ मे २०२६ रोजीचे संपादकीय पृष्ठ) |
सहा मे हा दिवस माझ्यासाठी नेहमीच शोकदिन राहिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा स्मृतिदिन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या परंपरेत वाढलेल्या माणसासाठी केवळ स्मरणाचा नव्हे; तर, महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतानाच सामाजिक न्याय, समता आणि विवेक या मूल्यांना जागवण्याचाही दिवस असतो.
या दिवसाला आता आणखी एका वेदनेची किनार
लाभली आहे. कालच्या ६ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ‘सकाळ’ उघडला. पहिलं, तिसरं पान पाहून झालं
अन् संपादकीय पान उघडलं. या पानावर दररोज पहिल्यांदा ब्रिटीश नंदी यांचं ‘ढिंगटांग’ वाचायचं,
त्यानंतर लगेच अग्रलेख पाहायचा अशी सवय- अनेक वर्षांपासूनची! या दिवशी मात्र नेहमीच्या जागी अग्रलेख दिसला
नाही, लेआऊटही बदललेला. ढिंगटांगही न वाचता पुढची सगळी पानं एकदा, दोनदा नव्हे,
तीनदा उलटीपालटी करून पाहिली. अग्रलेख कुठेच नाही. लेआऊट असा की, अग्रलेख चुकून
राहिला असावा अगर मागे ठेवला असावा, असं दिसत नव्हतं. खूप अस्वस्थ वाटलं. ज्या
वृत्तपत्रामध्ये मी घडलो, मनापासून काम केलं, माझ्या यशाचं श्रेय निःसंशय
ज्या दैनिकाचं; त्या दैनिकामध्ये अग्रलेख येणे बंद होणं, हे माझ्या अस्वस्थतेमागील
मोठं कारण.
कदाचित व्यवस्थापनाचा हा निर्णय
भविष्यात अनेकांसाठी ‘दिशादर्शक’ही ठरेल; पण,
आज तरी अग्रलेख वाचणाऱ्यांसाठी ते धक्कादायक ठरलं आहे. कदाचित पहिल्या
दृष्टीक्षेपात ही बाब काहींना किरकोळही वाटेल. “अग्रलेख किती लोक वाचतात?” असा
प्रश्नही उपस्थित केला जाईल. आम्ही विद्यार्थी असतानाही हे प्रमाण २ ते ५ टक्के
इतकंच सांगितलं जायचं. पण तरी अग्रलेख म्हणून त्याचं स्थान शीर्षस्थ होतं. हा
प्रश्न वाचकसंख्येचा नाहीच मुळी; प्रश्न वृत्तपत्राच्या आणि अधिक
स्पष्टपणे सांगायचं तर संपादकाच्या आत्मभूमिकेचा असतो.
एखाद्या दैनिकाचा अग्रलेख त्याची
वैचारिक धडधड असते. तो त्या वृत्तपत्राचा विवेक असतो. त्या माध्यमाची भूमिका, त्याची
सामाजिक जाणीव, त्याचा काळाशी संवाद — हे सगळं
अग्रलेखातून अभिव्यक्त होत असतं. तुम्ही कोणती भूमिका घेता याहीपेक्षा तुम्ही
भूमिका घेता, ही गोष्ट लाखमोलाची असते. कारण ती भूमिका वाचकांच्या संवेदनशीलतेला
सतत जागं ठेवण्याचं काम करत असते.
अग्रलेखाच्या जागेकडं केवळ एक ‘स्पेस’ म्हणून
पाहणं खचितच योग्य नव्हे. जाहिरातीची जागा अडवणारे ठिकाण म्हणून त्या जागेवर तिरका
डोळा ठेवणं, हेही रास्त नव्हे. तिच्याकडे फक्त कमर्शियल दृष्टिकोनातून पाहणं
म्हणजे पत्रकारितेच्या मूलभूत आत्म्यालाच नाकारणं होय.
अर्थात, हा अग्रलेख
न छापण्याचा निर्णय नेमक्या कोणत्या भूमिकेतून घेतला गेला, याविषयी
वाचक म्हणून आपण सारेच अनभिज्ञ आहोत. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही.
तो व्यवस्थापनाच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग असू शकतो. हेही खरं आहे की, आजचा
एखादा प्रभावी व्यंगचित्रकार अनेकदा संपादकापेक्षाही कमी शब्दांत अधिक नेमकी
भूमिका मांडतो. पण म्हणून अग्रलेखाची जागाच व्यंगचित्राला देणं आणि संपादकीय
परंपरेला हद्दपार करणं, स्वीकारार्ह वाटत नाही. पूर्वी हुशार
प्रधानाच्या जागी राजानं चतुर विदुषकाला नेमल्याच्या गोष्टी सांगितल्या जात, तसं काहीसं
झालं हे!
आजच्या काळात भूमिका घेण्याची गरज अधिक
तीव्र आहे. समाजात गोंधळ, ध्रुवीकरण, दिशाभ्रम
करणाऱ्या अपमाहितीचा महापूर वाढत असताना विवेकी मार्गदर्शनाची गरज वाढलेली आहे.
अशा वेळी जवळपास शतकभराची परंपरा असलेल्या वृत्तपत्राने अग्रलेख बंद करणं, ही केवळ
संपादकीय बदलाची बाब नाही; तर एका वैचारिक संस्कृतीच्या ऱ्हासाची
नोंद आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांच्यावर अर्धवट, फेक, बनावटी
माहितीचा ओघ प्रचंड वाढत असण्याच्या काळात प्रिंट मीडियाकडं विश्वासार्ह माहितीचा
स्रोत म्हणून आशेनं पाहिलं जातं. त्यामुळं आज वाचकांना वस्तुनिष्ठ माहिती आणि
त्याआधारे योग्य मतनिर्मितीसाठी त्यांना मदत करणं, हे फार मोठ्या जबाबदारीचं काम
मुद्रित माध्यमांकडं आहे. अशा काळात अग्रलेख बंद होणं वेदनादायी आहे.
आम्ही पत्रकारितेत काम करत असताना
उद्याचा अग्रलेख कोणत्या विषयावर असावा, यावर
संपादकीय बैठकीत गंभीर चर्चा व्हायची. कोणती बातमी केवळ ‘न्यूज’ न राहता ‘भूमिका’
मागते, याचा विचार केला जायचा. उद्याच्या अग्रलेखाच्या
शक्यतेतूनच एखाद्या वृत्तपत्राचा वृत्तनिवडीचा दृष्टिकोन तयार होत असे. आमच्यासारख्या
उदयोन्मुख पत्रकारांसाठी तो एक जिवंत वस्तुपाठ असायचा. अग्रलेख
लिहीण्याच्या प्रक्रियेत “बिटविन द लाइन्स” आणि “बियॉन्ड द लाइन्स” मांडणी करत
भविष्याचा वेध घेत वाचकांची मनोभूमिका त्या दृष्टीनं तयार करणं हे संपादकाचं खरं कसब.
त्या दृष्टीनं अग्रलेखाचं महत्त्व अनमोल. तेव्हापासूनच एडिट पेज, ऑप-एड पेज
वाचण्याची सवय आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.
माध्यमे आज कोणत्या प्रकारच्या ट्रांझिशन
फेजमधून जात आहेत, हे काही लपून नाही. कालच्याच पोस्टमध्ये ‘मीडिया विस्तारतोय, पत्रकारिता आक्रसतेय...’ हे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचं
स्टेटमेंट दिलं आहेच. त्यामुळं आपल्या विस्तार प्रसरणाच्या प्रक्रियेमध्ये
पत्रकारितेचा अवकाश संकुचित करण्याची आवश्यकता नाही. पण तरीही ते घडते आहे. माध्यमे
आज कोणाची ना कोणाची बाजू उचलून धरतात, हे वास्तव आहे. तटस्थ, त्रयस्थ किंवा
संतुलित भूमिकांचा काळ मागे पडलाय. पण, भूमिका घेण्याची आपली हक्काची जागा आज आपण
स्वतःहून गमावण्याचे कारण नाही. मात्र ते घडलं आहे. विवेकशील समाजाला दिशादर्शनाची
गरज असण्याच्या काळात अग्रलेखाच्या अस्तित्वाला नख लावलं जाणं, वेदनादायक आहे.
पत्रकारितेच्या अभ्यासात आणीबाणीच्या
काळातील एक प्रसंग विशेष आवर्जून सांगितला जायचा. काही वृत्तपत्रांनी आणीबाणीचा
आणि विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा
कोरी ठेवून अंक प्रकाशित केले. हजारो शब्दांनी जेजो विरोध नोंदविता आला नसता, तो नोंदविण्याचं
काम त्या कोऱ्या अग्रलेखांनी केलं होतं. ती कोरी जागा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
गळचेपीविरुद्धची सर्वात प्रभावी संपादकीय भूमिका ठरली. आज असे
आदर्श इतिहासजमा झाले आहेत.
इतर दैनिकंही ना-अग्रलेखाच्या दिशेनं मार्गक्रमण करतील की काय, अशीही शक्यता वाटते. म्हणूनच आज केवळ अग्रलेखाच्या नसण्याचं दुःख नाही; तर, एखाद्या वृत्तपत्राचा संपादक ओळखला जातो, तोच मुळी अग्रलेखावरुन आणि त्यामध्ये त्याने मांडलेल्या भूमिकेवरुन अन् भूमिकेसाठी! आज जर अंकात अग्रलेखच नसेल, तर संपादकाचं त्या वृत्तपत्रामधील अस्तित्व काय? म्हणजे ही घटना केवळ अग्रलेखाचं अस्तित्वलोपन नाही, तर वृत्तपत्र जगतातील संपादकाच्या स्थानाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. भूमिका नसणारा संपादक हा मग या क्षेत्रातील केवळ कन्टेन्ट मॅनेजरच असेल काय, अशीही चिंता भेडसावते. माझी हळहळ अन् अस्वस्थता ही त्यापायीच आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा