रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

माकडाचं घर..!










(सन्मित्र श्री. सुभाष सूर्यवंशी यांचा 'अक्षरभेट' हा दिवाळी विशेषांक हा जणू माझे हक्काचे लिहीण्याचे ठिकाण. त्यांनी हक्कानं विषय सांगून लेख मागायचा अन् मी तो द्यायचा, असं हे गेली कित्येक वर्षे चाललेलं आहे. यंदाही 'अक्षरभेट'साठी लिहीलंय. ते माझ्या वाचकांना सादर करतोय, आपल्याला आवडेल, या अपेक्षेसह अन् दिपावलीच्या शुभेच्छांसह! - डॉ. आलोक जत्राटकर)



दुसरी-तिसरीतली आपल्यातल्या बहुतेकांना माहिती असलेली एक गोष्ट... माकडाचं घर... एक माकड. अत्यंत स्वच्छंद. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारायच्या. मनसोक्त फळं खायची. मजा करायची. मस्त आनंदात राहायचं. हेच त्याचं जीवन. अशातच पावसाळा सुरू झाला. पावसात भिजून माकड चिंब झालं. पाऊसपाणी आणि बोचऱ्या वाऱ्यात थंडीनं काकडून गेलं. त्यानं ठरवलं. आता पावसाळा संपला की पहिल्यांदा आपण एक चांगलं घर बांधायचं. मग आपल्याला पावसाचा त्रास होणार नाही. पावसाळा संपला. ऊन पडलं. माकड पुन्हा आनंदानं या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत राहिलं. थोड्याच दिवसांत हिंवाळा सुरू झाला. थंडीचा कडाका वाढला, तसं माकड गारठलं. त्याचं फिरणंच काय, खाणंपिणंही जणू गोठलं. थंडीनं थरथर कापत एका झाडाच्या फांदीला बिलगून बसलेल्या माकडानं ठरवलं, आता काही नाही, एकदा का हा हिंवाळा संपला की पहिलं काम- घर बांधायचं. म्हणजे ऊबदार घरात थंडीची कटकटच होणार नाही. थोड्याच दिवसांत हिंवाळा सरला. फिरून ऊन पडू लागलं. माकड पुन्हा आनंदानं इकडून तिकडं उड्या मारत राहिलं. उन्हाळ्याच्या झळा हळूहळू वाढू लागल्या. माकडाला उन्हानं जीव नकोसा झाला. झाडांच्या फांदीवरही उन्हाचे चटके बसू लागले. तेव्हा त्यानं पुन्हा एकदा ठरवलं. ते काही नाही, उन्हाळा संपला की घर बांधायचंच. पण, अशा सर्व ऋतूंत ठरवून देखील शेवटपर्यंत माकडाचं घर काही बांधून झालं नाही.

आज ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे आपण माणसं जणू काही या माकडाचेच वंशज असल्याचा दाखला देण्यासाठीच जन्मलो आहोत, अशा रितीनं वागत आहोत, हे होय. माकडाच्या बाबतीत त्याच्या आळसामुळं का असे ना, फक्त एकच गोष्ट चांगली म्हणजे त्याला घर बांधता आलं नाही. तसं झालं असतं, तर माकड त्या घराच्या भोवतीच गुरफटलं असतं. त्याच्या गरजा वाढत गेल्या असत्या. त्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी माकडानं आजूबाजूच्या पर्यावरणावर डल्ला मारायला सुरू केला असता आणि एक दिवस ते पर्यावरण आणि त्या पर्यावरणाबरोबर ते स्वतःही नष्ट झालं असतं. महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या धबडग्यात माकडाचा आनंद, त्याचा स्वच्छंदपणा हे सारं नष्ट झालं असतं. ते उड्या मारायलाही विसरलं असतं. असो!

अलिकडंच महाराष्ट्राच्या काही भागांत खूप मोठा महापूर आला. सन २००५, २०१९ आणि २०२१ या तीनही वर्षी आलेल्या महापुरांचा मी एक साक्षीदार. विशेषतः कोल्हापूरमध्ये या पुराची तीव्रता आणि वाढता प्रकोप यांचा अनुभव घेतलेला. सन २००५ साली आम्ही पुराच्या तीव्रतेचा दोष थोपला तो थेट कर्नाटकनं बांधलेल्या अलमट्टी धरणावर. तेथपासून ते अगदी सन २०१९पर्यंत इथल्या महापुरासाठी आम्ही त्याच्यावरच दोष टाकून आपली जबाबदारी मात्र झटकत होतो. कर्नाटक सरकारवर प्रादेशिक वादातून आमचा रोष होताच. त्यात भर पडली अलमट्टीची. हा रोष इतका होता की, त्या धरणाच्या पलिकडं कर्नाटक राज्यातही आपले भारतीय बंधू-भगिनी राहतात, याचं भान आपण कधीच बाळगलं नाही. आमच्या बाजूच्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे, यासाठी झगडताना पलिकडच्यांचा तो जीवनाचा अधिकार धोक्यात घालण्याबद्दल मात्र आम्हाला खंत वाटली नाही. सन २०१९मध्ये अलमट्टीतून सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटकातील किमान १६ ते १९ नागरिकांचा वाहून जाऊन मृत्यू झाला तर काही जण बेपत्ताही झाले. या गोष्टीचा आपल्याकडच्या किती लोकांना पत्ता होता? किती जणांना त्याची दखल घ्यावीशी वाटली अगर किती जणांना खंत वाटली? माझ्या मते, नाहीच वाटली.

यंदा सन २०२१च्या महापुराच्या वेळी मात्र आपल्या धरणांवरच्या अभियंत्यांनी धाडसी निर्णय घेऊन पावसाळ्यापूर्वी जादा पाणी सोडून अतिरिक्त पाऊस झाला, तरी धरणांतून लगोलग पाणी सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठीचे नियोजन केल्यामुळे अलमट्टी धरणावर आजवर चालत आलेला ब्लेमगेम यंदाच्या महापूर काळात चालला नाही, किंबहुना, फोलच ठरला. काही अभ्यासकांशी चर्चा केली असता त्यांनीही यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. इतक्या दूरवर अलमट्टीचे बॅकवॉटर मागे येऊ शकत नाही, हे त्यांनी ठामपणाने सांगितले. अवघ्या काही तासांत २० ते ५० सेंटीमीटर पाऊस झाल्याने पंचगंगा, कृष्णेच्या सर्वच उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे पाण्याचा फुगवटा ४५ ते ५५ फुटांच्याही वर गेला. अलमट्टीचा फुगा फुटला.

मग इतर कारणांचा शोध सुरू झाला. एक सापडलंही. राष्ट्रीय महामार्गावर बांधलेला बंधारावजा पूल हे पाणी साचण्याचं आणि हळू ओसरण्याचं कारण म्हणून पुढं आणलं गेलं. त्यात काही अंशी तथ्य आहे, मात्र पूर्णतः नाही. कारण केवळ पूलच नाही, तर मग रेड झोनमध्ये झालेली सर्वच बांधकामं त्यासाठी दोषी आहेत. अगदी २०१९च्या पुरानंतरही शहाणे न होता उलट अधिक गतीनं फर्निचरच्या भव्य शोरुम्सपासून ते मंगल कार्यालयांपर्यंत अनेक बांधकामं नदीपात्राच्या सभोवतीनं झाली. त्यामुळं एकट्या पुलावर जबाबदारी ढकलणं हेही चुकीचं.

या बाबतही तज्ज्ञांशी बोललो असताना त्यांनी कोल्हापूरपेक्षा नृसिंहवाडीची समुद्रसपाटीपासूनची उंची ही पाच मीटरनं कमी आहे. त्यामुळं तिकडं गुरुत्वाकर्षणानं पाण्याचा ओढा आहेच. मात्र, ज्या कोनामध्ये पंचगंगा कृष्णेला तिथं मिळते, त्या कोनामुळे पंचगंगेचे पाणी गतीने तिच्या प्रवाहात मिसळू शकत नाही. त्याचप्रमाणे कृष्णेमध्ये जर आधीच महापूर असेल, तर पंचगंगेचे पात्र तेथून मागेपर्यंत बॅकवॉटर साठवित जाते. त्याचा फटका शिरोळ परिसराला बसतो. यासाठीचा उपायही तज्ज्ञ सुचवितात, तो असा की एक अतिरिक्त चॅनल पंचगंगेमधून काढायचा आणि त्याद्वारे पंचगंगेचे अतिरिक्त पाणी कृष्णेच्या पात्रामध्ये अन्यत्र सोडावयाचे. म्हणजे पाणी फिरेलही आणि ते कृष्णेत समाविष्ट होईलही. मात्र, अतिरिक्त पावसाच्या वेळी मात्र त्यालाही मर्यादा पडतील.

आपल्या वर्तनाची मी माकडाच्या घराशी तुलना करतो आहे, याचे कारण म्हणजे या काळात आणखी काही भन्नाट अशास्त्रीय आणि अनैसर्गिक उपाययोजना पुढे चर्चेत आणल्या गेल्या. त्यामध्ये एक म्हणजे शहर परिसरात नदीपात्राला भिंत बांधायची आणि दुसरी म्हणजे नदीचा प्रवाह वळवायचा. या दोन्ही गोष्टी म्हणजे निसर्गाची अफाट क्षमता आणि मानवाची त्यापुढील मर्यादा यांचे आकलन अजिबातच न झाल्याची प्रचिती देणाऱ्या म्हणाव्या लागतील. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपले काही चुकलेच नाही आणि सारा दोष जणू काही निसर्गाचाच आहे, हा त्यामागे दडलेला सुप्त अहंभाव होय.

मुळात या सूचना करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलेलीच नाही, ती म्हणजे समपातळीत वाढत जाणे हा पाण्याचा नैसर्गिक स्थायीभाव आहे. भांड्यात पाणी ओतले जात असताना भांडे कमी-अधिक तिरके असले तरी पाणी त्याची समपातळी सोडत नाही, हा अनुभव आपल्याला आहेच. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी म्हणून नैसर्गिक तसेच मानवी नितीनियमांना धाब्यावर बसवित आपण नदीपात्रांच्या सभोवताली, त्याचप्रमाणे अगदी नदीपात्राच्या लगतही जिथे रेडझोन, ऑरेंज झोन घोषित केले आहेत, अशा ठिकाणीही केवळ पैशासाठी भव्य इमारती, संकुले उभ्या करण्यास परवानगी दिल्या. स्थानिक नेते, नगरसेवक आणि बिल्डर लॉबी यांच्या भ्रष्ट युतीने दणादण तिथे बांधकामे उभारली. लाखो रुपये घेऊन नागरिकांनी त्यात फ्लॅट खरेदी केले. अगदी २०१९मध्ये ज्या ओढ्याच्या पात्रामध्ये पाणी ओसंडून वाहात होते. तेथे पाणी ओसरताच भराव घालून, कॉलम टाकून एक भव्य संकुल उभे राहिले. वैशिष्ट्य म्हणजे ओढ्यातल्या त्या संकुलात फ्लॅट घेणारे ग्राहकही त्या बिल्डरला भेटले, ही आणखी एक चिंतेची आणि दुर्दैवाची बाब. २०२१मध्ये तिथल्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले, हे सांगायला नकोच. आपण बोलत होतो, ते पाण्याच्या समपातळीविषयी. अतिवृष्टीमुळे पाण्याचा फुगवटा वाढत जाईल, तसतसे ते आजूबाजूच्या शेती, रस्ते, घरे, रिकाम्या जागा अशा समस्त परिसरात त्याच समपातळीमध्ये पसरायला सुरवात करते. नदीपात्राची अधिकतम उंची ओलांडल्यानंतर त्या पातळीत बाजूला जितके पसरता येईल, तितके ते पसरत राहते आणि आपली पातळी कायम राखते. पाऊस कमी झाला आणि ओसरण्यास सुरवात झाली की आपली सिमेंट काँक्रिटची घरे या सर्वत्र पसरलेल्या पाण्याला अडवणाऱ्या बंधाऱ्यांचे अथवा भिंतींचे काम करतात. नदीपात्राला वेढून पसरलेल्या आपल्या नागरी वस्त्या ते पाणी रोखून धरतात. त्याला नदीपात्राकडे परतण्यास अटकाव करतात. त्यामुळे ते पाणी लवकर ओसरू शकत नाही. ही बाब आपल्याला माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. कारण पुन्हा तेच. भ्रष्टाचारामुळे उभारलेल्या या भिंतींची जबाबदारी कोण घेणार? पण, यांच्यातल्याच कोणाच्या सुपीक डोक्यातून नदीलाच भिंत घालण्याची कल्पना आली. ठीकाय. काही क्षण ही कल्पना मान्यही करू. पण, त्या भिंतीची उंची किती असेल? ५५ फूट, ६० फूट की आणखी उंच? आणि तिची लांबी? ती किती असेल? डोळ्यांसमोर चित्र आणा आपल्या परिसरातील कोणत्याही नदीचे. आणि मनातल्या मनात बांधा तिच्या दोन्ही बाजूला अशा उंच आणि लांब भिंती. भीषण चित्र येतं ना डोळ्यासमोर. आणि समजा, अतिवृष्टी अशी झाली की आपण बांधलेल्या भिंतीवरुनही पाणी ओसंडलं नागरी वस्तीत. तर ते पुन्हा नदीत जावं कसं? त्यावेळी आपल्या वस्त्यांची अवस्था काय होईल? या भिंतींच्याच आधारे झोपडपट्ट्या वाढण्याची साधार भितीही येते मनात. मुंबईत पाहा. वस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांच्या बाजूनं बांधलेल्या भिंतींचीच एक बाजू करून तीन तीन मजली झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत तिथं. मग, आपल्या शहरात अशा ५० फुटी भिंतीचा आधार घेऊन साधारण पाच-सहा मजली झोपडपट्टी तर सहज ओळीनं उभी राहू शकते. हा पर्याय जलदीनं मागं पडला, हे एक बरं झालं.

नदीचा प्रवाह वळवण्याचा प्रस्ताव पुढं आणणाऱ्या बलरामांबद्दल तर काय बोलावं? जगभरात झालेल्या अशा प्रयत्नांना निसर्गानं कशा पद्धतीनं पाणी दाखवलं आहे, याची अनेक उदाहरणं आहेत. असा प्रस्ताव येतो, त्यावेळी आपण स्वतःला निसर्गापेक्षाही खूप बलवान समजतो आहोत आणि हा आपला गैरसमज निसर्ग एका फटकाऱ्यानिशी पाण्यात घालविण्यास सक्षम आहे, एवढं त्यांनी वेळीच लक्षात घ्यावं.

पावसामुळं कोसळणाऱ्या दरडी आणि त्यातून होणारी जिवित व वित्त हानी, हा आणखी एक चिंतेचा विषय. मात्र, माळीणसारखी प्रचंड दुर्घटना होऊनही आपण त्यापासून काहीच बोध घेत नाही. पुनःपुन्हा काय होणाराय, म्हणून अशा डोंगरांच्या पायथ्यांशी वस्त्या करून राहू लागतो आणि दुर्घटना घडली की शासनाला बोल लावीत राहतो. त्यांचं राजकारण करीत राहतो. आज या बाबतीत पूर्वराजकारण करण्याची गरज आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर प्रशासनाच्या माध्यमातून अशा वाड्या-वस्त्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसित करणं शक्य आहे. मात्र, ते होत नाही. नागरिकही आपली जागा सोडायला तयार होत नाहीत. उदाहरणच द्यायचं, तर कोल्हापूरशेजारच्या चिखली गावाचंच देता येईल. राजर्षी शाहू महाराजांनी तिथल्या जवळजवळ सर्वच कुटुंबांचं पुनर्वसन त्यांच्या राजपूतवाडी कॅम्पच्या परिसरात त्यांच्या काळातच केलं होतं. लोकांना जमिनी देऊन घरंही बांधण्यात आली. मात्र, नागरिकांचा मूळ घर आणि शेतीतला मोह काही सुटला नाही. सन २०१९च्या महापूर काळात इथल्या नागरिकांच्या सुटकेचा मोठा दबाव प्रशासनावर राहिला. सन २०२१मध्ये नागरिक पुराची शक्यता वाटताच स्वतःहून राजपूतवाडीच्या त्यांच्या सेकंड होममध्ये स्थलांतरित झाले. पण तिथे एकदा गणेशोत्सव साजरा केला की पुन्हा ते आपल्या इथल्या मूळ घरांकडे परततील. हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही इथल्या नागरिकांना मूळ जागेचा, जमिनीचा, घराचा मोह सुटत नाही, तर अशा दरडींच्या पायथ्याशी, डोंगरउतारांवर वाड्यावस्त्या थाटून राहणाऱ्या आणि अन्य कोणताही पर्याय नसलेल्या लोकांकडून ती अपेक्षा कशी बरे करावी? आपल्या प्रशासनासमोरची ही एक मोठी डोकेदुखी असणार आहे. माणूस शहाणा होऊन स्वतःहून जोपर्यंत अशा जागा सोडणार नाही आणि प्रशासन त्यांना योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत माळीण, रायगडसारख्या दुर्घटना होतच राहणार.

या पद्धतीने डोंगरमाथ्यावरील विकासकामांच्या, बांधकामांच्या वाढलेल्या भारामुळे आणि त्यात अतिवृष्टीमुळे जमीन कमकुवत होऊन तसेच पायथ्याची जमीनही भुसभुशीत होऊन घसरण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. पूर्वी दुर्गम भागामध्ये असलेले हे प्रमाण आता पन्हाळ्यासारख्या किल्ल्यांच्या परिसरातही प्रचंड वाढले आहे. कडे कोसळू लागले आहेत, रस्ते खचू लागले आहेत. निसर्गाने दिलेले हे सारे संकेत आहेत. ते आपण समजून घ्यायला हवेत.

समतल, शहरी, गावठाण भागाच्या परिसरातील, नदीच्या परिसरातील शेतजमिनी एन.ए. करून तिथे एकीकडे प्लॉट पाडून त्यातून पैसा पैदा करायचा आणि दुसरीकडे डोंगरमाथ्यापासून ते पायथ्यापर्यंत मातीला घट्ट धरून ठेवून जमिनीची धूप रोखणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करून तेथे शेती करायची, या दोन्ही बाबी मानवी विकासाच्या दृष्टीने तात्कालिक पूरक वाटत असल्या दूरगामी मानवी अस्तित्वाला घातक आहेत, हे एव्हाना लक्षात येऊ लागले आहे. अतिवृष्टीमध्ये शेतीमुळे भुसभुशीत झालेले डोंगर शेतीसह वाहून जाऊ लागले आहेत. तर नदीकाठच्या एन.ए. प्लॉटमधील बांधकामे ही विकासाचे दुष्परिणाम सिद्ध करणारी ठिकाणे बनली आहेत.

खनिज उत्खनन हा त्याचा आणखी एक वेगळा पैलू. या उत्खननादरम्यान हव्यासापोटी मान्यतेपेक्षा अधिक केली जाणारी खोदाई, त्यासाठी वापरली जाणारी स्फोटके यांमुळे भूसंरचनेला मोठ्या प्रमाणात हादरे बसतात. ती उद्ध्वस्त होते. जमीन आत खोलवर पोखरली जाते. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, शिवाय भूस्खलनाचा धोका वाढतो. सातारा परिसरात दगड-वाळूच्या खाणी आहे. महामार्गावरून दिसणाऱ्या डोंगरांच्या दर्शनी बाजू तेवढ्या पोखरणाऱ्या उंदरांनी उभ्या ठेवल्या आहेत. मागील बाजूने संपूर्ण डोंगर संपवले आहेत. डोंगर संपवून ते थांबलेले नाहीत, आता तिथे खोदून जमिनीच्या पोटातही घुसले आहेत. पुढे या मार्गावर कधी काळी दुतर्फा किती तरी डोंगरांच्या रांगा होत्या, हे सांगूनही कोणाला पटणार नाही. त्यांच्या ठिकाणी केवळ मोठमोठे खड्डे आणि पाणी साचलेल्या खणीच काय त्या उरतील. हा हव्यास कोणता विकास घडविणार आहे, ठाऊक नाही.

मान्य आहे, निसर्गाचा समतोल बिघडला आहे. पण, तो कोणामुळे, हेही लक्षात घ्यायला हवे ना! पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक स्तरावर जे जे करार करण्यात आले, त्या करारांमधून विकसित राष्ट्रांनी आपले अंग काढून घेण्यास सुरवात केली आहे. जागतिक तापमानवाढ, कार्बन क्रेडिट्स, हरितगृह वायू उत्सर्जनापासून ते अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरास प्राधान्य देण्यापर्यंत पर्यावरण रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधूनही विकसित राष्ट्रे माघार घेत आहे. नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर रोखून जगाला आगामी पर्यावरणीय संकटांपासून वाचविण्याच्या जबाबदारीपासूनही ते पलायन करीत आहेत. सारी जबाबदारी जणू काही विकसनशील राष्ट्रांचीच असल्यासारखे त्यांचे वर्तन सुरू झाले आहे. अंतिमतः हे सारे काही मानवी अस्तित्वाच्या मुळावरच उठणारे आहे, याची जाणीव जागतिक स्तरावरही दुर्लक्षिण्याचे प्रकार होत आहेत.

या साऱ्या बाबींमुळेच मला राहून राहून माकडाच्या घराची गोष्ट आठवत राहते. संकट आले की, तेवढ्यापुरते आक्रोश करायचा, त्यावर मात करण्यासाठीच्या उपायांची चर्चा करायची आणि संकट ओसरले की, पुन्हा व्यापक मानवी हित विसरून व्यक्तीगत स्वार्थ साधण्याच्या मागे लागायचे, हे वरचेवर, वारंवार दिसून येते आहे. किंबहुना, आपण इतिहासापासून धडे घेत नाही, म्हणूनच नेहमी आपल्या अस्तित्वासमोरची आव्हाने अधिकाधिक गडद होत जात आहेत. मानवी समुदाय म्हणून आपण एक आहोत, ही वसुंधरा जपणे, यावरील पर्यावरण जपणे, पर्यावरणातील अन्य पशु, पक्षी, कीटक, वनस्पती हे सारे आपले सहचर, सहोदर आहेत. बुद्धीच्या बळावर या साऱ्यांचे मोठेपण आपण स्वतःकडे घेतले खरे, पण आता खऱ्या अर्थाने त्या मोठेपणाचे भान ठेवून आपण त्यांच्याही अस्तित्वाची काळजी वाहिली पाहिजे. मात्र आपण ते आपल्या भौतिक सुखसोयींच्या, आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी बासनात गुंडाळून ठेवले आहे. स्वार्थापुढे सर्व हिताहिताचे आपल्याला विस्मरण होते किंबहुना आपण जाणीवपूर्वक त्या विसरून जातो. म्हणून माकडाचे घर हे दिवास्वप्नच राहते.


सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

‘जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारे पुस्तक

 




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या जनसंपर्काचे अंतरंग या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच (दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी) सोलापूर येथे झाले. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक या निमित्ताने मराठीत निर्माण झाले आहे. या पुस्तकाविषयी...

---

डॉ. रवींद्र चिंचोलकर सर जनसंपर्काच्या संदर्भात पुस्तक लिहीत आहेत, याची माहिती होती. त्यामुळे पुस्तक पूर्ण कधी होते, याची अत्यंत उत्कंठा लागून राहिलेली होती. त्याचा कळसाध्याय म्हणजे जनसंपर्काचे अंतरंग या पुस्तकाचे प्रकाशन होय.

यापूर्वी डॉ. सुरेश पुरी यांनी सन १९८४मध्ये जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत हे जनसंपर्काविषयी मराठीतले पहिले पुस्तक लिहीले. तेच आजवर पत्रकारिता व जनसंपर्काचे शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांनी संदर्भासाठी वापरले. मराठीत डॉ. पुरी यांच्या या पुस्तकानंतर सुमारे ३६ वर्षांनी जनसंपर्काविषयी आलेले सकस आणि दर्जेदार पुस्तक म्हणजे डॉ. चिंचोलकर सरांचे जनसंपर्काचं अंतरंग होय. ही दोन पुस्तके म्हणजे मराठीतली जनसंपर्क या विषयामधील मैलाचा दगड ठरावीत, अशी आहेत.

या पुस्तकाच्या निमित्ताने एक फार महत्त्वाचा योगायोग घडून आला आहे. पुरी सरांच्या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुधाकर पवार यांची प्रस्तावना लाभलेली आहे. तर, चिंचोलकर सरांच्या या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुरेश पुरी यांची प्रस्तावना प्राप्त झाली आहे. आधुनिक काळात गुरू-शिष्य परंपरा जोपासनेचे यापेक्षा अधिक सकारात्मक उदाहरण दुसरे कोणते बरे असेल?

एक बाब आपण लक्षात घ्यायला हवी की, पत्रकारिता अगर जनसंपर्क ही क्षेत्रे अनुभवाधिष्ठित आहेत. पत्रकारांच्या, प्रॅक्टीशनर्सच्या अनुभवातून या ज्ञानक्षेत्रांचा विस्तार झाला आहे. डॉ. चिंचोलकर यांच्या या पुस्तकालाही त्यांच्या अनुभवाचा भरभक्कम पाया लाभल्याने त्याची मांडणी अतिशय संवादी झालेली आहे. पुरी सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, चिंचोलकर सरांनी ज्या संघर्षमय परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले, त्याचा उल्लेख केलेला आहे. चिंचोलकर सरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात दहा वर्षे वार्ताहर, आवृत्ती प्रमुख आदी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. त्यानंतर जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले जनसंपर्क अधिकारी म्हणून बारा वर्षांहून अधिक काळ काम केले. ऑक्टोबर २००८पासून ते सोलापूर विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. सरांच्या या समग्र वाटचालीतील अनुभवाचा अर्क त्यांच्या पुस्तकामध्ये उतरल्याचे आपल्याला दिसते.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आवश्यक आहेच; मात्र फिल्ड वर्क आणि पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो. बातमी लेखनापासून ते संपादनाच्या विविध प्रक्रिया, उत्तम जनसंपर्कासाठी आत्मसात करावयाच्या नेमक्या बाबी, आपत्कालीन स्वरुपाच्या परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय अशा अनेक बाबी क्रमिक पुस्तकांतून वाचून शिकणे आणि प्रत्यक्ष फिल्ड वर्क केलेल्या व्यक्तीच्या तोंडून समजावून घेणे यात फरक आहे. सदर कामातील खाचाखोचा, अचानक उद्भवणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी बाबींची माहिती सर्वांगीण अनुभवसिद्ध शिक्षक उत्तम प्रकारे देऊ शकतो. डॉ. चिंचोलकर सरांनी त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

अगदी मुखपृष्ठापासूनच त्याची सुरवात झालेली आहे. सर्व माध्यमे- अगदी उपग्रहापर्यंतची अत्याधुनिक साधने भोवतीने आहेत. मात्र, त्यांच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. सारी माध्यमे, समस्त जनसंपर्क यांचा आटापिटा कशासाठी? तर, मानवाची संवादाची भूक भागविण्यासाठी. संवाद नसेल, तर माणूस वेडा होऊन जातो. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनीच त्याचा अनुभव घेतला आहे. ऑनलाईन, व्हर्चुअल माध्यमांद्वारे कितीही संवाद साधा; प्रत्यक्ष संवादाची उत्कटता त्याला कधीही लाभणार नाही. पूर्वी आपण म्हणायचो, पारंपरिक शिक्षणाचे भवितव्य ऑनलाईन शिक्षण आहे. मात्र, आपले विधान अर्धसत्य असल्याचे या काळात सिद्ध झाले. पारंपरिक शिक्षणाला ही माध्यमे पूरक म्हणूनच उत्तम काम करतील, असे आता चित्र आहे. अशा प्रकारे मानवाचे संवाद प्रक्रियेतील मध्यवर्तीपण अधोरेखित करीतच डॉ. चिंचोलकर त्यांच्या जनसंपर्काच्या अंतरंगाची मांडणी करताना दिसताहेत.

जनसंपर्काची प्रक्रिया आणि स्वरुप या बाबी अतिव्यापक आहेत. केवळ बोलणे, संवाद साधणे अगर माहिती देणे असा जनसंपर्क व्यवसायाचा संकुचित अर्थ आजही काढला जातो. स्वाभाविकपणे जनसंपर्काचा अर्थ तेथे मर्यादित राहतो. त्याचप्रमाणे जाहिरात, विक्री, विपणन, उत्पादन वृद्धी, प्रेस एजंट्री अगर प्रसिद्धी या संकल्पनाही जनसंपर्कसदृश समजल्या जातात. मात्र, जनसंपर्काची संकल्पना ही त्याहून वेगळी आणि या सर्वच बाबींना कमीअधिक प्रमाणात सामावून घेणारी आहे. उपरोक्त सर्व बाबींचा अंतर्गत आणि बाह्य घटकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी वापर करून अंतिमतः संस्थेच्या हितास्तव व्यापक सामाजिक स्तरावर दूरगामी सदिच्छा प्रस्थापना करणे, यासाठी जे सकारात्मक वस्तुनिष्ठ प्रयत्न केले जातात, त्या बाबींचा जनसंपर्काच्या कक्षेत समावेश होतो. जनसंपर्काचे क्षेत्र हे तुलनेत आधुनिक आहे. गेल्या शतकभरामध्ये त्याचा संकल्पनात्मक, सैद्धांतिक आणि क्षेत्रीय विकास आणि विस्तार झाला आहे. शासकीय विभागांसह खासगी उद्योग-व्यवसायांनी जनसंपर्काचा अंगिकार करून आपली प्रगती साधलेली असल्याचे आपल्याला दिसते.

जनसंपर्काच्या विविध पैलूंचा साकल्याने वेध घेण्याचे काम जनसंपर्काचे अंतरंग या पुस्तकाद्वारे डॉ. चिंचोलकर यांनी केले आहे. अत्यंत मुद्देसूद आणि तपशीलवार मांडणी, त्याच्या जोडीला समजावून सांगण्याची संवादी, प्रवाही शैली आणि त्याला पूरक छायाचित्रे, रेखाचित्रे यांचा सुरेख मेळ घालत त्यांनी हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकात एकूण ४४४ पृष्ठांमध्ये नऊ प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. जनसंपर्काचा उदय आणि विकास, जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत, जनसंपर्क आराखडा, जनसंपर्काची माध्यमे, जनसंपर्काची साधने आणि लेखन तंत्रे, जनसंपर्काच्या व्यावसायिक संस्था आणि आचारसंहिता, जनसंपर्काची विविध क्षेत्रे, कॉर्पोरेट संवाद आणि जनसंपर्क संशोधन अशी ही अगदी क्रमवार प्रकरणे आहेत. जनसंपर्काच्या प्रारंभापासून ते समकाळातील जनसंपर्क क्षेत्राच्या डिजीटल विस्तारापर्यंत सर्वंकष वेध लेखकाने घेतला आहे. पारंपरिक, प्रस्थापित माध्यमांबरोबरच नवमाध्यमांच्या आधारे जनसंपर्क कसा साधावा, याचे दिग्दर्शनही यात त्यांनी केले आहे. विद्या बुक पब्लिशर्सचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे यांनी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत कोठेही तडजोड केलेली नाही, याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावरील पी.टी. बार्नम यांच्यापासून ते आयव्ही लेड बेटर ली, वॉल्टर लिपमन, जॉर्ज क्रील, एडवर्ड बार्नेस यांच्या योगदानाचा साद्यंत आढावा तर या पुस्तकात घेण्यात आला आहेच; शिवाय, भारतीय परिप्रेक्ष्यात सम्राट अशोक यांनी शिलालेख, स्तंभ या माध्यमातून तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची राजमुद्रा, विविध हुकूमनामे यांद्वारे प्रस्थापित केलेल्या जनसंपर्काचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे.

भारतीय जनसंपर्काचे जनक म्हणून महात्मा गांधी यांचा सार्थ गौरव करीत असतानाच भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचीही जनसंपर्काच्या अंगाने त्यांनी केलेली मांडणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. फाळके यांनी चित्रपट माध्यमाच्या प्रसारासाठी जनसंपर्काच्या वापरलेल्या विविध क्लृप्त्यांचा वेध यात घेतला आहे. विशेषतः डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भातील मांडणी अतिशय लक्षणीय स्वरुपाची आहे.

कोणत्याही ज्ञानशाखेची वृद्धी आणि विस्तार या बाबी त्या क्षेत्राशी निगडित उपलब्ध असणारे संदर्भ साहित्य आणि त्या क्षेत्रात सुरू असणारे संशोधन यावर अवलंबून असतात. पत्रकारिता आणि जनसंपर्काचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तथापि, मराठीमध्ये या संशोधन सिद्धांतांचा गांभीर्यपूर्वक साद्यंत मांडणीचा मोठा अभाव होता. ही उणीव सदर पुस्तकामध्ये चिंचोलकर सरांनी भरून काढली आहे. जनसंपर्क आराखडा, संशोधन, सर्वेक्षण प्रकार, जनसंपर्क मोहीम, उपक्रम मूल्यमापन, आशय विश्लेषण अशा सर्व संशोधकीय बाबींचा परिचय पुस्तकात सविस्तर करून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे शासकीय, कॉर्पोरेट, वित्तीय, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य, संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रांमधील जनसंपर्काचा वेधही सरांनी घेतलेला आहे. हा वेध घेत असताना त्या त्या क्षेत्रातील अनेकविध समकालीन उदाहरणे देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यातील क्लिष्टता जाऊन विषय समजावून घेणे सोपे झाले आहे. शैक्षणिक जनसंपर्काच्या संदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या महापूर काळातील सामाजिक कार्याचाही पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

हे पुस्तक पत्रकारिता आणि संवादशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरणारे आहेच; मात्र, त्याचबरोबर विविध शासकीय, खासगी आस्थापना, संस्था, उद्योग-व्यवसाय यांनाही आदर्श जनसंपर्क कशा प्रकारे असावा, याबाबत मार्गदर्शन करणारे आहे. आजच्या माध्यमांनी घेरलेल्या काळात उत्तम जनसंपर्काची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली आहे. संस्थाच नव्हे, तर सेलिब्रिटी नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा व्यक्तीगत पातळीवर आपला जनसंपर्क वृद्धिंगत करण्याची, आपली स्वतंत्र ओळख, छबी निर्माण करण्याची आस लागलेली आहे. या पुस्तकाच्या आधारे ही बाब सहजसाध्य आहे. खरे तर, या पुस्तकाला केवळ क्रमिक पुस्तक म्हणणे, त्याच्यावर अन्याय करणारे ठरेल. कारण जनसंपर्क ही पुस्तकात कमी आणि व्यवहारात अधिक अंमलात आणावयाची संकल्पना आहे. जनसंपर्क जितका प्रभावी, तितकी उत्तम प्रतिमा निर्मिती असे थेट समीकरण आहे. म्हणूनच माध्यमकर्मी, जनसंपर्क व्यावसायिक, जनसंपर्काचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह जनसंपर्काची आस असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हाती हे पुस्तक असलेच पाहिजे, असे त्याचे स्वरुप आहे.

या पुस्तकाचे गुणवैशिष्ट्य अगदी एका शब्दात सांगायचे तर समग्रता हाच शब्द त्याला लागू पडेल. जनसंपर्काचे सर्व घटक, सर्व बाजू यांचा साकल्याने वेध त्यात आहे. पण, त्या समग्रतेला पृष्ठसंख्येच्या मर्यादा पडल्यामुळे अनेक संकल्पनांना धावता स्पर्श करावा लागलेला आहे. यातील जवळपास प्रत्येक संकल्पनेवर एकेक पुस्तक होईल, अशी त्यांची व्याप्ती आहे. इंग्रजीत तशी ती आहेतही. मराठीत मात्र आता तशा प्रकारची पुस्तके निर्माण होण्याची निकड या पुस्तकामुळे नव्याने अधोरेखित झालेली आहे.

एकूणातच, जनसंपर्काविषयी मराठीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक जनसंपर्काचे अंतरंग या पुस्तकाच्या रुपाने दाखल होते आहे. येथून पुढील काळात महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, शिक्षण संस्था, विद्यापीठे, विद्यार्थी यांना या पुस्तकाचा अभ्यास केल्याखेरीज पुढे जाता येणार नाही. जनसंपर्क व्यावसायिक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी तर एक महत्त्वाचा दस्तावेज मातृभाषेत उपलब्ध होतो आहे. हे सर्वच घटक चिंचोलकर सरांच्या या पुस्तकाचे स्वागत केल्याखेरीज राहणार नाहीत, याची खात्री आहे.

 

पुस्तकाचे नाव: जनसंपर्काचे अंतरंग

लेखक: डॉ. रवींद्र चिंचोलकर

प्रकाशन: विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगपुरा, औरंगाबाद

पृष्ठसंख्या: ४४४

किंमत: रु. ५००/-

 

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

आम्ही तो येरागबाळे...

 

संत तुकाराम (प्रातिनिधिक छायाचित्र)


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होतो. त्यावेळी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बोलताना बोलून गेलो की, महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान जितके सोपे वाटते, तितकेच ते अंगिकारण्यास अवघड आहे. गांधी तत्त्वज्ञान आचरणात आणणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांभोवती चढलेली भौतिकवादाची, चंगळवादाची पुटे होय. जोवर आपण ती दूर करीत नाही, तोवर गांधींची सत्य, अहिंसा आणि मानवतावादी मूल्ये यांपासून आपण दूरच राहू... असे मला समजलेल्या गांधींबाबत मी बोलून गेलो. कार्यक्रम झाला. उत्तमच झाला.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास साताऱ्याहून एका अॅकॅडेमिशियन व्यक्तीचा फोन आला. इतक्या उशीरा फोन केला म्हटल्यावर त्यांनी मोठ्या कष्टानेच माझा क्रमांक शोधला असावा. त्यांनी बोलायला सुरवात केली. म्हणाले, सर, कार्यक्रम चांगला झाला. मात्र, इतक्या मोठ्या अॅकॅडेमिक कार्यक्रमात तुम्ही अत्यंत नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरलात. विशेषतः गांधीजींच्या संदर्भात हा शब्द वापरल्याने तो अधिक खटकला. तुम्हाला कदाचित दिवसभरातही अनेकांचे फोन आले असतील त्यासाठी. पण म्हटले आपणही सांगायला हवे, म्हणून फोन केला.

इकडे त्याच्या शब्दागणिक माझी हवा टाइट होत चाललेली. फोन तर इतर कोणाचाही नव्हता आलेला. सध्याचा काळ काही बोलण्या-लिहीण्यासाठी अत्यंत बेकार स्वरुपाचा आहे. कोणाच्या भावना कुठे दुखावल्या जातील अन् कोणाच्या अस्मितांना कधी धक्का पोहोचेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे नाही म्हटलं तरी मी टेन्शनमध्ये येत चाललो होतोच. मी विचारलं, अहो, कोणता शब्द, ते तरी सांगा. त्यावर महोदय उत्तरले, येरागबाळा हा शब्द तुम्ही वापरलात, हे काही योग्य केले नाहीत. विद्यापीठासारख्या अॅकॅडेमिक व्यासपीठावरुन असा नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरला जाणेच मुळात आक्षेपार्ह आहे. मनात म्हटलं, बाप रे! आता या शब्दाचा वापर ज्या संदर्भात केला आहे, ते लक्षात न घेता या महोदयांची गाडी या शब्दावरच अडून बसलेली आहे. आजकाल असा ट्रेन्डच झालाय म्हणा. एखाद्या वाक्याचा मागील पुढील संदर्भ काढून टाकायचा आणि आपल्याला हव्या त्या संदर्भानं तो पेश करायचा की झालं. आपली ठरविलेला मोहीम यशस्वी होते. इथे मात्र यांचा रोख तसा थेट नव्हता. नसला तरी त्यांनी फोन करून सांगण्याची भूमिका मला आजच्या भोवतालात स्वागतार्ह वाटली. म्हणून मग त्यांचं निरसन करायचं ठरवलं. सुरवातीला उद्धृत केलेलं वाक्य आठवून मी पुन्हा त्यांना सांगितलं. आणि मग म्हणालो, येरागबाळा हा काही नॉन-अॅकॅडेमिक अथवा असंसदीय शब्द आहे, असं म्हणता येणार नाही. संत तुकोबारायांनी योजलेला शब्द आहे तो. पर्यायी इंग्रजीत सांगायचं तर, गांधी तत्त्वज्ञानावर बोलणं आणि त्याहूनही ते आचरणात आणायचं म्हणजे कोणाही टॉम, डिक वा हॅरीचं काम नाहीये ते! हिंदीमध्ये आपण त्यांना लल्लू-पंजू असंही म्हणतो. मी त्यांना असं बरंच काही सांगत राहिलो. त्यांचं समाधान झालं की नाही, त्यांनी समाधान मानून घेतलं की नाही, माहीत नाही. पण, या शब्दाच्या नॉन-अॅकॅडेमित्वात मात्र मी गुरफटला गेलो.

कोणत्याही विद्यापीठात न शिकलेले तुकोबाराया हे स्वतःच एक संतपीठाचे महान विद्यापीठ बनून राहिले आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या गाथेतील शब्दावर नॉन-अॅकॅडेमित्वाचा आरोप करणाऱ्या तथाकथित अॅकॅडेमिशियन्सच्या तुकाराम शिकवायच्या अधिकारावरचंच प्रश्नचिन्ह वाटलं ते मला. अनुभवाशिवाय बोलणाऱ्यांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेताना संत तुकारामांनी म्हटले आहे की,

नका दंतकथा येथे सांगू कोणी।

कोरडे ते मानी बोल कोण।।

अनुभव येथे व्हावा शिष्टाचार।

न चलती चार आम्हांपुढे।।

निवडी वेगळे क्षीर आणि पाणी।

राजहंस दोन्ही वेगळाली।।

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे।

येरागबाळाचे काय काम।।

अर्थात, कोणत्याही विषयातले (विशेषतः अध्यात्मातील) तुम्हाला काहीही कळत नसताना आपल्याला खूपच कळते, असा आव आणून त्यासंदर्भात कपोलकल्पित कथा रचून लोकांना सांगणारे वाचाळवीर खूप असतात. त्यांना फटकारताना तुकोबाराय म्हणतात की, तुम्ही मंडळी, येथे लोकांना दंतकथा सांगत बसू नका. अनुभवविरहित असे ते आपले बोलणे कोण बरे ऐकत बसेल? अनुभव असेल तरच बोलावे, हाच शिष्टाचार बनला पाहिजे. अन्यथा अनुभवाविना बोलणाऱ्यांची आमच्यापुढे काही खैर नाही.

राजहंस जसा पाण्यात मिसळलेले दूध पाण्यापासून वेगळे काढून पितो, त्याप्रमाणे अनुभवी व्यक्ती भल्याबुऱ्याचा विवेकाने विचार, निवाडा करतात. असा राजहंसीय नीरक्षीरविवेक करण्यासाठी असा जातीचाच (अर्थात अनुभवी) व्यक्ती लागतो. ते कोणाही येरागबाळ्याचे काम नाही.

आता साक्षात संत तुकारामांनीच अधिकृत केलेल्या या शब्दाला अशैक्षणिक, असंसदीय मानावे तरी कसे बरे? त्यानंतरच्या गेल्या शेकडो वर्षांत तुकारामांचा हा शब्दप्रयोग अनेक संत, साहित्यिक, पत्रकार, लेखकांनी आपापल्या लेखनामध्ये आवर्जून वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्येष्ठ अभिनेते नीळू फुले यांनी येरागबाळ्याचे काम नोहे या शीर्षकाच्या नाटकातूनच मराठी रंगभूमीवर तसेच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते, हेही लक्षात घ्यावे लागेल. खरे तर तुकारामांचे लेखन हा सार्वकालिक संदर्भाचा प्रमुख स्रोत आहे, असे म्हणता येईल इतका सुवचनांचा, शब्दप्रयोगांचा, वाक्प्रचार, म्हणींचे त्यात उपयोजन आहे.

तुकारामांचा विषय येथे ताणवण्याचे कारण नाही, मात्र हे सारे विवेचन यासाठीच की आपली शैक्षणिक आणि अशैक्षणिकत्वाची समज खुरटत, खुंटत चालली आहे का, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. आपण आपली समज विवेकापेक्षा सध्या भोवतालात सुरू असलेल्या गदारोळाच्या दावणीला बांधू लागलो आहोत का, याचा विचार करण्याचीही नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा अॅकॅडेमिक्सभोवती आधीच घोंघावू लागलेले मळभ अधिकच दाट होऊन काळोख वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

 

 

 

कृतज्ञ आठवांचा प्रवाहो!


 

'सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा' हे आपले ध्येयवेड्या जीवनप्रवास वर्णनपर पुस्तक भेट देताना डॉ. बाळासाहेब गोफणे.

डॉ. बी.एन. तथा बाळासाहेब गोफणे... माझ्या परिचयातील एक ज्येष्ठ उमदे व्यक्तीमत्त्व... खरे म्हणजे गोफणे सर हे माझ्या वडिलांच्या पिढीतील... स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मलेली आणि शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही पहिली पिढी... शिक्षणासाठीच्या खस्ता त्यांनी आपापल्या परीनं खाल्लेल्या... संघर्ष रेटलेला... या संघर्षाच्या धुमीत तेजाळून निघालेले त्यांचे अनुकरणीय ज्ञानकर्तृत्व... अशी ही पिढी...

गोफणे सरांचा माझा परिचय हा मी शिवाजी विद्यापीठात सन २०१२ साली सहाय्यक कुलसचिव पदावर रूजू झाल्यानंतरचा... तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी मी सर्वात शेवटी रुजू होणारा उमेदवार असूनही माझ्यासाठी जणू सभा व निवडणुका विभागाची जबाबदारी राखून ठेवलेली... या विभागामुळं संपूर्ण विद्यापीठाचंच नव्हे, तर विद्यापीठ परिक्षेत्राचंही कामकाज समजावून घेण्याची, निर्णय प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अंगानं विशिष्ट भूमिका बजावण्याची संधीच जणू मला लाभलेली... विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा इत्यादींच्या बैठकांचं नियोजन, कामकाजाचे मिनिट्स, ठराव इत्यादी विहीत मुदतीत मार्गी लावण्याची जबाबदारी या विभागाकडं आहे. त्यावेळी डॉ. गोफणे सर हे विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून संपर्कात आले. एक अत्यंत गोड वाणीचे, मृदूभाषी, निर्मळ मनाचे आणि कर्तव्यतत्पर सदस्य म्हणून त्यांच्याबद्दल मला विशेष आदर वाटत असे. प्रत्येक बैठकीच्या वेळी आले की, हमखास विचारपूस करणारे आणि अन्य वेळी कधी काही कामानिमित्तानं विभागात आले तरी अनेक बाबी चिकित्सक आणि जिज्ञासापूर्ण पद्धतीनं जाणून घेणारे म्हणूनही त्यांच्याबद्दलचा आदर दुणावलेला. त्यांची मुदत संपली तरी, समाजमाध्यमांपासून ते प्रत्यक्ष कधीही आले तरी काही क्षण का असे ना, भेट घेऊन चौकशी केल्याखेरीज कधीही पुढे न जाणारे, असे गोफणे सर!

नुकतंच त्यांचं सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास हे आत्मनिवेदनपर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आवर्जून भेट घेऊन त्यांनी ते भेट दिलं. त्यांच्या सहृदयी स्वभावाला ते साजेसंच आहे. पुस्तक वाचून हातावेगळं केलं, तेव्हा गोफणे सरांच्या आयुष्यातील सकारात्मकतेचं, सहृदयतेचं गमक ध्यानी आलं. आईच्या ममतेसाठी आसुसलेलं कोवळं मन आजही त्यांच्याआत खोलवर कुठं तरी आहे. त्यामुळं भेटणाऱ्या प्रत्येकाविषयी एक माया, ममता, कणव अथवा वात्सल्य या भावना त्यांच्या हृदयातून ओसंडून वाहू लागतात. पुस्तक वाचताना पानोपानी त्याची प्रचिती येते. प्रस्तावनेत डॉ. रणधीर शिंदे म्हणतात, त्याप्रमाणं या निवेदनात व्यक्तीगत, सामाजिक, संस्थात्मक अंतर्विरोधाला अजिबात स्थान नसल्यानं त्याला एकरेषीयता प्राप्त झाली आहे. मात्र, याचं कारण त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनातच असल्यामुळं त्यांच्यातील सकारात्मक दृष्टीनं त्यावर मात केली आहे. डॉ. शिंदे यांचं म्हणणं खरंच आहे. गोफणे सरांना अडचणीत आणायचं म्हणून सुरवातीला अनुमोदक म्हणून सही देणाऱ्या आणि अगदी ऐनवेळी पाठिंबा मागं घेत असल्याचं पत्र देणाऱ्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाचं नाव न छापण्याचा विशालहृदयी दृष्टीकोन गोफणे सरांच्या या जीवनदृष्टीमुळंच त्यांच्यात आलेला आहे. अन्यथा, दुसरा एखादा ते नाव सहजी छापून गेला असता. नेमकं हेच गोफणे सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

कृतज्ञतेनं ओथंबलेल्या आठवांचा प्रवाह असं एका वाक्यात त्यांच्या या आत्मनिवेदनाचं वर्णन मी करेन. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या विविध व्यक्तीमत्त्वांबद्दल केवळ अन् केवळ कृतज्ञताभाव बाळगणं आणि त्याचा आवर्जून निर्देश करणं, हा आजच्या काळात एक वस्तुपाठ म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्याचप्रमाणं आत्मनिवेदनामध्ये स्वशय येणं, स्व असणं हे अनिवार्यच असतं. मात्र, हा स्व मांडत असताना त्यामध्ये मीपणा डोकावणार नाही, मी लाऊड होणार नाही, याची दक्षता घेणं, तारेवरची कसरत असते. या दोहोंमध्ये एक धूसर, बारीक सीमारेषा असते. ती सांभाळणं भल्याभल्यांना जमत नाही. मात्र, स्वभावतःच कृतज्ञशील असलेल्या गोफणे सरांना मात्र ते सहजी जमलेलं आहे, असं पुस्तक वाचताना जाणवतं. या पुस्तकातील कन्टेन्टबद्दल मी लिहीणार नाही कारण गोफणे सरांनी अत्यंत सुबोध, ओघवत्या आणि रसाळ शब्दांमध्ये मांडलेला सीनेच्या वाळवंटापासून सुरू झालेला आणि पंचगंगेद्वारा प्रितीसंगमापर्यंत येऊन ठेपलेला ध्येयवेडा प्रवास मुळातूनच एकदा वाचनानुभवण्यासारखा आहे.

कोविड-१९ लॉकडाऊनच्या कालखंडात आपण सारेच बऱ्याच सहृदजनांना दुरावलो. मात्र, याच कालखंडानं गोफणे सरांसारख्यांना लिहीण्यासाठी अवधी मिळवून दिला आणि त्या काळात एक मार्गदर्शक, कृतज्ञताभावानं ओथंबलेली साहित्यकृती निर्माण होऊ शकली, हेही नाकारता येणार नाही. गोफणे सरांची ही भावगाथा आजच्या तरुणाईला स्वातंत्र्योत्तर पहिल्या पिढीचा संघर्ष सांगणारी तर आहेच, शिवाय, स्वतःमध्ये मूल्ये कशी रुजवून घ्यावीत, त्यांचा अंगिकार, प्रसार कसा करावा, याचेही धडे देणारी आहे. त्या दृष्टीने गोफणे सरांच्या या साहित्यकृतीकडे पाहायला हवे, तिचे स्वागत करायला हवे.

 

पुस्तकाचे नाव: सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास

लेखक: डॉ. बाळासाहेब गोफणे

लेखकाचा संपर्क: ९४२२३८४०३५  

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, सोलापूर

पृष्ठसंख्या: २४०

किंमत: रु. ३००/-