रविवार, १३ मे, २००१

हंचिनाळला पाच दिवसाच्या संत संमेलनाचा समारोप; हजारो भक्तगणांची उपस्थिती

'संत दर्शनापेक्षा संत होण्यासाठी वाटचाल करा'

(दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय संत संमेलनाच्या समारोप समारंभाची बातमी पान-१ वर प्रकाशित झाली. रात्री ९ वाजता हंचिनाळ येथून फॅक्सद्वारे ही बातमी पाठविण्यात आली.)

 


(आलोक जत्राटकर यांजकडून)

हंचिनाळ, ता. १२: सर्व प्रकारच्या विकारांवर विजय मिळविल्यास मनुष्य संतपदाकडे वाटचाल करतो. केवळ संतांचे दर्शन नको, तर सर्वांनी संत होण्याकडे वाटचाल करावी. त्यासाठी तपश्चर्येची किंवा शास्त्रज्ञानाची आवश्यकता नाही. संत होणे म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये पवित्र प्रेमाची स्थापना करणे होय, असे प्रतिपादन सिद्धेश्वर महास्वामी (ज्ञानयोगाश्रम, विजापूर) यांनी केले. येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागांतून सुमारे ५० हजार भक्तगण उपस्थित होते.

ते म्हणाले, "प्रेमामुळेच मनुष्याचे मन पवित्र आणि भक्ती संपन्न होते. संत दर्शन करा; पण त्यापेक्षा संतसाधना महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल आणि मोक्षाकडे वाटचाल कराल."

जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (संतूर संस्थान मठ, म्हैसूर) म्हणाले, "निरपेक्ष व निष्कामबुद्धीने केलेली भक्ती भगवंताला प्रिय असते. भक्ती कोणत्या पद्धतीने केली, यापेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची असते. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी आपापल्या पद्धतीने भक्ती केली. त्यांची भक्ती परमेश्वराने स्वीकारली."

ते म्हणाले, "इतर योगामध्ये साध्यासाठी ठराविक मार्ग आहेत; पण भक्तीसाठी ठराविक मार्गाचे बंधन नाही. देवाबद्दल मनात शंका न ठेवता भक्तांनी प्रार्थना केली पाहिजे. सत्ता, पैसा, जमीन यासाठी कोटी कोटी मेले; पण भगवंतासाठी व भक्तीसाठी एकही जण मेलेला नाही. निसर्गावर आपण सातत्याने अत्याचार करतो. परंतु या कृतीतून आपण परमेश्वरालाच इजा करीत आहोत, ही भावना आपल्या मनालाही शिवत नाही, याबद्दल जोपर्यंत आपल्या मनात सहानुभूती निर्माण होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही."

ते पुढे म्हणाले, "अशिक्षितपणा सोडून लोकांनी शिक्षणाच्या वाटा स्वीकारल्या पाहिजेत. यासाठी संतूर मठाद्वारे सुमारे २५० शिक्षण संस्था कार्य करीत आहेत. गरिबांच्या मुलांना या शिक्षण संस्थांमध्ये बारावीपर्यंतमोफत शिक्षणाची सोय केली आहे."

यावेळी ईश्वर स्वामींनी आयोजित केलेले संत संमेलन यशस्वी झाल्याचे सांगून ते म्हणाले, "ईश्वर स्वामींच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून भक्ती योगाश्रम साकारला आहे. विजापूरच्या सिद्धेश्वर महास्वामींच्या अखत्यारीतच ते तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे येथील कार्य अखंडित सुरू राहील, यात शंकाच नाही. परिसरातील लोकांना भक्ती कशी असावी, हे सांगण्यासाठी त्यांनी पाचही दिवस भक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा घडवून आणली.

यावेळी सर्व उपस्थित स्वामींचे, भक्तांचे व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानताना ईश्वर स्वामी म्हणाले, "मी भक्ती योगाश्रमामध्ये सद्‌गुरूंच्या आदेशानुसार ज्ञान व भक्ती प्रसाराचे काम प्रामाणिकपणे करीत राहीन."

यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाश आवाडे, राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, संजय पाटील, रजनीताई मगदूम, कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार काका पाटील आदी उपस्थित होते.

आत्मनिवेदन म्हणजे देव व भक्ती यांची एकरुपता: निर्मलानंद महास्वामींचे प्रतिपादन

 (दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी संत संमेलनाविषयी प्रसिद्ध झालेले वृत्त.)

 

 


हंचिनाळ, ता. १२ (बातमीदार) : 'आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता होय,' असे विचार निर्मलानंद महास्वामी यांनी व्यक्त केले.

येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या पाचव्या दिवशी आज पहिल्या सत्रात विविध संतांची 'आत्मनिवेदन व भक्ती' या विषयावर प्रवचने झाली. संमेलनात आज तिघा जणांना संन्यस्त जीवनाची दीक्षा देण्यात आली. यात एका सहा वर्षांच्या मुलाचा समावेश होता. आज सदाशिव महास्वामी (म्हैसूर), निर्मलानंद' महास्वामी (विजापूर), सेवानंद महाराज (भांदवले), विनयानंदजी महास्वामी (मौजे वडगाव), शिवगंगाधर स्वामी (शिंदगी) यांची प्रवचने झाली.

निर्मलानंद महास्वामी म्हणाले, "आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता. आत्मनिवेदन भक्तीमुळे देव व भक्त यांच्यात अंतर राहत नाही. ईश्वरस्वामी प्रतिगाडगे महाराज आहेत."

विनयानंद महाराज म्हणाले, "मनामध्ये निर्मल भावना ठेवून भक्ती केल्यास यश प्राप्ती होते. आसक्ती संपविण्यासाठी विवेक व वैराग्य यांची गरज असते. विवेक, वैराग्य, षड्संपत्ती, ममत्त्व या चार गोष्टी आत्मज्ञान संपादन करण्यास आवश्यक असतात. संकुचितपणा म्हणजे मृत्यू व व्यापकता म्हणजे जीवन."

सेवानंद महाराज म्हणाले, "भोगासाठी जीवन नाही, ते मुक्तीसाठी असते. अध्यात्माचा संबंध हा मनाशीच असतो. ग्रहण करणे याला जीवनात महत्त्व आहे. शरणागतीचा भाग म्हणजे नम्र जीवन. गुरुमंत्राच्या जपाने जीवन सफल होते."

सदाशिव महास्वामी म्हणाले, "भक्ती म्हणजे हृदयातील मधु भाव. अहंकारमुक्त केलेली भक्ती सर्वश्रेष्ठ असते. आत्मा-परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती होय."

शिवगंगाधर स्वामी म्हणाले, "मोक्षासाठी भक्ती गरजेची असते. आत्मियतेने केलेली भक्ती भगवंताला आवडते. भक्तीमुळे माणसाच्या आयुष्यात सन्मार्ग येण्यास मदत होते."

दरम्यान, शुक्रवारी रात्री उषा मंगेशकर यांचा 'रंग उषेचा' हा गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात उषा मंगेशकर यांचा प.पू. शिवरात्री देशीकेंद्र सुत्तूर संस्थान मठ म्हैसूर यांच्या हस्ते सत्कार झाला. बाळासाहेब देवनाळ यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन संजय दामले यांनी केले. उषा मंगेशकर यांनी गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरवात केली. यात त्यांनी माझी रेणुका माऊली..., 'मेंदीच्या पानावर.... 'ऐरणीच्या देवा..., 'पाऊस पहिला बरसून गेला... अशी भक्तिगीते व भावगीते सादर केली.

'शालू हिरवा पाचूनी मढवा... हे बहारदार गीतही सादर केले. 'ऐ मेरे वतन के लोगो...' या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल देशपांडे व पुरुषोत्तम गोणावर यांनी त्यांना गायनात साथ केली. या कार्यक्रमाला सुमारे एक लाखाहून अधिक श्रोते उपस्थित होते. राजू जावळकर यांनी उत्कृष्ट ढोलकीवादन केले. जगद्‌गुरु ईश्वरानंदजी महास्वामी यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचा सत्कार झाला.

तिघांना दीक्षा

या कार्यक्रमात जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते ओंकार कृष्णा चौगुले (वय ६, रा. टाकवडे, ता. शिरोळ), सतीश रावसाहेब पाटील (वय ११, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), शंकर कृष्णा आण्णा (वय २४, भक्ती योगाश्रम) यांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांचे अनुक्रमे ओंकारानंद, सत्यानंद व धर्मानंद स्वामीजी असे नामकरण करण्यात आले. महास्वामीजींनी त्यांना कन्नडमधून दीक्षा व नियम-संहिता दिली.

बुधवार, ९ मे, २००१

‘पाच दिवसांच्या संत संमेलनास हंचिनाळ येथे उत्साहात प्रारंभ’

दीनदलितांचा उद्धार हेच भक्तीयोगाश्रमाचे उद्दिष्ट: ईश्वर स्वामी

 (दै. सकाळमध्ये रुजू होऊन महिना उलटण्यापूर्वीच हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय महा संत संमेलनाचे कव्हरेज करण्याची संधी मिळाली. दि. ९ मे २००१ रोजी दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीच्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेले संत संमेलनाच्या उद्घाटनाचे वृत्त.)

 

चिकोडी तालुक्यातील हंचिनाळ येथील भक्तियोगाश्रमामध्ये मंगळवारी भरलेल्या संत संमेलनाचे उद्घाटन करताना शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी. शेजारी रुद्रपशुपती महास्वामीमहेशानंद ईश्वर महास्वामीअदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीपंचम शिवलिंगेश्वर महास्वामीसिद्धेश्वर महास्वामीजयदेव महास्वामीनीलकंठ महास्वामी आदी.






हंचिनाळ, ता. ८ (खास बातमीदार): गोरगरिबांना आश्रय देणे, मदत करणे हे हेतू मनात ठेवूनच भक्तीयोगाश्रमाचा भक्तिवृक्ष उभारला आहे. त्याची सावली पददलित जनतेला मिळावी, हीच माझी इच्छा आहे, असे प्रतिपादन हंचिनाळ भक्ती योगाश्रम मठाचे अधिपती महेशानंद ईश्वर स्वामी यांनी आज येथे केले. पाच दिवसांच्या सर्वधर्मीय संत संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते उपस्थित महास्वामींना आणि भक्तांना संबोधित करत होते. अध्यक्षस्थानी रूद्रपशुपती महास्वामी (कोळेकर मठ, मिरज) होते. ज्ञानयोगाश्रम, विजापूरचे सिद्धेश्वर महास्वामी यांची विशेष उपस्थिती होती.

ते म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी मल्लिकार्जुन महास्वामींनी या उजाड माळरानावर आश्रमाची स्थापना करून भक्तीचे रोपटे लावले. या पवित्र परिसराला एवढे विस्तृत स्वरूप आलेले पाहून कार्यपूर्तीचे समाधान लाभले. इथून पुढील वाटचालही ग्रामविकास, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षणप्रसार अशा सामाजिक, शैक्षणिक कार्याबरोबर सुरू राहील.

भक्ती सेवाश्रमाच्या नवीन वास्तूचे शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (सुत्तूर संस्थान मठ, म्हैसूर) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नऊला संतसंमेलनाचे उद्घाटन झाले. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (सिद्धगिरी मठ, कणेरी) यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते; परंतु त्यांच्याच 'सूचनेनुसार हे उद्घाटनही शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रातील पहिल्या प्रवचनास सुरवात झाली. 'श्रवण भक्ती' या विषयावर योगानंद महास्वामी (रायरहेब्बळी); अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (कणेरी), प्रभूदेव महास्वामी (रबकवी), सिद्राम देशीकेंद्र महास्वामी (देवकरे) यांची प्रवचने झाली.

योगानंद महास्वामी म्हणाले, "मानवी जीवन आनंदी बनविण्यासाठी भक्ती आवश्यक आहे, त्याखेरीज आत्मिक शक्ती वाढत नाही. मानवी जीवनात समतोल राखण्याचे काम भक्ती करते."

अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, "सर्व मानवी इंद्रियांत श्रवणेंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. जगतात जल व वायू प्रदूषणाप्रमाणेच भावप्रदूषण झाले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी श्रवण माध्यम गरजेचे आहे. श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नव्हे, तर ऐकलेल्या गोष्टीमागील कार्यकारणभाव समजून घेणे होय. त्यासाठी श्रवणभक्ती आवश्यक आहे."

अध्यक्षीय भाषणात रूद्रपशुपती महास्वामी म्हणाले, "श्रवणभक्ती म्हणजे संतपूजा व देवपूजा. सामान्य जनांसाठी त्यांचा गुरु हाच संत आणि देव असतो. प्रत्येकाने गुरू केला पाहिजे. गुरुंची पूजा करावी आणि गुरुंची आज्ञा प्रमाण मानून आपले आचरण ठेवावे. ईश्वरस्वामींनी त्यांच्या गुरुची आज्ञा ऐकून कार्य केल्यामुळे आज या परिसरात भक्तीचा मळा फुललेला दिसतो."

संमेलनाच्या मंचावर रामानंद महास्वामी (बसवनाळ), नीलकंठ महास्वामी (म्हैसूर), मल्लय्या महास्वामी (घोडोरी), पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी (सिद्धसंस्थान मठ, निडसोशी), जयदेव महास्वामी (वनश्री मठ, गदग), विरूपाक्ष महास्वामी (गणीकोप्प), नंदीश्वर महास्वामी (विजापूर) यांचा तसेच इतर उपस्थित महास्वामींचा हंचिनाळ ग्रामस्थ आणि आयोजकांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

बसवलिंग महास्वामी (उगार) व सिद्धलिंग महास्वामी (म्हैसूर) यांनी स्वागतगीत म्हटले. उपस्थित महास्वामीचे स्वागत व परिचय श्रद्धानंद महास्वामी यांनी करून दिला. प्रास्ताविक सौम्या सुंकद (हुबळी) हिने केले. सूत्रसंचालन श्री. डोंगरे (एकसंबा) आणि अजित गणेशवाडीकर यांनी केले.

सौम्या सुंकदचे प्रास्ताविक

सौम्या सुंकद (वय १६) ही अकरावीत शिकणारी हुबळीची मुलगी. लहानपणीच तिला धार्मिक अभ्यासाची गोडी लागली. आजच्या संतसंमेलनात तिने प्रास्ताविकाची जबाबदारी पेलली. उपस्थित सर्व धर्मगुरूंसमोर तिने आत्मविश्वासाने व ओघवत्या भाषेत 'निस्वार्थ भक्तीतूनच परमार्थाचा मार्ग सापडतो,' हे विविध उदाहरणांनी सांगितले. तिचे 'प्रवचन तरंग' हे धार्मिक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. उपस्थित भक्तगण व संतमहंतांनी तिचे कौतुक केले.

क्षणचित्रे

·         सुमारे चार ते पाच एकर परिसरात भव्य शामियाना

·         मांगूर फाट्यापासून तसेच कोगनोळी फाट्यापासून फलक

·         भक्तगणांना प्रवचनाचा लाभ अखंडितपणे मिळावा, यासाठी संमेलन मंडपात ठिकठिकाणी क्लोज-सर्किट टी.व्ही.ची व्यवस्था

·         पाच दिवस भक्तगणांसाठी अखंड प्रसादाचे आयोजन

·         भक्तांच्या वर्दळीने मठाचा माळरान परिसर फुलून गेलेला

 

आजचा कार्यक्रम

·         सकाळी ८ ते ११ 'नामस्मरण भक्ती' प्रवचन

उपदेशक शिवानंद महास्वामी (हळींगळी), गुरुनाथ महास्वामी (संगधेरी), दयानंद महास्वामी (गदग), गोपालशरण एकंची.

·         दुपारी ४ ते रात्री ८ 'पादसेवन भक्ती' प्रवचन.

उपदेशक - कुमार निजगुण महास्वामी (चिकलवाड), अनदानेश्वर महास्वामी (म्हैसूर), सहजानंद महास्वामी (महालिंगापूर).

·         रात्री ८ वाजता ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचा भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम.

शनिवार, ८ जुलै, २०००

सीमाप्रश्न सुटेपर्यंत 'अनवाणी' राहण्याची जगावेगळी प्रतिज्ञा!

(सोलापूरच्या दै. संचारच्या सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानावर दि. ८ जुलै २००० रोजी ठळकपणाने बायलाइन प्रकाशित झालेली माझी बातमी.)






(आलोक जत्राटकर)


कोल्हापूर, दि. ७: निपाणी आणि परिसरातील नागरिकांसाठी सीमाप्रश्न हाअत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. येथील मराठी भाषिकांनी या भागाचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे म्हणून प्रयत्न चालविले आहे. परंतु आजतागायत हा प्रश्न सोडविण्याऐवजी या प्रश्नाचे राजकीय भांडवल अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर सामान्यजनांनी आपल्यापरीने सीमाप्रश्नासाठी योगदान देणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकीच एक असणारे रामचंद्र धोंडीबा परीट (दिवाणजी) हे सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासमोर पानपट्टीचा गाडा चालवतात. 'सीमाप्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे.
रामचंद्र परीट मूळचे निपाणीचे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. सातवीनंतर त्यांना शालेय शिक्षणाला रामराम ठोकून दिवाणजीची नोकरी पत्करावी लागली. विनोबांच्या भूदान चळवळीची कर्नाटकातील सभा आटोपताच त्यांच्या महाराष्ट्रात प्रवेशावेळी कन्नडमधून भाषणे झाली, त्याला मोठा विरोध झाला. त्यामध्ये अनेकांनी विविध प्रतिज्ञा करून आपल्या मराठी अस्मितेचा रंग दाखवला. अंगावर वस्त्र परिधान न करण्याची, दाढी व केस न कापण्याची अशा प्रतिज्ञा केल्या. त्याच प्रसंगी रामचंद्र परीट यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानुसार, आजतागायत ते अनवाणी राहिले आहेत. त्यांच्या या महाराष्ट्रनिष्ठेला 'दै. संचार'चा सलाम!

शनिवार, १ जुलै, २०००

श्रमाची पूजा बांधणारा साहित्यिक

(सोलापूरच्या 'दै. संचार'साठी बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. निपाणीचे ज्येष्ठ साहित्यिक श्री. महादेव मोरे यांच्या वाढदिवसाची दि. १ जुलै २००० रोजी 'संचार'च्या अष्टपैलू पुरवणीत सर्व आवृत्त्यांत छापून आलेली याची बातमी.)



'श्रमाची पूजा' बांधत आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या महादेव मोरे या वास्तववादी साहित्यिकाच्या अनोख्या वाढदिवसाची कथा....


निपाणी येथील ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचा बासष्ठावा वाढदिवस त्यांनी आपली नित्याची कामे उरकूनच साजरा केला.

आज वाढदिवस असूनही मोरे गुरुवारचा बाजार असल्याने आणि त्यांच्या पिठाच्या गिरणीकडे गावातील व बाजाराला येणाऱ्या लोकांची दळणासाठी रीघ लागत असल्याने सकाळी लवकरच ते तिकडे गेले होते. 'झोंबडं', 'वर आभाळ, खाली धरती', 'एकोणीसावी जात', 'स्टैंड', 'दवणा', 'इंगीत', 'पावणा', 'डूख', 'चिताक', आदि ३९ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या 'झोंबडं' या कादंबरीला १९७५-७६ चा ग. ल. ठोकळ पुरस्कार आणि 'चिताक'ला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अजूनही ते विविध वृत्तपत्रांसाठी, दिवाळी अंकांसाठी कथा लिहित असतात. परंतु 'साहित्याने प्रतिष्ठा मिळते पण भाकरी नाही' या मताचे श्री. मोरे हे निपाणी येथे पिठाची गिरणी चालवून गुजराण करतात. अत्यंत साधी राहणी व प्रसिद्धी-पराङमुखता ही मोरे यांची वैशिष्ट्ये आहेत. गेल्या वर्षी श्री. आनंद यादव यांनी मोरे यांच्या एकसष्टी कार्यक्रमात 'महादेव मोरे यांचे कर्तृत्व, साहित्यक्षेत्रातील योगदान जितके आहे. त्याप्रमाणात त्यांची दखल घेतली गेलेली नाही.' ही खंत बोलून दाखविली होती आणि ते सत्यही आहे.
मोरे यांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील व परिसरातील साहित्यिक, त्यांचे चाहते आणि नागरिक त्यांच्या गिरणीत येऊनच शुभेच्छा देत होते आणि मोरे ही त्यांचा आपले काम करतच स्वीकार करीत होते. 'दै. संचार'च्या वतीने आमचे प्रतिनिधी आलोक जत्राटकर यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.

गुरुवार, १३ एप्रिल, २०००

रामोजी फिल्मसिटी... सारे अद्‌भुतच !

 


('दै. सकाळ'च्या साप्ताहिक रंजन पुरवणीमध्ये गुरुवार, दि. १३ एप्रिल २००० रोजी प्रकाशित झालेला माझा लेख. एमजेसीच्या स्टडी टुरदरम्यान हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीला भेट देण्याचा योग आला. सन १९९६मध्ये स्थापन केलेल्या या स्टुडिओसंदर्भात मराठी दैनिकात अत्यंत तपशीलवार प्रसिद्ध झालेला हा पहिलाच लेख ठरला. तसा अभिप्राय पुरवणी संपादक श्री. संजय करकरे आणि सकाळचे संपादक श्री. अनंत दीक्षीत यांनीही दिला, माझ्यासारख्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यासाठी ही मोठी प्रोत्साहनाचीच बाब आहे. त्याबद्दल या दोघांसह दै. सकाळ परिवाराला मनापासून धन्यवाद.- आलोक जत्राटकर)



रामोजी फिल्मसिटीच्या प्रवेशद्वारी लेखक आलोक जत्राटकर (सन २०००)

रामोजी फिल्मसिटीच्या भेटीप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे एम.जे.सी.चे विद्यार्थी प्रा. निशा मुडे यांच्यासमवेत. (डावीकडून) धर्मेंद्र पवार, संदीप तेंडोलकर, प्रज्ञा कलमे, संजय साळुंखे, समाधान पोरे आणि निशिकांत तोडकर

युरेका

हवामहल येथून दिसणारे रामोजी फिल्मसिटीचे दृश्य

जपानी वास्तू

फिल्मसिटीमधील कारखाना 'माया'




हैदराबादजवळ असणारी रामोजी राव यांची फिल्मसिटी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अद्भुत फिल्मसिटी चा एक फेरफटका...

एका सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्ती... तरुणपणी शहरात नोकरीसाठी धावपळ... अखेर एका ठिकाणी सामान्य नोकरी... ती सोडून काहीतरी व्यवसाय करीत त्यात वर्चस्व... अखेर तो त्या व्यवसायातला बादशहा बनतो. बऱ्याच चित्रपटांतून हिरोची भूमिका अशा पद्धतीने रेखाटलेली असते, प्रेक्षकांना ते अवास्तव वाटते. पण एका व्यक्तीचा प्रवास हा अगदी याच टप्प्याटप्प्याने झालेला आहे आणि ती व्यक्ती आज आंध्र प्रदेशातील सर्वाधिक शक्तिमान आणि प्रसारमाध्यमांची अनभिषिक्त सम्राट मानली जाते, ती व्यक्ती म्हणजे रामोजी राव!

आंध्रच्या कृष्णा जिल्ह्यातील एका खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामोजी रावांनी १९५८ मध्ये विज्ञानाची पदवी हाती येताच नोकरीसाठी दिल्ली गाठली. तिथे काही वर्षे एका जाहिरात संस्थेत छोटी नोकरी केल्यावर १९६२ मध्ये ते हैदराबादला परतले. तेथे त्यांनी चिटफंड व्यवसाय सुरू केला. त्यात प्रगती करत असतानाच एक उणीव त्यांच्या लक्षात आली, की विशाखापट्टणम् सारख्या मोठ्या बंदर शहरात एकही तेलगू दैनिक सकाळी उपलब्ध नसते. त्यांनी १९७४ मध्ये 'इनाडू' (मराठी अर्थ: आज) दैनिक सुरू केले. हळूहळू विविध व्यवसायांमध्ये ते शिरले. प्रत्येक ठिकाणी त्यांना भरघोस यश मिळत गेले. आंध्रमध्ये दररोज जवळजवळ नऊ लाख खप असणारे 'इनाडू दैनिक', 'इटीव्ही' ही लोकप्रिय तेलुगु चित्रवाहिनी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी, तरीही विश्वासार्ह व प्रतिष्ठित अशी 'मार्गदर्शी' चिटफंड कंपनी, यशोधरा शिपिंग, युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युशन, प्रिया टिफिन्स, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कलांजली शोरूम, कलांजली हॅन्डिक्राफ्टस एम्पोरियम, कलांजली टेक्स्टाईल्स, उषाकिरण मूव्हिज, रामोजी फिल्मसिटी असे प्रचंड साम्राज्य रामोजी रावांनी उभे केले आहे. तीन हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे ते अधिपती आहेत. हैदराबादपासून २५ किलोमीटर अंतरावर स्थित १२०० एकर परिसर व्यापलेल्या, रामोजी रावांच्या 'रामोजी फिल्मसिटी'ला भेट दिली असता 'जगातील सर्वांत मोठी चित्रनगरी' या वर्णनाची सत्यता पटली.
'रामोजी फिल्मसिटी'समोर आले की तिच्या आकर्षक प्रवेशद्वारापासूनच मनाला भुरळ पडायला सुरवात होते. तिथून टुरिस्ट बसमधून प्रेक्षकांना फिल्मसिटीमध्ये नेले जाते. येथे पोहोचताच एक मोठा भुईकोट किल्ला (अर्थातच बनावट, सध्या उभारलेला) आपले स्वागत करतो. याला 'युरेका' नाव दिले आहे. याच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आधुनिक किल्ल्यातच आल्याप्रमाणे वाटते. युरेकामध्ये खरेदी करण्याची, खाण्यापिण्याची सोय आहे. येथे मौर्य, मुग्धा, ब्लॅककॅट वेअर हाऊस, फ्रंटीयर लँड, शांग्रिला अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. आग्र्याच्या मीनाबाजारचे प्रतिरूपही येथे उभे केले आहे. येथे आपल्या 'फिल्मसिटी' भेटीची आठवण म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करता येते. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर शाकाहारींसाठी 'चाणक्य', मांसाहारींसाठी 'आलमपनाह' आणि पाश्चिमात्य पद्धतीचे 'गनस्मोक' अशी रेस्टॉरंटस सेवेला तत्पर आहेत.
'फिल्मसिटी'ची सफर युरेकापासून सुरू होते. सफरीसाठी खास बस आणि गाईडची सोय केलेली आहे. चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मात्र परवानगी नाही. प्रवासाला सुरवात होते आणि गाईड या अद्भुत दुनियेतील एकेक ठिकाणाबद्दल तेलगू, हिंदी, इंग्रजीतून माहिती सांगू लागतो.
सुरवातीलाच लक्ष वेधून घेतात ते प्रचंड उंचीचे आणि कोरीव शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असलेले 'सन फाऊंटन' आणि 'एंजेल फाऊंटन'. नंतर आपली गाडी एकदम राष्ट्रीय महामार्गावरून धावू लागते. राष्ट्रीय महामार्ग म्हटलं, की पंजाबी धाबा हवाच. त्यामुळे इथे धाब्याचा कायमस्वरुपी सेटच उभा केलेला आहे. थोडे पुढे गेलो की 'सितारा' (पंचतारांकित) व 'तारा' (तीन तारांकित) ही खरीखुरी हॉटेल्स आहेत. त्यानंतर काही अंतरावर (नकली) चहाचे 'मळे दृष्टीस पडतात. न जाणो एखाद्या निर्मात्याला चहाच्या मळ्यात शूटिंग करायचे असेल, तर अडचण नको. पुढे गेलो, की आपण एकदम युरोप, अमेरिकेच्या रस्त्यावर तर नाही ना, असे वाटते. कारण आपण थेट 'प्रिन्सेस स्ट्रीट'वर असतो, परदेशातील आधुनिक बंगल्यांचा आणि रस्त्यांचा हा सेट आहे. येथे सर्व ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडता येईल, अशीही व्यवस्था आहे. प्रिन्सेस स्ट्रीटवरून बाहेर आलो की आपण जुन्या आश्रमकाळात जातो. इथे त्या काळातील आश्रम, घरे, झाडे, केळीची झाडे, कुंपण अगदी हुबेहूब साकार केले आहे. गाडी पुढे सरकते आणि आपण मुंबईच्या झोपडपट्ट्यांतून वाट काढत जाऊ लागतो. हा सेटही कायमस्वरुपी आहे. त्यानंतर आपली गाडी रेल्वेस्थानकात उभी राहते. रेल्वेस्थानक वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका बाजूला मोठ्या शहरातील विविध सुविधा, स्टॉल्स, वेगवेगळ्या जाहिराती असलेले असे; तर, पलीकडील बाजूस खेड्यातील शांत, रम्य असा प्लॅटफॉर्म, रेल्वेचे डबेही (रुळाऐवजी टायरवर असले तरी) शूटिंगसाठी कायम तयार असतात. तेथून बाहेर पडताच सेंट्रल जेलची तीन प्रवेशद्वारे दिसतात. तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत.
त्यांना मागे टाकून आपण वळलो, की समोर उंचच उंच पोलादी सळ्यांचा सांगाडा दिसतो. निर्मात्याच्या गरजेनुसार या सांगाड्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स, इमारती, चाळी असे कशातही रुपांतरित करता येते. याच्या थोडे पुढे एक मोठे गॅरेज आहे. या ठिकाणी अगदी अद्ययावत गाड्यांपासून ते अगदी मोडक्या तोडक्या अवस्थेतील गाड्याही आहेत. चित्रीकरणाला लागेल तशी गाडी येथे उपलब्ध असते. यापासून काही अंतरावर एक मंदिर आहे. या ठिकाणीही कथेच्या गरजेप्रमाणे गाभाऱ्यातील देव बदलता येतो. मंदिर मात्र तेच!
मंदिरापासून पुढे येताच प्रशस्त अशी विमानतळाची इमारत दिसते. बाह्यरुपात किरकोळ बदल करून येथे कोणतेही विमानतळ तयार करता येते. आतमध्ये विमानाच्या अंतर्भागाचा कायमस्वरुपी सेट लावलेला आहे. तेथील खुर्चीवर बसले की बाहेरील निळे आकाश दिसण्याचीही खबरदारी घेतली आहे. येथून काही अंतरावर मोठी इमारत दृष्टीस पडते. सर्वसाधारणपणे न्यायालयाची दृश्ये इथे घेतली जातात. पण गरजेनुसार मोठे ग्रंथालय, हॉटेल, महाविद्यालय असे रूपही देता येते.
यानंतर आपण बगीचा विभागामध्ये येतो. विविध प्रकारच्या बागा या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृतीही येथे आहे. फुलझाडे, शोभेची झाडे तर प्रचंड प्रमाणावर आहेत. विशेष म्हणजे इथे असणारे प्रत्येक रोप किंवा गरजेप्रमाणे लागणारी झाडे ही फिल्मसिटीतच तयार केली जातात. त्यासाठी येथे ग्रीनहाऊस आणि वेगवेगळी रोपे उगवण्यासाठी सुपीक जमीनही आहे, चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगसाठी अभिनेत्रीच्या साडीच्या रंगाचीही हवी तितकी फुले तयार करण्याची क्षमता या विभागाकडे आहे. बागांमध्ये ठिकठिकाणी विविध प्रकारच्या मूर्ती, पुतळे उभे केले आहेत. हे पुतळे निर्मात्याच्या गरजेनुसार पाहिजे तिथे हलवता येतात किंवा काढूनही टाकता येतात.
फिल्मसिटीत एका उंच टेकडीवर संपूर्ण प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये बारीक कोरीव काम केलेला अत्यंत आकर्षक असा 'हवामहल' आहे. येथून फिल्मसिटीचा नयनरम्य देखावा पाहता येतो. हवामहालच्या मागील बाजूस जलतरण तलाव आहे. या एकाच टँकमधील पाण्याची पातळी कमी-जास्त करून त्याला विविध आकार देता येतात. पाण्यात कॅमेरा लावण्याची व्यवस्था आहे. तसेच वेगवेगळे प्रकाशझोत वापरून पाण्याचा रंगही बदलता येतो. हवामहलमधून आपण खाली येतो तेच 'जपान'च्या परिसरात. जपानमधील काही पारंपरिक इमारती येथे उभ्या करण्यात आलेल्या आहेत. जपानच्या देखाव्यातून बाहेर आलो, की काही अंतरावर मोठा प्रशस्त बंगला आहे. चित्रपटांना नेहमीच अशा बंगल्यांची गरज असते, साध्या घरांचा सेटही इथे तयार आहे.
फिल्मसिटीच्या एका टोकाला 'माया' आहे. या 'माया' इमारतीमध्ये शूटिंगसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि लाकडापासून बनवले जाते. येथील कामगारांची संख्या दोनशेच्या आसपास आहे.
चित्रपटाच्या विविध संस्करणासाठी आवश्यक असणारी लॅब, स्टुडिओही या ठिकाणी उपलब्ध आहे. निर्मात्याने एकदा फिल्मसिटीत आपल्या युनिटसह प्रवेश केला, की हातात चित्रपटाच्या प्रिंटस् घेऊनच बाहेर पडावे, याची पूर्ण काळजी रामोजी रावांनी घेतलेली दिसून येते. आपण त्यांच्या कल्पकतेला आणि निर्मितीक्षमतेला दाद देतच फिल्मसिटीतून बाहेर पडतो.