Dr. Randhir Shinde लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dr. Randhir Shinde लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

"कोण नामदेव ढसाळ?"

पुस्तकाचे मुखपृष्ठ


डॉ. रणधीर शिंदे


काही दिवसांपूर्वी नामदेव ढसाळ यांच्यासंदर्भातील चित्रपट सेंन्सॉरसाठी जेव्हा सेंन्सॉर मंडळापुढे आला, त्यावेळी सेंन्सॉर मंडळाच्या एका सदस्याने "कोण नामदेव ढसाळ?" असा प्रश्न विचारला आणि राज्यामध्ये मोठा गहजब उडाला.
सत्तरच्या दशकामध्ये केवळ राज्यातच नव्हे; तर देशभरात दलित पॅंथरच्या माध्यमातून आपल्या सामाजिक चळवळीच्या कार्याचा मोठा ठसा निर्माण करणाऱ्यांमध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे या पॅंथर चळवळीचे नेतृत्व करण्यामध्ये आघाडीवर असणाऱ्यांत नामदेव ढसाळ यांचे नाव आघाडीवर होते. प्रज्ञावंत राजा ढाले, ज. वि. पवार यांच्याबरोबरीने दलित पॅंथर चळवळीला तिची ओळख, अधिष्ठान आणि दिशा प्राप्त करून देण्यामध्ये नामदेव ढसाळ यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण ठरले.
रस्त्यावरची लढाई करण्यामध्ये जसे ढसाळ आघाडीवर होते, त्याचप्रमाणे साहित्यिक सांस्कृतिक चळवळ करण्यात, घडविण्यात; विशेषतः दलित, शोषित आणि वंचित वर्गाला साहित्याच्या वर्तुळामध्ये प्रकर्षाने इंट्रोड्यूस करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजे ढसाळांनी! त्यांच्या 'गोलपिठा'नं मराठी साहित्य विश्वाला अस्वस्थ करून सोडलं. मोठी खळबळ उडवली. आजवर कधीही साहित्याच्या परिघावर दूर दूरपर्यंत स्थान न मिळालेली माणसं, त्यांचं दुःख, त्यांचं दैन्य, त्यांचा आक्रोश आणि त्यांचे शोषण या साऱ्याच गोष्टींना गोलपिठानं साहित्याच्या मुख्य प्रवाहात ठसठशीत स्थान प्राप्त करून दिलं. विशेष म्हणजे आजवर मराठी साहित्यानं कधीही ऐकली, बोलली नाही आणि स्वीकारली सुद्धा नव्हती, अशी त्यांची भाषा सुद्धा ढसाळांनी मोठ्या आक्रमकतेने मांडली. त्या भाषेलाही तिचं स्थान, तिचा उद्गार आणि सन्मान प्राप्त करून दिला. ही फार मोठी कामगिरी आहे त्यांची! त्यानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, तुही यत्ता कंची, गांडू बगीचा, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे अशा एकापाठोपाठ एक आलेल्या कवितासंग्रहांनी मराठी साहित्य विश्वाला एका अनोख्या आणि दुर्लक्षित विश्वाचा परिचय करून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कवितांचा संग्रह असणारा 'तुझे बोट धरून चाललो आहे मी' हा फार महत्त्वाचा कवितासंग्रह सुद्धा ढसाळांनी लिहिला. अशा या चौफेर सामाजिक, साहित्यिक कामगिरी बजावणाऱ्या नामदेव ढसाळांविषयी 'कोण नामदेव ढसाळ?' असे विचारण्याचे धाडस किंवा अनभिज्ञता सेन्सॉर बोर्डाचा सदस्य करू शकतो, अगर दाखवू शकतो याचं कारण म्हणजे ढसाळ यांना या समाजाने कधीही मुख्य प्रवाहातील साहित्यिक अगर कार्यकर्ता म्हणून स्वीकारले नाही, हेच होय.
खरं म्हणजे ढसाळांची साहित्यिक प्रतिभा ही कोणत्याही जागतिक दर्जाच्या कवीला साजेशी आहे आणि त्याची प्रचिती त्यांनी त्यांच्या हरेक साहित्यिक कृतीमधून दिलेली आहे. तथापि जातीच्याच चष्म्यातून आणि तथाकथित अभिजनवादी साहित्यिक नजरेतूनच साऱ्या साहित्यिकांचे परीक्षण, समीक्षण, निरीक्षण आणि परिशीलन करण्याची सवय लागलेले भारतीय साहित्यिक वर्तुळ आणि त्यांच्याच नजरेतून समग्र साहित्य व्यवहाराकडे पाहण्याची सवय लागलेले वाचक सुद्धा ढसाळांच्या या उपेक्षेला कारणीभूत आहेत. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 'समग्र नामदेव ढसाळ' असे ढसाळांच्या साहित्याचे दोन संपादित खंड प्रकाशित केले असले, तरी त्यांच्या साहित्यकृतींच्या पलीकडे ढसाळ यांचे जीवन व कार्य नेमके कशा स्वरूपाचे होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या साहित्यिक वाटचालीची, त्यांच्या सामाजिक कार्याची जडणघडण कशा पद्धतीने झाली, हे सांगणारे पुस्तक मात्र आले नव्हते. नामदेव ढसाळांची पुस्तके आली; मात्र त्यांच्याविषयी पुस्तकांची साहित्यिक वर्तुळामधील असणारी वानवा लक्षात घेऊन भारतीय साहित्य अकादमीने 'भारतीय साहित्याचे निर्माते' या मालिकेअंतर्गत नामदेव ढसाळ यांच्याविषयीचे एक सर्वंकष चरित्रकार्यात्मक पुस्तक आणले आहे. महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचे लेखन आमचे सन्मित्र, मराठी साहित्याचे एक महत्त्वाचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.
डॉ. शिंदे यांनी अवघ्या १०० पृष्ठांच्या या पुस्तकामध्ये नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाटचालीची अतिशय थोडक्यात पण साद्यंत मांडणी करण्याचा, वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि कार्य, ढसाळांचे कविताविश्व, त्यांचे कादंबरी लेखन, त्यांचे गद्य लेखन अशा सर्वच पैलूंचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आहे. १९७० च्या दशकापासून ते एकविसाव्या शतकाचे पहिले दशक या साधारण अर्धशतकीय वाटचालीच्या कालावधीत ढसाळांनी जी काही चळवळ केली, जे काही साहित्यिक योगदान दिले, त्याचा वेध डॉ. शिंदे यांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे; आणि 'कोण नामदेव ढसाळ?' हे ज्यांना खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे आहे, अशा सर्वच साहित्यिक अभावग्रस्तांसाठी आणि जिज्ञासूंसाठीही डॉ. शिंदे यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. ढसाळ यांच्या प्रज्ञेची विलक्षण झेप, त्यांच्या काव्यशैलीतील कमालीची विविधता, त्यांच्या कविता आणि साहित्यामध्ये आढळणारा विविध प्रकारच्या बोलींचा नवा सहजाविष्कार, कवितेचा खुला रूपबंध आणि त्या कवितेला त्यांनी प्रदान केलेली लवचिकता, त्यांच्या कवितेमधील प्रसरणशीलता या सर्वांचाच अतिशय महत्त्वपूर्ण आणि नेमका वेध डॉ शिंदे यांनी या पुस्तकामध्ये घेतला आहे. ढसाळांची कविता ही भारतीय काव्य परंपरेतील एक श्रेष्ठ कविता असल्याचे त्यांनी यामध्ये दाखवून दिले आहे. ढसाळ यांच्या कवितेने परंपरेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. मराठी साहित्यविश्वासमोर सर्वहारा वर्गाचे दुःख आणि शोषणाची अस्वस्थ चित्रे त्यांनी आपल्या साहित्यातून रेखाटली, प्रदर्शित केली. आंबेडकरी जीवनदृष्टी, चिंतनशीलता, काव्यात्मता, विद्रोही काव्य भाषा, दीर्घ कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृतज्ञतापूर्ण गुणगान आणि मनोगत कविता ही वैशिष्ट्ये सुद्धा ढसाळ यांच्या कवितेमधून आढळतात, असे शिंदे दाखवून देतात. एकूणच जात आणि वर्ण जाणिवांचा सखोल आणि सर्वांगीण आविष्कार घडविणारे, स्त्रीविषयक उन्नत भावाची चित्रे रेखाटणारे, नर-नारीच्या समतेची आणि विश्वबंधुतेची प्रचिती देणारे त्याचप्रमाणे वंचित आणि आंबेडकरी समूहाच्या अपरिचित अनुभव प्रदेशाचे निर्भीड चित्र रेखाटणारे ढसाळ हे त्यांच्या साहित्यातून मानवतावादाचा विशाल आणि व्यापक पट मांडताना दिसतात, असे सुस्पष्ट निरीक्षणही डॉ. शिंदे नोंदवितात. विषमतेविरुद्धची जाणीव ढसाळ यांनी आपल्या साहित्यामधून सातत्याने प्रकट केली आणि या जाणिवांचे टोकदारपणे प्रदर्शन करण्यातही कोठे उणेपण येऊ दिले नाही. सातत्याने शोषित, वंचितांच्या वेदनांचा हुंकार ते अखेरच्या क्षणापर्यंत भरत राहिले. सारे काही समष्टीसाठी असे मांडत असताना सुद्धा या जाणीवांना त्यांनी कधीही बोथट होऊ दिले नाही, हे ढसाळ यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. हे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे करण्याचे काम डॉ. शिंदे यांचे हे पुस्तक करते. त्यामुळे "कोण नामदेव ढसाळ?" असा प्रश्न पुन:पुन्हा सामोरे आणणाऱ्या आणि ज्यांच्यासमोर असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे, अशा सर्वांसाठीच त्या प्रश्नाचे उत्तर देणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे डॉ. रणधीर शिंदे यांचे "भारतीय साहित्याचे निर्माते - नामदेव ढसाळ" हे पुस्तक होय.

मंगळवार, ५ मार्च, २०२४

‘घरंदाज सावली’ अखेर प्रकाशात आली...




‘हॅलो, रजिस्ट्रार स्पिकिंग... माझ्याकडे ‘अमूक’ नावाचा विद्यार्थी आला आहे... चांगला लायक आहे, शिकण्याची उमेद आहे. त्याला मी अॅडमिशन दिलं आहे. त्याला आपल्याकडं विभागात पाठवते. त्याचा फॉर्म वगैरे भरून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करा.’... ‘त्याला कमवा आणि शिका योजनेत सहभागी करून घेतलंय, प्रवेश द्या, खोली द्या.’... ‘भवनमधली प्रवेश क्षमता संपली असली तरी, या विद्यार्थ्याची आरोग्य केंद्रातल्या वाढीव विद्यार्थ्यांबरोबर राहायची सोय करा. शिकू द्या त्याला.’...

वर्तमानात एखाद्या विद्यार्थ्यालाच नव्हे, तर विद्यापीठाच्या कुलसचिवांना देखील स्वप्नवत आणि धाडसी वाटावं, असं हे विधान साधारण साठेक वर्षांपूर्वी एका महिला कुलसचिवांच्या तोंडून अनेक गरीब, होतकरू आणि उच्चशिक्षणेच्छु विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आलं आणि त्या विधानावर अनेकांची जीवननौका तरली, नव्हे महदअंतर कापून त्यांनी मोठमोठी पदे, प्रतिष्ठा मिळवली आणि आपल्या या मातेप्रती सदैव कृतज्ञता मनी बाळगली.

शिवाजी विद्यापीठात रुजू झाल्यापासून किंबहुना विद्यार्थीदशेपासून या विद्यापीठाच्या सुरवातीच्या कालखंडातील कुलसचिव डॉ. उषा इथापे मॅडम यांच्याविषयी प्रचंड कुतूहल मनी होतं. त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रंही मी संकलित केली. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि दुसऱ्या कुलसचिव डॉ. उषा इथापे या दोघांनी प्रदीर्घ काळ शिवाजी विद्यापीठाची पायाभरणी करून या रोपाचा वटवृक्ष करण्याचं कार्य आपल्या हयातीत केलं. डॉ. आप्पासाहेब पवार यांना पितामह म्हटलं, तर डॉ. इथापे या इथल्या प्रत्येक घटकाच्या माता होत्या. इथापे मॅडमचं एक छायाचित्र माझ्या मनात कायमचं ठसलं आहे, ते म्हणजे विद्यापीठाचा ज्ञानदंड घेऊन त्या विद्यापीठाच्या अगदी सुरवातीच्या काळातील एका दीक्षान्त मिरवणुकीचं नेतृत्व करताहेत आणि सारे कार्यकारिणी सदस्य, कुलगुरू, प्रमुख पाहुणे आदी सर्व त्यांना ‘फॉलो’ करताहेत. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचं प्रशासकीय कामकाज जुन्या ओपल हॉटेलच्या इमारतीत चालायचं आणि तिथेच हा दीक्षान्त समारंभ झालेला. छायाचित्र पाहताक्षणी त्यांची आत्मविश्वासानं भारलेली बॉडी लँग्वेज आपल्या मनाचा ताबा घेते. डोक्यावरचा पदर घरंदाजपणाची ओळख देणारा, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रखर तेजही न लपून राहणारं. या तेजस्वितेनं शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार १९६६ ते १९८३ असा सुमारे १७ वर्षे  हाकला, त्याला आकार दिला. मात्र, त्यांच्याविषयी अन्य कोणतीही माहिती मला नव्हती. त्यांच्याविषयी अगदीच त्रोटक माहिती आणि तीही तुकड्या तुकड्यांत होती- जवळपास नसल्यासारखीच. मात्र, ही उणीव भरून काढणारं एक फार महत्त्वाचं पुस्तक हाती पडलं. मराठी अधिविभागातील आमचे सन्मित्र डॉ. रणधीर शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच त्यांनी संपादित केलेलं ‘घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी’ हे पुस्तक दिलं आणि माझ्या कुतुहलाचा विषय असणारं इथापे मॅडम यांचं जीवनकार्य मी गेल्या दोन दिवसांतच वाचून काढलं. सुरवातीला मला डॉ. रणधीर शिंदे यांनी हा एक महत्त्वाचा आणि अलक्षित व्यक्तीमत्त्वाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा प्रकल्प हाती घेऊन तडीस नेला, याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत आणि या कार्यासाठी प्रेरित केल्याबद्दल माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

मंगळवेढ्याच्या शब्दशिवार प्रकाशनानं २१६ पृष्ठांच्या या ग्रंथाची देखणी निर्मिती केली आहे. तसं हे काही इथापे मॅडम यांचा सलग चरित्रग्रंथ नाही. तर इथंही त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी आलेल्या किंवा त्यांच्या कार्याची कृतज्ञ जाणीव असणाऱ्या लोकांच्या मनोगतांतून त्यांचं आयुष्य बरंचसं आपल्यासमोर येतं. अगदीच चित्रासारखं नसलं तरी कॅलिडोस्कोपिक व्ह्यू तरी नक्कीच साकार होतो, हे या पुस्तकाचं यश. प्रस्तावना आणि स्वतः इथापे मॅडम यांच्या ‘दो स्मरण प्रसंग’ या लेखाखेरीज एकूण २६ व्यक्तींनी मॅडमविषयी इथं लिहीलंय, त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. या लेखकांत माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एस.एन. पठाण यांच्यासह शालिनीताई पाटील, चंद्रकुमार नलगे, डॉ. राजन गवस, डॉ. एस.एच. पवार, किसनराव कुराडे, डॉ. अरुण भोसले, डॉ. माया पंडित, विजय पाटील, निनाद शहा, प्रतिमा पवार, मानसिंगराव जगताप, कृष्णा इंगोले, जी.पी. माळी, सूर्यकांत जुगदर-पाटील, विजयसिंह पाटील, डॉ. सुनीलकुमार लवटे, राजेश पाटील, गजानन साळुंखे, विलास पोवार, अरुण साटम, महेंद्र शिंदे, रेखा नलवडे आणि रेखा शिंदे यांचा समावेश आहे. या लिहीणाऱ्यांतील बहुतांश जण मॅडमच्या कार्यकाळात विद्यार्थी म्हणून त्यांच्याशी संबंध आलेले, तर काही शिक्षक अन् काही नातेवाईकही आहेत.

ग्वाल्हेरच्या सरदार शिंदे घराण्यातून थेट आलेल्या इथापे मॅडम या राजघराण्यातील पहिल्या उच्च पदवीधर. हिंदी विषयातून त्यांनी पीएच.डी.चा प्रबंध सुद्धा स्वतंत्रपणे (विना-मार्गदर्शक) सादर केलेला. पुणे विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला पीएचडी धारक संशोधक. असं क्रांतीकारी शिक्षण घेऊन अखेरीस व्ही.टी. पाटील यांच्या कीर्ती कॉलेजद्वारा त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदापर्यंत प्रवास झाला आणि दोनच वर्षांत त्यांच्यावर कुलसचिव पदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली, ती त्यांनी अखेरपर्यंत प्रशासकीय कर्तव्यकठोरतेने आणि विद्यार्थ्यांप्रती मातृत्वभरल्या ममतापूर्णतेने निभावली. या पुस्तकांतल्या साऱ्यांच लेखांतून मॅडमची कर्तव्यकठोरता जितकी सामोरी येते, त्याहूनही अधिक त्यांची मातृहृदयी प्रतिमा अधिक झळाळून दिसते. त्यांच्या कारकीर्दीतली सारी मुलं त्यांना आईच्या जागी मानायची आणि त्याही या सर्व मुलांना आईच्या करारी आणि सहृदयी संस्कारी नजरेनं जपायच्या. त्या स्वतः मात्र विनापत्य होत्या, याला काय म्हणावं? विद्यापीठातील त्यांच्या कारकीर्दीची अखेर मात्र संघर्षपूर्ण पद्धतीनं झाली. आत्मसन्मानाची लढाई जिंकून त्यानंतरच त्यांनी पुन्हा पद स्वीकारणं नाकारलं, हे त्यांच्या फाईंटिंग स्पिरिटला आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या वृत्तीला साजेसंच होतं. दातृत्वतेज तर इतकं की अवयवदानाचा फारसा गाजावाजा नसण्याच्या काळात त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मृत्योपरांत देहदानही केलं.

या पुस्तकातून इथापे मॅडम यांचं चरित्र जसं समजतं, तसंच शिवाजी विद्यापीठाची जडणघडणही समजायला मदत होते. अनेक गोष्टी समजतात. आजही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विमान इमारतीत कंजारभाट समाजातील मुलांसाठी विद्यापीठ शाळा चालवित होतं, हे समजलं आणि अभिमानच दाटला मनी. आज आपण एक्स्टेंशनच्या गोष्टी करतो. पण त्या काळात वरून खाली असा शिक्षणाचा विस्तार करण्याचा विद्यापीठाचा हा प्रयत्न केवढा तरी स्तुत्यच होता. अशा अनेक गोष्टी इथं समजतात. इथापे मॅडमचं चरित्र तर इथं समजतंच, पण ज्या व्यक्तींनी त्यांच्याविषयी यात लिहीलंय, त्यांच्याही जडणघडणीचा, उभारणीचा असा तो कालखंड होता, ज्यामध्ये त्यांना इथापे मॅडमनी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आधार आणि उमेद दिलेली. त्यामुळं या चरित्रकारांचं चरित्रही इथं थोडंफार उलगडतंच. उदाहरणार्थ, चंद्रकुमार नलगे सरांचं विद्यापीठातलं योगदान आणि त्यांचं येथून पुनःश्च बाहेर पडणं, माया पंडित मॅडमचा विद्यापीठाच्या सेवेतील प्रवेश ते त्यांच्या विवाहाला इथापे मॅडमचा आशीर्वाद लाभणं अशा अनेक बाबी वाचायला मिळतात, ज्या एरव्ही पुन्हा त्यांच्या त्यांच्या आत्मकथनातच कधी तरी पुढं वाचता येऊ शकतील.

डॉ. अरुण भोसले सर म्हणतात, त्याप्रमाणं इथापे मॅडम या विद्यापीठाच्या यशोगाथेतील ‘उपेक्षित मानकरी’ असतील, तर गवस सर म्हणतात त्याप्रमाणं त्यांच्यावरील अन्यायाला कधीतरी वाचा फुटायला हवी आणि या रखरखत्या माळावरच्या सावलीला आपण नीट समजून घ्यायला हवं आहे.

शेवटी आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे डॉ. उषा इथापे मॅडम या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलसचिव होत्या, इथपर्यंत ठीकच आहे. पण, अलीकडच्या काळात साधारण २०१७ नंतरच्या काळात आंध्र प्रदेशात डॉ. आर.के. अनुराधा (श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटी), पश्चिम बंगालमध्ये नुपूर दास (नॉर्थ बेंगॉल युनिव्हर्सिटी) आणि आर. सुधा (मदुराई कामराज युनिव्हर्सिटी) या महिलांनी त्या त्या विद्यापीठांच्या ६० ते ८० वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारल्याच्या बातम्या वाचनात आलेल्या होत्या. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठांना जर महिला कुलसचिव लाभण्यास शतकभराचा कालावधी लागत असेल तर माझ्या अंदाजाने डॉ. उषा इथापे या केवळ महाराष्ट्रातील विद्यापीठांतीलच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठांच्या इतिहासातील कदाचित पहिल्या महिला कुलसचिव ठरतील. हा माझा अंदाज आहे. तो जर खरा असेल, तर विचार करा, इथापे मॅडमच्या कार्याचे मोल आणि त्यांनी जिथे घाम, रक्त आणि अखेरच्या काळात अश्रूही गाळले, त्या शिवाजी विद्यापीठाचे मोल कितीतरी पटीने अधिक वाढलेले असेल. त्या दृष्टीने मॅडमच्या जीवनचरित्राचा अधिक चिकित्सक संशोधकीय वेध घेण्याची गरज डॉ. रणधीर शिंदे यांच्या या संपादकीय कार्याने अधोरेखित केलेली आहे. त्यांना धन्यवाद!

 

पुस्तकाचे नाव: घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी

संपादक: डॉ. रणधीर शिंदे

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा

पृष्ठे: २१६

किंमत: रु. ३००/-