रविवार, २७ जुलै, २०२५

‘समाज आणि माध्यमं’ ः माध्यमभान वाढवणारं पुस्तक

(शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक तथा माझे मित्र डॉ. शिवाजी जाधव यांनी माझ्या 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयी फेसबुकवर लिहीलेली नोंद...)



सन्मित्र डॉ. आलोक जत्राटकर यांचे ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचले. दुसऱ्यांदा या अर्थाने की, यातील बहुतेक लेख यापूर्वी विविध दैनिके आणि नियतकालिके आणि दिवाळी अंकातून वाचनात आले होते आणि त्यावर वेळोवेळी चर्चाही झाली होती. पुस्तकात वेगळे काय म्हणून परत नव्याने वाचायला हाती घेतलं. वर्तमानपत्रं/नियतकालिकांतील लेखांपेक्षा पुस्तकातील लेखांनी वाचनाचा जास्त आनंद दिला, हे आतून जाणवलं. आपण पुस्तक वाचतोय, हा फिलच भारी असतो. त्यातही ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक निर्मितीच्या अंगाने तगडं झालं असल्यानं ते वाचलं गेलं आणि सोबतच लेखांचे पुस्तक करत असताना करावयाचे अनुषंगिक बदल लेखकाने काळजीपूर्वक केले असल्याने त्याचे वाचनमूल्य आणखी वाढले आहे. अत्यंत देखण्या, अनुरुप आणि औचित्याला धरुन असलेल्या आशयगर्भ मुखपृष्ठापासून पुस्तकाच्या आकर्षणाला सुरुवात होते. चांगल्या, सुटसुटीत पण उठावदार आणि आशयाची सुलभ अभिव्यक्ती करणार्या मुख्यपृष्ठासाठी गौरीश सोनार यांचं खास अभिनंदन! लेखकाचा विचार, चिंतन आणि आशय चांगला असून भागत नाही, तो वाचकांपर्यंत घेऊन जाणारा प्लॅटफॉर्मही तितकाच तगडा लागतो. अक्षर दालनने त्यात जराही कमतरता ठेवली नाही. कागद, फॉन्ट, लेआऊड, मलपृष्ठ अशा सर्वच पातळ्यांवर प्रकाशकाने मन लावून काम केल्याने पुस्तकाची निर्मिती सर्वांगसुंदर झाली आहे.
ख्यातनाम समीक्षक आणि कणा असलेले शिक्षक डॉ. राजन गवस यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे ही मोठी बाब. ‘मला डॉ. जत्राटकर गंभीर, व्यासंगी आणि तटस्थ अभ्यासक वाटतात,’ या शब्दांत प्रा. गवस सरांकडून शाबासकी मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. डॉ. आलोक यांनी गेली 25 वर्षे पत्रकारिता, प्रशासन आणि जनसंपर्क आदी महत्त्वाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची ही पावती म्हणावी लागेल. पत्रकार, लेखक, संवादक, प्रशासक, शिक्षक, वक्ता अशा अनेक भूमिकांत वावरत असताना डॉ. जत्राटकर यांच्यातील संवेदनशील माणूस कधीच बाजूला पडत नाही, हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक लिहिण्याची त्यांची प्रेरणा विचारात घेतली तर आपल्याला या संवेदना नीट कळतील. ‘मी स्वतः माध्यमांचा आणि समाजमाध्यमांचा समर्थक आहे. या माध्यमांचे समर्थन करत असताना माध्यमांचा वापर शुद्ध, चांगल्या अभिव्यक्तीसाठी तसेच वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी केला जावा. सर्वसामान्य वापरकर्त्यांनी जागरुकपणे माध्यमांचा वापर करावा आणि त्यांना त्या अनुषंगाने अवगत करीत राहण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, या भावनेतून हे सारे लेखन केले आहे,’ ही डॉ. जत्राटकर यांनी मनोगतात व्यक्त केलेली भावना त्यांची माध्यमांप्रती असलेली आस्था आणि माध्यमांच्या वापरकर्त्यांबद्दलचे उत्तरदायित्त्व स्पष्ट करते.
पत्रकारितेत प्रदीर्घ काळ काम केल्याने डॉ. आलोक यांच्या लिखाणात टोकदारपणा, संदर्भ आणि उपयुक्ततामूल्य पानोपानी जाणवते. त्यांना संशोधनाचा अनुभव असल्याने वर्तमानपत्रीय लेखांतही त्यांची संशोधनवृत्ती दिसते. अनेक लेखांमध्ये आकडेवारी, संदर्भ आणि विश्लेषणाचा सुयोग्य मेळ साधला आहे. साधारणतः गेल्या दहा वर्षातील माध्यमे आणि विशेषतः डिजिटल माध्यमांच्या विश्वात घडलेल्या ठळक घटना-घडामोडींचा हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा अविष्कार आहे. यात माध्यमांची केवळ माहिती नाही; तर लेखकाच्या बहुआयामी अनुभवाचा आणि त्यातून तयार झालेल्या चिंतनाचाही बराचसा भाग येतो. माध्यमांच्या अंतरंगापासून ते परिणामपर्यंतच्या अनेक गंभीर मुद्यांचा पुस्तकात उहापोह आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, डिजीटायझेशन, निवडणुका, राजकारण, कोरोना, लैंगिक शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जागतिकीकरण अशा अनेक विषयांना डॉ. जत्राटकर भिडले आहेत.
डॉ. जत्राटकर चित्रपटाचे अभ्यासक आहेत. कॅमेरा आणि चित्रपट या दोन्हीचे त्यांना विद्यार्थीदशेपासूनचे वेड. त्यांच्या लिखाणातही ते सातत्याने डोकावत राहते. ‘बचाओ नहीं, बेच डालो’ या लेखात ‘एक गाडी, बाकी अनाडी’ या चित्रपटाचा आणि मग लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा काही नावांचा संदर्भ येणे हा डॉ. जत्राटकर यांच्या चित्रपटवेडाचा परिणाम आहे. ‘बचाओ नहीं, बेच डालो’ असे मथळे देणे ही कला त्यांना पत्रकारितेने शिकवली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा वापर करुन सर्वसामान्य माणसांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी मथळ्यांची रचना केली आहे. हा भाषिक मोकळेपणाही पुन्हा त्यांना पत्रकारितेनेच शिकवला आहे. हे पुस्तक लेखकापेक्षा पत्रकाराचे जास्त आहे. पुस्तकांच्या अनेक पानांवर पत्रकारितेच्या खुणा दिसतात. ‘पोर्नबंदी’ आणि ‘पोर्नग्रस्त पौगंड’ हे दोन्ही लेख वाचत असताना डॉ. जत्राटकर यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयावर तितक्याच जबाबदारीने आणि विचारांच्या स्पष्टतेसह केलेले लिखाण त्यांच्यातील शिक्षकाची साक्ष देतो. इतर लेखांपेक्षा या दोन्ही लेखांच्या भाषेचा पोत निराळा आहे. हलक्याफुलक्या शब्दांत पण अणकुचीदार लेखन करुन त्यांनी अतिशय जोरकसपणे लैंगिक शिक्षणावर भर दिला आहे. प्रा. गवस सरांनी उल्लेख केलेल्या ‘लालित्यबळा’ची प्रचिती या दोन्ही लेखांत डॉ. जत्राटकर यांच्या लिखाणात येते.
डॉ. जत्राटकर यांच्या विद्यापीठाच्या जनसपंर्क कक्षाची मोठी जबाबदारी आहे. त्यासोबतच ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशीसुद्धा वेळ देतात. या सर्व धबडग्यातून वेगळा वेळ काढून ते नियमित लिहितात, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पत्रकारितेत असूनही स्वतंत्रपणे लिखाण करणारे कमी आहे. डॉ. जत्राटकर त्यापैकी एक. सतत वाचत-लिहित राहणं आणि नेहमी लिहित्या हातांना बळ देत, त्यांचा चांगुलपणा अधोरेखित करत पुढं जाणं हा त्यांचा स्वभावगुण. माध्यमविषयक वाचन-चिंतनातून त्यांचं ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक आकाराला आलं. त्यांच्याकडून यापुढील काळातही माध्यमविश्वाला असेच भरीव योगदान मिळावे. त्यांचे लिखाण पत्रकार, विद्यार्थी, संशोधक आणि माध्यमांच्या अभ्यासकांना निश्चित उपुयक्त ठरणार आहे. डॉ. जत्राटकर यांना भरपूर सदिच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा