बुधवार, ३० जुलै, २०२५

An Essential Handbook for media literacy and media awareness: Dr. B. M. Hirdekar

(ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक वाचून आपला चिकित्सक अभिप्राय स्वतंत्र पत्राद्वारे कळविला आहे. तो येथे देत आहे. या प्रोत्साहनपर शब्दांसाठी हिर्डेकर सरांचा मी मनापासून ऋणी आहे.)





डॉ. आलोक जत्राटकर यांनी लिहिलेलं 'समाज आणि माध्यमं' हे एक अगदीच वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे हे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो.
भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देण्याची आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.
माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या, वयाने तरुण पण बौद्धिक प्रौढत्व असलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे.
मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया एडिक्ट होत चाललेल्या समाजाला विशेषतः तरुणांना हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला सांगायला हवे. दुभंगलेली माणसं, दुभंगलेली कुटुंबं, दुभंगलेला समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. डॉ. जत्राटकर यांनी एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यमांचा वापर, वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सोबती म्हणून दिलेले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक सेल्फ अवेअरनेस, सोशल अवेअरनेस आणि प्रॉब्लेम अवेअरनेस यासाठीचे आहे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. तरुण, ज्येष्ठ, समाज घडणीत जबाबदार म्हणून काम करणारे या सर्वांनी हा लेख आवर्जून वाचायला हवा. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते.
लेखक माध्यमाच्या विश्वात संचार करून, माध्यमांसंबंधित जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यापीठात आपल्या कामाची वेगळी शैली जपली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांचा शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्व घटकांशी जवळून संबंध आहे. या पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन फॉर ऑल, वाटा ऑनलाईन शिक्षणाच्या, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य करण्यात आले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. शिक्षण प्रक्रिया आणि नव्या युगातील नवे शिक्षण याविषयी शिक्षक लिहितातच; पण, माध्यमांत काम करणाऱ्या व्यक्तीने शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे लिहावे, हे कौतुकास्पद आहे.
बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक लिहिताना लेखक माध्यमकर्मी म्हणून कुठेही 'तटस्थ' असलेले पुस्तकात दिसत नाहीत. माझा या सर्व प्रश्नांची संबंध आहे, I am very much concerned and hence I have to write, अशी भूमिका- वैचारिक भूमिका घेऊन या पुस्तकाची निर्मिती झालेली दिसते. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. Content of the book, cause of the book, concern of the author, along with clarity of the message या सर्व गोष्टी सदर पुस्तकाला वेगळे परिमाण देतात. May be an Essential Handbook for media literacy and media awareness, असे या पुस्तकाबाबत मला म्हणावेसे वाटते.
Dr. Alok sir congratulations for this book- not for pleasure and fun- but to learn serious things, seriously!
- डॉ. बी. एम. हिर्डेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा