सोमवार, ३ फेब्रुवारी, २००३

एका यशोगाथेचा शोकान्त!

(भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिचा गेल्या १ फेब्रुवारी २००३ रोजी अंतराळ स्थानकाहून परत येत असताना अवकाशातच दुर्दैवी अंत झाला. या प्रसंगी तिच्या संदर्भात लिहीलेला लिहीलेला एक लेख सोमवार, दि. ३ फेब्रुवारी २००३ रोजी 'युवा सकाळ'च्या पहिल्या पानावर महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाला. तो माझ्या वाचकांसाठी येथे देत आहे.)

कल्पना चावला


कल्पना चावला ! एकदा अवकाशात जाऊन आली, तेव्हाच ती तिच्या कुटुंबीयांबरोबरच अखिल भारतवासीयांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय बनली. त्यामुळे तिची दुसऱ्या अवकाश संशोधन मोहिमेसाठी निवड होणं हा तर तिच्या आई-वडिलांना, चुलत भावंडांसाठी अत्युच्य आनंदाचा क्षण असणे स्वाभाविक होते. मात्र शनिवारी तिच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या कुटुंबीयांना डोळ्यांदेखत जळणारे कोलंबिया अवकाशयान हतबलपणे पाहव्याखेरीज काहीच करता आले नाही. एका साहसी यशोगाथेचा कल्पनाच्या रूपाने शोकांत झाला, मात्र तरीही कित्येक भारतीय तरुणींना साहसाची प्रेरणा देणाऱ्या कल्पनाने या घटनेतूनही जाता जाता तिच्या ठायी असलेल्या प्रचंड साहसी वृत्तीची प्रचितीच जणू दिली.

गेल्या वर्षीच्या मध्यापासूनच ही अवकाश मोहीम तांत्रिक कारणांनी पुढे ढकलत ढकलत अखेर जानेवारीत पूर्णत्वाला गेली..
कल्पनाच्या कुटुंबीयांनाही याची कल्पना होती. कल्पनाला या मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यासाठी तिचे आई-वडील, दोन थोरल्या बहिणी, तिची चुलत भावंडे अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेत गेले होते. गेल्या शनिवारी सकाळी केनेडी अवकाश केंद्रात कल्पनाचे स्वागत करण्यासाठी हे सर्व जण उपस्थित होते. यान उतरण्याला जास्तीत जास्त एक ते दीड तास अवधी उरला असतानाच परतीच्या मार्गावरच त्याचा स्फोट आणि अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय कन्येच्या मृतदेहाची राखही अवकाशात विखुरली.
कल्पनाच्या कुटुंबीयांना तिच्या कामगिरीचा अभिमान असण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे अवकाशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आर्थिक बळ तिच्या कुटुंबात नव्हते. १९४७ च्या फाळणीवेळी पाकिस्तानातून तिचे वडील दंगलीत कसाबसा जीव बचावत कर्नालला आले होते. कर्नालच्या रेल्वेस्थानकावर भुईमुगाच्या शेंगा विकून त्यांनी आपले कुटुंब स्थिरस्थावर केले. या पार्श्वभूमीवर न डगमगता आपले स्वप्न हे दिवास्वप्न न ठरू देता तिने जिद्दीने त्याच्या पूर्तीचा ध्यास घेतला आणि परिस्थितीला नमवीत आपले उद्दिष्ट साध्य केले.
आपल्या धाकट्या बहिणीबद्दल बोलताना कल्पनाची मोठी बहीण सुनीता चौधरी यांना शब्द पुरत नाहीत. 'भेटींदरम्यान तसेच फोनवरून आपल्या प्रकल्पांविषयी आणि मोहिमांबद्दल सांगताना कल्पना अगदी भारावून जायची. आपल्या कामगिरीचा सार्थ अभिमान तिला होता,' असे त्या सांगतात. सुनीता यांचे पतीही पायलट होते आणि त्यांचा मुंबईत एका विमान अपघातात मृत्यू झाला, हे उदाहरण देऊन सुनीता कल्पनाला नेहमी सावधगिरीचा सल्ला द्यायची.
'नासा'त अंतराळवीर म्हणून निवड होण्यापूर्वी ती पती ज्याँ पेरी, जे ब्रिटिश फ्लाइट इन्स्ट्रक्टर आहेत, यांच्यासोबत भारतात दोन वेळा येऊन गेली, पेरी यांच्याही कुटुंबाचा इतिहास कल्पनाच्या कुटुंबाशी मिळताजुळता आहे. त्यांचे वडील ज्यू असल्यामुळे हिटलरच्या छळाची झळ त्यांना बसली होती. यामुळेच परकीय असूनही पेरी यांच्याबाबत कल्पनाच्या सर्वच कुटुंबीयांना आत्मियता आहे.
अमेरिकेला आता जाण्यामागे तिच्या घरच्यांचा तिला भारतात घेऊन येण्याचा हेतू होता. भारतातील ज्या हजारो तरुण-तरुणींचे ती प्रेरणास्थान बनली आहे; त्या सर्वांना तिच्या कामगिरीची वर्णने तिच्याच तोंडून त्यांना ऐकवायची होती. आपले ध्येय साध्य करण्यात आलेल्या अडचणींशी तिने कसा मुकाबला केला, तसेच जगभरातल्या अगणित नागरिकांसाठी अजून विमानप्रवासही स्वप्नवत असताना, एकदा नव्हे तर दोनदा अवकाश फेरीनंतर तिच्या भावना त्या सर्वापर्यंत पोहोचवायच्या होत्या. मात्र, आता ते सारेच तिच्यासोबत इतिहासगर्भात लोपले आहे. मागे उरल्या आहेत, त्या तिच्या पराक्रमी मोहिमेच्या आठवणी. त्या आपण जपून ठेवू या. पुढील पिढ्यांना सांगू या. त्यातूनच अवकाशाची स्वप्ने पाहणाऱ्या नव्या 'कल्पना' घडविण्याला प्रोत्साहन देऊ या. हेच तर कल्पनाच्या हौतात्म्याचे आणि यशोगाथेचे सांगणे...

शुक्रवार, २६ एप्रिल, २००२

'टायटॅनिक'चे भविष्य वर्तविणारी गूढ कादंबरी...

( दि. २६ एप्रिल २००२ रोजी दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला विशेष लेख.)




टायटॅनिक लायनर... जगात आजपर्यंत बांधण्यात आलेले सर्वांत मोठे जहाज... आठशे फूट लांब, तीन हजार लोकांना वाहून नेण्याची क्षमता असणारे हे जहाज हिमनगावर आपटले आणि बुडाले. पुरेशा जीवरक्षक बोटींअभावी त्यातील हजारो प्रवासीही बुडाले. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. १९१२ मध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघातास या आठवड्यात ९० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु ही दुर्घटना घडेपर्यंत किंवा त्यानंतरही आजतागायत बऱ्याच लोकांना एक गोष्ट माहीत नाही की, ही दुर्घटना घडण्याच्या १४ वर्षे आधीच या घटनेचे भाकित विस्मयजनकरीत्या वर्तविण्यात आले होते... तेही एका पुस्तकाच्या माध्यमातून...
मॉर्गन रॉबर्ट्सन हा कोणी एखादा भविष्यवेत्ता नव्हता किंवा धर्मोपदेशकही नव्हता. बऱ्यापैकी पार्श्वभूमी असणारा तो एक अमेरिकन खलाशी होता, ज्याने आपल्या तुटपुंज्या शिक्षणाच्या आधारावर मोठ्या लेखकाचा आव आणला होता. आयुष्यभरात एखादेही ध्येय साध्य करणे त्याला शक्य झाले नाही. त्याने लिहिलेले अवघे ९६ पानी पुस्तक, ज्याला कादंबरी म्हणणेही धाडसाचे ठरावे, ते साहित्यिकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. सरधोपट मागनि त्याने हिमनगाशी टक्कर झाल्यानंतर एका बोटीवरील प्रवाशांचा मृत्यूशी मुकाबला मांडला आहे. तरीही याच कारणांमुळे त्याने योगायोगाने मांडलेले कथानक मात्र विस्मयकारक आणि लक्षवेधी ठरले आहे.

खऱ्याखुऱ्या मोठ्या बोटीचे नाव टायटॅनिक होते, तर १८९८ मध्ये रॉबर्ट्सनने त्याच्या कथेतील जहाजाचे नाव 'टायटन' ठेवले होते. ८८२ फूट लांबीची टायटॅनिक मानवी हातांनी तयार केलेली आजपर्यंतची सर्वात मोठी बोट होती, तर रॉबर्ट्सनची टायटन ८०० फूट लांब होती. टायटॅनिक ६६ हजार टनांचे वजन वाहू शकत होती, तर टायटनची क्षमता ७० हजार टनांची होती. दोन्ही जहाजांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची होती. खऱ्या टायटॅनिकमधून दोन हजार लोक प्रवास करत होते, तर, रॉबर्ट्सनच्या काल्पनिक टायटनवरही दोन हजारच प्रवासी होते. दोन्ही जहाजांना प्रत्येकी तीन प्रोपेलर्स होती आणि दोन्ही जहाजे कमाल २४ नॉटस् म्हणजे ताशी तीस मैल वेगाने अंतर काटू शकत. रॉबर्ट्सनचे टायटन सुद्धा कधीही बुडणार नाही, असेच बनविले होते. 'मानवाने आपल्या अवगत ज्ञानाचा, व्यावसायिकतेचा पुरेपूर वापर करून ही बुडू न शकणारी, नष्ट न होऊ शकणारी बोट बनविली होती, केवळ कायद्यांचे पालन म्हणून ती सोबत काही जीवरक्षक बोटी न्यायची,' असे रॉबर्ट्सनने आपल्या टायटनचे वर्णन केले आहे, जे टायटॅनिकच्या निर्मात्यांच्या मताशी तंतोतंत साधर्म्य दाखविते.

टायटॅनिकच्या हिमनगाशी धडकेपेक्षा रॉबर्ट्सनने त्याच्या कथेत ही धडक अधिक नाट्यमयरित्या घडविली आहे. धडकेनंतर टायटनची मागील बाजू हवेत उचलली जाते, मग ती एका बाजूला कलंडून बुडते. योगायोगाने टायटॅनिकची मागची बाजू अखेरच्या क्षणी प्रोपेलर्ससह हवेत उचलली गेली होती आगि त्यानंतर तिचा समुद्राच्या तळाकडे वेगाने प्रवास झाला. रॉबर्ट्सनच्या कथेतील इतरही काही प्रसंग प्रत्यक्ष घटनेशी अविश्वसनीयरीत्या साधर्म्य दाखवितात. त्याच्या टायटनची हिमनगाशी धडक मध्यरात्री बाराच्या सुमारास होते. टायटॅनिकची त्यापूर्वी केवळ वीस मिनिटे आधी म्हणजे ११ वाजून ४० मिनिटांनी झाली होती.

रॉबर्ट्सनच्या जहाजात पाणी शिरण्यास अटकाव करण्यासाठी १९ मजबूत भिंती होत्या, टायटॅनिकमध्ये त्यांची संख्या १५ होती. रॉबर्ट्सनचे टायटनही टायटॅनिकप्रमाणेच एप्रिलमध्ये बुडाले. प्रत्यक्ष घटनेच्या सुमारे चौदा वर्षे आधीच ही कादंबरी लिहीणाऱ्या रॉबर्ट्सनने, दुर्घटनेतून बचावलेल्या आपल्या कथेतील पात्रांना न्यूयॉर्कच्या धक्क्यावर सुखरूप पोचविले. टायटॅनिक दुर्घटनेतून वाचलेले ७०५ प्रवासी सुद्धा न्यूयॉर्कच्या बंदरावरच सोडण्यात आले होते. रॉबर्ट्सनच्या टायटन दुर्घटनेची बातमी देण्यासाठी न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांनी जादा आवृत्त्या छापल्या होत्या. हे टायटॅनिक दुर्घटनेच्या बाबतीत खरोखरच घडले. त्यात न्यूयॉर्क टाइम्सने मोठी बाजी मारली होती. कारण त्याचे संपादक कार व्हॅन अँडा यांनी एकूण रचनेचा अभ्यास करून टायटॅनिक प्रवासाला निघण्यापूर्वीच ते अधिक काळ पाण्यावर तरंगू शकणार नाही, असे भाकित वर्तविले होते.
या साधर्म्याखेरीज रॉबर्ट्सनच्या कथेत काही विरोधाभासही होता. कथेतील हिमनग दाट धुक्यामुळे दिसू शकला नव्हता. तर, टायटॅनिकच्या धडकेवेळी समुद्र शांत होता, तसेच वातावरणही स्वच्छ होते. त्याच्या कथेतील मुख्य पात्र एक 'मेयर' होता. हा मेयर मोडकेतोडके इंग्रजी बोलत आणि विचित्र वागत असे. प्रत्यक्ष टायटॅनिकवर इसा डॉर स्ट्राऊस यांच्यासारखे दिलदार लोक होते. स्ट्राऊस दांपत्याने जीवरक्षक बोटीवर लहान मुले व महिलांना चढवण्यास प्राधान्य दिले. ते दोघे मात्र जहाजाबरोबरच बुडाले,
रॉबर्ट्सनने अत्यंत ओबडधोबडपणे ही कथा लिहिलेली आहे. १८९८ मध्ये एम. एफ. मॅन्सफिल्ड यांच्या न्यूयॉर्क हाऊसने 'फ्युटीलिटी' नावाचे हे पुस्तक प्रकाशित केले. १९१२ ला टायटॅनिक दुर्घटनेनंतर न्यूयॉर्कच्या मॅक्युलर आणि मेट्रोपॉलिटन या मासिकांनी त्याचे पुनर्मुद्रण केले. त्यावेळी रॉबर्ट्सन जिवंत होता. या घटनेनंतर त्याची बऱ्यापैकी मिळकतही झाली. त्यानंतर तीन वर्षांनी मार्च १९१५ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी तो मरण पावला. मात्र त्याने अखेरपर्यंत 'फ्युटीलिटी'चे कथानक कसे सुचले किंवा त्यामागील प्रेरणा याबद्दल अवाक्षरानेही माहिती दिली नाही. 'द टायटॅनिक कॉन्स्पिरसी' या पुस्तकात लेखक रॉबिन गार्डिनर आणि कॅन व्हॅन डरवॅट यांनी रॉबर्ट्सनचा 'एक हौशी गूढवादी' असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे.

बुधवार, ६ मार्च, २००२

मागणी रास्त, पण....

('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीमध्ये 'चर्चा' या साप्ताहिक सदरामध्ये बुधवार, दि. ६ मार्च २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे फेरसादर करीत आहे.)




निपाणीतील दिवेकर कॉलनीतील वेश्यांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांनी गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृतीसाठी कार्यरत असलेल्या संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेच्या श्रीमती मीना शेषू येथे वेश्यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत, अशी चर्चा एका वर्तुळात सुरू आहे. यातील गंभीर बाब अशी की, पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनीही श्रीमती शेषूंना सहकार्य करणे तर दूरच; उलट त्या आणि त्यांचे सहकारी पत्रकार नील पाटे यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधले. याशिवाय वेश्या या 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असेही उद्‌गार एका पोलिस अधिकाऱ्याने काढले. हीच सर्वात आक्षेपार्ह बाब आहे. हा विषय गुंतागुंतीचा अनेक पदरी असल्याचे झालेल्या घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे श्रीमती शेषू यांनी सुरवातीच्या काळात स्वतःच्या घरी वेश्यांच्या बैठका घेतल्या, हे विसरता येणार नाही. एका महिलेने अशा पद्धतीने काम करणे हीच आजही अत्यंत वेगळी वाटणारी तरीही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधणे म्हणजे त्यांच्या कामाचा आणि त्यातील मानसिक, भावनिक गुंतवणुकीचा तो अपमानच म्हटला पाहिजे.
दुसरी बाब म्हणजे पोलिस अधिकाऱ्याने वेश्यांना 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असे म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उद्‌गारांतून स्पष्ट होतो. पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या भिंतीला लागून असलेल्या दिवेकर वस्तीत वेश्या व्यवसाय वर्षानुवर्षे का सुरू राहिला, याचे उत्तर त्यांच्या उद्‌गारांमागील प्रवृत्तीत आहे.
सुरवातीपासूनच पोलिसांनी येथील वेश्यांविरुद्ध कारवाई करून दबाव आणला असता तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे दिवेकर वस्तीतील नागरिकांनीच दबाव आणून आतापर्यंत येथे वेश्यावस्ती वाढू दिलेली नाही. श्रीमती शेषू यांनी येथे येऊन आपल्या संस्थेची शाखा उघडल्यानंतर त्या नागरिकांना परत येथे वेश्यावस्ती वाढण्याचे भय वाटते आहे, हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल किंवा त्यांना श्रीमती शेषू यांच्या कार्याची पुरेशी माहिती नसावी. या नागरिकांच्या भावनांचा काही नगरसेवकांनी फायदा उठवून त्यांना चिथावले आणि येथील वेश्या व्यवसाय बंद करावा म्हणून मोर्चा काढला. त्यांची मागणी अगदी रास्त आहे; पण, त्यांनी श्रीमती शेषू वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप करणे पूर्णतः चुकीचे आहे.
मुळात एखाद्याच्या प्रोत्साहनामुळे वेश्या व्यवसाय वाढतो, असे म्हणणेच चुकीचे आहे. किंबहुना वेश्या व्यवसाय संबंधितांनी स्वेच्छेने स्वीकारला असे कधीही होत नाही. वेश्या निर्माण होण्यास समाजच कारणीभूत असतो. निपाणी जर इतकी स्वच्छ होती, येथील सगळेच नागरिक इतके चारित्र्यसंपन्न होते, तर येथे वेश्यावस्ती निर्माण झालीच कशी, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर ठळकपणे सामोरा येतो. त्याला उत्तर आहे ?
त्या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला एक महिला पुढे सरसावते, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविते, त्यांना आपलेपणाने वागविते. यामुळे या वेश्यांनाही त्यांच्याबाबत आत्मीयता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच त्या त्यांच्याकडे येतात. इतर समाजाने त्यांना ओरबाडण्याखेरीज दुसरे काय केले आहे?
साधारण एक वर्षांपूर्वी वेश्यांची राष्ट्रीय परिषदही झाली. त्यावेळी देशभरातून हजारो वेश्या राजधानीत एकत्र आल्या होत्या, याचीही आठवण येथे द्यायलाच हवी.
पूर्वापार दुर्लक्षित असलेल्या या समाजघटकाच्या समस्यांकडे गांभीयनि कोणीही पाहत नाही. यासाठीच त्यांना संघटित करून एडस् तसेच इतर समस्यांबाबत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी काम करणाऱ्या श्रीमती शेखूंसारख्या सेवाभावी व्यक्तींना किमान उपद्रव देऊ नये, ही जबाबदारी ओळखण्याचे भान आपल्याला कधी येणार हा प्रश्न आहे.
याबाबत येथील स्थानिक सेवाभावी सामाजिक संस्थांनीही मौन का बाळगले आहे, हे समजायलाही मार्ग नाही. वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी व नागरिकांनी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, केवळ या वेश्यांना येथून हाकलून देऊन चालणार नाही. कारण त्या इतरत्र जाऊन पुन्हा तोच व्यवसाय करणार! यावर उपाय म्हणजे त्यांना पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून निर्वाहाचा दुसरा मार्ग निवडण्यासाठी प्रोत्साहन व सहाय्य देणे, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःची मानसिकता आधी बदलायला हवी.
केवळ कर्नाटकातील वेश्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर देवदासी प्रथेचा याला प्रचंड मोठा हातभार आहे. पुण्या-मुंबईमध्येसुद्धा या देवदासीच अधिकांशरित्या भोगदासी झालेल्या आहेत. याबरोबरच गरिबी, अज्ञान आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायाकडे महिला-मुली वळताना दिसतात.
वेश्या व्यवसायाच्या निर्मूलनासाठी आपण प्रत्यक्ष जरी काही करत नसलो तरी कार्यकर्त्यांना सहकार्य करू शकतो. तेही शक्य नसेल तर त्यांना त्रास देऊन खच्चीकरण करणे तरी थांबवावे. त्यांना शांतचित्ताने आपले काम करू द्यावे. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरेल. तेवढा विवेक आता आपण दाखवायलाच हवा !

मंगळवार, ८ जानेवारी, २००२

विद्याकरच्या रूपाने चेन्नईत 'फादर तेरेसा'

(दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये दि. ८ जानेवारी २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा विशेष लेख ब्लॉगवाचकांसाठी...)

 



काही माणसांचा जन्मच दुसऱ्यावर प्रेम करणे, माया देणे, दुःखावर फुंकर घालणे, यासाठीच झालेला असतो की काय, असे त्यांचे जीवितकार्य पाहून वाटते. मदर तेरेसा त्याचे मूर्तिमंत प्रतीक. चेन्नई येथील विद्याकर यांचे कार्यही मदर यांच्या कामाशी किती तरी साधर्म्य दाखविणारे आहे. जणू ते चेन्नईतील दीन-दुःखितांचे 'फादर' तेरेसाच आहेत.

अद्याप पन्नाशीही न गाठलेल्या विद्याकर यांनी गेल्या अठरा वर्षांत समाजाने नाकारलेल्या सुमारे अठराशे लोकांसाठी मायेचे, आपुलकीचे नंदनवन उभारले आहे. त्यांच्या या प्रचंड परिवारात नवजात अर्भके, हरवलेली, टाकून दिलेली मुले, घराबाहेर काढलेली माणसे ते मृत्युपंथाला लागलेल्या आजारी वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. मोठी आर्थिक अडचण असूनही त्यांच्याकडे येणाऱ्या कोणाही गरजवंताला त्यांचा दरवाजा कधीही बंद नसतो. अशा व्यक्तीने त्यांना एक दूरध्वनी जरी केला तरी काही वेळातच ते त्याच्यासमोर हजर असतात. या लोकांसाठी त्यांनी चेन्नईबाहेर एका प्रशस्त, शांत आवारात निवासस्थान उभारले आहे. तेथेच ते आसपासच्या खेडेगावातील मुलांसाठी शाळाही चालवितात.

या सर्व गोष्टी विद्याकर यांच्या हातून घडत आहेत, याचे बरेचसे मूळ त्यांच्या लहानपणात रुजलेले आहे. १९५३ ला म्हैसूरजवळच्या कोल्लीगल खेड्यात जन्मलेल्या विद्याकर यांचे आई-वडील त्यांच्यांवर सतत रुष्ट असत. ज्यावेळी काहीच समजत नव्हते, अशा वयात आपल्या आई-वडिलांना आपण नको आहोत, एवढे त्यांना समजले, 'का' ते समजायचे, ते वय नव्हते. त्यामुळे ते बराचसा वेळ घराबाहेर घालवित. रस्त्यावर भटकणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणे अशी कामे करीत, जेणेकरून स्वतःला समाधान मिळेल, असे ते पाहत होते.

१९६७ मध्ये म्हैसूरमधील एका अपघाताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. रस्त्यावरून जात असताना त्यांनी प्रथमच एक अपघात पाहिला. मोटारीमध्ये एक मनुष्य गंभीर जखमी होता. त्या माणसाला रुग्णालयाच्या गाडीतून नेल्यानंतर बघ्यांची गर्दी आपोआप ओसरली. विद्याकर मात्र त्या गाडीमागे पळत सुटले. त्यानंतर रुग्णालयात त्या माणसाची दोन आठवडे शुश्रूषा केली. मद्रासमध्ये वाहनांचे सुटे भाग विक्रेते असणाऱ्या त्या रामकृष्णन यांच्याशी भाषेची अडचण असूनही प्रेमाचे धागे जुळले. १९८३ पर्यंत, रामकृष्णन यांच्या मृत्यूपर्यंत हे संबंध अतूटच राहिले.

ते रामकृष्णन यांच्याकडे मद्रासला गेले, त्यांनी मानसोपचार, समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी घेतली, मनोरुग्ण आणि कुष्ठरोग रुग्णालयात तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. इतर काही व्यवसाय करण्याचा विचारही त्यांना कधी शिवला नाही. त्यांनी रामकृष्णन यांच्या दुकानासमोर आपल्या 'उदवुम करंगल' संस्थेचा फलक लावला. या तमिळ शब्दांचा अर्थ 'मदतीचे हात' असा आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कामाचा व्याप वाढतच गेला आणि विद्याकर चेन्नईतील दीनदुबळ्यांचे 'मसीहा' ठरले.

विद्याकर यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अनंत आर्थिक अडचणी असूनही त्यांना कोणतीही शासकीय मदत वा निधी मिळालेला नाही. संपूर्णपणे वैयक्तिक दात्यांकडून आलेली मदतच त्यांच्या संस्थेला साहयभूत ठरली. चांगली गोष्ट म्हणजे या दात्यांत भारतीयांचे प्रमाण मोठे आहे. किमान शंभर रुग्णांची सोय असणारे रुग्णालय बांधणे; तसेच कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, मनोरुग्ण या सर्वांचीच आपल्या कुटुंबात अधिक चांगली सोय करणे, ही विद्याकर यांची आता तळमळ आहे.

रविवार, १३ मे, २००१

हंचिनाळला पाच दिवसाच्या संत संमेलनाचा समारोप; हजारो भक्तगणांची उपस्थिती

'संत दर्शनापेक्षा संत होण्यासाठी वाटचाल करा'

(दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय संत संमेलनाच्या समारोप समारंभाची बातमी पान-१ वर प्रकाशित झाली. रात्री ९ वाजता हंचिनाळ येथून फॅक्सद्वारे ही बातमी पाठविण्यात आली.)

 


(आलोक जत्राटकर यांजकडून)

हंचिनाळ, ता. १२: सर्व प्रकारच्या विकारांवर विजय मिळविल्यास मनुष्य संतपदाकडे वाटचाल करतो. केवळ संतांचे दर्शन नको, तर सर्वांनी संत होण्याकडे वाटचाल करावी. त्यासाठी तपश्चर्येची किंवा शास्त्रज्ञानाची आवश्यकता नाही. संत होणे म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये पवित्र प्रेमाची स्थापना करणे होय, असे प्रतिपादन सिद्धेश्वर महास्वामी (ज्ञानयोगाश्रम, विजापूर) यांनी केले. येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागांतून सुमारे ५० हजार भक्तगण उपस्थित होते.

ते म्हणाले, "प्रेमामुळेच मनुष्याचे मन पवित्र आणि भक्ती संपन्न होते. संत दर्शन करा; पण त्यापेक्षा संतसाधना महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल आणि मोक्षाकडे वाटचाल कराल."

जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (संतूर संस्थान मठ, म्हैसूर) म्हणाले, "निरपेक्ष व निष्कामबुद्धीने केलेली भक्ती भगवंताला प्रिय असते. भक्ती कोणत्या पद्धतीने केली, यापेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची असते. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी आपापल्या पद्धतीने भक्ती केली. त्यांची भक्ती परमेश्वराने स्वीकारली."

ते म्हणाले, "इतर योगामध्ये साध्यासाठी ठराविक मार्ग आहेत; पण भक्तीसाठी ठराविक मार्गाचे बंधन नाही. देवाबद्दल मनात शंका न ठेवता भक्तांनी प्रार्थना केली पाहिजे. सत्ता, पैसा, जमीन यासाठी कोटी कोटी मेले; पण भगवंतासाठी व भक्तीसाठी एकही जण मेलेला नाही. निसर्गावर आपण सातत्याने अत्याचार करतो. परंतु या कृतीतून आपण परमेश्वरालाच इजा करीत आहोत, ही भावना आपल्या मनालाही शिवत नाही, याबद्दल जोपर्यंत आपल्या मनात सहानुभूती निर्माण होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही."

ते पुढे म्हणाले, "अशिक्षितपणा सोडून लोकांनी शिक्षणाच्या वाटा स्वीकारल्या पाहिजेत. यासाठी संतूर मठाद्वारे सुमारे २५० शिक्षण संस्था कार्य करीत आहेत. गरिबांच्या मुलांना या शिक्षण संस्थांमध्ये बारावीपर्यंतमोफत शिक्षणाची सोय केली आहे."

यावेळी ईश्वर स्वामींनी आयोजित केलेले संत संमेलन यशस्वी झाल्याचे सांगून ते म्हणाले, "ईश्वर स्वामींच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून भक्ती योगाश्रम साकारला आहे. विजापूरच्या सिद्धेश्वर महास्वामींच्या अखत्यारीतच ते तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे येथील कार्य अखंडित सुरू राहील, यात शंकाच नाही. परिसरातील लोकांना भक्ती कशी असावी, हे सांगण्यासाठी त्यांनी पाचही दिवस भक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा घडवून आणली.

यावेळी सर्व उपस्थित स्वामींचे, भक्तांचे व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानताना ईश्वर स्वामी म्हणाले, "मी भक्ती योगाश्रमामध्ये सद्‌गुरूंच्या आदेशानुसार ज्ञान व भक्ती प्रसाराचे काम प्रामाणिकपणे करीत राहीन."

यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाश आवाडे, राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, संजय पाटील, रजनीताई मगदूम, कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार काका पाटील आदी उपस्थित होते.

आत्मनिवेदन म्हणजे देव व भक्ती यांची एकरुपता: निर्मलानंद महास्वामींचे प्रतिपादन

 (दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी संत संमेलनाविषयी प्रसिद्ध झालेले वृत्त.)

 

 


हंचिनाळ, ता. १२ (बातमीदार) : 'आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता होय,' असे विचार निर्मलानंद महास्वामी यांनी व्यक्त केले.

येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या पाचव्या दिवशी आज पहिल्या सत्रात विविध संतांची 'आत्मनिवेदन व भक्ती' या विषयावर प्रवचने झाली. संमेलनात आज तिघा जणांना संन्यस्त जीवनाची दीक्षा देण्यात आली. यात एका सहा वर्षांच्या मुलाचा समावेश होता. आज सदाशिव महास्वामी (म्हैसूर), निर्मलानंद' महास्वामी (विजापूर), सेवानंद महाराज (भांदवले), विनयानंदजी महास्वामी (मौजे वडगाव), शिवगंगाधर स्वामी (शिंदगी) यांची प्रवचने झाली.

निर्मलानंद महास्वामी म्हणाले, "आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता. आत्मनिवेदन भक्तीमुळे देव व भक्त यांच्यात अंतर राहत नाही. ईश्वरस्वामी प्रतिगाडगे महाराज आहेत."

विनयानंद महाराज म्हणाले, "मनामध्ये निर्मल भावना ठेवून भक्ती केल्यास यश प्राप्ती होते. आसक्ती संपविण्यासाठी विवेक व वैराग्य यांची गरज असते. विवेक, वैराग्य, षड्संपत्ती, ममत्त्व या चार गोष्टी आत्मज्ञान संपादन करण्यास आवश्यक असतात. संकुचितपणा म्हणजे मृत्यू व व्यापकता म्हणजे जीवन."

सेवानंद महाराज म्हणाले, "भोगासाठी जीवन नाही, ते मुक्तीसाठी असते. अध्यात्माचा संबंध हा मनाशीच असतो. ग्रहण करणे याला जीवनात महत्त्व आहे. शरणागतीचा भाग म्हणजे नम्र जीवन. गुरुमंत्राच्या जपाने जीवन सफल होते."

सदाशिव महास्वामी म्हणाले, "भक्ती म्हणजे हृदयातील मधु भाव. अहंकारमुक्त केलेली भक्ती सर्वश्रेष्ठ असते. आत्मा-परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती होय."

शिवगंगाधर स्वामी म्हणाले, "मोक्षासाठी भक्ती गरजेची असते. आत्मियतेने केलेली भक्ती भगवंताला आवडते. भक्तीमुळे माणसाच्या आयुष्यात सन्मार्ग येण्यास मदत होते."

दरम्यान, शुक्रवारी रात्री उषा मंगेशकर यांचा 'रंग उषेचा' हा गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात उषा मंगेशकर यांचा प.पू. शिवरात्री देशीकेंद्र सुत्तूर संस्थान मठ म्हैसूर यांच्या हस्ते सत्कार झाला. बाळासाहेब देवनाळ यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन संजय दामले यांनी केले. उषा मंगेशकर यांनी गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरवात केली. यात त्यांनी माझी रेणुका माऊली..., 'मेंदीच्या पानावर.... 'ऐरणीच्या देवा..., 'पाऊस पहिला बरसून गेला... अशी भक्तिगीते व भावगीते सादर केली.

'शालू हिरवा पाचूनी मढवा... हे बहारदार गीतही सादर केले. 'ऐ मेरे वतन के लोगो...' या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल देशपांडे व पुरुषोत्तम गोणावर यांनी त्यांना गायनात साथ केली. या कार्यक्रमाला सुमारे एक लाखाहून अधिक श्रोते उपस्थित होते. राजू जावळकर यांनी उत्कृष्ट ढोलकीवादन केले. जगद्‌गुरु ईश्वरानंदजी महास्वामी यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचा सत्कार झाला.

तिघांना दीक्षा

या कार्यक्रमात जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते ओंकार कृष्णा चौगुले (वय ६, रा. टाकवडे, ता. शिरोळ), सतीश रावसाहेब पाटील (वय ११, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), शंकर कृष्णा आण्णा (वय २४, भक्ती योगाश्रम) यांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांचे अनुक्रमे ओंकारानंद, सत्यानंद व धर्मानंद स्वामीजी असे नामकरण करण्यात आले. महास्वामीजींनी त्यांना कन्नडमधून दीक्षा व नियम-संहिता दिली.

बुधवार, ९ मे, २००१

‘पाच दिवसांच्या संत संमेलनास हंचिनाळ येथे उत्साहात प्रारंभ’

दीनदलितांचा उद्धार हेच भक्तीयोगाश्रमाचे उद्दिष्ट: ईश्वर स्वामी

 (दै. सकाळमध्ये रुजू होऊन महिना उलटण्यापूर्वीच हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय महा संत संमेलनाचे कव्हरेज करण्याची संधी मिळाली. दि. ९ मे २००१ रोजी दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीच्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेले संत संमेलनाच्या उद्घाटनाचे वृत्त.)

 

चिकोडी तालुक्यातील हंचिनाळ येथील भक्तियोगाश्रमामध्ये मंगळवारी भरलेल्या संत संमेलनाचे उद्घाटन करताना शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी. शेजारी रुद्रपशुपती महास्वामीमहेशानंद ईश्वर महास्वामीअदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीपंचम शिवलिंगेश्वर महास्वामीसिद्धेश्वर महास्वामीजयदेव महास्वामीनीलकंठ महास्वामी आदी.






हंचिनाळ, ता. ८ (खास बातमीदार): गोरगरिबांना आश्रय देणे, मदत करणे हे हेतू मनात ठेवूनच भक्तीयोगाश्रमाचा भक्तिवृक्ष उभारला आहे. त्याची सावली पददलित जनतेला मिळावी, हीच माझी इच्छा आहे, असे प्रतिपादन हंचिनाळ भक्ती योगाश्रम मठाचे अधिपती महेशानंद ईश्वर स्वामी यांनी आज येथे केले. पाच दिवसांच्या सर्वधर्मीय संत संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते उपस्थित महास्वामींना आणि भक्तांना संबोधित करत होते. अध्यक्षस्थानी रूद्रपशुपती महास्वामी (कोळेकर मठ, मिरज) होते. ज्ञानयोगाश्रम, विजापूरचे सिद्धेश्वर महास्वामी यांची विशेष उपस्थिती होती.

ते म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी मल्लिकार्जुन महास्वामींनी या उजाड माळरानावर आश्रमाची स्थापना करून भक्तीचे रोपटे लावले. या पवित्र परिसराला एवढे विस्तृत स्वरूप आलेले पाहून कार्यपूर्तीचे समाधान लाभले. इथून पुढील वाटचालही ग्रामविकास, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षणप्रसार अशा सामाजिक, शैक्षणिक कार्याबरोबर सुरू राहील.

भक्ती सेवाश्रमाच्या नवीन वास्तूचे शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (सुत्तूर संस्थान मठ, म्हैसूर) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नऊला संतसंमेलनाचे उद्घाटन झाले. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (सिद्धगिरी मठ, कणेरी) यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते; परंतु त्यांच्याच 'सूचनेनुसार हे उद्घाटनही शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रातील पहिल्या प्रवचनास सुरवात झाली. 'श्रवण भक्ती' या विषयावर योगानंद महास्वामी (रायरहेब्बळी); अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (कणेरी), प्रभूदेव महास्वामी (रबकवी), सिद्राम देशीकेंद्र महास्वामी (देवकरे) यांची प्रवचने झाली.

योगानंद महास्वामी म्हणाले, "मानवी जीवन आनंदी बनविण्यासाठी भक्ती आवश्यक आहे, त्याखेरीज आत्मिक शक्ती वाढत नाही. मानवी जीवनात समतोल राखण्याचे काम भक्ती करते."

अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, "सर्व मानवी इंद्रियांत श्रवणेंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. जगतात जल व वायू प्रदूषणाप्रमाणेच भावप्रदूषण झाले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी श्रवण माध्यम गरजेचे आहे. श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नव्हे, तर ऐकलेल्या गोष्टीमागील कार्यकारणभाव समजून घेणे होय. त्यासाठी श्रवणभक्ती आवश्यक आहे."

अध्यक्षीय भाषणात रूद्रपशुपती महास्वामी म्हणाले, "श्रवणभक्ती म्हणजे संतपूजा व देवपूजा. सामान्य जनांसाठी त्यांचा गुरु हाच संत आणि देव असतो. प्रत्येकाने गुरू केला पाहिजे. गुरुंची पूजा करावी आणि गुरुंची आज्ञा प्रमाण मानून आपले आचरण ठेवावे. ईश्वरस्वामींनी त्यांच्या गुरुची आज्ञा ऐकून कार्य केल्यामुळे आज या परिसरात भक्तीचा मळा फुललेला दिसतो."

संमेलनाच्या मंचावर रामानंद महास्वामी (बसवनाळ), नीलकंठ महास्वामी (म्हैसूर), मल्लय्या महास्वामी (घोडोरी), पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी (सिद्धसंस्थान मठ, निडसोशी), जयदेव महास्वामी (वनश्री मठ, गदग), विरूपाक्ष महास्वामी (गणीकोप्प), नंदीश्वर महास्वामी (विजापूर) यांचा तसेच इतर उपस्थित महास्वामींचा हंचिनाळ ग्रामस्थ आणि आयोजकांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

बसवलिंग महास्वामी (उगार) व सिद्धलिंग महास्वामी (म्हैसूर) यांनी स्वागतगीत म्हटले. उपस्थित महास्वामीचे स्वागत व परिचय श्रद्धानंद महास्वामी यांनी करून दिला. प्रास्ताविक सौम्या सुंकद (हुबळी) हिने केले. सूत्रसंचालन श्री. डोंगरे (एकसंबा) आणि अजित गणेशवाडीकर यांनी केले.

सौम्या सुंकदचे प्रास्ताविक

सौम्या सुंकद (वय १६) ही अकरावीत शिकणारी हुबळीची मुलगी. लहानपणीच तिला धार्मिक अभ्यासाची गोडी लागली. आजच्या संतसंमेलनात तिने प्रास्ताविकाची जबाबदारी पेलली. उपस्थित सर्व धर्मगुरूंसमोर तिने आत्मविश्वासाने व ओघवत्या भाषेत 'निस्वार्थ भक्तीतूनच परमार्थाचा मार्ग सापडतो,' हे विविध उदाहरणांनी सांगितले. तिचे 'प्रवचन तरंग' हे धार्मिक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. उपस्थित भक्तगण व संतमहंतांनी तिचे कौतुक केले.

क्षणचित्रे

·         सुमारे चार ते पाच एकर परिसरात भव्य शामियाना

·         मांगूर फाट्यापासून तसेच कोगनोळी फाट्यापासून फलक

·         भक्तगणांना प्रवचनाचा लाभ अखंडितपणे मिळावा, यासाठी संमेलन मंडपात ठिकठिकाणी क्लोज-सर्किट टी.व्ही.ची व्यवस्था

·         पाच दिवस भक्तगणांसाठी अखंड प्रसादाचे आयोजन

·         भक्तांच्या वर्दळीने मठाचा माळरान परिसर फुलून गेलेला

 

आजचा कार्यक्रम

·         सकाळी ८ ते ११ 'नामस्मरण भक्ती' प्रवचन

उपदेशक शिवानंद महास्वामी (हळींगळी), गुरुनाथ महास्वामी (संगधेरी), दयानंद महास्वामी (गदग), गोपालशरण एकंची.

·         दुपारी ४ ते रात्री ८ 'पादसेवन भक्ती' प्रवचन.

उपदेशक - कुमार निजगुण महास्वामी (चिकलवाड), अनदानेश्वर महास्वामी (म्हैसूर), सहजानंद महास्वामी (महालिंगापूर).

·         रात्री ८ वाजता ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचा भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम.