भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो
वर्षे जातिव्यवस्था आणि त्यायोगे येणाऱ्या विषमतेच्या गर्तेमध्ये रुतून पडलेल्या
भारतीय समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढले. वर्णाश्रमाधारित उच्चनीचता, त्यातून
निर्माण झालेली आणि या समाजाच्या मनीमानसी खोलवर रुजलेली जातिव्यवस्था या साऱ्या
बाबींना बुद्धीप्रामाण्यवादाच्या बळावर उद्ध्वस्त केले. स्वातंत्र्य, समता आणि
बंधुता ही मूल्ये या समाजाला प्रदान करीत असताना या समाजाला एक देश म्हणून संघटित
करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले.
आजकाल भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा असं
कंठरवानं ओरडून आपल्या माथी काही तरी गीत, संगीत, नृत्य मारलं जातं. परंतु मुळात
भारतीय असं काही सन १९५०पर्यंत अस्तित्वात तरी होतं का, हा खरा प्रश्न आहे. आजचा
भारत हा मूळचा होता तरी काय? विखुरलेली शेकडो संस्थाने, त्यातले काही मोठे
राजे, तर काही छोटे. पण हा छोटे-मोठेपणा हा निव्वळ भौगोलिक विस्तार आणि संपत्तीवरच
जोखला जात असे. त्यांच्या-त्यांच्यात झडलेल्या या अस्तित्वासाठीच्या झगड्यांनी
आपला इतिहास व्यापून राहिला आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्मप्रसार,
त्यानंतर सम्राट अशोकाचा साम्राज्य व धम्मविस्तार यातून काही अंशी या नकाशाला आकार
येण्यास सुरवात झाली. त्यानंतरच्या काळात आधी मुस्लीम राज्यकर्ते आणि त्यानंतर
ब्रिटीश यांनी आपल्या साम्राज्यविस्ताराच्या नादात जो काही भूप्रदेश आपल्या
अखत्यारीत आणला, त्याला आधी हिंदुस्थानी सल्तनत आणि पुढे ब्रिटीश इंडिया असं
संबोधण्यात आलं. म्हणजे परकीयांच्या साम्राज्यविस्तारातून आजच्या भारताचे पूर्वरुप
खऱ्या अर्थाने आकाराला आले, असे म्हणता येईल. नाही म्हणायला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मध्य भारतामध्ये स्वराज्य निर्माण करून एक मोठा भूप्रदेश आपल्या अखत्यारीत आणला. पहिल्या बाजीरावाने अटकेपर्यंत झेंडा फडकविला. पण, पुन्हा पुढे त्याची शकले झालीच. हा इतिहास फार फार तर मागच्या
पाच-सात शतकांचाच अवघा... मग हे सारं भारतीयत्व आलं कोठून?
भारतीय उपखंड, हिंदुस्थानी सल्तनत, ब्रिटीश
इंडिया या साऱ्या संबोधनातून साकारलेल्या भारताला खऱ्या अर्थानं ‘भारत’ म्हणून संघटित करण्याचं
महत्त्वाचं कार्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
केलं. या देशातील धर्म, जाती, वंश, भाषा, प्रांत, उच्चनीचता, गरीब-श्रीमंत अशा
अनेक भेदांच्या भिंती भेदून साऱ्यांना लोकशाही व्यवस्थेच्या एकसमान प्रतलावर
आणून ठेवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. या देशाला, देशातील प्रत्येक नागरिकाला ‘भारतीय’ ही ओळख प्राप्त झाली, ती
केवळ बाबासाहेबांमुळेच. ‘वुई... दि पीपल ऑफ इंडिया...’ ही एकता, एकात्मतेची,
एकजिनसीपणाची भावना या भारतीय समाजात निर्माण करण्याचा ठोस प्रयत्न त्यांनी केला.
एकमेकांपासून अत्यंत भिन्न असलेल्या एका व्यापक भौगोलिक पटावरील समाजाला एका समान
सूत्रात, समान धाग्यात गुंफून अभिन्नत्व बिंबविण्याचे काम त्यांनी केले.
बाबासाहेब हे सच्चे राष्ट्रप्रेमी होते. त्यांनी
देशभक्ती वादातीत होती, हे या भारतीय समाजाला कंठरवानं ओरडून सांगितलं तरी, आजही बाबासाहेबांकडे
केवळ जातीच्या चष्म्यातून पाहून त्यांचं मोठेपण त्यांची ‘जन्मजात’ काढून नाकारण्याचे
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न सातत्यानं बिंबविण्याचे काम विविध पातळ्यांवर सुरू
असते. बाबासाहेबांनी मुळात इतक्या विविध क्षेत्रांत, इतक्या विविध ठिकाणी कामच
इतकं मोठं करून ठेवलं आहे की, त्यांना नाकारून अगर त्यांना ओलांडून आपल्याला पुढे
जाता येत नाही. उच्चवर्णीय, उच्चजातीय मानसिकता खोलवर भिनलेल्या भारतीय समाजाची
खरी समस्या ही आहे. आणि आजकाल प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक महापुरूषाकडं
जातीच्याच चष्म्यातून पाहायची सवय लागलेल्या नेत्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी
त्यांना केवळ ज्या त्या जातीच्या अस्मितेच्या साखळदंडांत करकचून बांधून टाकले आहे.
असे करताना या महान राष्ट्रपुरूषांना आपण जातीमध्ये बंदिस्त करून टाकतो आहोत,
त्यांचे मोठेपण संकुचित करतो आहोत, याचे भान मात्र कोणालाच राहिलेले नाही. भारतीय
समाजाचे खरे दुखणे हे आहे.
बाबासाहेबांनी विज्ञानवाद, विवेकवादाचा
सातत्याने पुरस्कार केला. शिक्षण हाच प्रगतीचा मूलाधार आहे, असे मानून या देशातील
बहिष्कृत समाजाला त्यांनी शिक्षणाची दीक्षा दिली. केवळ बहिष्कृतांच्या
शिक्षणासाठीच त्यांनी प्रयत्न केले नाहीत, तर बहुजन आणि अभिजन संज्ञेखाली
मोडणाऱ्या समाजालाही त्यांनी भारतातील जातिव्यवस्थेचे दुष्परिणाम पटवून देऊन ती
ध्वस्त करण्यासाठी प्रेरित केले. त्यांना तसे काही साथीदारही मिळाले. धर्माच्या
नावाखाली विषमतेचा पुरस्कार करणारी व्यवस्था त्यांनी नाकारली. जो धर्म माणसाला
माणूस मानत नाही, पशूपेक्षाही हीन वागणूक देतो, तो धर्म कसा? असा प्रश्न या समाजासमोर
उपस्थित करून धर्माच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालविले. मात्र,
एका क्षणी आपल्या दलित बांधवांना स्वीकारण्याची मानसिकता या धर्माच्या ठायी
उत्पन्न होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र बाबासाहेबांनी अत्यंत जड अंतःकरणाने ‘मी हिंदू म्हणून जन्माला
आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ अशी घनघोर प्रतिज्ञा केली.
बाबासाहेब कितीही विज्ञानवादी असले तरी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील धर्माचे
महत्त्व अगर स्थान त्यांनी नाकारले नव्हते. स्वतःच्या हिंदू धर्मातच राहून
समानतेची वागणूक शूद्रातिशूद्रांना, दलितांना मिळावी, ही त्यांची अपेक्षा रास्त
होती. पण, त्यांची ही अपेक्षा पूर्ण होत नाहीसे दिसल्यानंतरच त्यांनी नवा मार्ग
स्वीकारण्याचे ठरविले. मात्र, १९३५ साली केलेल्या या घोषणेनंतर बाबासाहेबांनी लगेच
आपला विचार अंमलात आणला नाही. या संदर्भातील त्यांचे चिंतन, विचारविमर्श सातत्याने
सुरू राहिले, ते थेट १९५६पर्यंत. त्यांनी या भूमीतच जन्मलेल्या आणि जगाला
सर्वप्रथम विज्ञानवादाची शिकवण देणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्माची निवड त्यासाठी
केली, हे सुद्धा बाबासाहेबांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, ही बाब आपण कधी तरी
समजून घेणार की नाही? बाबासाहेबांसमोर ख्रिस्ती, मुस्लीम आणि शीख या धर्मांच्या
अक्षरशः “ऑफर्स” होत्या. मात्र, बाबासाहेबांनी या देशात
पसरलेल्या एक षष्ठांश बहिष्कृत समाजाने कोणत्या दिशेने धर्मांतर केल्यास या देशाची
एकता आणि अखंडता बाधित होणार नाही, याचाच साकल्याने सर्वप्रथम विचार केला.
बाबासाहेबांनी त्यावेळी ख्रिस्ती, मुस्लीम अगर शीख धर्म स्वीकारला असता, तर
भारताला आज किती मोठ्या अराजकाला सामोरे जावे लागले असते, हे आजची परिस्थिती अवलोकनी
घेतली तरी लक्षात येते. मिशनरी स्वरुपाचे हे धर्म वाईट आहेत, अशातला भाग नाही.
माणसाच्या जीवनाच्या आचारसंहितेला दिशा देणारा, मर्यादशील राखणारा कोणताही धर्म,
त्याची शिकवण वाईट नसतेच कधी. मात्र, तो धर्म शिकविणारे, त्यांचे अनुयायी धर्माच्या
वाटचालीची दिशा अधोरेखित करीत असतात. या पार्श्वभूमीवर, त्यांनी ख्रिश्चन धर्म
स्वीकारला असता, तर या देशाची वाटचाल ख्रिश्चन राष्ट्र होण्याकडे झाली असती.
मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर आणखी एका देशांतर्गत पाकिस्तानच्या निर्मितीला ते
कारणीभूत ठरले असते. शीख धर्म स्वीकारला असता तर खलिस्तानी चळवळीला किती बळ मिळाले
असते, याचा विचारच करवत नाही! त्यामुळे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून
भारतीय समाजाचे अखंडत्व टिकविले आहे. म्हणूनच भारतीय समाजावर त्यांचे थोर उपकार
आहेत, असे मी म्हणतो.
बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती करीत असताना
येथील प्रत्येक नागरिक त्या घटनेच्या मध्यवर्ती ठेवून तिची रचना केली. या देशातील
प्रत्येक व्यक्तीला एक समान मूल्य प्रदान करण्याचे महत्कार्य त्यांनी केले. ‘एक व्यक्ती, एक मत, एक
मूल्य’ ही एक महत्त्वाची देणगी त्यांनी भारतीय समाजाला दिली. जात, धर्म, पंथ, लिंग,
भाषा, वंश, प्रांत आदी कोणत्याही भेदाशिवाय लोकशाहीच्या व्यापक पटावर प्रत्येक
भारतीय स्त्री-पुरूषाचे सममूल्य अधोरेखित करण्याचे कार्य त्यांनी केले.
बाबासाहेबांनी या देशात सामाजिक स्वातंत्र्याची
चळवळ बळकट केली नसती, तर या देशाच्या राजकीय स्वातंत्र्याला कवडीचेही मोल प्राप्त
झाले नसते, याची जाणीव भारतीय समाजाला नव्याने करून देण्याची वेळ येऊन ठेपलेली
आहे. पारतंत्र्याच्या हजारो वर्षांच्या झळा सोसून भारतीय समाजाने स्वातंत्र्याचे
मोल जाणलेले आहे. ते स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून चिरकाल अबाधित
राखण्याची पराकाष्ठा बाबासाहेबांनी केलेली आहे. राज्यघटनेला स्वातंत्र्य, समता व
बंधुता या नैसर्गिक, मानवी मूल्यांचे अधिष्ठान देऊन त्या पायावर भारत या एकसंध
राष्ट्राची उभारणी त्यांनी केलेली आहे. मात्र, आज या समाजात पुन्हा विषमतेची बीजे,
परस्परांबद्दल असूया आणि अविश्वास पेरून घटनाविरोधी कारवायांना बळ देण्याचे प्रकार
वाढीस लागले आहेत. जातीय, प्रांतिक, भाषिक अस्मिता टोकदार करून वादांना खतपाणी
घातले जात आहे. भारतीय ही ओळख बाजूला ठेवून इथे प्रत्येक जण कोणत्या तरी भाषेची,
जातीची, धर्माची, प्रांताची पताका घेऊन आपापल्या दिंड्या काढू लागला आहे. त्यासाठी
त्यांना प्रेरित केले जाऊ लागले आहे. भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय स्वातंत्र्य
या दोहोंसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्या दृष्टीने वेळीच सावध होण्याची वेळ आता
येऊन ठेपली आहे. अन्यथा, भारतात राहणाऱ्यांची नव्हे, तर भारत सोडून परदेशात
राहणाऱ्यांचीच ओळख केवळ ‘भारतीय’ अशी राहील. तशी वेळ येऊ न
देण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे.