बुधवार, ८ जुलै, २०२०

कोविड, ऑनलाईन शिक्षण आणि आरोग्य('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीचा वर्धापन दिन नुकताच (दि. ३० जून) झाला. या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

कोविड-१९ तथा कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरली. त्याचे अनेक परिणाम-दुष्परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. लाखो लोकांचे मृत्यू, तितकेच पॉझिटिव्ह रुग्ण निर्माण झाल्याने जगाचे जगण्याचे, एकमेकांशी जोडले जाण्याची स्वाभाविकता या साऱ्याच बाबी अभूतपूर्व स्वरुपाच्या बदलल्या आहेत. आपले जगणे आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, राहणार नाही. जगण्याला अनेक मर्यादा पडलेल्या आहेत, प्रादुर्भावाच्या भीतीच्या सावटाखाली येथून पुढले आयुष्य जाणार आहे. कधीपर्यंत? कोणीही सांगू शकत नाही.

साऱ्याच क्षेत्रांवर कोविड-१९ साथीचा परिणाम झालेला आहे, शिक्षणाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मानवाचा हौशी स्वभाव येथेही दिसून आला. ऑनलाईन शिक्षण आणि एकमेकांशी ऑनलाईन जोडले जाण्याचा आपण इतका अट्टाहास मांडला की, एरव्ही ज्या एप्रिल-मे मध्ये आपली मुलं सुटीचा आनंद घेत असतात, त्या कालखंडात ऑनलाइन शिक्षणाच्या प्रकारांना अक्षरशः ऊत आला. अगदी वात येईपर्यंत जो तो उठतो आणि ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली गोंधळ घालायला सुरवात करतो, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून आले. हे गैर आहे, असे माझे म्हणणे मुळीच नाही; मात्र, त्यामध्ये प्रोफेशनॅलिझमचा अभाव आणि ऑनलाईन माध्यमांची ताकद आणि मर्यादा यांचे भान न बाळगता काही तरी वेगळे करण्याची हौस भागवून घेण्याची प्रवृत्तीच अधिक दिसून आली, अगदी शिक्षकांमध्ये सुद्धा! अगदी एखाद-दुसरेच ऑनलाईन व्यासपीठ असे दिसून आले, जिथे खरोखरीच या माध्यमाचे गांभीर्य ओळखून शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येत होते.

या ठिकाणी आपण ऑनलाईन माध्यमांद्वारे मुलांना शिक्षण देत असताना अनेक गोष्टींचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि सरते शेवटी विद्यार्थी यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यातही ऑनलाईन माध्यमाद्वारे जेव्हा शिक्षण देण्याचा पर्याय आपण निवडतो, तेव्हा त्यामध्ये गुंतलेले माहिती तंत्रज्ञान आणि त्यासाठीची आर्थिक क्षमता ही विद्यार्थी-पालकांमध्ये आहे का, याचा विचारही खूप महत्त्वाचा ठरतो. भारतामध्ये अद्यापही अनेक घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत, ज्यांच्या मूलभूत गरजा अद्यापही भागविणे आपल्याला शक्य झालेले नाही. पोटाला चिमटा घेऊन जो घटक आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून शाळेत घालतो, त्या घटकाला ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या स्वतंत्र टॅब, लॅपटॉप, पीसी, मोबाईल, इंटरनेट कनेक्शन, डाटा चार्जेस, त्या साधनांसाठी अव्याहत आवश्यक वीजपुरवठा आणि मुलांना ती साधने घेऊन शिकण्यासाठी शांत, निवांत असा घरातला त्याचा हक्काचा एक कोपरा इत्यादी गोष्टींची पूर्तता आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे नकारात्मक आहे. शासन तरी या साधन सुविधा या कुटुंबांना देण्यास सक्षम अगर तत्पर आहे का? याचेही उत्तर सकारात्मक असू शकत नाही. कारण बेरोजगार झालेल्या नागरिकांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठीच शासन यंत्रणेला लॉकडाऊनच्या कालखंडात किती परिश्रम करावे लागले आहेत, याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधन सुविधांची पूर्तता करणे, ही विद्यार्थ्यांची प्राथमिक गरज आहे, त्याची पूर्तता आपण कशी करणार, त्यावर ऑनलाइन शिक्षणाचे लाभार्थी कोण असणार, हे अवलंबून आहे. समाजामध्ये आज मोठा डिजीटल डिव्हाईड आहेच, त्याची व्याप्ती यामुळे अधिकच वाढणार आहे.

दुसरे, हे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था, आपले शिक्षक कितपत समर्थ आहेत, याचेही अवलोकन आणि विश्लेषण आवश्यक आहे. मोबाईलसमोर बसणे आणि एकतर्फी शिकवित सुटणे, असा ऑनलाइन शिक्षणाचा अर्थ नाही. एखादा विषय घेऊन मल्टीमीडिया साधनांचा वापर करीत त्याला आकृती, आलेख, चित्रे, ऑडिओव्हिज्युअल्स अशा अनेक बाबींची जोड देत विषय व आशय विश्लेषण करून विषय सोपा करून समजावून सांगणे, या माध्यमाला अभिप्रेत आहे. पण, ती जाणीव अगदी मोजक्या खाजगी व्यावसायिक संस्था सोडल्या तर आपल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेला झालेली आहे, असे सध्या तरी दिसत नाही. ऑनलाईन-ऑनलाईनचा गजर करीत तातडीने विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेणे आणि आपले अर्थकारण साधणे, असेच चित्र सध्या तरी सर्वत्र आहे. येथे आपल्या वंचित घटकांचा विचार होताना दिसत नाही. त्यामुळे पुनश्च एकदा शिक्षणाअभावी मोठी सामाजिक-आर्थिक दरी निर्माण करण्याच्या टोकाला आपण समाजाला घेऊन जाणार आहोत का, अशी शंका निर्माण होते.

या माध्यमाच्या सशक्त बाजूंची जाणीव आपल्या शिक्षकांना तरी कितपत झालेली आहे, हाही एक प्रश्नच आहे. ऑनलाईनमध्ये शिकविणे म्हणजे घरात संगणकाच्या अगर मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बसून बडबड करणे, असे नक्कीच नाही. विद्यार्थ्यांना विषय सोपा करून समजावून देण्यासाठी ज्या विविध प्रकारचे सादरीकरणाचे शैक्षणिक मटेरिअल निर्माण करणे अभिप्रेत आहे, त्यावर कोणीही कष्ट घेण्याच्या मानसिकतेत आहे, असे जाणवत नाही. ऑनलाईन माध्यमाद्वारे संवाद साधत असताना आपण कसे प्रेझेंटेबल असावे, याचे मूलभूत भानही कित्येकांना आहे, असे दिसत नसताना उपरोक्त अपेक्षांची पूर्ती त्यांच्याकडून परिश्रमपूर्वक होईल, याची अपेक्षा बाळगणे सध्या तरी मोठाच भ्रमनिरास करणारे ठरेल. आपले शिक्षक ऑनलाईन माध्यमाद्वारा शिक्षण देण्यास तयार आहेत, असे चित्र सध्या तरी नाही.

सरते शेवटी विद्यार्थी या घटकाचा विचार करू या. बालक गटातील विद्यार्थी, ज्यांच्यासाठी मोबाईल अगर पीसी हे साधन गेम खेळण्याचे आहे. त्या पलिकडे त्या साधनाचा वापर त्याला माहिती आहे, अगर त्याचे पालक त्याला माहिती करून देतात, असे वास्तव नाही. त्यामुळे काल जसा गेम खेळत होतो, तसेच शिक्षण आहे, असे वाटून त्या मुलास शिक्षणाचे गांभीर्य पटविणे अवघड बनते. येथे शिक्षणाच्या सुरवातीलाच त्याचा खेळखंडोबाच होण्याची शक्यता अधिक. प्रत्यक्ष शिक्षण आणि व्हर्चुअल शिक्षण यातील फरक पूर्वप्राथमिक व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पटवून देणे, जाणवून देणे आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबविणे या बाबतीत पालकांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. सहशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जे सामाजीकरण होते, त्याला मुकल्याने अनेक कौटुंबिक व सामाजिक तोट्यांना या मुलांना सामोरे जावे लागेल. अनेक मनोकायिक विकारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते. सध्याच्या स्थितीत ऑनलाईन शिक्षण हे सोयीचे माध्यम असले तरी त्यासाठी आवश्यक सुविधा साधनांच्या अभावी मुलांच्या मनात वंचिततेची भावना निर्माण होऊ शकते. इंटरनेट व अन्य साधनांच्या वापरामुळे मुलांचा त्यावरील वेळ वाढेल. त्याचे परिणाम मुलांचे वर्तन व मानसिकता यांवर होण्याची दाट शक्यता आहे. शिक्षणाखेरीज अन्य अशैक्षणिक बाबी, अॅप्लिकेशन्स, समाजमाध्यमांचे विविध प्लॅटफॉर्म यासाठी सदर साधनांचा वापर अधिक केला जाण्याची शक्यता अधिक निर्माण होईल. इंटरनेटसह या साधनांचा मर्यादेपेक्षा अधिक वापर हा चुकीचाच आहे; मात्र तसे झाल्यास मुलांच्या झोपेपासून ते अनेक मनोशारीरिक समस्या निर्माण होतील. ऑनलाईन शिक्षणासाठी स्वयंशिस्त हा कळीचा मुद्दा आहे, पण त्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांमध्येच त्याविषयीची जागृती असणे आवश्यक आहे. शाळेत विद्यार्थी त्यांच्या मित्रांसोबत असतात, त्यामुळे त्यांचे सामाजीकरण सहज आणि नैसर्गिकरित्या होते. त्यातून त्यांच्या सामाजिक जाणिवा सुद्धा समृद्ध होण्यास मदत होते. ऑनलाईन शिक्षणामुळे हे सामाजीकरण धोक्यात येऊन मुले एकलकोंडी अधिक होतील, त्यांच्यामध्ये मानसिक आजार निर्माण होण्याची, समाजामध्ये मिसळण्यास भीती वाटण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे हे नवे माध्यम अत्यंत सजगपणे वापरण्याचे ज्ञान व भान शिक्षक, पालक व विद्यार्थी या घटकांमध्ये येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटवरील आभासी जगतामध्ये मुलांची फसवणूक होणे, त्यांचा छळ, शोषण आदी घटनांचे प्रमाण वाढण्याची, बालकांविषयीच्या सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे, ती निराळीच.

या ठिकाणी उपरोक्त बाबींची चर्चा करीत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ऑनलाईन शिक्षणाला विरोध करून उपयोगाचे नाही. ती एक महत्त्वाची शिक्षण प्रणाली आहे. मात्र कालपर्यंत केवळ उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात पूरक शिक्षणासाठीचे उपयुक्त माध्यम म्हणून कार्यरत असणारे ऑनलाईन शिक्षण आज शिक्षणाच्या सर्व स्तरांतले वास्तव म्हणून सामोरे आले आहे. कोविड-१९च्या साथीने त्याला पूरक अगर पर्यायी शिक्षणप्रणाली म्हणून नव्हे, तर शिक्षणाचे प्रमुख माध्यम म्हणूनच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे त्याविषयी सजगता, प्रबोधन, विद्यार्थी-शिक्षकांवरील त्याचे भलेबुरे परिणाम आणि त्यातून सर्वंकष सामाजिक-शैक्षणिक समानता प्रस्थापनेच्या मार्गातील अडथळे आदी अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण केले आहेत. ऑनलाईन शिक्षणाला आता नकार देता येणार नाहीच, पण त्यातून निर्माण झालेल्या या विविधांगी समस्यांना आपण कसे सामोरे जातो, त्यांवर कशी मात करतो आणि त्यायोगे सर्व समाजघटकांना सोबत कसे घेऊन जातो, यावर त्याचे दूरगामी परिणाम अवलंबून आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा