बुधवार, २९ जुलै, २०२०

पँथर जिंदा है..!

(पँथर ज.वि. पवार यांची दोन भागांची विशेष युट्यूब मुलाखत...)

सन १९७२ च्या २९ मे रोजी दलित पँथर या महाराष्ट्रात सामाजिक समता प्रस्थापनेसाठी आग्रही असणाऱ्या संघर्षशील दलित युवकांच्या संघटनेची स्थापना झाली. नामदेव ढसाळ आणि ज.वि. पवार यांनी मुंबईच्या रस्त्यावर चालत बोलत जात असतानाच या जहाल संघटनेच्या स्थापनेचे सुतोवाच केले. या स्थापनेला पार्श्वभूमी होती ती १९७० साली संसदेत सादर झालेल्या पेरुमल अहवालाची... या अहवालात दलितांवर देशभरात सुरू असलेल्या अन्याय, अत्याचारांचं विदारक प्रतिबिंब उमटलेलं होतं... अहवालात या अत्याचारांचे जे आकडे होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात दसपटीनं गावोगावी दलितांवर अत्याचार होत होते... महिलांची विटंबना होत होती... १४ मे १९७२ रोजी परभणी जिल्ह्यातल्या ब्राह्मणगावात सार्वजनिक विहीरीवर पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन दलित महिलांची बाभळीच्या काट्यांचे फटके मारत गावातून नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या या युवकांनी पँथरची स्थापना करीत प्रतिकाराला सज्ज होण्याची तयारी चालविली.

१९७२ सालातील जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने दलित पँथरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. एक तर ९ जुलै रोजी दलित पँथरची पहिली जाहीर सभा मुंबईत झाली आणि त्यांनी आपल्या अंगिकृत कार्याचा उद्घोष केला... ऑगस्टमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात असताना साधनेच्या विशेषांकात राजा ढाले यांचा काळा स्वातंत्र्यदिन हा लेख छापून आला. प्रतीकाच्या अवमानासाठी ३०० रुपयांचा दंड आणि माता-भगिनींच्या पातळाला हात घालणाऱ्याला ५० रुपये दंड? प्रतीकांच्या अपमानाचं दुःख मोठं की त्या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांचं?” असा खडा सवाल राजाभाऊंनी त्यात उपस्थित केला. पुढे वरळी-नायगावची मोठी दंगल झाली. पोलीसांकडून आंदोलकांवर मोठे अत्याचार झाले. पँथरचे नेते जखमी झाले, त्यांना पोलीसांनी उचलले. भय्यासाहेब आंबेडकरांच्या आवाहनानंतर ती शांतही झाली. पँथर तिच्या उद्देशामुळे देशभरात फोफावली. फुटीचे ग्रहण तिलाही लागले अन् देशातली एक महत्त्वाची चळवळ १९७७ साली- अवघ्या पाच वर्षांतच फुटली; पण थांबली नाही. त्या पाच वर्षांच्या काळात या चळवळीने ते केले, जे त्यापूर्वीच्या २५ वर्षांतच होणे अभिप्रेत होते. मूळच्या पँथरच्या असलेल्या संघर्षशील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध मार्गांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. या देशातल्या तरुणांच्या मनामनांत आणि हृदयात जोपर्यंत बाबासाहेब आहेत, तोपर्यंत हा पँथर मरणार नाही, तो जिंदाच आहे.

या चळवळीने देशाला नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, अविनाश महातेकर, अरुण कांबळे, दयानंद म्हस्के, के.बी. गमरे, गंगाधर गाडे, भाई संगारे, रामदास आठवले, उमाकांत रणधीर, एस. एम. अंधेरीकर, अरविंद निकाळजे, दादाभाऊ साळवे, रतनकुमार पाटलीपुत्र, सी.रा. जाधव, भालचंद्र मुणगेकर अशा अनेक उमद्या तरुणांची फळी दिली.

यंदा पँथरच्या स्थापनेला ४८ वर्षे होताहेत आणि पँथर ज. वि. पवार यांनी सुद्धा १५ जुलैला ७७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने दलित पँथरची स्थापना, वाटचाल, फूट आणि आजची परिस्थिती या अनुषंगाने पँथर ज.वि. पवार यांच्याशीच संवाद साधून त्यांच्याकडूनच दलित पँथरविषयी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही दोन भागांची सविस्तर विशेष मुलाखत येथे आपणा सर्वांसाठी सादर करीत आहे. आपणाला ती आवडेल, असा विश्वास आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा