रविवार, १ जानेवारी, २०२३

डाटा ‘ड्रिव्हन’ सोसायटी...

('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'युगांतर' ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली. या पुरवणीसाठी लिहीलेला लेख सदर दिवशी कोल्हापूर व बेळगाव आवृत्तींमध्ये प्रकाशित झाला. हा लेख येथे माझ्या वाचकांसाठी 'दै. पुढारी'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)





मानवप्राणी आणि अन्य जनावरे यांच्यामध्ये जर कोणता फरक असेल, तर तो बुद्धीमत्तेचा. मानवाने उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर त्याची विचार करण्याची क्षमता विकसित केली आणि तो इतर प्राण्यांपेक्षा स्वतःचे वेगळेपण अधोरेखित करत गेला. अंतिमतः तो जणू काही या धरातलाचा आणि तिच्यावरील सर्व प्राणीमात्रांचा स्वामी असल्याप्रमाणे त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागला. मानवाची विचारक्षमता, त्याचा विवेक, त्याचा बुद्धीप्रामाण्यवाद यांचा विकास होत असताना मूलभूत भौतिक गरजांच्या पलिकडे त्याच्या बौद्धिक गरजा वाढल्या. भौतिक गरजा भागविण्यासाठीची अनेकविध साधने, संसाधने त्याने विकसित केली. जीवन सुखकर बनविले. राहणीमान आरामदायी झाले. मात्र, त्याचबरोबर त्याची माहितीची (डाटा) गरजही वाढत गेली.

मानवाच्या वाढत्या आशाआकांक्षांच्या बरोबरीने माहितीची गरज ही वाढतच गेली. पूर्वी राजेरजवाड्यांच्या काळात त्यांच्याभोवती माहितीचे वलय फिरत असे. धर्मसत्ता, राजसत्ता यांच्यामध्ये हे माहितीचे वलय अधिक प्रभावीपणे फिरविले जात असे. आपापल्या सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेवरील आपला अंकुश कायम राखण्यासाठी या माहितीचा वापर, गैरवापर केला जात असे. त्याचप्रमाणे सत्ता बळकावण्यासाठीही तिचा वापर सोयीने केला जात असे. व्यापारउदीम करणाऱ्यांनी अर्थात अर्थसत्तेनेही या माहितीच्या प्रसारामध्ये आपला वाटा उचललेला दिसून येतो. तथापि, त्या काळात अर्थसत्तेचे केंद्र हे राजसत्ताच होते.

माहितीचे स्रोत हे पूर्वी मौखिक स्वरुपाचे होते. लेखन ही काही ठराविकांची मक्तेदारी होती. इतरेजनांना अर्थात व्यापक बहुजन समाजाला त्यापासून वंचित राखून ही मक्तेदारी बळकट करण्यात आली होती. तथापि, मुद्रणकलेचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी पंधराव्या शतकात लावला आणि माहितीच्या प्रसारासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग जगाला खुला केला. सुरवातीच्या काळात बायबलच्याच प्रती प्रिंटींग प्रेसवर छापण्यात आल्या. अर्थातच, धर्मसत्तेने मोठ्या प्रमाणात या तंत्राचा लाभ घेऊन आपले पाठीराखे वाढविण्यासाठी त्याचा वापर केला. तथापि, हळूहळू इतरही लोकाभिमुख साहित्य छापले जाऊ लागले आणि टप्प्याटप्प्याने छपाईकलेचे लाभ सर्वसामान्य वाचक-लेखकांपर्यंत येऊ लागले.

पुढे सतराव्या शतकाच्या प्रारंभी जर्मनीतूनच वृत्तपत्र निघण्यास सुरवात झाली. माहितीच्या प्रसाराचे पुस्तकांपलिकडले आणखी एक नियतकालिकीय प्रकाशन जगाला ठाऊक झाले आणि ते त्याच्या याच गतिमान माहितीप्रसारणाच्या बळावर यशस्वीही झाले. पुढे औद्योगिक क्रांतीच्या युगामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात अनेकविध प्रयोग होऊ लागले. मानवी श्रमाच्या ऐवजी यंत्रांकडून काम करवून घेऊन अधिक दर्जेदार उत्पादने काढण्यावर भर देण्यात येऊ लागला. यंत्रे राक्षसी वेगाने काम करू लागली. उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला. या राक्षसाकडून अधिकाधिक उत्पादन करवून घ्यावयाचे, तर कच्च्या मालाची उपलब्धता तितक्याच मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक ठरू लागले. जगाच्या पाठीवर अशा ठिकाणांचा शोध घेऊन भांडवलदारी राष्ट्रे तेथे आपल्या वसाहती स्थापन करू लागल्या. सुरवातीला गोड बोलून, स्थानिकांशी करारमदार करून, ऐकले नाही तर हल्ले अन् हत्या करून किंवा थेट त्यांच्यावर राज्य प्रस्थापित करून ही कच्च्या मालाची गरज भागविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याचप्रमाणे तयार झालेला माल खपविण्यासाठी उत्तम क्रयशक्ती असणाऱ्या विभागांत आपल्या बाजारपेठा वसवून किंवा स्थानिक बाजारपेठा ताब्यात घेऊन व्यापार वाढविला. व्यापारातून नफेखोरीलाही ऊत आला. पण, औद्योगिक क्रांतीने जगामध्ये भांडवलदारांचे बस्तान निर्माण केले.

याच कालखंडात माहिती प्रसारणाचेही अत्यंत महत्त्वाचे शोध लागले. रेडिओ हा त्यातील महत्त्वाचा क्रांतीकारक शोध. जगाच्या एका कोपऱ्यातील आवाज दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन पोहोचविण्याची अचाट क्षमता असणारा हा शोध होता. त्याच टप्प्यावर तारयंत्राचा आणि पुढे टेलिफोनचाही शोध लागला. जगाच्या दोन टोकांवरील व्यक्ती एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकल्या. टपाल पाठवून ते पोहोचून पत्रोत्तराची प्रतीक्षा करण्याच्या कालखंडात हा प्रत्यक्ष संवादाचा क्षण मानवी इतिहासात किती महत्त्वाचा ठरला असेल, याची कल्पनाच करावी. इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात संशोधकीय प्रगती होत चालली तसा संवाद आणि दळणवळणाच्या साधनांचा शोध लागतच राहिला. दूरचित्रवाणी, गणनयंत्र, संगणक हे त्याचे पुढील महत्त्वाचे टप्पे.

भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारत हा सातत्याने या माहिती साधनांचा आपल्या प्रगतीसाठी वापर करीत आलेला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या द्रष्टेपणाने येथील टेलिकॉम क्षेत्राचा गतीने विकास झाला. भारतामध्ये दळणवळणाचे एक नवे युग अवतरले. तत्कालीन विरोधाला न जुमानता त्यांनी संगणकाचाही विविध क्षेत्रांत अवलंब केला. संगणकामुळे नोकऱ्या जातील, असा आक्षेप घेतल्या जाण्याच्या काळात संगणकाचा स्वीकारही केला आणि त्या माध्यमातून नोकरीच्या नव्या संधींचे अवकाशही खुले झाले. डिजीटल तंत्रज्ञानाने आणि जगात नव्याने अवतरलेल्या इंटरनेट युगाने जगभरात क्रांतीला सुरवात केलेली होती. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात या नवतंत्रज्ञानाचा देशाने खुल्या दिलाने अंगिकार केला आणि डिजीटल टेलिफोनीचे युग देशात सुरू झाले. खिशात अगर हातात घेऊन कुठेही फिरता येईल असा टेलिफोन, इतकेच मर्यादित महत्त्व असणाऱ्या मोबाईलने स्मार्टफोनपर्यंत वाटचाल केली आहे. माहिती देणाऱ्या माध्यमांचे मल्टीमीडिया आविष्करण अचंबित करणारे ठरले. इंटरनेटमुळे लोकांना वसुधैव कुटुम्बकम्चा प्रत्यय येऊ लागला. डिजीटल क्रांतीमुळे आविष्कृत झालेल्या आणि मोठ्या संख्येने वाढलेल्या विविध माध्यमांच्या आगमनामुळे माहितीचा प्रस्फोट झाला. वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज' म्हणता म्हणता या खेड्यात इतक्या वार्तांची, माहितीची देवाणघेवाण सुरू झाली की त्या माहितीचे करावे काय, हेच कळेनासे झाले. एकविसाव्या शतकामध्ये प्रचलित पारंपरिक प्रसारमाध्यमांपेक्षाही वेगळी अशी समाजमाध्यमे अस्तित्वात आली. सुरवातीला केवळ एकमेकांशी संपर्कासाठी असणाऱ्या या माध्यमांनी या शतकाच्या पहिल्या अवघ्या दोन दशकांतच इतकी क्रांतीकारक वाटचाल केली आहे की आता प्रत्येक सर्वसामान्य नागरिक जणू माध्यमकर्मी बनला आहे. प्रत्येकाकडे माहिती आहे आणि ती माहिती त्याला समोरच्याला द्यावयाची आहे. अशी जगभरात क्षणोक्षणी अब्जावधी संदेशांची, माहितीच्या तुकड्यांची देवाणघेवाण सुरू आहे. तथापि, या प्रचंड माहितीचे करावयाचे काय, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आज उभी ठाकली आहे.

शासकीय यंत्रणांना विकासाभिमुख निर्णय घेण्यासाठी, त्यात पारदर्शकता राखण्यासाठी लोकांची विविध प्रकारची माहिती हवी असते. ती डिजीटल माध्यमांद्वारे सर्वेक्षणांच्या द्वारे गोळा केली जाते. आजकाल डिजीटल स्वरुपात ही माहिती गोळा केली जाते. आपल्या आधार क्रमांकापासून ते बँक अकाऊंटपर्यंतची सर्व माहिती यात असते. ती गोपनीय असते, तोपर्यंत ठीक; मात्र, जर कोणी वाईट हेतूने ती चोरली (हॅक), तर त्याचे कितीही टोकाचे दुष्परिणाम होऊ शकतात. शासनाला माहिती देणे ठीक आहे. पण, आपण विविध कंपन्यांनाही आपली खाजगी माहिती देऊन ठेवलेली असते. उदाहरणार्थ, गुगल-पे सुविधा वापरणाऱ्यांनी आपल्या बँक अकाऊंटची सर्व माहिती गुगलला देऊन आपल्या क्रयशक्तीचा अंदाज कंपनीला देऊन ठेवलेला असतो. ही माहिती संबंधित कंपनी स्वतःच्या उत्पादनाच्या प्रचारासाठी अगर अन्य कंपनीच्या लाभासाठी वापरणारच नाही, याची खात्री कोण देणार?

आपल्याकडील माहिती देणे, इथपर्यंतच ही बाब मर्यादित राहिली असती, तरी चालले असते. मात्र, आता त्यापुढे जाऊन भांडवलदार समाजमाध्यम कंपन्यांसाठी त्यांचा प्रत्येक वापरकर्ता हाच एक माहितीचा तुकडा बनला आहे. त्याची माहिती हा त्यांच्या भांडवली मिळकतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या समाजमाध्यम कंपन्यांनी आता तुमच्या माझ्या हातातल्या स्मार्टफोनचा आधार घेत तुम्हाला आणि मलाच एक उत्पादन, विक्रयवस्तू बनवून टाकले आहे. म्हणजे आपण आता ग्राहक राहिलो नाही, तर या कंपन्यांनी आपल्याला चांगलेच गिऱ्हाईक बनविले आहे. आपण आपली सारी खाजगी, सार्वजनिक माहिती या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतो. आपल्याला विविध प्रकारचा डाटा हवा आहे, असे म्हणत असताना आपणही त्याचवेळी त्या डाटाचा एक तुकडा बनत चाललेलो आहोत, याचे भान आपण बाळगायला हवे.

खरे तर, प्रत्यक्षात डाटा ही गोष्ट वापरून विश्लेषण करणे, तिचा मानवी जीवनाच्या भल्यासाठी वापर करणे हे अपेक्षित असताना डाटा ड्रिव्हन सोसायटीच्या नावाखाली मानवतेलाच ड्राईव्ह करीत भांडवलदारांच्या दावणीला बांधण्यात तर येणार नाही ना, अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आज आपल्या सभोवती निर्माण झाली आहे. तिची जाणीव या निमित्ताने करवून घेणे हीच आजच्या काळातील अगत्याची बाब आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा