आजरा महाविद्यालयात विज्ञान नोंदलेखन कार्यशाळा
![]() |
| आजरा येथे आयोजित मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेत उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. स्नेहा खोब्रागडे, कृष्णा येसने, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. विजय लाळे. |
कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: मराठी विश्वकोशाच्या
नोंदलेखकांना माहितीच्या लोकशाहीकरणाच्या राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाचे
भागीदार होण्याची संधी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी
डॉ. आलोक जत्राटकर यांनी आज आजरा येथे केले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
आणि आजरा महाविद्यालय, आजरा येथील मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. जनता एज्युकेशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल
देशपांडे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. जत्राटकर म्हणाले, वर्तमानात माहिती
पुरविणारी अनेक साधने मानवाच्या हाती असली तरी माहितीचे अधिकृत स्रोत हे विश्वकोश
आहेत. समाजमाध्यमे अर्धवट, चुकीची अथवा एकदम खोटी माहितीही पसरवित आहेत. आणि
त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर
नागरिकांना खऱ्या माहितीशी जोडण्याचे काम विश्वकोश करते. त्यामुळे विश्वकोशाच्या
नोंदलेखकांवर वस्तुनिष्ठ, पारदर्शक आणि निष्पक्ष माहिती संकलित करण्याची जबाबदारी
आहे. त्यातही कुमारकोश हा १४ ते १८ या वयोगटातील नवतरुण वर्गासाठी आहे. त्यामुळे विश्वकोशाच्या
मूल्यांशी, संदर्भांशी तडजोड न करता या वर्गाला रुचेल, आवडेल अशा शब्दांत माहिती
देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी
१९८०मध्ये कुमारकोशाच्या १२ खंडांची संकल्पना सविस्तर मांडली आहे. त्यामधील
जीवसृष्टी आणि पर्यावरण कोश हा चार खंडांमध्ये साकार झाला आहे. त्यामुळे उर्वरित
११ खंड गतीने पूर्ण करण्याची जबाबदारी नोंदलेखकांवर आहे. ती ते सुनियोजितरित्या
पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोजच्या जीवनव्यवहारात व्हॉट्सअप
विद्यापीठाच्या आहारी न जाता अधिकृत माहितीचा स्रोत म्हणून विश्वकोश हाताळले
पाहिजेत, असे सांगून डॉ. जत्राटकर पुढे म्हणाले
की, एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिकाच्या धर्तीवर निर्माण केलेल्या या
मराठी विश्वकोशास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारतीय चेहरा प्रदान केला
आहे. विश्वकोशामध्ये नोंदलेखन करण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाने संबंधित
विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, लेखक व संशोधकांचे सहाय्य घेण्याचे
ठरवले आहे. नोंदलेखन करत असताना ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे. सत्याशी कोणतीही तडजोड
न करता, सत्यापलाप होऊ न देता नोंदलेखन केले पाहिजे. नोंदलेखन करताना पूर्वग्रहाचा
प्रभावही असू नये, असेही ते म्हणाले.
तीन सत्रामध्ये संपन्न झालेल्या या
कार्यशाळेत डॉ. होमी भाभा संशोधन केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विजय लाळे, विश्वकोश
निर्मिती मंडळाच्या विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा खोब्रागडे आणि डॉ. रवींद्र
घोडराज यांनी नोंद लेखनासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
अशोक सादळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यशाळेस जनता एज्युकेशन
सोसायटीचे संचालक श्री. कृष्णा येसणे, उपप्राचार्य
प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, कार्यालयीन
अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह गडहिंग्लज,आजरा, चंदगड, गारगोटी
परिसरातील सत्तरहून अधिक प्राध्यापक, संशोधक
व अभ्यासक यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब बुडके
यांनी केले, तर कार्यशाळेचे समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार
मानले.





