बुधवार, ६ मार्च, २००२

मागणी रास्त, पण....

('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीमध्ये 'चर्चा' या साप्ताहिक सदरामध्ये बुधवार, दि. ६ मार्च २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे फेरसादर करीत आहे.)




निपाणीतील दिवेकर कॉलनीतील वेश्यांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांनी गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृतीसाठी कार्यरत असलेल्या संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेच्या श्रीमती मीना शेषू येथे वेश्यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत, अशी चर्चा एका वर्तुळात सुरू आहे. यातील गंभीर बाब अशी की, पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनीही श्रीमती शेषूंना सहकार्य करणे तर दूरच; उलट त्या आणि त्यांचे सहकारी पत्रकार नील पाटे यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधले. याशिवाय वेश्या या 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असेही उद्‌गार एका पोलिस अधिकाऱ्याने काढले. हीच सर्वात आक्षेपार्ह बाब आहे. हा विषय गुंतागुंतीचा अनेक पदरी असल्याचे झालेल्या घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे श्रीमती शेषू यांनी सुरवातीच्या काळात स्वतःच्या घरी वेश्यांच्या बैठका घेतल्या, हे विसरता येणार नाही. एका महिलेने अशा पद्धतीने काम करणे हीच आजही अत्यंत वेगळी वाटणारी तरीही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधणे म्हणजे त्यांच्या कामाचा आणि त्यातील मानसिक, भावनिक गुंतवणुकीचा तो अपमानच म्हटला पाहिजे.
दुसरी बाब म्हणजे पोलिस अधिकाऱ्याने वेश्यांना 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असे म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उद्‌गारांतून स्पष्ट होतो. पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या भिंतीला लागून असलेल्या दिवेकर वस्तीत वेश्या व्यवसाय वर्षानुवर्षे का सुरू राहिला, याचे उत्तर त्यांच्या उद्‌गारांमागील प्रवृत्तीत आहे.
सुरवातीपासूनच पोलिसांनी येथील वेश्यांविरुद्ध कारवाई करून दबाव आणला असता तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे दिवेकर वस्तीतील नागरिकांनीच दबाव आणून आतापर्यंत येथे वेश्यावस्ती वाढू दिलेली नाही. श्रीमती शेषू यांनी येथे येऊन आपल्या संस्थेची शाखा उघडल्यानंतर त्या नागरिकांना परत येथे वेश्यावस्ती वाढण्याचे भय वाटते आहे, हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल किंवा त्यांना श्रीमती शेषू यांच्या कार्याची पुरेशी माहिती नसावी. या नागरिकांच्या भावनांचा काही नगरसेवकांनी फायदा उठवून त्यांना चिथावले आणि येथील वेश्या व्यवसाय बंद करावा म्हणून मोर्चा काढला. त्यांची मागणी अगदी रास्त आहे; पण, त्यांनी श्रीमती शेषू वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप करणे पूर्णतः चुकीचे आहे.
मुळात एखाद्याच्या प्रोत्साहनामुळे वेश्या व्यवसाय वाढतो, असे म्हणणेच चुकीचे आहे. किंबहुना वेश्या व्यवसाय संबंधितांनी स्वेच्छेने स्वीकारला असे कधीही होत नाही. वेश्या निर्माण होण्यास समाजच कारणीभूत असतो. निपाणी जर इतकी स्वच्छ होती, येथील सगळेच नागरिक इतके चारित्र्यसंपन्न होते, तर येथे वेश्यावस्ती निर्माण झालीच कशी, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर ठळकपणे सामोरा येतो. त्याला उत्तर आहे ?
त्या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला एक महिला पुढे सरसावते, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविते, त्यांना आपलेपणाने वागविते. यामुळे या वेश्यांनाही त्यांच्याबाबत आत्मीयता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच त्या त्यांच्याकडे येतात. इतर समाजाने त्यांना ओरबाडण्याखेरीज दुसरे काय केले आहे?
साधारण एक वर्षांपूर्वी वेश्यांची राष्ट्रीय परिषदही झाली. त्यावेळी देशभरातून हजारो वेश्या राजधानीत एकत्र आल्या होत्या, याचीही आठवण येथे द्यायलाच हवी.
पूर्वापार दुर्लक्षित असलेल्या या समाजघटकाच्या समस्यांकडे गांभीयनि कोणीही पाहत नाही. यासाठीच त्यांना संघटित करून एडस् तसेच इतर समस्यांबाबत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी काम करणाऱ्या श्रीमती शेखूंसारख्या सेवाभावी व्यक्तींना किमान उपद्रव देऊ नये, ही जबाबदारी ओळखण्याचे भान आपल्याला कधी येणार हा प्रश्न आहे.
याबाबत येथील स्थानिक सेवाभावी सामाजिक संस्थांनीही मौन का बाळगले आहे, हे समजायलाही मार्ग नाही. वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी व नागरिकांनी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, केवळ या वेश्यांना येथून हाकलून देऊन चालणार नाही. कारण त्या इतरत्र जाऊन पुन्हा तोच व्यवसाय करणार! यावर उपाय म्हणजे त्यांना पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून निर्वाहाचा दुसरा मार्ग निवडण्यासाठी प्रोत्साहन व सहाय्य देणे, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःची मानसिकता आधी बदलायला हवी.
केवळ कर्नाटकातील वेश्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर देवदासी प्रथेचा याला प्रचंड मोठा हातभार आहे. पुण्या-मुंबईमध्येसुद्धा या देवदासीच अधिकांशरित्या भोगदासी झालेल्या आहेत. याबरोबरच गरिबी, अज्ञान आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायाकडे महिला-मुली वळताना दिसतात.
वेश्या व्यवसायाच्या निर्मूलनासाठी आपण प्रत्यक्ष जरी काही करत नसलो तरी कार्यकर्त्यांना सहकार्य करू शकतो. तेही शक्य नसेल तर त्यांना त्रास देऊन खच्चीकरण करणे तरी थांबवावे. त्यांना शांतचित्ताने आपले काम करू द्यावे. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरेल. तेवढा विवेक आता आपण दाखवायलाच हवा !

मंगळवार, ८ जानेवारी, २००२

विद्याकरच्या रूपाने चेन्नईत 'फादर तेरेसा'

(दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये दि. ८ जानेवारी २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा विशेष लेख ब्लॉगवाचकांसाठी...)

 



काही माणसांचा जन्मच दुसऱ्यावर प्रेम करणे, माया देणे, दुःखावर फुंकर घालणे, यासाठीच झालेला असतो की काय, असे त्यांचे जीवितकार्य पाहून वाटते. मदर तेरेसा त्याचे मूर्तिमंत प्रतीक. चेन्नई येथील विद्याकर यांचे कार्यही मदर यांच्या कामाशी किती तरी साधर्म्य दाखविणारे आहे. जणू ते चेन्नईतील दीन-दुःखितांचे 'फादर' तेरेसाच आहेत.

अद्याप पन्नाशीही न गाठलेल्या विद्याकर यांनी गेल्या अठरा वर्षांत समाजाने नाकारलेल्या सुमारे अठराशे लोकांसाठी मायेचे, आपुलकीचे नंदनवन उभारले आहे. त्यांच्या या प्रचंड परिवारात नवजात अर्भके, हरवलेली, टाकून दिलेली मुले, घराबाहेर काढलेली माणसे ते मृत्युपंथाला लागलेल्या आजारी वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. मोठी आर्थिक अडचण असूनही त्यांच्याकडे येणाऱ्या कोणाही गरजवंताला त्यांचा दरवाजा कधीही बंद नसतो. अशा व्यक्तीने त्यांना एक दूरध्वनी जरी केला तरी काही वेळातच ते त्याच्यासमोर हजर असतात. या लोकांसाठी त्यांनी चेन्नईबाहेर एका प्रशस्त, शांत आवारात निवासस्थान उभारले आहे. तेथेच ते आसपासच्या खेडेगावातील मुलांसाठी शाळाही चालवितात.

या सर्व गोष्टी विद्याकर यांच्या हातून घडत आहेत, याचे बरेचसे मूळ त्यांच्या लहानपणात रुजलेले आहे. १९५३ ला म्हैसूरजवळच्या कोल्लीगल खेड्यात जन्मलेल्या विद्याकर यांचे आई-वडील त्यांच्यांवर सतत रुष्ट असत. ज्यावेळी काहीच समजत नव्हते, अशा वयात आपल्या आई-वडिलांना आपण नको आहोत, एवढे त्यांना समजले, 'का' ते समजायचे, ते वय नव्हते. त्यामुळे ते बराचसा वेळ घराबाहेर घालवित. रस्त्यावर भटकणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणे अशी कामे करीत, जेणेकरून स्वतःला समाधान मिळेल, असे ते पाहत होते.

१९६७ मध्ये म्हैसूरमधील एका अपघाताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. रस्त्यावरून जात असताना त्यांनी प्रथमच एक अपघात पाहिला. मोटारीमध्ये एक मनुष्य गंभीर जखमी होता. त्या माणसाला रुग्णालयाच्या गाडीतून नेल्यानंतर बघ्यांची गर्दी आपोआप ओसरली. विद्याकर मात्र त्या गाडीमागे पळत सुटले. त्यानंतर रुग्णालयात त्या माणसाची दोन आठवडे शुश्रूषा केली. मद्रासमध्ये वाहनांचे सुटे भाग विक्रेते असणाऱ्या त्या रामकृष्णन यांच्याशी भाषेची अडचण असूनही प्रेमाचे धागे जुळले. १९८३ पर्यंत, रामकृष्णन यांच्या मृत्यूपर्यंत हे संबंध अतूटच राहिले.

ते रामकृष्णन यांच्याकडे मद्रासला गेले, त्यांनी मानसोपचार, समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी घेतली, मनोरुग्ण आणि कुष्ठरोग रुग्णालयात तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. इतर काही व्यवसाय करण्याचा विचारही त्यांना कधी शिवला नाही. त्यांनी रामकृष्णन यांच्या दुकानासमोर आपल्या 'उदवुम करंगल' संस्थेचा फलक लावला. या तमिळ शब्दांचा अर्थ 'मदतीचे हात' असा आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कामाचा व्याप वाढतच गेला आणि विद्याकर चेन्नईतील दीनदुबळ्यांचे 'मसीहा' ठरले.

विद्याकर यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अनंत आर्थिक अडचणी असूनही त्यांना कोणतीही शासकीय मदत वा निधी मिळालेला नाही. संपूर्णपणे वैयक्तिक दात्यांकडून आलेली मदतच त्यांच्या संस्थेला साहयभूत ठरली. चांगली गोष्ट म्हणजे या दात्यांत भारतीयांचे प्रमाण मोठे आहे. किमान शंभर रुग्णांची सोय असणारे रुग्णालय बांधणे; तसेच कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, मनोरुग्ण या सर्वांचीच आपल्या कुटुंबात अधिक चांगली सोय करणे, ही विद्याकर यांची आता तळमळ आहे.

रविवार, १३ मे, २००१

हंचिनाळला पाच दिवसाच्या संत संमेलनाचा समारोप; हजारो भक्तगणांची उपस्थिती

'संत दर्शनापेक्षा संत होण्यासाठी वाटचाल करा'

(दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय संत संमेलनाच्या समारोप समारंभाची बातमी पान-१ वर प्रकाशित झाली. रात्री ९ वाजता हंचिनाळ येथून फॅक्सद्वारे ही बातमी पाठविण्यात आली.)

 


(आलोक जत्राटकर यांजकडून)

हंचिनाळ, ता. १२: सर्व प्रकारच्या विकारांवर विजय मिळविल्यास मनुष्य संतपदाकडे वाटचाल करतो. केवळ संतांचे दर्शन नको, तर सर्वांनी संत होण्याकडे वाटचाल करावी. त्यासाठी तपश्चर्येची किंवा शास्त्रज्ञानाची आवश्यकता नाही. संत होणे म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये पवित्र प्रेमाची स्थापना करणे होय, असे प्रतिपादन सिद्धेश्वर महास्वामी (ज्ञानयोगाश्रम, विजापूर) यांनी केले. येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागांतून सुमारे ५० हजार भक्तगण उपस्थित होते.

ते म्हणाले, "प्रेमामुळेच मनुष्याचे मन पवित्र आणि भक्ती संपन्न होते. संत दर्शन करा; पण त्यापेक्षा संतसाधना महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल आणि मोक्षाकडे वाटचाल कराल."

जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (संतूर संस्थान मठ, म्हैसूर) म्हणाले, "निरपेक्ष व निष्कामबुद्धीने केलेली भक्ती भगवंताला प्रिय असते. भक्ती कोणत्या पद्धतीने केली, यापेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची असते. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी आपापल्या पद्धतीने भक्ती केली. त्यांची भक्ती परमेश्वराने स्वीकारली."

ते म्हणाले, "इतर योगामध्ये साध्यासाठी ठराविक मार्ग आहेत; पण भक्तीसाठी ठराविक मार्गाचे बंधन नाही. देवाबद्दल मनात शंका न ठेवता भक्तांनी प्रार्थना केली पाहिजे. सत्ता, पैसा, जमीन यासाठी कोटी कोटी मेले; पण भगवंतासाठी व भक्तीसाठी एकही जण मेलेला नाही. निसर्गावर आपण सातत्याने अत्याचार करतो. परंतु या कृतीतून आपण परमेश्वरालाच इजा करीत आहोत, ही भावना आपल्या मनालाही शिवत नाही, याबद्दल जोपर्यंत आपल्या मनात सहानुभूती निर्माण होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही."

ते पुढे म्हणाले, "अशिक्षितपणा सोडून लोकांनी शिक्षणाच्या वाटा स्वीकारल्या पाहिजेत. यासाठी संतूर मठाद्वारे सुमारे २५० शिक्षण संस्था कार्य करीत आहेत. गरिबांच्या मुलांना या शिक्षण संस्थांमध्ये बारावीपर्यंतमोफत शिक्षणाची सोय केली आहे."

यावेळी ईश्वर स्वामींनी आयोजित केलेले संत संमेलन यशस्वी झाल्याचे सांगून ते म्हणाले, "ईश्वर स्वामींच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून भक्ती योगाश्रम साकारला आहे. विजापूरच्या सिद्धेश्वर महास्वामींच्या अखत्यारीतच ते तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे येथील कार्य अखंडित सुरू राहील, यात शंकाच नाही. परिसरातील लोकांना भक्ती कशी असावी, हे सांगण्यासाठी त्यांनी पाचही दिवस भक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा घडवून आणली.

यावेळी सर्व उपस्थित स्वामींचे, भक्तांचे व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानताना ईश्वर स्वामी म्हणाले, "मी भक्ती योगाश्रमामध्ये सद्‌गुरूंच्या आदेशानुसार ज्ञान व भक्ती प्रसाराचे काम प्रामाणिकपणे करीत राहीन."

यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाश आवाडे, राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, संजय पाटील, रजनीताई मगदूम, कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार काका पाटील आदी उपस्थित होते.

आत्मनिवेदन म्हणजे देव व भक्ती यांची एकरुपता: निर्मलानंद महास्वामींचे प्रतिपादन

 (दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी संत संमेलनाविषयी प्रसिद्ध झालेले वृत्त.)

 

 


हंचिनाळ, ता. १२ (बातमीदार) : 'आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता होय,' असे विचार निर्मलानंद महास्वामी यांनी व्यक्त केले.

येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या पाचव्या दिवशी आज पहिल्या सत्रात विविध संतांची 'आत्मनिवेदन व भक्ती' या विषयावर प्रवचने झाली. संमेलनात आज तिघा जणांना संन्यस्त जीवनाची दीक्षा देण्यात आली. यात एका सहा वर्षांच्या मुलाचा समावेश होता. आज सदाशिव महास्वामी (म्हैसूर), निर्मलानंद' महास्वामी (विजापूर), सेवानंद महाराज (भांदवले), विनयानंदजी महास्वामी (मौजे वडगाव), शिवगंगाधर स्वामी (शिंदगी) यांची प्रवचने झाली.

निर्मलानंद महास्वामी म्हणाले, "आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता. आत्मनिवेदन भक्तीमुळे देव व भक्त यांच्यात अंतर राहत नाही. ईश्वरस्वामी प्रतिगाडगे महाराज आहेत."

विनयानंद महाराज म्हणाले, "मनामध्ये निर्मल भावना ठेवून भक्ती केल्यास यश प्राप्ती होते. आसक्ती संपविण्यासाठी विवेक व वैराग्य यांची गरज असते. विवेक, वैराग्य, षड्संपत्ती, ममत्त्व या चार गोष्टी आत्मज्ञान संपादन करण्यास आवश्यक असतात. संकुचितपणा म्हणजे मृत्यू व व्यापकता म्हणजे जीवन."

सेवानंद महाराज म्हणाले, "भोगासाठी जीवन नाही, ते मुक्तीसाठी असते. अध्यात्माचा संबंध हा मनाशीच असतो. ग्रहण करणे याला जीवनात महत्त्व आहे. शरणागतीचा भाग म्हणजे नम्र जीवन. गुरुमंत्राच्या जपाने जीवन सफल होते."

सदाशिव महास्वामी म्हणाले, "भक्ती म्हणजे हृदयातील मधु भाव. अहंकारमुक्त केलेली भक्ती सर्वश्रेष्ठ असते. आत्मा-परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती होय."

शिवगंगाधर स्वामी म्हणाले, "मोक्षासाठी भक्ती गरजेची असते. आत्मियतेने केलेली भक्ती भगवंताला आवडते. भक्तीमुळे माणसाच्या आयुष्यात सन्मार्ग येण्यास मदत होते."

दरम्यान, शुक्रवारी रात्री उषा मंगेशकर यांचा 'रंग उषेचा' हा गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात उषा मंगेशकर यांचा प.पू. शिवरात्री देशीकेंद्र सुत्तूर संस्थान मठ म्हैसूर यांच्या हस्ते सत्कार झाला. बाळासाहेब देवनाळ यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन संजय दामले यांनी केले. उषा मंगेशकर यांनी गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरवात केली. यात त्यांनी माझी रेणुका माऊली..., 'मेंदीच्या पानावर.... 'ऐरणीच्या देवा..., 'पाऊस पहिला बरसून गेला... अशी भक्तिगीते व भावगीते सादर केली.

'शालू हिरवा पाचूनी मढवा... हे बहारदार गीतही सादर केले. 'ऐ मेरे वतन के लोगो...' या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल देशपांडे व पुरुषोत्तम गोणावर यांनी त्यांना गायनात साथ केली. या कार्यक्रमाला सुमारे एक लाखाहून अधिक श्रोते उपस्थित होते. राजू जावळकर यांनी उत्कृष्ट ढोलकीवादन केले. जगद्‌गुरु ईश्वरानंदजी महास्वामी यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचा सत्कार झाला.

तिघांना दीक्षा

या कार्यक्रमात जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते ओंकार कृष्णा चौगुले (वय ६, रा. टाकवडे, ता. शिरोळ), सतीश रावसाहेब पाटील (वय ११, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), शंकर कृष्णा आण्णा (वय २४, भक्ती योगाश्रम) यांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांचे अनुक्रमे ओंकारानंद, सत्यानंद व धर्मानंद स्वामीजी असे नामकरण करण्यात आले. महास्वामीजींनी त्यांना कन्नडमधून दीक्षा व नियम-संहिता दिली.

बुधवार, ९ मे, २००१

‘पाच दिवसांच्या संत संमेलनास हंचिनाळ येथे उत्साहात प्रारंभ’

दीनदलितांचा उद्धार हेच भक्तीयोगाश्रमाचे उद्दिष्ट: ईश्वर स्वामी

 (दै. सकाळमध्ये रुजू होऊन महिना उलटण्यापूर्वीच हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय महा संत संमेलनाचे कव्हरेज करण्याची संधी मिळाली. दि. ९ मे २००१ रोजी दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीच्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेले संत संमेलनाच्या उद्घाटनाचे वृत्त.)

 

चिकोडी तालुक्यातील हंचिनाळ येथील भक्तियोगाश्रमामध्ये मंगळवारी भरलेल्या संत संमेलनाचे उद्घाटन करताना शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी. शेजारी रुद्रपशुपती महास्वामीमहेशानंद ईश्वर महास्वामीअदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीपंचम शिवलिंगेश्वर महास्वामीसिद्धेश्वर महास्वामीजयदेव महास्वामीनीलकंठ महास्वामी आदी.






हंचिनाळ, ता. ८ (खास बातमीदार): गोरगरिबांना आश्रय देणे, मदत करणे हे हेतू मनात ठेवूनच भक्तीयोगाश्रमाचा भक्तिवृक्ष उभारला आहे. त्याची सावली पददलित जनतेला मिळावी, हीच माझी इच्छा आहे, असे प्रतिपादन हंचिनाळ भक्ती योगाश्रम मठाचे अधिपती महेशानंद ईश्वर स्वामी यांनी आज येथे केले. पाच दिवसांच्या सर्वधर्मीय संत संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते उपस्थित महास्वामींना आणि भक्तांना संबोधित करत होते. अध्यक्षस्थानी रूद्रपशुपती महास्वामी (कोळेकर मठ, मिरज) होते. ज्ञानयोगाश्रम, विजापूरचे सिद्धेश्वर महास्वामी यांची विशेष उपस्थिती होती.

ते म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी मल्लिकार्जुन महास्वामींनी या उजाड माळरानावर आश्रमाची स्थापना करून भक्तीचे रोपटे लावले. या पवित्र परिसराला एवढे विस्तृत स्वरूप आलेले पाहून कार्यपूर्तीचे समाधान लाभले. इथून पुढील वाटचालही ग्रामविकास, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षणप्रसार अशा सामाजिक, शैक्षणिक कार्याबरोबर सुरू राहील.

भक्ती सेवाश्रमाच्या नवीन वास्तूचे शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (सुत्तूर संस्थान मठ, म्हैसूर) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नऊला संतसंमेलनाचे उद्घाटन झाले. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (सिद्धगिरी मठ, कणेरी) यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते; परंतु त्यांच्याच 'सूचनेनुसार हे उद्घाटनही शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रातील पहिल्या प्रवचनास सुरवात झाली. 'श्रवण भक्ती' या विषयावर योगानंद महास्वामी (रायरहेब्बळी); अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (कणेरी), प्रभूदेव महास्वामी (रबकवी), सिद्राम देशीकेंद्र महास्वामी (देवकरे) यांची प्रवचने झाली.

योगानंद महास्वामी म्हणाले, "मानवी जीवन आनंदी बनविण्यासाठी भक्ती आवश्यक आहे, त्याखेरीज आत्मिक शक्ती वाढत नाही. मानवी जीवनात समतोल राखण्याचे काम भक्ती करते."

अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, "सर्व मानवी इंद्रियांत श्रवणेंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. जगतात जल व वायू प्रदूषणाप्रमाणेच भावप्रदूषण झाले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी श्रवण माध्यम गरजेचे आहे. श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नव्हे, तर ऐकलेल्या गोष्टीमागील कार्यकारणभाव समजून घेणे होय. त्यासाठी श्रवणभक्ती आवश्यक आहे."

अध्यक्षीय भाषणात रूद्रपशुपती महास्वामी म्हणाले, "श्रवणभक्ती म्हणजे संतपूजा व देवपूजा. सामान्य जनांसाठी त्यांचा गुरु हाच संत आणि देव असतो. प्रत्येकाने गुरू केला पाहिजे. गुरुंची पूजा करावी आणि गुरुंची आज्ञा प्रमाण मानून आपले आचरण ठेवावे. ईश्वरस्वामींनी त्यांच्या गुरुची आज्ञा ऐकून कार्य केल्यामुळे आज या परिसरात भक्तीचा मळा फुललेला दिसतो."

संमेलनाच्या मंचावर रामानंद महास्वामी (बसवनाळ), नीलकंठ महास्वामी (म्हैसूर), मल्लय्या महास्वामी (घोडोरी), पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी (सिद्धसंस्थान मठ, निडसोशी), जयदेव महास्वामी (वनश्री मठ, गदग), विरूपाक्ष महास्वामी (गणीकोप्प), नंदीश्वर महास्वामी (विजापूर) यांचा तसेच इतर उपस्थित महास्वामींचा हंचिनाळ ग्रामस्थ आणि आयोजकांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

बसवलिंग महास्वामी (उगार) व सिद्धलिंग महास्वामी (म्हैसूर) यांनी स्वागतगीत म्हटले. उपस्थित महास्वामीचे स्वागत व परिचय श्रद्धानंद महास्वामी यांनी करून दिला. प्रास्ताविक सौम्या सुंकद (हुबळी) हिने केले. सूत्रसंचालन श्री. डोंगरे (एकसंबा) आणि अजित गणेशवाडीकर यांनी केले.

सौम्या सुंकदचे प्रास्ताविक

सौम्या सुंकद (वय १६) ही अकरावीत शिकणारी हुबळीची मुलगी. लहानपणीच तिला धार्मिक अभ्यासाची गोडी लागली. आजच्या संतसंमेलनात तिने प्रास्ताविकाची जबाबदारी पेलली. उपस्थित सर्व धर्मगुरूंसमोर तिने आत्मविश्वासाने व ओघवत्या भाषेत 'निस्वार्थ भक्तीतूनच परमार्थाचा मार्ग सापडतो,' हे विविध उदाहरणांनी सांगितले. तिचे 'प्रवचन तरंग' हे धार्मिक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. उपस्थित भक्तगण व संतमहंतांनी तिचे कौतुक केले.

क्षणचित्रे

·         सुमारे चार ते पाच एकर परिसरात भव्य शामियाना

·         मांगूर फाट्यापासून तसेच कोगनोळी फाट्यापासून फलक

·         भक्तगणांना प्रवचनाचा लाभ अखंडितपणे मिळावा, यासाठी संमेलन मंडपात ठिकठिकाणी क्लोज-सर्किट टी.व्ही.ची व्यवस्था

·         पाच दिवस भक्तगणांसाठी अखंड प्रसादाचे आयोजन

·         भक्तांच्या वर्दळीने मठाचा माळरान परिसर फुलून गेलेला

 

आजचा कार्यक्रम

·         सकाळी ८ ते ११ 'नामस्मरण भक्ती' प्रवचन

उपदेशक शिवानंद महास्वामी (हळींगळी), गुरुनाथ महास्वामी (संगधेरी), दयानंद महास्वामी (गदग), गोपालशरण एकंची.

·         दुपारी ४ ते रात्री ८ 'पादसेवन भक्ती' प्रवचन.

उपदेशक - कुमार निजगुण महास्वामी (चिकलवाड), अनदानेश्वर महास्वामी (म्हैसूर), सहजानंद महास्वामी (महालिंगापूर).

·         रात्री ८ वाजता ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचा भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम.

शनिवार, ८ जुलै, २०००

सीमाप्रश्न सुटेपर्यंत 'अनवाणी' राहण्याची जगावेगळी प्रतिज्ञा!

(सोलापूरच्या दै. संचारच्या सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानावर दि. ८ जुलै २००० रोजी ठळकपणाने बायलाइन प्रकाशित झालेली माझी बातमी.)






(आलोक जत्राटकर)


कोल्हापूर, दि. ७: निपाणी आणि परिसरातील नागरिकांसाठी सीमाप्रश्न हाअत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. येथील मराठी भाषिकांनी या भागाचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे म्हणून प्रयत्न चालविले आहे. परंतु आजतागायत हा प्रश्न सोडविण्याऐवजी या प्रश्नाचे राजकीय भांडवल अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर सामान्यजनांनी आपल्यापरीने सीमाप्रश्नासाठी योगदान देणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकीच एक असणारे रामचंद्र धोंडीबा परीट (दिवाणजी) हे सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासमोर पानपट्टीचा गाडा चालवतात. 'सीमाप्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे.
रामचंद्र परीट मूळचे निपाणीचे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. सातवीनंतर त्यांना शालेय शिक्षणाला रामराम ठोकून दिवाणजीची नोकरी पत्करावी लागली. विनोबांच्या भूदान चळवळीची कर्नाटकातील सभा आटोपताच त्यांच्या महाराष्ट्रात प्रवेशावेळी कन्नडमधून भाषणे झाली, त्याला मोठा विरोध झाला. त्यामध्ये अनेकांनी विविध प्रतिज्ञा करून आपल्या मराठी अस्मितेचा रंग दाखवला. अंगावर वस्त्र परिधान न करण्याची, दाढी व केस न कापण्याची अशा प्रतिज्ञा केल्या. त्याच प्रसंगी रामचंद्र परीट यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानुसार, आजतागायत ते अनवाणी राहिले आहेत. त्यांच्या या महाराष्ट्रनिष्ठेला 'दै. संचार'चा सलाम!

शनिवार, १ जुलै, २०००

श्रमाची पूजा बांधणारा साहित्यिक

(सोलापूरच्या 'दै. संचार'साठी बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. निपाणीचे ज्येष्ठ साहित्यिक श्री. महादेव मोरे यांच्या वाढदिवसाची दि. १ जुलै २००० रोजी 'संचार'च्या अष्टपैलू पुरवणीत सर्व आवृत्त्यांत छापून आलेली याची बातमी.)



'श्रमाची पूजा' बांधत आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या महादेव मोरे या वास्तववादी साहित्यिकाच्या अनोख्या वाढदिवसाची कथा....


निपाणी येथील ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचा बासष्ठावा वाढदिवस त्यांनी आपली नित्याची कामे उरकूनच साजरा केला.

आज वाढदिवस असूनही मोरे गुरुवारचा बाजार असल्याने आणि त्यांच्या पिठाच्या गिरणीकडे गावातील व बाजाराला येणाऱ्या लोकांची दळणासाठी रीघ लागत असल्याने सकाळी लवकरच ते तिकडे गेले होते. 'झोंबडं', 'वर आभाळ, खाली धरती', 'एकोणीसावी जात', 'स्टैंड', 'दवणा', 'इंगीत', 'पावणा', 'डूख', 'चिताक', आदि ३९ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या 'झोंबडं' या कादंबरीला १९७५-७६ चा ग. ल. ठोकळ पुरस्कार आणि 'चिताक'ला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अजूनही ते विविध वृत्तपत्रांसाठी, दिवाळी अंकांसाठी कथा लिहित असतात. परंतु 'साहित्याने प्रतिष्ठा मिळते पण भाकरी नाही' या मताचे श्री. मोरे हे निपाणी येथे पिठाची गिरणी चालवून गुजराण करतात. अत्यंत साधी राहणी व प्रसिद्धी-पराङमुखता ही मोरे यांची वैशिष्ट्ये आहेत. गेल्या वर्षी श्री. आनंद यादव यांनी मोरे यांच्या एकसष्टी कार्यक्रमात 'महादेव मोरे यांचे कर्तृत्व, साहित्यक्षेत्रातील योगदान जितके आहे. त्याप्रमाणात त्यांची दखल घेतली गेलेली नाही.' ही खंत बोलून दाखविली होती आणि ते सत्यही आहे.
मोरे यांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील व परिसरातील साहित्यिक, त्यांचे चाहते आणि नागरिक त्यांच्या गिरणीत येऊनच शुभेच्छा देत होते आणि मोरे ही त्यांचा आपले काम करतच स्वीकार करीत होते. 'दै. संचार'च्या वतीने आमचे प्रतिनिधी आलोक जत्राटकर यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.