मंगळवार, १४ जुलै, २०२०

‘यळगूड’ अन् मी...


'यळगूड'ची दूध उत्पादने


सहकार बेकरी उत्पादने


काही अनुषंगानं आज सर्फिंग करता करता यळगूडच्या श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेचा आज ५३वा वर्धापन दिन असल्याचं समजलं. या उत्पादनांचा मी नकळत्या वयापासून चाहता आणि कळत्या वयात ग्राहक बनलो असल्यानं या संघाच्या उत्पादनांशी एक खाद्यरसिक म्हणून अगदी लहानपणापासूनचं नातंय. त्या आठवणी मनात जाग्या झाल्या, म्हणून शेअर करतोय इतकंच...

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात सुमारे ५३ वर्षांपूर्वी यळगूड दूध संघानं सहकाराचं वारं आणलं आणि आपल्या वाटचालीनं सहकारी चळवळीबद्दल विश्वास आणि आपुलकी रुजविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. संस्थापक वसंतराव तात्यासाहेब मोहिते, सुजीतसिंह मोहिते यांचा त्यात महत्त्वाचा वाटा आहे. 

आज जरी इचलकरंजी-कागल रस्ता झाला असला तरी यळगूडला जायचं तर वाट वाकडी करूनच जावं लागतं. मग सुमारे ५० वर्षांपूर्वी जिथं कोल्हापूरचं स्वरुपच एखाद्या खेड्यासारखं होतं, तिथं यळगूडची काय अवस्था असेल? इथलं दळणवळण किती मागास अवस्थेत असंल? त्यातही १९६५चा कालखंड म्हणजे तर अत्यंत टंचाईचा. भारताच्या पंतप्रधानांनी लोकांना एक वेळचं खाऊन राहावं आणि जवानांना अन्न पुरवठा करावा, असा संदेश जनतेला दिलेला. अन्नधान्याच्या अशा टंचाईचा सामना करीत त्यातून देश सावरत असताना, वाटचाल करत असताना दूध व्यावसायिकांची सहकारी संस्था स्थापन करणं हा विचार खरं तर त्या काळात आत्मघातकीच ठरायचा. मात्र, संस्थापकांचा दुर्दम्य आत्मविश्वास, त्यांना साथ देणारे सहकारी, परिसरातील दूध उत्पादक शेतकरी या साऱ्यांच्या बळावरच हा संघ उभा राहिला. आजवरची वाटचाल यशस्वीपणे करू शकला.


आज या क्षेत्रात स्पर्धा मोठी वाढलीय, परिसरातच अनेक तुल्यबळ, तगडे प्रतिस्पर्धीही ठाकले आहेत. मात्र परिसरातील तरुण उद्योजकांना व्यवसाय करण्याची प्रेरणा देणारा हा संघच आहे. म्हणूनच या विभागातून वेगवेगळे दूध संघ आणि बेकरी उत्पादक मोठ्या आत्मविश्वासाने पुढं येताना दिसताहेत. आज जर हे
 तरुण यशस्वी होताना दिसताहेत, तर त्याचं कारणही यळगूड संस्थेनं केलेल्या भक्कम पायाभरणीमध्येच आहे. ही संस्था जर कुठे कोलमडताना, अडखळताना दिसली असती, तर या नव्या संस्थाही परिसरात उदयाला आल्या असत्या का, याविषयी शंका वाटते. त्यामुळे श्री हनुमान सहकारी दूध संस्था ही यळगूड पंचक्रोशीची भाग्यविधाती आहे.

माझ्या माहितीप्रमाणे यळ्ळम्हणजे कन्नडमधील सात आणि गूड म्हणजे टेकड्या. अर्थात सात टेकड्यांनी वेढलेले गाव, असं हे यळगूड. एकीकडं पंचगंगा आणि दुसरीकडे दूधगंगा अशा दोन नद्या आणि या सप्तटेकड्या अशा भौगोलिक परिस्थितीमुळे हा परिसर संपन्न आहे, हे खरंच. पण, त्याला प्रगतीची दिशा दिली ती इथल्या शेतकरी बांधवांच्या श्रम करण्याच्या वृत्तीनंच. शेतीबरोबरच कृषीपूरक व्यवसायाच्या बाबतीतही या परिसरातील शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने अथक योगदान दिलं आहे, आजही देत आहेत, त्यामुळंच यळगूडसारखे प्रकल्प दिमाखात उभे राहिले, हेही तितकंच खरं.

वसंतराव मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथलं ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या मंदिरात १४ जुलै १९६७मध्ये या सहकारी उद्योगाची स्थापना केली. संस्थेच्या लोगोमध्येही मोठा घट तोंडाला लावून दूध प्राशन करणारा हनुमान प्रतिष्ठापित करण्यात आला. जसा त्याचा घट रिता होत नाही, तसा या संस्थेच्या यशाचा आलेखही कधी खाली येणार नाही, असं जणू हा लोगो सूचित करीत राहतो. सहकार असं छापलेले आणि सुरवातीच्या काळात पिवळ्या आणि गडद निळ्या रंगाच्या कागदामध्ये बांधलेली संस्थेची बेकरी उत्पादनं - विशेषतः गोड, चेरीवाला ब्रेड हा त्या काळात घरोघरी इतका प्रिय झालेला होता की स्पर्धक बेकरी उत्पादक किंवा स्थानिक बेकरी उत्पादकही तशाच डिझाईनच्या कागदातून आपली उत्पादने विकायला ठेवू लागले होते. निदान सहकार समजून तरी लोक आपली उत्पादनं घेतील, अशी त्यांची भावना असावी. आमचे अनेक अशिक्षित पै-पाहुणे स्टँडवरुन येताना यळगूडचाच समजून काळ्या-पिवळ्या कागदातला डुप्लीकेट ब्रेड घेऊन येत असत. अशातलाच एक शिळा ब्रेड खाऊन फूड पॉईझनिंगही झालं होतं लहानपणी मला. (आजही काही काही गावांच्या आठवडी बाजारात पारले-जी बिस्कीटांच्या रॅपरची डुप्लीकेट बघायला मिळते.) इतकी लोकप्रियता या समूहाच्या वाट्याला आली. तीच गोष्ट यळगूडच्या चौरसाकृती नानकटाईची- ज्यावर केशरी- लाल रंगाचा गोड वर्ख असायचा. आम्ही लहान मुलं आधी त्याखालची मिठाई संपवित असू आणि सगळ्यात शेवटी हा गुळगुळीत गोड वर्ख खात असू. पुढे अनेक उत्पादकांनी या उत्पादनाचीही नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण, ती चव त्यात आणणं मात्र त्यांना जमलं नाही. अगदी खारी-बटरचेही अनेक प्रकार यळगूडनं आणले आणि यशस्वी केले. मला वाटतं, बिस्कीटे, बेकरी उत्पादनांच्या बाबतीत जी प्रयोगशीलता आणि कल्पकता त्या काळात या समूहानं दाखविलेली होती, तितकी आजतागायत अन्य कोणत्याही समूहानं दाखविल्याचं दिसत नाही. आज यळगूडची नक्कल असणारी अनेक उत्पादनं बाजारात आहेत आणि ती चांगली खपताहेत सुद्धा!

मिरजेला दूध पुरवठा करून त्यातून उरलेल्या दुधापासून बेकरी उत्पादनं करण्यास १९७२मध्ये यळगूडनं सुरवात केली. मिल्क ब्रेड ही संकल्पनाही त्यातनंच उदयाला आली. त्या काळात केवळ दुधाचा अपव्यय टाळणे हा हेतू असला तरी, पुढे दूध उत्पादनांपेक्षाही अधिक लौकिक, लोकप्रियता व प्रतिष्ठा या समुहाला बेकरी उत्पादनांनीच मिळवून दिली, हे मान्य करावे लागेल.

यळगूडच्या संदर्भात आणखी एक किस्सा आठवतोय, तो म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक बसस्टँडवर यळगूडच्या दूध आणि बेकरी उत्पादनांचा स्टॉल हमखास असायचा. तो इतका फेमस असायचा की स्थानिक असो, अगर येणारा पाहुणा, या प्रत्येकासाठी तो एक महत्त्वाच्या लँडमार्कची भूमिका बजावायचा. कोल्हापूरच्या स्टँडवर आजही हा स्टॉल मोठ्या दिमाखात उभा आहे. अत्यंत हक्कानं इथं बेकरी उत्पादनं घेणारे लोक जसे आहेत, तसेच कधीही दूध न पिणाऱ्या व्यक्तीलाही इथल्या सुगंधी दुधाची चव पुनःपुन्हा चाखावीशी वाटते, असे लोकही आहेत. यळगूडची उत्पादनं ही अशा प्रकारे इथल्या लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेली आहेत. या संघानं परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासाला असाच हातभार लावत राहावं, याच या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सदिच्छा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा