Online Education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Online Education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ जुलै, २०२०

कोविड, ऑनलाईन शिक्षण आणि आरोग्य



('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीचा वर्धापन दिन नुकताच (दि. ३० जून) झाला. या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

कोविड-१९ तथा कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरली. त्याचे अनेक परिणाम-दुष्परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. लाखो लोकांचे मृत्यू, तितकेच पॉझिटिव्ह रुग्ण निर्माण झाल्याने जगाचे जगण्याचे, एकमेकांशी जोडले जाण्याची स्वाभाविकता या साऱ्याच बाबी अभूतपूर्व स्वरुपाच्या बदलल्या आहेत. आपले जगणे आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, राहणार नाही. जगण्याला अनेक मर्यादा पडलेल्या आहेत, प्रादुर्भावाच्या भीतीच्या सावटाखाली येथून पुढले आयुष्य जाणार आहे. कधीपर्यंत? कोणीही सांगू शकत नाही.

साऱ्याच क्षेत्रांवर कोविड-१९ साथीचा परिणाम झालेला आहे, शिक्षणाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मानवाचा हौशी स्वभाव येथेही दिसून आला. ऑनलाईन शिक्षण आणि एकमेकांशी ऑनलाईन जोडले जाण्याचा आपण इतका अट्टाहास मांडला की, एरव्ही ज्या एप्रिल-मे मध्ये आपली मुलं सुटीचा आनंद घेत असतात, त्या कालखंडात ऑनलाइन शिक्षणाच्या प्रकारांना अक्षरशः ऊत आला. अगदी वात येईपर्यंत जो तो उठतो आणि ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली गोंधळ घालायला सुरवात करतो, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून आले. हे गैर आहे, असे माझे म्हणणे मुळीच नाही; मात्र, त्यामध्ये प्रोफेशनॅलिझमचा अभाव आणि ऑनलाईन माध्यमांची ताकद आणि मर्यादा यांचे भान न बाळगता काही तरी वेगळे करण्याची हौस भागवून घेण्याची प्रवृत्तीच अधिक दिसून आली, अगदी शिक्षकांमध्ये सुद्धा! अगदी एखाद-दुसरेच ऑनलाईन व्यासपीठ असे दिसून आले, जिथे खरोखरीच या माध्यमाचे गांभीर्य ओळखून शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येत होते.

या ठिकाणी आपण ऑनलाईन माध्यमांद्वारे मुलांना शिक्षण देत असताना अनेक गोष्टींचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि सरते शेवटी विद्यार्थी यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यातही ऑनलाईन माध्यमाद्वारे जेव्हा शिक्षण देण्याचा पर्याय आपण निवडतो, तेव्हा त्यामध्ये गुंतलेले माहिती तंत्रज्ञान आणि त्यासाठीची आर्थिक क्षमता ही विद्यार्थी-पालकांमध्ये आहे का, याचा विचारही खूप महत्त्वाचा ठरतो. भारतामध्ये अद्यापही अनेक घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत, ज्यांच्या मूलभूत गरजा अद्यापही भागविणे आपल्याला शक्य झालेले नाही. पोटाला चिमटा घेऊन जो घटक आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून शाळेत घालतो, त्या घटकाला ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या स्वतंत्र टॅब, लॅपटॉप, पीसी, मोबाईल, इंटरनेट कनेक्शन, डाटा चार्जेस, त्या साधनांसाठी अव्याहत आवश्यक वीजपुरवठा आणि मुलांना ती साधने घेऊन शिकण्यासाठी शांत, निवांत असा घरातला त्याचा हक्काचा एक कोपरा इत्यादी गोष्टींची पूर्तता आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे नकारात्मक आहे. शासन तरी या साधन सुविधा या कुटुंबांना देण्यास सक्षम अगर तत्पर आहे का? याचेही उत्तर सकारात्मक असू शकत नाही. कारण बेरोजगार झालेल्या नागरिकांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठीच शासन यंत्रणेला लॉकडाऊनच्या कालखंडात किती परिश्रम करावे लागले आहेत, याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधन सुविधांची पूर्तता करणे, ही विद्यार्थ्यांची प्राथमिक गरज आहे, त्याची पूर्तता आपण कशी करणार, त्यावर ऑनलाइन शिक्षणाचे लाभार्थी कोण असणार, हे अवलंबून आहे. समाजामध्ये आज मोठा डिजीटल डिव्हाईड आहेच, त्याची व्याप्ती यामुळे अधिकच वाढणार आहे.

दुसरे, हे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था, आपले शिक्षक कितपत समर्थ आहेत, याचेही अवलोकन आणि विश्लेषण आवश्यक आहे. मोबाईलसमोर बसणे आणि एकतर्फी शिकवित सुटणे, असा ऑनलाइन शिक्षणाचा अर्थ नाही. एखादा विषय घेऊन मल्टीमीडिया साधनांचा वापर करीत त्याला आकृती, आलेख, चित्रे, ऑडिओव्हिज्युअल्स अशा अनेक बाबींची जोड देत विषय व आशय विश्लेषण करून विषय सोपा करून समजावून सांगणे, या माध्यमाला अभिप्रेत आहे. पण, ती जाणीव अगदी मोजक्या खाजगी व्यावसायिक संस्था सोडल्या तर आपल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेला झालेली आहे, असे सध्या तरी दिसत नाही. ‘ऑनलाईन-ऑनलाईन’चा गजर करीत तातडीने विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेणे आणि आपले अर्थकारण साधणे, असेच चित्र सध्या तरी सर्वत्र आहे. येथे आपल्या वंचित घटकांचा विचार होताना दिसत नाही. त्यामुळे पुनश्च एकदा शिक्षणाअभावी मोठी सामाजिक-आर्थिक दरी निर्माण करण्याच्या टोकाला आपण समाजाला घेऊन जाणार आहोत का, अशी शंका निर्माण होते.

या माध्यमाच्या सशक्त बाजूंची जाणीव आपल्या शिक्षकांना तरी कितपत झालेली आहे, हाही एक प्रश्नच आहे. ऑनलाईनमध्ये शिकविणे म्हणजे घरात संगणकाच्या अगर मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बसून बडबड करणे, असे नक्कीच नाही. विद्यार्थ्यांना विषय सोपा करून समजावून देण्यासाठी ज्या विविध प्रकारचे सादरीकरणाचे शैक्षणिक मटेरिअल निर्माण करणे अभिप्रेत आहे, त्यावर कोणीही कष्ट घेण्याच्या मानसिकतेत आहे, असे जाणवत नाही. ऑनलाईन माध्यमाद्वारे संवाद साधत असताना आपण कसे प्रेझेंटेबल असावे, याचे मूलभूत भानही कित्येकांना आहे, असे दिसत नसताना उपरोक्त अपेक्षांची पूर्ती त्यांच्याकडून परिश्रमपूर्वक होईल, याची अपेक्षा बाळगणे सध्या तरी मोठाच भ्रमनिरास करणारे ठरेल. आपले शिक्षक ऑनलाईन माध्यमाद्वारा शिक्षण देण्यास तयार आहेत, असे चित्र सध्या तरी नाही.

सरते शेवटी विद्यार्थी या घटकाचा विचार करू या. बालक गटातील विद्यार्थी, ज्यांच्यासाठी मोबाईल अगर पीसी हे साधन गेम खेळण्याचे आहे. त्या पलिकडे त्या साधनाचा वापर त्याला माहिती आहे, अगर त्याचे पालक त्याला माहिती करून देतात, असे वास्तव नाही. त्यामुळे काल जसा गेम खेळत होतो, तसेच शिक्षण आहे, असे वाटून त्या मुलास शिक्षणाचे गांभीर्य पटविणे अवघड बनते. येथे शिक्षणाच्या सुरवातीलाच त्याचा खेळखंडोबाच होण्याची शक्यता अधिक. प्रत्यक्ष शिक्षण आणि व्हर्चुअल शिक्षण यातील फरक पूर्वप्राथमिक व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पटवून देणे, जाणवून देणे आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबविणे या बाबतीत पालकांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. सहशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जे सामाजीकरण होते, त्याला मुकल्याने अनेक कौटुंबिक व सामाजिक तोट्यांना या मुलांना सामोरे जावे लागेल. अनेक मनोकायिक विकारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते. सध्याच्या स्थितीत ऑनलाईन शिक्षण हे सोयीचे माध्यम असले तरी त्यासाठी आवश्यक सुविधा साधनांच्या अभावी मुलांच्या मनात वंचिततेची भावना निर्माण होऊ शकते. इंटरनेट व अन्य साधनांच्या वापरामुळे मुलांचा त्यावरील वेळ वाढेल. त्याचे परिणाम मुलांचे वर्तन व मानसिकता यांवर होण्याची दाट शक्यता आहे. शिक्षणाखेरीज अन्य अशैक्षणिक बाबी, अॅप्लिकेशन्स, समाजमाध्यमांचे विविध प्लॅटफॉर्म यासाठी सदर साधनांचा वापर अधिक केला जाण्याची शक्यता अधिक निर्माण होईल. इंटरनेटसह या साधनांचा मर्यादेपेक्षा अधिक वापर हा चुकीचाच आहे; मात्र तसे झाल्यास मुलांच्या झोपेपासून ते अनेक मनोशारीरिक समस्या निर्माण होतील. ऑनलाईन शिक्षणासाठी स्वयंशिस्त हा कळीचा मुद्दा आहे, पण त्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांमध्येच त्याविषयीची जागृती असणे आवश्यक आहे. शाळेत विद्यार्थी त्यांच्या मित्रांसोबत असतात, त्यामुळे त्यांचे सामाजीकरण सहज आणि नैसर्गिकरित्या होते. त्यातून त्यांच्या सामाजिक जाणिवा सुद्धा समृद्ध होण्यास मदत होते. ऑनलाईन शिक्षणामुळे हे सामाजीकरण धोक्यात येऊन मुले एकलकोंडी अधिक होतील, त्यांच्यामध्ये मानसिक आजार निर्माण होण्याची, समाजामध्ये मिसळण्यास भीती वाटण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे हे नवे माध्यम अत्यंत सजगपणे वापरण्याचे ज्ञान व भान शिक्षक, पालक व विद्यार्थी या घटकांमध्ये येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटवरील आभासी जगतामध्ये मुलांची फसवणूक होणे, त्यांचा छळ, शोषण आदी घटनांचे प्रमाण वाढण्याची, बालकांविषयीच्या सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे, ती निराळीच.

या ठिकाणी उपरोक्त बाबींची चर्चा करीत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ऑनलाईन शिक्षणाला विरोध करून उपयोगाचे नाही. ती एक महत्त्वाची शिक्षण प्रणाली आहे. मात्र कालपर्यंत केवळ उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात पूरक शिक्षणासाठीचे उपयुक्त माध्यम म्हणून कार्यरत असणारे ऑनलाईन शिक्षण आज शिक्षणाच्या सर्व स्तरांतले वास्तव म्हणून सामोरे आले आहे. कोविड-१९च्या साथीने त्याला पूरक अगर पर्यायी शिक्षणप्रणाली म्हणून नव्हे, तर शिक्षणाचे प्रमुख माध्यम म्हणूनच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे त्याविषयी सजगता, प्रबोधन, विद्यार्थी-शिक्षकांवरील त्याचे भलेबुरे परिणाम आणि त्यातून सर्वंकष सामाजिक-शैक्षणिक समानता प्रस्थापनेच्या मार्गातील अडथळे आदी अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण केले आहेत. ऑनलाईन शिक्षणाला आता नकार देता येणार नाहीच, पण त्यातून निर्माण झालेल्या या विविधांगी समस्यांना आपण कसे सामोरे जातो, त्यांवर कशी मात करतो आणि त्यायोगे सर्व समाजघटकांना सोबत कसे घेऊन जातो, यावर त्याचे दूरगामी परिणाम अवलंबून आहेत.


बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

वाटा ऑनलाइन शिक्षणाच्या!




(संपादक मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांच्या तेजस प्रकाशनच्या 'बदलते जग' या दिवाळी वार्षिकांकाचे अतिथी संपादक म्हणून काम पाहण्याची संधी यंदा सलग पाचव्या वर्षी लाभली. यंदा या अंकासाठी 'दिशा दूरशिक्षणाच्या' असा विषय घेऊन दूरशिक्षणाच्या क्षेत्रातील विविध प्रवाहांचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे. या अंकामधील माझा लेख ब्लॉग वाचक मित्रांसाठी येथे शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)

दूरशिक्षणाकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहात असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे दूरशिक्षणाला अगदी गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत हवी ती प्रतिष्ठा जनमानसात दिली गेली नाही. बहिःस्थ शिक्षण अर्थात एक्सटर्नल एज्युकेशन या नावाने पारंपरिक उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दूरशिक्षणाचा अंतर्भाव झाला खरा, परंतु, त्याकडे पाहण्याचा उदात्त दृष्टीकोन मात्र निर्माण झाला नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याविषयी एक असा समज निर्माण झाला की, विषय न सुटलेले, अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीच बहिःस्थ शिक्षणाकडे वळतात. तत्कालीन परिस्थिती पाहता, त्यामध्ये तथ्यही होते. बहिःस्थ शिक्षणामध्ये विद्यार्थ्याने संपूर्ण अभ्यास स्वतः घरीच करून केवळ परीक्षेसाठी महाविद्यालयांत येणे अपेक्षित होते. दूरशिक्षणाच्या संकल्पनेत ही संकुचितता दूर करण्यात आली आणि विद्यार्थ्याला आवश्यक तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यासाचे साहित्य, पुस्तके आदींची उपलब्धता करून देण्याची सोय येथे करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) तसेच महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या स्थापनेनंतर दूरशिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही पूर्वीपेक्षा अधिक व्यापक झाला. युजीसीने बहिःस्थ शिक्षण देणाऱ्या काही अकृषी विद्यापीठांकडेही दूरशिक्षणाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे विविध कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करता आले, त्याचप्रमाणे पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त आवश्यक अन्य आवडीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्गही या निमित्ताने खुला झाला. दूरशिक्षणाचा इतिहास इथे सांगण्याचा हेतू नसला तरी पूर्वपिठिका म्हणून या गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते.
उपरोक्त पार्श्वभूमीवर, डिजिटल तंत्रज्ञानाचा आविष्कार झाला आणि त्याने जवळजवळ सर्वच क्षेत्रे आपल्या कवेत घेतली. शिक्षण क्षेत्र हे तर त्या आविष्काराचे प्रमुख केंद्र ठरले कारण त्या आविष्काराचे प्रमुख लाभार्थी आणि भवितव्यही तरुण विद्यार्थीच होते. शिक्षण क्षेत्रात आयसीटी (माहिती संवाद तंत्रज्ञान) हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरू लागला. आयसीटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षकांना अध्यापनासाठी नवनवीन पद्धती आविष्कृत कराव्या लागल्या. साहजिकच अध्ययन-अध्यापन प्रणाली अधिक प्रभावी बनविण्याच्या कामी आयसीटी तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले.
आयसीटीमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होत असतानाच दूरशिक्षणाच्या क्षेत्रावरही त्याचे परिणाम न होते, तरच नवल. तरुणांमध्ये इंटरनेटचा वाढता वापर, मोबाईल, स्मार्टफोन्सचे आधुनिक तंत्रज्ञान, टॅब्लेट, पीसीच्या तंत्रज्ञानात झालेले क्रांतीकारक बदल या सर्व गोष्टींमुळे दूरशिक्षणाचे क्षेत्रही प्रभावित झाले. दूरशिक्षणाच्या नवनवीन पद्धतींची निर्मिती सुरू झाली.
दूरशिक्षणामध्ये कॉरस्पॉन्डन्स कोर्स लोकप्रिय झाले होते. संबंधित मुक्त विद्यापीठाकडे नोंदणी करून टपालाद्वारे त्यांचे कोर्स मटेरिअल प्राप्त करून घ्यावयाचे आणि वर्षाखेरीस परीक्षा द्यायची, असे या कोर्सचे स्वरुप असे. डिजीटल क्रांतीमुळे इंटरनेटने या कॉरस्पॉन्डन्सची जागा घेतली. मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स अर्थात MOOC अभ्यासक्रमांचा कालखंड सन २०१२पासून सुरू झाला. 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने सन २०१२ला 'मूक'चे वर्ष असे म्हटले. याचे कारण म्हणजे या एका वर्षातच कोर्सेरा, युडॅसिटी आणि ईडीएक्स हे तीन ऑनलाईन अभ्यासक्रमांचे अत्यंत महत्त्वाचे प्लॅटफॉर्म कार्यान्वित झाले. या तीनही प्लॅटफॉर्म्सनी ऑनलाईन एज्युकेशन अथवा ई-लर्निंगच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि आजतागायत या क्षेत्रात आपली विश्वासार्हता आणि लोकप्रियता कायम राखली आहे. या प्लॅटफॉर्मवर जगभरातील अनेक नामांकित विद्यापीठांचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पूर्वीप्रमाणे आता मात्र दूरशिक्षणाच्या बाबतीतला गैरसमज राहिलेला नाही. उलट पारंपरिक शिक्षणाला पूरक अथवा अधिक आवश्यक शिक्षण घेण्याच्या दृष्टीने हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरत आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या तुलनेत ऑनलाइन शिक्षणक्रमाचे लाभही अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पहिल्याच टप्प्यात शैक्षणिक शुल्क आणि क्लासरुम या गोष्टींना फाटा मिळतो. आपल्या वेळेनुसार हव्या त्या वेळी बंधनमुक्त अभ्यास करणे ऑनलाइन पद्धतीत सहज शक्य आहे. आपल्याला हवं ते शिकण्याची संधी या प्लॅटफॉर्मवर मिळते, जी पारंपरिक शिक्षणात कमी असते. त्याचप्रमाणे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करावी लागत असते. त्यासाठी येणारा खर्च अधिक असतो. साहजिकच पारंपरिक शिक्षण हे ऑनलाइन शिक्षणाच्या तुलनेत कितीतरी खर्चिक ठरते. किंबहुना, कित्येक ऑनलाइन अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत किफायतशीर दरात किंवा अगदी मोफत सुद्धा उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे जगातल्या कोणत्याही विद्यापीठातील अभ्यासक्रम विद्यार्थी घरबसल्या शिकू शकतो. पारंपरिक शिक्षणासाठी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष त्या विद्यापीठात जाणे शक्य असले तरी त्यासाठी त्या संबंधित देशाचा व्हिसा, तेथील राहणीमान, नवीन वातावरण या साऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ आणि बराचसा पैसा खर्च करावा लागत असतो. ऑनलाइन अभ्यास करीत असताना या सर्व गोष्टींना फाटा दिला जातो आणि विद्यार्थी थेट अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो.
ऑनलाइन पद्धतीमध्ये आपल्याला पारंपरिक पद्धतीमधील कोणताही अभ्यासक्रम घेऊन नियमित अभ्यास करता येऊ शकतो. केवळ गुगलवर जाऊन आपल्या आवडीचा अभ्यासक्रम टाइप केला की, जगभरात तो विषय उपलब्ध असणाऱ्या विद्यापीठांची यादी आपल्यासमोर येते. त्यातून आपल्याला हवे असणारे विद्यापीठ निवडून आपण त्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतो. केवळ एखाद्या विषयात रुची आहे म्हणून किंवा त्याविषयी तपशीलात जाणून घेण्याची उत्सुकता, जिज्ञासा म्हणूनही आपण अशा अभ्यासक्रमांना अर्ज करू शकतो आणि त्यांचा अभ्यास करू शकतो, ते सुद्धा कोठेही न जाता.
याठिकाणी केवळ आवड म्हणून एखाद्या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन आपल्या छंदाचे अभ्यासात रुपांतर करणारे एक जवळचे उदाहरण दिल्याखेरीज राहवत नाही. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंचालक असणाऱ्या श्री. सतीश लळित यांना ट्रेकिंगचा छंद आहे. या छंदातून ठिकठिकाणच्या प्राचीन वास्तू, विशेषतः मंदिरे, गुहा, लेणी आदी गोष्टींची पाहणी करण्याची त्यांना आवड आहे. कोकणातील काही महत्त्वाच्या कातळशिल्पांचा शोध त्यांनी लावला आहे. अनेक ठिकाणच्या वीरगळांची माहिती घेऊन ती नोंद करण्याचा प्रयत्नही ते करतात. या संदर्भात त्यांचा शोधनिबंधही प्रकाशित झाला आहे. या पाषाणकलेविषयीचा अभ्यासक्रम केवळ आवडीपोटी त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन निवडला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केला, तो सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी असण्याच्या कालखंडात. म्हणजे एवढी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी असताना आणि उसंत नावाचा प्रकार नसतानाही केवळ आवडीपोटी त्यांनी पाषाणकलेच्या अभ्यासासाठी वेळ काढला. हे वेळेचे व्यवस्थापन ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे ठरते.
दुसरे म्हणजे या साऱ्या अभ्यासक्रमाचे साहित्य आपल्याला ऑनलाइन उपलब्ध करुन दिले जात असल्याने आपल्या सोयीच्या वेळेनुसार ते आपण पाहून अभ्यास करू शकतो. घरबसल्या साऱ्या गोष्टी प्राप्त होत असल्यामुळे त्यासाठी इंधन जाळून बाहेर जावे लागत नाही किंवा कपडे वगैरे घालून तयार होऊन बसण्याचीही गरज भासत नाही. ही आरामदायिकता एकीकडे फायद्याची आहे, परंतु, ती फारच अंगावर येणारीही असायला नको. घरबसल्या अभ्यास करण्यामधला सर्वात मोठा धोका किंवा तोटा हा असा होऊ शकतो की, आपला आळस तिथे आडवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे घरी आपण आरामशीर असलो तरी अभ्यासाची खोली, तिथले अभ्यासपूर्ण वातावरण जाणीवपूर्वक जपण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची असते. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याची काळजी घेतली गेली नाही, तर वेळेत अभ्यासक्रम पूर्ण होणे अशक्य ठरते. पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये अभ्यासाचे, परीक्षेचे किंवा एकूणच सारे वेळापत्रक तयार करणारी विद्यापीठीय यंत्रणा असते. ऑनलाइन अभ्यासक्रमात मात्र घरच्या घरी अभ्यासाला पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करून नियोजनबद्ध अभ्यास करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्याची आणि विद्यार्थ्याचीच असते, हे लक्षात घ्यायला हवे.
ऑनलाइन अभ्यासक्रमांचे आणखी एक महत्त्व म्हणजे आपल्या बायोडाटावर ते खूप वेगळ्या पद्धतीने उठून दिसतात. आपण खाजगी किंवा शासकीय कोणत्याही नोकरीत असलात, तरी नवे ज्ञान, नवे कौशल्य आत्मसात करण्याची इच्छाशक्ती अधोरेखित करण्याचे कार्य आपण पूर्ण केलेले ऑनलाइन अभ्यासक्रम करीत असतात. खाजगी नोकरी बदलत असताना नवीन एम्प्लॉयर आपल्या मूलभूत शैक्षणिक पात्रतेबरोबरच ऑनलाइन पदवी, पदविका पाहून प्रभावित होऊ शकतो. कारण त्यातून संबंधित उमेदवारामध्ये नवीन शिकण्याची, नवीन काही करण्याची उमेद आहे, ही बाब केवळ बायोडाटावर नजर टाकूनच त्याला समजू शकते आणि त्यातून त्याची निवड होण्याची शक्यता वृद्धिंगत होते.
ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या संदर्भातला महत्त्वाचा भाग म्हणजे हा अभ्यासक्रम विद्यार्थी त्याच्या सोयीनुसार कितीही कालावधीत संपवू शकतो. दिवसा किंवा रात्री सोयीच्या वेळी अभ्यास करून अगदी अल्प वेळेत आपण हा अभ्यासक्रम संपवू शकतो. ही गतिमानता आणि लवचिकता पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये नसते. किमान वेळेत अभ्यास पूर्ण करण्याची संधी येथे असते. तथापि, किमान निर्धारित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन विद्यार्थ्याने करणे आवश्यक असते. अन्यथा, हा अभ्यासक्रमाचा कालावधी लांबूही शकतो. तसे होऊ न देण्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यावर असते.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे अत्यल्प खर्च किंवा अगदी मोफत या पद्धतीने ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. बऱ्याचदा मोफत असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेनंतर प्रमाणपत्र दिले जात नाही. तरीही, नामांकित शिक्षण संस्थांकडून ते शिक्षण प्राप्त केल्याचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
थोडक्यात काय, तर ऑनलाइन अभ्यासक्रम हे पारंपरिक शिक्षणपद्धतीच्या तुलनेत त्यांच्या लवचिकतेमुळे आणि अभ्यासक्रमातील वैविध्यतेमुळे अगदी अल्पावधीत जगभरात विद्यार्थीप्रिय झाले आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच नोकरदार, व्यावसायिक वर्गही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अगर आवडीपोटीही ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्याला प्राधान्य देत आहे. शिकण्यातला निखळ आनंद प्राप्त करून देण्यामध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम अत्यंत मोलाची कामगिरी बजावित आहेत.


ऑनलाइन शिक्षणात 'मुडल' महत्त्वाचे!
मुडल शिक्षण प्रणाली ही अत्यंत लवचिक, प्रभावी व आवश्यकतेनुसार बदलता येणारी मुक्त स्रोत संगणक प्रणाली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासह जगातील अनेक शाळा व महाविद्यालये यांचा यशस्वीपणे वापर करीत आहेत. शिक्षणप्रक्रियेचा मूलभूत विचार घेऊन मुडल ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुडल प्रणालीत शिकविणे व शिकणे या दोन्ही क्रियांतील वैयक्तिक तसेच  सामूहिक कृतीशीलतेला मह्त्वाचे स्थान दिले आहे. पेडॉगॉजी (Pedogogy) म्हणजे लहान मुलांना शिकविण्याची पद्धत व अँड्रागॉजी (Andragogy) म्हणजे प्रौढांना  शिकविण्याची पद्धत या दोन परस्पर भिन्न पद्धतींचा यथायोग्य उपयोग करणे शक्य व्हावे, हे उद्दिष्ट ठेवून मुडल प्रणालीची रचना केली आहे. पेडॉगॉजी ही शिक्षणाची रूढ पद्धत असून विद्यार्थ्याला नवीन शिकण्यास उद्युक्त करणे, त्याच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देऊन नवी माहिती देणे  याला इथे महत्व आहे. येथे शिक्षकाला महत्वाचे स्थान असून कल्पनाशक्ती व आपला शिकवण्याचा अनुभव याद्वारे तो विद्यार्थ्याला ज्ञान देतो. विद्यार्थ्यांकडून कृती करवून घेतो.  तर प्रौढांना शिकविताना त्यांची शिकण्याची क्षमता, त्यांचा अनुभव व शिकलेल्या ज्ञानावर आधारित जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यांचा विचार करून त्यांना स्वयंशिक्षणासाठी प्रेरित केले जाते. येथे शिक्षकाची जबाबदारी मार्गदर्शनाची राहाते. शिक्षण देणे व शिक्षण घेणे या गोष्टींची शिक्षक व विद्यार्थी या गटात विभागणी करण्याऐवजी खर्‍या शिक्षण पद्धतीत  शिक्षक व विद्यार्थी एकत्रितपणे विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या क्रियेत शिकणे व शिकविणे या दोन्ही भूमिका परस्परांना घ्याव्या लागतात. विद्यार्थ्याने आपल्याला समजलेले आपल्या भाषेत पुनः शिक्षकाला वा इतर विद्यार्थ्यांना सांगणे वा त्यावर आधारित कृती करणे यात अभिप्रेत असते. अशा सामूहिक कृतीस पोषक असे मुक्त चर्चा व्यासपीठ (फोरम) ठेवणे मुडलमध्ये शक्य असते. याशिवाय, शिक्षक अनेक प्रकारचे अभ्यास साहित्य व मल्टीमिडीया सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतात. विद्यार्थ्यांना समजलेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारणे, परीक्षा घेणे  वा प्रकल्प करवून घेणे शिक्षकास शक्य असते. मुडल प्रणालीत सर्व्हरवर सर्व शैक्षणिक सुविधा देणारा डाटाबेस (माहिती कक्ष) व त्यावर आधारित डायनॅमिक वेबसाईट यांचा वापर केला जातो. या पद्धतीत वेबसाईट व्यवस्थापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळी  प्रवेशद्वारे असून त्यांना विशिष्ट अधिकार देता येतात.


'मूक' अभ्यासक्रम प्रदाते
मूक (MOOC) अर्थात मासिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस हे ऑनलाइन अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाईन केलेले अभ्यासक्रम आहेत. अशा सेवा पुरविणारे जगभरात अनेक प्लॅटफॉर्म असले तरी कोर्सेरा (coursera.org), ईडीएक्स (edx.org), युडॅसिटी (udacity.com) आणि अकॅडेमिकअर्थ (academicearth.org) हे प्लॅटफॉर्म जगभरातील विविध विद्यापीठांमधील 'मूक' अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आघाडीवर आहेत.

मुक्त आणि मोफत
इंटरनेटवरील विकीपेडिया हा सर्वसामान्यांसाठी माहितीचा अत्यंत मुक्त आणि मोफत असा खजिना आहे, जो दिवसेंदिवस समृद्ध होत चालला आहे. पण त्यामध्ये लिहीणारे विषयतज्ज्ञच असतील, असे नसते. ते लिहीण्यासाठीही मुक्त ठेवले असल्याने काही प्रसंगी माहितीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा विकीपेडियावरील माहिती कन्फर्म करण्याची जबाबदारी माहिती घेणाऱ्यावर सर्वस्वी अवलंबून असते. याव्यतिरिक्त ऑनलाइन एज्युकेशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या संस्थेने ओपन कोर्स वेअर उपलब्ध केले आहेत. ocw.mit.edu या पोर्टलवर जाऊन विद्यार्थी तेथील अभ्यासक्रम पाहू, शिकू शकतो. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीनेही शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी मर्लोट (www.merlot.org) या पोर्टलवर अशा मुक्त व मोफत अभ्यासक्रमांची उपलब्धता केली आहे. याशिवाय, येल, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड आदी अनेक नामांकित विद्यापीठांनीही आपापल्या प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा जगभरातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत.
खान अकेडमी (www.khanacademy.org) हे या क्षेत्रातले एक नामांकित नाव. सलमान खान या एमआयटीचा त्रि-पदवीधारक व हार्वड विद्यापीठाचा एमबीए असणाऱ्या तरुणाने आपल्या पुतण्यांना विषय समजावून देण्यासाठी म्हणून सुरू केलेला उपक्रम आज जगभरातील तरुणांचा मार्गदर्शक बनला आहे. गणित, विज्ञान, तंत्रज्ञानादी अनेक विषयांशी निगडित अभ्यासक्रम या ऑनलाइन खान अकेडमीमध्ये मोफत उपलब्ध करण्यात आले आहेत. त्या त्या विषयातील तज्ज्ञांची फौजच इथे विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. वैशिष्ट्य म्हणजे टॉबी (डायरेक्टर ऑफ वेलनेस), फ्लीटवूड (चीफ लेझीनेस ऑफिसर) आणि पिप्पी (हेड ऑफ फूड सेफ्टी) या तीन श्वानांनाही टीम मेंबर्समध्ये सन्मानाचे स्थान प्रदान करण्यात आले आहे.

भारतीय अभ्यासक्रम प्रदाते
भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्य व प्रेरणेतून मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास व रुरकी येथील आयआयटी आणि आयआयएससी, बंगळूर या महत्त्वाच्या शिक्षण संस्थांनी एकत्रित येऊन एन.पी.टी.ई.एल. अर्थात नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग (http://nptel.ac.in/) हा मुक्त ऑनलाइन अभ्यासाचा प्लॅटफॉर्म विकसित केला असून त्याअंतर्गत सध्या ९०हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतीय मुक्त ऑनलाइन शिक्षण प्रदानाच्या क्षेत्रात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठी क्रांती होणे अपेक्षित आहे. याखेरीज आयआयटी-कानपूर यांनी विकसित केलेला बृहस्पती-३ हा पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म तसेच भारतातील व्हीसॅट ऑपरेटर ह्युजेस ग्लोबल एज्युकेशनसाठी कोलकता, लखनौ व कोझिकोड येथील आयआयएम, मुंबई व दिल्ली आयआयटी व एक्सएलआरआय, जमशेदपूर यांनी एकत्रित येऊन विकसित केलेला ऑनलाइन शिक्षणाचा प्लॅटफॉर्मही महत्त्वाचा आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) वेबसाईटसह मोबाईल व व्हीसॅटच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरुम विकसित करून त्याद्वारे विविध पदवी व पदव्युत्तर ऑनलाइन दूरशिक्षण अभ्यासक्रम चालविले आहेत.
सीके-१२ (http://www.ck12.org/) हा असाच आणखी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जिथे विविध विषयांतील क्रमिक पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. याखेरीज, एज्युकॉम्प (Educomp), ट्युटरव्हिस्टा (TutorVista.com), एव्हरॉन (Everonn), विझआयक्यू (WizIQ.com) तसेच एन.आय.आय.टी.चा nGuru.com हे खाजगी प्लॅटफॉर्मही ऑनलाइन एज्युकेशनशी निगडित विविध सेवा निर्माण करून प्रदान करण्यामध्ये आघाडीवर आहेत.